अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ०, भाग - १. आणि माझे सर्व लेखन
मागच्या भागात आपण सेल्फ अॅनालीसीसची तोंड ओळख करून घेतली. तोंडओळख अशासाठी जसजसे आपण पुढे सरकू, तसतसे चालू विषयाच्या अनुषंगाने आपण सेल्फ अॅनालीसीस का आणि कसा आवश्यक आहे ते पण पाहू. त्याच सेल्फ अॅनालीसीसचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे पेशन्स तो आपल्यात असलाच पाहिजे हा ही मार्केटचा नियमच आहे.
जर आपण एखादे दुकान काढले आणि आपल्या आजूबाजूलाच आपले स्पर्धक असतील तर काय होईल ? तुमच्या दुकानावरून एखादा माणूस बाजूच्या दुकानात जाताना दिसला किंवा नुसताच तुमच्या दुकानाकडे बघत बघत गेला तर त्याचा कान धरून तुम्ही दुकानात आणू शकता का ? नाही. मग तो दुकानात यावा म्हणून प्रयत्न करणे, त्यानंतर तो येईपर्यत वाट पाहणे हेच आपल्या हातात रहाते. हे अगदी प्राथमिक झाले. मार्केटिंग कोळून प्यायलेले इथे १०० उपाय सुचवतील तरीही त्या उपायाचे परिणाम पाहण्यासाठी वाट पाहणे अपरिहार्यच आहे. तर, जसे गिऱ्हाईक येण्याची वाट पाहणे हि सक्ती आहे तसेच आपल्याला हव्या त्या भावालाच आपल्या दुकानातील वस्तू विकणे हि व्यवसायाची शिस्त आहे आणि दोन्ही ठिकाणी वाट पहाणे किंवा पेशन्स हे अपरिहार्य आहेत. (किंवा जर बँकेत आपण एफ.डी केली तर बँक आपल्या खात्यावर त्याचे जे काही व्याज आहे ते एका विशिष्ठ तारखेला जोपर्यंत जमा करत नाही तो पर्यंत आपण काही करू शकतो का ? नाही. तिथे ही वाट पहाणे आलेच. ) ह्या उलट जेव्हा आपण आपल्या ट्रेडिंग टर्मिनल वर बसून ट्रेड करतो, तेव्हा आपल्या हातात आपल्या मनाला येईल तसे खरेदी आणि विक्री करणे असल्याने आपण पेशन्सच्या ऐवजी टेम्पटेशन्सचे बळी ठरतो. मला वाटते इतक्या उदाहरणावरून पेशन्सचे महत्त्व लक्षात यावे. स्वतंत्र आणि स्वैर ह्यातला फरक व्यवसायाला सुरुवात करण्या आधीच स्पष्ट होणे गरजेचे आहे.
तसेच शेअर्स ट्रेडिंगच्या यशस्वी प्रवासात लागणारी दोन स्थानके म्हणजे खरेदी आणि विक्री ह्या दोन्हीसाठी पेशन्स लागतो. खरेदी काळजीपूर्वक करावी लागते. त्यासाठी स्थिर मनाने बरीच कामे करावी लागतात, अभ्यास करावा लागतो, तर्क लढवावे लागतात आणि वाऱ्याच्या वेगाने येणाऱ्या माहितीतून ओला कचरा (बातम्या) - सुका कचरा (अफवा) वेगळा काढावा लागतो. तेव्हा खरेदीचा काळ, भाव समजतो. बरे, नुसता तो समजून चालत नाही तर एकूण भांडवलाच्या किती % रक्कम गुंतवणूक म्हणून वापरावी आणि किती % रक्कम ट्रेडिंगसाठी वापरावी ह्याचे वैयक्तिक गणित, तर्कशुद्ध पद्धतीने, आधी कागदावर मांडावे लागते. सेल्फ अॅनालीसीसमध्ये पेशन्स ही प्रचंड मोठी स्ट्रेंग्थ ठरू शकते.
शेअर मार्केट म्हणजे झटपट पैसा हा प्रचंड मोठा गैरसमज दूर करून आणि शेअर मार्केट म्हणजे आपली नोकरी किंवा आपल्या दुसऱ्याच कुठल्यातरी मूळ व्यवसायाच्या बरोबरीने करायचा जोड - धंदा म्हणून ह्या धंद्यात उतरणे ही आत्महत्या आहे. इथे मी शेअर मार्केट हा एक धंदा आहे असे म्हणतो आहे कारण ज्यांना ट्रेडिंगमध्ये स्वारस्य आहे त्यांनी त्याचा १००% विचार करावा. उभे राहून बुडलेले आणि उभे होण्याआधीच बुडलेले असंख्य इतर धंदे आणि शेअर ट्रेडिंगचा धंदा ह्यात मुलभूतरित्या काहीच फरक नाही. पण शेअर ट्रेडिंगमध्ये बुडालेला माणूस आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत चटकन येतो. इतर धंद्यातले अयशस्वी झालेले लोक ठळकपणे लोकांच्या लक्षात येत नाहीत म्हणून इतर धंद्यात कुणी बुडतच नाही असे अजिबातच नाही. दोन्ही धंद्यात बुडालेले हे धंद्याचे नसलेले ज्ञान किंवा अनेक वर्ष करून देखील धंद्याचे न उमगलेले गाणित ह्या कारणानेच बुडतात. (व्यवसायातला कमालीचा यशस्वी माणूस रम, रमा, रमीच्या नादाने रसातळाला गेलेला पाहिला आहे.)
गुंतवणूक हा सर्वस्वी वेगळा विषय आहे. त्याची गणिते, त्यासाठी लागणारे भांडवल, आवश्यक वेळ आणि वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीची करावी लागणारी मशागत हे समजूनच ती करता येते.
पण ज्या अर्थी तुम्ही टेक्निकल अॅनालीसीसचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करता आहात त्याअर्थी तुम्हाला ट्रेडिंगमध्ये स्वारस्य आहे असे मी गृहीत धरतो.
टेक्निकल अॅनालीसीस ह्या विषयाच्या गाभ्याकडे येण्याआधी “अॅनालीसीस” ह्या संज्ञेबद्दल जमेल तेव्हढे विस्ताराने लिहण्यामागचे कारण इतकेच कि फक्त “अॅनालीसीस” हा विषयच इतका अथांग आहे तर त्यानुषांगाने येणारे टेक्निकल किंवा फंडामेंटल किंवा इतर अनेक अॅनालीसीस आपण किती गांभीर्याने आणि सखोल अभ्यासाने आत्मसात करण्याची गरज आहे त्याची झलक वाचणाऱ्याला यावी.
आता गृहपाठाचे उत्तर,
मागील भागातील गृहपाठ हा अत्यंत महत्त्वाचा वाटावा म्हणून त्याधीचे लेखन त्रोटक ठेवण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येकाच्या प्रतिसादातील विविधता लक्षात घेता त्यातून त्यांच्या विचारसरणीचा बोध होतो. (इथे कुणी चूक किंवा बरोबर हा प्रश्नच नाही. त्यामुळे त्यावर (काठ्याकुट...) काथ्याकूट अपेक्षितच नाही.) प्रत्येकाच्या प्रतिसादातील नैसर्गिकता लक्षात घेणे गरजेचे आहे. ह्या उदाहरणात सगळ्यांनी स्त्रीवर आणि तिच्या गोऱ्या देहावर फार नैसार्गिकरित्या फोकस केले. जेव्हा शेअर्सच्या टिप्स येतात तेव्हा कुणा दुसऱ्याने केलेला अॅनालीसीस कशावर फोकस्ड असेल ते आपणास कळणे केवळ अशक्य असते हे लक्षात यावे म्हणून दिलेला तो गृहपाठ होता. जेव्हा दुसऱ्याच्या अॅनालीसीस वर आपण अवलंबून असतो तेव्हा एक लक्षात घ्यावे कि तो एका उन्मादात (म्हणजे बघा मी किती उत्तमरितीने अॅनालीसीस केला आहे. किंवा मला तो किती परफेक्ट रितीने उस्फुर्तपणे सुचलेला आहे वगैरे )असतो. जोपर्यत त्या अॅनालीसीसच्या विपरीत परिणाम त्याला दिसत नाहीत तो पर्यंत तो उन्माद टिकतो. पण त्याचे परिणाम कसे होतात तेही आपण पुढे जाऊन पाहणार आहोतच.
तर, विश्लेषणासाठी जॉनचे वर्णन आणि मॅटील्डाचे वर्णन जर वाचले तर एक क्लू मिळू शकतो. (श्री. श्याम भागवत ह्यांनी हा क्ल्यू दिला होता.)
दिसायला किंचित उग्र, राकट हातांचा, उंच पुरा जॉन हा मजूर होता. मजुराचे हात आणि नाजूक सुंदर, गोऱ्या देहाच्या मॅटील्डाचे हात ह्यात विक्रीचे गमक दडलेले होते. बाजारातल्या इतर विक्रेत्यांचे आणि जॉनचे हात आणि त्या समोर मॅटील्डाचे हात ह्याची तुलना केली तर ह्याचे उत्तर कदाचित मिळाले असते. इथे विक्रीसाठी असलेल्या प्रोडक्टकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. पूर्वीची जॉनची मॅनेजमेंट फेल गेल्याने आलेली मॅटील्डाची नवी मॅनेजमेंट केवळ स्त्री आहे म्हणून प्रोडक्ट विकण्यात यशस्वी होईल हा तर्क कितपत योग्य आहे. हे झाले विक्रेत्याच्या बाजूने केलेले विश्लेषण पण खरेदीदाराचीही काही बाजू असेलच. तो काही मॅटील्डाचे सौंदर्य पाह्यला बाजारात येत असतील का? . (ठरलेल्या कोळणीकडे मासे घेणारे काय विचार करून बाजार विकत घेतात त्याबद्दल त्यांनी त्यांचे अनुभव प्रतिसादात द्यावेत.) नक्कीच येत असतील ती शक्यता नाकारता येतच नाही. पण मुरलेला पट्टीचा खरेदीदार हा प्रोडक्टची क्वालिटी बघून येणार. ह्या दोन्ही म्हणजे नवख्या अशा (जो मॅटील्डाचे सौदर्य पहायला येतो आहे. ) आणि मुरलेल्या खरेदीदाराचा फोकस कशावर आहे त्यावर सगळे अवलंबून आहे. जितके प्रतिसाद आले त्यात अंड्याच्या क्वालिटी काय असू शकते? ह्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. विक्री वाढण्यास केवळ त्या प्रोडक्टचे प्रेझेन्टेशनच महत्त्वाचे होते असे माझे विश्लेषण मला सांगते. पुन्हा सांगतो इथे कोण चूक किंवा बरोबर ह्यावर फोकस नसून विश्लेषणात कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत त्यावर फोकस आहे.
मजूर असलेल्या जॉनच्या हातात अंड्याचा आकार अत्यंत लहान दिसत असल्याने खरेदीदारास तो लहान अंडी आपल्या गळ्यात मारतो आहे असे वाटून आणि तीच अंडी मॅटील्डाच्या हातात आकारमानाने मोठी दिसत असल्याने गिऱ्हाईक त्या अंड्यांच्या आकारमानाला भुलतील ह्या गृहितकावर आधारित सल्ला कुणीतरी जॉनला दिला आणि तो क्लिक झाला इतकेच.
त्यामुळे सल्ला देणारा किती तार्किकतेने देतो आहे त्यावर अनेक गोष्टी, निर्णय अवलंबून असतात. तो चूक कि बरोबर हे कालांतराने कळते पण तोपर्यंत आपल्याला पैसे मिळालेले तरी असतात किंवा गेलेले तरी असतात. केव्हाही काहीही होऊ शकते. जसे मार्केटमध्ये येण्याचे आमंत्रण देणारे माझ्यासाखे आणि मार्केट म्हणजे जुगार, प्रलोभने दाखवणारे आणि दिशाभूल करणारे ह्यांनी भरलेले आहे असे सांगणारे ह्या दोघांचे हि ऐकून, त्याचे योग्य विश्लेषण करून फक्त स्वतःच्या अभ्यासाने आणि निर्णयाने पुढील वाटचाल करावी. ती कशी करावी ह्याची सुरुवात आपण पुढील लेखापासून करूच.
पुढचा भाग : कल (Trend )
प्रतिक्रिया
27 Jan 2019 - 2:01 pm | शाम भागवत
वाचतोय. छान समजावून सांगताय.
तेव्हा आपल्या हातात आपल्या मनाला येईल तसे खरेदी आणि विक्री करणे असल्याने आपण पेशन्सच्या ऐवजी टेम्पटेशन्सचे बळी ठरतो.
हे वाक्य ज्याला निट समजेल, उमजेल व पचवेल तो शेअरबाजारात नेहमी पैसे मिळवत राहील. कारण नुकसानीचे व्यवहार त्याचे कमी असतील.
27 Jan 2019 - 4:47 pm | तुषार काळभोर
याची किंमत मला दहा वर्षांपूर्वी कळली आहे.
तेव्ह ट्रेडिंग करताना बरोबरचा मित्र राहुल द्रविडसारखा होता. खेळपट्टीवर उभं राहायचं. आउट नाही व्हायचं. रन्स आपोआप बनतात.
मी पहिल्या बॉल पासून दांडपट्टा सुरू. बहुतेक वेळा स्वस्तात आउट. महिन्यातून एखादा (योगायोगाने बसलेला) फटका. सहा महिन्यात करियरचं पॅकअप.
तो अजून विक्रमी खेळी करतोय. आणि अजूनही द्रविडसारखाच खेळतोय. प्रत्येक ट्रेड केलाच पाहिजे असं काही नाही. १-५-१०-२०-५० सोडून द्यायचे. खात्री वाटली तरच ट्रेड करायचा. बहुतेक दिवशी मोठ्या खेळी करतो. मोठ्या खेळींसाठी फक्त चौकार षटकार लागतात असं थोडंच आहे? सिंगल्स-डबल्सने सुद्धा शतकं-द्विशतक होतातच की. फक्त... संयम हवा!
28 Jan 2019 - 12:20 pm | ज्ञानव
सगळीकडेच आवश्यक आहे. जमिनीखालून कोंब फुटून वर यायला पण चार दिवस लागतात. पण जिथे आपल्या हातात थांबंयाखेरीज काही नसते तिथे आपण थांबतोच....नव्हे थांबवलेच जाते आपल्याला .....पण खरी परीक्षा योग्य तिथे थांबून वाट पाहण्यात आहे.
28 Jan 2019 - 2:20 pm | युयुत्सु
तुमच्या या मालिकेत तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा एका प्रश्नाचा विचार जरूर करावा -why fundamentally good companies/stocks do not necessarily perform well in stock market. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की कंपनी फायदयात आहे. कर्ज पण नाही तरीही शेअरच्या किंमतीत फार हालचाल होत नाही.
28 Jan 2019 - 5:33 pm | शाम भागवत
कंपनीचा नफा किंवा विक्री वाढत नसेल तर किंमत कशी वाढेल?
असे शेअर्स लाभांशासाठी कदाचीत चांगले असू शकतील.
28 Jan 2019 - 8:40 pm | युयुत्सु
धन्यवाद
29 Jan 2019 - 2:15 pm | Blackcat (not verified)
लाभांश हा फेस वेल्यू वर देतात,
मार्केट रेट ने शेअर घेऊन त्याचा लाभांश परतावा अगदी निगलीजीबल असतो
29 Jan 2019 - 7:37 pm | शाम भागवत
अस खात्रीशीर म्हणता येईल अस वाटत नाही.
विशेष करून ज्या शेअरच्या किमती स्थीर असतात. कंपनी नफ्यात असते. लाभांश वाटपही करत असते. कंपनीवर कर्जही नसते.
(या चार मुद्यांवर युयुत्सु यांचा भर आहे.) बीएसई वर लाभांश वाटपाप्रमाणे यादी पहा. कित्येक कंपन्यांचा लाभांश बॅंक ठेवींपेक्षा जास्त असल्याचे आठळून येईल.
29 Jan 2019 - 7:41 pm | शाम भागवत
मार्केट रेट ने शेअर घेऊन त्याचा लाभांश परतावा अगदी निगलीजीबल असतो >> या वाक्यावर खुलासा केला आहे.
शेअरच्या दर्शनी किमतीवर लाभांश मिळतो हे मान्य. :)
29 Jan 2019 - 8:12 pm | शाम भागवत
https://www.moneycontrol.com/stocks/marketstats/bsetopdiv/
शिवाय लाभांश काही मर्यादेपर्यंत करमुक्त असतो.
28 Jan 2019 - 8:19 pm | ज्ञानव
ऑपरेटर ड्रिव्हन, सेन्सेक्स पार्टीसिपंट्स, निगलेक्टेड स्क्रिप्स ह्या पैकी तिसर्या कॅटेगरीत येणार्या कंपन्या बरेचदा चांगल्या असू शकतात असे पूर्वी दलाल स्ट्रिटवर वावर असताना ऐकले आहे. पण ऑनलाईन झाल्यावर माझा स्ट्रिटशी संबंध राहिला नाही त्यामुळे खात्रीशीर ऊत्तर देणे अशक्य आहे.
28 Jan 2019 - 8:40 pm | युयुत्सु
धन्यवाद
28 Jan 2019 - 7:53 pm | दीपक११७७
Why fundamentally good companies/stocks do not necessarily perform well in stock market.
यात business model महत्वाचे आहे,
१.काही कंपन्या नफा बक्कळ कमवतात (म्हणजे PE आकर्षक असते) पण पण त्या कोणत्यातरी एकाच कंपनीला माल सप्लाय करत असतात, मग त्या कंपनीने नको म्हटले तर बोंबल सगळं, उदाहरणार्थ काही गोळ्या बनविणा-या कंपन्या ह्या फक्त सरकारी ठेक्यावर चालतात किंवा WHO च्या सप्लायर असतात. हे business model long term investment साठी चांगलं नसतं
२. Cyclic Business यात metal, mining इत्यादि उद्योग येतो, ४-५ वर्षात मंदी मग चांदी असच चालु असतं उदाहरणार्थ tata Steel etc
सध्या एवढचं
28 Jan 2019 - 8:40 pm | युयुत्सु
धन्यवाद
28 Jan 2019 - 10:12 pm | प्रमोद देर्देकर
ऑ मग रिलायंस ही मल्टि tasking कंपनी असून सुध्दा त्यांच्या काही उप कंपनी का बंद पडल्या ?
शिवाय कितीही अनालिसिस केला तरी मार्केट मधील काही खरं नसते ते कशानेही तुटते. संसदेवर हल्ला असो किंवा फुल्लन देवीला मारलं असो तरीही ते पडतं .
दुसरी एक विनंती एकदा तुम्ही ट्रेडिंग केलंत की मागे सेटलमेंट सायकल पण असते त्या बद्दल खूप कमी लोकांना महिती असते तर त्या बद्दलही लिहा.
जसे demat अकाउंट ओपन , ऑक्शन , पे-इन , पे -ऑउट , स्टॉक सेटलमेंट , डीमटेरियलायझेशन , इत्यादी इत्यादी.
28 Jan 2019 - 11:00 pm | दीपक११७७
Reliance सारख्या कंपनीचे analysis करण्यात वेळ घालवु नये असे वाटते. नेमकं profit शेकडो सबसायडरी पैकी कुठुन येतं हे शेवट पर्यंत समजत नाही
28 Jan 2019 - 11:08 pm | दीपक११७७
Reliance सारख्या कंपनीचे analysis करण्यात वेळ घालवु नये असे वाटते. नेमकं profit शेकडो सबसायडरी पैकी कुठुन येतं हे शेवट पर्यंत समजत नाही
29 Jan 2019 - 10:04 am | ज्ञानव
तुमच्या सूचनांचा जरूर विचार करीन आणि योग्य वेळी त्याबद्दल देखील माहिती देण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद.
29 Jan 2019 - 11:13 am | अनिंद्य
.....अंडी मॅटील्डाच्या हातात मोठी दिसत असल्याने............
गिऱ्हाईकाचे पर्सेप्शन हा मुद्दा होता तर !
मालिका आवडते आहे, सर्व भाग पूर्ण वाचणार.
8 Mar 2019 - 12:45 pm | मराठी कथालेखक
माफ करा, मी अंडी खात नाही आणि विकतही घेत नाही पण साधारण ऐकीव माहिती आणि दुकानात नजरेस पडणारी अंडी यावरुन निदान एका प्रकारची सर्व अंडी (जसे गावरान वगैरे) साधारणतः एकाच अकाराची असावीत असाच माझा अंदाज आहे. किंवा फरक असला तरी तो अगदी किंचित असावा.
8 Mar 2019 - 12:58 pm | मराठी कथालेखक
झालंच तर गिर्हाईक आधी रचून ठेवलेल्या अंड्यांकडे बघून मत बनवेल (जरी अंडी लहान मोठी असतीलच तरी) गिर्हाईकाला देताना ती जेव्हा जॉन हातात घेईल तेव्हा त्याचं मत बदलेलं असं फारसं वाटत नाही. शिवाय नंतर घरी जावून गिर्हाईक अंडी बघणारच आहे, ती शिजवणार, खाणार ई तेव्हाही त्याला अंड्याचा नेमका आकार कळेल. असे असताना जॉनच्या हाताचा आकार विरुद्ध माटिल्डाच्या हाताचा आकार हा मुद्दा एकूण विक्रीवर काही परिणाम करेल असे वाटत नाही.
हा आता अंडी देताना माटील्डाच्या नाजूक हाताचा स्पर्श होणार असेल तर मात्र शाकाहारी पुरषही रोज अंडी घ्यायला नक्कीच येतील :)
8 Mar 2019 - 2:07 pm | ज्ञानव
वैयक्तिक अॅॅनालिसिस झाला. जो योग्य किंवा अयोग्य असू शकतो. मार्केटमध्ये तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे असंख्य विश्लेषक आपली मते मांडत असतात. ते सगळे बरोबरच असतात पण त्यांच्या स्वतःपुरते हाच मुद्दा आहे. अंडी, जॉन, माटील्डाच्या प्रतीकात्मक उदाहरणातून तो समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही तुमचे विश्लेषण, मत मांडलेत त्याबद्दल धन्यवाद.
8 Mar 2019 - 3:12 pm | मराठी कथालेखक
बरोबर आहे.. एक शक्यता म्हणून अनेक पर्याय विचारात घेता येवू शकतात हा तुमचा मुद्दा पटला.
अवांतर : माटिल्डा हे स्त्रीचे नाव असते हे माहीत नव्हतं.. आता माटील्डा फोर्ट नामक माझ्या आवडत्या मल्टीव्हिटॅमिनकडून मला थोडे जास्तच विटॅमिन्स मिळतील :)