डोक्यात घाणेरड्या कल्पना/विचार कुठून येतात ? त्यांचा मूळ स्रोत नक्की काय आहे ?

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
11 Apr 2019 - 11:58 am
गाभा: 

मिपाकरांनो , माझा विषय तसं बघायला गेलं तर खूप कठीण आहे आणि कदाचित नाही सुद्धा .. मी माझ्या स्वतःबद्दल सांगतो , मला काहीतरी वेगळे लिहायला फार आवडते .. पण ते बऱ्याचदा खूप भयानक असते , इतके कि मी स्वतःच ते फाडून फेकून देतो .. चांगलं फार कमीवेळा सुचते पण वंगाळ मात्र पाचवीला पुजल्यासारखं चिकटलेलं असतं. हे असं का होत ते माहित नाही पण चांगले असे काही सुचतच नाही ..
मला हा प्रश्न पडला आहे , कि या वंगाळ कल्पना नक्की येतात तरी कुठून आणि कश्या येतात ? त्या येऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ?
विषय तुमच्यासाठी सोप्पं असेल पण माझ्यासाठी नक्कीच कठीण आहे ..

प्रतिक्रिया

तुमच्या डोक्यात जे काही येतंय ते सगळं रोज लिहून काढा.
आणि पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने ते सगळं नेऊन मानसोपचार तज्ञाला दाखवा.
ते प्रोफेशनली योग्य मदत करू शकतील.

उगा काहितरीच's picture

11 Apr 2019 - 2:02 pm | उगा काहितरीच

एक नंबर उपाय !

(कृहघ्या )
डोक्यात आलं खिलजी गेले मानसोपचार तज्ञाकडे, त्याने शांतपणे वाचून घेतलं. आणि काठी हातात घेऊन मागे लागला , एवढं घाणेरडं सुचलच कसं म्हणून !
;)

खिलजि's picture

11 Apr 2019 - 4:04 pm | खिलजि

==)) ==)) ==)) ह्हि ह्हि ह्हि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2019 - 2:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ताशी कुठे मिपावर आल्यासारखं वाटलं...!!!
=))

-दिलीप बिरुटे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Apr 2019 - 1:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

स्तोत्र पठण रामरक्षा,मनाचे श्लोक ह्यावर भर देऊन काही फरक पडतो का बघावास रे खिलजी.

माई तुम्ही वर दिलेली सर्व स्तोत्रे अगदी तोंडपाठ आहेत . पण हे सर्व करूनही काही फरक पडत नाही मला .. मी तर नित्यनेमाने हि स्तोत्रे ना बघता म्हणतो .. पण या येणाऱ्या कल्पना काही नष्ट होत नाहीत .. अचानक उफाळून येतात लाव्हासारख्या ....

चामुंडराय's picture

12 Apr 2019 - 4:10 am | चामुंडराय

अगदी अगदी
स्तोत्र म्हणतानाच भलते सलते विचार मनात येतात जे इतर वेळी फिरकत देखील नाहीत.
काय स्तोत्रबंगाल आहे कोण जाणे !
शेम टू शेम अणभव

घाणेरडे म्हणजे नेमके काय ? ते 'घाणेरडे' आहेत, हे तुम्ही कश्यावरून ठरवता ? सामान्यपणे कामवासना, हिंसा, छळ करणे, कुरूपता, समाजात रूढ असलेल्या समजूती-श्रद्धा यांचे विरुद्ध असलेल्या कल्पना/विचार ... वगैरेंना 'घाणेरडे' समजले जाते. तुमचे विचार कोणत्या प्रकारचे असतात ? तुम्ही त्यांच्याशी जेवढे झगडाल, तेवढे ते आणखी प्रबळ होऊ शकतात. त्यांचा निचरा कोणत्यातरी कलेद्वारे करत राहिले पाहिजे. तुमची कल्पनाशक्ती अफाट आहे, त्यामुळे तुम्ही ज्या प्रकारच्या कविता करता ते चांगले माध्यम आहे. ते तुमचे वैगुण्य नसून ताकद आहे. आपले लिहीलेले फाडून टाकू नका. चित्रकलाही अजमवा.
माझ्यापुरते म्हणाल, तर मला तुमचे तसले लिखाण वाचायला आवडेल, आणि असे अनेक असतील, शोध घ्या.
Hieronymus Bosch (१४५०-१५१६) याची दोन चित्रे देतो आहे, भीषण कल्पना चित्रात मांडून तो विख्यात चित्रकार बनला. याची आणखी चित्रे बघा.

.

.

पाडगावकरांची एक कविता:

सुंदर आहे माझी वासना
सुंदर जशी आषाढघनांची उन्मत्त गर्जना !
सुंदर जसें तलम आकाश...
पांढरा प्रकाश...
उडते पक्षी...
चांदण्यावरील छायांची नक्षी...
बेफाम नदीचें मत्त समुद्राशीं गाढ आलिंगन
रातराणीनें वार्‍याला दिलेलें मादक चुंबन
सुंदर जसा रात्रीच्या गडद काजळीमधून
लखलखणारा विजेचा तराणा
सुंदर आहे माझी वासना

करून आपुला सुतकी चेहरा म्हणाले कोणी :
वासना म्हणजे पापाची खाणी !
वासना म्हणजे अनीति अनीति
वासना म्हणजे मृत्यूची दूती
हवा ना ईश्वर ? हवी ना मुक्ती ?
पळा रे पळा रे हिचियापासून
अवघें पुण्यच जाईल नासून !
क्षितिजावरतीं केशरी अंजिरी रंगांत न्हाऊन
हीच मायाविणी घाली भुलावण,
नकोच नकोच हिचें तें दर्शन !
सौदर्यवतींचें प्रमत्त यौवन हिचें इंद्रजाल
अवघें सौदर्य इथूनतिथून समजा खुशाल
हिचें हलाहल !
मिटून लोचन
तपस्या करून
मिळवा विजय हिचियावरतीं
वासना म्हणजे मृत्यूची दूती
शांतं पापम्‌ !

आठवतो ना ऋषि पराशर ?
केवढें सामर्थ्य ! प्रत्यक्ष ईश्वर !
लोचनामध्यें तपाची दीप्ती
पुण्याचें गाठोडें पाठीवरतीं !
भर दुपारीं
नाचर्‍या पाण्याला ऒढच भारी
पार्‍याच्या रंगाची एखादी मासळी
लकाके...उसळे...घेऊन उसळी
चंचल पाण्याच्या नाचर्‍या लयींत होडी खालींवर
धीवरकन्यका सत्यवतीचें तसेंच ऊर
कृष्ण भुवयांचें ताणलें धनुष्य
फुलानें विंधिला पाषाण प्रत्यक्ष !
मदनविव्हल म्हणे पराशर :
’ये ना सत्यवती, जवळ सत्वर ! ’
लाजे सत्यवती : ’ काय हें भलतें..असता दुपार !’
हसला धुंदींत ऋषि पराशर
केवढें सामर्थ्य, प्रत्यक्ष ईश्वर !...
क्षणांत मालवे जळती दुपार
पसरे भोवतीं चंचल...कापरा...सुगंधी अंधार !

होय मत्स्यगंधा योजनसुगंधा...
...वार्‍याच्या मनांत नाचलीं गाणीं
...भिजे चांदण्यांत लाजरें पाणी !
आणिक पुढतीं--
व्यासाचें गाठोडें झाडाच्या मुळाशीं
पुण्याचें गाठोडें घेऊन पाठीशीं निघे पराशर

सुंदर आहे माझी वासना
सुंदर जशी आषाढघनांची उन्मत्त गर्जना !
दिसावें कसें आंधळ्या डोळ्यांस
हिचें हें लावण्य,सौदर्यविलास ?
दांभिक दुबळे :
कोठून तयांस हिचिया शक्तींची विराट प्रतीति ?
मरण्यापूर्वीच पावलोपावलीं भेकड मरती !

समर्थ सुंदर आहे वासना
हिचियाभोवतीं सहाही ऋतु हे धरिती फेर
उघडा लोचन; पहा चौफेर !
हीच वसंतांत,फुलांत पानांत
मातीच्या मनांत
प्रेरित पेरीत सौंदर्य जाते
लावण्यवतींच्या धुंद कटाक्षांत
हिच्याच खड्‍गाचें अमोघ पातें !
हिचेंच यौवन वर्षेच्या सहस्त्र धारांत धुंद
चंचल झर्‍यांत हिचाच छंद,
दीर्घ चुंबनांत , मादक मिठींत
सुगंधी उत्सव हिचिया गानाचा
हिच्याच स्पर्शे मातींत संचार हिरव्या प्राणाचा

हिचीच प्रेरणा भूमींत रुजते , जळांत न्हाते ,
वरतीं सरते तृणाचें हिरवें होऊनि पातें
हीच निर्मितीच्या करींची सतार
पांच इंद्रियांच्या तारांवरतीं
मोहरे अमर जीवनश्रृंगार !

सुंदर आहे माझी वासना
सुंदर जशी आषाढघनांची उन्मत्त गर्जना :
जिच्यांत लपली नव्या सृजनाची अद्‍भुत प्रेरणा !

-मंगेश पाडगावकर
( जिप्सी )

सुंदर प्रोत्साहनपर प्रतिसाद ,, धन्यवाद चित्रगुप्त साहेब,, त्रिवार धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2019 - 4:30 pm | चौथा कोनाडा

जबरदस्तच आहे.

तुषार काळभोर's picture

11 Apr 2019 - 6:05 pm | तुषार काळभोर

वासनेत सौंदर्य शोधायला दृष्टी तशी हवी.

शेखरमोघे's picture

11 Apr 2019 - 7:52 pm | शेखरमोघे

खिलजीन्चा प्रश्न अवघड आहे कारण अशाच सगळ्या प्रश्नान्चे उत्तर शोधण्यासाठी मनावर विजय मिशोधण्यासाठीअनेकाना अनेक प्रयत्न करावे लागले आहेत.
प्रतिसाद आवडला.

खरंच लय वंगाळ चित्र वाटतेय ..

mrcoolguynice's picture

11 Apr 2019 - 2:14 pm | mrcoolguynice

Define first, What is "घाणेरड्या कल्पना" for you ?

पूर्वी युरोपात वैद्यकीय पेशातील लोकं, गाडलेले मृतदेह उकरून त्यावर अभ्यास करायचे ! तत्कालीन घाणेरडी कल्पना...

अजमल कसाबला , सरकारी वकील देणे (डिफेन्स ) ! काही लोकांसाठी घाणेरडी कल्पना ...

===========हि घ्या अति***शी*** घ्र कल्पना ==========

शेम्बड्या पोरानं हागूरडीला इचारलं

शेमबुड पुसायला बायको पाहिज्ये

तुझ्यावाणी देखणी

हागूरडी लाजली अन म्हणाली

मला बी धुवून धुवून कंटाळा आलाय

तूच बाणतोस का रं माझा धनी ?

शेम्बड्याची व्हता पंचाईत

हागूरडी आली व्हती घाईत

काढुनी गळ्यातला ताईत

हागूरडीच्या गळ्यात बांधला

हागूरडीन हात पकडला

अन थेट परसाकडं नेला,,,धुण्यासाठी

आनन्दा's picture

11 Apr 2019 - 5:05 pm | आनन्दा

ही काय वाईट नाय बुवा..
मला तर आवडली.

हे असं आहे तर ,, कसं लिहावं आणि किती फाडावं , तेच तर कळत नाही आहे.. तुमच्या सखोल मार्गदर्शनाची गरज आहे राव ...

धत्त्तेरी. मोठाच द्वाड निघालास रे तू खिलज्या.
इकडे तमाम वाचकवर्ग मोठ्या उत्कंठेने वाट बघत होता, की आता काहीतरी 'सनसनीखेज' वाचायला मिळणार... तो 'सनसनी' तला दाढीवाला नाही का, आपल्याकडे बोट दाखवून सांगतो, तसे काहीतरी 'रोंगटे खडे करने' वाले, किंवा जे ऐकून आपले 'दिल दहल' जाईल, एखादा 'खौफनाक दरिंदा'च करू शकेल, असले काही कृत्य करण्याचे विचार येत असतील, आणि ते सर्व लिहीलेले कागद तू तुझ्या 'खूनी खंजर' ने टराटरा फाडत असशील .... पण अगदीच फुसका बार ठरला रे शेवटी.

"प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा कवीचा असे" असे केशवसुत सांगून गेलेत, ते उगाच नाही. 'शैशव' म्हणजे शिशुवय. अर्थात शी-शू चे वय. खुद्द केशवसुतांनीच असल्या शिशु कविता लिहाव्यात असे सांगून ठेवलेले असताना टेन्शन किस बात का ? 'कट्यार' मधे महाग्रु नाही सांगत का "गाते रहो बेटे" तसे लिखते रहो.
हो, आणि अशा कविता 'शिशुपाद' या टोपण नावाने लिहाव्यात, असे 'ह्यांचे' म्हणणे. त्याखेरीज त्या मोर्‍याच्या सांगण्यावरून काही लोक स्वमूत्र पीतात, अंगाला लावतात, आणि काय काय करतात. असे करण्याने सुद्धा असले विचार मनात येत रहातात, असेही 'ह्यांचे' म्हणणे.

-- बाईसाहेब फुर्‍र्‍र्सुंघीकर.

खिलजि's picture

12 Apr 2019 - 2:16 pm | खिलजि

ह्ही ह्ही ह्ही ह्ही

आजपर्यंतचा सर्वात जवळचा अभिप्राय .. माईसाहेब एकेरी संबोधतात तेही जवळचे वाटते .. पण तुम्ही जो हा प्रतिसाद दिला आहे ना तो ज्जाम आवडला ..
शिशुपालाचे जसे शंभर अपराध कृष्णाने माफ केले होते आणि नंतर त्याची सुदर्शनचक्र सोडून मुंडी उडवली होती , त्याप्रमाणे आपण मला शिशुपाद बनायला सांगून शंभर कविता करायला सान्गताय कि काय .. म्हणजे मग आहे १०१ व्या कवितेला जी वर एल .... त्यापेक्षा मी काय करतो , काही भयानक झालीच तर तुम्हाला व्यनि करेन , वेळ मिळेल तेव्हा वाचा आणि प्रतिसाद द्या .. कशी वाटली आयडिया ..

ओके जे घाणेरड्या म्हणजे ओंगळ असे तुम्हाला म्हणायचे आहे काही हरकत नाही
तुमचे प्रयत्न चालू ठेवा समाज ठरवेल ते ऑनगळ आहे की नाही ते

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Apr 2019 - 5:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

रामदास स्वामी दासबोधात काय लिहीतात ते वाचा

नर्काचें कोठार भरलें । आंतबाहेरी लिडीबिडिलें । मूत्रपोतडें जमलें । दुर्गंधीचें ॥
जंत किडे आणी आंतडी । नाना दुर्गंधीची पोतडी । अमुप लवथविती कातडी । कांटाळवाणी ॥
सर्वांगास सिर प्रमाण । तेथें बळसें वाहे घ्राण । उठे घाणी फुटतां श्रवण । ते दुर्गंधी नेघवे ॥
डोळां निघती चिपडें । नाकीं दाटतीं मेकडें । प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥
लाळ थुंका आणी मळ । पीत श्लेष्मा प्रबळ । तयास म्हणती मुखकमळ । चंद्रासारिखें ॥
मुख ऐसें कुश्चीळ दिसे । पोटीं विष्ठा भरली असे । प्रत्यक्षास प्रमाण नसे । भूमंडळीं ॥
पोटीं घालितां दिव्यान्न । कांहीं विष्ठा कांहीं वमन । भागीरथीचें घेतां जीवन । त्याची कोये लघुशंका ॥
एवं मळ मूत्र आणी वमन । हेंचि देहाचें जीवन । येणेंचि देह वाढे जाण । यदर्थीं संशय नाहीं ॥
पोटीं नस्तां मळ मूत्र वोक । मरोन जाती सकळ लोक । जाला राव अथवा रंक । पोटीं विष्ठा चुकेना ॥
निर्मळपणें काढूं जातां । तरी देह पडेल तत्वतां । एवं देहाची वेवस्था । ऐसी असे ॥

हे देखिल घाणेरडे आहे का? तर नक्कीच नाही. कारण समर्थांचा हे लिहिण्यापाठीमागे काहीतरी चांगला उद्देश होता.

असे काहिसे धेय्य ठेउन लिहिले तर कदाचित आपले लिहिणे घाणेरडे वाटणार नाही.

पैजारबुवा,

शाम भागवत's picture

11 Apr 2019 - 8:27 pm | शाम भागवत

व्वा!
झकास व चपखल उत्तर.

अन्या बुद्धे's picture

12 Apr 2019 - 2:03 pm | अन्या बुद्धे

हेच म्हणतो.. त्यातून सांगायचं आहे काही.. अस असेल तर त्या सांगण्याच्या कंटेंट नुसार लिखाण घाण की छान ते ठरेल..

काही शिकायचे ,करायचे,गाठायचे यासाठी जिद्द नसली की डोके रिकामे राहाते. ते कशानेही भरले जाते.
तरुण मुलांममध्ये खेळ , मैदानी खेळ याची आवड असली की आपोआपच इतर गोष्टी दूर राहतात.
रेझिझ्टन्स नसला की शॅार्ट सर्किट तसे शरीर आणि बुद्धिला विरोधक नसला की सडतात.

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2019 - 5:44 pm | चौथा कोनाडा

:-))

आता भयानकच काहीतरी शिकायचे,
ते घाणेरड्याच शब्दात मांडायचे,
लोकांना ते ओंगळच वाटले पाहिजे,
हे सगळं सनसनाटीच वाटले पाहिजे
असंच ठरवल्यावर आणखी काय म्हणायचे ?

कृ ह घेणे

एक नंबर पेस्तवली हाय , पै बु काका .. तसेही समर्थ आमचे खासमखास मार्गदर्शक .. त्यांच्या कृपेनेच आम्ही इथवर आलो आहोत आणि पुढेही जाऊ ... पण हे दासबोधरूपी कवन जास्तच भावले ..

सुबोध खरे's picture

12 Apr 2019 - 2:18 pm | सुबोध खरे

एक सद्गृहस्थ मनोविकार तज्ज्ञाकडे गेले आणि म्हणाले कि डॉक्टर मला रात्री फार "घाणेरडी" स्वप्नं पडतात.
माझ्या स्वप्नात अर्धनग्न आणि नग्न सुंदर स्त्रिया येतात आणि मग जाग आली कि मला फार शरमल्यासारखं होतं

डॉक्टरनी त्यांना औषधे दिली आणि १५ दिवसांनी यायला सांगितले

१५ दिवसांनी आल्यावर डॉक्टरांनी विचारले "काय, किती सुधारणा आहे?"

सद्गृहस्थ म्हणाले -- हो, भरपूर सुधारणा आहे

डॉक्टर -- मग ता आता "तशा" स्त्रिया स्वप्नात येणे बंद झालं का?

सद्गृहस्थ (जरासं लाजत)-- नाही, "तशा" स्त्रिया अजून स्वप्नात येतात. पण आता मला लाज शरम वाटणं बंद झालंय

))=(( , ))=((

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2019 - 11:10 am | चौथा कोनाडा

हा .... हा ..... हा ...... !

अशी स्वप्नं पडण्यासाठी काय करायला पहिजे हे मानसोपचार तज्ज्ञांना विचारलं पाहिजे !

आमाला स्वप्नं म्हंजे पगार वाढ झालीय, बायको खुष त्यामुळं आमीए टेन्शन फ्री !
नाय तर मग कमळ, पंजा, घड्याळ, सायकल, ७२,००० रु वै

अहो त्यांचा प्रॉब्लेम वेगळा होता..

त्यांना जाग आल्यावर जी लाज वाटायची त्याची कारणे अन्य काही असणार.. त्यांच्यावर उपाय केल्यावर त्यांना लाज वाटायची बंद झाली असणार..

आपले प्रॉब्लेम वेगळे आहेत..

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2019 - 5:10 pm | चौथा कोनाडा

आपले प्रॉब्लेम वेगळे आहेत..

खरयं !

हा .... हा ..... हा ...... !

Reddit वर चक्कर मारून या एकदा.

:)

खिलजि's picture

12 Apr 2019 - 5:45 pm | खिलजि

सद्गृहस्थ आणि त्यांची चॅन चॅन स्वप्ने

असेल हिम्मत तर याचे विडंबन करून दाखवा

https://misalpav.com/node/44384

फार कठीण आहे आणि जोखमीचे पण .. जरा लाईन आणि लेन्थ बिघडली तर अनर्थ होऊ शकतो .. मी गळक्या माठाचा अर्थ वेगळा घेतलेला आहे आणि बरेच प्रतिसाद एकदम सरळ मार्गी आलेले आहेत त्यामुळे नक्की लेखन कुठल्या अर्थाने झालेले आहे तेच कळत नाही . कारण मूळ लेखाची प्रतिक्रिया कुठंच दीसत नाही आहे ..

म्हणूनच, मला पण अर्थ वेगळा वाटतोय.
एक विडंबन होऊनच जाऊद्या

खिलजि's picture

15 Apr 2019 - 2:08 pm | खिलजि

ह्ही ह्ही ह्ही

बघतो जमलंच तर व्यनि कारेन नक्की

आणि तुम्ही तेव्हा मला सांगा , कि हि पेस्तवयाची कि नाय ते

खिलजि's picture

16 Apr 2019 - 5:35 pm | खिलजि

मी आपल्याला विडंबन व्यनि केला आहे , वाचून प्रतिसाद द्यावा

बॅटमॅन's picture

17 Apr 2019 - 2:09 am | बॅटमॅन

घाण म्हणजे नक्की काय?

१. तांब्या, भांडे, पडणारं पीठ इ.इ.
२. झ**पणा
३. सांस्कृतिक प्रतीकांबद्दल काही अशिष्ट विचार

यांपैकी

१ असेल तर मिपावर कविता पाडा
२ असेल तर मचाकवर कथा पाडा
३ असेल तर लोकांना सांगू नका कारण लोक मारतील.

प्रमोद देर्देकर's picture

17 Apr 2019 - 10:46 am | प्रमोद देर्देकर

चला तुमच्या घाणेरड्या कल्पनेच्या उत्तरासाठी तरी बॅट्या आला मिपा वर परत

जय हो बॅटमॅन की ।!

खिलजि's picture

17 Apr 2019 - 1:03 pm | खिलजि

विवेचन आवडलेले आहे .. सुटसुटीत नि छोटेखानी पण प्रत्येक मंचाची कहाणी ..

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2019 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा

काय म्हणावे ह्या लेखाला शी'वरचा लेख! =))

खिलजि's picture

17 Apr 2019 - 3:07 pm | खिलजि

आलास माझ्या मित्रा ,, तुला लिहिताना बघून खूप बरे वाटले .. मला माहित आहे सांसारिक उन्हाळ्यामुळे हैराण होतो इथं प्रत्येकजण ,, पण निदान एक , फक्त एक तरी प्रतिसाद देऊन जात जा म्हणजे बरे वाटत राहील ...

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2019 - 10:51 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif
------------
http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/fireman-smiley-emoticon.gif

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2019 - 10:52 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif
------------
http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/fireman-smiley-emoticon.gif

खिलजि's picture

19 Apr 2019 - 12:35 pm | खिलजि

हायला ह्ये कुठलं मशीन म्हणायचं रे आत्माराम .. सांसारिक उन्हाळ्यावर तोडगा कि काय ..

कपिलमुनी's picture

18 Apr 2019 - 6:07 pm | कपिलमुनी

सॉ, हिल्स हॅव आईज , राँग टर्न असे चित्रपट सलग बघा !

माम्लेदारचा पन्खा's picture

7 May 2019 - 6:32 pm | माम्लेदारचा पन्खा

आॕनलाईन खरेदी करणाऱ्या लोकांना जसं डेटा अॕनालिटिक्स वापरून सूचक जाहिराती दिसतात तसंच आहे हे ! आता घाणेरडं वाटणारं कधीतरी तुम्हाला बेहद्द आवडलेलं असणार...आठवून पहा !