बघता मानस होते दंग २: पुणे ते सातारा (१०५ किमी)
बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना
७ सप्टेंबरची सकाळ. आज ह्या प्रवासाचा पहिला मुख्य टप्पा आहे. आज शंभर किलोमीटरपेक्षा जास्त सायकल चालवायची आहे. सकाळी उजाडता उजाडता निघालो. आज लगेचच कात्रज घाट किंवा कात्रज बोगद्याचा चढ लागेल. ह्या रूटवर आधीही गेलो आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही. पुण्यात धायरीतून निघाल्यानंतर लवकरच कात्रज बोगद्याच्या आधीचा चढ सुरू झाला. सायकलमध्ये ब्लिंकर ऑन केलं. तसेच, सायकल व हेलमेटवरही अनेक लाल पट्ट्या चिटकवल्या आहेत. आणि प्रकाशात चमकणारं रिफ्लेक्टिव्ह जॅकेटही घातलं आहे. आज नक्कीच पाऊस लागणार, त्याचीही तयारी झाली आहे. आता बोगद्यापर्यंत चढ आणि नंतर मोठा उतार! सुमारे आठ किलोमीटरच्या चढानंतर बोगदा आला. सव्वा किलोमीटरचा बोगदा! हा अनुभव आधीही घेतला असला तरी विशेष वाटतो. हळु हळु जसा बोगदा संपत येतो, तसा परत प्रकाश येतो! आपल्या सगळ्यांच्या जीवन कहाण्यांचा हा अविभाज्य भाग! आता इथून सलग पंचवीस किलोमीटर उतार आहे.
लवकरच पाऊस सुरू झाला. पुढे रस्त्यावर मस्त ढग दिसत आहेत. उतार संपायच्या आधी कपूरहोळ गावात नाश्ता केला. मागच्या वर्षी योग- ध्यान सायकल प्रवासासाठी गेलो होतो, तेव्हा इथूनच भोरला वळालो होतो. सुरुवातीला चढ असूनही नंतर उतार असल्यामुळे इथपर्यंत वेगात आलो आहे. पुढे पाऊस वाढत जातोय. आता इथून पुढे हलका चढ सुरू होईल आणि साताराच्या आधी खंबाटकी घाट लागेल. आता मस्त पाऊस सुरू झाला! पण मी पूर्ण तयारी केली आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही. लॅपटॉपही अनेक आच्छादनांच्या थरांच्या आत सुरक्षित आहे. पावसामुळे फक्त मोबाईलमधून फोटो घेणं थांबवावं लागलं.
खंबाटकी घाट मी आजवर कधी चढलो नाही आहे. पण त्यापेक्षा मोठा असलेला सिंहगड अनेकदा सायकलवर केला आहे. त्यामुळे घाटात काहीच अडचण नाही आली. घाट सुरू होईपर्यंत पाऊस होता. त्यामुळे वाटतंय की, वर घाटात तर मोठा पाऊस असणार. पण घाट सुरू झाल्यावर लगेचच पाऊस थांबला! आणि मग फोटो सुरू झाले. आता जोरदार नजारे दिसत आहेत. ढग खाली राहिल्यामुळे घाटात तर ऊन पडलं आहे! वा! घाटातला रस्ता तितका ओला नसल्यामुळे सायकल स्किड होण्याची भितीही दूर झाली. (नजारे) बघता बघता घाट पार झाला. अर्थात् वेळ लागलाच, पण नजा-यांमुळे तो जाणवला नाही.
घाटामध्ये ऊन!
आता परत उतार लागेल. इथून आणखी नजारे दिसत आहेत. परत एकदा नाश्ता केला. इथून सातारा फक्त ३५ किमी दूर आहे. पण माझं वेळेचं गणित बहुतेक चुकणार. सायकलचा वेग तर छान आहे, उतार लागत असल्यामुळे चढासाठी लागणारा वेळ कव्हर होतोय. पण मध्ये थोडं थांबावं लागतंय व त्यात वेळ जातोय. त्यामुळे चहा- बिस्कीट व चिप्स घेऊन लगेचच निघालो. मागच्या वेळी भोर- वाई करून ज्या रस्त्याने साताराला आलो होतो, तोही येऊन मिळाला. आता परत ओळखीचा रस्ता! हळु हळु सातारा जवळ येत गेलं. मागच्या वेळी ज्या सरांकडे थांबलो होतो, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या रूमवर ह्या वेळी थांबेन. मागच्या वेळी साता-यातल्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात एक कार्यक्रमही झाला होता. ह्या वेळी ह्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या रूमवर थांबेन. जमलं तर त्यांच्यासोबत थोडी बातचीतही करेन. हायवे सोडून सातारा गावाकडे निघालो. समोर अक्षरश: धडकी भरवणारा विराट अजिंक्यतारा दिसतोय! इथून त्यांना फोन करण्यामध्ये व रस्ता विचारण्यात थोडा वेळ गेला. १२ ला साता-याला पोहचेन असं वाटलं होतं, पण सव्वा वाजता पोहचलो. पण काय जबरदस्त प्रवास झाला!
कृष्णा नदी!
थोडा उशीर झाल्यामुळे माझ्या रूटीन कामाची थोडी काळजी वाटत होती. पण काही अर्जंट सबमिशन्स नसल्यामुळे मला फ्रेश होण्याइतका वेळ मिळाला. पण नंतर जेवण्यासाठी फुरसत नाही मिळाली. एक तर पुढे सबमिशन होते आणि जेवलो असतो तर झोप येण्याची भिती होती. तसंच सायकल चालवताना मध्ये मध्ये काही ना काही खात होतोच. त्यामुळे जेवण टाळून लॅपटॉपवर कामाला बसलो. मध्ये मध्ये थोडा आराम करत राहिलो. संध्याकाळी मागच्या वेळी भेटलो होतो त्यांना भेटलो. कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांसोबत गप्पाही मारल्या. काय दिवस गेला आजचा! कोंकण जवळ येतंय हळु हळु!
आज १०५ किलोमीटर झाले. दोन मध्यम श्रेणीचे घाट आणि एकूण हाईट गेन ९६० मीटर
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
17 Oct 2018 - 8:43 am | राघवेंद्र
मस्त चालू आहे सायकल सफर. पु भा प्र
17 Oct 2018 - 8:35 pm | दुर्गविहारी
वा ! झक्कास चालली आहे सफर. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.
19 Oct 2018 - 12:17 pm | सिरुसेरि
हाही भाग छान झाला आहे . पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर प्रवासाला शुभेच्छा .
19 Oct 2018 - 4:42 pm | विनिता००२
वा मस्तच !! घाटातल्या फोटोतले ढग अगदी अंगावर आले आणि शहारायाला झालं :)
20 Oct 2018 - 8:01 am | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!
@ सिरुसेरी जी, ही मोहीम शीर्षकात दिलेल्या रूटप्रमाणे तेव्हाच पूर्ण झाली आहे. सो आत्ता शुभेच्छा ठेवून घेतो व पुढच्या मोहीमेच्या वेळी वापरतो! धन्यवाद! :)