Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Mon, 09/26/2011 - 17:34
लेखनविषय (Tags)
देशांतर
जीवनमान
तंत्र
भूगोल
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
: विमानाच्या वेगाबाबतीत एक फंडा क्लिअर करुन घेऊ. विमानाचा वेग म्हणजे त्याच्या कॉकपिटात दाखवला जाणारा वेग. हा वेग हवेशी रिलेटिव्ह असतो. विमान हवेला मागे ढकलून पुढे जातं.. जमिनीला नव्हे.. त्यामुळे मागे जाणार्‍या हवेचा स्पीड म्हणा किंवा हवेच्या तुलनेत पुढे सरकणार्‍या विमानाचा स्पीड म्हणा, हाच विमानाचा स्पीड असतो. त्याला ट्रू एअरस्पीड म्हणतात. पण आपल्याला प्रवास तर जमिनीवरच्या ठिकाणांमधे करायचा असतो. त्यामुळे आपल्याला विमानाचा ग्राउंड स्पीड, अर्थात जमिनीशी रिलेटेड स्पीड काढणं भाग असतं. समजा मुंबई गोवा एरियल अंतर ६०० किलोमीटर असेल. आणि समजा विमानाचा ट्रू एअर स्पीड ३०० किलोमीटर प्रतितास असेल. अशा वेळी वारा साफ बंद असेल, तर विमान दोन तासात गोव्याला पोहोचेल. म्हणजे एअरस्पीड आणि ग्राउंड स्पीड एकच असेल. जर समोरुन शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारा असेल तर ग्राउंड स्पीड (३०० उणे १००) २०० किलोमीटर प्रतितास इतका कमी होईल आणि विमानाला पोचायला तीन तास लागतील. जर पाठीकडून असाच वारा असेल तर विमान ४०० किमी प्रतितास अशा वाढीव ग्राउंडस्पीडने दीड तासातच गोव्याला पोहोचेल. तसं वर दिलेलं गणित साधंच आहे. प्रत्यक्षात पायलटला प्रत्यक्ष वार्‍याचा वेग आणि दिशा बघून बरंच गणित करावं लागतं. वारा बरोब्बर समोरुन किंवा पाठीकडून नसतोच. त्याचा विरोध किती होईल त्याप्रमाणे वेग आणि उडण्याचे अँगल बदलले जातात. विमान वर उचललं जातं ते पंखांवर तयार होणार्‍या हवेच्या "लिफ्ट"मुळे, एवढं सगळ्यांनाच माहीत असतं. पंख जोरात हवेतून पुढे जातो तेव्हा त्याच्या एरोफॉईल आकारामुळे त्याच्या खालून हवा वर दाब देते. हा दाब विमानाला हवेत उचलून धरण्याएवढा जोरदार हवा असेल तर पंख हा किमान एका वेगाने हवेतून सरकत राहिला पाहिजे. या वेगापेक्षा कमी वेग झाला की लिफ्ट पुरेशी मिळणार नाही आणि पंख (अर्थात विमान) खाली कोसळणार. म्हणजेच "स्टॉल" होणार. या विमान हवेत राहण्यासाठी आवश्यक अशा किमान वेगाला "स्टॉलिंग स्पीड" म्हणतात. समजा तुमच्या विमानाचा स्टॉलिंग स्पीड दोनशे किलोमीटर प्रतितास आहे, तर फ्लाईटच्या कोणत्याही स्टेजमधे (जमिनीवरील चालणे वगळून) तुम्हाला २०० पेक्षा कमी स्पीड करता येणार नाही. अर्थात स्टॉलिंग स्पीड हा ट्रू एअरस्पीड असतो. ग्राउंड स्पीड नव्हे. तात्विकदृष्ट्या तुम्ही शून्य ग्राउंडस्पीडमधे आकाशात टिकू शकाल (विमानाच्या एअरस्पीडइतकाच वारा समोरुन येत असेल तर) पण ट्रू एअरस्पीड स्टॉलिंग स्पीडच्या जराही खाली गेला की कपाळमोक्षच. त्यामुळे विमान फास्ट चालवू नको रे म्हणण्याऐवजी "स्लो नको रे चालवू. मरायचंय का?" असं म्हणावं लागतं. रनवेच्या भोवती विमान ज्या मार्गाने उडतं त्याला सर्किट पॅटर्न म्हणतात. सर्किट पॅटर्न हा सर्व एअरपोर्टसमधे जवळजवळ सारखाच असतो. एखाद्या एअरपोर्टच्या रनवेची दिशा ठरवताना त्या जागी वारा कसा वाहतो याचं अनेक वर्षांचं रेकॉर्ड पाहतात. विमानाचा टेकऑफ आणि लँडिंग, दोन्हीही वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं. कारण.. ? वर म्हटल्याप्रमाणे विमानाचे सर्व स्पीड हे हवेशी रिलेटिव्ह असतात. टेक ऑफसाठी आवश्यक स्पीडसुद्धा.. रनवेची लांबी अर्थातच मर्यादित असते. त्यामुळे वारा समोरुन येत असला तर ट्रू एअरस्पीडच्या मानाने ग्राउंड स्पीड कमी राहतो आणि रनवेवरची कमी लांबी खर्च होऊन लवकर टेकऑफ होतो. एरवी विमान रनवेच्या दुसर्‍या टोकाशी जाऊन कदाचित ठोकरग्रस्त झालं असतं. लँडिंगही याच, पक्षी वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं, कारण समोरुन येणार्‍या वार्‍याने लँडिंग झाल्यावर ग्राउंड स्पीड कमी होतो आणि विमान कमी अंतरात थांबतं.. रनवे जरी वार्‍याच्या हिस्टॉरिक दिशेवरुन बांधत असले, तरी वार्‍याची दिशा बदलत राहतेच. विशेषतः हवामान खूप बदललं की वार्‍याची दिशा उलटही होते. अशावेळी रनवे तर हलवता येत नाही.. मग टेकॉफ आणि लँडिंगची दिशा उलटी केली जाते. मुंबईवासी विमानप्रवाशांनी किंवा नागरिकांनी खूपदा पाहिलं असेल की बर्‍याचवेळा घाटकोपरकडून लँडिंग करणारी आणि टेकॉफनंतर जुहू चौपाटीवर वर चढताना दिसणारी विमानं अचानक दिशा बदलून चौपाटीच्या दिशेने उलट लँडिंग करायला खाली येऊ लागतात. आणि टेकॉफनंतर ती जुहू ऐवजी घाटकोपर कुर्ल्यावर दिसतात. यालाच रनवे बदलला असं म्हणतात. मुंबई कंट्रोल टॉवर सर्व विमानांना "रनवे इन यूज" अशा नावाखाली नेहमीच याक्षणी कोणत्या बाजूने रनवे वापरात आहे हे सांगत असते. आता सर्किट पॅटर्न पाहू.. इथे मी लेफ्ट साईडेड सर्किट पॅटर्न दाखवला आहे. २७ आणि ०९ हे रनवे नंबर्स आहेत. रनवे नंबर म्हणजे त्या रनवेचं तोंड ज्या बाजूला आहे ती दिशा. २७० डिग्री म्हणजे पश्चिम दिशा. त्यातलं शेवटचं शून्य काढून पहिले दोन आकडे वापरले जातात. त्याचप्रमाणे ०९ म्हणजे ९० डिग्री, अर्थात पूर्व दिशा. या सर्किट पॅटर्नमधे आपण ०९ रनवे वापरुन सर्किट पॅटर्न दाखवला आहे. पूर्वेला तोंड करुन टेकऑफ घेतला जातो. टेकॉफनंतर नाकासमोर वर चढत जाण्याच्या भागाला अपविंड लेग म्हणतात. अपविंड लेगमधून सरळ नाकासमोर एक्झिट घेऊन ठराविक उंची गाठायची आणि मग आपल्या गन्तव्यस्थानाची दिशा सेट करुन तिकडे तोंड वळवायचं, अशी एक एक्झिटची पद्धत आहे. किंवा मग काही ठिकाणी वर चढताचढताच डावीकडे वळून क्रॉसविंड लेग ही रेषा जॉईन केली जाते. क्रॉसविंड लेगमधून डावीकडे ४५ डिग्रीत एक्झिट घेण्याचा आणखी एक प्रकार आहे. आता एक पूर्ण सर्किट करुन पाहूया.. अशी एकामागून एक सर्किट्स उड्डाण शिकताना केली जातात. त्यामुळे टेकॉफ आणि लँडिंगसहित सर्वच प्रकारची उत्तम प्रॅक्टिस होते. टेकऑफ घेतला.. अपविंडमधे एक हजार फुटापर्यंत वर चढत गेलो. मग काटकोनात पण स्मूथ असं डावीकडे वळण घेतलं. क्रॉसविंड जॉईन केला.. दोन हजार फुटांची उंची गाठली. पुन्हा डावं वळण घेऊन रनवेला समांतर पण उलट दिशेत प्रवास सुरु केला. दोन हजार फुटांवर इंजिन पॉवर अ‍ॅड्जस्ट करुन विमान स्थिर केलं. आता रनवे आपल्या डाव्या हाताला दिसतोय. इथे आपण कंट्रोल टॉवरला रेडिओवर सांगतो. उदा. "पुणे, व्हिक्टर किलो अल्फा ऑन लेफ्ट डाउनविंड जीरो नाईन.." म्हणजेच अहो पुणे टॉवरवाले काका, मी रनवे ०९ च्या डाव्या डाउनविंड लेगमधे आहे. टॉवर आपल्याला सांगतो:" व्हि़क्टर किलो अल्फा, पुणे... रिपोर्ट ऑन फायनल्स.." म्हणजे जेव्हा फायनल लेगला पोचाल तेव्हा सांगा. डाउनविंड लेगमधे आपण रनवे पार करुन थोडे पुढे गेलो की साधारण आपल्याला रनवेचं ०९ टोक "एट ओ क्लॉक" पोझिशनमधे दिसायला लागतं, असा एक पॉईंट येतो. या ठिकाणी पुन्हा स्मूथली डावं वळण घ्यायचं. याच सुमारास इंजिन पॉवर आयडल किंवा बंद करायची. त्यामुळे विमान खाली उतरायला लागतं. उतरत उतरत आणि वळत वळत क्रॉसविंडच्या उलट दिशेत असलेल्या "बेस लेग" नावाच्या रेषेला जॉईन व्हायचं. बेस लेगला काटकोनात असलेला लेग म्हणजे फायनल लेग. उतरणं चालूच आहे. फायनल लेगमधे आलात की दूर रनवे तुमच्या नाकासमोर दिसेल. रनवेच्या सेंटरलाईनशी विमानाचं नाक लावून धरत उतरणं चालू ठेवायचं. गरजेनुसार उतरण्याचा रेट वाढवायचा. रनवेचा आकडा हे आपलं टचडाऊन करण्याचं टारगेट असलं पाहिजे. त्याच्या आधी टच केलं तर अंडरशूट झालात, म्हणजे दगडधोंड्यात थेट घुसलात.. त्या टार्गेटच्या पुढे गेलात तर ओव्हरशूट..मग टचडाऊन झाल्यावर रनवेची उरलेली लांबी तुम्हाला पुरणार नाही. अशा दोन्ही वेळी लँडिंग म्हणजे क्रॅशच.. (मेंगलोर क्रॅश ओव्हरशूटमुळे झाला होता..) फायनलवर आल्यावर पुन्हा टॉवरला सांगायचं की मी फायनलवर आहे. मग तो तुम्हाला लँडिंग क्लियरन्स देईल आणि लँडिंगसाठी उपयोगी आकडेरुपी माहितीही देईल.. टचडाऊन केलंत की थोडं पुढे जाऊन टॅक्सीवेवर विमान वळवा आणि एप्रनमधे पार्क करा, किंवा परत सलग टेकऑफ घेऊन आणखी सर्किट करा. जर बाहेरुन प्रवास करुन या विमानतळावर येत असलात तर जनरली डाउनविंड लेगमधे ४५ डिग्रीमधे जॉईन व्हायचं असतं. बाकी पुढे तसंच. रनवेची दिशा बदलली की लेफ्ट साईडेड पॅटर्न राईट बनू शकतो... .................... ओव्हर..
  • Log in or register to post comments
  • 18717 views

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 09/30/2011 - 15:01

In reply to ०००, ०९०, १८०, २७० असे तीन by गवि

Permalink

वोगे!

वोगे!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Sat, 10/01/2011 - 05:47

Permalink

जबरी.

अतिशय उत्कृष्ठ व संग्राह्य लेख मालिका. अभिनंदन. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 04/20/2012 - 16:40

Permalink

मस्त माहिती

इथे दिल्यबद्दल धन्यवाद !!
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Fri, 04/20/2012 - 17:02

In reply to मस्त माहिती by कपिलमुनी

Permalink

कपिलमुनी, तुम्ही आज धागा

कपिलमुनी, तुम्ही आज धागा वाचल्यामुळे तो वर आला, त्यामुळे छान लेख वाचायला मिळाला.. गविंबरोबर तुम्हालाही धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 05/15/2012 - 13:00

Permalink

उदाहरण आणि माहितीसाठी..

या धाग्यात वर्णन केलेल्या सर्किटच्या संदर्भाने नुकताच नेपाळला जोमसोम एअरस्ट्रिपवरुन गो अराउंड केल्यावर जवळच्या डोंगरात झालेला अपघात साधारण असा झाला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. आकृतीत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जोमसोम विमानतळाची धावपट्टी प्रचंड उंच पर्वतातल्या खडतर जागी आहे आणि ती कच्ची आहे. रनवे ०६ (६० डिग्री अतएव उत्तरपूर्व दिशेत तोंड असलेल्या) या रनवेवर उतरण्यासाठी खाली आलेलं डॉर्नियर २२८-२१२ विमान फायनल लेगवर असताना तीव्र वार्‍यामुळे भेलकांडून त्याला लँड करता येईनासे झाल्यावर पायलटने गो-अराउंडचा निर्णय घेतला. चित्रातील पिवळ्या बाणाच्या मार्गाने हवेतून गो अराऊंड केलं. पायलटला आपल्या उंचीचा अंदाज नसावा किंवा एअरपोर्टच्या परिसरातल्या टेकड्यांच्या उंचीची माहिती नसावी. किंवा त्याला टेकडीपेक्षा जास्त उंची वेळेत गाठता आली नसावी. क्रॉसविंड लेग पार करुन डावा डाऊनविंड लेग पकडल्यावर (रनवेच्या उलट दिशेत) वाटेत असलेल्या टेकड्यांपैकी (लाल बिंदू) एकीला उजवा पंख धडकला आणि विमान तिथेच क्रॅश झालं. डाऊनविंड पूर्ण होऊ शकला नाही. Image removed. Image removed. बळी पडलेलं डॉर्नियर २२८-२१२ विमान असं असतं. Image removed. नंबर दोन आणि तीनचे छायाचित्र : जालावरुन साभार.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 05/15/2012 - 18:14

Permalink

भयानक.

भयानक. अकरा भारतियांचा आणि विमान कर्मचार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू. जगातील मोजक्या खतरनाक धावपट्यांपैकी ती एक आहे असे वाचण्यात आले.
  • Log in or register to post comments

Submitted by विजय_आंग्रे on Wed, 05/16/2012 - 11:49

Permalink

भयानक अपघात,या अपघातात,

भयानक अपघात, Image removed. या अपघातात, तरुणी सचदेव, आणि तीच्या आईचाही मृत्यू झाला आहे. तरुणी सचदेव म्हणजे 'आय लव्ह यू रसना'... असे म्हणत आपल्या निरागस हास्याने जाहिरातीतून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ‘रसना गर्ल’
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com