आसाम! ईशान्य भारताच्या सात बहिणींपैकी त्यातल्या त्यात जास्त ओळखीची असणारी हि सगळ्यात थोरली. माझा आसामातील प्रवास तसा अगदीच थोडक्यातला. मणिपूर व त्रिपुरा येथे जाण्याचा मूळ आराखडा असला तरी एकंदर ईशान्य भारताचा भूगोल पाहता मध्यवर्ती राज्य असल्याने आसामचा समावेश प्रवासासाठी सोयीचा ठरतो. याव्यतिरिक्त कामाख्या हे अनेक वर्षांपासून यादीत असलेले ठिकाण त्यानिमित्ताने पाहून झाले. राज्याचा बाकीचा भाग पाहण्यासाठी मात्र निवांत वेगळा प्रवास करावा लागेल हे निश्चित. या भागात आसामची तोंडओळख व गुवाहाटी परिसराची भटकंती. हे आसामचे संगीत ऐकत पुढील लेख वाचा...
वेदोत्तर पौराणिक काळापासून आसाम चे साहित्यात उल्लेख सापडतात. सध्याचे आसाम म्हणजे पूर्वेकडील प्राचीन प्राग्ज्योतिष, कामरूप, दुर्जय, शोणित व लौहित्य जनपदांची भूमी. महाभारत काळास समांतर अशी भागवत व हरिवंशातील नरकासुराच्या वधाची कथा हि प्राग्ज्योतिषपुरातील. पुढे भगदत्त महाभारत युद्धात कौरवांकडून लढल्याचेही वर्णन आहे. ऐतिहासिक काळात देखील हे देश आपली सांस्कृतिक ओळख जोपासत भरभराट करत गेले. गोलपाडा येथील सूर्यमंदिर व प्राचीन वेधशाळा, गुवाहाटी म्हणजेच प्राचीन प्राग्ज्योतिषपुरातील नवग्रह मंदिर इत्यादी खगोल संबंधित स्थाने असलेला प्रदेश 'प्राग्ज्योतिष', मदन कामदेवाचे प्राचीन मंदिर व त्यावरून आलेले 'कामरूप' हे नाव, तिथून पूर्वेकडे शोणितपूर म्हणजे आजचे तेझपूर, व त्याहून पूर्वेकडे लौहित्य हि परशुरामांच्या आईच्या वधानंतर परशु धुण्याच्या कथेशी संबंधित रक्ताचा निर्देश असणारी नावे असे पौराणिक संदर्भ. मगधापासून पूर्वेस तसे जवळ असल्याने चक्रवर्ती राजांच्या राज्यविस्ताराच्या उल्लेखात या प्रदेशाचे नाव आढळते. सहाव्या शतकात भास्करवर्मा राजाच्या कारकिर्दीत या प्रदेशाची सर्वांगीण विशेष भरभराट झाली. चिनी प्रवासी ह्युएन त्सेंग च्या नोंदीतून तत्कालीन राजा भास्करवर्माच्या कारकिर्दीतील वैभवशाली आसामची झलक मिळते. पुढील काळात मुस्लिम आक्रमणात बंगालचा पाडाव झाला तरी आसाम आपले स्वातंत्र्य राखून होते. मुघलांच्या अगदी कळसाध्यायातही ते आसामला हातही लावू शकले नाहीत. पुढे ब्रिटिश काळात आसामला बंगालच्या प्रभावळीत मानून बृहदबंगालची रचना करण्यात आली. पुढे वंग भंगानंतर पूर्व बंगाल. स्वातंत्र्यानंतर आजचे मेघालय, मिझोराम, नागालँड व अरुणाचल मिळून बनवलेले बृहदासाम व हि राज्ये वेगळी झाल्यानंतर उरलेले आज आपण ओळखतो ते आसाम. यातही बोडो व कार्बी लोकांना अलग राज्ये हवी आहेत व त्यासाठी चर्चा, आंदोलने चालू आहेत. सध्या राज्याचा बराचसा भाग ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यात येतो. दक्षिणेकडील सिल्चरचा भाग बराक खोऱ्यात. सत्तरच्या दशकापासून राजधानी गुवाहाटीच्याच लगत दिसपूर. उत्कृष्ठ प्रतीचा चहा, रेशीम, एकशिंगी गेंडा, तेलाच्या विहिरी, ब्रह्मपुत्रा महानद व वारंवार येणारे पूर हि राज्याची मुख्य ओळख.
आसामच्या भटकंतीकडे वळूया. सुरुवात व शेवट गुवाहाटीमध्येच. गुवाहाटी शहर रेल्वे तसेच विमान सेवेने भारतातील इतर महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. विमानतळ तसा गावापासून लांब आहे. महत्वाची रेल्वे स्थानके, कामाख्या व गुवाहाटी मात्र मुख्य शहरातच आहेत. ईशान्य भारतात अन्यत्र जाण्यासाठी हा मुख्य मार्ग असल्याने येथून पुढे बाकीच्या सहा सीमावर्ती राज्यात जाण्यासाठी रेल्वे, विमान व बस सेवा उपलब्ध आहे. सध्या रेल्वेच्या कामाला उत्तम वेग आला असून किमान एक स्थानक का असेना पण प्रत्येक राज्यात रेल्वे पोहोचली आहे. गुवाहाटी शहर व जवळच असलेले सुआलकूची हे लहानसे खेडे हा एवढाच माझ्या यावेळच्या आसामच्या भटकंतीचा आवाका.
सुआलकूची हे ब्रह्मपुत्रेच्या उत्तर तटावर वसलेले एक लहानसे खेडे. गुवाहाटीहून लहान रिक्षा किंवा बसने ब्रह्मपुत्र ओलांडून तासाभरात इथे पोहोचता येते. अलीकडे सराईघाटच्या नव्या पुलाचे कामही पूर्ण झाले आहे त्यामुळे वाहतूक आणखी सुकर झाली आहे. गुवाहाटी शहराच्या पश्चिमेस कामाख्या, तिथून पुढे काही अंतरावर हा सेतू, ओलांडून पलीकडल्या काठावर पूर्वेस आय आय टी संस्थान व पश्चिमेस हे लहानसे गाव. सुआलकूची हि आसामची रेशीम राजधानी! खूप जुन्या काळापासून येथे रेशमाचे उत्पादन व विणकाम होते. अलीकडच्या काळात रेशीम विणकर कारागिरांचे हे केंद्रस्थान बनले. रेशमासाठी वनस्पतींची लागवड, किड्यांची पैदास, रेशमाची उत्कलन, सूत्रकर्तन, रंजन/विरंजन प्रक्रिया (रेशमाचे कोष उकळणे, त्यापासून सुत काढणे व कातणे, रंग देणे किंवा नैसर्गिक असलेली पिवळसर झाकहि उतरवून शुभ्र करणे) इत्यादी सर्व कामे करणारी कुटुंबे खेड्यातच राहतात. सहकारी तत्वावर एक रेशीम बँकही खेड्यात आहे. अतिरिक्त रेशीम येथे ठेव म्हणून देता येते, पेढी ते गरजेप्रमाणे इतरत्र वापरते व मूळ ठेवीदाराला जेव्हा हवे तेव्हा परत त्याच दर्जाचे रेशीम भविष्यात उपलब्ध होते. याचबरोबर संशोधन व विकास केंद्राची शाखाही आहे. पायी चालत देखील अर्ध्या तासात पार होईल असे लहानसे खेडे असूनही उद्योगास आवश्यक असे सर्व काही जागीच उपलब्ध आहे.
आसाम दर्शनाची सुरुवात इथपासूनच केली. सकाळी गुवाहाटीत उतरल्यानंतर टुकटुक-रिक्षा अशा उपलब्ध साधनांद्वारे साधारण माध्यान्हीस गावात पोहोचलो. ब्रह्मपुत्राचे प्रचंड पात्र जवळून पाहण्याची खूप वर्षांपासून इच्छा होती, त्यामुळे नदी ओलांडताना जाम मजा आली. गावातही पोहोचल्यावर थेट पहिले नदी किनारा गाठला. गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर नदी वाहते. लहानशी पायवाट गर्द झुडुपांतून नदीकडे जाते. अतिशय रम्य असा हा प्रदेश आहे. काही अत्यंत सुंदर प्रकाशचित्रे येथे मला मिळाली.
ब्रह्मपुत्रा नदीकाठ
आसाम पक्षीजीवन : blue-throated barbet निळकंठी चंडील
आसाम पक्षीजीवन : blue-throated barbet निळकंठी चंडील
आसाम पक्षीजीवन : coppersmith तांबट
आसाम पक्षीजीवन : coppersmith तांबट
आसाम पक्षीजीवन : bee-eater भृंगभक्षी
नदीकडे जाणारी पायवाट
नदीकिनाऱ्याहून परतीच्या वाटेवर क्रिकेट खेळणारी काही लहान पोरं उत्सुकतेने भेटायला आली. फार मोडकी हिंदी थोडी आसामी असा काहीसा संवाद चालू होता. फार मजेशीर अनुभव. त्यातलाच एक छोटू त्याची सायकल घेऊन बरोबरीने चालू लागला, आपणहूनच 'इथे हे मंदिर आहे, तिथे सरपंच राहतात, पुढे अमुक सत्र आहे' वगैरे बडबड करत स्वयंघोषित गाईड झालेला होता. आम्ही बोलत बोलत टेकडीवरच्या सिद्धेश्वरी मंदिरात गेलो, हि येथील ग्रामदेवता. पुढे गावात बाकीची मंदिरे पाहत त्याच्या घरी घेऊन गेला. सर्वच घरात येथे वस्त्रोद्योग आहेच त्यामुळे मला अनायासे हातमागाचे काम जवळून पाहावयास मिळाले. त्याची आजी साडी विणत होती. सर्वांशी संवाद साधून पुढे इथल्या छोटेखानी बाजारपेठेत थोडी खरेदी व सूर्यास्तासमयी परत गुवाहाटीस प्रस्थान असा अर्ध्या दिवसाचा मस्त अनुभव. अतिशय स्वच्छ, आनंदी, उद्योगी व स्वावलंबी असे आदर्श खेडेगाव. गुवाहाटीपर्यंत जात असाल तर अजिबात चुकवू नये असे!
सुआलकूचीचे सिद्धेश्वरी मंदिर
सुआलकूचीमधले एक 'सत्र' (मठ)
लाकडावरील कोरीवकाम, सत्राची जुनी इमारत
नव्या जुन्याची जोड, रेशीम कातण्यासाठीचा चरखा.
कामाख्या: गुवाहाटी शहराच्या पश्चिमेस नीलाद्री/नीलाचल पर्वत नावाच्या टेकडीवर कामाख्येचे देवस्थान आहे. शहरातून पायथ्यापर्यंत बसने येता येते. तिथून काही लोक पाई जातात, इतरांसाठी देवस्थानाची बस व्यवस्था आहे तसेच रिक्षा वगैरे इतर वाहनेही आहेत. परिसरात अनेक धर्मशाळा आहेत. मी साधारण संध्याकाळी सुआलकूचीहून निघाल्याने नदी ओलांडून गुवाहाटीत आल्यावर रात्री देवस्थानाच्या परिसरात राहण्याचे ठरविले, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनादी कार्यक्रम लवकरात लवकर करून पुढे शहर फिरायला अधिक वेळ मिळावा. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे उठून मुख्य मंदिरात सर्वप्रथम दर्शन घेतले तदनंतर अन्य मंदिरात गेलो त्यानंतर छायाचित्रणासाठी अजून एक फेरी. करता माध्यान्ह झालीच, देवस्थानाच्या अन्नछत्रात भोजन प्रसादाचा लाभ घेऊन पुढे शहराकडे प्रस्थान.
कामाख्या मंदिर
मंदिरातील शिल्पे
मंदिरातील शिल्पे
कामाख्या हे हिंदू धर्माच्या शाक्त पंथाचे एक अतिशय विलक्षण केंद्र आहे. अन्य कोणत्याही देवस्थानाविषयी मी असे मत मांडणार नाही, परंतु या स्थानाविषयी मी हे नक्की नमूद करू इच्छितो कि इथे काय आहे याची कल्पना घेऊन मगच येथे जावे कि नाही हे ठरवावे. हिंदू धर्म/पूजापद्धती यांचे प्रचलित सौम्य स्वरूपाहून फार वेगळे चित्र येथे पाहावयास/अनुभवास मिळते. शाक्त पंथाच्या दशमहाविद्या येथे विराजमान आहेत. बहुतांश देवतांची प्रचलित नावे हि तांत्रिक परंपरेतील आहेत. यांपैकी तीन प्रमुख देवता, षोडशी (तांत्रिक पार्वती) कमला (तांत्रिक लक्ष्मी) व मातंगी (तांत्रिक सरस्वती) या मुख्य मंदिरात स्थित असून अन्य सात देवता थोड्या अंतरावर वेगवेगळ्या मंदिरात विराजित आहेत. मुख्य मंदिर हे नागर शैली व स्थानिक आसामी 'नीलाचल शैली' यांचा सुंदर मिलाफ आहे. गर्भगृह पश्चिमाभिमुख असून त्यापुढे चौकोनी शिखराचे चलांत, पाच गोल शिखरांचे पंचरत्न व यवाकृती शिखराचे नटमंदीर अशी रचना आहे. यासर्वांपुढे लगतच मोठी बलिशाला आहे. देवीला कोंबडा बकरा रेडा इत्यादींचे बळी नित्य चढविले जातात. याशिवाय देवीला कबुतरांची जोडी (जिवंत) अर्पण करण्याचीही प्रथा आहे. गर्भगृह काही उंच पायऱ्या उतरून जमिनीच्या आत गुहेप्रमाणे आहे. वर विटांनी बांधलेला गोलाकार घुमट व काळोखी गुहा खऱ्या अर्थाने 'गर्भ-गृह' भासावे यासाठी आहे. डाव्या बाजूस तीन देवता अमूर्त/निर्गुण स्वरूपात पूजिल्या जातात. येथे नैसर्गिक झऱ्याचे पाणी कायम हा भाग निमग्न ठेवते. तसेच वाहिलेली फुले हा सर्व भाग झाकून टाकतात. काही पंथात योनी आकार कल्पून सृजनशक्तीचे पूजन करण्याची प्रथा आहे. या मुख्य मंदिरातील तीन प्रमुख शक्तींबरोबर अन्य सात महाविद्यांची मंदिरेही परिसरातच आहेत. सर्व ठिकाणी निर्गुण स्वरूपात देवीचे अस्तित्व मानतात, म्हणजेच मूर्ती किंवा कोणतेच दृश्य रूप नाही. काही ठिकाणी मुख्य गर्भगृह विहिरीप्रमाणे खोल आहे व प्रत्येकास जाता येण्यासारखे नाही. काही ठिकाणी विशिष्ट पूजा चालू असल्यास ते सर्व बघवणार असेल तरच पुढे जावे.
मुख्य मंदिराच्या दक्षिणेस उतारावर लगतच 'धूमावती' चे मंदिर, हे देवीचे सर्वात घोर रूप, वृद्धा, काकवाहना, हाती सूप व झाडू असणारी, काळी वस्त्रे नेसणारी अशी आहे. धूमावती मंदिराच्या दक्षिणेकडे अजून खाली एका तलावाच्या काठी 'भैरवी', हि सुद्धा उग्र देवता व पौर्वात्य प्रदेशात मुख्यत्वे या देवतेची मंदिरे आहेत. इथून पुन्हा मुख्य मंदिराकडे जावे. तिथून मुख्य प्रवेशद्वाराकडे लगतच थोडे अधिक पूर्वेकडे 'तारा' किंवा 'उग्र तारा'. वज्रयान बौद्ध धर्मातही या देवतेचे महत्व आहे. या देवतेचे बंगालमधील तारातारिणी शक्तीपीठ प्रसिद्ध आहे. तिथून मुख्य रस्त्याने अजून पुढे पूर्वेकडे 'दक्षिण काली', हे त्यातल्या त्यात देवीचे ओळखीचे उग्र रूप. या मंदिराच्या शेजारीच शेजारीच 'छिन्नमस्ता' देवीचे मंदिर. स्वतःचे शीर धडावेगळे केलेली, दोन सहचारिणींसोबत रक्त सेवन करणारी, मिथुनवाहना असे देवीचे वर्णन. हिमाचलमधील चिंतपुर्णी शक्तीपीठ हे या देवतेचे प्रसिद्ध स्थान. इथून थोडे पुढे रस्ता मुख्य बस स्थानकापाशी येतो. उरलेली दोन मंदिरे जरा अधिक दूर पूर्वेकडे आहेत, तेव्हा काही वाहन घेऊन येथून जाणे सोयीचे आहे. मी जंगलाचा आनंद घेत पायीच गेलो. जाताना जरा चढ आहे. प्रथम 'बगलामुखी' चे मंदिर लागते. हे तुलनेत अधिक प्रशस्त, नव्याने बांधलेले दिसते. अनेक मारवाडी लोकांची कुलदेवता असल्याने त्यांची बरीच वर्दळ येथे दिसली. या देवीच्या पूजेत पिवळ्या रंगाचे फार महत्व आहे. देवी प्रेतवाहना व खङगधारिणी आहे. तिथून पुढे डोंगराच्या माथ्यावर 'भुवनेश्वरी' चे सातवे मंदिर. या सर्व दशरूपांमध्ये तुलनेत सौम्य रूप. शहराचा विस्तार, नदीचे पात्र, आय आय टी परिसर असे विहंगम दृश्य दिसते. अशी हि दशमहाविद्यांची स्थाने या पर्वतावर आहेत. प्रत्येक देवीचे उपासक त्यांच्या पद्धतीने पूजा करण्यास दूर दूर हुन इथे येतात. यातल्या काही देवतांची मंदिरे अन्यत्र नसल्याने व दहाही देवतांची मंदिरे एकाच ठिकाणी असल्याने या स्थानास शाक्तपंथात अनन्यसाधारण महत्व आहे.
उग्र तारा मंदिराचे तोरण
भुवनेश्वरी मंदिराजवळून दिसणारे नदीपात्र व आय आय टी परिसर
भारतात शाक्त पंथीयांमध्ये १०८ शक्तिस्थाने फार महत्वाची आहेत. पौराणिक कथेप्रमाणे दाक्षायनीचे कलेवर घेऊन शिव इतस्ततः भटकत असताना मायेचे छेदन करण्यासाठी सुदर्शन चक्राद्वारे सतीची आभूषणे व अवयव विखरून टाकण्यात आले ते जिथे पडले ती हि शक्तिपीठे. त्या १०८ मधील आभूषणांची स्थाने वगळता, मुख्य शरीराचे अवयव पडले ती ५१ स्थाने महत्वाची शक्तिपीठे. त्यातही १८ 'अष्टादश शक्तिपीठ' स्थाने हि विशेष जागृत, त्यातील हे योनीपिठ 'कामाख्या'. वर्षातून एकदा आषाढ महिन्यात देवी कामाख्या/धरतीमाता/शक्ती हि रजस्वला होते अशी मान्यता असून त्या काळात येथे तांत्रिक महापर्व 'अंबुबाची मेला' संपन्न होतो. अनेक प्रदेशातून शाक्त, तांत्रिक, अघोरी अशा ज्ञात-अज्ञात अनेक पंथाचे लोक यात भाग घेण्यासाठी येतात. त्यातले काही तर केवळ या पर्वसमयीच सामान्य लोकात वावरतात, व पुन्हा आपल्या साधना एकांतात गायब होतात. पर्वारंभी महापूजा करून योनिपिठ वस्त्राने आच्छादले जाते, त्याचे पुढे प्रसादात वाटप होते. नंतर या चार दिवसाच्या काळात मंदिर बंद असते. पूजाविधी होत नाहीत. भक्तगण उपवासादी सौम्य/तीव्र व्रते करतात. चौथ्या दिवशी मंदिर महापूजेनंतर पुन्हा खुले होते. नंतर लक्षावधी भक्तांना अंगोदक व अंगवस्त्र या महाप्रसादाचे दान होते. अंगवस्त्राचा लहानसा तुकडाही विलक्षण तांत्रिक शक्ती असलेला मानला जात असल्याने तेवढ्यासाठी तांत्रिक लोक दूरवरून येथे येतात. कुमारी पूजेचे या स्थानी विशेष महत्व आहे. नित्य पूजेत सुद्धा प्रथम कुमारी पूजन होते व नंतर मंदिर उघडून देवीची पूजा होते. यातील बरेच विधी हे आपल्याकडील सामान्य प्रथांपेक्षा फारच वेगळे आहेत. तंत्र साहित्यात देवीला रक्तवर्णी वस्त्र व पुष्पे (प्रामुख्याने करवीर-कण्हेर व जास्वंद) विशेष प्रिय आहेत असा उल्लेख असल्याने आपल्याइथून जाणाऱ्यांनी काही पूजा साहित्य न्यायचेच असेल तर हे न्यावे.
कामाख्येहून पुढे गुवाहाटी शहराकडे मोर्चा वळवला. अगदी टळटळीत दुपार असल्याने प्रथम संग्रहालयाला भेट दिली. आसामच्या इतर भागास भेट देणे या प्रवासात योजित नसल्याने संग्रहालय आवर्जून यादीत ठेवले. शहराच्या मध्यवर्ती अंबारी-पलटण बाजार भागात हे राज्य शासनाचे संग्रहालय आहे. अतिशय उत्तम मांडणी केलेली प्रशस्त दालने हे एक विशेष. आसामच्या नागरी व ग्रामीण इतिहासाचा मागोवा घेण्याचा हा एक उत्तम झरोका.
संग्रहालयाची रचना फार आवडली
संग्रहालय
संग्रहालय भेट आटोपून पुढे पुन्हा बह्मपुत्राच्या किनाऱ्याकडे वाटचाल सुरु केली. या शहराच्या जुन्या भागात अनेक ब्रिटिशकालीन टुमदार बंगले, जुन्या इमारती इत्यादी पाहात उमानंद फेरी घाटाच्या दिशेने चालत असताना वाटेत उग्र तारा मंदिर एक उल्लेखनीय जागा. याही मंदिरात मूर्ती नसून गाभाऱ्यात पाण्याने भरलेल्या खोलगट भागात देवी कल्पून पूजा होते. इथून पुढे बह्मपुत्राच्या किनारी १० मिनिटाची फेरी बोट घेऊन उमानंद बेटावर पुढील ठिकाण. नदीपात्राच्या मधोमध हे बेट असून अतिशय दाट झाडीने भरलेले आहे. बेटावर मधोमध शिवमंदिर असून सभोवती प्रदक्षिणा मार्ग बांधलेला आहे. प्रत्येक शक्तिपीठासमीप शिवाचे अस्तित्व भैरव रूपात असते, कामाख्यपीठाचे हे भैरव स्थान, उमानंद. मंदिर हे थोडे उंचावर असले तरी गाभारा आत खोल बऱ्याच पायऱ्या उतरून गुहेसारखा आहे. सभोवती बह्मपुत्राचा प्रचंड ओघ अखंड वाहत आहे व मधोमध या गुहेत थंडगार वातावरणात गंभीर ध्वनी-प्रतिध्वनीच्या गूढ छायेत त्या स्वयंभू शिवलिंगासमोर रोमांचित झाल्याशिवाय राहत नाही... अतिशय आवडले मला हे स्थान. या बेटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सुवर्ण वानरांचे कुटुंब. अतिशय दुर्मिळ असलेली हि वानरे केवळ भूतान सीमेवर मानस अभयारण्यात आढळून येतात परंतु त्यांच्या संवर्धन कार्यात काही कुटुंबे इथे व त्रिपुराच्या जंगलात विस्थापित करण्यात आली व दोन्ही ठिकाणी त्यांनी चांगलेच जुळवून घेतले आहे. बेटाच्या पश्चिमेकडील काठावर कातळात काही पाण्याला स्पर्श करणारी सुरेख शिल्पे आहेत. किनाऱ्यावरून सूर्यास्ताचा आनंद घेत पुन्हा शहराकडे प्रस्थान. पुढच्या प्रवासासाठी रात्री कामाख्येहून गाडी पकडायची होती. त्याआधी पोटाची सोय, दिसपूर मध्ये 'गॅम्स डेलिकसी' नावाचे पारंपरिक आसामी जेवणासाठी प्रसिद्ध हॉटेल आहे. तेथे मस्त थाळीवर आडवा हात मारला व रेल्वे स्टेशन कडे प्रस्थान ठेवले. पुढे नागालँड एक्स्प्रेस ने दुसऱ्या दिवशी पहाटे दिमापूर... नागालँड विषयी अधिक पुढील लेखात. तिथून पुढे मणिपूर व त्रिपुरा प्रवास करत ईशान्य भारताचा हा प्रवास संपन्न झाला.
उमानंद बेटावरचे सुवर्ण वानर
उमानंद बेटावरची कातळातील शिल्पे
तसा अगदी दोन दिवसाचा प्रवास असला तरी एक आसामची चुणूक दाखविणारा होता त्यामुळे ईशान्य भारत प्रवासावर लिहिताना अनुभव थोडका असला तरी न वगळण्यासारखा होता त्यामुळे हा लेख... अर्थातच केवळ तोंडओळखच यातून शक्य आहे, पण एका विस्तृत आसाम दर्शनाची ओढ त्याने नक्कीच लावली ती तुम्हालाही लागो :-)
आसामची सांस्कृतिक ओळख
काही महत्वाच्या वा प्रसिद्ध व्यक्ती :
सध्याच्या प्रसिद्ध व्यक्तीत अर्णब गोस्वामी. भारताचे आणीबाणी पर्वामुळे लक्षात राहिलेले राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हे आसाममधून सर्वोच्च स्थानी पोहोचलेले पहिले व एकमेव. 'लोकप्रिय' गोपीनाथ बोर्डोलोई, आसामचे स्वातंत्र्यपूर्व काळात नियुक्त झालेले प्रथम मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी, तसेच आसामातील एकमेव भारतरत्न सन्मानित. अलीकडेच प्रसिद्धीला आलेली दर्जेदार धावपटू हिमा दास. 'सुधाकंठ' भूपेन हजारिका व 'तारसप्तकसम्राज्ञी' परवीन सुलताना हे कलाकार या प्रदेशातील.
परवीन सुलताना यांचा तरुणपणीचा आवाज, आसामी भाषेतले कल्याण रागाच्या सुरावटीतले चित्रपटगीत:
आचार्य श्रीमंत शंकरदेव हे भारतातील मध्ययुगीन संत परंपरेचे आसाम प्रांतातले श्रेष्ठ अधिकारी. सुदूर दक्षिणेत सुरु झालेला वैचारिक तथा सामाजिक सुधारणा घडवून आणणारा हिंदू धर्माच्या घडणीतला हा संत परंपरेचा महत्वपूर्ण अध्याय हळूहळू तीनही दिशांना विस्तारला. नायन्मार-आळवारांबरोबर आठव्या शतकात सुरु झालेल्या या क्रांतीने नामदेवांच्या पताकेसोबत सोबत चौदाव्या शतकात नर्मदा ओलांडली. त्यानंतर पंजाबात गुरु नानक, वाराणसीत संत कबीर व त्यांचे आसामातील समकालीन श्रीमंत शंकरदेव या संतांनी हे कार्य पुढे नेले. आसामात 'एकशरण' वैष्णव परंपरेची स्थापना त्यांनी केली. त्याचप्रमाणे आसाम प्रांतात 'सत्र' नावे मठांची एक शृंखला त्यांनी निर्माण केली. पुढे हीच सत्रे आसामच्या 'बरगीत' गायन, 'सत्रीय' नृत्य, 'भाऊना' नाट्य अशा विविध कलांच्या विकासाची केंद्रे ठरली. ते स्वतः १२० हुन अधिक वर्षे जगले तर त्यांचे उत्तराधिकारी माधवदेव हे ११० वर्षे, या गुरुशिष्यद्वयीने अशी दीर्घकाळ आसामला छत्रछाया प्रदान केल्याने या समाजाचा भक्ती व कलेच्या अंगाने अतिशय बहारदार विकास झाला.
लाचित बरफुकन : आहोम राजाच्या सैन्यातील हे सेनानायक सराईघाटच्या ऐतिहासिक लढाईमुळे इतिहासात अमर झाले. चक्रध्वज सिंहाच्या कारकिर्दीत मुघल सैन्याने कामरूपावर चढाई करण्याचा १६७१ मध्ये आणखी एक प्रयत्न केला. यावेळी जरा अधिक जोरानिशी. मराठ्यांविरुद्ध मावळात पाठविण्यात आलेल्या मिर्झा राजा जयसिंहाचा मुलगा रामसिंह आसामात नेतृत्व करीत होता आणि त्याच्या जोडीला सात बोटांचा शाहिस्त्या... अनेक कारणांसाठी हि लढाई भारतीय इतिहासात सदैव अभ्यासली जाईल. पोर्तुगीजांपासून राजपुतांपर्यंत समावेश असलेले अफाट संख्येचे मुघल सैन्य नदीवरच्या युद्धात नमविले गेले. आणि निसटता विजय नव्हे तर पुन्हा मुघलांची इथे फिरकण्याची हिम्मत झाली नाही (या युद्धाचा भाग नसली तरी काही वर्षातच युद्धानंतरची गुवाहाटीची माघार हि कायमची). युद्धास भ्याला म्हणून स्वतःच्या मामाचेही शीर उडविण्यास मागे पुढे पहिले नाही असा हा वीर लाचित! या प्रसंगीच्या त्यांच्या ओळी आसामात कायम स्मरणात राहतील "দেশতকৈ মোমাই ডাঙৰ নহয়" (देशॊतकै मौमाई दाङ्गर नॊहॊय - देशापेक्षा मामा मोठा नव्हे). खडकवासल्याच्या एनडीए मध्ये या वीरयोद्ध्याच्या नावाने पदक दिले जाते व इथे त्यांचे स्मृतिस्थानही आहे.
आसामचे कलावैभव
हस्तकला:
बांबू व वेताची कला सर्वत्र पाहावयास मिळते. बांबू वेत किंवा ताडाच्या पानापासून बनवलेली टोकदार गोलाकार 'जापी' शिरोवेष्ट आसामची ओळखच बनली आहे. येथील विशेष म्हणजे पितळ व काश्याची भांडी व खेळणी. रोजच्या वापरातून पितळ अजून बाद झालेले नाही व विशेषतः जेवणाची ताटे, वाट्या, भांडी अजूनही पितळ्याचीच वापरतात. पान-सुपारीलाही महत्व असल्याने त्याचीही सुबक कलात्मक पात्रे अजूनही वापरात आहेत.
वस्त्रकला:
सुती कापडाचा लाल काठाचा 'गामोसा' हि जापीबरोबर आसामची दुसरी ठळक ओळख. आजकाल तर बरेच राजकारणी गामोसा वापरताना दिसतात. यात रेशमी प्रकारही मिळतो परंतु सुती सर्वात सामान्य. एकंदर सामाजिक चालीरीतींमध्ये या कपड्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी शेजारी मिठाई देण्यापासून ते वरदक्षिणेपर्यंत सर्वत्र या वस्त्राची आवश्यकता असते.
'गामोसा'
आसामचे सर्वात देखणे कलावैभव म्हणजे येथील रेशमी वस्त्रे. फार पूर्वीच्या काळापासून येथे रेशीम उत्पादन होते. रेशमाचे तीन प्रकार. 'पाट' रेशीम, तुतीच्या झाडावर पोसलेल्या किड्यांपासून मिळणारे, सर्वात तलम व महाग. इतरत्र मिळणारी रेशमी वस्त्रेही याच प्रकारच्या सुताची असतात. दुसरे 'मुगा' रेशीम, हे नैसर्गिक सोनेरी झाक असलेले तुलनेत कमी तलम रेशीम आसामची खासियत. यावर लाल रंग फार उठून दिसतो व बऱ्याच पारंपरिक वस्त्रात हि रंगसंगती वापरली जाते. तिसरे जरा अधिक जाडसर रेशीम 'ईरी'. हे किडे एरंडाच्या झाडावर वाढतात, एरंडाचे आसामी नाव इरी. याच्या शाली किंवा स्टोल सारखी जाडसर वस्त्रे बनवतात. हे रेशीम कोसा/टसर च्या वर्गातले असले तरी त्यापेक्षा अधिक तलम व चमकदार. येथील स्त्रिया मेखला-चादोर अशी २ पीस साडी वापरतात. गोल निऱ्यांचा भाग मेखला व पदराचा वेगळा भाग 'चादोर'. अतिशय कलात्मक नक्षीकाम असलेले हे वस्त्रप्रकार आसामची खास ओळख!
पाट रेशमी साडी, मुगा रेशमी मेखला चादोर व इरी रेशमाची शाल
मुगा रेशमाची साडी, जरीची झगमग नसूनही अतिशय उंची व कलात्मक वस्त्र, पदर निऱ्या व अंगातली वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर. शंभर टक्के हस्तनिर्मित.
मुगा रेशमाची साडी
पाट रेशीम कलाकुसर
पाट रेशीम कलाकुसर
अलंकार : ठळक मोठ्या पदकांचे गळाबंद हार हे आसामी अलंकारातील विशेष.लाल रंगाचे फार महत्व. खालील चित्रात चंद्रकोरीसारख्या पदकाची 'जुनबीरी', गोल पदकाचे 'जेठीपोटा', चौकोनी पदकाचे 'मेजबिरी' हे अलंकार आहेत. याशिवाय हातातील जाड कंकण 'गाम खारू' हे हि एक वेगळेपण. हे सर्व अलंकार नंतर पुढे दिलेल्या चित्रफितीतही दिसतील.
सत्रिया नृत्य: आसामचे हे शास्त्रीय नृत्य. आचार्य शंकरदेवांची अजून एक देणगी. शंकरदेवांच्या 'संगीत रत्नाकर' ग्रंथातून त्यांनी आसामच्या सांस्कृतिक जीवनात अमूल्य भर घातली त्यातील हा नृत्यप्रकार एक. यात प्रामुख्याने तीन प्रकार, 'नृत्त' म्हणजे केवळ विशुद्ध शास्त्रीय नर्तन, 'नृत्य' म्हणजे अभिनयासहित नर्तन, व 'नाट्य' म्हणजे सामूहिक कथा सादरीकरण. यात 'पौरुषीक भंगी' व 'स्त्री/लास्य भंगी' असे दोघांसाठी वेगळे नियम. पोशाख, उत्तम प्रतीच्या रेशमाची 'चादोर' व कमरेभोवती 'कांची'. अतिशय देखणा नृत्यप्रकार...
सहलीच्या वेळी फेसबुक वर आसामविषयी काही पोस्टर टाकले होते त्यातील नृत्यविशेष दाखविणारे एक
भाऊना नृत्य : एक धार्मिक नृत्य-नाट्य, मोठाले टाळ व मृदुन्ग घेऊन लयबद्ध नृत्य करणारे शुभ्रावेशातील वैष्णव भक्त व दशावतार सादरीकरणात असतात तसे नटलेले कलाकार वेगवेगळ्या अंकात कला सादर करतात.
याशिवाय लोकनृत्याची आसामची एक खास शैली आहे. केवळ हाताच्या तळव्यांची लयबद्ध हालचाल करत अगदी बसल्या बसल्याही ठेका पकडणारे साधे नृत्य. दुसरी खास ओळख म्हणजे विशेषतः स्त्रियांचे हात पाठीमागे दुमडून कोपरांची लयीत हालचाल करीत नृत्य.
बोरगीत व बोनगीत: शंकरदेव-माधवदेवांचे अजून एक वरदान, बोरगीत भक्तिपर गीतरचना... साधारण लोकगीतांच्या सुरावटीवर गायली जाणारी हि संथ गीते. यात तालाची साथ बऱ्याच वेळेला आवश्यक मनाली जात नाही. बोनगीत म्हणजेच वनगीत लोकगीताचाच प्रकार. लेखाच्या सुरुवातीला जोडलेले गीत अश्विनी भिडे यांनी गायलेले, नावाड्याची गाणी असतात त्या 'भाटियाली' सुरावटीतले बोरगीत आहे.
वाद्ये: ढोल मृदुन्ग व बासरी हे उर्वरित भारताप्रमाणे असामातही लोकसंगीतात महत्वाची भूमिका बजावतात पण याशिवाय खास आसामची काही वाद्ये आहेत. पेपा : गव्याच्या शिंगापासून बनवलेली लहानशी तुतारी. याचे बिहू उत्सवात अनन्यसाधारण महत्व आहे. शुतुली: मातीची किंवा बांबूची लहानशी शिटी. गोगोना : हे मजेदार टॉय टॉय वाजणारे लहानसे मौखिक वाद्य बांबू पासून बनवलेले असते. भारतात इतरत्र याला मोरचंग किंवा मोरसिंग (संस्कृत मुखशंकु) म्हणतात
आसामची वेशभूषा, अलंकार, संगीत, वाद्ये या सर्वांचे दर्शन पुढील काही गाण्यांत...
काय पाहाल : आसामचे जीवन सुरेख टिपणारे हे गाणे, माजुली या ब्रह्मपुत्रातील बेटावरील खेड्यातील लोकांची वेशभूषा, खेड्यातील दैनंदिन जीवन. काय ऐकाल: मधुर आसामी भाषा, भाऊना नृत्य, बोनगीत, वाद्ये यांचे गीतातील भावुक संदर्भ
अन्न : मुख्य अन्न भात. रोजच्या जेवणात साधा पांढरा भात असतो परंतु सणासुदीला तांदुळाचे वडे, घावन, धिरडी, केक अशा प्रकारचे 'पिठा' बनवतात. भाताबरोबर विविध स्थानिक भाज्या व डाळ. मासे सुद्धा महत्वाचे. 'माछ तेंगा' हि ईडलिंबू किंवा कोकम वापरून अशा आंबट चवीचे प्राधान्य असलेली एक स्थानिक डिश. 'पिटिका' म्हणजे 'भरीत', डावीकडील व्यंजन, आलू-पिटिका म्हणजेच बटाट्याचा मसालेदार कुस्करा त्यातील सर्वत्र मिळणारा प्रकार. त्याशिवाय वांग्याचे भरीत व 'खोरीसा तेंगा' हे खारवलेल्या बांबूच्या कोवळ्या अंकुराचे भरीत हे अजून एक विशेष. जेवणानंतर पानाचेही महत्व आहेच. आणि चहा सुद्धा महत्वाचा आहेच! रोजच्या जेवणासाठी पितळी भांडी वापरली जातात.
आसाम थाळी
भाषा व लिपी : प्राकृत कालखंडात महाराष्ट्री शौरसेनी व मागधी या प्रमुख तिघींपैकी मागधी हि पुर्वेकडची. पुढे त्यातून कामरूपी हि प्राकृत उदयास आली व तिचे आधुनिक रूप म्हणजे आसामी भाषा. त्यामुळे बंगाली, ओडिया, मैथिली, मणिपुरी प्रमाणेच मागधी मध्ये या भाषेचे मूळ व आजही या भगिनींमध्ये बरेच साम्य आहे. लिपीमध्येही कानडी-तेलुगू प्रमाणे आसामी-बंगाली मध्ये बरेच साम्य असले तरी आसामी मध्ये बंगालीपेक्षा पेक्षा अक्षरे अधिक आहेत. लेखकांमध्ये ज्ञानपीठ विजेते लेखक बिरेंद्र कुमार भट्टाचार्य व इंदिरा गोस्वामी उल्लेखनीय. इंदिरा गोस्वामी यांची "চিন্নমস্তাৰ মানুহটো" (छिन्नमस्तार मनूहतो) अनुवादित The Man from Chinnamasta कामाख्या व इतर शाक्त मंदिरातील बळीप्रथेवर टीका करणारी कादंबरी विशेष उल्लेखनीय, लेखिका स्वतः खूप दुःखातून वर आलेली असल्याने त्यांचे लिखाण खूप वास्तववादी आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अदाह्या (Adajya/অদাহ্য) चित्रपट त्यांच्या स्वतःच्या वृन्दावनातील विधवा म्हणून वास्तव्याच्या काळातील अनुभवांवर आधारित 'नीलकंठ ब्रज' अनुवादित The blue necked god या कादंबरीवरून घेतलेला आहे. अनुवाद किंवा सारांश इंटरनेटवर नक्की वाचा.
उत्सव : बिहू हे आसामचे वैशिष्ट्य. यात बोहाग किंवा रोंगाली बिहू म्हणजेच एप्रिल मध्यावरील मेष संक्रांत व हिंदू सौर नववर्ष. भोगाली बिहू म्हणजे मकर संक्रांत व तिसरा कोंगाली बिहू, ऑक्टोबर महिन्यातील तूळ संक्रांत. लोकजीवनात बिहूचे अनन्यसाधारण महत्व आहे. खाद्यान्न, संगीत, नृत्य, सजावट याद्वारे मोठ्या उत्साहात हे सण इथे साजरे करतात.
एक बिहू गीत, आसामच्या उत्सवाची झलक
काय पाहाल : बिहूचा उत्साह; खेड्यातील दैनंदिन जीवन; साधे सोपे लोकनृत्य व नृत्यप्रधान उत्सव संस्कृती, वस्रोद्योगाचे महत्वाचे सांस्कृतिक स्थान. पारंपरिक मेखला चादोर पेहेराव व त्यात मुख्य गायिकेने केलेला आधुनिक बदल; अलंकार काय ऐकाल: पेपा वाद्य, गोगोना वाद्य
विशेष उल्लेख - आसाम रायफल्स व आसाम रेजिमेंट : आसामचे नाव घेतल्यावर या दोन्ही दलांचा उल्लेख अनिवार्य... आसाम रायफल्स हे सर्वात जुने निमलष्करी दल, सध्या भारत-ब्रह्मदेश सीमेचे रक्षक. आसाम रेजिमेंट ईशान्य भारतातून सैन्य भरती करणारे दल. दोहोंच्या राष्ट्रसुरक्षेच्या धैर्य व कार्याबद्दल कडक सॅल्यूट! आसाम रेजिमेंट चे रेजिमेंटल गीत फार मजेदार आहे... आर्मीची ऐट ही औरच आणि मौजही वेगळी... या जन्मी जमले नाहीये, पुढच्या जन्मी नक्की...
आसाम रेजिमेंट गीत
संकीर्ण :
आसामचे नव्या पिढीचे संगीत, लोकगीताचा साज ठेऊन नव्याची जोड असणारे हे गाणे माझे आवडते आहे.
एकंदर ईशान्य भारताची पाश्चात्य संगीताविषयीची जाण व त्यातील प्रतिभा उर्वरित भारतापेक्षा कैक पावले पुढे आहे. कोणाला मेटल आवडत असेल तर हे एका आसामी बँड चे पाशात्य संगीत
लेखातले बाकी कुठलेही व्हिडीओ पहिले नसतील तरी चालेल, पण हा चुकवू नका. या सुंदर शांत सुरावटीबरोबर लेखाची समाप्ती.
काय पाहाल : आसामची व्हर्चुअल सफर, फुल स्क्रीन पहा. ती चोप्रा सोडून सगळं पहा :-) काय ऐकाल: लक्ष्मीनाथ बेझबरुआ रचित "ओ मुर आपुनार देश" हे आसामचे राज्यगीत
समाप्त
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया
प्रतिक्रिया
1 Sep 2018 - 4:46 pm | उगा काहितरीच
लेख खूप आवडला. विस्तृत असूनही कुठेच कंटाळवाणा नाही झाला. फोटो पण आवडले.
1 Sep 2018 - 5:10 pm | अभ्या..
जब्बरदस्त. अगदी डिटेल आणि परफेक्ट लेख. कसे फिरावे, कसे अनुभवावे आणि ते कसे लिहावे हे तुमच्याकडून शिकावे.
बदलूराम का बदन जमीन के नीचे है, हमे उसका राशन मिलता है चा व्हिडिओ मस्त. आसाम टूरिझमचा व्हिडीओही.
1 Sep 2018 - 5:10 pm | श्वेता२४
आसाममध्ये थोडेच फीरलात तरी आसामबद्दल खूपकाही माहिती दिलीत. लिखाणाची भाषा अत्यंत ओघवती त्यामुळए वाचताना खूप मजा आली. फोटो तर एकाहून एक सुंदर.
1 Sep 2018 - 6:50 pm | सुबोध खरे
+१००
1 Sep 2018 - 5:24 pm | यशोधरा
अतिशय सुरेख लेख. गामोसा आहे माझ्यापाशी :)
फोटो, वर्णन सारेच आवडले. वाचनखूण साठवली.
1 Sep 2018 - 5:44 pm | सतिश गावडे
आसामची ओळख आवडली.
1 Sep 2018 - 7:13 pm | अनिंद्य
@ समर्पक
तुमच्या लौकिकाप्रमाणे हा लेखही आखीव-रेखीव आणि सांगोपांग माहिती देणारा !
सध्या भारताच्या तेल उत्खनन इतिहासाबद्दल लिहीत आहे, त्यात आसामचा नंबर पहिला !
1 Sep 2018 - 7:56 pm | दुर्गविहारी
अप्रतिम धागा. एकाच धाग्यात माहितीचा अक्षरशः खजिना आहे. बाकी शेवटच्या व्हिडीओमधील आम्ही तर बुवा प्रियांकाच बघीतली. ;-)
पु.ले.शु.
1 Sep 2018 - 8:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपल्याच देशातील असूनही फार कमी माहिती असलेल्या राज्यांपैकी एका राज्याची ही सविस्तर ओळख खूप खूप आवडली. वाखू साठवली आहे.
वर्णनाला अनुरुप फोटो व चित्रफितींनी तर मजा द्विगुणित केली आहे. फोटोंची प्रत भन्नाट आहे !
2 Sep 2018 - 2:37 am | दिपस्तंभ
आवडला
2 Sep 2018 - 7:46 am | कंजूस
फोटो, ध्वनि/चित्रफिती,माहिती असलेला संपूर्ण लेख आवडला.
स्लाइडशो आणि माहिती सांगणारे कार्यक्रम करा.
2 Sep 2018 - 1:55 pm | सुखी
वरच्या साड्या कुठे बघायला मिळतील?
त्यांच साधारण बजेट किती असेल?
2 Sep 2018 - 5:38 pm | तुषार काळभोर
काय लेख लिहिलाय!! अप्रतिम!!!
तळटीप- काही शब्द ओळखीचे वाटले
गामोसा - गमछा
भोगाल बिहू - आपल्याकडे मकर संक्रांतीच्या बरोबरीने येणारी भोगी
मेखला (साडीचा निऱ्या असलेला भाग)- आपल्याकडचा कमरेचा दागिना
2 Sep 2018 - 6:48 pm | समर्पक
वर चित्रातील साड्या साधारण ५-८ हजार मधल्या आहेत. एक साडी विणायला साधारण ३-५ आठवडे लागतात, व एका साडीचे वजन ७०० - १५०० ग्रॅम म्हणजे, तेवढे रेशीम. हा किंमतीसाठी संदर्भ
2 Sep 2018 - 8:13 pm | सुखी
धन्यवाद... त्या गावीच मिळतील का?
4 Sep 2018 - 10:17 pm | समर्पक
गुवाहाटी मध्ये तर नक्कीच, पण कलकत्त्यातही मिळत असाव्यात
स्त्रीवर्ग कदाचित सांगू शकेल, आसाम सिल्क आपल्याकडे, किमान मुंबई-पुण्यात, मिळते का ते...
2 Sep 2018 - 7:10 pm | प्रमोद देर्देकर
मस्त वर्णन. लेख आवडला.
3 Sep 2018 - 7:27 pm | मंजूताई
माहितीपूर्ण लेख खूप आवडला. विस्तृत असूनही कुठेच कंटाळवाणा नाही झाला. फोटो पण आवडले. मागच्या दोन वर्षात एकंदर आठ महिने राहून एवढी माहिती मिळाली नव्हती पण तिथली माणसं, संस्कृती जवळून पाहता आली होती.
4 Sep 2018 - 5:35 pm | चिगो
दोन दिवसात भरपूरच बघितलं की तुम्ही.. सुंदर आणि 'समर्पक' लेख..
तेझपूरला नक्की जा. तिथे काही प्राचीन शिल्पे आहेत. बाणासुराने त्याच्या मुलीशी (चित्रलेखा) प्रेमसंबंध असणार्या श्रीकृष्णाच्या नातवाला, अनिरुद्धाला, कैद करुन ठेवले. त्याला सोडवण्यास आलेल्या श्रीकृष्णासोबत झालेल्या तुंबळ युद्धात एवढी प्रचंड प्राणहाणी झाली की रक्ताच्या नद्या वाहू लागल्या, म्हणून ह्या जागेचे नाव 'शोणितपूर' / 'तेझपूर', अशी आख्यायिका आहे.
4 Sep 2018 - 8:42 pm | टर्मीनेटर
सुंदर लेख आणि तितकेच सुंदर फोटो.
4 Sep 2018 - 10:15 pm | दीपा माने
फारच सुंदर माहीतीपुर्ण लेख झाला आहे.
काही वर्षांपुर्वी केलेल्या आसामच्या ट्रीपच्या आठवणी जाग्या झाल्या.
5 Sep 2018 - 9:23 am | मार्गी
खूपच जबरदस्त!!! हा लेख म्हणजे लघु असम विश्वकोष आहे!!!
5 Sep 2018 - 12:17 pm | सुधीर कांदळकर
आवडला. जवळजवळ दहा वर्षापूर्वी मी एकटा सेव्हन सिस्टर्स ला जाणार होतो. माहिती जमवली. पण पाय मोडून बसलो आणि सारेच फिस्कटले.
लेखाची मांडणी अप्रतिम. पक्ष्यांची चित्रे सुंदर. अश्विनी भिडे आणि परवीन सुलताना, दोन्ही ऑडीओ छान. शाक्त पंथाची आणि संबंधित मंदिरांची माहिती अभ्यासपूर्ण. चलत्चित्रांची निवड अफलातून. सारेच कसे सर्वांगसुंदर. मिपावरील काही सर्वोत्तम प्रवासवर्णनांपैकी एक.
एवढे दूर जाऊन वेळेअभावी फक्त आसाम केले याबद्दल वाईट वाटले. पुढील वेळी चांगली ४०-५० दिवसांची सात बहिणींची सफर करून अशा सुंदर लेखातून ती आम्हालाही घडवा. दिघालीपुखुरी तलाव, शिलॉंग, सिल्चर अजून बाकी आहे. पूर्वेचे स्कॉटलंड ऊर्फ मेघालय, मिझोरमचे ३ जी सारे काही खुणावते आहे तुम्हाला.
एका सर्वांगसुंदर लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.
5 Sep 2018 - 8:35 pm | मिसळ
कमी वेळ असूनही बरच काही पाहिलेत आणि अनुभवलेत. सुंदर फोटो.
कामाख्या देऊळ लहान मुलांसोबत जाण्यासारखे नाही का? ह्या मंदिराविषयी आधी वाचले न्हवते.
6 Sep 2018 - 12:02 pm | समर्पक
बळीशाळा वगळता फार काही मुलांच्या दॄष्टीस समजण्यासारखे नाही.
5 Sep 2018 - 8:47 pm | मंदार कात्रे
खूप छान लेख व फोटो . धन्यवाद
रच्याकने आसामात शाकाहारी जेवण चांगले मिळते का?कुठे ?
6 Sep 2018 - 12:05 pm | समर्पक
गुवाहाटीत म्हणत असाल तर गॅम्स डेलिकसी म्हणून दिसपूर जवळ उत्तम जागा आहे... तसेच पल्टन बाजारातही बरीच चांगली उपहारगृहे आहेत.
24 Jun 2019 - 11:30 pm | समर्पक
25 Jun 2019 - 12:46 am | वरुण मोहिते
आणि मी आज वाचला चक्क हा सुटलेला लेख
25 Jun 2019 - 2:19 pm | Rajesh188
लेख खूप छान आहे ,सविस्तर वर्णन केल्यामुळ लेख उत्तमच झाला आहे आवडला.
पण आसाम सध्या कठीण परिस्थिती मधून जात आहे बांगलादेशी लोकांनाच आक्रमण ह्या राज्यावर होत आहे .
त्याच बरोबर भारतातील इतर राज्यातील लोकांचं आक्रमण सुद्धा ह्या सुंदर राज्याला बेसूर बनवत आहे .
त्याचा उल्लेख लेखात नाही
26 Jun 2019 - 12:17 am | जालिम लोशन
पण डिटेल्स आले नाहीत.
26 Jun 2019 - 8:34 pm | समर्पक
हा भटकंती सदरातला लेख आहे, सामाजिक/राजकीय नाही. कुठलेही प्रवासवर्णन हे त्या त्या प्रदेशाचे सौंदर्यवर्णन करण्यासाठी असते, लोकांनी तिथे का जावे आणि ज्यांना जाणे शक्य नाही त्यांना तेथे कोणत्या विशेष गोष्टी आहेत त्याचे वर्णन वाचता यावे यासाठी असते.