श्रीगणेश लेखमाला - स्पीकरला ब्लूटूथ जोडणे

कंजूस's picture
कंजूस in लेखमाला
18 Sep 2018 - 9:00 am

.

स्पीकरला ब्लूटूथ जोडणे (DIY)
(ब्लूटूथ स्पीकरला एक्स्टर्नल स्पीकर जोडणे)

गाभा

आता बाजारात चिनी बनावटीचे स्वस्त ब्लूटूथ स्पीकर्स मिळू लागले आहेत. त्याशिवाय JBL किंवा अगदी महाग असे BOSE कंपनीचेही आहेतच. या स्पीकर्सना आपण मोबाइलच्या ब्लूटूथ माध्यमातून वायरलेस पद्धतीने गाणी / Audio files पाठवून मोठ्या आवाजात ऐकू शकतो. एखाद्या पिकनिक/पार्टी/छोट्या समारंभात याचा विशेष उपयोग होतो. तयार युनिटला असणाऱ्या स्पीकरशिवाय बाहेरचा इतर स्पीकर जोडण्याची सोय करणे - हे आपण करणार आहोत.

कृती
ब्लूटूथ स्पीकर ही एक असेम्ब्ली असते, त्यामध्ये तीन मुख्य गोष्टी असतात -
१) ब्लूटूथ सर्किट,
२) बॅटरी (रिचार्जेबल लिथिअम आयन)
३) स्पीकर.
४) शिवाय इतर सोयी म्हणजे
४ अ) स्क्रीन विंडो
४ ब) मेमरी कार्ड स्लॉट
४ क) पुढची फाइल वाजवणे
४ ड आवाज कंट्रोल इत्यादी

क्र. (१) निरनिराळ्या ऑडिओ फाइल्स वाजवणे हे असते.
क्र. (२) बॅटरी जेवढी मोठी, तेवढा जास्त वेळ स्पीकर वापरता येतो. किंमत वाढत जाते. परंतु ही मोठी समस्या नाही, कारण पॉवर बँक जोडता येते.
क्र. (३) स्पीकर जेवढा मोठ्या आवाजाचा (जास्त वॅाटेज/आउटपुट) आणि चांगला (कमी व्होल्टेजवर मोठा आवाज, कमी खरखर, चांगला नॉइस-टु-सिग्नल रेशो), तेवढी ब्लूटूथ स्पीकरची किंमत वाढत जाते.
क्र. (४) मधल्या सोयी आपण मोबाइलमधून ऑडिओ पाठवतानाच आपल्या हातात असतात.

आपल्याकडे एखादी जुनी म्युझिक सिस्टिम असते आणि त्यात चांगले स्पीकर्स असतात, परंतु त्यात ब्लूटूथ रिसीव्हर चिप नसते. ऑडिओ इनपुट सॉकेट्स असतात. त्यास ब्लूटूथ जोडायचे झाल्यास बाजारात एक ब्लूटूथ अ‍ॅडॉप्टर १५०-२०० रुपयांत मिळतो. तो वापरता येईल. याचे व्हिडिओ यूट्यूबवर आहेतच. या सिस्टिम्सना पॅावर द्यावी लागते, हा एक मुद्दा विचारात घ्यावा लागतो.

माझ्याकडे फिलिप्सचा तीस वर्षांपूर्वीचा एक रेडिओ होता. आता त्यातले मीडिअम वेव्ह चांगले लागत नाही, खरखर येते. एफएम नाही. शॅार्टवेव्ह केन्द्रे इतिहासजमा झाली. भंगारवाला तो रेडिओ म्हणून घेत नाही. प्लास्टिक आणि लोखंड याचे आठ रुपये किलो भावाने घेतो म्हणाला. (नंतर तो हातोड्याने प्लास्टिक तोडणार आणि स्पीकरची लोखंडी फ्रेम, मॅग्नेट वेगळे करणार.) त्यातला स्पीकर दहा वॉट्सचा चांगला आहे. त्याला दुसरा ब्लूटूथ स्पीकर किंवा छोटा रेडिओ जोडल्यास वापर होईल, ई-वेस्ट कमी होईल या विचाराने कामाला लागलो.
लागणारे साहित्य

आता प्रयोग करायचेच, तर हा म्युझिक कंपनीचा स्वस्तातला चिनी स्पीकर दोनशे रुपयाला मिळाला. त्यास रेडिओचा स्पीकर जोडायचा आहे. पण त्यास 3.5 mm audio socket नाहीये. तो लावायचा आहे.

music कंपनीचा ब्लूटूथ स्पीकर

खालच्या बाजूस असणारे स्क्रू काढले की झाकण उघडता येते.

इथे आतमध्ये छोटे सर्किट, बॅटरी, इतर सॅाकेट्स दिसतात. सर्किटमधून आतल्या स्पीकरला जाणाऱ्या लाल-काळ्या वायर्स दिसतात. त्यामध्ये ऑडिओ जॅकसाठी एक सॉकेट जोडायचे आहे.

लाल-काळी वायर पुढे दिसते आहे.

ऑडिओ सॉकेट जोडणे
प्रथम एक सॉकेट घेऊन (हे मोनो आणि स्टिरिओ या प्रकारात मिळते. आपल्याला मोनो चालेल.) ते झाकणाखाली कुठे बसेल आणि बसवल्यानंतर झाकण परत लावता येते का एवढी जागा आहे का, हे पाहायला हवे. ते झाल्यावर झाकणास योग्य ठिकाणी भोक पाडून सॉकेटचा स्क्रू आणि बाहेरची रिंग नट लावून झाकण ठेवून खातरी करून घेतली.

सॉकेट कनेक्शन्स
सर्किटमधून दोन वायर्स स्पीकरकडे जातात, त्या मध्येच कापल्यावर त्या ठिकाणी चार शेडे तयार होतात. सर्किटकडून आलेल्या शेडांना C1 आणि C2 आणि स्पीकरकडूनच्या दोन शेडांना S1 आणि S2 म्हणू या.
सॉकेट्सच्या (हे स्टीरिओ सॅाकेट आहे, चार पिनवाल्या जॅकसाठी तरीही तीन पिनवाल्या जॅकसाठी चालते.) थ्रेडेड बाजूला रिंग बसते, तिकडची पिन कॅामन असते. एक C1 आणि एक S1 एकत्र करून ती एक वायर इथे सोल्डर केली.
आता उरल्या दोन वायर्स - C2 आणि S2.

सॅाकेटच्या खालच्या बाजूस पारदर्शक प्लास्टिकमधून आतली रचना दिसते. ऑडिओ हेडफोन जॅक/पिन सॉकेटमध्ये घुसवल्यावर एक पट्टी ढकलली जाताना दिसेल. या पट्टीस जोडलेल्या पिनला C2 सोल्डर केली. हेडफोन जॅक बाहेर काढताना हलणारी पट्टी परत एका दुसऱ्या पट्टीस जाऊन चिकटताना दिसेल, त्या पट्टीच्या पिनेला S2 सोल्डर केली. (मोनो सॉकेट असल्यास हीच युक्ती वापरायची.)

सॉकेटची कनेक्शन्स करून

सॉकेटची मागची बाजू

झाकणात फिक्स करून

आता अगोदर रेडिओच्या स्पीकरला ऑडिओ जॅक/ हेडफोन्स पिन लावायची आहे.

प्रथम रेडिओचे मागचे कव्हर काढून घेतले.
- रेडिओच्या मेन्स वायरचा प्लग काढून ती वायर गुंडाळून आतच ठेवली.
- स्पीकरला जोडलेल्या सर्किटच्या वायरी काढल्या.
- स्पीकरच्या पिनांना/पॉइंट्सना दोन मल्टिस्ट्रँड वायर्स (या बाजारात मिळतात.) सोल्डर केल्या.
- या दोन वायर्स बाहेर काढून झाकण बंद केले.
- आता या दोन वायर्समधून आतल्या मोठ्या स्पीकरशी संबंध जोडता येतो, परंतु पॅावर सप्लायशी / आतल्या सर्किटशी काही संपर्क नाही.
- वाया गेलेली कोणतीही हेडफोन्स पिन / जॅक घेऊन त्यावरचे प्लास्टिक तापवून काढले. तीन कनेक्शन्स दिसतील. त्यातली मधली सोडून दोन्ही टोकाच्या पिनांना या वायर्स सोल्डर केल्या. त्यावर थोडे प्लास्टिक वितळवून लावून हँडल तयार केले.

टेस्टिंग
ब्लूटूथ स्पीकर चालू करून रेडिओचा जॅक सॅाकेटमध्ये लावून आलटून पालटून स्पीकर्स चालू-बंद झाले, तर सॉकेट्सची कनेक्शन्स बरोबर आहेत.
ही खातरी झाल्यावर झाकण फिट करा.

टेस्टिंग

फायनल

चार्जिंगसाठी पॉवर बँक लावून

इतर स्पीकर्सना पॉवर द्यावी लागते, तशी या फिलिप्स स्पीकरला जरुरी नाही.
ब्लूटूथ स्पीकर ऑडिओ सॉकेटसह वेगळाच वापरताही येतो.
बऱ्याचदा चांगले हेडफोन्स वायर तुटल्याने निकामी होतात, त्यांचीही वायर आणि जॅक बदलता येईल.
सोल्डरिंग फारसे अवघड नाही.

धोके आणि सावधगिरी

स्पीकर जोडताना त्याचे इम्पीडन्स आणि वॉटेज दुसऱ्या इलेक्ट्रांनिक्स सर्किटशी संतुलित आणि सुयोग्य ( matching, compatible) असावे लागते अथवा दोन्हींपैकी एक बंद पडू शकते. इथे music bluetooth speaker unitशी दहा वॉट्स, आठ ओहम्सचा फिलिप्स स्पीकर जोडता आला आहे.
कोणतीही वस्तू दुरुस्त (DIY) करताना काळजी घ्यावीच.
कनेक्शन्स योग्य करावीत. विशेषत: बॅटरी शॉर्टसर्किट होणार नाही हे पाहावे. सोल्डरिंग गन तापवायला सुरू केल्यावर हलकेच टिचकी मारून शॅाक बसत नाही याची खातरी करावी. लहान मुले आजूबाजूस असताना इलेक्ट्रिकची कामे करू नयेत. ती नंतर अनुकरण करतात किंवा पटकन गरम वस्तूस हात लावतात.

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

18 Sep 2018 - 11:20 am | कुमार१

अभिनंदन !

पाचव्या फोटोसाठी हा पाहा.( चुकून तिसरा रिपीट झाला आहे.)
ब्लुटुथ युनिटमधल्या स्पिकरमधली एक(S1) आणि सर्किटमधली एक (C1) एकत्र करून कॅामन पांढरी वायर,
ब्लुटुथ युनिटमधल्या स्पिकरमधली दुसरी(S2) लाल वायर,
सर्किटमधली दुसरी वायर (S2) लाल
अशा तीन वायर्स जोडलेले सॅाकेट.
फोटो

अथांग आकाश's picture

18 Sep 2018 - 12:13 pm | अथांग आकाश

वाह! छान!

speaker

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2018 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला प्रयोग.

-दिलीप बिरुटे

लगे रहो कंजूस साहेब. चांगला प्रयोग आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2018 - 3:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी भारी प्रयोग करत असतात कंजूससाहेब ! ब्राव्हो !!

तुषार काळभोर's picture

19 Sep 2018 - 7:27 am | तुषार काळभोर

भारी भारी प्रयोग करत असतात कंजूससाहेब ! ब्राव्हो !!

पिलीयन रायडर's picture

18 Sep 2018 - 4:26 pm | पिलीयन रायडर

मस्त हो काका! आवडले.

पद्मावति's picture

18 Sep 2018 - 5:40 pm | पद्मावति

फारच मस्तं.

प्रचेतस's picture

19 Sep 2018 - 8:19 am | प्रचेतस

उपयुक्त प्रयोग

गामा पैलवान's picture

19 Sep 2018 - 12:38 pm | गामा पैलवान

एकदम मस्त, जबरदस्त!

नीलदंत वगैरे नाही हो. आमच्या कंजूसकाकांना म्हणतोय! :-)

-गा.पै.

यशोधरा's picture

19 Sep 2018 - 12:45 pm | यशोधरा

मस्त DIY.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Sep 2018 - 11:04 am | प्रकाश घाटपांडे

मी फिलिप्सची साउंड सिस्टिम एच पी विंडोज ७ लॅपटॉपला ब्लूटूथने जोडायचा प्रयत्न करतो आहे पण सर्व प्रयत्न करुन ही कनेक्ट पर्याय करडाच दिसतोय. अगोदर तर ड्रायव्हर लोड होत नव्हते मग ते नेटवर शोधून केले तरी जोडलाच जात नाही काय करावे?

ट्रम्प's picture

2 Oct 2018 - 8:00 pm | ट्रम्प

कंजूस काका चें प्रयोग एक से एक भारी आहेत !!!!
त्यात सगळ्यात खतरनाक काम म्हणजे सोल्डर गन वापरून त्या दोन तीन वायर सोल्डर करणे !!! आणि सोल्डरिंग करणे एक्स्पर्टचेच काम आहे असं मला वाटतं
कारण बी इ झालेली मुलं प्रॅक्टिकल ज्यास्त नसल्याने हातात चाकू धरल्या सारखी सोल्डर गन पकडताना खूप वेळा पाहिले आहे .
आम्ही कंपनीत त्यांना दोन दोन महिने सोल्डरिंग करायला शिकवायचो तेंव्हा ते एक्स्पर्ट व्हायचे .

ब्लूटूथ सर्किटमध्ये प्री अँपला जोडले असते तर रेडियो चा पॉवर अँपलिफायर पण वापरला गेला असता.
रेडियोला वीज वापरावी लागली असती पण आवाजाची पातळी आणि दर्जा दोन्ही उंचावला असता का?

असे करणे जास्त चांगले झाले नसते का?

निनाद's picture

22 Aug 2023 - 9:47 am | निनाद

माझ्याकडे एक जुना फिलिप्स चा स्पिकर सेट आहे. हा आधी पीसी साठी वापरात होता. १० वॅटसचा आहे, आवाजाचा दर्जा चांगला आहे, खरखर किंवा हिसिंग नॉईज फारसा नाही. शिवाय चालू बंद करण्याचे बटन आहे. वॉल्युम बटन पण आहे. आतले सगळे सर्किट १२ व्होल्ट चे आहे असे दिसते. आकाराच्या मानाने आवाज उत्तम आहे. पण अर्थात त्याला ब्लूटूथ नाही.
त्याला एक ब्लूटूथ सर्किट लावण्याचा विचार अनेक दिवसांपासून चालला आहे. एकदा ईबे वरून ते चिमुकले ब्लूटूथ सर्किट मागवले पण होते. पण ते आवरा-आवरीत हरवले. आता वेळ काढून परत मागवावे लागेल. किंवा तुम्ही केले आहे त्या धर्तीवर एखादा कंडम ब्लूटूथ स्पिकर असेल तर त्याचे सर्किट वापरता येईल.

याला बॅटरी नाहीये - आणि मला बॅटरी नकोच आहे. कारण नेमक्या वेळी जेव्हा गाणी ऐकायची असतात तेव्हा स्पिकरची बॅटरी संपलेली असते, मग चार्जर शोधून वगैरे
जोडाजोडी करायचे मला कंटाळा येतो. त्यापेक्षा वीज बरी - वीजेची पिन खोचली की खात्रीशीर आवाज येणारच!
ते मला बरे वाटते...

एखादा कंडम ब्लूटूथ स्पिकर असेल तर त्याचे सर्किट वापरता येईल.
.
.
लेखात दिलेला स्पिकर दीडशे रुपयांत कुठेही अजूनही मिळतो. पण काम दणदणीत. आणि फिलिप्स दहा वॉटस स्पिकरही दणदणीत. इनपूट सप्लाय न देताही जोरदार चालतो. पण मोठ्या समारंभासाठी/पार्टीसाठी लागणारा दोनशे वॉटचा आवाज काढणारा नाही. घरातल्या पंधरा बाई दहाच्या खोलीसाठी सहा वॉट्स पुरतात.
जेव्हा म्युझीक प्लेअरला ॲम्प्लीफायर जोडतो तेव्हा प्रेअरी लाईन आउट एक मिलीवोल्ट सिग्नल देते. ॲम्प्लीफायरला लाईन इनसुद्धा एक मिलीवोल्ट सिग्नल घेते आणि वाढवते. काही वेळा ॲम्प्लीफायर सिस्टिम चालू कंपनीची फीडबॅक मारून म्युझिक प्लेअर ची आइसी उडवते.

आता समजा मोबाईलचे गाणे ब्लूटूथला पाठवले तर फीडबॅक येऊन मोबाईल बिघडत नाही. पण ब्लूटूथ ॲम्प्लीफायरला वायरीने जोडण्यात धोका संभवतो. दोनशे रुपयांचा ब्लूटूथ जळला तरी चालेल पण महागडं ॲम्प्लीफायर उपकरण बिघडू नये.
समारंभाच्या ठिकाणी आपली पर्सनल उपकरणे ठेवू नये.

आमच्याकडे पण सिस्टीम आणि चांगले स्पीकर आहेत..आता प्रयोग करायला एक गाईडही मिळाले तुमच्या लेखामुळे.. मनापासून धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2023 - 5:45 pm | चौथा कोनाडा

अतिशय रोचक +१

वाह, कंजूसजी ! तुमच्या उपदव्यापांना सलाम !

धागा वाचून पुन्हा कॉलेजला गेल्या सारखे वाटले.
अशी प्रायोगिकता मला जवळजवळ जमतच नाही असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही !