✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

We are not here to make friends ... खरंच ?

छ
छोटा डॉन यांनी
Mon, 04/15/2013 - 15:11  ·  लेख
लेख
मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही.... माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत कधी ब्लॊगवर काही लिहीत नाही, मला ते तितकेसे आवडत नाही.... तसेच आपण काम करत असलेल्या जागेबद्दल आणि तिथे घडत असलेल्या घटनांबद्दल ब्लॊगवर लिहणे हे ही मला तितकेसे योग्य वाटत नाही.... पण आज थोडंसं हे सर्व बाजुला ठेऊन ४ शब्द लिहावेसे वाटत आहेत. सध्या तसं पाहता आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ कुठे जात असेल तर ऑफ़िसात. दिवसातले जागेपणातले महत्वाचे निदान ९-१० तास तरी आपण ऑफ़िसात असतो. इथे मग अनेक लोकांशी आपला संबंध येतो. मुळात ऑफिस म्हणजे काय तर जिथे ४ लोक एकत्र जमुन मी जे काही करतो ते सगळ्यात भारी कसे आहे आणि त्यामुळे कंपनीला अमुकतमुक फायदा कसा होतो हे सांगायचा प्रयत्न करत असतात ती जागा, ऑफिस म्हणजे काय तर हेच ४ लोक जरा चान्स मिळाला की भले दुसर्याच्या डोक्यावर पाय देऊन का होईना पण पदजेष्ठतेच्या वरच्या पायरीवर जायचा प्रयत्न करतात ती जागा .. भले ह्याला मग फास्ट ट्रॅक करियर वगैरे म्हणतही असतील, ऑफिस म्हणजे काय तर ज्याच्याशी आपले पटत नाही किंवा समोरच फारच स्पष्ट आणि खरे बोलतो हे लक्षात आल्यावर इतर ३ जणांनी कंपु करुन त्याला कुठे ना कुठे दाबायला बघणे आणि त्याला होणार्या त्रासात स्वतःला सुख मानुन घेण्याची जागा, ऑफिस म्हणजे काय तर वरच्या पोझिशनसाठी आणि हेवी पे-पॅकेजेससाठी जमेल ती तडजोड करणे आणि त्याला नंतर अॅाजिलीटी/व्हर्साटाईल असल्याचे गोंडस नाव देणे ... असे बरेच काही लिहता येईल आणि ते बहुतांशी खरेच आहे. ऑफिसमध्ये वर लिहले आहे असे काही घडत नाही असे ज्यांना वाटते ते साधुसंत आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे आणि ते हिमालयात जायचे सोडुन चुकुन ह्या सिमेंटच्या जंगलात आले आहेत असेही मला वाटते. ऑफ़िसमध्ये शक्यतो एक समंजसपणाचा मुखवटा चढवुनच रहावे लागते, ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते ...तर दुसरीकडे एखादा अगदी आपल्यासारखाच आहे आणि तो आपला परफ़ेक्ट दोस्त बनु शकतो हे कळत असतानाही काही अलिखित ऒफ़िशियल कारणांमुळे आपण त्याच्याशी हवे तेवढे मोकळेपणाने वागु शकत नाही .. मुखवट्याची कृपा. एवढी सगळी लफडी असताना आणि स्वतःला प्रोजेक्ट करायचे एवढे काम बाकी असताना ऑफिसात दोस्ती वगैरे करायचा भानगडी हव्यातच कशाला? दोस्ती वगैरे ठिक आहे हो, पण उद्या हाच दोस्त आपल्या प्रमोशनच्या रस्त्यात दत्त म्हणुन उभा राहिला किंवा ह्याच्या तिथे असण्यामुळे आपले एखादे भारी ट्रेनिंग किंवा ऑनसाईट व्हिसिट वगैरे धोक्यात येत असेल तर ह्याचय दोस्तीचे काय लोणचे घालायचे ? बरं, समजा मी ह्याच्यासाठी शक्य त्या तडजोडी केल्या आणि समोरुन त्याने काहीच न करता जिथे चान्स मिळेल तिकडे चान्स मारला तर मी तक्रार तरी कुणाकडे करायची ? एकंदरीत हे रिस्कीच प्रकरण नाही का ? म्हणुनच बरेच जाणकार सांगतात की ऑफिसात शक्यतो प्रेमाच्या आणि दोस्तीच्या फंदात पडु नये .. पहिले जमले, दुसरे साफच गंडले, असो. पण काहीही असले तरी मी शक्यतो ऒफ़िसात मित्र बनवत नाही, त्या मित्रांचा त्रास होतो, त्रास होतो म्हणजे असा की त्यांच्या अपरिहार्य असणा-या दुरावण्यामुळे त्रास होतो, असा अनुभव निदान २-३ वेळा घेऊन झाला आहे त्यांमुळे आजकाल जरासा मी सावधच असतो, उगाच पटकन कोणीतरी यायचा आणि दोस्त होऊन जायचा, ही साली दोस्ती नंतर उदाहरणार्थ गंमतच होऊन बसते. त्यापेक्षा आपलं मुन्नाभाईमधल्या जे. अस्थाना ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे "We are not here to make friends" हे पाळावे आणि निदान ऒफ़िसात मित्र वगैरे बनवायच्या भानगडीत पडु नये. शाळा / कॊलेजात बनणारे मित्र हे शक्यतो आपल्यासारखे येड** असल्याने त्यांचा कधी त्रास होत नाही पण ऒफ़िसात बनणारे मित्र उगाच समंजस वगैरे असतात. काही लफ़डे किंवा वादविवाद झाले तर शाळा/कॊलेजातल्या मित्रांशी कसे ’तु आधी *कात जा अन मी पण इकडे भ*त जातो’ म्हणुन प्रश्न मिटवता येतो, पण हे ऒफ़िसातला मित्र साले उगाच समंजस वगैरे असल्याने स्वत:ही भो*त जा नाहीत आणि समोरच्यालाही जाऊ देत नाहीत, म्हणुन सांगत असतो की शक्यतो ऒफ़िसात दोस्ती वगैरे करु नये. पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे. आयडियली स्पिकिंग ऑफिसात होणार्‍या दोस्तीला कुठेना कुठे अंत असतोच, अंत म्हणजे अगदी दी एंड नव्हे पण एखाद्याने काही कारणासाठी दुसर्‍या ठिकाणी निघुन जाणे हे अगदीच स्वाभाविक आहे. करियर म्हणा, वैयक्तिक तडजोडी म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा पण हे घडतेच, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करत असणारे आणि पक्के दोस्त असणारे ह्यांचीही उदाहरणे विरळ नाहीत पण आजच्या घडीला हे तितकेसे स्वाभावीक नाही. मुळ ज्या गोष्टीमुळे आपण एकत्र आलेलो असतो त्या ऑफिसला ह्या मुव्हमेंटमुळे काही फरक पडत नाही (निदान वरकर्णी असे म्हणायची पद्धत आहे). कारण एक गेला की त्याला जागा घ्यायला इतर ४ जण तयार असतात, इनफॅक्ट त्याच्या जाण्याची वाटच बघत असतात. पण इथे प्रत्येकजण निराळा आहे आणि कुणीच कुणाची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही हे सत्य आहे तेच बर्याचदा लोकांना कळत नाही. रुटिन कामाचे एक ठिक आहे हो ते कसेही होऊन जाते, पण निघुन गेलेला माणुस त्याच्याबरोबर जी एनर्जी घेऊन गेला ती कुठुन आणणार? इथुन निघुन गेलेल्या माणसाचा समंजसपणा आणि कामे करुन घेण्याचे व त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे कामे करण्यास माणुस तयार करण्याचे स्कील कुठुन आणणार? एखाद्याचे डेडिकेशन आणि कमालीचा आत्मविश्वास ह्यामुळे इथे दिसणारा परिणाम असा सहजासहजी रिप्लेस करता येतो? एखाद्या इव्हेंटवेळी त्याच्याकडुन येणार्या क्रिएटिव्ह आयडियास अशा सहजासहजी रिप्लेस करता येतात? वरुन कितीही दडपण आले तरी त्याची झळ खालच्या लेव्हलपर्यंत येऊ न देता मधल्यामध्ये सर्व काही शांत करण्याची खुबी अशी जादुसारखी उभी करता येते? नाही .. सगळ्याच गोष्टींना रिप्लेसमेंट देता येत नाही म्हणुनच अशा मुव्हमेंट्स जस्टिफाईड नसतात .. समाजासाठी आणि त्या त्या ग्रुपसाठी. हे ही सर्व एक वेळ जमुन जाईल, पण ह्याचा परिणाम जो पर्सनल लेव्हलला होतो त्याचे नुकसान मात्र कधीही भरुन ने येण्यासारखे असते. डिटेल लिहायची गरच नाही पण अगदी छोट्याछोट्या गोष्टीतही एखाद्याच्या असण्याची सवय झाली असते, आता त्याचे इथे नसणे एवढे रिप्लेसेबल नक्कीच नसते. पण अपरिहार्य आहे हे सगळे .. हे सगळे करावेच लागते. तुमची अगदी लाख इच्छा नसली तरी ह्या गोष्टी घडतात आणि त्यातुनच माणुस पुढे जातो, आता किंचित लांब असल्याने दोस्ती अजुनही गहिरी होत जात असते कदाचित, निदान अशा अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे ? 'अतिपरिचयात अवज्ञा' टाळावी असे म्हणतात, म्हणजे असे की एखाद्याशी फारच घसट वाढली की त्यातुन मानापमानाचे प्रसंग उद्भवतात असा मानवी स्वभाव आहे. परिचय कधी 'अति' झाला असे वाटलेच नाही, अवज्ञेचा तर प्रश्नच येत नाही, तरीही ह्या उपरोक्त वचनाची प्रचिती कशी येते ते बघु येत्या काळात ... असो, फारच तात्विक आणि काहीसे सेन्टीमेन्टी टाईपचे लिखाण झाले. असे काही होण्याचा अन असे काही लिहण्याचा माझा स्वभाव नाही, एकंदरीत भावनांचे प्रदर्शन न करण्यातच मला जास्ती सुख वाटत आले आहे. खुद्द माझ्या बाबतीतच सांगायचे म्हटले तर बेंगलोरच्या ३ वर्षापेक्षा जास्त सहवासानंतर ते सोडायची जेव्हा वेळ आली होती तेव्हा भावना ह्यापेक्षा जास्त उत्कट झाल्या होत्या, मात्र काळ हेच औषध ठरले, असो. आता हे सर्व उकरुन निघण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात आमचा एक दोस्त ट्रान्सफर होऊन दुसरीकडे गेला, त्याच्या सेन्डॉफसदृष्य कार्यक्रमाला माझ्या सुभाग्याने मी हजर नव्हतो, जरी हजर असतोच तरी हेच बोललो असतो (बोलता आले असते का नाही ते माहित नाही), पण नसल्याने हे राहुन गेले होते, आता तेच इथे उतरले आहे ... काटेकोर नियम असा नाही पण आंतरजालावर शक्यतो मी मित्रांबाबत लिहीत नाही ... पण हे खास श्रीकांतसाठी !!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नोकरी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिसाद
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
16962 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

लेखन केल्याबद्दल अभिनंदन

नाना चेंगट
Mon, 04/15/2013 - 15:12 नवीन
लेखन केल्याबद्दल अभिनंदन सविस्तर प्रतिक्रिया लेख वाचून
  • Log in or register to post comments

प्रकटन आवडले.

पैसा
Mon, 04/15/2013 - 15:20 नवीन
बरेच दिवसांनी लिहिलेले सुरेख प्रकटन. कधीतरी असे व्यक्त होणे चांगले असते. सगळ्याच भावना नेहमी लपवून ठेवू नयेत.
  • Log in or register to post comments

अगदी हेच

ऋषिकेश
Mon, 04/15/2013 - 18:05 नवीन
अगदी +१ फक्त हल्ली कम्युनिकेशची खूप साधने आहेत त्यामुळे ऑफिसेस बदलली तरी मैत्री साफ तुटते असे अनुभवास आलेले नाही हीच काय ती चंदेरी किनार, अर्थात संपर्क कमी होणार/ प्रत्यक्ष समोरा समोर संपर्क होणार नाही यामुळे मन तुटत राहते हे ही तितकेच खरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

संपर्क कमी होणार/ प्रत्यक्ष

मनराव
Mon, 04/15/2013 - 18:12 नवीन
संपर्क कमी होणार/ प्रत्यक्ष समोरा समोर संपर्क होणार नाही यामुळे मन तुटत राहते हे ही तितकेच खरे!
तुटत राहते ते सुद्धा काही काळा पुरता..... नंतर मागे उरतात त्या कडु/गोड आठवणी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

चांगले लिहिलेस डान्या.

यशोधरा
Mon, 04/15/2013 - 15:23 नवीन
चांगले लिहिलेस डान्या.
  • Log in or register to post comments

आवडेश

अद्द्या
Mon, 04/15/2013 - 15:27 नवीन
आवडेश डोक्यातल्या गोष्टी बाहेर काढण कठीण त्यातल्या त्यात मित्रांच्या बाबतीत . तर महाकठीण . . असो . . "टच " मध्ये राहण्याचा प्रयत्न तर होईलच . . तो सुटू नये अशी अशा . .
  • Log in or register to post comments

आयला इथे एडीट कसं करतात!!

अद्द्या
Mon, 04/15/2013 - 15:30 नवीन
आयला इथे एडीट कसं करतात!! वाक्य असं होतं >>> डोक्यातल्या गोष्टी बाहेर काढणे कठीण
  • Log in or register to post comments

आयला नका एडीट करु. केलयं!

स्पंदना
Mon, 04/15/2013 - 15:32 नवीन
आयला नका एडीट करु. केलयं! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

ठ्यांक्स

अद्द्या
Mon, 04/15/2013 - 15:50 नवीन
:D ठ्यांक्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

एका विशिष्ट टप्प्यानांतर

पिंपातला उंदीर
Mon, 04/15/2013 - 15:36 नवीन
एका विशिष्ट टप्प्यानांतर एकूणच मित्र बनवणे जमत नाही. आपण आपल्या प्रकाराने मानसिक दृष्ट्या सेट झालेले असतो. अड्जस्टमेंट करायला जमत नाहीत. लेख आवडला -२८ व्या वर्षी पोक्त पणा आलेला अमोल
  • Log in or register to post comments

ऑफीसच्या आवारात शिरले की कोणी

शुचि
Mon, 04/15/2013 - 15:37 नवीन
ऑफीसच्या आवारात शिरले की कोणी कोणाचा मित्र नसतो - हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.
  • Log in or register to post comments

असहमत आहे ...

छोटा डॉन
Mon, 04/15/2013 - 16:03 नवीन
शुचि, असहमत आहे तुझ्या वाक्याशी. बाकी असो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

मी तर ऑफीसमध्ये "आवर्जून असं"

शुचि
Mon, 04/15/2013 - 18:22 नवीन
मी तर ऑफीसमध्ये "आवर्जून असं" गुड-मॉर्निंगही करायच्या भानगडीत पडत नाही. दिसले .... केलं पण मुद्दाम शेजार्‍याला कधीच करत नाही. यामागे कारण आहे. समजा रोज विश केलं तर मग ती सवय अन ऑब्लिगेशन होऊन बसतं. कधी त्याच्याबरोबर थोडं (किंचीत) बिनसलं की मग आपण विश करत नाही आणि ते मग खुपतं. त्यापेक्षा "इनडिफरंट" फसाड बरा वाटतो. सर्व्हायव्हल आणि मैत्री दोघी एकत्र राहू शकत नाही हे माझे मत झाले. डॉन यांचा अनुभव सुदैवाने वेगळा आहे त्याबद्दल आनंदच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सहमत आहे. हपिसात शक्यतोवर

बॅटमॅन
Mon, 04/15/2013 - 18:41 नवीन
सहमत आहे. हपिसात शक्यतोवर मित्र वैग्रे बनवू नयेत. त्यातही रोज रोज संपर्क येणारे तर नकोतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

१००१% सहमत. ऑफिसमध्ये असतात

चावटमेला
Wed, 04/17/2013 - 12:20 नवीन
१००१% सहमत. ऑफिसमध्ये असतात ते फक्त कलीग्ज, सहकर्मचारी, बास्स. मित्र वगैरे बनविण्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं (अनुभवाने शहाणा झालेला) चावटमेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पण या वृत्तीमुळे माझी ऑफीसात

शुचि
Wed, 04/17/2013 - 20:13 नवीन
पण या वृत्तीमुळे माझी ऑफीसात घुसमट होते हेही तितकेच खरे आहे. आपण उस्फूर्तपणे काही सांगू इच्छितो अन एक मन म्हणतं "हूम आर यु टेलींग? इझ ही/शी योर फ्रेंड? A BIG NOOOO!!!!" अन मग आपण गप्प बसतो. पण एकवेळ घुसमट परवडली पण कावेबाज मैत्री नको असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

पण एकवेळ घुसमट परवडली पण

चावटमेला
Wed, 04/17/2013 - 21:26 नवीन
पण एकवेळ घुसमट परवडली पण कावेबाज मैत्री नको असे वाटते.
एकदम बरोब्बर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पण तुला अनुभव आलाय का शुचीतै,

रेवती
गुरुवार, 04/18/2013 - 01:30 नवीन
पण तुला अनुभव आलाय का शुचीतै, आजकाल मैत्रीमध्येही मुखवट्याचा कली शिरलाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

सुदैवाने अनुभव नाही गं.

शुचि
गुरुवार, 04/18/2013 - 23:02 नवीन
सुदैवाने अनुभव नाही गं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सर्व्हायव्हल आणि मैत्री दोघी

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 04/19/2013 - 11:03 नवीन
सर्व्हायव्हल आणि मैत्री दोघी एकत्र राहू शकत नाही हे माझे मत झाले.
ऑफिस बद्दल बोलताय की रोडीज बद्दल ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

रोडीज काय असतं?

शुचि
Fri, 04/19/2013 - 18:59 नवीन
रोडीज काय असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

रोडीज

श्रीरंग_जोशी
Fri, 04/19/2013 - 20:17 नवीन
भारततल्या पश्चिमी सभ्यतेवरचा एक रिअ‍ॅलिटी शो (एम टिव्ही). संवादात सतत बीप वाजत असते. मला तर एकदाच पाहून किळस वाटली होती. बरेच लोक चवीने बघतात. एकाने सांगितले होते की लिडरशीप क्वालिटी वगैरे डेवलप होते म्हणे ;-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पश्चिमी सभ्यतेवरचा

बॅटमॅन
Fri, 04/19/2013 - 22:48 नवीन
पश्चिमी सभ्यतेवरचा
हिंदाळलेपण पाहून डोळे पाणावले. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, श्रीरंगराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

;-)

श्रीरंग_जोशी
Fri, 04/19/2013 - 23:02 नवीन
'पश्चिमी सभ्यता' चा उपयोग करण्यामागे एक कथा आहे. अमेरिकेत मी तसा नवा असतानाचा हा प्रसंग. काही सहकारी अमेरिकेत आलोच आहोत तर स्ट्रीपक्लबला जाऊन दौलतजादा करून पुण्य कमवावे म्हणून आसूसले होते. माझ्याही फारच मागे लागले होते. त्यापैकी एक जण हिंदी भाषक असल्याने त्यास रंग दे बसंती चित्रपटातील शब्दांचा वापर करून 'मै पश्चिमी सभ्यता में दिलचस्पी नहीं रखता' असे ऐकवले होते. अन त्या संध्याकाळी तीन लोक मोठ्या उत्साहाने कामगिरीवर निघाले. तेव्हा कुणाचकडे चतुरभ्रमणध्वनी नव्हते. चांगले कपडे घालून, फवारे मारणे वगैरे सुरू असताना एकाने घाईघाईत स्ट्रीपबार चा पत्त्ता शोधला अन नोंदवून घेतला. जिपिएस वापरून त्या ठिकाणी पोचल्यावर एक हार्डवेअर ची फॅक्टरी निघाली कसले तरी मेटॅलिक स्ट्रीप बार्स बनवणारी ;-). तेव्हापासून मी त्यांना 'कैसी रही पश्चिमी सभ्यता' व ते मला 'क्यो तुम्हे तो पश्चिमी सभ्यता में दिलचस्पी नहीं हैं ना?' असे चिडवत असत. बाकी मागाहून कळले की मिसूरी राज्यात त्या प्रकारावर बंदी आहे व त्यासाठी नदीपलिकडे इस्ट सेंट लुईसला जावे लागते जे इलिनॉय राज्यात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

>>>त्यासाठी नदीपलिकडे

प्यारे१
Fri, 04/19/2013 - 23:16 नवीन
>>>त्यासाठी नदीपलिकडे इकडे पण आहे का नदीअलिकडे नि पलिकडे? कोण रे तो अमेरिका वर्गविरहीत आहे म्हणणारा/री/रे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सभ्यतेचा इतिहास बाकी असभ्य

बॅटमॅन
Fri, 04/19/2013 - 23:19 नवीन
सभ्यतेचा इतिहास बाकी असभ्य आहे मोठा ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

त्रिकालाबाधित सत्य

कपिलमुनी
Fri, 04/19/2013 - 23:54 नवीन
हसत फार मोठे सत्य सांगितलेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हार्डवेअर ची फॅक्टरी निघाली

रेवती
Sat, 04/20/2013 - 03:53 नवीन
हार्डवेअर ची फॅक्टरी निघाली ख्या ख्या ख्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

एक अत्यंत मजेदार प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 04/21/2013 - 02:50 नवीन
एक अत्यंत मजेदार प्रतिक्रिया सुचली होती.... पण जाऊ दे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

यदाकदाचित

श्रीरंग_जोशी
Sun, 04/21/2013 - 02:56 नवीन
भापो. यदाकदाचित 'केवळ पुरूषांसाठी' असा विभाग सुरू झालाच तर असे बरेच किस्से टंकता येतील :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

चांगला

सुमीत भातखंडे
Mon, 04/15/2013 - 15:37 नवीन
लेख डॉनराव
  • Log in or register to post comments

अगदी वैश्विक अनुभव लिहिला आहे

नगरीनिरंजन
Mon, 04/15/2013 - 15:40 नवीन
अगदी वैश्विक अनुभव लिहिला आहे. छानच! सगळे कडू-गोड अनुभव आठवून गेले.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Mon, 04/15/2013 - 15:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

डॉन

मन१
Mon, 04/15/2013 - 15:48 नवीन
डॉन लिहिते झाल्याचे पाहून आनंद झाला. लेखन/प्रकटन जे काही आहे ते आवडले/भावले.
  • Log in or register to post comments

+१

गुलाम
Mon, 04/15/2013 - 15:54 नवीन
श्रीकांतचा हेवा वाटला!!!
  • Log in or register to post comments

+११

कोमल
Sun, 04/21/2013 - 11:54 नवीन
खरोखर... लेख आवडला.. पण असे कलिग्ज कम मित्र/मैत्रिणी मिळणे फारच अवघड असते बॉ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

चांगले मित्र मिळाले.

प्रभाकर पेठकर
Mon, 04/15/2013 - 16:27 नवीन
७३ ते ८१ एवढ्या प्रदीर्घ कालात एकाच कंपनीत नोकरी करून कांही मित्र जमवले होते. ते सर्व चांगले होते. कदाचित त्या काळात आणि माझ्या व्यवसायात एवढी चढाओढ नव्हती. पण, मला तरी माझ्या सर्व मित्रांचा चांगलाच अनुभव आला. अगदी शिक्षणात मार्गदर्शन करण्यापासून ऑफिसमध्ये तात्पुरता होणारा फायदा सोडून देऊन दूरदृष्टीने 'अनुभव' मिळविण्याचा सल्ला मला ह्या मित्रांकडून मिळाला. त्या सर्व मित्रांचा मी आभारी आहे, कृतज्ञ आहे.
  • Log in or register to post comments

मस्त नेमकेपणा

मैत्र
Mon, 04/15/2013 - 16:54 नवीन
फार दिवसांनी लिहिते झाले डानराव याबद्दल आनंद आहे. थोड्या धुसर गोष्टी झकास नेमक्या पद्धतीने मांडल्या आहेत. खूप आवडलं ते हे -- "ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते ...तर दुसरीकडे एखादा अगदी आपल्यासारखाच आहे आणि तो आपला परफ़ेक्ट दोस्त बनु शकतो हे कळत असतानाही काही अलिखित ऒफ़िशियल कारणांमुळे आपण त्याच्याशी हवे तेवढे मोकळेपणाने वागु शकत नाही "
  • Log in or register to post comments

वय आणि मैत्री

आनंद घारे
Mon, 04/15/2013 - 17:20 नवीन
माझी एक पेट थिअरी अशी आहे की माणसाचे मन जन्मतः मातीच्या गोळ्याप्रमाणे ओलसर असते आणि त्याला विशिष्ट आकार आलेला नसतो. दोन मुलांची गट्टी लगेच जमते. वय वाढत जाते तसतसे मन सुकत आणि कठीण होत जाते. दोन मने जुळण्यासाठी समान आवडी किंवा लाभ वगैरे गोंदाची गरज पडते. उतारवय येईपर्यंत ते शुष्क झालेले असते आणि त्याला अनेक कंगोरे आलेले असतात. त्यानंतर फेविकॉल सुद्धा लावता येत नाही. डॉनच्या वयामध्ये असतांना दिवसाचा बहुतेक सगळा वेळ ऑफिसमध्ये जात असल्यामुळे त्या वेळात ज्या व्यक्ती संपर्कात येतात, त्यांच्यातल्या कोणाकोणाशी आपण काही ना काही शेअर करत असतो, त्या निमित्याने जोडले जात असतो. पण जेंव्हा लाभ किंवा हानी याचा प्रश्न येतो तेंव्हा तो जोड निखळतो. ते होतांना थोडे कष्टही होतात. आपसानध्ये काही वितुष्ट नसतांना बाह्य कारणांमुळे दूर जावे लागले तर जास्त दु:ख होते. आज संपर्कसाधनांमुळे जग इतके जवळ आले आहे की शरीराने दूर गेले तरी एकमेकांना स्क्रीनवर पाहू शकतो, बोलू शकतो, वाटल्यास मैत्री राखू शकतो.
  • Log in or register to post comments

+१११११११११११

शिद
Mon, 04/15/2013 - 17:36 नवीन
म्हणुनच बरेच जाणकार सांगतात की ऑफिसात शक्यतो प्रेमाच्या आणि दोस्तीच्या फंदात पडु नये
+११११११११११ अगदी माझ्याच मनातले लिहिले आहे असे वाटते...पहिल्या कंपनीमध्ये अख्खी प्रोजेक्ट टीम ३ वर्षांत एकमेकांची जिवलग बनली होती पण तो जॉब सोडताना डोळ्यातुन पाणी वहायला लागले होते :( ...म्हणुन आता वर लिहिलेल्या वाक्याप्रमाणे ऑफिसात यारी-दोस्ती टाळतो.
  • Log in or register to post comments

वाह ...डॉन राव

नि३सोलपुरकर
Mon, 04/15/2013 - 17:48 नवीन
वाह ...डॉन राव , मस्त लिहलय..आणी हेवा वाटतोय श्रीकांतचा (तुमच्या सारखा मित्र मिळाल्यामुळे). कुठेतरी वाचलेय " If friendship is your weakest point then you are the strongest person in the world".. जियो यार (असेच जिवाभावाचे मित्र लाभलेला)
  • Log in or register to post comments

अजिबात पटले नाही

सुबोध खरे
Mon, 04/15/2013 - 18:36 नवीन
ऑफिसात मैत्री असू नये किंवा ऑफीसच्या आवारात शिरले की कोणी कोणाचा मित्र नसतो. मी सरकारी नोकरीत होतो २३ वर्षे किंवा कोर्पोर्रेट हॉस्पिटल मध्ये ४ वर्षे तेथे झालेली माझी मैत्री अजून टिकून आहे. कितीतरी मित्र जरी वर्षात एकदा किंवा दोनदा भेटलो तरी पूर्वीसारखाच जिव्हाळा कायम आहे. प्रत्येक माणूस हा तुमच्या बढती किंवा पगाराच्या स्पर्धेत असतो असे नाही. माझे मित्र हे वेगवेगळ्या शाखेत असल्यामुळे असा कधीही प्रकार घडला नाही. कोणी पैथोलोजीस्ट कोणी हृदयविकार तज्ञ कोणी प्रशासकीय अधिकारी असे असले तरी समान विचार सरणी मुळे झालेली मैत्री आजही कायम आहे. लष्करातील पायलट पाणबुडी अधिकारी असेही लोक आम्ही आवर्जून भेटतो. यात एक फरक आहे तो नुसते आम्ही नव्हे तर आमच्या बायकांची तर जुळली तर मैत्री पुढे चालू राहते नाहीतर ती हळूहळू कमी होते. even if you win the rat race you're still a rat हे तत्व ठेवून चालणारे आम्ही बरेचसे मित्र हे नंतरच्या काळात मैत्री झालेले आहोत. बालमित्र नव्हे समानशीले व्यसनेषु सख्यम यामुळे असेल
  • Log in or register to post comments

छान !

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/15/2013 - 18:54 नवीन
डान्या लिहिता झाला ते एक बरे झाले. मी स्मशानात काम करत असल्याने ओळखी फारशा टिकतच नाहीत, किंवा लोक टिकवायला बघत देखील नाहीत.
  • Log in or register to post comments

खर्‍यांशी सहमत

तिमा
Mon, 04/15/2013 - 19:00 नवीन
आत्तापर्यंत जास्तीतजास्त मित्र ऑफिसातच मिळाले आहेत. अगदी ज्यांच्याशी तात्विक कारणांवरुन कडाकडा भांडलो तेही शेवटी जवळचे मित्र झाले. तुलनेने मैत्री न करण्यासारखे लोक अगदी तुरळक भेटले. जे सोडून गेले ते अजूनही संपर्क ठेवतात. संपूर्ण नोकरीत कधीही स्पर्धा करणारे कोणी भेटले नाही. कदाचित माझेच स्टार उच्चीचे असावेत.
  • Log in or register to post comments

बाप रे

रमताराम
Mon, 04/15/2013 - 19:55 नवीन
डान्राव, लैच आतड्याने लिवलं राव. बर्‍याचशा मुद्द्यांशी सहमत. फक्त दोस्त बनवू नयेत हे चूक. आमचे जगण्याचे तत्त्वज्ञान साधे सोपे आहे. जिवाभावाचे मित्र करावेत पण जगण्यातील इतर गोष्टींप्रमाणेच मैत्रीबाबतही चिरंतनाची आस ठेवू नये. ती कधी ना कधी संपणारच आहे याची खूणगाठ बांधून ठेवावी. पण हरकत नाही, जे काही मैत्रीचे क्षण तुम्ही जगलात ते छोटे असतील, खोटे तर नसतील? मग जेवढे मिळाले ते पुरेपूर उपभोगावे नि हरवले की शक्य तितक्या लवकर त्यातून आतडे सोडवून घ्यावे नि खुल्या दिलाने त्या मैत्रीला टाटा करून पुढे चालते व्हावे. हीच गोष्ट डोक्यावर पाय देऊन जाऊ पाहणार्‍या तथाकथित मित्रांची. मित्रांना आपल्या कुवतीच्या मर्यादेत शक्य ती सारी मदत करावी पण एकदा दगा दिला (चूक वेगळी नि जाणीवपूर्वक दिलेला दगा वेगळा) की दोन द्यावे दोन घ्यावे याच न्यायाने वागावे. आजवर आमचे उत्तम चालले आहे.
  • Log in or register to post comments

वा! खूप संतुलित वृत्ती (अ

शुचि
Mon, 04/15/2013 - 19:57 नवीन
वा! खूप संतुलित वृत्ती (अ‍ॅटिट्यूड). प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

+१

सुहास झेले
Mon, 04/15/2013 - 20:14 नवीन
शब्दशः सहमत.... :) :) डान्रावांचे लिहिते झाल्याबद्दल अभिनंदन... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हेच

श्रावण मोडक
Mon, 04/15/2013 - 22:07 नवीन
हेच स्मिता.नं वेगळ्या शब्दांत इथं चौथ्या परिच्छेदात म्हटलं आहे. तिचेच शब्द:
नात्यांचीही वेगवेगळी आयुष्यं असतात. या नात्यांना काळाच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते. काही रक्ताच्या नात्यासारखी दीर्घायुषी नाती कायम सोबत असतात. काही नातीच अल्पायुषी असतात आणि ती या काळाच्या प्रवाहात केव्हाच विरून जातात. त्यांना ओढून ताणून तगवत ठेवण्याचा प्रयत्नही करू नये. तसे प्रयत्न कधी हास्यास्पद तर प्रसंगी तिरस्कारासही पात्र होतात. बरं प्रत्येक वेळी आपणच त्या व्यक्तीपासून दूर जात असतो असं नाही. कधी दोघंही एकमेकापासून लांब जात असतो तर कधी दोघांतली एक व्यक्ती तिथेच असते आणि दुसरी दूर जात असते. अश्या वेळी 'त्या' आपल्या जवळच्या व्यक्तीला तिथेच ठेवून आपणच दूर निघून आलो ही बोच मनाला लावून घेणं फारसं व्यवहार्य नाही. आठवणी या येणारच, मानवी अस्तित्वाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्यांचा क्लेश करून घ्यायचा नाही.
ऑफिसातला दोस्त असा काही प्रकार आपल्याला कधीच कळला नाही. दोस्त हा दोस्त. ऑफिसात तो झाला म्हणून ऑफिस त्याच्यात सामावत नाही, की तो ऑफिसातच रहात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

चोक्कस!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 04/16/2013 - 00:04 नवीन
चोक्कस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

>>>>पण ही दोस्ती पण अशी नाठाळ

प्यारे१
Mon, 04/15/2013 - 20:23 नवीन
>>>>पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे. >>>रुटिन कामाचे एक ठिक आहे हो ते कसेही होऊन जाते, पण निघुन गेलेला माणुस त्याच्याबरोबर जी एनर्जी घेऊन गेला ती कुठुन आणणार? इथुन निघुन गेलेल्या माणसाचा समंजसपणा आणि कामे करुन घेण्याचे व त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे कामे करण्यास माणुस तयार करण्याचे स्कील कुठुन आणणार? एखाद्याचे डेडिकेशन आणि कमालीचा आत्मविश्वास ह्यामुळे इथे दिसणारा परिणाम असा सहजासहजी रिप्लेस करता येतो? एखाद्या इव्हेंटवेळी त्याच्याकडुन येणार्या क्रिएटिव्ह आयडियास अशा सहजासहजी रिप्लेस करता येतात? वरुन कितीही दडपण आले तरी त्याची झळ खालच्या लेव्हलपर्यंत येऊ न देता मधल्यामध्ये सर्व काही शांत करण्याची खुबी अशी जादुसारखी उभी करता येते? खूपच छान लिहीलंय.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा