श्रीगणेश लेखमाला - आशा पाटील : अंधार्‍या आकाशातली तेजस्वी तारका

मार्गी's picture
मार्गी in लेखमाला
19 Sep 2018 - 8:17 am

.

आशा पाटील : अंधार्‍या आकाशातली तेजस्वी तारका
कॉलेजमध्ये सायकलिंग सुटल्यानंतर दहा वर्षांनी सायकल पुन: हातात घेण्याची प्रेरणा देणार्‍या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती होत्या आशा पाटील ह्या मागच्या पिढीतील दिग्गज सायकलिस्ट! जेव्हा फक्त पुरुषांच्या मुंबई-पुणे रेस व्हायच्या, त्या वेळेस त्या रेसमध्ये भाग घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता; पण स्पर्धा आयोजकांनी भाग घेऊ दिला नाही, म्हणून शेवटी मुंबई-पुणे १६० किलोमीटर अंतर १९७०च्या दशकात त्यांनी एकटीने पावणेसहा तासांमध्ये सायकलवर पार केलं होतं! तेही त्या काळातली सायकल वापरून व त्या काळातल्या रस्त्यांवर!!! २०१३मध्ये सायकल नव्याने हातात धरल्यापासून त्यांना भेटायचं मनात होतं. पण असंही वाटायचं की, त्यांना भेटण्याआधी आपणही थोडं सायकलिंग करावं. नवीन सायकल घेण्यापूर्वी इंटरनेटवर एका लेखात आशा पाटील ह्यांची माहिती मिळाली होती. त्यामध्येच त्यांचा नंबरही दिला होता. त्यानुसार ओळखीच्या एका सायकलिस्ट मित्राच्या शाळेतही त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलावलं होतं.
अखेरीस एके दिवशी त्यांना भेटायचा योग आला. भेटायला अर्थातच तळेगाव दाभाडे येथे सायकलवरून गेलो. तळेगाव-चाकण रस्त्यापासून जवळच इंद्रायणी कॉलनीत त्यांचा बंगला आहे. बंगल्यात जाताच अनेक चतुष्पाद प्राणी अनेक प्रकारे आपलं स्वागत करतात. त्या अनेक प्रकारच्या कुत्र्यांचं हॉस्टेल चालवतात. काही छोटी पिलं, तर काही अगदी विदेशी कुत्रे! प्रत्येक कुत्रा पाहुण्यांचं स्वत:च्या पद्धतीने 'स्वागत' करतो! आशाताई त्यांना समजावतात आणि बाजूला करतात. आतमधल्या खोलीपर्यंत हे मित्र सोबत करतात. आशाताई त्यांना चुचकारून समजावतात आणि थोडं लांब करतात. मग सुरू होते गप्पांची एक मैफील, एका वेगळ्याच काळात आणि एका वेगळ्या अनुभवविश्वात घेऊन जाणारी!
त्यांच्या घरात गेल्यावर प्राण्यांबरोबरच त्यांची जुनी सायकल, अनेक मेडल्स, अनेक जुन्या सायकलिंगचे फोटो व कात्रणंही आपलं स्वागत करतात. त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता होती. अगदी १९६०च्या व १९७०च्या दशकात, त्या काळात त्यांनी इतकी सायकल कशी चालवली असेल? तीसुद्धा सायकलिंगमध्ये महिलांचा सहभाग अतिशय कमी असताना? आणि त्या काळात त्यांना काय अडचणी आल्या असतील? हे सगळे प्रश्न मनात घेऊन त्यांच्यासमोर बसलो आणि हळूहळू एक विलक्षण जीवन प्रवास उलगडण्यास सुरुवात झाली.







अकोला ते मॉस्को व्हाया अमेरिका
आशाताईंची कहाणी सुरू होते त्यांच्या वडिलांपासून - म्हणजे पंढरीनाथ पाटीलांपासून. मूळचे अकोला जिल्ह्यातील बेरार गावातले असलेल्या त्यांच्या वडिलांना त्यांच्या लहानपणी, म्हणजे १९००च्या काळामध्ये शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. मराठा समाजातले असल्यामुळे आणि फक्त ब्राह्मणांची मुलं शिकत असल्यामुळे त्यांना कोणीही शिकवत नव्हतं. पण पंढरीनाथ पाटील मात्र शिकायला उत्सुक होते. त्यांनी शाळेचा हट्ट धरला. पण त्यांच्या वडिलांनीच विरोध केला व त्यांना मारलं, असा तो काळ होता. पण ते झाडाच्या जवळ उभं राहून मुलं काय शिकतात हे बघायचे. पंढरीनाथ शाळेच्या वर्गाच्या बाहेरून ऐकून ऐकून त्यांना अभ्यासात गोडी लागली. त्यांची गोडी बघून शिक्षकांनी त्यांना पाटी‌-पेन्सिल घेऊन दिली आणि काही काळाने बाजूला बसून अभ्यास करायला प्रोत्साहन दिलं. हळूहळू ते मुलांमध्ये बसायला लागले - सगळ्यांत मागे. त्यांची आवड बघून शिक्षकांनी त्यांना वर्गात घेतलं - एका कोपर्‍यात आणि कालांतराने पुष्कळ संघर्ष करून वर्गामध्ये बसू लागले. इतक्या विपरीत परिस्थितीतून जाऊन त्यांनी त्या वेळची मॅट्रिक पूर्ण केली. त्यांच्या शिक्षकांना तोपर्यंत कळलं होतं की हा मुलगा पुढेही शिकू शकतो, म्हणून त्यांनी पंढरीनाथांच्या घरच्यांना समजावून त्यांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. पंढरीनाथ पाटील पुण्यात दोन वर्षं शिकले व त्यांचं इंग्लिश पक्कं झालं.
त्यानंतर ते मुंबईला गेले, तिथे अजून पुढे शिकले. वडील काय शिकले हे आम्हाला माहीत नाही, असं आशा पाटील सांगतात. पण मुंबईत तीन वर्षं काढल्यानंतर ते थेट अमेरिकेला गेले. एकोणीस-वीस वर्षं वय असताना ते बोटीने अमेरिकेला गेले. हा काळ साधारण १९१५-१८चा आहे. त्यांनी फोर्ड कंपनीमध्ये नोकरी मिळवून आपला चांगला जम बसवला आणि तिथेच न थांबता शिक्षण पुढे सुरू ठेवलं आणि शुगर केमिस्ट्री ह्या विषयात पीएच.डी. केलं. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातली ही एका ग्रामीण मुलाची झेप! त्यांनी अमेरिकेत चौदा वर्षं फोर्ड कंपनीत नोकरी केली व पुढे शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे इतकी वर्षं अमेरिकेत राहत असतानाही त्यांनी आपल्या गावची कुस्ती सोडली नव्हती. उलट त्यांनी ती अमेरिकेतल्या लोकांना शिकवली व तिथे सुरू केली.
१४ वर्षं अमेरिकेत काढल्यानंतर त्यांना राजकारणात खूप रस निर्माण झाला होता. म्हणून रशियन सिस्टिमचा अभ्यास करण्यासाठी ते रशियाला गेले. त्या वेळचा रशिया स्टॅलिनच्या बोल्शेव्हिक राजवटीतला रशिया होता. एके दिवशी बॅग घेऊन अमेरिका सोडली व रशियाला गेले. तिथली भाषा येत नव्हती, बाकी काही माहिती नव्हती, तरी तिथे गेले. आशा पाटील सांगतात, "माझी आई सांगायची की त्या वेळी रशिया फार स्ट्रिक्ट होता. त्यांना बाहेरचे लोक आलेले चालत नव्हते. वडिलांनी तिथे शेवटी नोकरी मिळवली व तिथे राहू लागले. त्या दरम्यानच त्यांची आईशी भेट झाली व नंतर त्यांचं प्रेम जुळून आलं." नंतर पंढरीनाथांनी त्यांच्याशी - म्हणजे एका रशियन युवतीशी लग्नही केलं. त्या काळात त्या लग्नाला प्रचंड विरोध झाला. अगदी सरकारपर्यंत तो विषय गेला होता आणि पंढरीनाथांचे सासू- सासरे ह्यांना सरकारने तीन वर्षं कुप्रसिद्ध सैबेरियामधल्या तुरुंगवासातही पाठवलं होतं. पण हे त्यांनी आशाताईंच्या आईंना तेव्हा सांगितलं नाही. लग्न केल्यानंतर आशाताईंचे आई-वडील १९३३मध्ये भारतात परत आले.
आशाताईंच्या आईंचा जन्म मॉस्कोला झाला होता. त्यांच्या आईंचे वडील मिलिटरीत होते व नंतर खूप वरच्या पोस्टला गेले. त्यांचं कुटुंब श्रीमंत होतं, त्या चांगल्या शिकल्या होत्या. त्या काळात ते लँडलॉर्ड होते. त्या अस्थिर काळात आईंचे वडील झारच्या मिलिटरीत होते व त्यामुळे त्यांना त्रास नव्हता. मिलिटरी ट्रेनिंग कंपल्शन असल्यामुळे नंतर आईंचे दोघेही भाऊ मिलिटरीत गेले. एक भाऊ नंतर युद्धामध्येच गेला. दुसर्‍या भावाने (आशाताईंच्या मामाने) मिलिटरी ट्रेनिंग पूर्ण केलं व नंतर तो स्पुटनिक उपग्रहाच्या टीममध्ये होता. आशाताईंच्या आई-वडिलांच्या लग्नानंतर त्यांच्या वडिलांच्या व भावांच्या नोकरीवर परिणाम झाला. विदेशी मुलाशी मुलीचं लग्न केलं म्हणून कुटुंबाला त्रास झाला. आणि तोही इतका की आशाताईंच्या आईंना तीस वर्षं रशियाला जायला परवानगी दिली नाही. केवळ पत्रव्यवहार होता. पत्र यायची, पण ती सगळी उघडून बंद करून यायची. त्यांच्या आईंनाही सायकलिंगची आवड होती.
मुक्काम तळेगाव दाभाडे
आई-वडील नंतर भारतात आल्यावर त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना नोकरी मिळत नव्हती. फक्त वालचंद नगरला एक शुगर फॅक्टरी होती. पण ती नोकरी वडिलांनी स्वीकारली नाही. काही काळ त्यांनी मुंबईला राहून इतर काही कामं केली आणि शेवटी १९३५ला आई-वडील तळेगावला आले आणि पोल्ट्री फार्मिंग सुरू केलं. आशाताई सांगतात, नंतर इतर काही जॉब मिळत नसल्यामुळे त्यांनी हेच काम पुढे नेण्याचं ठरवलं. १९३०च्या दशकात इथे खूप मोठा पाऊस असायचा. शिवाय तेव्हाचं तळेगाव दाभाडे म्हणजे अगदी लहानसं निर्जन खेडंच. सुरुवातीला ही पोल्ट्री कामशेतला होती. १९३० व ४०च्या दशकात इथे अतिशय मोठा पाऊस पडत असे व जून ते सप्टेंबर हे चार महिने सतत ओलावा असे. त्यानंतरही‌ ती जागा थंड व ओलसर असायही. त्यांचं घरही नदीजवळ होतं. त्यामुळे ह्या थंड व ओल्या हवेमुळे कोंबडीची पिल्लं मरायची. म्हणून त्यांना पोल्ट्री दुसर्‍या जागी न्यावी लागली. पुढे १९३५-३६मध्ये आत्ताची तळेगावमधली जागा मिळाली. सामान बैलगाडीतून न्यावं लागलं व त्यासाठी १५ दिवस लागले. ब्रिटिश कलेक्टरने दाभाडे संस्थानची ही जागा दहा वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिली. नंतर वडिलांनी ११,००० कोंबड्यांची पैदास केली. लोक दूरवरून यायचे बघायला. त्या काळात कोंबड्या खाण्याचं प्रमाण कमी होतं. फक्त अंडी बाजारात जायची. आईने बरेच प्रयत्न करून मुंबईच्या ताज महाल हॉटेलचं काँट्रॅक्ट मिळवलं. इथून ते बॉक्स तळेगाव स्टेशनला न्यायचो, तिथून लोकलने लोणावळा व मग डेक्कन क्वीनने मुंबई! आणि तसेच ते बॉक्सेस संध्याकाळी परत यायचे.
इथेच आशाताईंच्या भावांचा जन्म झाला. आशाताईंचा जन्म १९५१मध्ये झाला. आपल्या मुलांनी इंग्लिश शाळेत शिकावं अशी आशाताईंच्या आईंची इच्छा होती. लहानपणी जवळ इंग्लिश माध्यमाची शाळा नसल्यामुळे त्यांचे भाऊ घोड्यावरून शाळेत जायचे, एक बाई घोड्यावरून घेऊन जायची. असं एक वर्षं त्यांनी केलं. नंतर लोणावळ्यात व्ही.पी.एस. शाळेमध्ये मुख्याध्यापकांच्या घरी राहून शिकले व पुढे पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला व मेडिकल कॉलेजला शिकून १९५९मध्ये डॉक्टर झाले. आशाताईंना लहानपणापासूनच शेतावरच्या गुरांची-प्राण्यांची सोबत मिळाली. नंतर वडिलांनी दुधाचा व्यवसाय केल्यामुळे गाई-म्हशी-बकरी-कोंबड्या अशा सगळ्यांनी त्यांना वाढवलं. तिथूनच त्यांची प्राण्यांशी मैत्री सुरू झाली व ती आजही टिकून आहे. प्राणी किती जीव लावतात, हे त्यांनी अनुभवलं.
शिक्षणासाठी संघर्ष
पुढे आशाताईंच्या शाळेचा प्रश्न आला. इथे इंग्लिश शाळा नव्हती. तेव्हा तीन वर्षाच्या वयात त्यांच्या आईंनी एक छोटी सायकल कुठून तरी आणली. तीसुद्धा तिसरं चाक नसलेली. तिथून त्यांचं सायकलिंग सुरू झालं. नंतर पुण्यात सेंट हेलेना शाळेत अ‍ॅडमिशन घेतली. आशाताईंना पुण्यात शिकताना वडिलांइतका संघर्ष करावा लागला नाही, पण वेगळ्या प्रकारे संघर्ष करावा लागला. तिथे त्या शाळेमध्ये त्यांच्या आईंची एक रशियन मैत्रीण होती. तिथे त्या एक वर्ष राहिल्या. फक्त पहिलीसाठीच. पुढच्या वर्षापासून त्यांनी तळेगाववरून अप-डाउन सुरू केलं. अगदी दुसरीत असताना आशाताई पहाटे उठून स्टेशनवर सायकलने जायच्या. तिथून ट्रेनने पुण्यात जायच्या व दुपारी अडीचच्या एक्स्प्रेसने परत यायच्या व मग परत स्टेशनवरून सायकलने घरी यायच्या! आई फार कडक असल्यामुळे कितीही पाऊस-थंडी असेल तरी जावंच लागायचं. त्या वेळेस त्या मोठ्या जेंट्स सायकलने जायच्या. दांड्याच्या मधून पाय घालून - कैची कट सायकल म्हणतात तसं. ताई सांगतात, "मी अंधारात स्टेशनवर जायची, सगळ्या गाड्या लेट असायच्या. तसंच पुढे जायची व शाळा करायची. तेव्हापासून सायकलची आवड निर्माण झाली! आणि त्याच्याही आधी आई मला सायकलवर बास्केटमध्ये बसवून गावात नेत होतीच. दुसरी ते चौथी तीन वर्षं ह्या पद्धतीनेच केलं."
पाचवीला असताना मात्र त्यांच्या आईंना मुंबई आयआयटीमध्ये नोकरी मिळाली. तेव्हा त्या तीन वर्षं सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये शिकल्या. पाचवी ते सातवी तिथे केलं. तिथे स्पोर्ट्सची आवड असल्यामुळे सगळ्या खेळांमध्ये त्या भाग घ्यायच्या. तिथे स्पोर्ट्ससाठी खूप चांगला वाव मिळाला. नंतर पुढे आयआयटी पवईमध्येच सेंट्रल स्कूल सुरू झाल्यावर तिथे शिकल्या. पण नंतर त्यांच्या आईंनी ती नोकरी सोडल्यामुळे त्या परत तळेगावला आल्या व त्यांनी देहू रोडच्या सेंट्रल स्कूलमध्ये प्रवेश घेतला.

१९६५-६६चा हा काळ. देहू रोडला जाण्यासाठीही आधी स्टेशनवर सायकलने जाणं व परत स्टेशनवरून सायकलने घरी येणं, हाच क्रम होता. ताई आठवीत असताना १९६६ला वडील वारले. पुढे काही वर्षं देहूरोडलाच त्या शिकल्या. तेव्हा येणं-जाणं सोयीचं व्हावं, म्हणून १९६७मध्ये पुण्याच्या कँपमधून एक नवीन सायकल घेतली. सरदारजीचं दुकान होतं! आईने भाव करून २१०ची सायकल १९०ला घेतली. ती सायकल घेऊन स्टेशनला आल्या व ट्रेनने तळेगावला आल्या. स्टेशनवर आईने सायकल लावलेली होती. दोघी सायकलीवरूनच घरी आल्या. पुढे देहू रोडची शाळा त्याच सायकलवर सुरू केली. तेव्हा आतून बेगडेवाडीजवळून एक रस्ता होता. अकरावी तिथे केलं.
आशाताईंनी नंतर बीए इंग्लिश लिटरेचर केलं. तेव्हा तळेगावात इंद्रायणी महाविद्यालय सुरू झालं होतं. तिथे मराठी माध्यम होतं. पण पुण्यात अप-डाउन नको, म्हणून त्यांनी दोन वर्षं इथे शिक्षण घेतलं. आधीचं सगळं शिक्षण इंग्लिश माध्यमात झाल्यामुळे अडचण होती, पण केलं. तरी फायनल इयर फर्ग्युसन कॉलेजला केलं. १९६९मध्ये भाऊ कोल्हापूरला राहायला गेला. त्याचं लग्न झालं होतं आणि तळेगावात मेडिकल प्रॅक्टिसमध्ये फार कमाई होत नव्हती. कारण सगळे पेशंट व बायका म्हणायच्या, "आम्ही तुम्हाला लहानपणी खांद्यावर खेळवलं आहे, तुम्हांला कसे पैसे देऊ?" वडिलांच्या कोंबड्यांसाठी अनेक जण यायचे, त्यामुळे लोक ओळखीचे होते. लोक आम्हाला 'कोंबडे पाटील' म्हणून ओळखायचे. मग फक्त त्या व आईच तिथे राहिल्या.
तळेगावातल्या त्यांच्या जागेमध्ये बावन्न वर्षं वीज नव्हती. पाणी दूरवरून आणावं लागायचं. आई विदेशी असूनही कावडीने पाणी आणायची. घर दहा खोल्यांचं मोठं असलं, तरी पडीक होतं. उंदीर, विंचू आणि साप घरात फिरायचे. पण घरी नेहमी दहा-बारा कुत्री असायची. "तिथल्या विहिरीवर आम्ही सगळे व्यवसाय केले, ती कधीच आटली नाही. दूध, पोल्ट्री याबरोबर शेतीही केली. दर वेळेस दहा वर्षांचं लीज संपलं की, वाढवत जायचे. असं पासष्ट वर्षं झालं. सुमारे पस्तीस एकर जमिनीचं वार्षिक भाडं १०६ रुपये होतं. त्यातच दाभाडे संस्थानिकांनी खटला दाखल केला. नंतर धंद्यात कमाई होत नव्हती, म्हणून पोल्ट्री कमी करत गेले. नंतर दहा वर्षं दुधाचा व्यवसाय चांगला चालला. नंतर बाजूला कंपन्या आल्या व माणसं मिळणं कमी झालं. नंतर दुधाचा व्यवसायही बंद करावा लागला. नंतर त्यांनी व आईंनी मिळून १९९७पर्यंत शेती केली. आईंनी सांगितल्यानुसार नोकरी न करता शेतीच केली."
ताईंच्या वडिलांना राजकारणात रस होता. नंतर नंतर ते राजकारणी लोकांसोबत जायचे. ताई सांगतात, "वडील त्या लोकांकडे जाऊन राहायचे. कधी मलाही न्यायचे. तेव्हा मला वाटायचं की, इतरांचं बघण्याऐवजी आपलं का बघू नये? त्या मानाने आईने जास्त केलं. पण शेतीतून फारसं मिळायचं नाही. कारण पीक चांगलं आलं तर सगळ्यांचंच चांगलं येतं आणि भाव पडतो. विदेशात मात्र वेगळं करतात. ठरलेल्या भागात ते ठरलेलं पीकच घेतात. तिथे त्यांना भाव मिळतो. इथे प्रत्येकाला वाटतं मी करणार, मी करणार. दलाल लोकही असतात. त्यामुळे शेतकरी अडचणीत असतो."
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन सायकली मिळवल्या
हे करत असताना एकदा १९७३मध्ये पेपरमध्ये सायकल रेसबद्दल वाचलं. तोपर्यंत काहीही माहीत नव्हतं. आशाताई सांगतात, "तेव्हा काहीच माहीत नव्हतं. आईला विचारलं, तेव्हा म्हणाली - बघ, तुला कसं वाटतं. शिवाजीनगर पोलीस ग्राउंडला रेस होती. रेसच्या चार दिवस आधी जाऊन सगळी माहिती काढली. मग प्रश्न होता सायकल कशी न्यायची. आणि त्या वेळी हेही कळलं की सायकलवरचं एक्स्ट्रा सामान काढायला पाहिजे - मडगार्ड, कॅरिअर असं. तितकं तेव्हा कळत होतं! ते काढलं आणि आदल्या दिवशी ट्रेनने नेली सायकल. पोलीस ग्राउंडजवळ सायकल ठेवली. दुसर्‍या दिवशी रेसला गेले. एका दिवसात अनेक शर्यती होत्या. त्यामध्ये एकाच दिवसात तीन सायकली जिंकल्या! सात किलोमीटरच्या शर्यतीत दुसरा नंबर आला, कारण रस्ता नीट माहीत नव्हता. रेस काय असते, हेही माहीत नव्हतं. नंतर अडथळ्याच्या शर्यतीत पहिला नंबर आला आणि स्लो सायकलिंगमध्ये हवा कमी करून पहिला नंबर आला! एकाच दिवशी तीन सायकली मिळाल्या! रात्री मैत्रिणीबरोबर ट्रेनने तळेगावला येताना एक सायकल आणली. नंतर सलग दोन दिवस जाऊन दोन सायकली आणल्या. सायकलनेच तळेगावला येण्याचा विचार होता, पण भीती वाटली. त्या दिवसापासून सायकलीची खरी सुरुवात झाली. नंतर कँपमध्येही दोन-तीन रेसेस झाल्या. त्यामध्येही पहिला नंबर आला. १९७५मध्ये international year of womenची एक रेस झाली होती कँपमध्ये, तिथेही पहिला नंबर आला.
ह्या शर्यतींसाठी तयारी वेगळी काहीच नव्हती. आशाताई सांगतात, "डेली सायकलिंग होतं तेच. कारण काही माहीतच नव्हतं. शाळेपासून रोज चौदा किलोमीटरची प्रॅक्टिस होतीच. अर्थात कॉलेजमध्ये असताना विशेष सायकलिंग सुरू नव्हतं. रेस म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. पण १९७५ची रेस गाजल्यानंतर पेपरमध्ये फोटो आला, बाकीच्या सायकलिस्ट्सना कळलं. खडकीचा दशरथ पवार सायकलिस्ट माझा कोच झाला," ताई सांगतात. त्याने तीन वेळा मुंबई-पुणे रेस जिंकली होती. त्यांनी सांगितल्यानुसार भारतीय मॉडेलची रेसिंग सायकल घेतली. पण ती जड होती. म्हणून रेसच्या वेळेस मी त्यांची सायकल वापरायचे.
१९७७ला स्टेट रेस होती. त्या वेळेस पवारने दिलेली इटालियन सायकल मी चालवली. पण प्रॅक्टिस मी माझ्याच सायकलवर करायचे. त्याशिवाय किरकोळ रेसेस व्हायच्या. त्या काळात तेरा वर्षं मी पुण्यात पहिला नंबर ठेवला. पण रेस फार कमी व्हायच्या. दर वर्षी व्हायच्याच, असं नाही. दोन-तीन वर्षांनी एखादी रेस यायची. मुंबईला रेसेस व्हायच्या, ते पवार कळवायचा आणि आम्ही जायचो. एका स्टेट रेसला दुसरा नंबर आला, सायकल घसरली व मी पडले होते."
जगावेगळी अडथळ्यांची शर्यत
"त्या काळात मुलींचा रेसमधला सहभाग फार कमी असायचा. रेसचे आयोजक कसेबसे काही मुलींना तयार करायचे आणि मुंबई-पुणे रेसमध्ये तर मुलींचा सहभागच नसायचा. कारण ही रेस लांब पल्ल्याची आहे व मध्ये घाट येतो. पण मी ह्या रेससाठी तीन वर्षं सराव केला. त्यासाठी मी माझी रेसिंग सायकल वापरायचे. सायकलिस्ट दशरथ पवार माझ्यासोबत असायचा. तो खडकीवरून यायचा व मी तळेगाववरून निघायचे. वाटेत आम्ही भेटायचो. बाकीही मुलं असायची. आम्ही मग सायकलीवरून न उतरता बाँबे रोडवरून पनवेलला जायचो. तिथून परत सलग यायचो. वाटेतल्या घाटात मुख्य प्रॅक्टिस असायची. जुना घाट रस्ता तीव्र चढाचा होता. त्या वेळेस त्या सायकलीला गियर्स होते. पण पवार म्हणायचे की, घाटात उतरायचं नाही. उतरलं तर चढता येत नाही. तीन वर्षं मी सराव केला. एका वेळेस पेपरमध्ये आलं होतं की, आशा पाटील रेसमध्ये सहभाग घेणार. पण आयोजकांनी मला परवानगी दिली नाही. जेंट्स रेसमध्ये मुलगी भाग घेऊ शकत नाही म्हणाले.
मी विचार केला की, मला रेस करायची तर आहे. त्यासाठी सराव करत होते. शेवटी परमिशन दिली नाही म्हणून मी तोच रूट वैयक्तिक प्रकारे केला. रेसमध्ये ट्रॅफिक अडवलेला असतो. पण मी आणि दशरथने मिळून हा रूट वैयक्तिक प्रकारे केला. आम्हांला १६० किलोमीटरला सगळं मिळून पावणेसहा तास लागले. त्या रेसचं टायमिंग सायनपासून सुरू होतं. मुंबईत सायन ते पुण्यात जंगली महाराज रोड असा रूट असतो. ह्या रूटचं जेंट्सचं टायमिंग साडेचार तास आहे. कमलाकर झेंडेने केलं होतं. आणि घाट चढण्यासाठी मला चार वेळेस प्रयत्न करूनही २९ मिनिटं लागायची. मुलांसाठी ती वेळ बहुतेक २०- २२ मिनिटं होती. दशरथ पवारने त्याच्या सायकलीवर हा रूट केला व मला दुसर्‍या एकाची सायकल दिली होती. आमच्या दोघांच्या सायकली गियर्ड होत्या. हा रूट केलेली व एका अर्थाने मुंबई-पुणे रेस केलेली मी पहिली मुलगी होते. पण ते unofficialच राहिलं.
अमरावती-नागपूर सायकल शर्यत
ही शर्यत १९८४-८५च्या सुमारास होती. तिथे आम्ही मुली दिवसभर सायकलिंग करत होतो. सकाळी सातला निघालो, तो रात्री आठला पोहोचलो. आमची‌ वन वे रेस होती, तर मुलांची बोथ वेज होती. पण तरी मुलांनी आम्हाला ओव्हरटेक केलं व त्यांची रेस संपलीही. तिथे माझा तिसरा नंबर आला, कारण बाकी दोन मुली नागपूरच्या होत्या. ही ९६ मैलांची रेस होती व ही रेस स्टँडर्ड टीव्हीच्या जाहिरात करत होती. रेसमध्ये पहिली पाच आलेली मुलं सगळे दूधवाले होते. गंमत म्हणजे ह्या रेसमध्ये असताना मी माझ्या वडिलांच्या मूळ गावावरून गेले - अकोल्यातील बेरार. वाटेतली सगळी गावं खूप साधी होती. जाताना अनेक वेळेस वाटेमध्ये संपूर्ण निर्जन रस्ता होता. तासाभराने एखादा ट्रक लागायचा. पावसाळा असल्यामुळे बैलगाड्याही नव्हत्या. ऑगस्ट महिना होता, थोडा पाऊस होता. ह्या रेसमध्ये दोघी बाकीच्या मुली पुढे गेल्या. वाटेत काही अंतर एक पोलीस मोटरसायकलवर सोबत होता. त्याने पाणीही दिलं. ते मी थोडं चेहर्‍यावरही ओतलं. नंतर एक सरदारजी भेटला. तो मला हाताने लिफ्ट देणार होता, ओढत नेणार होता. पण ते चुकीचं असल्यामुळे मी त्याला नाही म्हणाले. येताना महाराष्ट्र एक्स्प्रेसने आले, तेव्हा पूर्ण डब्यात मी एकटीच होते. पूर्ण दिवस एकटी होते. नंतर संध्याकाळी एका स्टेशनला डबा पूर्ण भरला. सोबतच्या लोकांनी माझी चौकशी केली, तेव्हा त्यांना पेपरमधली बातमी दाखवली. ह्या रेससाठी मी दुसर्‍याची एक सायकल नेली होती. ह्या रेसमध्ये मला १५०० रुपये मिळाले होते. ह्या रेसनंतर काही किरकोळ रेसेस झाल्या.
साठीच्या वयात केलेली रेस
१९८७नंतर रेसेस खूप कमी झाल्या. माझाही सहभाग कमी होत गेला. नंतर आई आजारी पडली व नंतर वारली. त्यानंतर कुठे जाण्याचा प्रश्नच आला नाही. त्यानंतर दहा-पंधरा वर्षांची गॅप रेसमध्ये पडली. २०१०मध्ये पुण्यात एक रेस होती. त्या वेळी वयाच्या ५९ व्या वर्षी मी त्यात भाग घेतला. पुण्यातल्या एका रेसविषयी मला कळलं आणि मी गेले त्या रेसला. त्या वेळी माझी नेहमीचीच सायकल घेऊन गेले होते. तिथे मुलींकडे मात्र गियरच्या सायकली होत्या. माझी जुनी लेडीज सायकल बघून त्यांना हसू आलं. ती चार किलोमीटरची थोडे चढ-उतार असलेली रेस होती. गियरवाल्या मुली पुढे गेल्या. पण सपाटीला आले तेव्हा ही‌ सायकल पुढे गेली! श्रेय माझं नाही, माझ्या सायकलचं! ह्या सायकलीचं फ्रीव्हील २३ आसांचा आहे. बाकीच्या सायकलींची २०, १८ अशी छोटी होती. त्याला जास्त पेडल मारावं लागतं आणि ताकदही जास्त लागते. गियरच्या सायकलींचं फ्रीव्हील छोटं होतं. चढावर मी मागे होते, पण चढावर पुढे गेले. माझ्या पुढे फक्त एक मुलगी होती. पण लास्ट मोमेंटला मी वेग वाढवून जिंकले. त्याच शर्यतीत तीन किलोमीटर रनिंग होतं. तिथे माझा दुसरा क्रमांक आला.
ह्या काळात जरी रेसला जात नसले, तरी माझं सायकलिंग सुरूच होतं. त्यात गॅप पडली नव्हती. जवळ गावात तर सायकलिंग सुरूच होतं. आणि कधी वाटलं तर १५-२० किलोमीटरपर्यंत जायचे. नंतर ट्रॅफिकमुळे व गर्दीमुळे सायकलिंग कमी होत गेलं. अनेक सायकली मिळाल्या व मी अनेकांना देऊन टाकल्या. पण आईने घेऊन दिलेली १९६७मधली सायकल अजूनही आहे. तिला आता ५० वर्षं झाली आहेत. हिरो कंपनीचं लेडीज मॉडेल आहे. तीन वेळेस त्या सायकलचं वेल्डिंग केलेलं आहे. त्या सायकलवर चोवीस वर्षं मी गॅस सिलेंडर घरी घेऊन यायचे. कुत्र्यांमुळे गॅसवाला घरी न येता रोडवर ठेवून निघून जायचा. पन्नास वर्षांनंतरही त्या सायकलच्या हँडलला गंज नाहीय. रेसिंगची सायकल मी दहा वर्षं वापरली. तीन हजारांना घेतली होती व तीन हजारांना विकून टाकली. सध्या मी रेस वगैरे करत नाही. पण गावातल्या गावात सायकल चालवते. काही दिवसांपूर्वी तळेगावात एका रॅलीसाठी बोलावलं होतं, तेव्हा मी गेले होते.
प्राण्यांचं साहचर्य
मी व आई एकट्या असलो, तरी सोबत कुत्रे व प्राणी असायचेच. त्यांची सोबत कधीच सोडली नाही. नंतर कुत्र्यांचं हॉस्टेल सुरू झालं. इकडून-तिकडून कुत्रे यायचे. आता सोळा वर्षांपासून कुत्र्यांचं हॉस्टेल मी केलं आहे. आई गेल्यापासून मी गावठी कुत्रीच पाळत आली आहे आणि युरोपियन कुत्रे आत्ता नव्याने आले आहेत. लहानपणापासून हेच माझे सोबती आहेत. आई-वडील लांब असायचे. मी प्राण्यांसोबतच खेळायची. म्हशीवर व बैलावर बसलेली आहे. त्यामुळेच मला प्राण्यांच्या वेदना कळतात. आपण नेहमी म्हणतो की साखर गोड असते. पण मला वाटतं साखर गोड नसते, कारण साखर ज्या उसापासून बनते, तो ऊस वाहून नेणार्‍या बैलांचा मोठा छळ केला जातो. त्यांच्यावर किती वजन लादावं ह्याची मर्यादा आहे. पण त्या मुक्या जनावरांवर ट्रॅक्टरपेक्षाही जास्त वजन लादलं जातं. ट्रॅक्टर तरी चढावर उलटू‌ शकतो, म्हणून कमी वजन लादतात, पण बैलांवर मात्र खूप बोजा लादतात. आणि चालवताना त्यांना सतत मारत राहतात. वजन वजन उचलून बैल शेतीसाठी निरुपयोगी होतो. त्याला काही खायला दिलं जात नाही. आणि एकदा सामान वाहून झाल्यावर बैलांना सोडून दिलं जातं. शेवटी शेवटी तर बैल बसूही शकत नाही. शेतकरी बैलाला त्रास देत नाहीत, पण हे वाहतूक करणारे बैलांना छळतात. हा त्रास थांबत नाही. शिवाय बैलांना खायलाही देत नाहीत. विदेशामध्ये असं होत नाही. तिथे कामं योग्य प्रकारे केली जातात.
पाळीव प्राण्यांचीही तीच दशा आहे. बाइक चालवणारे लोक जाणीवपूर्वक प्राण्यांच्या अंगावर गाडी घालतात. कुत्र्यांना त्रास दिला जातो, मग तेही गाड्यांच्या मागे लागतात. कुत्र्यांच्या लसीकरणामध्येही त्यांना त्रास दिला जातो. गाढवांवरही मोठं वजन लादलं जातं. माणसांची संख्या वाढत गेली, तसा प्राण्यांचा छळही वाढत आहे. आपण एकीकडे म्हणतो - प्राणिमात्र आपले बांधव, पण त्यांना वागणूक मात्र विपरीत देतो. हा फार मोठा विरोधाभास आहे. मी माझ्या परीने पाळीव प्राण्यांचं हॉस्टेल चालवते. पण ह्या विषयावर काम करण्यासाठी लोकांनी पुढे आलं पाहिजे."
.... अशी ही विलक्षण जीवन कहाणी उलगडत गेली. जवळजवळ एका शतकाचा प्रवास - पंढरीनाथ पाटीलांनी अकोल्यातील गावापासून अमेरिकामार्गे मॉस्कोपर्यंत गाठलेली मजल आणि त्यानंतर आशा पाटीलांचा पराक्रम - ह्या मुलाखतीतून उलगडला. आणि फारशा माहीत नसलेल्या पण अनेक अडथळ्यांची शर्यत जिंकणार्‍या एका योद्धेला भेटण्याचं समाधान मिळालं, एक वेगळी जीवनदृष्टी आणि खूप प्रेरणाही मिळाली. महिलांची त्या काळातली स्थिती आणि आजची स्थिती ह्यामध्ये बराच फरक असला, तरी अद्याप बरीच समानताही आहे. आजही महिलांना समाजात मिळणारी वागणूक फारशी चांगली नाही. त्यामुळे आशा पाटील ह्या अद्यापही अंधार्‍या आकाशातल्या तेजस्वी तारका ठरतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर अनेक तारका समोर याव्यात, हीच इच्छा.
-निरंजन वेलणकरniranjanwelankar@gmail.com 09422108376www.niranjan-vichar.blogspot.in (लेखक अनुवादक व सायकलिस्ट आहे)

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

19 Sep 2018 - 9:20 am | ज्योति अळवणी

अप्रतिम लेख. Hats off to asha tai.

जव्हेरगंज's picture

19 Sep 2018 - 9:33 am | जव्हेरगंज

सुंदर लेख!! आवडला!!

सिरुसेरि's picture

19 Sep 2018 - 11:15 am | सिरुसेरि

अप्रतिम लेख .

सविता००१'s picture

19 Sep 2018 - 11:56 am | सविता००१

फार सुरेख लेख आहे हो.
आशा पाटील यान्च अतिशय कौतुक.
मला त्यांच्या बाबांचंही अतिशय कौतुक वाट्लं. किती प्रतिकूल परिस्थितीत काय काय केलं त्यांनी... बापरे
हॅट्स ऑफ

पद्मावति's picture

20 Sep 2018 - 11:20 am | पद्मावति

काय बोलू? निशब्द आणि नतमस्तक आशाताईंसारख्या व्यक्तिमत्वापुढे.
त्यांच्या आई आणि वडिलांची सुद्धा कहाणी ऐकून थक्क व्हायला झालंय. किती धैर्य आणि किती निष्ठा __/\__

राघवेंद्र's picture

19 Sep 2018 - 5:36 pm | राघवेंद्र

मस्त लेख आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व आशा ताईंचे.

धन्यवाद निरंजन !!

अथांग आकाश's picture

19 Sep 2018 - 8:18 pm | अथांग आकाश

माहितीपूर्ण लेख! आणि छान सादरीकरण!

.

मार्गी's picture

19 Sep 2018 - 8:19 pm | मार्गी

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! हा लेख घेतल्याबद्दल व संधी दिल्याबद्दल संपादक मंडळातील मान्यवरांनाही धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2018 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

"फारशा माहीत नसलेल्या पण अनेक अडथळ्यांची शर्यत जिंकणार्‍या एका योद्धेची" प्रतिकूलतेशी झुंज देत विजय मिळविण्याची ही कहाणी प्रेरणादायक आहे !

त्यांच्या वडीलांनीही त्यांच्या काळात जे काही केले तेही अकल्पनिय आहे !

चित्रगुप्त's picture

20 Sep 2018 - 5:52 am | चित्रगुप्त

अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिमत्व.

जव्हेरगंज's picture

20 Sep 2018 - 9:43 am | जव्हेरगंज

फार उत्तम लेख!!!!

मुक्त विहारि's picture

20 Sep 2018 - 12:21 pm | मुक्त विहारि

मस्त...

प्रमोद देर्देकर's picture

20 Sep 2018 - 2:41 pm | प्रमोद देर्देकर

खूप छान. प्रेरणादायक आयुष्य आहे ताईंचे .

तुषार काळभोर's picture

20 Sep 2018 - 8:06 pm | तुषार काळभोर

आशाताई पाटील, त्यांच्या आई व वडील सगळयांचाच जीवनप्रवास अतिशय अद्भूत आहे!

मुक्तांगण's picture

21 Sep 2018 - 10:27 am | मुक्तांगण

अतिशय सुंदर लेख! ही माहिती आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद. माणूस खरांच किती प्रतिकूल परिथिती मधे काय काय करू शकतो. अफाट आहेत त्यांचे वडिल आणि त्या सुद्धा!

विवेकपटाईत's picture

21 Sep 2018 - 10:55 am | विवेकपटाईत

अप्रतिमच !

मित्रहो's picture

22 Sep 2018 - 7:42 am | मित्रहो

छान प्रेरणादायी माहिती

सुधीर कांदळकर's picture

23 Sep 2018 - 7:36 am | सुधीर कांदळकर

पावले टाकणारी माणसे. आपल्या बाबांचा अफलातून वारसा अशाताईंनी पुढे चालवला.

एका छान, प्रेरणादायी लेखाबद्दल धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

24 Sep 2018 - 7:07 pm | टवाळ कार्टा

बाब्बो

पियुशा's picture

26 Sep 2018 - 8:47 pm | पियुशा

वा, प्रेरना दायी आशा ताइ -/\-- लेख खुप आवड्ला :)

भुजंगराव's picture

5 Oct 2018 - 8:52 pm | भुजंगराव

खुप महितिपुर्वक लेख ,प्रेरणादायी व्यक्तिमत्व ची ओळख करून दिली , धन्यवाद मार्गी जी

अगदीच विलक्षण! खूप भारावून टाकणारी कहाणी आहे ही. आशाताईंची आणि त्यांच्या आई-वडिलांचीसुद्धा.

या लेखासाठी धन्यवाद!

चिगो's picture

17 Oct 2018 - 3:31 pm | चिगो

प्रतिकूलतेच्या हेडविंड्सना धैर्याने तोंड देत जीवनाची रेस जिंकणार्‍या आशाताईंना सलाम.. त्यांच्या आई-वडीलांची कहाणीदेखील अत्यंत रोमहर्षक आणि स्फुर्तिदायक आहे.