कर्करोग आणि दुर्दैव !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
25 Mar 2019 - 7:32 am

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. या वैज्ञानिक लेखात हे दैव वगैरे कुठून आले हा प्रश्न लगेच मनात येईल. पण घाबरू नका ! कर्करोगासंबंधात ‘दुर्दैव’ हा शब्द दोन वैज्ञानिकांनीच उपस्थित केलेला आहे. सामान्य माणूस ज्याला दुर्दैव म्हणतो त्याचा वैज्ञानिक पातळीवरील अर्थही त्यांनी सांगितलेला आहे. तो तुमच्यापर्यंत पोचविण्यासाठीच मी हा लेख लिहीत आहे.

तर या सगळ्या प्रकरणाची सुरवात २०१५मध्ये झाली. Cristian Tomasetti (गणितज्ञ) आणि Bert Vogelstein (जनुकतज्ञ) या वैज्ञानिकांनी काही कर्करोगांचे मूळ कारण सांगणारी त्यांची “Bad Luck Theory” विज्ञान विश्वात सादर केली. ती जाणून घेण्यापूर्वी या विषयाचा पूर्वेतिहास थोडक्यात जाणून घेऊ.

कर्करोगाची कारणमीमांसा हा अनेक वर्षे सतत अभ्यास होत असलेला विषय आहे. त्यावर अफाट संशोधन होत आहे. त्यातून नवनवी गृहीतके पुढे येतात. मग त्यावर सखोल चर्चा होते आणि मतभेद झडत राहतात. या सगळ्यामागे वैज्ञानिकांचा हेतू एकच असतो. तो म्हणजे कर्करोगाच्या कारणाच्या सखोल मुळाशी पोचणे. एव्हाना या रोगाच्या बाबतीतली मध्यवर्ती कल्पना स्पष्ट झालेली आहे - मुळात कर्करोग होण्यास पेशींतील काही महत्वाच्या जनुकांचा बिघाड कारणीभूत असतो.
जनुकीय बिघाड(mutation) हा मुख्यतः दोन प्रकारे होतो:
१. वातावरणातील (environmental = E) कर्करोगकारक घटक : यात किरणोत्सर्ग, रसायने आणि काही विषाणूंचा समावेश होतो.

२. अनुवंशिकता (Heredity = H)
या दोन्ही प्रकारातील( E व H) कारणे प्रस्थापित झालेली आहेत. परंतु काही कर्करोगांच्या बाबतीत ती दोन्ही लागू होत नसल्याचे आढळून येते. त्यामुळे संशोधकांना अन्य काही कारणांचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी पेशीतील DNAवर लक्ष केंद्रित झाले. जेव्हा एखाद्या मूळ पेशीचे विभाजन होते, तेव्हा त्यातील DNAचेही विभाजन (replication) होऊन त्याच्या प्रतिकृती तयार होतात. या प्रक्रियेत कधी ना कधी चुका (random errors) होतातच आणि त्या अटळ असतात. अशा काही चुकांतून जनुकीय बिघाड होतात. त्यातील काहींमुळे पुढे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगाच्या कारणमीमांसेतील हे तिसरे कारण स्पष्ट झाले आणि त्याला ‘R’ (Replication दरम्यानच्या चुका) असे संबोधले गेले.

वयानुसार जसे पेशींचे विभाजन वाढत्या प्रमाणात होते, त्याच प्रमाणात या चुकाही वाढत जातात. परिणामी कर्करोगाची शक्यता वाढती राहते. आता ‘R’ प्रकारच्या चुका का होतात? तर याला काही उत्तर नाही. काही व्यक्तींत त्या जास्त तर काहींत कमी होतात इतकेच. म्हणून या तत्वास अनुसरून या वैज्ञानिक द्वयीने या प्रकाराला ‘bad luck’ असे लाक्षणिक अर्थाने संबोधले. अन्य काहींनी या गृहितकाला ‘TV थिअरी’ असेही नाव दिले – यातील T व V ही त्या दोघांच्या आडनावाची अद्याक्षरे आहेत !

२०१५मध्ये हे गृहीतक प्रसिद्ध झाले खरे पण त्यात काही त्रुटी होत्या. अन्य कर्करोग संशोधकांनी त्यावर खालील आक्षेप घेतले:
१. समाजातील एकूण कर्करोगांपैकी नक्की किती टक्के हे ‘R’ चुकांमुळे होतात?
२. या अभ्यासात स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगांचा समावेश नव्हता आणि हे तर बऱ्याच प्रमाणात आढळतात. त्यामुळे अशा चुका आणि विशिष्ट अवयवाचा कर्करोग याची सांगड कशी घालायची?
३. हा अभ्यास फक्त अमेरिकी रुग्णांच्या माहितीवर आधारित होता. मग जगातील विविध वंशियांना याचे निष्कर्ष कसे लागू होतील?

त्यातून स्फूर्ती घेऊन या द्वयीने या विषयाचा व्यापक अभ्यास केला. आता त्यांनी संशोधनात जगातील ६९ देशांतील रुग्णांचा समावेश केला. त्याचबरोबर एकून ३२ प्रकारचे कर्करोग अभ्यासले आणि त्यात अर्थातच स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगांचाही समावेश होता. मग २०१७मध्ये त्यांनी पुढील निष्कर्ष जाहीर केले. त्यात विविध कर्करोग आणि त्यांच्या कारणांची साधारण टक्केवारी दिली. ती अशी होती:
६६% कर्करोग हे ‘R’ मुळे होतात.
२९% .......... हे ‘E’ मुळे, तर
५% ....... हे ‘H’ मुळे.

अर्थात ही सर्वसाधारण आकडेवारी होती. मग निरनिराळ्या अवयवांच्या रोगांचीही टक्केवारी काढली गेली. त्यातली काही प्रमुख अशी:
१. प्रोस्टेट, मेंदू आणि हाडांचे कर्करोग : ९५% ‘R’ मुळे
२. फुफ्फुस कर्करोग : ३५% ‘R’ मुळे (आणि ६५% ‘E’ मुळे).

यावरून एक लक्षात येईल. काही कर्करोगांच्या बाबतीत ‘R’ हे कारण अगदी योग्य आहे पण अन्य काहींच्या नाही. फुफ्फुसाचा कर्करोग होण्यास ‘E’ म्हणजेच धूम्रपान अधिक अंशी जबाबदार आहे. त्यामुळे दुर्दैवाचे गृहीतक प्रत्येक कर्करोगाला लागू होईलच असे नाही.

आता या गृहितकावर अधिकाधिक टीका होऊ लागली. काही गणितज्ञांनी याचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या मते या वैज्ञानिक द्वयीने त्यांच्या अभ्यासात संख्याशास्त्राची सूत्रे नीट वापरलेली नाहीत. त्यामुळे या विषयावरील गोंधळ अजून वाढला.

Tomasetti आणि Vogelstein यांनी त्यांच्या गृहीतकाच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडले. त्यांच्या मते ‘R’ कारण जर आपण रुग्णांना पटवून दिले तर त्यांच्या मनाला खूप बरे वाटते. विशेषतः खालील प्रकारच्या रुग्णांत याचा उपयोग होतो:
१. अजिबात धूम्रपान न करताही फुफ्फुसाचा कर्करोग झालेले रुग्ण.
२. काही जणांची आहारशैली अगदी आरोग्यपूर्ण असते तसेच ते वातावरणातील कर्करोगकारक जहाल घटकांच्या फारसे संपर्कात आलेले नसतात. तरीही त्यांना एखादा कर्करोग झालेला असतो.

३. लहान मुलांच्या कर्करोगात तर हे स्पष्टीकरण खूप कामी येते. त्यांचा रोग जर अनुवांशिक नसेल तर अशा वेळेस त्यांच्या पालकांना खूप अपराधी वाटते. मुलांत ‘E’ प्रकारची कारणे सहसा लागू नसतात. “मग माझ्याच मुलाच्या वाट्यास हे का आले?” असे ते उद्वेगाने म्हणतात. इथे ‘R’ चे स्पष्टीकरण चपखल बसते.

वरील तिन्ही प्रकारांत संबंधित रुग्ण “नशीब माझे” असेच स्वतःला दूषण देतो. त्याचेच शास्त्रीय स्पष्टीकरण म्हणजे ‘R’ थिअरी.

‘R’ गृहीतकाचे प्रवर्तक आणि टीकाकार यांच्या प्रदीर्घ विचारमंथनातून आता असा सुवर्णमध्य काढता येईल:
१. कर्करोगाची कारणमीमांसा गुंतागुंतीची आहे. तो E, H व R यांतील निव्वळ एका घटकामुळे होत नाही, तर या तिघांच्या एकत्रित परिणामातून होतो.

२. जवळपास ४०% कर्करोगांचा प्रतिबंध आरोग्यपूर्ण जीवनशैलीतून करता येतो. त्यामुळे ‘E’ कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उदा. धूम्रपान व मद्यपानापासून अलिप्तता ही महत्वाची राहीलच. तसेच विविध किरणोत्सर्ग हेही याबाबतीत महत्वाचे आहेत.

३. कर्करोग्यांचे समुपदेशन करताना गरजेनुसार ‘R’ गृहीतकाचा वापर करता येईल.

४. काही कर्करोगांच्या बाबतीत E व H ही कारणे लागू नसतील तर ‘R’ हेच स्पष्टीकरण मानावे लागेल. अशा बाबतीत रोग टाळणे हे आपल्या हातात नसेल. पण कर्करोग जर अगदी लवकरच्या अवस्थेत कळून आला तर त्यावरील उपाय प्रभावी ठरतात. त्यादृष्टीने आयुष्याच्या योग्य त्या टप्प्यात विविध चाळणी चाचण्या करून घेणे हितावह ठरेल.
.....

आज समाजात विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८५ लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत. त्यादृष्टीने कर्करोगावरील संशोधन हे बहुमूल्य आहे. कोणत्याही रोगावरील प्रभावी उपचार शोधण्यासाठी त्याची कारणे सूक्ष्म पातळीवर समजणे गरजेचे असते. कर्करोगाच्या बाबतीत तर ते खूप गुंतागुंतीचे आहे. प्रस्तुत वैज्ञानिक द्वयीने मांडलेली ‘R’ थिअरी हे त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. जरी ती वादग्रस्त असली तरी ती या संशोधनाला एक वेगळे परिमाण देते हे निश्चित.
**************************
कर्करोग या विषयावरील माझे अन्य लेखन:
* रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर
(https://www.misalpav.com/node/41581)

* मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहीतक (https://www.misalpav.com/node/41353)

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

R मधील चूक होण्याचा दर हा संपूर्ण आयुष्यात सारखाच असतो का? पेशींमध्ये काही चुका शोधून आपोआप करेक्शन करणारे मार्ग असतात, त्यांचा प्रभाव म्हातारपणी कमी होत असावा का?

कुमार१'s picture

25 Mar 2019 - 9:18 am | कुमार१

मनो,
R चुका होण्याचा दर >>>>>>

वयानुसार जसे पेशींचे विभाजन वाढत्या प्रमाणात होते, त्याच प्रमाणात या चुकाही वाढत जातात. परिणामी कर्करोगाची शक्यता वाढती राहते.

** त्यांचा प्रभाव म्हातारपणी कमी होत असावा का?>>>

शक्यता आहे पण असे सांगणारा संदर्भ मिळाला नाही.

समीरसूर's picture

25 Mar 2019 - 11:40 am | समीरसूर

आधीचेही लेख वाचले. खूप चांगली माहिती अगदी सोप्या शब्दांत दिलेली आहे. धन्यवाद!

आजकाल कँन्सरचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतोय असे वाटते. २५-३० वर्षांपूर्वी एखाद्याला कँन्सर झाल्याचे अभावानेच ऐकू यायचे. आजच्या घडीला मला किमान १२ कँन्सरग्रस्त रुग्ण (हयात/हयात नसलेले) माहित आहेत. पर्यावरणातील बदल (प्रदूषण, आहारातील बदल, रसायने, मोबाईल, वगैरे) हे एक प्रमुख कारण यामागे असावे असे वाटते.

सुबोध खरे's picture

25 Mar 2019 - 12:45 pm | सुबोध खरे

आजकाल कँन्सरचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतोय असे वाटते.

कर्करोग हा जास्त प्रमाणात वाढत्या वयात आढळणारा रोग आहे.

हा रोग आता जास्त दिसण्याचे फार महत्त्वाचे कारण हे आहे कि आपली आयुर्मर्यादा वाढली आहे.

स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा आपली आयुर्मर्यादा ३२ वर्षे होती तो आता ७१ झाली आहे.

https://blogs.wsj.com/indiarealtime/2013/08/15/indias-record-since-indep...

याचा अर्थच असा आहे कि पूर्वी कर्करोग होण्याच्या अगोदरच बहुसंख्य लोक परमेश्वर चरणी लीन होत असत.

आता बहुसंख्य लोक कर्करोग होईपर्यंत जिवंत राहतात हि खरी वस्तुस्थिती आहे.

जुन्या कालच्या खात्या पित्या घरच्या लोकांची तब्येत चांगली असे याच्या इतका मोठा गैरसमज दुसरा नसेल
.
आज ८० वर्षे वयाचा माणूस ( १९३९ साचा जन्म) पाहिला तर त्याच्या आयुष्याची बहुसंख्य वर्षे (१९३९ ते १९७५) हि त्या काळच्या रेशनची कदान्न खाऊनच गेलेली आहेत.

प्रदूषणामुळे कर्करोग होतात हि अ=वस्तुस्थिती असली तरी त्याचे प्रमाण फार अतिशयोक्ती करून सांगितले जाते आहे.

प्रदूषण संपूर्ण नाहीसे केले तर एक लाख कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी पण फक्त ३९ मृत्यू कमी करू शकू.

Improving the worst environments in the US could prevent 39 in every 100,000 cancer deaths.

https://www.newscientist.com/article/2130086-increased-cancer-rate-in-us...

फुप्फुसांच्या कर्करोगापैकी ८५ % हे धूम्रपानामुळे होतात

Being a smoker poses a much bigger risk to health than air pollution. Long-term smokers can have 20 times the risk of lung cancer compared to people who have never smoked. And research has shown that more than eight out of 10 lung cancers in the UK are caused by smoking.

https://scienceblog.cancerresearchuk.org/2013/10/18/the-link-between-air...

भारतात दर वर्षी कर्करोगाने किती लोक मरतात त्याची सांख्यिकी

in 2012, there were 478,180 deaths out of 2,934,314 cases reported.

In 2013 there were 465,169 deaths out of 3,016,628 cases.

In 2014, 491,598 people died in out of 2,820,179 cases

https://en.wikipedia.org/wiki/Epidemiology_of_cancer

याच्या तुलनेत चुलीच्या धुराने मरणारी माणसे

However for Indians, high BP is the third worst threat after IAP and smoking, including second-hand smoke.The World Health Organization (WHO) had said that IAP was claiming 500,000 lives in India every year, most of whom were women and children.

According to WHO, India accounted for 80% of the 600,000 premature deaths that occur in south--east Asia annually due to exposure to IAP. Nearly 70% of rural households in India don't even have ventilation.

https://timesofindia.indiatimes.com/india/Chulha-smoke-choking-Indian-wo...

याचा अर्थ घरातील चुलीच्या धुराने भारतात कर्करोगापेक्षा जास्त माणसे मरतात.

श्री मोदी यांनी आणलेली स्वयंपाकाचा गॅस फुकट देण्याची उज्ज्वला योजना का फार महत्त्वाची आहे हे पण समजून घ्या

कुमार१'s picture

25 Mar 2019 - 12:15 pm | कुमार१

धन्यवाद आणि सहमती .

कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले म्हणावे की कर्करोग झाल्याचे निदान होण्याचे प्रमाण वाढले ?
पूर्वी अनेक लोक 'अल्प आजाराने' मरण पावत. उपचाराअभावी कर्करोगी फार जगू शकत नाहीत हा योगायोग नसावा.

लेख आणि दुवे दोन्ही माहितीपूर्ण, नेहेमीप्रमाणेच.

कुमार१'s picture

25 Mar 2019 - 3:39 pm | कुमार१

कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले म्हणावे की कर्करोग झाल्याचे निदान होण्याचे प्रमाण वाढले ? >>>

हा प्रश्न पेचात टाकणारा असतो. यावर दोन्ही बाजूंनी लोक बोलतात. आता ‘पूर्वी’चे सोडून देऊ कारण तेव्हा कर्करोग-निदानाच्या पुरेश्या पद्धती नव्हत्या. आता ‘पुढचे’ बघूया.

वैद्यकात एखाद्या आजाराचे दरवर्षी नव्याने निर्माण होणारे रुग्ण ‘Incidence’ ने मोजतात. यावर आधारित आंतरराष्ट्रीय कर्करोग संघाची (IARC) जागतिक आकडेवारी बघा:

२०१८ ची रुग्णसंख्या : 18 078 957
२०४० चा त्याचा अंदाज : 29 532 994

(http://gco.iarc.fr/tomorrow/graphic-isotype?type=0&population=900&mode=p...)

..... हा रोग वाढतोच आहे असे माझे मत.

खूप पूर्वी मनुष्य कशाने मेला हे फारसं खोलात शिरून शोधून काढण्याची पद्धत नसावी.

-अनेक वर्षे ज्वर पाठीशी लागला होता, त्यात देवाज्ञा झाली.

-हीव भरून येत असे, शरीर झिजत चालले होते.

-"पोटातलं" होऊन लहानपणीच जग सोडून गेला.

-महामारीच्या साथीत

-क्षयाची भावना झाली होती

- शक्तीपाताने गेले.

वगैरे उल्लेख जुन्या लिखाणात दिसतात.

सुबोध खरे's picture

25 Mar 2019 - 6:31 pm | सुबोध खरे

पूर्वी लोक मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगाने (किंवा जीवाणू मुळे) मृत्यू पावत असत. यात चुकीच्या पद्धतींमुळे बालमृत्यू आणि मातांचे मृत्यू सुद्धा होते.

बाळंतरोगाने किंवा प्रसूती दरम्यान स्त्रियांचे मरणे हे सुद्धा नित्याचे होते. बहुतांशी राजे राजवाडे यांच्या बायकांपैकी एखादी हमखास अशी मरत असे याचे ढळढळीत उदाहरण ताजमहालाच्या रूपाने जगासमोर उभे आहे.

शिवाय भारतात तर दुष्काळ, अतिवृष्टी, अन्नाचा तुटवडा, कुपोषण या समस्या युगानुयुगे होत्याच यामुळे माणसे फारशी जगतच नसत.

यामुळे साठी पर्यंत जगणारे / निवृत्तीवेतन खाणारे लोक फार कमी असत. यासाठीच आपल्याकडे साठीची शांत करण्याची पद्धत/ परंपरा आहे.

आणि त्यातून वाचणारे लोक जरी कर्करोगाने गेले तरी त्याचे निदानच होत नसे.

म्हणून मग "वैऱ्याने मूठ मारली म्हणून माणूस रक्त ओकून मेला" "भूताने घोळसल्या मुळे माणूस खंगून मेला" किंवा "अमक्या मांत्रिकाने करणी केली" किंवा "तमुक पिशाच्च बाधा झाली" आणि माणूस वरचा श्वास वरती आणि खालचा श्वास खाली राहून गेला अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आणि आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात किंवा १०० वर्षपूर्वीच्या साहित्यात वाचायला मिळतात.

अशी कोणतीही सुरस आणि चमत्कारिक कहाणी आपल्याला आताच्या काळात ऐकायला का मिळत नाही?

बाकी संशीधन कर्त्यांना सी टी स्कॅन या तंत्राने इजिप्तच्या ममींमध्ये ४००० ते ४७०० वर्षांपूर्वी हि रक्ताचे कर्क रोग (मल्टिपल, मायलोमा, ल्युकेमिया), गुदद्वाराच्या कर्करोग, विषाणूंमुळे होणारा गर्भाशयाच्या तोंडाचा आणि प्रोस्टेट आणि स्तनांचा कर्करोग आढळून आला आहे.

https://www.oncnursingnews.com/web-exclusives/oldest-known-cancer-cases-...

https://www.sciencemag.org/news/2011/10/mummy-has-oldest-case-prostate-c...

https://www.livescience.com/62908-ancient-egypt-cancer.html

सुबोध खरे's picture

25 Mar 2019 - 6:31 pm | सुबोध खरे

पूर्वी लोक मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगाने (किंवा जीवाणू मुळे) मृत्यू पावत असत. यात चुकीच्या पद्धतींमुळे बालमृत्यू आणि मातांचे मृत्यू सुद्धा होते.

बाळंतरोगाने किंवा प्रसूती दरम्यान स्त्रियांचे मरणे हे सुद्धा नित्याचे होते. बहुतांशी राजे राजवाडे यांच्या बायकांपैकी एखादी हमखास अशी मरत असे याचे ढळढळीत उदाहरण ताजमहालाच्या रूपाने जगासमोर उभे आहे.

शिवाय भारतात तर दुष्काळ, अतिवृष्टी, अन्नाचा तुटवडा, कुपोषण या समस्या युगानुयुगे होत्याच यामुळे माणसे फारशी जगतच नसत.

यामुळे साठी पर्यंत जगणारे / निवृत्तीवेतन खाणारे लोक फार कमी असत. यासाठीच आपल्याकडे साठीची शांत करण्याची पद्धत/ परंपरा आहे.

आणि त्यातून वाचणारे लोक जरी कर्करोगाने गेले तरी त्याचे निदानच होत नसे.

म्हणून मग "वैऱ्याने मूठ मारली म्हणून माणूस रक्त ओकून मेला" "भूताने घोळसल्या मुळे माणूस खंगून मेला" किंवा "अमक्या मांत्रिकाने करणी केली" किंवा "तमुक पिशाच्च बाधा झाली" आणि माणूस वरचा श्वास वरती आणि खालचा श्वास खाली राहून गेला अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आणि आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात किंवा १०० वर्षपूर्वीच्या साहित्यात वाचायला मिळतात.

अशी कोणतीही सुरस आणि चमत्कारिक कहाणी आपल्याला आताच्या काळात ऐकायला का मिळत नाही?

बाकी संशीधन कर्त्यांना सी टी स्कॅन या तंत्राने इजिप्तच्या ममींमध्ये ४००० ते ४७०० वर्षांपूर्वी हि रक्ताचे कर्क रोग (मल्टिपल, मायलोमा, ल्युकेमिया), गुदद्वाराच्या कर्करोग, विषाणूंमुळे होणारा गर्भाशयाच्या तोंडाचा आणि प्रोस्टेट आणि स्तनांचा कर्करोग आढळून आला आहे.

https://www.oncnursingnews.com/web-exclusives/oldest-known-cancer-cases-...

https://www.sciencemag.org/news/2011/10/mummy-has-oldest-case-prostate-c...

https://www.livescience.com/62908-ancient-egypt-cancer.html

मराठी कथालेखक's picture

25 Mar 2019 - 5:19 pm | मराठी कथालेखक

मला कर्करोग होणं हे मुलगा बिघडण्यासारखं वाटतं..
मुलाला चांगल्या शाळेत घातलं, वाईट संगतींपासून दूर ठेवलं, वाईट पुस्तके- चित्रपट यांपासूनही दूर ठेवलं तरी मुलगा बिघडला असं कधी होवू शकतं
तर एखाद्या झोपडपट्टीत वाढून , पालिकेच्या शाळेत शिकून एखादा मुलगा चांगला निघतो.
तसंच काहीसं या रोगाचं दिसतंय.. DNA का आणि कशानं बिघडेल याचं पक्कं गणित उपलब्ध नाही.

कुमार१'s picture

25 Mar 2019 - 5:35 pm | कुमार१

म क,
अगदी चपखल उदाहरण दिलेत !

चौकटराजा's picture

25 Mar 2019 - 7:06 pm | चौकटराजा

पुन्हा डॉ जॉन डोयर यान्चे वाक्य आठवले ...इव्हन इफ ऑल युवर सिस्टम्स आर ओके, यू विल डाय आयदर विथ कॅन्सर ऑर न्युमोनिया ... दॅर्‍ इज गिफ्ट ऑफ एजिन्ग !
दुसरे असे की सर्व गोष्टी लिनियर लॉजिक ने घडतात असे नाही तर क्वान्टम लोजिक म्ह्णण्जे अत्यन्त गुन्तागुन्ती स्वरूप कारणाच्या समुच्च परिणाम म्हणून होतात ,याच गुन्तागुन्तीचे दुसरे नाव " दैव" !

कुमार१'s picture

25 Mar 2019 - 7:28 pm | कुमार१

आता ही घ्या रिचर्ड गॉर्डन यांची एक कविता. विन्ग्रजीतच लिवतो:

Ashes to ashes
Dust to dust
If cancer doesn’t get you
Atherosclerosis must.

सुबोध खरे's picture

25 Mar 2019 - 9:24 pm | सुबोध खरे

हाती पायी धड असताना वेळेत मृत्यू येणे हे पण एक भाग्याचे लक्षण आहे.

अन्यथा नखात रोग नाही पण केवळ वय झाल्याने गलितगात्र झालेले वृद्ध लोक हे आपल्याच जवळच्या नातेवाईकांवर बोजा झाल्याची उदाहरणे भरपूर दिसतात.

आमच्या शेजारी एक वृद्ध बाई नवरा गेल्यावर आपल्या एकुलत्या एका मुलीकडे राहत असत आणि जाईपर्यंत त्यांनी आपल्या सोशिक मुलीचे फार हाल केलेले आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहे

वीणा३'s picture

25 Mar 2019 - 9:30 pm | वीणा३

खूपच छान लेख / माहिती.

आजकाल आपण वार्षिक तपासण्या करून घेतो. त्यामुळे कितीतरी रोग आधीच लक्षात येतात. लहान मुलांना चष्मा लागण्याचं प्रमाण वाढलं नाहीये तर, आई वडिलांची जागरूकता वाढलीये. त्यामुळे डोळ्यांची वार्षिक तपासणी होते आणि थोडासा नंबर असेल तरी कळून येतो. पूर्वी तो येत नसे.
सत्यनारायणाच्या गोष्टी / पंच्यात्नत्रातल्या गोष्टी / जुन्या गोष्टी ऐकल्या तर, मुलं न होणं, अकाली मृत्यू, धक्का बसून मरण, हे प्रकार सतत दिसतात. त्याकाळी त्याला हृदयविकार / कॅन्सर इ नाव नसतील पण लोक मारत असणार हे नक्की.
माझी एक मैत्रीण गमतीने म्हणते कि मी कॅन्सर होऊन मरणार हे अटळ दिसतंय, कायपण खाल्ला प्यायलं तरी कॅन्सर होईलच असं बहुतेक.

प्रभाकर पेठकर's picture

26 Mar 2019 - 1:40 am | प्रभाकर पेठकर

शीतगृहात साठविलेले अन्न (फ्रोझन फुड) खाऊ नका. तसेच कृत्रीम गोडवा निर्माण करणारे (आर्टीफिशिअल स्विटनर्स) पदार्थ, अगदी वेष्टनावर हर्बल असे लिहीलेले असले तरीही पदार्थ वापरू नका. ९५०,९५१ इ. क्रमांक असणारी रसायने त्या पदार्थात मिसळ/वापरली असतील तर त्यात अ‍ॅस्परटेम नांवाचे कृत्रीम गोडवा निर्माण रसायन असते. कॅन्सरच्या अनेक कारणांमध्ये ह्या रसायनाचे सेवन हे एक कारण आहे.
ताज्या अन्नाची तरी खात्री कुठे देता येते? त्यातही वेगवेगळी रसायने वापरून अन्नपदार्थांचा रंग, रुप, आकार आकर्षक बनविला जातो. ही रसायने ह्या ताज्या(?) पदार्थांच्या मार्फत आपल्या शरीरात प्रवेशतात. कोंबड्यांनाही विविध इंजेक्षने देऊन त्यांचे वजन-आकार वाढविण्याचे प्रकार केले जातात त्यामुळे ताज्या कोंबड्याही सुरक्षित नाहीत. फळांमध्येही अशी रसायने इंजेक्ट केली जातात.

ही ऐकीव आणि वाचीव माहिती आहे.

कुमार१'s picture

26 Mar 2019 - 7:40 am | कुमार१

सुबोध, वीणा व प्रभाकर,

प्रतिसाद व पूरक माहितीबद्दल आभार !

Rajesh188's picture

26 Mar 2019 - 8:35 am | Rajesh188

कॅन्सर होण्याची कोणतीही करणे आसू द्यात dna. मध्ये बिघाड झाल्या शिवाय कॅन्सर होवू शकत नाही वयामुळे बिघाड होत असेल तर repair karne thode अवघड आहे .
पण कॅन्सर वर उपचार करताना dna repair करण्या विषयी काही संशोधन झाले आहे का .
Dna दुरुस्ती आणि जो gene to कारणीभूत आहे त्याचा perfect माहिती कॅन्सर वर विजय मिळवण्यासाठी खूप गरजेचं आहे .
फक्त केमोथेरपी नी कॅन्सर chya cell नष्ट करून कॅन्सर बरा होवू शकणार नाही असे मला वाटत .
अधिक माहिती डॉक्टरांनी द्यावी

कुमार१'s picture

26 Mar 2019 - 10:17 am | कुमार१

पण कॅन्सर वर उपचार करताना dna repair करण्या विषयी काही संशोधन झाले आहे का >>>

भरपूर संशोधन झालेले आहे. अलीकडील काही नवी औषधे अशा प्रकारे काम करतात:

१. DNA च्या निकटच्या काही एन्झाइम्सच्या कार्यावर परिणाम
२. कर्करोग पेशींच्या मूलभूत गुणांवर परिणाम
३. पेशीच्या आतून ‘बाहेर’ जे ‘सिग्नल’ जातात त्यांच्यावर परिणाम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2019 - 12:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.

चर्चाही तितकीच उत्बोधक आहे.

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख!! या R च्या करामतीत काही location specific issues असतात का -उदा. मुम्बईत चेम्बुरला (जिथे oil refinery, fertiliser plant इ.इ. असल्याने चेम्बूरमध्ये मुम्बईच्या इतर भागातल्यापेक्षा R जास्त असू शकेल का?

कुमार१'s picture

27 Mar 2019 - 7:44 am | कुमार१

डॉ. सुहास व शेखर,
अभिप्रायाबद्दल आभार.

शेखर,
R चा अर्थ पुन्हा एकदा बघा. R म्हणजे पर्यावरणातील (E) कुठलेच कारण लागू नसणे.

तुम्ही जे तेल शुद्धीकरण कारखान्याचे उदा दिले आहे, त्या भागात जर रोग जास्त आढळला तर तो E मध्ये मोडेल; R बिलकूल नाही. R ही चूक गणितातील random प्रमाणे आहे. त्याला ‘कारण’ लागत नाही.
म्हणजेच….
जेव्हा एखादया कर्करोग्यात E वा H ची शक्यता जवळजवळ नसते, तेव्हा “काय माहीत बुवा” असे म्हणण्याऐवजी R हे शास्त्रीय स्पष्टीकरण देता येते.

लई भारी's picture

6 Apr 2019 - 8:46 am | लई भारी

उत्तम सोप्या पद्धतीने माहिती आणि रोचक चर्चा!

कुमार१'s picture

6 Apr 2019 - 9:44 am | कुमार१

आणि सर्व वाचकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा !

कुमार१'s picture

7 Apr 2019 - 9:21 am | कुमार१

आजच्या जागतिक आरोग्यदिनाच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा !

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख.
E आणि H बद्दल माहिती होती त्यात आता R ची भर पडली.
धन्यवाद.

कुमार१'s picture

16 Apr 2019 - 5:59 pm | कुमार१

धन्यवाद ! फारा दिसांनी तुमची भेट झाली, शुभेच्छा !

कुमार१'s picture

15 May 2019 - 11:12 am | कुमार१

नुकतेच ‘ लँसेट’ वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार आजपासून ते २०४० या काळामध्ये कर्करोग-उपचार घेण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण दरवर्षी ५३ टक्क्यांनी वाढेल.
२०४०पर्यंत कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या १.५ कोटींच्या घरात गेलेली असेल.

लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्या मुळे उपचार घेण्याचे प्रमाण वाढेल
पण हा सर्व्हे करण्या मागे Lancet cha हेतू शुद्ध आहे की दुसऱ्या बाजूने त्यांनी आर्थिक गणित सांगितलं आहे
नवीन शोध लागत आहेत किती तरी संशोधक कॅन्सर वर संशोधन करत आहेत काय सांगावे मनुष्य पूर्ण विजय मिळवून कॅन्सर
ल थंडी तापाच्या लाईन मध्ये सुधा जागा मिळणार नाही
आणि हो एक प्रश्न heart cancer hi अत्यंत दुर्मिळ मधली दुर्मिळ घटना असते
असे काय आहे heart chya पेशीमध्ये की त्या कॅन्सर ला बळी पडत नाहीत

कुमार१'s picture

15 May 2019 - 12:37 pm | कुमार१

असे काय आहे हृदयाच्या पेशीमध्ये की त्या कॅन्सर ला बळी पडत नाहीत >>>

या पेशी आयुष्याच्या अगदी लवकरच्या टप्प्यावर पूर्ण differentiate होतात. पुढे त्यांची विभाजन प्रक्रिया जवळजवळ होत नाही. त्यामुळे जनुकीय बिघाड नाहीत >>> कर्करोग खूप दुर्मिळ.

चौकटराजा's picture

22 May 2019 - 5:34 pm | चौकटराजा

माझा आपला एक अंदाज असा आहे की जिथे अन्न ( यात दारू तंबाखू ही आले ) व हवा यांचा संपर्क शरीराशी जास्त येतो त्या भागात कँसर चे प्रमाण जास्त असते. निरनिराळे इन्झाइम व हार्मोन्स हे अन्नातूनच तयार होत असल्याने त्यांचा जिथे सहभाग असतो तिथेही कर्करोगाचे प्रमाण काही प्रमाणात असावे .लिव्हर, अन्ननलिका फुफुसे , आतडे, जठर , प्रोस्टेट स्वादुपिंड,,घसा , स्तन , गर्भाशय , बीजांडकोश हे एका बाजूला तर, कान डोळे, मेंदू , ह्रदय हात पाय केस नखे अशी विभागणी लाडके व दोडके अशी कर्करोग करीत असेल का ?

कुमार१'s picture

22 May 2019 - 6:15 pm | कुमार१

@ चौरा,

....अशी विभागणी लाडके व दोडके अशी कर्करोग करीत असेल का ? >>>

काही अवयवांचे कर्करोग इतरांपेक्षा अधिक प्रमाणात होतात हे बरोबर. याची कारणमीमांसा गुंतागुंतीची आहे. हवा वा अन्नसंपर्क ही कारणे (वरवर अंदाज केलेली) तशी लागू होत नाहीत.

मूळ कारण हे जनुकीय पातळीवर आहे. ज्या अवयवांत मूळ पेशींचे विभाजन जास्त प्रमाणात होते त्यांच्यात अनिष्ट जनुकीय बदलही अधिक होतात. >>>>> कर्करोगाची अधिक शक्यता.

सुधीर कांदळकर's picture

21 May 2019 - 8:48 pm | सुधीर कांदळकर

रुग्णारुग्णात कँसरच्या गाठीच्या वाढीचा वेग भिन्न असतो हे खरे का? तसा तौलनिक अभ्यास कोणी केला आहे का? जर तसे असेल तर हा वेगही दुर्दैवाच्या खखत्यखत घालायला हरकत नाही.

छान लेखाबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

21 May 2019 - 8:49 pm | सुधीर कांदळकर

खात्यात

कुमार१'s picture

22 May 2019 - 7:19 am | कुमार१

धन्यवाद.
* रुग्णारुग्णात कँसरच्या गाठीच्या वाढीचा वेग भिन्न असतो हे खरे का?>>>

याबाबतीत व्यक्तीपेक्षा कर्करोगाच्या प्रकारानुसार फरक पडतो. काही रोग अत्यंत घातकी असतात.