कुलदैवत!

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
12 Dec 2018 - 9:08 am
गाभा: 

सध्या खंडोबाची षष्ठी सुरु आहे.त्यानिमित्याने हा प्रश्न सुचला आहे.

एखाद्या घराण्याचे कुलदैवत कसे ठरवले गेले असेल? कारण कुलदैवतं ही ठरविक आहेत.शिवाय काहीजणांची कुलदैवतं ही पिढ्यानपिढ्या ज्या ठिकाणी ती कुटूंबं रहात आलेत त्या ठिकाणापासून बर्‍यापैकी लांब अंतरावर अाहेत.अगदी उस्मानाबाद पर्यंत कर्नाटकातील बदामीची बनशंकरी कुलदैवत असणारी घराणी आहेत;किंवा मंगसुळीचा खंडोबा हे मध्य महाराष्ट्रात राहणार्‍या लोकांच कुलदैवत आहे.जेजुरीचा खंडोबा कर्नाटकातल्या लोकांचं कुलदैवत आहे,विदर्भातल्या लोकांचं आहे.अनेक कोब्रांचं कुलदैवत मराठवाड्यात आंबेजोगाई इथं आहे.

आज दळणवळणाच्या चांगल्या सोयींमुळे जरी ही अंतरं खुप लांब वाटत नसली तरी शेकडो वर्षांपूर्वी ही सहजसाध्य नसतील.

साधारणपणे आपल्याला ज्या ठिकाणी सहज जाता येईल असे कुलदैवत कोणीही ठरवेल ना?त्या निमित्याने लांबचा प्रवास घडावा अशी इच्छा असं जरी समजलं तरी तो प्रवास पूर्वी बैलगाडीतून व्हायचा.म्हणजे अंगाची बरीच मोडतोड करुन लांबचा प्रवास करण्याची ही सोय(?) का करुन ठेवली असेल?

मराठवाड्यातल्या बर्‍याचशा देशस्थांचं कुलदैवत मंगसुळीचा खंडोबा असेल तर एवढ्या लांबचं कुलदैवत का निवडलं असेल? हे सगळे लोक पूर्वी मंगसुळी किंवा अासपासच्या प्रदेशात रहात असण्याची शक्यता किती? कोकणात राहणार्‍या कितीतरी कोब्रांची कुलदेवता मराठवाड्यात का असावी? कोकणातच का असू नये?झाडून सगळे कोब्रा आंबेजोगाईच्या परिसरात तर राहत असणं शक्य नाही.मराठवाड्यात अन्नधान्य भरपूर कोकणाच्या तुलनेत.मग समृध्द भाग सोडून कोकणात का जातील?

कोल्हापुरातल्या काही देशस्थांची कुलदेवता तुळजापूरची तुळजाभवानी आहे.गावातच अंबाबाई असताना तुळजाभवानी कुलदेवता म्हणून का स्विकारली असेल?

ही कुलदैवतं कशी ठरवली गेली असतील? याबद्दल कोणी कुठे वाचलंय का?काही माहिती आहे का?

प्रतिक्रिया

माहितगार's picture

12 Dec 2018 - 1:07 pm | माहितगार

कुणाकडे 'भारतीय संस्कृतीकोश' असल्यास त्यात धागा लेखकाच्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास पहाणे अधिक उत्तम असावे. (मराठी विशकोश, केतकरांचा महाराष्ट्रीय कोश, अथवा मराठी विकिपीडियावर धागा लेखकाच्या प्रश्नांची उत्तरे पहिल्या शोधात मिळाली नाही. इंग्रजी विकिपीडियावर कुलदेवता विषयावर लेख त्यातून कुलदेवतेची संकल्पना काश्मिर ते कन्याकुमारी आहे आणि विवीध प्रदेशात मानल्या गेलेल्या काही कुलदेवतांची नावे एवढी मर्यादीतच माहिती आहे)

क्वोरा वरील या प्रश्नोत्तर धाग्यातील पहिले उत्तर जरासे अधिक माहिती देणारे म्हणवता येऊ शकेल पण त्यात संदर्भांचा अभाव आहे. क्वोरावरील उत्तरा नुसार कुलदेवता संकल्पनेचा उल्लेख वेदात (बहुतेक ऋग्वेदात) नसावा रामायणाच्या प्रक्षीप्त समजल्या जाणार्‍या उत्तरखंडात कुलदेवतेचा उल्लेख येतो असे क्वोरातील उत्तरावरून दिसते. (रामाच्या विवाहाचा वाल्मिकी रामायणातील प्रसंगवर्णन पुन्हा तपासून पहाण्यास हरकत नसावी असे मला वाटते. ) पण तसे क्वोरातील उत्तरातील मांडणी प्रथमदर्शनी (संपूर्ण नव्हे पण ) बर्‍यापैकी स्विकार्य वाटते.

महाभारतात पांडवांच्या तीर्थयात्रेचा उल्लेख असावा पण कुलदेवतेचा उल्लेख वाचल्याचे आठवत नाही.

हिंदू संस्कृती काळाच्या ओघात अनेकविध परंपरानी उत्क्रांत होत गेलेली संस्कृती आहे, माझ्या व्यक्तिगत अंदाजा नुसार भारतात आज प्रमुख समजल्या जाणार्‍या अद्वैती वैदीकतेच्या प्रसारापुर्वी भारतभरातील व्यक्ती, परिवार , समुह, आणि गावांच्या अनेकविध इष्ट देवता असल्या पाहिजेत . पौराणिक आणि किर्तनकारांकडून पौराणिक कथांचा प्रचार केला जात असताना स्थानिकांच्या सद्य देवता नाकारून नव्या देवता लादण्यापेक्षा स्थानिकांच्या सद्य देवतांना एखाद्या देवतेचा अवतार ठरवणे सोपे होते, सध्याच्या परंपरा बाळगून पौराणिक कथेतील नव्या देवता स्विकारणे भक्तश्रोत्यांनाही सोपे होते. ( स्थानिक देवतातील बळी प्रथा असलेल्या देवता नाकारण्याचे ठळक प्रयत्न ब्राह्मण पौराणिकांकडून काही प्रमाणात झाले तरी असे प्रयत्न सर्वत्र स्विकारले गेले असे नसावे त्यामुळे मेसाई सारखी महाराष्ट्रातील मागे पडलेली देवता काही कुटूंबांची कुलदेवता म्हणून टिकुन असल्याचे दिसते)

व्यक्ती, परिवार , समुह, आणि गावांच्या ज्या काही इष्ट देवता असतील त्यातील प्रसन्न होणार्‍या नवसाला पावणार्‍या देवतांचे महात्म्य वाढत असावे आणि नवीन देवता स्विकारल्या जाताना पारंपारीक देवतांना कुलदेवतेचे स्थान मिळत असावे. काही वेळा स्थलांतरामुळेही कुलदेवता दूर असू शकते. तर दुसरीकडे कुलगुरुंनी सांगितले अथवा ऐकीव विश्वासावरुन एखाद्या दूरच्या देवतेचा वसा घेतला (आणि नवसाला पावली) की तिथे न जाताही विश्वास वाढत असेल.

काळाच्या ओघात विभाजीत झालेल्या एकाच कुळाच्या काही कुटूंबात एक कुलदेवता तर दुसर्‍या कुटूंबात दुसरी कुलदेवता असेही दिसून येते . याचे कारण एकतर हाय मोर्टेलिटी रेट मुळे जगलेल्या लहानमुलांना आपल्या पुर्वजांची मूळ कुलदेवता ठाऊक नसणे , किंवा कुटूंबातील काही व्यक्त्तीत तारुण्याच्या काळातील अश्रद्धेने मूळ कुलदेवता आठवणीच्या बाहेर जाणे आणि मग एखादी वेगळीच देवता कुलदेवता म्हणून स्विकारली जाणे असेही होत असावे.

असो या निमीत्ते जराशी धागा जाहीरात

* मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस
* मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ?
* तुमच्या घरच्या देवघरातील मुर्ती, टाक, देवक, तांदळा इत्यादींची माहिती हवी

माहितगार's picture

12 Dec 2018 - 1:47 pm | माहितगार

* हिंदू धर्म छोटे मोठे प्रश्न


* श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ?

* संत एकनाथांचा प्रतिमा आणि मुर्ती पुजन विषयक दृष्टीकोण

* अभिषेक प्रकारांची माहिती हवी

* संदर्भांचा विसर आणि भुलाबाईंचा उत्सव

* बगाड परंपरा

* इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न

* संत एकनाथांचा नैवेद्य -

* येल्ला आणि तीच्या दासी


* राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी

* आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ...

* मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव

* वाल्मिकी रामायणावरील पहिल्या चित्राकृती कोणत्या ?

* चक्रपूजा' माहिती सोबतच कोकणी ते मराठी अनुवाद साहय्य हवे

* अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश

* कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव

* ग्रामनामांच्या निमीत्ताने धाग्यात देवतां विषयक काही चर्चा आहे


* सुवर्चला, ह्या कोणाच्या कोण बरे ?

* बखरींची सांगाव्यांचे अन पुराणातली वांग्यांचे नवे पुराण

कंजूस's picture

13 Dec 2018 - 6:56 am | कंजूस

हे बहुतेक शिवाजीच्या / पेशव्यांच्या काळात झाले असणार. निरनिराळ्या पदांवर नेमून जमिनी इनामे देऊन कारभार पाहण्यासाठी पाठवल्यावर ते लोक तिकडची ग्रामदेवता भजु लागले असणार. त्याकाळी जाऊन येऊन चाकरी करण्याची पद्धत नव्हती. ग्रामदेवतेच्या उत्सवाला देणगी देणे, सहभाग करणे हे वतनातील मुख्य लोकांना करावेच लागते. ती देवता त्या लोकांच्या वारसाची कुलदेवता झाली.
या अगोदर प्रत्येक घराण्यात पंचायतनापैकी एका देवाची पुजा मुख्य असायची. त्यामुळे दोन दैवते झाली.
पण आता नवीन वारसांनी त्यांच्या गावातील नवीन कुलदेवता ठरवली तर काळानुरूप काहीच चुकीचे नाही. अमेरिका,युके,ओस्ट्रेलियातून इकडे येऊन कोल्हापूर, अंबेजोगाइ, जेजुरी, बदामिला जाण्यापेक्शा तिकडेच सोय करावी.

माहितगार's picture

13 Dec 2018 - 9:02 am | माहितगार

कुलदैवत संकल्पना ऋग्वेदीय नसली तरी पुराण काळापासून निश्चित दिसते. कुलदैवत संकल्पना इन एनी केस आदी शंकराचार्य आणि मराठेशाही पूर्व असण्याची शक्यता अधिक वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Dec 2018 - 2:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

कंकाका, आयडिया वाईट नाही. येत्या पन्नास एक वर्षात, न्यूयार्कची महालक्ष्मी, लॉस एंजेलिसची अंबाबाई, वगैरे कुलदैवते निर्माण झाली तरी आश्चर्य वाटायला नको ! :)

आजच्या घडीला तीसपेक्षा जास्त स्वामीनारायण मंदीरे व अनेक गणेश मंदिरे अमेरिकेत आहेत. इतर देवांचीही अनेक लहान मोठी मंदीरे आहेत. न्यूयॉर्क शहराला भेट देताना जरासा वेळ हाताशी असेल तर The Hindu Temple Society of North America यांच्या व्यवस्थापनाखालील फ्लशिंग, क्विन्स येथिल गणेश मंदिराला (श्री महावल्लभ गणपति देवस्थानम्) जरून भेट द्यावी. या मंदिराने चालवलेल्या 'टेंपल रेस्टॉरंट' मधिल जेवणाचाही आनंद घेता येईल.

विषय रोचक आहे. अशा दृष्टीने विचार केला नव्हता.

कंजूस यांचं मत (वतन, उपजीविका यांच्या परिसरात असलेली दैवतं भजणे) पटतं आहे. इतर चर्चा वाचायला आवडेल.

माझ्या माहितीनुसार वेगवेगळे प्रकार आहेत..
1. स्थलांतर करताना मूळ देवता आणि तिचे स्थान ना सोडणे. यात चित्पावनांची अंबेजोगाई जशी कुलदेवता आहे तसे. स्थलांतर होऊन शतके लोटली तरी कुलदेवता बदललेली नाही. देवीच्या बाबतीत हे प्रामुख्याने दिसून येते, कारण महाराष्ट्र भागात शक्तीपीठे 3 १/२ च आहेत, आणि बहुतांश लोकांची कुलदेवता तीच असते.
२. दळणवळणाच्या अभावामुळे स्थानिक तुल्यबळ देवता स्वीकारणे. हे विशेषतः देवांच्या बाबतीत झालेले आहे. (पुल्लिंगी). सामान्यपणे जवळ असलेले एखादे शंकराचे स्थान स्वीकारणे वगैरे वगैरे. यामध्ये सहसा देव बदलत नाही, म्हणजे शंकर तर शंकर/मल्हारी, विष्णू तर विष्णू वगैरे.
३. अट घालून देवता स्वीकारली जाणे - काही वेळेस एखाद्या भागात रोजगार हवा असेल तर तेथील स्थानिक देवता कुलदेवता स्वीकारण्याची अट घातली जात असे. यामध्ये माझ्या माहितीत गणपतीपुळे आहे. पूर्वी तिथे स्थानिक होताना गणपतीला देव म्हणून स्वीकारण्याचे अट असायची, असे ऐकून आहे. त्या पंचक्रोशीत दुसरा देव नाही.
४. मूळ कुलदेवतेची नवीन ठिकाणी प्रतिष्ठापना करणे - हे मी आर्यदुर्गा या देवीच्या बाबतीत पाहिले आहे. वेगवेगळ्या कुटुंबांची देवता एकाच , आर्यदुर्गा, पण कधी कणकवली ची, कधी राजपुरची वगैरे असे आहेत.

यामध्ये स्थानदेवता आणि ग्रामदेवता येत नाही. त्यांना मान देणे अपेक्षितच आहे. कोणत्याही कार्यारंभापूर्वी जर संकल्प ऐकला तर इष्टदेवता(कार्याची इष्ट देवता), कुलदेवता, वास्तुदेवता, स्थानदेवता आणि ग्रामदेवता असा क्रम असतो.

असो

एक जरा ताणलेली कल्पना अशी की काही बाबतीत खाजगी देवस्थान, देऊळ असून पुजारी कुटुंबाने स्थलांतर केलं आणि जाताना देव सोबत घेऊन गेले / नवीन गावी प्रतिष्ठापना केली असं झालं असणं शक्य आहे का?

माहितगार's picture

13 Dec 2018 - 1:33 pm | माहितगार

कुलगुरुंचे स्थलांतरा सोबत देवतेचे स्थलांतर अगदीच अशक्य नसावे. असे स्थलांतर जसे उपजिवीकेमुळे होऊ शकते तसे मुर्ती भंजकांच्या आक्रमणामुळे ही शक्य असावे. फाळणीच्या काळातील उदाहरण म्हणजे पेशावर येथील नृसींहमुर्ती केदारनाथ की बद्रीकेदार येथे स्थलांतरीत केली. मध्ययुगीन मुर्ती भंजक आक्रमणाच्या काळात मुर्ती आणि पुजारी स्थानांतरीत होऊन मुर्ती स्थानांतराची माहिती भक्तांपर्यंत कानोकानी पोहोचवली जाणेही शक्य असावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2018 - 2:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

पोर्तुगिजांच्या जाचामुळे देवतेसकट पुजार्‍यांचे स्थलांतर झाल्याची अनेक उदाहरणे गोव्यात आहेत. अनेक प्रसिद्ध देवळांच्या मूळ जागा त्यांच्या आत्ताच्या ठिकाणी नसून पोर्तुगिजांनी त्यांनी सुरुवातीच्या काळात व्यापलेल्या जुन्या गोव्यात होत्या.

संदर्भ...

महासंग्राम's picture

14 Dec 2018 - 2:14 pm | महासंग्राम

रा ची ढेरे यांची पुस्तके संदर्भात उपयुक्त ठरतील.