आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
15 Mar 2019 - 5:31 pm

इतर लेख
आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती

आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था

आकाशदर्शन - सुरुवात आणि ओळख
गाभा आणि ओळख
समुद्रमार्गे आणि जमिनीवरून विशेषत: वाळवंटातून पूर्वी व्यापारी रात्रीचा प्रवास करत असत तेव्हा आकाशातील ताऱ्यांचा दिशादर्शक म्हणून उपयोग होत असे. ग्रीक आणि अरब व्यापारी यात पुढे असल्याने त्यांचा गाढा अभ्यास होता. ताऱ्यांची नावे त्यांच्या भाषेतील असण्याचं मुख्य कारण तेच आहे. विशेष तारकापुंजातील ताऱ्यांना ग्रीक पुराणातील नावे देऊन त्यांच्या कथा आहेत. आकाशदर्शन हे त्यांच्यासाठी गरजेची गोष्ट होती. असिरिअन लोकांना ग्रहतारे आणि स्थिती त्यांच्या ज्योतिषासाठी लागत. भारतातही याच कारणासाठी शोध आणि निरीक्षण होत होते. राशीकल्पना असिरिअनांची,तर नक्षत्रकल्पना भारतीयांची. ग्रह तारे आणि विश्व म्हणजे काय याचा शोध घेण्याचे तत्वज्ञान जगात निरनिराळया देशांत सुरूच होते. सूर्यमाला, गॅलक्सी, गुरुत्वाकर्षण, प्रकाशाचा अतिप्रचंड असणारा वेग नंतर कसा टिबुकला वाटू लागला, सापेक्षतावाद, चंद्र कसा आहे, मंगळ कसा आहे, धूमकेतूंचे कोडे, ग्रहणे इत्यादींचे विज्ञान समजू लागले. दुर्बिणी आल्या,इतर साधने,गणिताचा विकास होत गेला आणि अंधारात उजेड पडू लागला तसेच उजेडातही बराच अंधार आहे हे कळत गेले.

तयारी भाग पहिला

आकाशदर्शनासाठी साधने
जागेवर वापरण्यासाठी -
१)फक्त डोळ्यांनी जेवढे दिसेल ते आकाश, ग्रह ,तारे ह सुरुवातीला पाहायचे आहे. कुठे काय केव्हा पाहता येते हे समजल्यावर पुढील साधने वापरताना वेळ जाणार नाही.
त्यानंतर
२)बाइनोक्युलर्स आणि
३)टेलिस्कोपचा वापर करून.
४) मोबाइल अॅप
यावर एखादे अॅप नाही असे कसे होईल? ओरिएन्टेशन, मॅग्ग्नेटिक, आणि जिपिएसवर ते एकत्रित काम करते. ओनलाइन आणि ओफलाइन वर्शन असतात. आकाशाच्या ज्या भागाकडे मोबाइल धरू तिकडे रिअलटाइममध्ये तारे ग्रह कोणते ते दाखवते.
काही अॅप्स फ्री आहेत, काही पेड. वेगवेगळ्या सोयी असतात. अॅपवरून आकाशदर्शन शिकता येणे अवघड आहे पण जेव्हा युरेनस,नेपच्युन ,प्लुटो शोधणे किंवा एखादा धुमकेतू तेव्हा उपयोगी पडतेच. स्क्रीन लाल करता येतो हेसुद्धा कामाचे आहे.
५) लाल टॅार्च
आपले डोळे उजेडाकडे पाहिल्यावर बारीक होतात ( दीपतात) मग अंधुक तारे अर्धा एक तास दिसत नाहीत. काही टिपण वगैरे वहीत शोधायचे असल्यास अशावेळी लाल टॅार्च वापरावा लागतो. लाल उजेडाने डोळे दिपत नाहीत. एखाद्या टॅार्चच्या काचेवर लाल जिलेटिन कागद चिकटपट्टीने झाकला की काम झाले. लाल एलइडी टॅार्चही चालेल. वरच्या अॅपमध्ये ही सोय यासाठीच असते.

६) होकायंत्र ( compass )
हे मोबाइलमध्ये असले तरी स्क्रीनचा पांढरा उजेड चालणार नाही. खरेखुरे सुईवाले पन्नास साठ रुपयात मिळू शकते. नवीन जागेत गेल्यावर रात्री दिशा समजण्यासाठी.
७) जिपीएस डेटा (Latitude)
यामध्ये अक्षांश ( Latitude ), रेखांश ( Longitude ) दिलेले असतात. त्यापैकी Latitude माहिती असणे तारे शोधण्यास उपयोगी पडतात. हे सतत पाहावे लागत नाही परंतू ज्या नवीन जागेत गेलो आहोत ( उदा० लडाखमध्ये ज्या ठिकाणी आहे ) त्याचे एकदा दिवसा पाहून ठेवायचे. पुणे/ मुंबई १८.५/१९ आहे. भारत दक्षिणेकडे ८ अंश, ते उत्तरेकड २८ अंश आहे याचा नक्की फरक होतो. ते कसे ते नंतर समजेल.
Longitude - पुढे टेलिस्कोप वापरताना ओटमॅटिक ट्रॅकिंग असल्यास त्यात जिपिएस डेटा वापरला जातो, परंतू ते ओटो सेटिंग्जमध्ये असतेच.

माहिती

इंटरनेटवर
प्रचंड माहिती आहे इंग्रजीमध्ये. विडिओ आहेत.
(( sky maps, star location data यांचा उपयोग कसा करायचा कळण्यासाठी संदर्भ पद्धती समजून घेणे आवश्यक आहे ते पुढच्या भागात.))

माहितीसाठी इंग्रजी / मराठी स्वस्त पुस्तके
इंग्रजी
१) स्काइ वॅाचिंग - नॅशनल बुक ट्रस्ट,किंमत ५५/-
नुसत्या डोळ्यांनी काय काय पाहता येईल ते यामध्ये आहे.
मराठी
२) नक्षत्र विचार - पुरुषोत्तम कुलकर्णी, नांदेडचं एक प्रकाशन आहे, ११०रु
भारतीय नक्षत्रांची गोष्टीरूप माहिती आणि रेखाचित्रे, इतर माहिती आहे.
३) हा तारा कोणता - जोगळेकर, साहित्य संस्कृति मंडळ ,रु १२० . आता छापत नाही. मिळालं कुठे तर पाहा. ( रंगीत चित्रे नाहीत.)
४) भितींवरचे कॅलेंडर - फार उपयुक्त वस्तू आणि पटकन माहिती मिळते. प्रत्येक महिन्याच्या पानाच्या मागे कोणते ग्रह कोणत्या राशीत आहेत, सूर्य कोणत्या राशीत आहे, आणि चंद्राची तिथी महत्त्वाची.
५) कथा
आकाशदर्शन म्हणजे चांदणी रात्र नसताना मंद तारकाही चमकू लागतात ते पाहात राहाणे. काही तारकांचे विशेष आकार लक्ष वेधतात. ग्रीक लोकांनी पुराणातल्या कथा त्याभोवती मानून प्रचलित केल्या. तशा काही मोजक्या आपल्याकडे होत्या त्या नक्षत्रावरून आहेत.
१) ध्रुव ताऱ्याचे अढळपद
२) चंद्राच्या २७ बायका आणि त्याचे रोहिणीवरचे प्रेम.
इतर तारकासमुहांसाठी कथा नव्हत्या त्या बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिल्या. उदा० Perseus and Andromeda साठी ययाति आणि देवयानी.
कथा ऐकता ऐकता तारकासमुह पाहणे एक विरंगुळा आहे.

आकाशदर्शन कुठे आणि केव्हा?

आता देशातील अनेक शहरांत / गावांत ठिकठिकाणी दिवेलागणी वाढत चालली तसतसे आकाशातले तारे दिसणे अवघड होऊ लागले आहे. रात्री ताऱ्यांनी चमचमणारे आकाश पाहण्याची गम्मत मात्र जराही कमी झालेली नाही. तुम्ही अशा लोकवस्तीपासून दूर असाल तर चांगले आकाश दिसू शकते. कमी पावसाचे, किंवा दुष्काळी भाग, समुद्र किनारपट्टीपासून दूर, उंचावरचे भाग , झाडी कमी असलेल्या जागा उत्तम. ज्याला आपण मिट्ट काळोख म्हणतो त्यासाठी पंधरा किमिटरात दिवे नसावेत.

सुर्य चंद्रासह सर्वच तारे आकाशात पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात याचं कारण पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेला फिरते हे आपल्याला माहीत आहेच. रोज रात्री ठरावीक वेळेला उदाहरणार्थ आठ वाजता डोक्यावरचे तारे पाहिल्यास लक्षात येईल की ते तारे थोडे पुढे (पश्चिमेकडे) सरकत आहेत. याचे कारण पृथ्वी सूर्याभोवती एका वर्षात पूर्ण फिरते. त्यामुळे वर्षभरात वेगवेगळे आकाश दिसते.
उत्तर ते दक्षिण अशी एक काल्पनिक रेषा आकाशात काढल्यास त्यावरचे सर्व तारे एकदमच उगवतात मावळतात. पृथ्वीच्या गोलामुळे त्यात थोडा फरक झाल्यासारखा वाटतो. संपूर्ण आकाशाचा गोल काल्पनिक २४ तासाच्या भागात आपण विभागला आहे. त्याचे सोयीकरता बारा राशीत सोपे भाग केले कारण यातून बारा महिन्यांत सूर्य फिरल्याचा भास होतो.

आकाशदर्शन म्हणजे काळोख हवा अर्थातच दोन मोठे प्रकाशाचे गोल सूर्य - चंद्र आकाशात असता कामा नयेत. चंद्र हा पृथ्वीभोवती अंदाजे साडे एकोणतीस दिवसात फिरतो त्यामुळे त्याला टाळून आकाशदर्शनाच्या वेळा ठरवाव्या लागतात.

चंद्राची तिथी आणि आकाशदर्शन वेळ
मराठी पंचांगात चंद्राची तिथी आणि पक्ष दिलेला असतो ते पाहून आकाशदर्शन वेळा -
शुक्ल प्रतिपदा - रात्रभर
शुक्ल द्वितिया - रात्रभर
शुक्ल तृतिया रात्री सात नंतर
शुक्ल चतुर्थी - आठ नंतर
शुक्ल पंचमी - नऊ नंतर
शुक्ल षष्ठी - दहा नंतर
शुक्ल सप्तमी - अकरा नंतर
शुक्ल अष्टमी - बारा नंतर
शुक्ल नवमी - एक नंतर
शुक्ल दशमी - दोन नंतर
शुक्ल एकादशी - तीन नंतर
शुक्ल द्वादशी - चार नंतर
शुक्ल त्रयोदशी - --------
शुक्ल चतुर्दशी - --------
शुक्ल पौर्णिमा - --------
कृष्ण प्रतिपदा --------
कृष्ण द्वितिया --------
कृष्ण तृतिया --------
कृष्ण चतुर्थी --------
कृष्ण पंचमी - नऊ अगोदर
कृष्ण षष्ठी - दहा अगोदर / पर्यंत
कृष्ण सप्तमी - अकरा अगोदर / पर्यंत
कृष्ण अष्टमी - बारा अगोदर / पर्यंत
कृष्ण नवमी - एक अगोदर / पर्यंत
कृष्ण दशमी - दोन अगोदर / पर्यंत
कृष्ण एकादशी तीन अगोदर / पर्यंत
कृष्ण द्वादशी चार अगोदर / पर्यंत
कृष्ण त्रयोदशी पाच अगोदर / पर्यंत
कृष्ण चतुर्दशी पूर्ण रात्रभर
कृष्ण अमावस्या पूर्ण रात्रभर

सूर्याची रास आणि दिसणारे आकाश

आकाशात निरनिराळे तारकासमुह निरनिराळ्या वेळी तसेच महिन्याप्रमाणे दिसतात. केवळ आकाशात सूर्य नसणे हे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर तो कोणत्या राशीत आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. भारतातला पावसाळा जून ते ओक्टोबर असतो तेव्हा आकाशदर्शन अशक्यच. सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश. तर सूर्य वृषभ ते कन्येत असेपर्यंत दर्शन नाही. ( हिमालय भागात मार्च ते सप्टेंबर. )

ज्या राशीत सूर्य त्याच्या विरुद्ध बाजूची रास आकाशात पूर्ण रात्रभर दिसत राहते. राशींचे क्रमांक, नावे, बदल आणि महिना माहिती असणे गरजेचे आहे.

क्रमांक - रास
१ - मेष
२ - वृषभ
३ - मिथुन
४ - कर्क
५ - सिंह
६ - कन्या
७ - तूळ
८ - वृश्चिक
९ - धनू
१० - मकर
११ - कुंभ
१२ - मीन

साधारणपणे सूर्य महिन्याच्या १४ ते १९ तारखेदरम्यान रास बदलतो / पुढच्या राशीत जातो. तो उडी वगैरे मारत नाही पण रास बदलली किंवा संक्रमण झाले असे म्हटले जाते. आपल्या सर्वानाच माहिती आहे की मकर संक्रांत / मकर संक्रमण १४ जानेवारीस होते. म्हणजे सूर्य धनू (९) राशीतून मकर (१०) राशीत जातो. अर्थात १ जानेवारीला सूर्य धनू (९) राशीत असतो, १ फेब्रुवारीला मकर (१०) राशीत याप्रमाणे लक्षात ठेवता येईल.

धनू राशीतला सूर्य संध्याकाळी पश्चिमेला मावळत असेल तेव्हा, डोक्यावर मीन रास ( ९+३ = १२) असेल. पूर्वेला मिथुन ( ९ वजा ६ = ३ ) विरुद्ध रास उगवत असेल. दोन तासाने पूर्वेला कर्क रास उगवेल आणि पश्चिमेला मकर (१०) रास मावळेल. याप्रमाणे राशींचे उत्तर_दक्षिण पट्टे सरकत राहतात. पहाटे पुन्हा वृश्चिक राशीनंतर धनू राशितला सूर्य उगवेल.

सूर्य ज्या राशित आहे ती, पुढची आणि मागची अशा तीन राशीलील ग्रह तारे उजेडामुळे दिसत नाहीत. एकेक महिना गेल्यावरच फरक पडतो. एकूण नऊ राशिंतील ग्रह तारे एका रात्रीत पाहता येतात.
वर्षाच्या तारखेप्रमाणे आणि रात्रीच्या वेळेप्रमाणे आकाशात कोणता भाग दिसेल हे आता ढोबळ मानाने जाणून घेतलं. यापुढेही याचा सूक्ष आणि अचूक विशेष विचार करण्यासाठी एकदोन संदर्भ पद्धती आहेत त्या पुढच्या भागात पाहू. ज्यांना आकाशदर्शन छंदपुढे वाढवायचा आहे त्यांना sky map वाचणे, इंटरनेट साइटसवरून एाखाद्या तारकेचा टेलिस्कोपमधून शोध घेणे यासाठी युनिवर्सल मोजणी पद्धत समजून घ्यावी लागते ती सुरुवातीपासूनच अभ्यासणे जरुरी आहे. रात्रीच्या वेळी आकाश निरिक्षकास स्वतंत्रपणे शोधाशोध करता आली पाहिजे हा हेतू आहे.

बारा राशी २७ नक्षत्रांत विभागल्या आहेत. एकेका राशित सवा दोन नक्षत्रं. ( एका नक्षत्राचे चार भाग - चार चरण कल्पिले आहेत.) चंद्र आणी पृथ्वीसह नवग्रह ज्या काल्पनिक मार्गातून आकाशात सूर्याभोवती फिरल्यासारखे वाटतात/ दिसतात त्यास क्रांतिवृत्त म्हणतात. भारतात फक्त क्रांतिवृत्तावरच्या नक्षत्रांचा विचार केला गेला आहे. राशी मात्र संपूर्ण उत्र ते दक्षिण पसरलेला तीस अंशाचा पट्टा आहे आणि त्यात बरेच तारे, तारकासमुह ठळक तसेच लक्षवेधी आहेत. ते रात्री दिशादर्शक होते.

* खुणेचे* तारे ठळक आहेत

राशी ( नक्षत्रे ??)

मेष ---- *अश्विनी*, भरणी, *कृत्तिका*

वृशभ--------- कृत्तिका , *रोहिणी* *मृग*

मिथुन ------ मृग आर्द्रा पुनर्वसु

कर्क --------- पुनर्वसु पुष्य आश्लेषा

सिंह -- *मघा* पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी

कन्या -- उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा

तूळ -- *चित्रा* * स्वाति* विशाखा

वृश्चिक -- विशाखा *अनुराधा* *ज्येष्ठा*

धनु -- *मूळ* पुर्वाषाढा उत्तराषाढा

मकर -- उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा

कुंभ - धनिष्ठा शततारका, पुर्वा भाद्रपदा

मीन --- पुर्वा भाद्रपदा, उ० भाद्रपदा, रेवती

मृग , सिंह वृश्चिक असे तारकासमुह आहेत त्यातला अमुकच तारा म्हणजे हे नक्षत्र असा कुठे उल्लेख नाही परंतु ग्रह,चंद्र त्या जवळून जाताना तसा उल्लेख येतो आणि त्यावरून निश्चित झाले आहे.

जे पर्यटक भारतातल्या लेह, लदाख, किवा राजस्थानात पर्यटनाला जाणार असतील त्यांना ट्रीप आखताना ही माहिती उपयोगी पडेल. पौर्णिमेला कच्छचे रण, जैसलमेर खुप छान वाटेल पण आकाशदर्शन हुकेल.
ताऱ्यांची इंग्रजी - मराठी नावे
Excel sheet मध्ये

Google doc link
Star names

https://drive.google.com/file/d/1vw5611KuJxjQp2YuerXeqvTc-yNfxOyI/view?u...

(( आकाशदर्शन यावर लिहिण्याचा एक प्रयत्न केला आहे. शंका विचारा, चुका दाखवा, तुमचे अनुभव लिहा.
आगामी भाग -
? ) आकाशदर्शन - संदर्भ पद्धती
? ) आकाशदर्शन - साधने आणि मर्यादा
? ) आकाशदर्शन - तारकासमुह ओळख
stargazing / sky watch यावर इंग्रजीमध्ये भरपूर साहित्य आहेच.

प्रतिक्रिया

मस्त सुरुवात! खूपच मनोरंजक होणार ही लेखमालिका.
पुढील भागाची वाट बघत आहे.
वा खू साठवली.

वरुण मोहिते's picture

15 Mar 2019 - 6:32 pm | वरुण मोहिते

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

प्रमोद देर्देकर's picture

15 Mar 2019 - 6:46 pm | प्रमोद देर्देकर

लाख लाख धन्यवाद काका.
एकदा ठाण्याला मागच्या वेळेसारखं भेटूया आणि प्रत्यक्ष बोलूया या विषयी.

नावातकायआहे's picture

15 Mar 2019 - 8:59 pm | नावातकायआहे

वा खू साठवली आहे.

तुषार काळभोर's picture

15 Mar 2019 - 9:58 pm | तुषार काळभोर

ओळखच इतकी छान आहे.
पुभाप्र

प्रचेतस's picture

16 Mar 2019 - 6:36 am | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
अगदी साध्यासोप्या भाषेत आकाशदर्शनाचे प्राथमिक उत्तम तऱ्हेने सांगितले आहे.

मायक्रोसॉफ्टच्या वर्ल्ड वाईड टेलिस्कोपवर (http://www.worldwidetelescope.org) अतिशय उत्तम माहिती तसेच व्हर्च्युअल टूर्स आहेत. अप्रतिम संस्थळ.

पूर्ण अंधाऱ्या रात्री साध्या डोळ्यांनी दिसणारे ऑब्जेक्टस् म्हणजे मृग नक्षत्रातील ओरायन तेजोमेघ (जो एखाद्या छोट्या पुंजक्यासारखा दिसतो) आणि देवयानी आकाशगंगा.
अगदी आवर्जून पाहण्यासारखेच.

तुषार काळभोर's picture

16 Mar 2019 - 9:53 am | तुषार काळभोर

अ

असंच अजून एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे Stellarium.
त्यांचं विंडोज आणि मॅक साठी फुकट सॉफ्टवेअर उपलब्ध आहे.
अँड्रॉइड वर बहुतेक विकत मिळतं. (हे तेच आहे का माहिती नाही)
ऑनलाईन वेबसाईटवर आपल्या लोकेशन नुसार लाईव्ह तसेच भूतकाळ अन भविष्यातील आकाशदर्शन उपलब्ध आहे.

तारकासमुहांचे फोटो पाहिले की आपल्याला हे दिसेल का? कुठे?केव्हा? हा विचार येतो. त्या माहितीकडे आपण दुसऱ्या भागात जाणार. केवळ एकाच शहरात आता हौशी खगोलप्रेमी राहात नाहीत, वर्षभरात भारतात किंवा भारताबाहेर जगात वेगवेगळ्या देशांत, राहतात. कॅनडा,भारत आणि ओस्ट्रेलिया हे ( उदाहरणार्थ) पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. इकडून तिकडे गेल्यावर आकाशात कुठे पाहायचे हे संपूर्ण बदलते. म्हणून सर्वसाधारण युनिवर्सल संदर्भ पद्धत लक्षात ठेवणे / अवलंबणे उपयुक्त ठरणार.

माझीही शॅम्पेन's picture

16 Mar 2019 - 1:41 pm | माझीही शॅम्पेन

वाह वाह अप्रतिम सुरुवात , वांगणीचे खगोल मंडळाचे दिवस आठवले :)

टवाळ कार्टा's picture

16 Mar 2019 - 5:33 pm | टवाळ कार्टा

आयला, त्या खगोल मंडळाच्या कार्यक्रमांना मी पण जायचो
लेखमाला उत्तम असेल यात शंकाच नाही

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Mar 2019 - 6:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

त्या कार्यक्रमाचे आयोजन आमचे कल्याणचे हेमंत मोने सर करत असत. दा. कृ. सोमण व त्यांचा तेव्हापासुन चांगला परीचय होता.

ईथे पुण्यात ज्योतिर्विद्या परीसंस्था या विषयात बरेच कार्यक्रम करत असते. टिळक स्मारक मंदीरला दर रविवारी ६-८ या वेळेत ऑफिस उघडे असते. बाकिच्या वेळी केसरीवाडा वगैरे येथे किंवा कुठेतरी फार्म हाउसवर आकाशदर्शन असते.
असो. लेख उत्तम. वाचतोय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Mar 2019 - 1:50 pm | ज्ञानोबाचे पैजार

मोबाईल अ‍ॅप वर ग्रह तार्‍यांची किंवा नक्षत्रांची इंग्रजी नावे दिसतात त्यांच्या मराठी भाषांतराची यादी कुठे आहे का?
कारण Sirius पेक्षा व्याध म्हणाले की लगेच समजते.
पैजारबुवा,

चौकटराजा's picture

25 Mar 2019 - 8:10 pm | चौकटराजा

चौकटराजा's picture

25 Mar 2019 - 8:11 pm | चौकटराजा

धन्यवाद

अजय देशपांडे's picture

16 Mar 2019 - 3:01 pm | अजय देशपांडे

ही लिंक वाचा माझी नाही पण छान लिहले आहे
https://www.misalpav.com/comment/346724#comment-346724

कंजूस's picture

16 Mar 2019 - 3:50 pm | कंजूस

अजय देशदेशपा, लिंकमधला मिपावरचा लेख फारच छान आहे!!
२००६ मध्ये मी पुण्याच्या आकाशदर्शन कार्यक्रमात नाव नोंदवले होते ( स्वत:ची दुर्बिण असणाऱ्यांनाच प्रवेश होता) माझ्राकडे एक १०गु४६ मोनोक्युलर आणि एक १०गु२१ बाइनो आहे तर मी येऊ शकतो का विचारलं तर चालेल म्हणाले. मग तिकडे सी८, १४इंची टेलिस्कोप, सहा इंची वीसेक पाहणयास मिळालया. अजून एक महत्त्वाचा सल्ला मिळाला - "टेलिस्कोप बनवायच्या भानगडीत अजिबात पडू नको, आहे हेच वापर."

कंजूस's picture

16 Mar 2019 - 3:52 pm | कंजूस

*अजय देशपांडे*

दुर्गविहारी's picture

17 Mar 2019 - 8:29 pm | दुर्गविहारी

अप्रतिम माहिती! पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत .

कंजूस's picture

17 Mar 2019 - 9:58 pm | कंजूस

>>>ग्रह तार्‍यांची किंवा नक्षत्रांची इंग्रजी नावे दिसतात त्यांच्या मराठी भाषांतराची यादी कुठे आहे का?>>>ज्ञानोबाचे पैजार.

लवकरच देतो. तोपर्यंत

https://www.thoughtco.com/stargazing-through-the-year-4064509

या साइटमध्ये महिन्याप्रमाणे कोणते तारे, तारकासमुह आकाशात बराच वेळ दिसतील ते चित्रासह दिले आहेत ते पाहा.
साइट्स खूप आहेत. एक उदाहरण म्हणून दिली आहे

तारकासमुहाचे नाव समजा Crux ( त्रिशंकू) आहे तर त्यातील सर्वात ठळक ताऱ्याला Alpha Crucis, जरा कमी ठळक Beta Crucis वगेरे नावे असतात. ( Crucis म्हणजे Crux'चा )

तसेच
Scorpius ( वृश्चिक) तारकासमुहातील मोठा तारा Alpha Scorpii ( ज्येष्ठा, दुसरे नाव Antares)दिलेला असतो. ( Scorpiusचा अल्फा तारा)
Cancer( कर्क) मधल्या ताऱ्यांना Alpha,Beta Cancri असे म्हणतात.

अनिंद्य's picture

18 Mar 2019 - 5:13 pm | अनिंद्य

रोचक सुरुवात !
ही लेखमाला अवश्य वाचणार.
पु भा प्र

जिज्ञासु आनन्द's picture

22 Mar 2019 - 3:07 pm | जिज्ञासु आनन्द

"हा तारा कोणता?" हे पुस्तक नागपुर शासकिय मुद्रणालय येथे उप्लब्ध आहे. काही वर्षान्पूर्वी मी तेथुनच घेतले. सम्पर्क -+919421800992

जिज्ञासु आनन्द's picture

22 Mar 2019 - 3:08 pm | जिज्ञासु आनन्द

नवीन भाग लिहिताना जुन्याची /च्या लिन्क दिल्यास उत्तम राहिल.

अनिकेत कवठेकर's picture

23 Mar 2019 - 12:12 pm | अनिकेत कवठेकर

मस्त आहे माहिती

आकाश दर्शन हा एक मस्त रन्जक छन्द आहे . मी तीन चार तरी जागी भारतात तारांगणात कार्यक्रम पाहिले आहेत. माझ्या प्रवासात मी राजस्थान वालवंट , व हिमालयात कौसानी येथून अचाट अशी ही पखरण पाहिली आहे. कौसानी येथे गुरू व त्याचे ४ चन्द्र दुर्बिणीतून पाहिले आहेत. माझ्या घराजवळ चिन्च्वड मधे सायन्स पार्क आहे इथे नवे तारांगण निर्माणाधीन आहे . आपल्याला आडवे पडून वर पाहिले असते जे दिसते त्याला ख स्वस्तिक असे म्हणतात. अर्थात काही तारे जर्मनीतून तर काही केपटाऊन वरून दिसणारच नाहीत कारण दोन्ही जागचे ख स्वस्तिक सारखे नाही . बाकी माहिती बरीच आहे येथे टन्क भुताने झपाटल्याने लेखन सीमा.

vikrantkorde's picture

2 Apr 2019 - 2:45 pm | vikrantkorde

मस्त आहे माहिती

लहानपणी तारे पाहण्याची फार आवड होती... ध्रूव तारा, व्याधाचा तारा, स्पतर्षी इं
यातही सूर्या विषयी विशेष आकर्षण !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Arjuna Kruta Kali Stuti from Mahabharatha