✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १ . . .

म
मार्गी यांनी
Tue, 11/24/2015 - 15:58  ·  लेख
लेख
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद. सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . . सिंहगड राउंड १ . . . गेल्या महिन्यात चांगली सायकलिंग झाल्यानंतर आता सिंहगडावर जायचं आहे. ह्या दिवसांमध्ये मी जिथे राहतोय त्या डिएसके विश्व, धायरीपासून सिंहगड फक्त २१ किलोमीटर दूर आहे. इथून दिसतो आणि अगदी जवळ वाटतो. पण मध्ये खूप मोठा घाट आहे. सुमारे नऊ किलोमीटरमध्ये ६०० मीटर क्लाइंब आहे. त्यामुळे आधी जाण्याची हिंमतच होत नव्हती. तशी हिंमत आताही होतच नाहीय, पण आता सायकलचं वेडच लागलं आहे. सिंहगडाच्या जवळच्या रस्त्यांवर अनेकदा गेलो आणि सिंहगडाला बघत राहिलो. सिंहगड साद देतोच आहे. सिंहगड! मराठी इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठिकाण! सतराव्या शतकामध्ये शौर्याचे किती अविष्कार इथे झाले! छत्रपती शिवरायांनी घेतलेला कोंडाणा! शत्रुच्या ताब्यात गेलेला कोंडाणा आणि मग १६७० मध्ये शिवरायांच्या स्वराज्यात झालेलं त्याचं पुनरागमन! त्यासाठी झालेला शौर्याचा प्रताप! त्याबद्दल जितका विचार करतो, तितका अस्वस्थ होतो. आणि सिंहगडाच्या आजच्या स्थितीबद्दल काय म्हणावं? सिंहगडाचा परिसर आज वाईट कारणांमुळे ओळखला जातो. हॉटेल, बार आणि कित्येक अवैध कामांसाठी तो प्रसिद्ध आहे. असो. पण हे सर्व असलं तरी सिंहगड ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी तीर्थ स्थान आहे आणि पुढेही राहील.    १५ ऑक्टोबरची सकाळ. सात वाजता निघालो. सकाळच्या शांततेत सायकल चालवणं किती अद्भुत अनुभव आहे! शांत रस्ता आणि फक्त सायकलच्या चाकांच्या घर्षणाचा मधुर स्वर! वा! पहिले अकरा किलोमीटर समतल रस्ता आहे. छोटे चढ- उतारसुद्धा येतात. अर्ध्या तासात खडकवासला डॅमजवळ पोहचलो. सुंदर नजारा! डॅममध्ये धुकं होतं! काही क्षण थांबलो आणि पुढे निघालो. मिलिटरी एरियामधून जाऊन सिंहगडाच्या पायथ्याजवळ पोहचलो. इथे नाश्ता करून घेतला. सोबत पाण्याच्या दोन बाटल्या आहेत. शिवाय बिस्किटंही आहेत. आता खरा घाट सुरू होईल. आधी पायवाटेनेसुद्धा एकदा गडावर गेलो आहे. ती पायवाट सरळ वर चढते तर रस्ता वळणं वळणं घेत वर जातो. दोन वर्षांपूर्वी जेव्हा बाईकवर लदाख़ला जाण्याचा विचार केला होता, तेव्हा प्रॅक्टिस ह्याच घाटात केली होती. कारण एक तर चढ मोठा आहे, रस्ताही थोडा खराब आहे. शिवाय त्याचं एलेव्हेशन इतकं जास्त आहे की, त्यावर मोठी बस किंवा ट्रकही जात नाहीत. फक्त लहान वाहनं आणि टेंपो जातात. त्यामुळे तेव्हा बाईकवरही आलो होतो. आता जेव्हा लदाख़ आणि सायकलने सम्मोहित केलं आहे, तेव्हासुद्धा सरावासाठी हेच चांगलं ठिकाण आहे. किंबहुना सिंहगडावर सायकल चालवणं ही लदाख़मध्ये सायकल चालवण्याची पात्रता आहे. सिंहगडामध्ये ९ किलोमीटरमध्ये ६३० मीटर चढ आहे जो खर्दुंगलाच्या एक चतुर्थांश येतो- खर्दुंगलामध्ये ४० किलोमीटरमध्ये २१०० मीटर चढ आहे आणि इतरही अनेक आव्हानं आहेत. सिंहगडावर त्या चढाची थोडी झलक नक्कीच मिळते. बघू कसं जमतं.  धुक्यामध्ये खडकवासला!   चढ सुरू झाल्या झाल्या अगदी खालच्या गेअरमध्ये सायकल चालवायला सुरू केली. अर्धा किलोमीटर गेलो. सायकल चालवणं कठिण होतं आहे. कसंबसं अजून एक किलोमीटर गेलो. फारच कठिण होतं आहे. जेमतेम दिड किलोमीटर सायकल चालवता आली. त्यानंतर पायी पायी जाण्याची वेळ आली. आणि तशीही सायकल पायी चालण्याच्या वेगानेच चालवता येत होती. थोड्या वेळाने परत प्रयत्न केला, पण पायांनी प्रतिसाद दिला नाही. जिद्द निरर्थक होती. म्हणून सरळ पायी पायी सुरू केलं. पहिल्या दिड किलोमीटरपर्यंत जेमतेम वीस मिनिटच सायकल चालवता आली. त्यानंतर इतकंच- "वहाँ हाथी न घोडा है, बस पैदल ही जाना है!” मध्ये मध्ये थांबून आराम करावा लागतोय. थोडं थोडं पाणी पितोय. पुढे जाताना भितीसुद्धा वाटते आहे की, उतरताना ह्याच उतारावरून सायकल न्यायची आहे. आणि चढ जितका मोठा आहे, तितकाच उतारही मोठा असणार आहे! अर्थात् सायकलीचे दोन्ही ब्रेक वापरावे लागतील. त्याचीही थोडी भिती वाटली. पण पुढे जात राहिलो. सुंदर दृश्य दिसत आहे. रस्ता जसा वर चढत गेला, तसं खडकवासलाचं पाणीही दूरवरून दिसू लागलं. एका उंचीवर पोहचल्यानंतर आपण जिथून येतो, तो मार्गही दिसू लागतो. . असो.  सिंहगडाकडे येणारा रस्ता आणि मागे दूर खडकवासलाचं पाणी    आता सिंहगड जवळ येतोय. अर्धं अंतर ओलांडल्यानंतर दिलासा म्हणून दोन किलोमीटरचा किंचितसा उतार लागतो! दोन किलोमीटर सायकल स्वत:च चालली. आता फक्त साडेतीन किलोमीटर राहिले. पण हाच टप्पा सर्वाधिक अवघड गेला. वारंवार थांबावं लागलं. पायी जाणंही अवघड झालं. खरं तर पायी पायी जाण्यासाठी चढाच्या रस्त्याने काहीच फरक पडत नाही. पण इथे खूप वेळ लागतोय. शेवटी साडेदहा वाजता गडावर पोहचलो. चढाच्या नऊ किलोमीटरला अडीच तास लागले. सायकल फक्त वीस मिनिटच चालवली! वर पोहचल्यानंतरही मन अशांत राहिलं. आता उतरण्याचं टेंशन आहे! उतरतानाही सायकलिंगची परीक्षा आहे. कारण चढाइतकाच उतारही अवघड आहे! सिंहगडावर फार वेळ थांबलो नाही. चहा पिऊन पाणी भरून घेतलं आणि परत फिरलो. आता उताराशी सामना आहे. दोन्ही ब्रेक लावून उतरायला सुरुवात केली. मध्ये मध्ये जिथे उतार जास्त आहे, तिथे पायी जातोय. ब्रेक्सनाही आलटून पालटून आराम देतोय जेणेकरून ते गरम होणार नाहीत. वेग अजिबात वाढू दिला नाही. हळु हळु उतार पार होतोय. ब्रेक्सना ब्रेक देत जात राहिलो. वाटेत मध्ये लागलेला दोन किलोमीटरचा हलका चढ सुखावणारा होता. आता अजून दोन पाऊल, थोडसं अंतर, असं करत करत एका तासात नऊ किलोमीटर उतरलो. उतरल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटलं. अजून एक मोठा नाश्ता केला आणि निघालो. जेवण केलं नाही, कारण अजून अकरा किलोमीटर सायकल चालवायची आहे. पुढचा प्रवास इतका जड गेला नाही. दोन तास चालल्याचाही फायदा झाला असावा. चालणं सायकलिंगला पूरकच आहे.  सिंहगडावर पोहचणारा रस्ता   सिंहगडाचा क्लाइंब आता दोन वर्षांनंतर जेव्हा ह्या राईडचा विचार करतो, तेव्हा अनेक चुका दिसतात. सगळ्यात मोठी चूक ही, की मी अजिबात रेग्युलर नव्हतो. ६ आणि ७ ऑक्टोबरला दोन अर्धशतक केले होते. चांगला टेंपो तयार झाला होता. पण त्यानंतर आठवडाभर थोडीही सायकल चालवली नाही. रोज १५ किलोमीटर जरी चालवली असती, तरी सिंहगडाच्या ह्या राईडमध्ये अजून चांगली चालवता आली असती दुसरी चूक अशी की, सायकलिंगसोबत पूरक व्यायाम- योगासन- प्राणायाम केल्यामुळे बराच फरक पडतो- ते मी जवळ जवळ करत नव्हतो. त्यामुळे चढावर फक्त दिड किलोमीटरच सायकल चालवता आली.   आणि काही चुका अशा असतात की, त्या सुधारणं लांबच, त्या समजण्यासाठीही अनेक वेळेस चुकावं लागतं. उदाहरणार्थ पंक्चर काढणं हीच गोष्ट. जोपर्यंत आपण दहा वेळेस चुकीच्या प्रकारे पंक्चर काढत नाही, तोपर्यंत ते योग्य प्रकारे कसं काढावं, हे आपल्याला कळूच शकत नाही. ह्या चुकाही काहीशा अशाच होत्या. सायकलिंग सुरू ठेवल्यामुळे हळु हळु समज वाढत गेली. आणि रेग्युलरिटी नसणं खूप त्रासदायक असतं. हे जवळ जवळ धावत्या ट्रेनसारखंच आहे. जर ट्रेन धावत असेल, तर तिला पुढे नेण्यासाठी कमी ऊर्जा लागते. पण प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनला चलायमान करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. पूर्ण ट्रेन विरोधही करते ज्यामुळे ट्रेन सुरू होताना आवाजही होतो. किंवा बाईकमध्ये पहिल्या व दुस-या गेअरमध्ये जास्त शक्ती असते; तिसरा व चौथा हे गेअर्स फक्त वेग देण्याचं काम करतात. तेच सायकलबद्दलही आहे. पहिल्या दिवशी पहाटे पाचला उठून सायकल बाहेर काढताना प्रचंड अडचण होते. पण दुस-या दिवशी ते सोपं होतं. तिस-या, चौथ्या- पाचव्या दिवशी ते हळु हळु एफर्टलेस होत जातं. माझं चुकलं हे की, मी फक्त मोठ्या राईडचाच विचार करत राहिलो. दहा- पंधरा किलोमीटरच्या छोट्या राईडही नियमित प्रकारे केल्या नाहीत. पण चुका करणं हीसुद्धा चांगली गोष्ट आहे कारण त्याचा अर्थ होतो की, काही शिकतोसुद्धा आहे. आणि चुका करायला घाबरायचं‌ कशाला? जो पोहायला घाबरेल, तो ते शिकूच शकणार नाही. असो.   ह्या राईडमध्ये त्रास झाला, पण त्यामुळे मी किती पाण्यात आहे, हेसुद्धा कळालं. जर मला लदाख़मध्ये सायकल चालवायची असेल, तर स्टॅमिना प्रचंड वाढवायला हवा, हे कळालं. माझा सध्याचा स्टॅमिना १५% सुद्धा नसेल. ही स्पष्टता मिळणं, हा मोठा धडा होता. ह्या आणि इतर सायकल राईडमध्येही एक गोष्ट बघितली. सायकलिंग करताना खूप आनंद होतो; मजा वाटते; पण तरीही‌ त्या वेळी मन तिथे थांबत नाही. जसं सुरुवातीला वाटत होतं, कधी एकदा चढ येईल. नंतर वाटलं की, पायी पायी जाता तर येतंय, पण उतरताना कसं होईल. आणि उतरल्यानंतर वाटलं, कधी एकदा घरी पोहचेन! मन नेहमीच अस्वस्थ राहतं. पूर्ण राईडमध्ये कदाचित असा एखादाच क्षण असेल, जेव्हा मन खरोखर थांबलं‌ असेल व त्या क्षणाच्या स्थितीमध्ये स्थिर झालं असेल. . .   ही राईड माझ्यासाठी बेसलाईन ठरली. चांगला पाया मिळाला ज्या आधारे पुढे जाऊ शकलो आणि आव्हानांना सामोरं जाऊ शकलो. पुढील भाग: सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

Book traversal links for सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १ . . .

  • ‹ सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नजदिकीयाँ बन गई. . .
  • Up
  • सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
प्रवास
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
10151 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

वा

_मनश्री_
Tue, 11/24/2015 - 16:01 नवीन
वा नेहमीप्रमाणेच हा भाग सुद्धा खूप सुरेख
  • Log in or register to post comments

वाचतोय.

मोदक
Tue, 11/24/2015 - 16:12 नवीन
वाचतोय. एक सहज सुचवत आहे. सिंहगड घाट दिड तासाच्या आत मारण्याचे लक्ष्य ठेवा. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर लिहिताय. नवीन लेख

मधुरा देशपांडे
Tue, 11/24/2015 - 16:22 नवीन
फारच सुंदर लिहिताय. नवीन लेख दिसला की लगेच धागा उघडला जातो. सायकलीचा प्रवास आणि त्यासोबत तुमच्या मनाचा प्रवास, आणि सोबतीने रम्य फोटो. वाह.
  • Log in or register to post comments

एक नंबर लेख.

बॅटमॅन
Tue, 11/24/2015 - 16:31 नवीन
एक नंबर लेख. रच्याकने खास तुमच्यासाठी म्हणून अजून दोन ठिकाणे सुचवतो: १. कात्रज घाट २. पुरंदर घाट. (म्हणजे पायथ्यापासूनची घाटवाट जी वरपर्यंत जाते). दोन्ही एकदम च्यालेंजिंग आहेत असे माझे तरी मत आहे.
  • Log in or register to post comments

हे च्यालेंजिंग असतील तर

मोदक
Tue, 11/24/2015 - 17:35 नवीन
हे च्यालेंजिंग असतील तर कादवे घाट पाबे घाट बोपदेव घाट करून बघा. पुण्यापासून २० ते ४०किमी अंतरावर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काय राव, चेष्टा करता का

बॅटमॅन
Tue, 11/24/2015 - 17:49 नवीन
काय राव, चेष्टा करता का गरिबाची. आम्ही आपले दहावीतले अवघड वाटणारे ड गटातले गणित दिले, तुम्ही एम थ्री फेकू लागला तोंडावर तर कसं व्हायचं? रच्याकने हे सगळे घाट नक्की कुठेशीक आहेत याबद्दल मार्गदर्शन व्हावे. बोपदेव घाट सासवड भागाजवळ आहे इतकंच अंधुकसं माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सिंहगडकडे जाताना डोणजे पासून

मोदक
Tue, 11/24/2015 - 18:13 नवीन
सिंहगडकडे जाताना डोणजे पासून पानशेतच्या दिशेने जो रस्ता जातो त्याच रस्त्यावर खानापूर नंतर डावीकडे पहिला रस्ता लागतो तो पाबे घाट, आणखी थोडे अंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा डावीकडे कादवे घाट. हे दोन्ही घाट वेल्ह्याजवळ उतरतात. (वेल्हे = तोरणा पायथा) आम्ही एकदा कादवे घाट मारून वेल्ह्याला उतरलो, एके ठिकाणी चिकन हादडले आणि त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत पाबे मार्गे परत आलो होतो. भरपूर दिवसांचे सायकलींग एकाच दिवसात केल्याचा फील आला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अनेक धन्यवाद!!

बॅटमॅन
Tue, 11/24/2015 - 18:36 नवीन
अनेक धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

पाबे घाट

मार्गी
Wed, 11/25/2015 - 10:32 नवीन
मोदक जी, पुढचा भाग पाबे घाटाबद्दलच आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सध्या पिरंगुट :P

sagarpdy
Tue, 11/24/2015 - 17:56 नवीन
सध्या पिरंगुट :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

पिरंगुट आणि पुढे लावासा कडे

मम्बाजी सर्वज्ञ
Tue, 11/24/2015 - 19:27 नवीन
पिरंगुट आणि पुढे लावासा कडे जाणारा रस्ता झक्कास आहे एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

मस्त. या लेखमालेतून शिकायला

एस
Tue, 11/24/2015 - 19:09 नवीन
मस्त. या लेखमालेतून शिकायला मिळतेय बरेच. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मस्त आहेत फोटो व लेखमाला...

मांत्रिक
Wed, 11/25/2015 - 06:23 नवीन
मस्त आहेत फोटो व लेखमाला...
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मार्गी
Wed, 11/25/2015 - 10:31 नवीन
सर्वांना धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो आणि लेख..

नीलमोहर
Wed, 11/25/2015 - 10:41 नवीन
सुंदर फोटो आणि लेख..
  • Log in or register to post comments

क्लासच!

वेल्लाभट
Wed, 11/25/2015 - 10:50 नवीन
क्लासच! व्हेरी इन्स्पायरिंग. पेठच्या किल्ल्याला जायलाही ४.५ किमीचा असाच चढ आहे कच्च्या वाटेवरचा.
  • Log in or register to post comments

एकदम भारी

जगप्रवासी
Wed, 11/25/2015 - 17:05 नवीन
कमाल आहे राव तुमची… एकदम भारी
  • Log in or register to post comments

छान फोटो

मित्रहो
गुरुवार, 11/26/2015 - 19:18 नवीन
सुंदर लेख
  • Log in or register to post comments

खूपच सुरेख!

पैसा
गुरुवार, 12/03/2015 - 23:29 नवीन
सायकलबद्दल लिहिताय तसे सहज इतर विचार लिहिताय ना, ते वाचून खूप शांत वाटतं. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा