Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user सोत्रि
Submitted by सोत्रि on Tue, 03/05/2013 - 22:25
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
संदर्भ
   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय? चला तर आज तेच बघूयात... कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल  :) ) दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार. दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती ह्यावरून, दोन प्रकार पडतात. लिकर आणि लिक्युअर. लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली. लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार. लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार. (इथे कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे). लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे त्यावरून. व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते. जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते. व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते. जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते. लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात. तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात. भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते. ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे असला शास्त्रोक्तपणा नसतो. इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो. प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते. बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते. मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते. ह्याउलट हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय. अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो त्यामुळे कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही; कारण इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते. डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो. ह्या प्रकारच्या दारूमुळेच, दारू वाईट असा सरसकट समज झाला आहे. ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे देशी दारू किंवा सरकार मान्य दारू. हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्‍या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य, हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो. आता दारू म्हणजे काय ते कळले पण दारू प्यायल्यावर नेमके होते काय? खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने. जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते आणि त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो. एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोल च्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्‍या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात आणि शरीराच्या हालचाली मंदावतात. त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते. अर्थात हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. अती तिथे माती ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली तर सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते. ही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते. ३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल हे शरीरासाठी एक अ‍ॅन्टीबॉडीच असते त्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात. आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग? तर त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते. त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात आणि त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते. तर दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर माणसाची अवस्था बिकट होते. आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल? तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते? तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही? तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्‍याचा ‘वकार युनुस’ होतो. त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, नापेक्षा दारू म्हणजे वाईट असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते. तर आता दारू म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?
  • 80994 views

प्रतिक्रिया

Submitted by मन१ on Tue, 03/05/2013 - 22:49

Permalink

माहिती

माहिती म्हणून ठीक आहे.(अचूक असणारच असा विश्वास आहे.) शंका :- बैठे काम सतत करणार्‍यांना साधारणतः किती अल्कोहोल recommanded मात्रेत असते? काही लोक "नियमित घेतो पण थोडीशीच घेतो" असे म्हणतात. नियमित घ्यायचीच झाल्यास ह्या थोडीशीच शब्दाची लिमिट आम आदमीसाठी किती आहे?
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 03/06/2013 - 00:05

In reply to माहिती by मन१

Permalink

घ्यायचीच झाल्यास ह्या थोडीशीच

घ्यायचीच झाल्यास ह्या थोडीशीच शब्दाची लिमिट आम आदमीसाठी किती आहे?
ते व्यक्तिसापेक्ष आहे. नेमके सांगता येणे कठिण आहे. -(साकिया) सोकाजी

Submitted by मन१ on Wed, 03/06/2013 - 12:19

In reply to घ्यायचीच झाल्यास ह्या थोडीशीच by सोत्रि

Permalink

हम्म...

ते बरोबर आहेच. पण जरासं डिप्लोमॅटिक नाहिये का? कोण किती धावू शकतो; किंवा सर्वसाधारण बैठे काम करणर्‍यास रोज सरासरी किती क्यालरिज लगतात्/पुरेशा असतात हे सरासरी प्रमाण सहसा उपलब्ध असतं; त्यांचं काहिसं standardization(स्पेलिंग मिष्टेक चु भू द्या घ्या ) झालेलय. तसं मद्यसेवनाचंही झालेलं असणारच की. त्यातही "व्यक्तीपरत्वे उन्नीस्-बीस..." हे ठीकच. तर असा स्टँडारडाझ्ड आकडा कुणाच्या पाहण्यात आहे का?

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 03/07/2013 - 01:00

In reply to माहिती by मन१

Permalink

recommanded

zero ml नियमित घेतो याला काही अर्थ नाही. पण २ पेग आठवड्यात दोन वेळा याने आपल्या शरीरावर फार जास्त परिणाम होणार नाही.नौदलाच्या व्यसन मुक्तीकेंद्रात काम करीत असताना मी एक सैनिक दोन पेग पिउन अल्कोहोलिक झालेला पाहिला आहे फक्त तो हे दोन पेग रिकाम्या पोटी एका घोटात घेत असे त्यामुळे तो कामावर जरा टाइट असे. अशा माणसाला सशस्त्र(गोळ्या भरलेली रायफल)गस्तीवर पाठवणे अशक्य होते.

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 03/05/2013 - 22:54

Permalink

वाह उस्ताद!!

एकाच वेळी सहजपण मांडलेली शास्त्रोक्त माहिती व त्यावर खुसखुशीत लेखनशैलीचा तडका याचे समर्पक उदाहरण म्हणजे वरील लेख. लहान असताना मला प्रश्न पडला होता की मोसंबीचा रस व मोसंबीची दारू यात नेमका फरक तो काय? मग या क्षेत्रात जाणकार असलेल्या शेजारच्या काकांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी दारू बनते कशी हे सोप्या भाषेत समजावून सांगितले होते. अवांतर - दारुपासून काही पोषण मिळते का यावर जाणकारांनी प्रकाश टाकल्यास आनंद होईल. काही प्रकारचे मद्य पिल्याने हॄदयरोगाची शक्यता कमी होते, वार्धक्याच्या त्वचेवरील खुणा येणे लांबते वगैरे नेमके कसे होते हे कोणी सोप्या भाषेत सांगेल का? (जीवशास्त्र हा विषय खूप लौकर सोडल्याने जालावरील क्लिष्ट माहिती नेमकेपणाने कळत नाही म्हणून येथे विचारतोय).

Submitted by मन१ on Tue, 03/05/2013 - 23:27

In reply to वाह उस्ताद!! by श्रीरंग_जोशी

Permalink

दोन लेख

http://www.misalpav.com/node/16202 आणि http://www.misalpav.com/node/16102

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 03/05/2013 - 23:33

In reply to दोन लेख by मन१

Permalink

धन्यवाद

# मनोबा - या दुव्यांबद्दल तुम्हाला अनेक दुआँ...

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 03/07/2013 - 01:19

In reply to वाह उस्ताद!! by श्रीरंग_जोशी

Permalink

मोसंबी नारंगी

देशी दारू हि हातभट्टी मुळे होणार्या विषबाधा अंधत्व इ टाळण्यासाठी सरकारने स्वतात दिलेला पर्याय आहे. यात उसाच्या मळीपासून तयार होणारे अल्कोहोल(मद्यार्क) ४०% पर्यंत विरळ करून त्यात मोसंबी किंवा संत्र्याचा अर्क ( स्वादासाठी) टाकला जातो. त्याला मोसंबी किंवा नारंगी देशी दारू म्हणतात. त्यात कोणताही फळाचा रस नसतो. दारूपासून मिळणारे पोषण हे अत्यल्प असून त्याचा फारसा फायदा होत नाही कारण दारूमध्ये कोणतेही इतर अन्न घटक नसतात ( नुसती साखर खाल्ल्यासारखे) दोन पेग व्हिस्की मध्ये ७ किलोकैलरी/ ग्राम किंवा ५.३किलोकैलरी/ मिली प्रमाणे ११०-१२० किलोकैलरी मिळतात.२७-३० ग्रॅम साखरे इतके( एका खडीसाखरेच्या खड्या इतके) मद्य प्यायल्याने हृदयरोगाची शक्यता कमी होते कारण माणूस यकृताच्या आजाराने दगावतो आणि म्हणूनच वार्धक्य सुद्धा येत नाही.

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 03/07/2013 - 01:29

In reply to मोसंबी नारंगी by सुबोध खरे

Permalink

धन्यवाद

खालच्या प्रतिसादाप्रमाणेच हा प्रतिसाद देखील मदतपूर्ण.

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 03/05/2013 - 23:43

Permalink

@ त्याने एक सहजावस्था प्राप्त

@ त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. >>> =)) .......................................................................................................................Image removed. @उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्‍याचा ‘वकार युनुस’ होतो.>>> =)) मद्यसंभव शरिर चयापचय शास्त्र विशारद... सोकू नाना की जय हो !!! Image removed.

Submitted by उपास on Tue, 03/05/2013 - 23:53

Permalink

आवडलंच..

मस्त लिहिलेय सोकू नाना!

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 03/06/2013 - 00:03

Permalink

जनहितार्थ जारी

हा धागा "मिसळपाव सरकार तर्फे जनहितार्थ जारी " असा घोषित करावा अशी जोरदार मागणी करीत आहे ! भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. >>> ह्या वाक्यावर माईल्ड निषेध ! बीयर विषयी काही बोलला नाहीत तें का बरे ? ( बीयर दारु मानत नाही काय तुम्ही ? तो इस बात पे होजाये चीयर्स !!) बाकी सोमरस विषयावर काथ्याकुट झाला असेलच... मधु उर्फ महुवा उर्फ आपल्या मोहाच्या फुलांची दारु ह्यावर कोणीतरी बोला राव ... असो || एवं मद्यस्य दोषेण कुलं वीराणामैक्यशालिनाम | काहीतरी काहीतरी काहीतरी मद्यम् कुलविनाशकं ||
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 03/06/2013 - 00:21

In reply to जनहितार्थ जारी by प्रसाद गोडबोले

Permalink

बीयर दारु मानत नाही काय

बीयर दारु मानत नाही काय तुम्ही ?
बीयरला दारू म्हणणे हे म्हणजे ताकाला मठ्ठा म्हणण्यासारखेच आहे :) -(साकिया) सोकाजी

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 03/07/2013 - 01:05

In reply to बीयर दारु मानत नाही काय by सोत्रि

Permalink

बीयरला दारू म्हणणे

बियर मध्ये ५-१०% अल्कोहोल असते. आणि (रम किंवा व्हिस्की मध्ये ४०-५०%) पण बियर हि पेग(३०-६० मिली) मध्ये न घेता बाटलीने प्यायली जाते (६५० मिली )त्यामुळे साप म्हणू नये धाकला या उक्तीनुसार ती पण तितकीच वाईट आहे

Submitted by सूड on Wed, 03/06/2013 - 00:27

Permalink

छान माहिती. पण या सहजावस्थेत

छान माहिती. पण या सहजावस्थेत गेलेल्या लोकांमुळे सजगावस्थेत असलेल्यांची जी काही करमणूक होते त्याला तोड नाही.

Submitted by सूड on Wed, 03/06/2013 - 00:27

Permalink

छान माहिती. पण या सहजावस्थेत

छान माहिती. पण या सहजावस्थेत गेलेल्या लोकांमुळे सजगावस्थेत असलेल्यांची जी काही करमणूक होते त्याला तोड नाही.

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/06/2013 - 01:22

Permalink

दारूचे जाणकार सोत्रिअण्णा

दारूचे जाणकार सोत्रिअण्णा लिहिताहेत म्हंजे योग्यच अष्णार-प्रष्णच नै. पण काही खुस्पटवजा शंका: भारताच्या जण्रल हवामानाकडे पाहिल्यास दारू पिणे ही गरज वाटत नाही. तुमचे मत काय? आणि पिऊन झिंगणार्‍यांचा उपद्रव सहन करणे ही लै तिडीक आण्णारी गोष्ट असते. असो. भोगल्यामुळे मते टोकदार होणारच. (दारू न पिणारा पण सोमरस कधीकाळी प्यायची इच्छा बाळगून असलेला) बॅटमॅन.

Submitted by पिंपातला उंदीर on Wed, 03/06/2013 - 10:09

In reply to दारूचे जाणकार सोत्रिअण्णा by बॅटमॅन

Permalink

उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन

उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन झींगण्ाची गरज आहेच असे काही नाही. उप्द्रव मूल्य असणारे लोक तो देतात्च. मग पिलेले असोत वा नसोत : )
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Wed, 03/06/2013 - 11:09

In reply to उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन by पिंपातला उंदीर

Permalink

उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन

उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन झींगण्ाची गरज आहेच असे काही नाही. उप्द्रव मूल्य असणारे लोक तो देतात्च. मग पिलेले असोत वा नसोत : )
न पिता उपद्रव देणार्‍याला तिथच ठोकुन काढता येते. पिउन उपद्रव देणार्‍याचे भान जागेवर असेलच याची शाश्वती नसल्याने ठोकुन काढुन (त्या वेळि तर) फरक फारसा पडत नाही. उलट ऐन कामाच्या वेळेत आपल्यालाही थोडी घ्याविशी वाटु शकते. ज्याचे नियत्रण होइलच असे नसल्याने आपलाही वेळ वाया जातो.

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/06/2013 - 11:56

In reply to उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन by अग्निकोल्हा

Permalink

+१११११११११.

+१११११११११. मद्याला शिव्या उगीच घातल्या जात नाहीत. बाकी कोणी काही म्हणो.

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 03/31/2013 - 20:50

In reply to +१११११११११. by बॅटमॅन

Permalink

हवामान हरडे!

काका, अहो हवामाण पाहून दारू प्याया लगल्यास कसे व्हावे? आपल्या 'आदिवासी' संस्क्रूतीत (म्हंजी कसं, की मूळ रहिवासी इत्यादी. आजकाल त्यास्नी वनवासी म्हनायची फ्याशन हाये) बारसं करतानी बाळाच्या व्हटाला दारू लावत्यात. लै वंगाळ बगा! हितलं हवामान वाईट म्हनाय्चं का?

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/02/2013 - 14:08

In reply to हवामान हरडे! by आनंदी गोपाळ

Permalink

आजोबा,

आजोबा, हवामाणाचा अण दारूचा काही घट्ट संबंध आहे असे माझे ठाम मत नसूण ती एक शंका आहे. बाकी दारुड्यांचा तिटकारा आणि तिरस्कार तर मला आहेच आणि याबद्दल मी फुकाचा वाद घालू इच्छित नाही.

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 03/31/2013 - 20:48

In reply to उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन by अग्निकोल्हा

Permalink

न पिता उपद्रव देणार्‍याला तिथच ठोकुन काढता येते.

अमक्या तमक्यांच्या नंदनवनात रहाता का हो तुम्ही? तुमच्या गल्लीतले ४ टुक्कार. वार्डाचा महा/नगरसेवक, मोहोल्ल्याचा आमदार, हापिसातला बॉस, बायको.. एण्डलेस यादी आहे. या सगळ्यांना उपद्रव दिला म्हणून ठोकून काढता का तुम्ही? वॉव!!

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 03/06/2013 - 09:18

Permalink

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती,दारुच्या उदात्तीकरणाच्या प्रयत्नांचा निषेध. दारु पिणारी व्यक्ती ही अगोदर स्माल पॅक म्हणुन पिते,व ति पिउन झिंगल्यावर गटारीत पडेस्तोवर पिते व वर जाते. एक जोकः:बायको : काय हो, तुम्ही म्हणाला होता न कि उगाच दारू पिणार नाही म्हणून, मग … नवरा : अग दिवाळी नाही का ….. बायको : हो का? दिवाळीचा अन् दारू प्यायचा काय संबध? .नवरा : रॉकेट उडवायला बाटली नको का?

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 03/31/2013 - 20:54

In reply to व्यक्ती तितक्या प्रवृत्ती by श्री गावसेना प्रमुख

Permalink

स्माल पॅक

"स्मॉल पेग." बाकी चालू द्या. *** धर्म ही अफूची गोळी आहे म्हणे. स्वाक्षरीत धर्म लिहिलेला दिसला. अफू चांगली की दारू? झोडग्यात काय पितात?

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Mon, 04/01/2013 - 09:23

In reply to स्माल पॅक by आनंदी गोपाळ

Permalink

ठन ठन पाळ

ठन ठन पाळ

Submitted by पिंपातला उंदीर on Wed, 03/06/2013 - 10:06

Permalink

असले जबरी लेख वाचायला पूर्व

असले जबरी लेख वाचायला पूर्व जन्माची पुण्याई लागते. दारू पिण्याबद्दल अपराध गंड नसणार्‍या लोकांबद्दल मला खतरनाक आदर आहे. सोत्रि हे अशा मोजक्या लोकांपैकी एक. Respects : )
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 04/01/2013 - 13:04

In reply to असले जबरी लेख वाचायला पूर्व by पिंपातला उंदीर

Permalink

हेहेहेहे

दारू पिण्याबद्दल अपराध गंड नसणार्‍या लोकांबद्दल मला खतरनाक आदर आहे
रोज कमीतकमी असे ५० नग दाखवेन. मोजके बिजके काही नाही. मलाच अपराध गंड वाटतो त्यांना बघून. :( आणि हे सोत्रीनानाबद्दल पूर्ण आदर बाळगून सांगतो. नानांचे पिणे हा अल्लग विषय आहे. त्यांची या विशयाची माहीती आणि ज्ञान जबरा आहे. मला पण त्यांनी मेन्शन केलेले बरेचसे ब्रॅन्ड आणि कॉकटेल्स माहीत नसतात.

Submitted by ऋषिकेश on Wed, 03/06/2013 - 10:22

Permalink

आभार!

चला! एक महत्त्वाचा दस्तैवज हाती लागला आहे. आता या विषयात (स्वानुभवशुन्य) शायनिंग मारता येईल ;)

Submitted by दादा कोंडके on Fri, 03/08/2013 - 23:10

In reply to आभार! by ऋषिकेश

Permalink

हेतू सफल.

आता या विषयात (स्वानुभवशुन्य) शायनिंग मारता येईल ;)
'मी दारू पितो' असं म्हणून शायनिंग मारणार्‍यांपेक्षा 'मी दारू पित नाही' असं म्हणून शायनिंग मारणारेच दिसतात. ;)
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Wed, 03/06/2013 - 10:33

Permalink

रॉकिंग सोकाजी.

चिज सोबत घेतल्याने लिव्हर वाचते (व कमी चढते), रममधे थोडसं पाणी मिसळुन पिल्यास शरीराला कमी बादते हे खरं आहे काय ?

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 03/07/2013 - 10:28

In reply to रॉकिंग सोकाजी. by अग्निकोल्हा

Permalink

दारू आणि यकृत

चीज सोबत घेतल्याने लिव्हर वाचत नाही पण चीज मध्ये प्रथिने आणि चरबी असल्याने दारू चे शरीरात शोषण हळू होते आणि दारू कमी चढते.तसेच रम मध्ये पाणी मिसळल्याने होते. शिवाय रम( किंवा व्हिस्की) मधील अल्कोहोल चे प्रमाण जास्त असल्याने ती तोंडाला घशाला आणि अन्ननलिकेला जाळत जाते ती आग कमी करण्यासाठी त्यात पाणी मिसळले जाते.

Submitted by भीडस्त on Wed, 03/06/2013 - 11:00

Permalink

दारू पुराण

ऐसा दाखिला देतो की मिपास्थित अद्वितीय आद्य धुरीण सकल जाणकार मद्याचार्य सोत्रिश्वर स्वामी विरचित मद्यमहतीपुराण याचा नवीन अध्याय मनास उन्मनी अवस्थेत नेण्यात यशस्वी झाला असे अवांतर कोणत्याही शर्कराजन्य धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे शर्कराजन्य-इथे शर्करायुक्त आणि अल्कोहोल- इथे ईथाईल अल्कोहोल हे अजून उचित वाटावे. लिखाण विज्ञानाधिष्टीत असल्याने हे धार्ष्ट्य करतो आहे. (सोकांजीसमवेत मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी पिण्याची आस असणारा)रिंद
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 03/06/2013 - 13:15

In reply to दारू पुराण by भीडस्त

Permalink

धन्यवाद! योग्य ते बदल करतो

धन्यवाद! योग्य ते बदल करतो लवकरच.दुरूस्तीबद्दल आभार. -(आभारी) सोकाजी

Submitted by चिगो on Wed, 03/06/2013 - 12:48

Permalink

मस्त लेख..

दारुपुराण आवडले, सोत्रिनाना.. (दारु आवडणारा) चिगो

Submitted by शिद on Wed, 03/06/2013 - 13:20

Permalink

मस्त लेख...

त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते.
१००% सहमत. अवांतरः मागच्या रविवारीच सुहास शिरवळ्करांचे "झिंग" हे अप्रतिम पुस्तक वाचुन संपवले. दारु पिणार्‍याने व न पिणार्‍याने एकदातरी वाचण्याजोगे असे पुस्तक आहे.

Submitted by चिगो on Fri, 03/15/2013 - 23:21

In reply to मस्त लेख... by शिद

Permalink

माफ करा..

मागच्या रविवारीच सुहास शिरवळ्करांचे "झिंग" हे अप्रतिम पुस्तक वाचुन संपवले. दारु पिणार्‍याने व न पिणार्‍याने एकदातरी वाचण्याजोगे असे पुस्तक आहे.
माफ करा, पण तुम्हाला 'झूम' म्हणायचं आहे का? बाकी पुढच्या वाक्याशी पुर्णपणे सहमत आहे.. अर्पणपत्रिकाही मस्त आहे ह्या पुस्तकाची..

Submitted by शिद on Mon, 03/18/2013 - 16:04

In reply to माफ करा.. by चिगो

Permalink

धन्यवाद चिगो...!!!

बरोबर...'झूम' असेच लिहायचे होते पण पुस्तकाच्या नशेपायी बहुतेक 'झिंग' असे लिहीले गेले असावे. :)

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 03/21/2013 - 10:05

In reply to धन्यवाद चिगो...!!! by शिद

Permalink

हा हा हा!

झूमची झिंग आहेच तशी! :) -(दादा करमरकरांच्या तावडीतून सुटलेला) धमाल शेरिफ.

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 03/06/2013 - 16:29

Permalink

निसरडी वाट आहे म्हणुन

निसरडी वाट आहे म्हणुन त्याच्या वाटेला न गेलेलेच बरे असा विचार लोक करतात. उगाच रिस्क नको!

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 03/07/2013 - 00:50

Permalink

दारू आणि दांभिकपणा

दारू पितो तर ती मजेसाठी हे सांगण्याचा प्रामाणिकपणा असावा. पार्टी मध्ये घ्यावी लागते, कंपनी म्हणून घेतो असा दांभिकपणा असू नये. मोलकरणीच्या नवर्याने प्यायली तर दारू आणि आपल्या जावयाने घेतली तर ती ड्रिंक्स असा दांभिकपणा(hippocracy) नसावा. दारू पिण्यापेक्षा त्याच्याबद्दलचा दांभिकपणा हा वाईट आहे. दारू हि दारूच असते. विषारी साप हा नाग असो मण्यार असो कि फुरसे अथवा घोणस असो चावल्यावर विषबाधा होणारच तद्वतच दारू हि कोणत्याही स्वरुपात प्या अपाय होणारच. या बदलाचा एक किस्सा मला आठवतो. १९८८ साली अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयाच्या समारंभात एक कमांडर बढाई मारत होता कि ५ पेग पिउन सुद्धा मला दारू चढत नाही. त्यावर आमचे एक वरिष्ठ डॉक्टर त्य्याला म्हणाले कि चढत नाही तर दारू पितोस कशाला ?पैसे कशाला फुकट घालवतोस?. मी दारू नाश येण्यासाठी पितो. नशा येत नसेल तर दारू पिउ नये. कोणत्याही हवामानात दारू पिणे मुळीच आवश्यक नाही. थोडी दारू प्यायली तर ती तुमच्या यकृतात जाळली जाते आणि त्याचे रुपांतर असेटिक आम्लात होते जे पुढे परत जाळून कैलरीमध्ये रुपांतर होते आणि त्यातील इथेनॉल रक्तापर्यंत पोचत नाही म्हणून त्याची नशा येत नाही.तुमच्या यकृतात अल्कोहोल डीहायड्रोजनेज म्हणून विकर(एन्झाईम) असते ते हि अल्कोहोल जाळण्याची प्रक्रिया करते. हि प्रक्रिया एका विशिष्ट वेगाने होते आपणा कितीही दारू प्या त्याचे ज्वलन एकाच वेगाने होते (० ओर्डर कायनेटीक्स) जेंव्हा दारूचे प्राशन या पेक्षा जास्त वेगाने होप्ते तेंव्हा ती यकृत पार करून रक्तात मिसळू लागते आणि त्याचे परिणाम आपल्याला जाणवू लागतात.म्हणून एक पेग पिउन नाश आली म्हणणार्यांना दारूची नव्हे तर त्या वातावरणाची किंवा आपण दारूपितो आहोत या विचाराची नशा येते.आपण जेंव्हा अधिक दारू पिता तेंव्हा याहून जास्त अल्कोहोल रक्तात मिसळते आणि ते आपल्या मेंदूवर प्रभाव दाखवू लागते. सुरुवातीला आपल्याला जास्त आरामदायी आणि हलके हलके वाटू लागते, मेंदूतील चिंतेचे केंद्र कमी काम करू लागते त्यामुळे आपल्याला जास्त आत्मविश्वास वाटू लागतो.(म्हणून दारू पिउन माणसे जोरात वाहन चालवितात). मनाची ताबा ठेवणारी उच्च क्न्द्रे शिथिल होतात म्हणून माणूस ज्या गोष्टी जागेपणी करणे शक्य नाही त्या नशेत करता येतील असा विश्वास बाळगतो.स्त्रीयांबद्दलचे वर्तन आपली चाकोरी सोडून जाऊ लागते (आउट ऑफ कंट्रोल).आणि माणसाची कामेच्छा उद्दीपित होते अजून दारू प्यायली तर मेंदू ची सर्वच केंद्रे शिथिल होऊ लागतात आणि त्याला झोप येऊ लागते. त्याच्या विचारांवरील ताबा सुटतो तारतम्य बाळगणारे केंद्र नीट काम न केल्याने माणूस नको ते आणि नको तिथे बोलू लागतो.अजून दारू रक्तात पोहोचली तर माणूस उभा राहणे कठीण होते कारण त्याचा स्वतःच्या स्नायु वरचा ताबा जातो आणि तो झिंगून पडतो.दारूचे रक्तातील प्रमाण जसे वाढते तसे त्या प्रमाणात ते तुमच्या फुप्फुसातून आणि मूत्रातून ते बाहेर टाकले जाते. म्हणून श्वासाला दारूचा वास येऊ लागतो.हेच प्रमाण मोजून माणूस किती दारू च्या नशेत आहे ते पोलिस ठरवतात.दारू पिण्याचा सर्वात जास्त फायदा ते बनविणाऱ्या कंपनीला आणि त्यानंतर सरकारला(अबकारी कराद्वारे होतो). पिणाऱ्या माणसाला होणार्या शारीरिक फायद्याच्या कितीतरी पटीने तोटाच होतो.वाईन मध्ये हृदयाचे संरक्षण करणारे रिझवाट्रोल नावाचे द्रव्य असत ते मूळ काळ्या(लाल) द्राक्षात असते ते वाईन मध्ये उतरते बनवण्याच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. तेंव्हा हृदयरोग टाळायचा असेल तर द्राक्षे खा की. उगाच प्रकृतीचे कारण देऊन वाईन पितो हा दांभिकपणा कशासाठी? मी दारू नशेसाठी पितो हे सांगण्याची हिम्मत असावी. लष्करात २३ वर्षे काढून दारूच्या थेम्बास स्पर्श न केलेला माणूस माझ्या रोजच्या पाहण्यात आहे. मी जेंव्हा रोज सकाळी मला स्वतःला आरशात पाहतो तेंव्हा. अर्थात दारू पिणारी माणसे वाईट असतात असे माझे मुळीच म्हणणे नाही. माणसे मुळात चांगली किंवा वाईट असतात दारूने काही फरक पडत नाही. बाकी पुढला भाग उद्या.

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 03/07/2013 - 01:17

In reply to दारू आणि दांभिकपणा by सुबोध खरे

Permalink

अनेक धन्यवाद

या सविस्तर प्रतिसादाद्वारे आपण माझ्या मनातील अनेक प्रश्नांची समजतील व पटतील अशी उत्तरे दिली आहेत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद!! यापुढे असे प्रश्न इतर कुणी विचारल्यास या प्रतिसादाचा दुवा पाठवून देईन.

Submitted by अमोल खरे on Sun, 03/10/2013 - 12:15

In reply to दारू आणि दांभिकपणा by सुबोध खरे

Permalink

ह्या वरच्या प्रतिसादाला केवळ

ह्या वरच्या प्रतिसादाला केवळ एकमेव नाव आहे. "अप्रतिम". दारु कशी वाईट नाही हे सांगायचा अट्टाहास ह्या लेखात वाटला. तो सुबोधदादाच्या प्रतिसादाने कमी होईल असं वाटतं. दारु ही वाईटच असते. माझा दारु पिणा-यांना एक सिंपल प्रश्न असतो. हाच प्रश्न मागे मिपावर एकाने विचारला होता. मी तोच प्रश्न सगळ्यांना विचारतो. उत्तर अर्थातच "नाही" असंच येतं. प्रश्न असतो की "तुम्हाला दारु मध्ये काही प्रॉब्लेम वाटत नाही ना, मग तुमच्या मुलांना द्याल का ?" आधी सांगितल्याप्रमाणे उत्तर हमखास "नाही" हेच येते. दारुने हातात सत्यानाश सोडुन काही येत नाही. त्या वाटेला अजिबात जाऊ नये हेच उत्तम.
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sun, 03/10/2013 - 15:21

In reply to ह्या वरच्या प्रतिसादाला केवळ by अमोल खरे

Permalink

??

दारु कशी वाईट नाही हे सांगायचा अट्टाहास ह्या लेखात वाटला
नेमका कुठे आणि कसा वाटला हा अट्टाहास ते सांगाल का? कारण दारू म्हणजे नेमके काय हे सांगून ती चांगली की वाईट हे व्यक्तिसापेक्ष असावे हे सांगायचा अट्टाहास होता ह्या लेखात. तुमच्या सिंपल प्रश्नाचे उत्तर इथे आहे. - (कसलाही अट्टाहास न धरणारा) सोकाजी

Submitted by सुबोध खरे on Sun, 03/10/2013 - 21:24

In reply to ?? by सोत्रि

Permalink

दारू-चांगली की वाईट

सोत्री साहेब दारू प्यावी कि न प्यावी हा पूर्णपणे स्वतः चा प्रश्न आहे. दारू पिण्याचे उदात्तीकरण नको तसेच दारू न पिण्याचा अहंगंड सुद्धा नको. केवळ मी आयुष्यभर दारू नाही प्यायली (२३ वर्षे लष्करात आणि त्यातील ५ वर्षे गोव्यात राहूनही)म्हणून मी स्वतःला श्रेष्ठ मानणे हा सुद्धा दांभिकपणा आहे असे मी मानतो.स्वतः वर ताबा ०,१ २ कि ४ पेग ने ठेवायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे डॉक्टर म्हणून दारूचे दुष्परिणाम यथातथ्य पणे लोकांसमोर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. फक्त एक कळकळीचा सल्ला म्हणून मी एवढेच म्हणेन कि ज्या भगिनी आपल्याला मुल होण्याच्या तयारीत(planning for pregnancy) आहेत त्यांनी मुलाला दुध पाजत असे पर्यंत दारूला अजिबात स्पर्श करू नये. कारण आपण केंव्हा गरोदर होणार हे पाळी चुकल्याशिवाय सांगता येत नाही आणि न जन्मलेल्या किंवा नवजात मुलाच्या नाजूक मेंदूवर एका पेगचा सुद्धा अतिशय वाईट परिणाम होतो.

Submitted by निनाद मुक्काम … on Mon, 03/18/2013 - 13:59

In reply to दारू-चांगली की वाईट by सुबोध खरे

Permalink

डॉक्टर साहेब

डॉक्टर साहेब तुम्ही लग्न प्रसंगी किंवा इतर आनंदाच्या क्षणी लोक गोड पदार्थ जसा जास्तच खातात , तेव्हा भर पंगतीत जिलब्या किंवा लाडवांचं फन्ना उडवणाऱ्या गृहस्थाला तुम्ही तुमच्या व्यवसायाची नैतिक जबाबदारी समजून मधुमेहावर प्रवचन देतात का हो , उद्या कोल्हापुरात जाऊन पंधरा व तांबडा रस्सा होर्पनार्या भल्या गृहुस्थाला अल्सर वर प्रवचन देणार का तुमची नैतिक ...... अति तेथे माती हा जगमान्य नियम सर्वांचा माहिती आहे. गर्भवती महिलांना दारूच नव्हे तर अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवायचे असते व अनेक प्रकारच्या काळज्या घ्याव्या लागतात , आता दारूचा मुद्दा आहे म्हणून तुम्ही येथे कळकळ मांडली , पण माझ्या माहितीत मी खात्रीने सांगतो , येथील महिला मिपाकर व मुक वाचक ह्या सुविद्य आहेत व त्यांना गर्भारपणात काय घ्यावे व काय घेऊन नये हे सांगणारे नातलग किंवा इंटरनेट आहे, व माझ्या मते त्यांना गर्भवती झाल्यावर डॉक्टरांच्या कडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार वागायचे एवढी समज नक्कीच आहे , तुमचे येथे हा कळ कळीचा मुद्दा नेमका कोणासाठी होता व तो येथे मांडण्यासाठी तुम्हाला गरज का वाटले हे समजू शकले नाही , किंबहुना आपण दारू पीत नाही व आपल्या व्यवसायाने आपल्याला प्रवचन देण्याचा मक्ता दिला आहे असा तुमचा समज झाला आहे का लोकांना सिगारेट व दारू ह्यांच्या सेवनाने किंवा अतिसेवनाने काय दुष्परिणाम होतात हे चांगले माहिती आहे, उगाच दारूचे उदात्तीकरण व त्यानंतर सल्ले अशी पुस्तकी व नाटकी भाषा कृपया येथे लिहू नका. ये पब्लिक हे , ये सब जान ती हे .

Submitted by सुबोध खरे on Mon, 03/18/2013 - 19:43

In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …

Permalink

ये पब्लिक हे , ये सब जान ती हे

जर पब्लिक ला सर्वच माहित असेल तर डॉक्टर काय किंवा वकील काय किंवा कोणताही सल्लागार (उदा.कर सल्लागार)याची गरजच नाही.

माझ्या मते त्यांना गर्भवती झाल्यावर डॉक्टरांच्या कडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार वागायचे एवढी समज नक्कीच आहे--

दुर्दैवाने सर्वच स्त्रियांची पाळी वेळेवर येतेच असे नाही त्यामुळे आपल्याला असे अनेक वेळा दिसते कि पाळी पुढे मागे झाल्याने स्त्रिया औषधे घेतात किंवा एक्स रे करून घेतात आणि नंतर त्यांना कळते कि आपण गरोदर आहोत. यानंतर ते मुल ठेवावे कि नाही याच्या विचित्र संभ्रमात त्या पडतात. अशी पाली येऊ नये म्हणून आपण जर मुल होण्याचे ठरवत असाल तर दारू पिऊ नका असा सल्ला जर मी दिला तर त्यात फार काही आगाऊ पण केला असे मला वाटत नाही. गेली २२ वर्षे मी सोनोग्राफी करीत आहे आणि अशा अनेक स्त्रिया मी पाहत आलो आहे म्हणून मला असे लिहावे असे वाटले. जर लोकांना असे वाटत असेल कि हा माणूस आगाऊ पण करीत आहे तर मी येथेच थांबतो.लग्नात कोणी काय खावे किंवा कोल्हापुरात कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते मत मांडण्याचे ठिकाण नाही. पण मिसळपाव हे सर्वजणांना आपले मत मांडण्याचे एक मुक्त व्यासपीठ आहे असा माझा समज( कदाचित गैरसमज) आहे. जर आपल्याला माझा सल्ला हा शब्द खटकला असेल तर मी आपली माफी मागतो.

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 03/18/2013 - 20:24

In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …

Permalink

आँ?

किंबहुना आपण दारू पीत नाही व आपल्या व्यवसायाने आपल्याला प्रवचन देण्याचा मक्ता दिला आहे असा तुमचा समज झाला आहे का
का बुवा?? काहीही माहिती नसताना उगाच फुकट सल्ले देत कितीतरी जण फिरतात इथे.. तेव्हा नाही तुम्हाला हे लिहावं वाटलं? त्यांनी विषय निघाला म्हणुन लिहिलं तेही सामाजिक कळकळीतुन.. काय चुकलं बुवा? असो.. असतो प्रत्येकाचा चष्मा!!

Submitted by बॅटमॅन on Mon, 03/18/2013 - 20:24

In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …

Permalink

-११११११११११११११.

प्रतिसाद आजिबातच पटला नै निनादराव. कोल्लापुरात एकट्या माणसाने तांबडा-पांढरा हादडला म्हणून काही विकार झाला तर त्याला एकट्यालाच होतो. पण गर्भवती बाईने काही अर्बट-चर्बट खाल्ले तर त्याची झळ बाळालासुद्धा लागते. डॉक्टरसाहेबांनी उपयुक्त माहिती सांगितली आहे. कमीत कमी त्यांचा हेतू प्रामाणिक आहे हे लक्षात घ्या. उगीच डिस्करेज का करताय त्यांना? इथे प्रवचन वगैरे कोण देतंय??? मेडिकल शास्त्रानुसार जे आहे ते साध्या, प्रसंगी रोखठोक शब्दांत सांगितलं तर त्याला प्रवचन म्हणणं ही तर तर्कदुष्टतेची परमावधी झाली.

Submitted by सुबोध खरे on Mon, 03/18/2013 - 20:33

In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …

Permalink

सर्जन जनरल(अमेरिका) चा सल्ला

http://www.surgeongeneral.gov/news/2005/02/sg02222005.html We do not know what, if any, amount of alcohol is safe. But we do know that the risk of a baby being born with any of the fetal alcohol spectrum disorders increases with the amount of alcohol a pregnant woman drinks, as does the likely severity of the condition. And when a pregnant woman drinks alcohol, so does her baby. Therefore, it's in the child's best interest for a pregnant woman to simply not drink alcohol." In addition, studies indicate that a baby could be affected by alcohol consumption within the earliest weeks after conception, even before a woman knows that she is pregnant. For that reason, the Surgeon General is recommending that women who may become pregnant also abstain from alcohol.

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com