३१ ऑक्टोबरला मोदींनी ह्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण केल्यावर कधी एकदा हा पुतळा पाहतो असं झालं होत , माहितीतील बऱ्याच जणांना काही अधिक माहिती आहे का हे विचारून झालेलं पण काहीही माहिती हाती लागली नाही , नंतर एकाशी बोलताना टेन्ट सिटी नावाचं काही तरी राहायला आहे एवढा धागा घेऊन आणि गुगल बाबाला साकडं घालून प्लॅन सुरु केला. २५ ला सकाळी ५:४५ निघून २७ ला रात्री घरी एक मस्त रोड ट्रिप मारून आलो
सरदार वल्लभाई पुतळा :- १८२ मीटर्सचा जगातील सर्वात उंच पुतळा नुसताच उंच नाही तर बर्यापॆकी रुंद पण आहे , लार्सन आणि टुब्रो (आम्ही गमतीने ल आणि ट म्हणतो ) ह्यांनी अवघ्या ४ वर्षात उभा केला आहे , तुमच्या अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या दुपटीहून अधिक आहे , श्री राम सुतार हे ह्या पुतळयाचे शिल्पकार आहेत , पुतळ्या खालीच म्युसिम आहे तेथे सर्व माहिती सविस्तरपणे मिळते
जवळच रेल्वे स्थानक / एअर पोर्ट :- बडोदा (गुगलला वडोदरा कळत म्हणे ) इथून नर्मदा सरोवर किंवा पुतळा साधारण पण ९० km / २ तासावर आहे.
बडोदा शहरापासून सरदार सरोवर साठी बसेस सुटतात त्या बसने ये-जा करू शकतो किंवा बडोद्याहून एखादी प्रायव्हेट गाडी बुक करून तुम्ही येऊ शकता
जर ठाणे / मुंबई हुन ड्राईव्ह करून जाणार असाल तर साधारण अंतर ४२० किमी आहे पण जायला सहजच ७/८ तास लागतात. सरदार वल्लभाई पटेल यांचा हा भव्य पुतळा केवडिया कॉलनी राजपिपला गुजरात येथे आहे मुंबईहून जाणार असल्यास सकाळी पाच वाजता निघावे जेणेकरून दुपारी बारा किंवा एक वाजेपर्यंत तिथे पोहोचता येईल
राहायची सोय :- एकतर बडोद्याला राहावं आरामात किंवा मग सर्वोत्तम पण बऱ्यापैकी महाग पर्याय म्हणजे नर्मदा टेन्ट सिटी , टेंथ सिटी मध्ये राहणार थोडसं महाग असलं तरी तिथल्या सोयीसुविधा अत्यंत चांगल्या आहेत जर दिवसाचं तपमान जास्त असेल तर एअर कंडीशन चा पर्याय निवडावा अन्यथा एअर कंडिशन शिवाय चालू शकेल. टेन्ट सिटीचे वेगवेगळे पॅकेज येतात २ दिवस १ रात्र किंवा ३ दिवस आणि २ दोन रात्र , आम्ही दुसरा पर्याय निवडला एकदा टेंट सिटी रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर सर्व खाणं-पिणं ब्रेकफास्ट चहा जेवण आणि साईट सीन याचा समावेश आहे , जेवणाची Quality अर्थातच उत्तम (सगळे गुजराती पदार्थ हादडुन झाले ) खूप छान आहे त्यामुळे आम्ही हाच पर्याय निवडला. टेंट सिटीमध्ये राहणार असाल तर बारा वाजता चेकिंग आहे चेक इन करून जेवण करून इतर स्पॉट बघता येतात पुतळ्याला जाण्यासाठी आणि गॅलरीचे तिकीट याची सर्व व्यवस्था टेंट सिटी व्यवस्थित पणे करते. रिसॉर्ट मधून पुतळ्यासाठी सरदार सरोवर धरणासाठी आणि आजूबाजूचे इतर छोटे-मोठे स्पॉट बघण्यासाठी बसेस आहेत या बसेस एअरकंडीशन आहेत तसेच रिसॉर्टचा एक गाईड तुमच्याबरोबर येतो आणि सर्व माहिती देतो पुतळ्यासाठी जर viewing गॅलरी जायचं असेल तर त्याची तिकीट बुक करता येतात.
viewing गॅलरीतुन जे काही दृश्य आहे चित्तथरारक आहे , पुढे सरदार सरोवर धारण आणि भोवताल नर्मदा खोर डोळ्याचं पारणे फेडतात आणि तळ मजल्यावरून viewing गॅलरीला जाणारी लिफ्ट ३६ सेकंदात वर पोहोचवते
सरदार सरोवर आणि सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ पास इतरही काही छोटी-मोठी सुंदर स्थळे आहेत ती पाहता येतात व्हॅली ऑफ फ्लॉवर हे एक नवीन उद्यान जे फक्त फुलांसाठी आहे ते हल्लीच उघडला आहे तसेच जवळपासच्या परिसरात एक राजवाडा आणि एक मंदिर आहे तेही छान आहे.
(Statue of Unity Visit , Sardar Sarovar Dam , Visit Rajvant Palace, Rajpipla , Shoorpaneshwar Temple , valley of flower )
https://live.ipms247.com/booking/book-rooms-narmadatentcity
सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि त्याचा परिसर अत्यंत मोहक आहे पुतळ्याच्या छातीमध्ये viewing गॅलरी आहे त्या गॅलरीचे तिकीट वेगळा आहे माणशी साडेतीनशे रुपये तिकीट आहे. तसेच पुतळ्या पुतळ्यावर संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी जवळजवळ अर्धा तासाचा एक लेझर शो आयोजित केला जातो तोही अत्यंत सुंदर आहे शक्य असल्यास हा शो नक्की पाहावा. हेलिकॉप्टर चे १५ मिनिटाच्या राईडचे माणशी तीन हजार रुपये आहेत
आता रिवाजानुसार सर्व फोटो , काहीही माहिती लागल्यास व्य नि करावा
पुतळ्याचे आणि भोवतालचे काही फोटो
पुतळ्याची भव्य सावली
आम्ही इवलुसे
लेझर शो क्षणचित्रे
टेन्ट सिटी
प्रतिक्रिया
29 Dec 2018 - 8:53 pm | Nitin Palkar
छान माहिती. संक्रातीच्या दरम्यान कच्छच्या रणात, GTDC तर्फे 'रणोत्सव' नावाचा कार्यक्रम आयोजित करते. तिथेही सर्व सोयींनी सज्ज तंबू असतात. या बाबतीत mtdc ला सुधारणा करण्यास खूप वाव आहे.
29 Dec 2018 - 9:10 pm | कपिलमुनी
तीन हजार कोटी मधली काही रक्कम तिजोरीत परत येण्यास हातभार लावल्या बद्दल धन्यवाद
31 Dec 2018 - 10:55 am | माझीही शॅम्पेन
भ्रष्टाचार करून इतकेच रुपये स्विस बँकेत टाकण्यापेक्षा किती पटीनं असा काही भव्य आणि दिव्य उभं करून देशाची शान वाढली आहे , त्यामुळे झालेला माझा खर्च सत्कारणी लागला इतकेच म्हणीन
31 Dec 2018 - 2:36 pm | मोदक
सहमत.. धन्यवाद रे माशँ...!!
फुकट सबसिड्या आणि कर्जमाफी लाटणार्यांनाही तुझ्यामाझ्यासारख्या टॅक्सपेयर जनतेसारखी सत् बुद्धी मिळो. :D
29 Dec 2018 - 9:16 pm | चौथा कोनाडा
अतिशय रोचक माहिती. पुतळ्याच्याउदघाटनाच्यावेळी टीव्ही वर या बद्दल माहिती पाहिली होतीच.
स्तार एबीपी यू त्य़ुब च्यानलवर देखील याचा सुन्दर रिपोर्ताज उपलब्ध आहे तो ही पाहिला.ी
आपन दिलेली तेन्त सितीची माहिती त्रिप प्लानिन्गच्या द्रूशतिने खुपच उपयोगी आहे.
माहिती शेरिन्ग करता धन्यवाद.
29 Dec 2018 - 9:54 pm | पद्मावति
फारच मस्तं.
29 Dec 2018 - 10:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर माहिती आणि फोटो. हा पुतळा बघायची इच्छा आहे, हेवेसांन.
29 Dec 2018 - 10:10 pm | दुर्गविहारी
फारच उत्तम माहिती. माझ्या विनंतीवरून धागा लिहीलात याबध्दल विशेष धन्यवाद. :-) पु.ले.शु.
29 Dec 2018 - 11:30 pm | टर्मीनेटर
मस्त लेख! इथे भेट द्यायची इच्छा होतीच, आता तुमचा लेख वाचल्यावर प्राधान्यक्रमात ती आणखीन वर आली. खूप छान लिहिलंय आणि फोटो पण मस्त.
30 Dec 2018 - 10:51 am | बोका
मी काही दिवसांपूर्वी पाहून आलो.
शनिवार / रविवार लिफ्ट साठी खुप लांब रांग असते असे ऐकून आहे. (मी शुक्रवारी गेलो होतो ) दोन तास लागु शकतात. रांगेत बसण्याची काही सोय नाही.
तसेच पुतळ्याच्या आवारात शिरण्यापूर्वी दोनदा सुरक्षातपासणी होते. (पुन्हा रांग).
कोणतेही खाण्याचे पदार्थ आत नेउ देत नाहीत. सुरक्षातपासणीत फेकून द्यावे लागते.
फूडकोर्ट आहे.
ऑनलाईन तिकिट काढावे.( एक रांग कमी !)
एक्सप्रेस तिकिट काढल्यास कोणतीही रांग नाही. १००० रु -मोठे, मुले समान दर.
31 Dec 2018 - 10:52 am | माझीही शॅम्पेन
चांगला मुद्दा आहे मी याबद्दल विसरून गेलो होतो
शनिवार , रविवार शक्यतो टाळावेत , सोमवारी बंद असतो आणि मंगळवारी सोमवारी बंद असल्याने थोडी गर्दी जास्त असतात
पुतळा शक्यतो सकाळी दहा पर्यंत बघून घ्यावा जेणेकरून नंतर ऊन आणि वाढलेली गर्दी ह्याचा फटका बसणार नाही
------------
जाता जात , तुमचं बोका हे नाव वाचून काळजात चर्रर्र झालं , समस्त मिपाचा परममित्र बोका-ए-आझम जाऊन जवळपास १ महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत :(
30 Dec 2018 - 11:38 am | मुक्त विहारि
धन्यवाद...
30 Dec 2018 - 1:09 pm | कंजूस
सारूँ छे पण मोंघू छे। शुँ करवू?
( जमिनउपर रहेलो पुतलो जोवामाटे छ हजार तो समुंदरवच्चे उभो पुतळोमाटे केटला रुपिया लागशे?)
31 Dec 2018 - 9:01 am | प्रचेतस
जबरदस्त आहे हे. मोदीकाकांनी देखणी निर्मिती केलीय.
31 Dec 2018 - 12:02 pm | सविता००१
माहिती आणि फोटो
31 Dec 2018 - 2:08 pm | मराठी कथालेखक
तुमच्या फोटोवरुन पुतळा किती मोठा आहे याची नेमकी कल्पना आली (आधी फक्त आकडेवारी माहित होती)
परदेशी पर्यटक होते का ?
10 Jan 2019 - 6:24 pm | माझीही शॅम्पेन
फारसे विदेशी पर्यटक दिसले नाहीत टेन्ट सिटी मध्ये राहायला काही विदेश पर्यटक होते , साध्याच विकांताला आणि सुट्टीच्या दिवशी भरपूर गर्दी होते आहे , सर्वात जास्त पर्यटक छोटे होते म्हणजे धडाधड शाळेच्या सहली येत होत्या , चिमुकल्या चेहऱ्यांवर एवढा भव्य पुतळा पहिल्याच समाधान पाहिलं :)
31 Dec 2018 - 2:30 pm | मोदक
सुंदर माहिती.. नक्की भेट देण्यात येईल.
धाग्याबद्दल धन्यवाद हो.
31 Dec 2018 - 4:00 pm | खटपट्या
छान धागा - तुम्हाला एकुण खर्च किति आला?
10 Jan 2019 - 6:28 pm | माझीही शॅम्पेन
कार ने जाऊन येऊन , टेन्ट सिटी साठी चौघांचे मिळून २५ हजार रुपये , बडोद्याहून जाऊन एक दिवसात पाहिलं तर अर्ध्याहून कमी होतील
2 Jan 2019 - 1:52 pm | प्राची अश्विनी
छान आणि उपयुक्त माहिती. आता तिथं जायचा प्लान बनवायला हवा.
2 Jan 2019 - 5:49 pm | कंजूस
आता इकडच्या टुअरसुद्धा आल्या. आजच एक जाहिरात आली.
2 Jan 2019 - 5:57 pm | मंदार कात्रे
जबरदस्त
2 Jan 2019 - 6:33 pm | नाखु
आणि समर्पक छायाचित्रे.
नाखु पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर
2 Jan 2019 - 6:36 pm | विटेकर
इथून अगदी जवळच म्हणजे केवडिया कॉलनी पासून परमहंस परिव्राजक टेम्बे स्वामींची समाधी आहे , नर्मदे च्या किनारी ! जागृत स्थान आहे
2 Jan 2019 - 6:36 pm | विटेकर
इथून अगदी जवळच म्हणजे केवडिया कॉलनी पासून परमहंस परिव्राजक टेम्बे स्वामींची समाधी आहे , नर्मदे च्या किनारी ! जागृत स्थान आहे
28 Jan 2019 - 6:42 pm | माझीही शॅम्पेन
माफ करा पण मला टेम्भे स्वामी बद्दल काहीही माहिती नाही ,
थोडा प्रकाश टाकता आला तर पहा ,
तसेच नक्की जागा सांगता आली तर महाराष्ट्रातील बरेचसे पर्यटक तिथे जाताना अजून एक नवीन ठिकाण पाहता येईल
29 Jan 2019 - 7:33 am | अर्धवटराव
__/\__
नक्की वाचा.
2 Jan 2019 - 11:11 pm | मृत्युन्जय
सुंदर माहिती शेम्पेन शेठ
3 Jan 2019 - 4:07 pm | कुमार१
आणि समर्पक छायाचित्रे.
4 Jan 2019 - 6:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सुंदर माहिती. जायला हवेच एकदा.
4 Jan 2019 - 7:24 pm | खिलजि
सुंदर आणि रोचक माहिती , तसेच सकारात्मक प्रतिसाद मिळून हा लेख उत्कृष्ट झाला आहे . एकंदरीत प्रतिसाद आणि लेखन पाहता , कसे आणि कुठे जायचे हेही समजले .. धन्यवाद , पुढील वर्षी नक्कीच प्लॅन केला जाईल ..
28 Jan 2019 - 3:48 pm | vikrantkorde
छान आणि उपयुक्त माहिती. आता तिथं जायचा प्लान बनवायला हवा.
29 Jan 2019 - 6:27 am | ज्योति अळवणी
अप्रतिम माहिती. हा पुतळा बघायची जबरदस्त इच्छा आहे तुमचा लेख वाचून ती अजूनच बळावली. शनी-रवी नाहींच जयच. सोमवारी बंद! म्हणजे इतर वारी नीट प्लॅन करून जावे लागेल.
मनापासून धन्यवाद
29 Jan 2019 - 6:27 am | ज्योति अळवणी
अप्रतिम माहिती. हा पुतळा बघायची जबरदस्त इच्छा आहे तुमचा लेख वाचून ती अजूनच बळावली. शनी-रवी नाहींच जयच. सोमवारी बंद! म्हणजे इतर वारी नीट प्लॅन करून जावे लागेल.
मनापासून धन्यवाद
30 Jan 2019 - 2:33 am | पाषाणभेद
तंबू शहरातील तंबूचे दर काय आहेत? बिगरवातानुकूलीत अन वातानुकूलीतसह?
आणि जवळच पोयचा हे मंदीर आणि कुबेरधाम आहे. ते नाही बघितले का?
जरुर बघा.
पोयचा येथे मंदीराची मुक्कामाची सोय आहे. अजून पैसे वाचतील. किंवा पिपलिआ येथे हॉटेल्स आहेत.
23 Feb 2019 - 4:48 pm | गोरगावलेकर
धन्यवाद माझीही शॅम्पेन. आपला लेख वाचून खूपच चांगली माहिती मिळाली आणि लगेच जाऊनही आले.
मुंबई सेन्ट्रलहून रात्री साडे अकराच्या गाडीने निघालो. बडोद्याला सकाळी साडे सहाला पोहचलो. स्टेशन बाहेरच चहा घेतला व टेन्ट सिटीसाठी सात आसनी गाडी केली. (२३००+५०० कुबेर मंदिरासाठी. यात परतीचा प्रवास नाही). कुबेर मंदिराला भेट देऊन अकरा वाजता टेन्ट सिटीला पोहचलो. एक रात्र व दोन दिवसाच्या सहलीचे बुकिंग अगोदरच केलेले होते. लगेच रूमचा ताबा घेतला.
काही गोष्टी सोडल्या तर माझीही शॅम्पेन यांनी वर्णन केल्याप्रमाणेच सर्व सहल झाली. आम्ही दोन तंबू बुक केलेले होते. दोघांचाही अनुभव वेगवेगळा. एका तंबूत राहिलेल्या लोकांना तेथे राहणे खूपच आवडले. सगळ्या अडचणी मात्र माझ्याच तंबूत होत्या. ए सी बंद पडल्याने दुपारच्या ३८ डिग्री तापमानात तंबूत भाजून निघत होतो शॉवरला पाणी येत नव्हते. संडासचा फ्लश काम करत नव्हता.
तक्रार केल्यावर एकेक तंत्रज्ञ तंबूत येऊन खूप काम केल्यासारखे दाखवत होता आणि आम्ही मात्र तंबूच्या बाहेर झाडाखाली सावलीला. तीन वाजता बाहेर फिरायला जायची वेळ झाली तरी ए सी चे काम झालेच नाही. संध्याकाळी परत येऊ तोपर्यंत सर्व ठीकठाक झालेले असेल अशी मॅनेजरने खात्री दिली. फिरून आलो. रिसेप्शनलाच मॅनेजरने सर्व हसून स्वागत केले व सर्व काही व्यवस्थित झाल्याचे सांगितले. रूमवर जाऊन बघितले तर ए सी चालू आहे पण फक्त हवेचा झोत येतो आहे पण थंड होतच नाही. परत आरडा ओरड , परत तीच दुरुस्ती करणाऱ्यांची धावपळ. काम झालेच नाही. संध्याकाळी सात वाजता आम्हाला दुसरा तंबू दिला गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता तंबू सोडायचा असला तरी उद्या संध्याकाळपर्यंत येथेच रहा, दुपारच्या जेवणाचे कूपनही फुकट देतो असे सांगून मॅनेजरने स्वतःच्या चुकांवर पांघरून घालून आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला बडोद्याहून दुपारी साडे चारची गाडी पकडायची होती त्यामुळे आम्ही सकाळीच तंबू सोडला.
थोडक्यात :
१. टेन्ट सिटी छानच आहे पण अतिशय महाग आहे.
२. देखभाल-दुरुस्ती व्यवस्था अतिशय खराब.
३. पुतळा बघण्यासाठी लांबलचक रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्यासाठी शनिवार, रविवार टाळावा (आम्ही बुधवार निवडला
होता. रांग नव्हतीच)
४. या भागात उन्हाचा तडाखा खूपच जाणवतो त्यामुळे उन्हाळ्यात पुतळा व टेंट सिटी सहल शक्यतो टाळावी.
4 Mar 2019 - 12:32 pm | माझीही शॅम्पेन
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद , तुमच्या १ , ३ आणि ४ मुद्द्यांशी सहमत , खरतर अजून एक दिवस राहिले असतात तर निवांत झालं असत , दुसरा मुद्दा अनुभवाला नाही पण नक्कीच टेन्ट सिटीच्या सर्व्हिस मध्ये बऱ्याच सुधारणा आवश्यक आहेत , आम्ही थंडीत गेलेलो त्यामुळे AC ची आवश्यकता नवहती , मला वाटत तंबूचा ताबा घेतानाच AC चेक करावा लागेल , बाकी जेवण ब्रेकफास्ट वैगरे एकदम भारी आहे (पैसे सुद्धा) :)
4 Mar 2019 - 12:02 pm | स्वीट टॉकर
उत्तम आणि उपयुक्त माहिती.
प्रत्येक भारतीयाने जायलाच पाहिजे. These are temples of modern India.
4 Mar 2019 - 1:59 pm | गोरगावलेकर
टेन्ट सिटीत तंबूचे तीन प्रकार आहेत
१. स्टॅंडर्ड २. डिलक्स ३. प्रिमिअम व तीनही प्रकारात ए सी व नॉन ए सी.
याबद्दलही एक मुद्दा सांगावासा वाटतो.
तंबू कुठलाही घेतला तरी सर्व सुविधा जसे जेवण, बघण्याची ठिकाणे, रात्रीचा सांस्कृतिक कार्यक्रम, बस सेवा वगैरे संगळ्यांसाठी एकच आहे. बदलते ते फक्त तंबूचे क्षेत्रफळ. त्यामुळे प्रिमिअम तंबू घेऊन आपण जास्त काही वेगळे अनुभवत नाही (स्वानुभव). उगाच प्रिमिअमच्या मागे लागून खर्च वाढवण्यात काही अर्थ नाही.
4 Mar 2019 - 7:26 pm | सुबोध खरे
आम्ही सहा चुलत भावंडं बायकांसहित असे १२ जण एक हेक्झा आणि एक सफारी अशा दोन गाड्यांनि २२ फेब्रुवारीला बडोद्याला गेलो. मुंबईतून हे अंतर ४०० किमीच्या आसपास आहे. रस्ता अप्रतिम आहे परंतु ट्रकची वर्दळ प्रचंड प्रमाणात आहे. ट्रक ड्रॉयव्हरना अजिबात शिस्त नसल्याने सारखे त्यानच्या पुढे जाण्यासाठी या लेनमधून त्या लेनमध्ये सारखे नागमोडी जावे लागते. त्यामुळे प्रवासाला ८ तास लागतात (त्यात मधला नाष्टा जेवणाचा वेळ गृहीत नाही).
२२ फेब्रुवारीला बडोद्याला हॉटेलात मुक्काम केला होता. दुसऱ्या दिवशी तेथून एकात्मतेच्या पुतळ्याला गेलो हे ९० किमी सुद्धा रस्ता उत्कृष्टच आहे. तेथे आपली गाडी पार्क करून त्यांच्या बसनेच सर्वत्र फिरलो. सर्वांचे १००० रूपयांचें तिकीट अगोदरच काढलेले होते त्यामुळे कुठेही रांगेत उभे राहावे लागले नाही. आपण तेथे रांगेत उभे राहून ३५० रुपयांचे तिकीट काढू शकता. दोन्हीच्या सुविधांत रांगेत उभे राहावे लागते एवढे सोडले तर काहीच फरक नाही.
प्रत्यक्ष पुतळा लाम्बपासूनच दिसू लागतो परंतु प्रत्यक्ष जवळ गेल्यावर त्याच्या भव्यतेची कल्पना येते. हा पुतळा फोटोत पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रत्यक्ष पुतळ्याचा जवळ गेल्यावर एक आश्चर्य, उत्सुकता आणि अवाक होणे यातील संमिश्र भावना मनात उचंबळून येते आणि भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या चरणाशी लीन होताना आदर, अभिमान आणि कृतज्ञता या संमिश्र भावाने डोळ्यात अश्रू उभे राहतात.
हा पुतळा त्यांच्या उत्तुंग प्रतिमेला साजेसा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील करारी भाव फोटोत अजिबात पकडता येत नाहीत.
अशी भावना मला प्रथम फक्त ताज महाल पाहताना झाली होती. फोटोत किंवा प्रतिकृतीत हा पुतळा किंवा ताजमहाल यांचे सौंदर्य भव्यता आणि उत्तुंगता याची अजिबात कल्पना येत नाही. आयुष्यात एकदा तरी माणसाने हा पुतळा जरूर पाहावा यात कोणतीही शंका नाही.
स्वच्छता कमालीची आहे. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी अतिशय स्वच्छ अशी स्वच्छतागृहे जागोजागी निःशुल्क आहेत. त्यामुळे विशेषतः स्त्रियांची अजिबात कुचंबणा होत नाही.
आपण भरतो त्याचे पैशात तेथे असलेल्या फुलांची बाग आणि धरणाची सहल अंतर्भूत आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या पातळीचे हे स्थळ आहे असे असूनही तेथे असलेल्या फूड मॉल मध्ये सर्व तर्हेचे उत्तम पदार्थ सर्वाधिक किरकोळ किमतीलाच मिळतात (MRP). म्हणजे थंड पाण्याची बाटली सुद्धा १५ रुपयालाच मिळते किंवा समोसा ४० रुपये लाच मिळतो. एवढे मोठे पर्यटन स्थळ असूनही मॉल सारखे २०० रुपये पॉप कॉर्न आणि ९० रुपयाला पेप्सी असा चावटपणा नाही. याशिवाय तेथे स्थानिक मिळणारी फळे, बोरे, चिंचा, मेवे, खारे दाणे हे सुद्धा मुबलक मिळते.
कुठेही आपल्याला लुटण्यात आले आहे अशी भावना अजिबात येत नाही.
एकंदर -- आंतर राष्ट्रीय पातळीचे पर्यटन स्थळ म्हणून ताजमहालसारखे केवळ एकात्मतेचा पुतळा हे पर्यटन स्थळ भेट देण्याच्या नक्कीच लायकीचे आहे.
परंतु एका दिशेने ४०० किमी चा प्रवास थोडा जास्त होतो आणि जाऊन येउन तुमचे दोन दिवस त्यात जातात. या पेक्षा उत्तम म्हणजे शताब्दी एक्स्प्रेसने सकाळी ६ २५ ला मुंबई सेंट्रल ला बसलात ( किंवा बोरिवली ला ०७.००) तर भरूच ला १०.२५ ला पोटातले पाणी न हलता नाष्ट्यासकट पोचता.माणशी तिकीट ७२५ रुपये. भरूच पासून हे अंतर ९० किमी च आहे तेथून तुम्ही खाजगी टॅक्सी किंवा सरकारी बसने जाऊ शकता. परत येताना दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्यकाळी निवांतपणे येऊ शकता.
4 Mar 2019 - 10:01 pm | गोरगावलेकर
फोटोत किंवा प्रतिकृतीत हा पुतळा किंवा ताजमहाल यांचे सौंदर्य भव्यता आणि उत्तुंगता याची अजिबात कल्पना येत नाही. आयुष्यात एकदा तरी माणसाने हा पुतळा जरूर पाहावा यात कोणतीही शंका नाही.
4 Mar 2019 - 10:05 pm | गोरगावलेकर
"स्टॅचू ऑफ युनिटी" येथील म्युझिअम मध्ये सरदार वल्लभभाई यांच्या चरणी शपथ घेण्याची सुविधा आहे. संगणकावर आपले नांव, शहर, वय व शपथ यांच्या नोंदी केल्या की आपली शपथ/प्रतिज्ञा तेथील मोठ्या पडद्यावर झळकते.
5 Mar 2019 - 12:05 pm | एकविरा
मी सुद्धा तुमचा लेख वाचून जाऊन आले ,तुम्ही दिलेल्या माहितीचा खूप उपयोग झाला . शनिवारी औगस्ट क्रांति ने रात्री बड़ोदयाला पोचलो , बडोदयाला रहिलो , ,7 आसनी गाडीने पुतळा पहायला गेलो , दुपारी 1ला पोचलो ,रस्ते अगदी गुळगुळित , पूर्वी लालू म्हणाले होते -हेमामलिनीचे गाल, ते उगिचच आठवले , आम्ही आधी तिकीट काढले ,गर्दी चिक्कार रविवार असल्यामुळे तरीही अर्ध्या तासात तिकीट मिळालि ,मग आम्ही टेंबे स्वामी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो , जवळच आहे , नंतर 3 वाजता परत आलो ,इथुन त्यांच्या ए सी बस मधुन प्रवास ,आम्हाला लेझर शो पहायचा होता म्हणून आम्ही आधी सरदार सरोवर ,नंतर valley of flower आणि मग 4 वाजे पर्यंत statue of Unity असा उलटा प्रवास केला .त्यामुळे प्रवेश रांग बरीचशी ओसरली होती , पण तुम्ही म्हटल्या प्रमाणे एक्सप्रेस तिकीट साठी direct entry नव्हती, आम्ही साधे तिकीट काढले होते पण एक्सप्रेस तिकीट वाले वाद घालत होते ,एक्सप्रेस तिकीट चा फायदा फक्त viewing gallery ला होतो ,तिथे त्याना वेगळी रांग होती .
-------------प्रत्यक्ष पुतळ्याचा जवळ गेल्यावर एक आश्चर्य, उत्सुकता आणि अवाक होणे यातील संमिश्र भावना मनात उचंबळून येते आणि भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या चरणाशी लीन होताना आदर, अभिमान आणि कृतज्ञता या संमिश्र भावाने डोळ्यात अश्रू उभे राहतात.
अगदी सहमत ,
5 Mar 2019 - 12:11 pm | एकविरा
आम्ही दुसर्या दिवशी बडोद्यातिल तपोवन पाहिले
दुपारी पावागड शक्ति पिठ - रोप वे आहे , संध्याकाळी अजवा नि मेट -इथे छान गार्डन आणि thrilling rides आहेत .
6 Mar 2019 - 8:15 am | चामुंडराय
सरदार पटेलांच्या पुतळ्याला तडे गेले आहेत आणि त्याच्या चिरा दिसत आहेत अशी वदंता आहे. हे खरे आहे काय?
6 Mar 2019 - 1:39 pm | सुबोध खरे
हि कुणा तरी हलकटाने पिकवलेली कंडी आहे.
कारण ब्रॉन्झ किंवा पितळेच्या वस्तु या मिश्र धातूच्या असल्यामुळे त्या गंजत नाहीत किंवा वारंवार गरम आणि थंड झाले तरी त्याना तडा जात नाही.
मग अगदी आतील सांगाडा जो सिमेंटचा आहे त्याला तडा जातो असे मान्य केले तरी बाहेर असलेल्या ब्रॉन्झच्या तबकड्याना (प्लेट्स) तडा जाणार नाही
म्हणजेच हे तडे बाहेरून दिसणे शक्य नाही. हे म्हणणे म्हणजे केवळ हलकटपणाचा बाजार आहे. दुर्लक्ष करा.
आम्ही काढलेल्या सर्व फोटो मध्ये कुठेही असे दिसत नाही.
8 Mar 2019 - 3:40 pm | माझीही शॅम्पेन
नतद्रष्ट लोकांची कमी नाहीये भारतात , हा पुतळा म्हणजे अक्षरशः अफाट आणि अद्भुत आहे , असल्या अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नका :)
9 Mar 2019 - 1:24 am | चामुंडराय
माहिती बद्दल धन्यवाद _/\_
एकदा जरूर भेट द्यायला पाहिजे.
रच्याकने, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांसाठी असे काही करता येईल काय असा विचार मनात आला.
9 Mar 2019 - 12:42 pm | सुबोध खरे
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे हि संकल्पना ९० च्या दशकापासून महाराष्ट्रात विचारमंथन करते आहे. परंतु आपले एकंदर राजकारणी( सर्वपक्षीय) पाहिले तर ते विचारमंथन ऐवजी वैचारिक मैथुनच चालू आहे असे दिसते आहे.
गुजरात सरकारने २०१३ ला कल्पना मंडळी २०१४ मध्ये त्यावर काम चालू केले आणि २०१८ मध्ये पुतळा प्रत्यक्षात आला सुद्धा.
आणि आपण महाराष्ट्रात त्यावर गेली ३० वर्षे काथ्याकूट आणि वैचारिक मैथुनच करत आहोत.
आपल्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे.
https://en.wikipedia.org/wiki/Shiv_Smarak
https://thewire.in/government/chhatrapati-shivaji-statue-mumbai-coast
https://www.indiatoday.in/india/story/shivaji-statue-to-cost-maharashtra...
10 Mar 2019 - 4:16 am | चामुंडराय
एकंदरीतच मराठी माणूस आणि मुख्यतः मराठी राजकारणी राज्यकर्ते यांची इच्छाशक्ती कमी पडते आहे असे दिसते आहे.
महाराष्ट्रात असंख्य गड, किल्ले आहेत. तेव्हा योग्य अशी जागा निवडून ज्या टीमने हा सरदार पटेलांचा प्रकल्प साकारला आहे त्यांना हे काम दिले तर सुकर होईल असे वाटते.
अर्थात ३० वर्षे पडलेले भिजत घोंगडे बघता मोदीमामांनी काही मनावर घेतले तरच शक्य होईल असे वाटते.
(आता पळा, नाहीतर भक्त म्हणून शिक्का पडायचा !)
6 Mar 2019 - 10:44 am | गोरगावलेकर
असे काही जाणवले नाही किंवा निव्वळ उणिवा शोधण्याच्या दृष्टीने मी पाहिले नाही. पुतळा पूर्ण भरीव नाही. आधी काँक्रीटचे दोन उंच खांब उभारून त्याच्या बाजूने लोखंडाचा ढाचा बनवला गेला. या ढाच्यावर तुकड्या तुकड्यात ब्रॉन्झ धातूचे पत्रे जोडले गेले आहेत. कदाचित कुठेतरी जोड देतांना वगैरे चिरा राहिल्या असू शकतील. (काँक्रिटचे हे दोनही खांब पुतळ्याच्या पायात आहेत व यातूनच वर जाण्यासाठी दोन लिफ्ट आहेत)
पुतळा उभारणीची माहिती येथे संध्याकाळी होणाऱ्या लेसर शो मध्ये दिल्या जाते. मुलीने या शो चे चित्रण केले होते. मी ते यु ट्यूबवर टाकले आहे. लिंक खाली देत आहे. १४ व्या मिनिटांपासून उभारणीची माहिती बघू शकाल.
https://youtu.be/ErnmrovozGA
6 Mar 2019 - 5:34 pm | स्मिता.
मूळ लेख आवडला होताच पण तुमच्या व्हिडिओमुळे लेखाची शोभा वाढली. कॅमेरातून केलेले चित्रण लॅपटॉपच्या छोट्या पडद्यावर बघतांना सतत अंगावर रोमांच होते. प्रत्यक्षात हा अतिभव्य पुतळा बघणं हा खास असा अनुभव असणार यात काही शंका नाही. शक्य तेव्हा नक्कीच भेट देणार.
अतिअवांतरः पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर हेसुद्धा केवळ एक पोलादाचे स्ट्र्क्च्र आहे. दुरून पाहतांना त्याच्याही भव्यतेची जाणीव होत नाही. परंतु जसजसे जवळ जावे तसे त्याच्या भव्यतेने आणि तंत्रज्ञानाने आपण भारावून जातो. जेव्हा आय्फेल टॉवरची बांधणी आणि उभारणी होत होती तेव्हा अनेक फ्रेन्च लोक त्याच्या विरोधात होते. पण आज त्याच टॉवरमुळे जगभरातले पर्यटक तेथे आवर्जून येतात.
जर या एकात्मतेच्या पुतळ्याजवळच्या सोयीसुविधांचा दर्जा उत्तम राखला (आणि योग्य जाहिरात केली) तर भविष्यात अनेक परदेशी पर्यटक तेथे भेट देतील.
12 Mar 2019 - 8:10 pm | मदनबाण
छान माहिती दिली आहे, फोटो आवडले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RAW - Romeo Akbar Walter | Official Trailer |
14 Mar 2019 - 5:24 pm | चौथा कोनाडा
हा धागा वाचल्यावर १५-२० दिवसानी लगेचच म्हणजे १५ जानेवारीला स्टॅचू ऑफ युनिटीला भे्ट देन्य़ाचे योग आले.
हा धागा वाचून टेन्ट सिटीलाच राहायचे होते, पण अहमदाबाद मुक्कामी परातायचे असल्याने ते शक्य झाले नाही.
पुतळा पाहताना डॉ सुबोध खरे यांनी वर्णन केलेली :
प्रत्यक्ष पुतळ्याचा जवळ गेल्यावर एक आश्चर्य, उत्सुकता आणि अवाक होणे यातील संमिश्र भावना मनात उचंबळून येते आणि भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या चरणाशी लीन होताना आदर, अभिमान आणि कृतज्ञता या संमिश्र भावाने डोळ्यात अश्रू उभे राहतात.
हा पुतळा त्यांच्या उत्तुंग प्रतिमेला साजेसा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील करारी भाव फोटोत अजिबात पकडता येत नाहीत.
फोटोत किंवा प्रतिकृतीत हा पुतळा किंवा ताजमहाल यांचे सौंदर्य भव्यता आणि उत्तुंगता याची अजिबात कल्पना येत नाही.
आयुष्यात एकदा तरी माणसाने हा पुतळा जरूर पाहावा यात कोणतीही शंका नाही.
याची अनुभुती घेतली !
डॉ सुबोध खरे, धन्यवाद, खुपच अप्रतिम शब्दात पकडल्या आहेत आपण, आम्हा सर्वांच्या भावना !
सुर्यास्ताचा समय असल्याने मावळतीच्या रंग-उधळेणीच्या पार्शवभूमी वर पुतळ्याचे दर्शन संस्मरणीय़ झाले. आयुष्यातील लक्षात राहणारे क्षण !
सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवरील सरदार पटेलांचा भव्य पुतळा.
सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनावरील प्रदर्शन अप्रतिम आहे. क्लासिकच ! पोस्टर्स पाहताना, मजकूर वाचताना वेळ पुरत नाही.
राजपिप्पलाचा रोड सुंदर आहे, दोन्ही बाजूनी असलेली झाडी सुखद होती. तसा हा प्रदेश रखरखाटीचा आहे. जानेवारी मध्ये देखिल हे जाणवत होते. इथं भेट द्यायचा कालावधी हिवाळ्यातच बेस्ट !
येता येता जवळच असलेले (पुतळ्यापासून ५५ किमी अलीकडे पोइचा येथिल नीळकंठधाम. स्वामीनारायण मंदिर पाहिले, सुंदर आहे, रात्री अप्रतिम विद्यूत रोषणाई पहायला मिळाली. ही रोषणाई चुकवू नये अशी आहे