काल पुण्यनगरीस जाणे झाले होते. एकटीच असल्यामुळे निवांत बसने जायचे ठरले. धनकवडीत मुलगा आहे. सकाळी अकरा वाजता त्याच्यासोबत नाष्टा झाल्यावर बारापर्यंत त्याच्यासह बावधनला बहिणीकडे जायचे होते. मुलाने उबेर टॅक्सी ऑनलाईन बघितली. ३०० रु. रेट आला. ओलाचा १८०. ओला कॉल केली असता ५ ते १० मिनिटात येईल असे समजले.
आम्ही भारती हॉस्पिटलच्या मागे चैतन्यनगर या भागात होतो. वीस मिनिटे झाली तरी टॅक्सीचा पत्ता नाही म्हणून ड्रायव्हरला कॉल लावला. तो याच भागात असून आम्ही होतो तो रस्ता त्याला सापडत नाही असे समजले. वास्तविक पाहता गूगल लोकेशन दिलेले असताना रस्ता सापडत नाही हे विचित्र आहे. पुन्हा पत्ता नीट सांगितला . आणखी दहा मिनिटे लागतील असे तो म्हणाला. आणखी पंधरा मिनिटे झाली तरी टॅक्सी आली नाही. पुन्हा फोन ट्राय केला तर एंगेज. पाच मिनिटांनी लावला तर त्याला आमचे काही ऐकू येईना. मग मुलाच्या मित्राने फोन लावला तर याला अजून आमचा ठिकाणा सापडत नव्हता असे समजले. मग भारती हॉस्पिटल माहिती आहे का तिथे याल का विचारले तर होय म्हणाला. मग पाचेक मिनिटे चालत भारती हॉस्पिटलला गेलो. तिथे दहा मिनिटे थांबूनही ओलावाला आलाच नाही. पुन्हा फोन केला तर या पठ्ठ्याने परस्परच ऑर्डर कॅन्सल केली असे म्हणाला. त्याला काय प्रॉब्लेम होता हे शेवटपर्यंत समजले नाही !
एव्हाना बारा वाजून गेले होते. पुन्हा उबेर पाहिली. रेट १८४ आला. त्याला बोलावले. तो मात्र दोन मिनिटात आला आणि अखेर बाराऐवजी एक वाजता बावधनला पोचलो.
परतीच्या वेळी पुणेकर नातेवाईक म्हणाले तुम्ही रिक्षाने जा. पुण्यात कंपल्सरी मीटर आहे. मीटरने व्यवस्थित भाडे होईल. रिक्षावाल्याला विचारले. मीटरने नाही म्हणाला. कात्रज बस स्टँडला जायचे होते. ३०० रु. म्हणाला.
परत टॅक्सी. यावेळी ओला न पाहता उबेरलाच बोलावले.. रेट १८० आला. टॅक्सी पाच मिनिटात आली. टॅक्सीत बसून अर्धा एक किलोमीटर पुढे गेल्यावर ड्रायव्हर महाशय म्हणाले कुठे जायचंय. मुलगा म्हणाला लोकेशन टाकलंय ना, कात्रज बस स्टँड. त्यावर तो म्हणाला मला आंबेगाव आलंय, तिथे सोडतो. मुलगा म्हणाला आम्ही कात्रज बस स्टँड बुक केलंय, तिथे सोडा. तो होय-नाही करू लागला. अखेर मी म्हटलं गाडी थांबवा आणि तुमच्या कंट्रोलला विचारून पहिले खुलासा करा, नाहीतर आम्ही दुसरी टॅक्सी घेतो. मग त्याने गाडी साईडला घेतली. वरती फोन लावला. दहाएक मिनिटे त्यांची बोलाचाली झाली मग हा सुरु झाला. मी म्हटले काय झाले ? तर म्हणे त्याचा मोबाईल रिस्टार्ट करून पाहायला सांगितले गेले रिस्टार्ट केल्यावर लोकेशन बरोबर आले.
काल बहुधा पनवतीच लागली होती.
बावधनवरून बहिणीच्या घरून निघून कोल्हापूरला यायचे होते. चौकशी केली असता समजले की चांदणी चौकातून काही ट्रॅव्हल कंपनीच्या बसेस कोल्हापूरला जातात. भाऊजींनी रेडबस च्या साईटवरून पाहिले तर नीता ट्रॅव्हल्सची एक कोल्हापूर बस दुपारी ४-३० वा. चांदणी चौकात येते व नऊ च्या दरम्यान कोल्हापूरला पोचते असे दिसले. भाऊजींनी मला विचारले चालेल का. चालेल म्हटल्यावर त्यांनीच त्यांच्या अकौंटमधून पेमेंट करून बुकिंग केले. काँटक्ट नंबर माझा दिला. तिकीट नंबर आणि गाडी नंबर इ. तपशिलाबरोबरच बस ट्रॅकरची लिंक पण मला मेसेजवर मिळाली. सव्वाचार वाजता चांदणी चौकात गेलो. ट्रॅव्हल्स बसेस थांबतात तिथे उभे राहून बसचा ट्रॅकर पाहिला. बस वेळेत सुटत असून ती आता पाषाण रोडवरून चांदणी चौकाकडे येत आहे असे दिसले. पाच पाच मिनिटांनी आम्ही ट्रॅकर चेकवत होतो. एका मिनिटाला बस २०० मीटरवर आली आहे असे दिसले. व दुसऱ्या मिनिटाला ती आता चांदणी चौक ओलांडून स्वारगेटकडे जात आहे, असे दिसू लागले !. प्रत्यक्षात नीता ट्रॅव्हल्सची कोणतीही बस चांदणी चौकातून गेलीच नव्हती. एव्हाना पावणेपाच वाजून गेले होते. मी भाऊजींना फोन केला. ते म्हणाले नीताच्या कस्टमर केअरला फोन करायला हवा. मुलग्याने कस्टमर केअरचा (एकमेव) नंबर जो संदेशात होता, तिथे फोन लावला असता ‘आपण चुकीचा नंबर डायल केला आहे’ असा आवाज येऊ लागला.
पाच वाजून गेले. आम्ही आता टॅक्सीने कात्रज बस स्टँडला जायचे ठरवले. वरती लिहिल्याप्रमाणे उबेर बोलावली आणि लोकेशनच्या गोंधळात दहा मिनिटे गेली. अखेर पुढे निघालो तोवर सव्वापाचला संदेश आला की नीता कोल्हापूर ही बस निर्धारित वेळेपेक्षा एक तास लेट असून पंधरा मिनिटात चांदणी चौकात येईल ! मुलगा म्हणाला काय करूया ? मला आता नीताचा भरोसा वाटेना. मी म्हटलं जाऊ कात्रजला आणि तिथे थांबून पाहू.
पुढे वडगाव पुलापाशी आलो तर अचानक रस्त्याच्या डावीकडे नीता ची एक बस उभी दिसली. नंबर पाहिला तर संदेशात लिहिलेलाच बस नंबर होता. आम्ही लगेच उबेर सोडली अन त्या बसकडे गेलो. तर ती पूर्ण रिकामी होती. ड्रायव्हर म्हणाला बस ब्रेकडाऊन आहे तुम्ही कस्टमर केअरशी बोला. झाले ! पुन्हा रिक्षा करून कात्रजला निघालो. रिक्षावाले २०० रु. मागू लागले. मग पुन्हा ओला बोलावली आणि वाट पहात बसलो.
एव्हाना सहा वाजत आले होते. इतक्यात वडगाव पुलाखालून एक कोंडुसकर ट्रॅव्हल्सची बस येताना दिसली. हात करून थांबवली आणि विचारले तर ती कोल्हापूरलाच निघाली होती. सिटाही बऱ्याच रिकाम्या होत्या. ‘हुश्श !’ म्हणून बसमध्ये चढले.
सातवाजता नीताकडून संदेश आला की तुम्हाला चुकीचा बस नंबर ‘चुकून’ पाठवला गेला असून करेक्ट बस नंबर अमुकतमुक आहे, व ही बस दहा मिनिटात चांदणी चौकात येत आहे. आता या संदेशात कस्टमर केअरऐवजी एक मोबाईल नंबर दिला होता. मी लगेच कॉल केला. नंबर चक्क खरा होता. त्याला झाप झाप झापले आणि माझे तिकीट कॅन्सल करुन रिफंड मागितला. त्याने सॉरी बिरी काही म्हणायच्या भानगडीत न पडता थंडपणे रिफंडचा प्रस्ताव ‘वरती’ पाठवतो असे सांगितले.
असे करत नऊच्या ऐवजी मी सव्वादहाला कोल्हापुरात पोचले. तोपर्यंत यष्टी महामंडळाच्या इचलकरंजी बसेस सगळ्या निघून गेल्या होत्या त्यामुळे शेवटची साडेअकराची बस मला मिळून साडेबाराला घरी पोचले. यापेक्षा बावधनमधून चारलाच उबेर करून स्वारगेटला गेले असते तर यष्टी महामंडळाच्या नॉनस्टॉप कोल्हापूर गाडीने साडेआठलाच कोल्हापुरात अन घरी साडेनऊला पोचले असते.
अखेरचा कहर म्हणजे रात्री साडेबारावाजता मला नीता वाल्यांकडून संदेश आला की आपले उतरण्याचे ठिकाण आता जवळ आले असून उतरण्याच्या तयारीत रहा !
पुढच्या वेळी पुण्याला जाताना स्वत:ची किंवा भाड्याची तरी गाडी घेतल्याशिवाय जायचे नाही, असे आता पक्के केले आहे !!
काय म्हणता ?
ओला, उबेर आणि खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या पन्क्चुअल / रिलायेबल आहेत का ?
गाभा:
प्रतिक्रिया
17 Dec 2018 - 2:29 pm | जेडी
सर्वच खाजगी वाहनांचा हा प्राॅब्लेम आहे, खरा प्राॅब्लेम कंपनीचा नसुन ड्रायव्रर लोकांचा आहे, ते एकतर नोकर असतात. कॅब कॅन्सल करायला लावतात म्हणजे त्यांना कॅश मिळते जी मालकाला कळत नाही. निता वैगेरे गाड्यांचेही तेच, अधले मधले लोक ते घेतात ज्याचे त्यांना पैसे मिळतात. कार्ड पे वाल्यांपेका ते कॅश वाल्यांना प्रेफरन्स देतात.
17 Dec 2018 - 4:28 pm | मराठी कथालेखक
शहरातच थोडा दूरचा प्रवास असेल (म्हणजे २०-२५ किमी) तरी ओला-उबेर भरवशाची राहिली नाही. हे अनेकदा 'येतो' म्हणून नंतर येतच नाहीत, ट्रिप रद्द करतात .. निवांत वेळ असेल तरच यांच्या भानगडीत पडावे असे झालेय. बूक करा, मग कॉल करुन येतोय का ते विचारा , त्यातून तो ड्रायव्हर प्रामाणिक उत्तर देईल याची खात्री नसते त्यामुळे तो येईल अशी आशा करत ट्रॅक करत रहा हे आपल्या हातात. ड्रायव्हर आला आणि ट्रिप चालू झाली की सहसा काही अडचण येत नाही. एकदा ट्रिप चालू झाल्यावर ते सहसा जास्त नाटकं करीत नाहीत. पण रद्द केलेल्या ट्रिपकरिता कुणी रेटींग देवू शकत नाही त्यामुळे तोपर्यंत त्यांची मनमानी चालते.
बाकी रिक्षाबद्दल म्हणाल तर पिंपरी चिंचवडमध्ये अजिबातच मीटर टाकत नाही, पुणे शहरात निदान मध्यवस्तीत टाकत असावेत, बाकी वेळ आणि प्रवासी (पुण्यातला की बाहेरचा) वगैरे बघून मनमानी चालत असावी असा अंदाज.. एकूणात सगळा आनंद आहे.
हे योग्यच ठरवलंत.
17 Dec 2018 - 4:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुढच्या वेळी पुण्याला जाताना स्वत:ची किंवा भाड्याची तरी गाडी घेतल्याशिवाय जायचे नाही, असे आता पक्के केले आहे
दोन किंवा जास्त लोक असल्यास हा पर्याय, अत्यंत सोईस्कर आहे (हवे तेव्हा, हवे तितका वेळ आरामशीर वाहन आणि चालक सेवेला तत्पर). तीनपेक्षा जास्त प्रवासी असल्यास, शहर ते शहर प्रवास आणि भेट दिलेल्या शहरांतील अंतर्गत प्रवास जमेस धरला तर, हा पर्याय आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरू शकतो.
17 Dec 2018 - 5:04 pm | यशोधरा
मला ऊबर छा अतिशय वाईट अनुभव आहे. तेव्हापासून उबर वापरणे सोडले. ओला चां अनुभव बरा आहे. ओला रीक्षाचा अनुभवही चांगला आहे. तुझे अनुभव फेसबुकवर त्यांच्या पानावर टाक. मी उबर अनुभव त्यांच्या पानावर टाकला होता व त्यांच्या कस्टमर केअर ला दखल घेणे भाग पडले होते, कारण इतर लोकही वाचतात व त्यांच्या नावाला धक्का पोहोचतो व बिझनेस कमी होतो.
उबर कधीच घेऊ नये.
17 Dec 2018 - 5:05 pm | यशोधरा
आणि नीता वगैरे पेक्षा एस टी महामंडळ कधीही झिंदाबाद.
17 Dec 2018 - 5:25 pm | समीरसूर
छान लेख! आवडला...
बाकी अनुभव...असे अनुभव येत असतात कधी कधी. मला उबर खूप जास्त रिलायेबल आणि सोयीची वाटते. माझ्याकडे कार नाही. बायको सप्टें २०१६ मध्ये गरोदर राहिली. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये डिलिव्हरी झाली तेव्हा फक्त सात महिने झालेले होते. बाळ १.५ महिने आयसीयूमध्ये होते. नंतर सहा महिने सतत हॉस्पीटल आणि डॉक्टरकडे चकरा व्हायच्या. हा सगळा कठीण काळ उबरमुळे खूप सुसह्य झाला. अजूनही मी उबर खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. मला काही किरकोळ अपवाद वगळता कधी प्रॉब्लेम नाही आला. ओलाचा मात्र माझा अनुभव वाईट होता. एकतर खूप महाग होते. चालक वेळेवर येत नसत. बर्याचदा ट्रिप परस्पर कँन्सल करत असत. मग मी ओला अॅप काढूनच टाकले. बाकी न सांगता किंवा येतो सांगून ट्रिप (किंवा कुठल्याही कामासाठी येणे) कँन्सल करणे हा 'मराठी बाणा' आहे. काही अपवाद वगळता मराठी ड्रायव्हर्स थर्ड्क्लासच असतात. अख्ख्या जगात फक्त पुण्यातील उबरचे ड्रायव्हर्स राजेशाही थाटात चालकाच्या सीटवर बसून राहतात. अगदी म्हातारे जोडपे खूप सामान घेऊन येत असेल तरी! किंवा वृद्ध व्यक्ती जड बॅग घेऊन डिकीत टाकण्याचा प्रयत्न करत असेल तरी! हे माजोर्डे ड्रायव्हर्स खुशाल बसून राहतात.
माझ्याकडे उबरचे इतके अनुभव आहेत की मी त्यावर एक पुस्तक लिहू शकेल :-) काही निरीक्षणे:
17 Dec 2018 - 11:54 pm | मराठी कथालेखक
मुंबई वा इतर शहरात काय अनुभव आहे ?
18 Dec 2018 - 9:12 am | सुबोध खरे
मुंबईत उबरचे ड्रायव्हर तुमचे सामान उचलून डिकीत ठेवायला बऱ्याच वेळेस मदत करतात असा स्वानुभव आहे.
17 Dec 2018 - 6:19 pm | सुबोध खरे
मी मुंबईत उबरच्याच गाड्या वापरत आहे. आता पर्यंत मला उबरचा एकही वाईट अनुभव नाही. त्या मानाने "ओला"चे भाडे नेहमीच जास्त असते. असे का ते माहिती नाही. ओलाच्या एका ड्रायव्हर ने आपले भाडे परस्पर कॅन्सल केले तेंव्हा त्याला ५ पैकी १ स्टार देऊन मोकळा झालो आणि उबर बुक केली.
दोनदा मुंबई ते पुणे सुद्धा आलो आहे एकदा ओला आणि एकदा उबर आउट स्टेशनने पण अनुभव उत्तमच आला आहे. मुंबईत ओला उबर या रिकशा टॅक्सी पेक्षा बऱ्याच स्वस्त पडतात आणि जास्त अराम दायक आहेत.
बाकी इतर शहरात ओला उबरचा अनुभव नाही.
अशा अनुभवामुळे मी नवी गाडी घेण्याचे ( यशस्वी पणे) टाळले आहे.मारवाडी हिशेबाप्रमाणे नवी गाडी घेऊन तिचा इ एम आय आणि विमा यात पैसे घालवण्याच्या अर्ध्या किमतीत सुखाने "ओला उबर"ने जाता येते. वर मानसिक शांतता.
17 Dec 2018 - 11:57 pm | मराठी कथालेखक
मला वाटतं मुंबईत काली पिवळी टॅक्सीची अजूनही चांगली स्पर्धा असल्याने तिथे चांगली सेवा मिळत असावी. पुण्यात आता फारशी चांगली सेवा नाही.. रिक्षा नामक दगडापेक्षापेक्षा यांची वीट मऊ आहे इतकंच
19 Dec 2018 - 2:35 am | सोन्या बागलाणकर
मुंबईत सार्वजनिक वाहतूकव्यवस्था पुण्याच्या तुलनेत खूपच चांगली असल्यामुळे उबर ,ओलावाले थोडे वचकून असावेत बहुधा.
असे असूनही एकदा ओलाचा वाईट अनुभव आला आहे. पहाटेची एअरपोर्ट कॅब बुक केली असताना ड्रायव्हरने परस्पर कॅन्सल केली. खरेसरांप्रमाणेच मीदेखील त्याला खराब रेटिंग देऊन दुसरी कॅब बुक केली.
पुण्यात एकंदर PMT चा "सुंदर" कारभार आणि रिक्षावाल्यांची मनमानी यामुळे "वासरात लंगडी गाय शहाणी" या न्यायाने उबर /ओला झक मारून वापरावी लागते.
19 Dec 2018 - 8:18 pm | राजेंद्र मेहेंदळे
ओला चे भाडे नेहमी उबर पेक्षा जास्त दाखवते. ड्रायव्हर लोकांशी बोललो असता त्यांना उबर जास्त आवडते कारण त्यांचे पैसे लवकर मिळतात. विनयशीलपणात सगळे ड्रायव्हर सारखेच. एकच गाडी ओला / उबर दोन्हिकडे लावता येते का माहित नाही.
कॅन्सलचा अनुभव मलातरी फार आलेला नाही. पहिले मेरु आणि रेडिओ कॅब वगैरे होत्या त्या पेक्षा ओला उबर बर्याच चांगल्या वाटतात. शिवाय ओला मनी मुळे सुट्टे पैसे वगैरे भानगडी नाहित. पावती लगेच मेलवर येते त्यामुळे ऑफिसची ट्रिप असेल तर नंतर क्लेम करायला बरे पडते.
पण एकुणातच लांबचा प्रवास किवा एकाच शहरात ३-४ ठिकाणी फिरायचे असल्यास स्वतःची गाडीच बरी. एस्टी पण मस्त. ४ जण येवोत कि ४० जण, हे लोक त्यांच्या वेळीच निघणार/ पोचणार.
18 Dec 2018 - 9:53 am | माहितगार
१) कॅबचालकाकडून ऐन वेळी कॅन्सलेशन किंवा येतो म्हणून न येणे पुण्यातल्या प्रत्येक कॅब सर्वीसकडून किमान दोन दोनदा अनुभवून झाले आहे. या बाबतीत ओला किंवा उबर अधिक सरस किंवा अधिक वाईट असे काही नाही.
एका सर्वीसकडे अधिक चांगले अनुभव आणि एका सर्वीस कडे अधिक वाईट अनुभव असे होत असेल तर कुणाला कोणता देव पावतो कुणाला कोणता देव कोपतो म्हणावे किंवा थेअरी ऑफ प्रोबॅबिलीटी स्विकारावी.
२) समस्या कॅबचालकांना ओळखीतली दुसरी चांगली ऑफर मिळाली कि ते तिकडे धावतात, सुरवातीची दोन एक वर्षे हि समस्या फारच होती, वस्तुतः गेल्या एखाद दिड वर्षात कॅबसर्वीसेस कडून काँट्रॅक्टस मध्ये बदल झाल्याने असेल कदाचित ऐनवेळच्या कॅन्सलेशनचे प्रमाण तसे बरेच कमी झाले आहे. पण नको तेव्हा असे अनुभव येऊ शकतील हे गृहीत धरुन त्या तयारीनेच रहावे लागते. आता कॅन्सलेशनचे प्रमाण कमी झाले असले तरी पिक ऑवर रेट्स भरमसाठ वाढले आहेत हे बहुधा कॅबचालकांशी जुळवून घेऊन कॅन्सलेशन टळावीत म्हणून झाले असावे
३) कॅब /प्रायव्हेट बस केल्या नंतर सर्वप्रथम चालकाशी लगोलग फोनवर बोलून घेऊन तो येणार आहे आणि तुमचा पत्ता त्याला समजतो आहे याची खात्री करुन घ्यावी. खात्री न केल्यास धागा लेखात नमुदकेल्या प्रमाणे मनस्तापाचे आश्चर्यकारक अनुभवांची संख्या वाढू शकते.
४) गावा बाहेर असाल, पिक ऑवर्स किंवा मध्यरात्री वाहन हवे असल्यास कॅबसर्वीस अनुपलब्ध राहण्याची एक शक्यता गृहीत धरून दुसर्या पर्यायाच्या तयारीत आधीपासूनच असावे.
५) कॅबसर्वीसेस चे सॉफटवेअर आणि गूगल मॅप पुर्वी पेक्षा बरे असले तरी त्यातही अद्याप परफेक्शनला बराच अवधी आहे त्या दृष्टीनेही आश्चर्याच्या धक्यांसाठी तयार राहून. गूगल खरेच बरोबर रस्ता दाखवतो का याची खात्री करावी. नो वे , वन वेंच्या बाबतीत गूगल अद्याप बरेच घोटाळते.
18 Dec 2018 - 2:10 pm | सस्नेह
उत्तम व्यवहारी सल्ल्यांसाठी धन्यवाद !
18 Dec 2018 - 4:24 pm | माहितगार
खरा विनोदी प्रकार, विकएंडला पब्लिक ट्रांस्पोर्ट अनुपलब्ध अशा बर्यापैकी आऊटस्कर्टमध्ये मोठ्या डिनर पार्टीला जाऊन डिनर संपवले. परतीच्या वेळी कुणी वेगळ्या दिशेचे दूरचे परिचीत त्यांच्या गाडीने तुम्हाला घरी सोडतो म्हणतात. तुम्ही अवघडल्यासारखे होऊन कॅबसर्वीसच्या भरवश्यावर नको नको म्हणता आणि कॅबसर्वीस ट्राय करता आणि प्रत्येक कॅबसर्विसचा या भागात या वेळी कॅब उपलब्ध नसल्याचा मेसेज मिळतो. आता आधी नको नको म्हटलेल्याच व्यक्तिला अहो कॅब दिसत नाही सोडता का जरा म्हणून विनवणी करताना जी केविलवाणी गत होते ती खरी मजेदार आणि विनोदी असते.
यातली अनुभवलेली सर्वात गंभीर स्थिती अॅडमिट पेशंटचा अटेंडंट म्हणून असताना चेक आऊटच्या वेळी नेमके या कॅब सर्वीस वाल्यांचे गायब होणे. चेक आऊट झाल्यामुळे हॉस्पीटल तिथेच राहू देत नाही. चेक आऊटचा पेशंटही शेवटी पूर्ण बरा होण्याचा शिल्लक पेशंटच असतो. अशा मुमेंटला बरे झाल्याच्या खुशीत त्याची अँब्युलन्स घेण्याची तयारी नसते. आणि कॅब चालक येतो म्हणून गायब मोठा त्रासाचा क्षण असू शकतो.
18 Dec 2018 - 5:23 pm | प्रसाद_१९८२
चेक आऊटचा पेशंटही शेवटी पूर्ण बरा होण्याचा शिल्लक पेशंटच असतो.
--
वरिल ओळीतील शब्दांचा नक्की अर्थ काय होतो ?
18 Dec 2018 - 8:35 pm | माहितगार
अहो हॉस्पीटल मधून डिसचार्ज दिला तरी बर्याच पेशंटना घरी जाऊन विश्रांती घेणे अपेक्षीत असते शिवाय इतरही व्याधी असू शकतात , असेही पेशंट असतात ज्यांना डिसचार्ज मिळाल्या नंतर फार काळ दवाखान्यात बसवत नाही ते प्रचंड अस्वस्थ होतात त्या वेळी वाहन उपलब्ध झाले नाही तर अडचण होते.
25 Dec 2018 - 9:40 am | मास्टरमाईन्ड
झालंय असं माझ्या बाबतीत.
ते पण कोंढवा सारख्या भागात.
20 Dec 2018 - 6:20 pm | चिगो
ह्या बाबतीत तर लैच खंग्री अनुभव आला आहे मला.. शिलाँगमध्ये 'दुर्गा पुजा' हा उत्सव बर्यापैकी मोठा आहे. त्यामुळे ह्यावेळच्या नवरात्रात अष्टमीच्या दिवशी मी माझं कुटूंब आणि ओळखीतल्या दोन-तीन पोरांना असं घेऊन 'पंडाल-हॉपिंग' करत होतो. गाडीत चार चिल्ली-पिल्ली आणि तीन मोठे लोकं. तर एका पंडाल मधून बाहेर पडल्यावर मी गूगल वापरुन आमच्या घरी यायला निघालो. (नेहमीच्या रस्त्याला जास्त गर्दी होती म्हणून) गूगल-बाबाने सांगितलेल्या रस्त्याने जात जात एका तीव्र उतारावरच्या चिंचोळ्या गल्लीत पोहचलो, तर पुढे एक छोटासा नाला-पुल, आणि त्यापुढे डोंगरावरची पायवाट ! अक्षरशः काही मीटर्सने अपघात टळला. आता त्या चिंचोळ्या, उतारावरच्या गल्लीतून गाडी वळवणे हेदेखील एक दिव्य होते. तर तिथं गाडीचं स्टिअरींग-व्हिलपण नाटकं करायला लागलं.. शेवटी कशीबशी गाडी वळवली, वर पोहचलो, तर तिथं खासी भाषेत रस्त्याच्या कडेला एक 'नो-वे'चा बोर्ड लावला होता. तिथल्या लोकांनी सांगितलं, की दर आठवड्याला गुगलने चकवलेले पाच-दहा लोक तिथं येतात..
आता मी पुन्हा गपगुमान 'गाव गुगल', 'नाका गुगल', 'पानटपरी-गुगल' वापरत लोकांना रस्ता विचारतो..
18 Dec 2018 - 8:52 pm | मराठी_माणूस
फ्लीट टॅक्सि चा मुंबई चा अनुभव चांगला आहे. खाजगी गाडीची उणीव भासत नाही.
बाकी खाजगी बसच्या बाबतीत बोलायचे तर , वर म्हणाल्या प्रमाणे एसटी झिंदाबाद.
18 Dec 2018 - 9:16 pm | माहितगार
अशात डेली बेसिस शेअर्ड कार पण सेल्फ ड्राईव्ह प्रकारातील काही जाहीरात दिसली होती. कुणाला काही कल्पना आहे का त्या बाबत
19 Dec 2018 - 1:35 pm | गामा पैलवान
मुंबईतला माझा उबेराचा अनुभव चांगला होता. माझा परिसर ठाणे-मुलुंड-पवई-दादर इतकाच होता.
एकदा मात्र गंमत झाली. उबेर चालकाचं दिशादर्शन बिघडलं होतं. त्याला माझं घर (तीन पेट्रोल पंप, ठाणे) सापडेना. त्याला फोनवरून सूचना देऊन बोलावलं. ते त्याला जमलं. मग आम्ही पवईs जायला निघालो. सुदैवाने माझं दिशादर्शन ठीक चालू होतं. मग मीच दिशादर्शक बनलो आणि त्याला पवईच्या गल्लीबोळांतनं फिरवीत इच्छित स्थळी घेऊन गेलो. उतरल्यावर नंतर गूगल म्यापवर बघितलं तर नेहमीच्या राजरस्त्यावर प्रचंड वर्दळमुरंबा होता. उबेराच्या अॅपने इतका सखोल विचार केला हे पाहून हृदय भरून आलं. चार तारे दिले. एक तारा कमी कारण चालकाचं अॅप ठीक दिशादर्शन करीत नव्हतं. अर्थात चालकाचा दोष नाही म्हणा. माझ्या अॅपची बेफाट स्तुती आणि त्याच्या अॅपची बिनपाण्याने हजामत केली.
-गा.पै.
19 Dec 2018 - 7:51 pm | मराठी कथालेखक
वर्दळमुरंबा !!
हा हा .. :)
19 Dec 2018 - 9:26 pm | सस्नेह
वर्दळमुरंबा जाम आवडल्या गेले आहे
=)) =))
19 Dec 2018 - 11:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
वर्दळमुरंबा... गापैंची मराठीला एका नवीन शब्दाची भेट ! =))
20 Dec 2018 - 4:14 am | गामा पैलवान
जुना शब्द आहे : http://maajhianudini.blogspot.com/2010/01/blog-post_23.html
-गा.पै.
19 Dec 2018 - 4:31 pm | टर्मीनेटर
स्वतः ड्राईव्ह करायचा कंटाळा आला किंवा एअरपोर्ट ड्रॉप/पिक अप करायचे असेल तर कॅब बुक करण्याची वेळ येते. पण रेट आणि एकंदरीत सेवेच्या बाबतीत मुंबईत उबर पेक्षा ओलाचा अनुभव चांगला आहे. लोकेशन मध्ये बऱ्याचवेळा गडबड होते पण नुकतेच एका ओला ड्रायव्हरने सुचवल्या प्रमाणे ओला लाईट app वापरून बघायचे आहे, त्याच्या म्हणण्या प्रमाणे त्यात लोकेशनच्या बाबतीत बरीच ॲक्युरसी आहे.
21 Dec 2018 - 11:50 pm | अर्धवटराव
दिल्ली शहरात आज अशी परिस्थीती आहे कि जर तुमच्याकडे उबर/ओला अॅप चालणारे स्मार्टफोन नसतील तर टॅक्सी सेवा मिळतच नाहि. उबरचा अनुभव बरा आहे.
25 Dec 2018 - 9:52 am | मास्टरमाईन्ड
ओला चे ड्रायव्हर्स परस्पर ट्रीप कॅन्सल करणे वगैरे उत्तम रित्या करतात.
ऊबर ला बहुतेक तशी सोय नसावी. कारण एकदा मी ऊबर च्या ड्रायव्हरला विचारलं होतं की ओला च्या बाबतीत कॅन्सल होण्याचं प्रमाण इतकं का आहे? तर म्हणे ओला च्या ड्रायव्हर अॅप मध्ये Destination समजतं त्यावर ड्रायव्हर ठरवतात की हे भाडं घ्यायचं की कॅन्सल करायचं.
उबर चे ड्रायव्हर ओला च्या ड्रायव्हर पेक्षा बरे किंवा चांगले म्हणता येतील.
वरती दिलेल्या इतरांच्या प्रतिक्रिया सुद्धा उपयोगी आहेत.
शेवटी
हे मात्र १००% खरं आहे.