सागु अर्थात कानडी मिश्र भाजी

शाल्मली's picture
शाल्मली in पाककृती
17 Mar 2009 - 2:47 pm

नमस्कार खवय्यांनो,

ही आहे कानडी पद्धतीची मिश्र भाजी. कानडी लोक या भाजीला सागु म्हणतात.

साहित्यः-
१ वाटी फरसबी
१ वाटी मोठे चिरलेले गाजराचे तुकडे
अर्धी वाटी मटार
अर्धी वाटी फ्लॉवरचे तुरे
१ बटाटा चौकोनी चिरून
१ लहान कांदा
१ लहान टोमॅटो
३ मोठे चमचे खोबरं
३-४ लवंगा
१ तुकडा दालचिनी
१ लहान चमचा भाजलेली खसखस
१०-१२ काजू
३-४ हिरव्या मिरच्या
१ लहान चमचा प्रत्येकी धने-जिरे
मूठभर कोथिंबीर
चवीनुसार मीठ
१ चमचा साखर
फोडणीचे साहित्य - तेल, मोहरी, हिंग,हळद.

कृती-
प्रथम फरसबी, गाजराचे तुकडे, मटार, फ्लॉवर, बटाटा या भाज्या धुवून घ्याव्यात. कुकरमधून २-३ शिट्ट्या करून शिजवून घ्याव्यात.
एका मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, खोबरे, लवंग, दालचिनी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, धने, जिरे, काजू, खसखस असे एकत्र करून, थोडे पाणी घालून मऊ मुलायम पेस्ट करून घ्यावी. शिजलेल्या भाजीत ही पेस्ट घालून ढवळून घ्यावे. भाजी फार घट्ट वाटल्यास गरजेनुसार अर्धी वाटी पाणी घालावे. त्यानंतर यात मीठ, साखर घालावे.
एका कढल्यात २ चमचे तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. आणि भाजीवर ही फोडणी घालावी.
भाजीला एक उकळी येऊ द्यावी.
पुर्‍या/पराठे/पोळी/भात कशाहीबरोबर ही भाजी गरम गरम वाढावी. :)
ही भाजी अतिशय पटकन होते आणि चविष्टही लागते !!

--शाल्मली.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

17 Mar 2009 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार

लज्जतदारच दिसतीये.
त्या भोगीला घरी करतात त्या भाजीची आठवण झाली. बहुतेक 'लेकुरवाळी' का काय असे म्हणतात तीला.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्मिता श्रीपाद's picture

17 Mar 2009 - 2:58 pm | स्मिता श्रीपाद

मस्तच ग शाल्मली...

माझ्या माहितीप्रमाणे...सेट डोश्यासोबत सागु देतात...

मस्त लागतं ते :-)

मी सेट दोसा करुन पाहिला होता पण सागु येत नसल्यामुळे सांबार सोबत खाल्ला...

आता सेट दोसा आणि सागु नक्की करुन बघणार... :-)

धन्यु.

-स्मिता

शाल्मली's picture

17 Mar 2009 - 5:35 pm | शाल्मली

सेट डोश्यासोबत सागु देतात...

बर.. हे माहीत नव्हते.
आता पुढच्या वेळेस सेट डोसा आणि सागु! :)

--शाल्मली.

अनिल हटेला's picture

17 Mar 2009 - 2:58 pm | अनिल हटेला

कानडी मध्ये सागु चा अर्थ भाजी असा होतो...

चित्रात तरी भाजी छान च दिसतीये ,टेस्ट केल्याशिवाय कशी कळाणार ? ;-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

छोटा डॉन's picture

17 Mar 2009 - 5:43 pm | छोटा डॉन

शाल्मलीताई, एकदम भारी रेसिपी टाकलीस ...
फोटोही अगदी जीवघेणा.

आजच आम्ही "पुरी-सागु" खाल्ले, फारच अप्रतिम लागते ही डीश ...
सोबत फक्त चवीपुरती नारळाची चटणी असावी ..

अवांतर : इथे बंगलोरमध्ये जेव्हा हे सागु करतात तेव्हा वर चित्रात दाखवल्याप्रमाणे रंग नसतो. इथे शुद्ध हळदीचाच रंग येतो, फिक्कट पिवळा. शिवाय रस्सा हा एकदम घट्ट असतो, थोडाफार पळीसांड म्हणावा इतका ...
मला वाटते की बटाटे मॅश करुन हे लोक त्याचा वापर रश्श्यात भरपुर करत असावेत. :)

------
(सागुप्रेमी ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

रेवती's picture

17 Mar 2009 - 6:15 pm | रेवती

माझी आवडती भाजी आहे ही.
वाटणामध्ये काजू, खसखस घालतात ही माहीती नविन.
पुढच्यावेळी दोन्ही जिन्नस घालून पाहीन.
फोटू मस्त!
रेवती

विसोबा खेचर's picture

17 Mar 2009 - 6:15 pm | विसोबा खेचर

अरे वा! छान आहे पाकृ! :)

तात्या.

क्रान्ति's picture

17 Mar 2009 - 9:09 pm | क्रान्ति

फोटोच इतका सुन्दर आहे तर भाजी नक्कीच मस्त असणार! करून पहायला हवी.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

श्रीया's picture

17 Mar 2009 - 10:49 pm | श्रीया

फोटो आणि करण्याच्या पध्दतीवरुन छानच वाटतीय ही सागु.
नक्की करुन पहायला हवी.

श्रावण मोडक's picture

17 Mar 2009 - 11:14 pm | श्रावण मोडक

हा एक प्रकारे कर्नाटकी कुर्मा. बेळगावात ही भाजी आणि पुऱ्या मिळायच्या. कुर्मा पुरी असे त्याचे नाव असायचे. पुरी-भाजी म्हटल्यावर येणारी भाजी म्हणजे बटाटा, कांदा, फरसबी वगैरेंची काहीशी महाराष्ट्रीय मसाल्यातली भाजी. तिचा रस्सा पातळ असायचा. कुर्मापुरीतील या भाजीचा रस्सा घट्ट. हा मसाला आणि करण्याची पद्धतही थोडी वेगळी आहे, वर दिल्याप्रमाणेच.
अवांतर : एक बाऊल भाजीसोबत दोन किंवा तीन प्लेट पुऱ्या आम्ही मित्र हाणायचो. कारण त्या पुऱ्यांनाही एक खमंग चव असायची. सोबत भाजी पाहिजेच असे नाही. भरपेट व्हायचे. वर तो टिपिकल उडपी चहा अर्धा-अर्धा हाणला की झालं. तीन तासांची निश्चिंती.

प्राजु's picture

17 Mar 2009 - 11:52 pm | प्राजु

खूपच छान आहे फोटो.
बरं झालं संध्याकाळचा प्रश्न सुटला. तश्याही पुर्‍या करणारच होते आज. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

18 Mar 2009 - 12:02 am | नंदन

पाककृती आणि फोटू झकासच. एका कारवारी घरी पुरीसोबत खाल्लेली ही मिश्र भाजी (आणि मुगांबट) आठवले.

अवांतर - सागु हा शब्द बहुधा 'शाक'वरून आला असावा असे वाटते. गुजरातीत तसंही भाजीला शाक म्हणतात.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Mar 2009 - 12:24 am | बिपिन कार्यकर्ते

छान!!! फोटूही छान आहेच.

बट व्हॉट टूक इट सो लाँग? :?

बिपिन कार्यकर्ते

शाल्मली's picture

18 Mar 2009 - 12:44 am | शाल्मली

प्रतिक्रियेसाठी आभार!

बट व्हॉट टूक इट सो लाँग?

हाहा..
आठवडाभर प्रकृती ठणठणीत राहिल्यावर मगच पाकृ. टाकली..
मिपाकरांची काळजी हो.. :)

पदार्थ घरच्यांना खायला घालून चार दिवस त्यांची प्रकृती ठणठणीत राहिली की मगच मिपावर प्रकाशित करते. सगळेच पदार्थ काही मिपावर टाकलेले नाहीत. ;)

--शाल्मली.

चित्रा's picture

18 Mar 2009 - 1:10 am | चित्रा

>सगळेच पदार्थ काही मिपावर टाकलेले नाहीत.

हा हा!

कृती/फोटो छान दिसत आहेत.

हम्म्म्..तरीच अधून मधून लिखाळ अचानक विडंबने किंवा समीक्षा करतात!! ;)

चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

18 Mar 2009 - 11:44 am | प्रभाकर पेठकर

भाजी मस्त चमचमीत स्वभावाची दिसते आहे. अभिनंदन.

एक प्रश्नः
खोबरं सुकं (किसलेलं) की ओला नारळ वापरायचा?

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

शाल्मली's picture

18 Mar 2009 - 5:41 pm | शाल्मली

प्रतिसादाबद्दल आभार!

खोबरं सुकं (किसलेलं) की ओला नारळ वापरायचा?

शक्यतोवर ओला नारळच. पण माझ्याकडे ओलं खोबरं उपलब्ध नव्हते म्हणून मी सुकं खोबरं आणि इथे नारळाचे दूध मिळते. ते वाटणात घातले होते.

--शाल्मली.

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2009 - 8:49 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद शाल्मली. आता करून पाहीन.

चिरोटा's picture

18 Mar 2009 - 3:13 pm | चिरोटा

ह्या भाजीत ओल्या मिरच्या पण टाकतात इकडे शान्तिसागरवाले.त्यामुळे जपुन खावी लागते.
-----------------------------------------
बेन्गळुरु

स्वाती दिनेश's picture

18 Mar 2009 - 5:51 pm | स्वाती दिनेश

भाजी आवडली, फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले. म्युनस्टरचे तिकिट काढेन म्हणते,;)
स्वाती

कुठल्या पाककृतीतली प्रमाणे लक्षात ठेवायची नाही हे मी ठरवलेलेच आहे जणू.

शिवाय घरी कांदा नव्हता (हे सांगायला लाज नाही वाटत मला?)
तस्मात लवंग-दालचीनी-गोव्याचे कोकणी "दगडफूल"(दोन फुले)*-सुके खोबरे-टमाटो-(भरपूर) कोथिंबीर-काजू-खसखस-हिरव्या मिरच्या-धने-जिरे-दोन मिरी-हिरव्या मिरच्या (म्हणजे जवळजवळ वरच्यासारखेच) मिक्सरमध्ये वाटले. हिरवाकच्च मसाला झाला.

घरात होत्या त्या भाज्यांचे (शेंगा, बटाटे, वांगी) चिरून तुकडे केले, शिजवले. मोहरी-हिंग-हळदीची फोडणी केली. हिरवा मसाला, शिजवलेली भाजी घातली. मीठ गूळ घातला.

हिरव्यागार घट्ट रसाची मस्त भाजी झाली. शाल्मलींनी सांगितल्यासारखी नाही, आणि कन्नड लोक वाटल्यास नाक मुरडू देत, पण आज दिल खुश! स्फूर्तीबद्दल शाल्मलींना धन्यवाद.

*(गोव्याचे दगडफूल हे वाळलेल्या शेवाळ्यासारखे नसून लाकडी चांदणीच्या आकाराचे असते, त्याला बडीशेपेसारखा काहीसा मोहक वास असतो. याला मराठीत काय म्हणतात माहीत नाही. मराठी दगडफूल हे अगदी मस्त मसालेदार वासाचे काळपट पापुद्रे असतात.)

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2009 - 8:55 am | प्रभाकर पेठकर

गोव्याचे दगडफूल हे वाळलेल्या शेवाळ्यासारखे नसून लाकडी चांदणीच्या आकाराचे असते, त्याला बडीशेपेसारखा काहीसा मोहक वास असतो. याला मराठीत काय म्हणतात माहीत नाही. मराठी दगडफूल हे अगदी मस्त मसालेदार वासाचे काळपट पापुद्रे असतात

त्याला दगडफूल नाही म्हणत. 'बाद्यान' म्हणतात. (त्यालाच 'बादियान', चक्रिफुल असेही म्हणतात.) इंग्रजीत त्याला 'स्टार ऍनीज' असे म्हणतात.

बा़की वाक्याच्या शेवटी दिलेले 'दगडफुला'चे वर्णन बरोबर आहे.