पोलाद कारखान्यांतील शिसं: दीर्घकालीन दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा!

बहुगुणी's picture
बहुगुणी in काथ्याकूट
22 Aug 2009 - 11:02 am
गाभा: 

सकाळी कामावर जातांना रेडिओवर, चीनच्या हुनान प्रांतातल्या एका शहरातल्या १३०० हून आधिक बालकांवर, नजीकच्या स्टीलच्या कारखान्यांमधून होणार्‍या शिस्याच्या उत्सर्जनामुळे झालेल्या दुष्परिणामांची (lead poisoning) ही बातमी ऐकली. याआधी चीनमधल्या क्षँग्सी प्रांतात अश्याच घटनेत गेल्याच महिन्यात ८५१ मुलांना lead poisoning झाल्याचं ऐकलं होतं. तेंव्हा घरी गेल्यावर या वृत्ताचा, भारतातील मुलांच्या प्रकृतीच्या दृष्टीकोनातून पाठपुरावा करायचं ठरवून आंतर्जालावर शोध घेतला.

[इथे हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे की मी या विषयातला तज्ञ नाही, केवळ ३-४ तासांचं 'खोदकाम' आणि थोडीबहूत मला असलेली शास्त्रीय माहिती याआधारे हे लिहितोय, हे लिखाण 'काथ्याकूट' या सदरात आहे त्यामुळे एका महत्वाच्या विषयावर चर्चा व्हावी हा या लिखाणाचा उद्देश आहे. अर्थात्, इथे लिहिलेली काही माहिती चुकीची असल्यास जाणकारांनी जरूर दुरुस्ती सुचवावी.]

मी शोध घेतल्यावर वरील वृत्ताला दुजोरा देणारा हा व्हिडिओ तर सापडलाच, पण या प्रकाराची आधिक माहितीही मिळाली.

मँगेनीज धातू पोलाद निर्मिती प्रक्रियेत वापरून पोलादाची tensile strength (कणखरपणा ?) मध्ये वाढ केली जाते. त्याच प्रक्रियेत शिसं का वापरतात ते काही कळत नव्हतं, गुगलबाबाला जवळजवळ दोन तास विचारून काही खास माहिती सापडली नाही.

अखेर शास्त्रीय नियतकालीकांचा शोध घेता १९८० साली प्रकाशित झालेल्या article मधलं हे पान सापडलं, त्याचा relevant भाग इथे डकवतोय. थोडक्यात, शिसं वापरून स्टीलची machinability वाढवली जाते, असा कार्यकारण भाग असावा असं वाटतं.

तर अशा या शिसं-मिश्रीत स्टीलच्या निर्मितीप्रक्रियेत (smelting) निर्माण होणारा शिस्याचा airborne particulate कचरा बरेचदा (चीन मधील वरील बातम्यांमध्ये दिल्याप्रमाणे) आसमंतात पसरतो. तो आजूबाजूच्या हवेबरोबरच पाण्यातही शिरतो, आणि तिथून मग प्रवेश करतो सजीवांच्या शरीरात.

असं हे शिसं आपल्या शरीरात सामान्य प्रमाणापेक्षा (म्हणजे दर डेसिलिटर मध्ये १० माय्क्रोग्रॅम पेक्षा) आधिक प्रमाणात साठायला लागलं की त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. दर डेसिलिटर मध्ये दहा ते सत्तर माय्क्रोग्रॅम शिसं असेल तर अ‍ॅनिमिया, डोकेदुखी, शक्तिहीनता, धाप लागणं, अक्षरं वा आकड्यांची समज कमी होणं (learning disabilities) अशी लक्षणं दिसायला लागतात. शिसं शरीरात साठण्याची क्रिया चवदा वर्षांखालील लहान मुलांमध्ये आधिक आढळते. याचं कारण म्हणजे लहान मुलांच्या शरीरात, विशेषतः त्यांच्या अन्नमार्गात, शिस्याच्या शोषणाचं प्रमाण मोठ्या माणसांपेक्षा आधिक असतं. उपाशीपोटी हे शोषण कितीतरी पटींनी वाढतं. म्हणून आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गातील लहान मुलं या विषबाधेला आधिक बळी पडतात. अशा मुलांमध्ये वरील दुष्परिणामांच्या जोडीला मज्जासंस्थेतील दोष, खुंटलेली वाढ असे दोष निर्माण व्हायला लागतात. अशी मुलं या विषबाधेचा सामना करीत मोठी झालीच तर त्यांच्यात कायमचं वंध्यत्व (reproductive disabilities), आकलनशक्तीचा नाश असे दीर्घकालीन दोष निर्माण होतात. शिस्याचं प्रमाण दर डेसिलिटर मध्ये सत्तर माय्क्रोग्रॅमपेक्षा आधिक वाढलं की क्रमाक्रमाने उलट्या, आतडी ओढून काढणारं दुखणं (abdominal spasms), स्नायूंचा नाश, बेशुद्धावस्था (कोमा) आणि शेवटी मरण असे घातक परिणाम उद्भवतात.

इतके सगळे दूरगामी परिणाम होण्याचं कारण म्हणजे, शरीरातल्या प्रत्येक अवयवात जिथे जिथे कॅल्शियम, झिंक, आयर्न या धातूंची गरज असते त्या त्या ठिकाणी शिसं या सर्वांची जागा घेतं, आणि मग एक एक महत्वाची शारीरीक क्रिया बंद पाडतं. (उदाहरणार्थ, रक्तपेशींमधील heme या द्रव्यात आयर्नच्या जागी शिसं जाऊन बसल्याने hemoglobin ची निर्मिती थांबते, रक्तपेशींची oxygen carrying capacity कमी होते, परिणामः hypochromic, normocytic अ‍ॅनिमिया.)

भारतात, विशेषतः महाराष्ट्रात स्टील smelting चे कारखाने कुठे आहेत ते शोधण्यासाठी मी Google search run केला (steel smelting Maharashtra असे शोधशब्द देऊन), तर मुंबईत आणि आसपासच्या परिसरातच निदान ५ कारखाने आहेत असं दिसलं. हे कारखाने शिस्याचं अनियंत्रित प्रदूषण करतात असा बिनबुडाचा आरोप मला करायचा नाही, म्हणून मी त्यांची नावं द्यायचं टाळतो आहे. फक्त ते कारखाने मालाड, तळोजा, पाचपाखाडी (पोखरण रोड, ठाणे), मुरबाड, अशा ठिकाणी आहेत एवढंच सांगेन; त्या ठिकाणी असं प्रदुषण होतं का, हे तिथे वावर असणार्‍या मिपा वाचकांना माहीत असेल, नसल्यास आधिक जागरूकपणे ते, किंवा इथे मिपावर वावर असणारे पत्रकारितेमधील मंडळी, या ठिकाणांवर आणि आसपासच्या मुलांच्या प्रकृतीच्या वर दिलेल्या लक्षणांच्या तक्रारींवर लक्ष ठेवतील अशी आशा ठेवायला हरकत नाही.

मी आधिक शोध घेता, हे शिसं प्रदुषण केवळ स्टीलच्या कारखान्यांमुळेच होतं असं मुळीच नसून, इतरही अनेक घटक याला कारणीभूत आहेत हे लक्षात आलं.

यांत सिरॅमिकची (चिनी मातीची) स्वयंपाकाची भांडी, सॉल्डरींग करण्याची वायर व gun, अशा अनेक रोजच्या वापरात असू शकणार्‍या गोष्टींचा समावेश आढळला. स्वयंपाक करताना चिनी मातीच्या भांड्यांतून शिसं अन्नामार्गे शरीरात शिरू शकतं. शिस्याची जोडणी केलेल्या जुन्या घरांतील नळांमधून बरेचदा शिसं पाण्यात शिरतं. म्हणून अशा घरांमध्ये ६-७ तासांपेक्षा आधिक साठून राहिलेलं पाणी न पिता वाहून जाऊ द्यावं अशी सूचना दिलेली आढळली. [इथे मला लहानपणी आई नेहेमी सकाळी 'नळाचं पहिलं पाणी वाहून जाऊ दे आणि मग पी' असं म्हणायची त्याची आठवण झाली.] (अमेरिकेतील बर्‍याच शहरांमध्ये जेंव्हा एखादं घर विक्रीला येतं, तेंव्हा जुन्या घरमालकांना किंवा गृहनिर्माणसंस्थेला त्या घराच्या आसपासच्या परिसरात शिस्याचं प्रमाण किती आहे ते नव्या घरमालकाला लेखी स्वरूपात देणं बंधनकारक आहे.)

जुन्या घरांमधील शक्य असलेला आणखी एक दोष म्हणजे भारतात बरीच वर्षं वापरात असलेला रंगांमधील शिस्याचा वापर. शिसं घातलं की रंग आधिक टिकतात हे इजिप्शियन लोकांना पुरातन कालापासून माहीत असलेलं 'शास्त्र' याच्या मुळाशी आहे. आता आता कुठे भारतात 'आमच्या शिसंविरहित रंगात तुमचं घर सजवा' अशा जाहिराती यायला लागल्या आहेत. या बाबतीत आधिक जनजागृती होणं महत्वाचं आहे. या संदर्भात आणखी एक निरीक्षणः अशा शिसं-मिश्रीत रंगाला एक गोडसर चव असते! त्यामुळे बरेचदा लहान मुलं (विशेषतः ८ महिने ते सव्वा वर्ष या वयोगटात असतांना दात येत असतांना जेंव्हा चाव-चाव करतात तेंव्हा!) खिडकीच्या गजांना धरून उभं राहतांना असा रंग चाटत असतात हे मी बरेचदा पाहिलंय! इकडेही घरातल्या ज्येष्ठांनी लक्ष दिलेलं उत्तमच.

अमेरिकेतील मिपाकरांसाठी गेल्या काही वर्षांतील लक्षणीय lead alerts खालीलप्रमाणे:

शिस्याचं प्रमाण आधिक आहे म्हणून 'सूरमा' या डोळ्याला लावण्याच्या मध्यपूर्वेतील प्रकाराला अमेरिकेत बंदी आहे.

२००८ साली इलिनॉय इथल्या प्रसिद्ध राजा फूड्स या कंपनीच्या 'स्वाद' ब्रँडच्या सिंदूर वर याच कारणासाठी बंदी घालण्यात आली. हा सिंदूर विशेषतः वंगभगिनी आणि पंजाबी महिला भांगात घालायला वापरतात.

अमेरिकेत बंदी घातलं गेलेलं आणखी एक भारतीय प्रॉडक्ट म्हणजे 'घसर्द' किंवा 'बाळगोळी' या नावाने ग्राईप वॉटर मध्ये विरघळवून लहान बाळांच्या पोटदुखीसाठी वापरलं जाणारं औषध.

शेवटी धोक्याची सूचना इथल्या मांसाहारी मंडळींसाठी: जर शिसं-मिश्रीत सांडपाण्यावर गुजराण करणारे प्राणीमात्र (डुकरं, मासे, वगैरे) तुमच्या आहारात आले, तर तुम्हाला या toxicity चा धोका संभवतो, तेंव्हा आपण भक्षण करतो त्या 'खाद्याचं खाद्य' काय आहे इकडेही नजर ठेवलेली बरी!

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

22 Aug 2009 - 11:12 am | मदनबाण

मस्त लेख...
मी असेही वाचले आहे की :---
१)लहान मुलांना खेळण्यासाठी देण्यात येणार्‍या प्लास्टिकच्या खेळण्या मधे (विशेषतः पिवळ्या रंगाच्या) शिसा चे प्रमाण असते !!! त्यामुळे अशी खेळणी देणे म्हणजे घातकच आहे.
२)खाध्य तेल ज्या प्लास्टिकच्या डब्यातुन दिले जाते त्याद्वारे सुद्धा काही प्रमाणात पोटात शिस जाऊ शकेल.

वरील माहितीत जर चूक असेल तर जरुर तसे सांगा.

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

शिसं हे machinability साठी पोलादात मिसळतात. अशा पोलादांना "Leaded free-cutting steels" अशी संज्ञा आहे. जास्त करून मोटारी व मोटरसायकली बनवतांना ज्या घटकांना (componentsना) जास्त tensile strength ची गरज नसते पण मोजमापाबद्दलचा अचूकपणा (accuracy) महत्वाचा असतो त्या ठिकाणी असं पोलाद वापरतात. कारण ऑटोमॅट्सवर एकदा cutting tool लावले की त्या cutting tool ची झीज व्हायच्या आत हजारो घटक बनविता येतात.
शिशामुळे होणार्‍या विषप्रयोगाला (lead poisoning ला) "slow poisoning" म्हणतात. त्याचा परिणाम लगेच दिसत नाहीं पण अनेक वर्षांनी तो होतो व तो प्राणघातक असतो.
मी कळव्याला "मुकुंद" कंपनीत काम करत असताना हे पोलाद बनवायला सुरुवात केली होती व त्या कंपनीने प्रदूषण होऊ नये म्हणून अद्ययावत fume collection system बसवली आहे.
मला वाटते एवढी माहिती आपल्या सभासदांना पुरेशी आहे.
सध्या मी असले पोलाद बनवत नाहीं. कारण इंडोनेशियात सगळे घटक आयते येतात. त्यामुळे बरीच वर्षें आता असल्या पोलादांशी संबंध आलेला नाही.
पोलाद बनविणे हा माझा मुख्य व्यवसाय आहे!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

बहुगुणी's picture

22 Aug 2009 - 7:01 pm | बहुगुणी

"शिसं हे machinability साठी पोलादात मिसळतात..." वा! म्हणजे माझा निष्कर्ष बरोबर होता तर, समर्थनाबद्दल आणि आधिक माहितीबद्दल धन्यवाद!

स्वाती२'s picture

22 Aug 2009 - 4:22 pm | स्वाती२

सर्व प्रथम या लेखाबद्दल धन्यवाद. माझ्या मुलाला ९ महिन्याचा असताना रुटिन वैद्यकिय तपासणी करताना lead चे प्रमाण जास्त असलेले आढळले होते. तेव्हा तो माझ्या नोकरीमुळे पाळणाघरात जायचा. अपार्टमेंट साधारण ३० वर्षे जुने होते. त्याला मग nursery water द्यायला सुरुवात केली. तसेच वर्षभर औषध घ्यावे लागले. blood test करावे लागे. त्या काळात भारत वारी मध्ये तिथे टेस्ट साठी चौकशी केली असता कुणालाच या बद्दल माहिती नव्हती. अगदी पुण्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ञांकडे ही परिस्थीती होती. इथे अमेरिकेतही बहूतेक डाक्टर रुटिन तपासणीत ही टेस्ट करत नाहीत. आमचा डाक्टर करतो त्यामूळे परिस्थीती हाताबाहेर जाण्याच्या आत उपाय झाले. हे सर्व झाले तेव्हा त्याची सर्व वाढ आतिशय चांगली होती, कसलीच तक्रार नव्हती. केवळ रुटिन टेस्ट मुळेच हे कळले. मी माझ्या माहितीतल्या लहान बाळे असलेल्या लोकांना हा अनुभव सांगुन अशी टेस्ट करून घ्यावी म्हणून सुचवायची पण बहूतेक जण दुर्लक्ष करायचे.

लवंगी's picture

22 Aug 2009 - 6:47 pm | लवंगी

इथे बालरोगतज्ञ लेड टेस्ट करायला सांगत आहेत. ती इतकी महत्वाची आहे हे माहिती नव्हते. लेखाबद्दल खूप धन्यवाद

रेवती's picture

22 Aug 2009 - 7:04 pm | रेवती

माहितीपूर्ण व उपयुक्त लेखाबद्दल धन्यवाद!
जास्त प्रमाणातले शिसे आपल्यासाठी घातक असते ते माहित होते पण किती काऊंट असायला हवा याकडे फारसे लक्ष दिले नाही. माझा मुलगा लहान असताना त्याच्या रक्त तपासणीत ठरावीक पातळीपेक्षा थोडेसे जास्त लेड आढळले तर त्याच्या डॉ. नी रोजच्या वापरातले फिल्टर्ड असले तरी नळाचे पाणी बंद करायला सांगितले. मग आम्ही सगळेचजण स्प्रिंग पाणी पिण्यासाठी वापरू लागलो. काही महिन्यांनंतरच्या रक्त तपासणीत शिश्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते.
तरी तो सहा वर्षाचा होईपर्यंत आम्ही स्प्रिंग वॉटरच वापरत होतो. भारतातही आजकाल डॉ. मुलांसाठी नेहमी उकळून थंड केलेले किंवा झीरो बी च्या यंत्राने गाळलेले पाणी पिण्याची सुचना करतात. अर्थात शिश्याचे प्रमाण घटवण्यासाठी त्याचा काय उपयोग असतो त्याची मला कल्पना नाही.

रेवती

नितिन थत्ते's picture

22 Aug 2009 - 5:17 pm | नितिन थत्ते

काळे साहेबांनी सांगितलेली माहिती अचूक आहे.

परंतु स्टील मेकिंगमध्येच प्रदूषण होते असे नसून हे स्टील बार वापरून पोलादी काँपोनंट बनवले जातात तेथूनही होते. मशिनिंग करताना जो कूलंट वापरतात त्याकूलंटमध्ये शिशाचा अंश उतरतो. वापरून खराब झालेले कूलंट बहुतेक कोणतीही प्रक्रिया न करता गटारात जाते. (कारण हे मशिनिंग करणारे मशीनशॉपवाले लघूद्योजक असतात आणि ते इंडस्ट्रिअल इस्टेट नामक चाळींमध्ये आपले उत्पादन करीत असतात.) गटारातून हे कूलंट कुठल्यातरी नदीतच/समुद्रातच जाते. सल्फर मुळेही अशीच मशिनॅबिलिटी वाढते. त्या सल्फरमुळे काय परिणाम होतात हे माहिती नाही.

तसेच इलेक्ट्रॉनिक सर्किटची जोडणी करण्यासाठी अगदी आत्ता आत्तापर्यंत शिसे आणि कथिलाचा मिश्र धातू वापरला जाई. (हल्ली म्हणे लेड फ्री सोल्डर असतो).

वाहनांच्या बॅटरीत शिशाच्या जाळ्या व पत्रे असतात. जुन्या बॅटर्‍यांचे डिस्पोझल व दुरुस्ती होणार्‍या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिशाचे प्रदूषण होते. (दुर्दैवाने शिसे न वापरल्या जाणार्‍या रिचार्जेबल बॅटर्‍यांचे तंत्रज्ञान - निकेल कॅडमियम वगैरे अजून खूप मागे आहे. त्यातून पाहिजे तितकी एनर्जी डेन्सिटी मिळत नाही त्यामुळे लेड अ‍ॅसिड बॅटर्‍यांना अजून तरी पर्याय नाही)

नितिन थत्ते

सुधीर काळे's picture

27 Aug 2009 - 8:31 am | सुधीर काळे

शिसे वापरल्यावर मशिनॅबिलिटी जितकी वाढते तितकी गंधकामुळे वाढत नाहीं. पण गंधक हे मूलतत्व (element) विषारी नाहीं. फक्त वितळलेले पोलाद भट्टीतून डाबूत (ladle) ओतताना पोलादात जेंव्हा गंधक टाकले जाते तेंव्हा कांहीं सेकंद गंधकाची दुर्गंधी जाणवते.
En1A हे British Specification प्रमाणे बनविलेले पोलाद सर्वात जास्त लोकप्रिय आहे, पण शिसेमिश्रित "फ्री-कटिंग स्टील" आल्यापासून गंधकमिश्रित पोलाद पडद्याआड गेलेले आहे.
सुधीर
<<सल्फर मुळेही अशीच मशिनॅबिलिटी वाढते. त्या सल्फरमुळे काय परिणाम होतात हे माहिती नाही.>>
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विशिष्ठ पाईप्स वापरले जातात त्यात शिशाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्याठिकाणी थंड व गरम पाणी एकाच तोटीतून येते तिथे थेट नळाचे पाणी पिण्यासाठी वापरताना आधी गरम पाणी बंद करुन थंड पाण्याचा प्रवाह चालू करुन थोडे पाणी जाऊ देणे गरजेचे असते.

वरती नितिन थत्ते ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सोल्डरिंग मटेरिअलमध्ये पूर्वी शिसे असे. आता सगळे काँपोनंट्स RoHS Compliant असतात
असे मटेरिअल असल्याचे सर्टिफिकेशन असल्याशिवाय तुम्ही कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स्/इलेक्ट्रिकल वस्तू निर्यात करु शकत नाही.

मध्यंतरी चीनमधून अमेरिकेत आलेल्या खेळण्यांना शिसेमिश्रित रंग दिलेले आढळल्याने लाखो खेळणी परत पाठवून तो निर्यातदार 'काळ्या यादीत' टाकला गेला. आपल्याकडेही चिनी सामान खूप मोठ्या प्रमाणावर येत असते त्याच्या तपासणीची सक्षम यंत्रणा हवी असे वाटते.

लहान मुलांसाठीची खेळणी ही थोडी महाग असली तरी चांगल्या दर्जाचीच वापरावीत अन्यथा त्यांना अपाय होऊ शकतो.

चतुरंग

विंजिनेर's picture

22 Aug 2009 - 7:14 pm | विंजिनेर

लहान मुलांसाठीची खेळणी ही थोडी महाग असली तरी चांगल्या दर्जाचीच वापरावीत अन्यथा त्यांना अपाय होऊ शकतो.

कबूल. पण आपण वर उल्लेखलेला चिनी निर्यातदार अमेरिकेतील मॅटेल ह्या दर्जाबद्दल प्रसिद्ध आणि महागडया कंपनीलाच पुरवठा करत होता हे विसरून चालणार नाही.
त्यामुळे किंमत आणि नाव हे दोन्ही मोठे असले तरी आजकाल खात्रीशीर रित्या सुरक्षित खेळणी मिळू शकतीलच हे अमेरिकेत तरी शक्य दिसत नाही...

चतुरंग's picture

22 Aug 2009 - 8:22 pm | चतुरंग

अगदी बरोबर आहे. किंमत आणी नाव ह्याचा संबंध लावणे अमेरिकेतच नव्हे तर सगळीकडेच दिवसेंदिवस अवघड होत आहे हे खरेच आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या मुलासाठी बरीच वर्षे 'ग्राममंगलची' साधी पुठ्ठ्याची किंवा लाकडाची खेळणी घेतलेली होती.

चतुरंग

विकास's picture

22 Aug 2009 - 7:00 pm | विकास

हा विषय खूप महत्वाचा आहे. या वरून बरेच काही लिहू शकेन. पण थोडक्यात:

वर चतुरंग ने सांगितल्या प्रमाणे अमेरिकेत चीनी खेळण्यात असले घटक आढळून आल्याने येथे नाकारले गेले होते. भारतात ही खेळणी सहज आलेली असू शकतात. म्हणून "मेड इन चायना" घेताना कशासाठी घेत आहोत ह्याचा विचार व्हावा (विशेष करून ६ वर्षांच्या खालील मुलांसाठी).

लेड पॉयझनिंगचा त्रास हा विशेष करून ६ वर्षाच्या आतील मुलांसाठी अधिक असतो. त्यामुळे येथे (किमान मॅसेच्युसेट्स मधे) प्रत्येक मुलाची तो पर्यंत लेड टेस्ट करावी लागते.

युयुत्सु's picture

23 Aug 2009 - 8:46 am | युयुत्सु

काही आयुर्वेदिक औषधांमध्ये पण शिसं वापरतात.

अजय भागवत's picture

23 Aug 2009 - 11:41 am | अजय भागवत

बहुगुणी, चांगली चर्चा घडवून आणलीत. प्रतिसादातूनही खूप चांगली माहिती कळते.
काही आठवणी आल्या त्या सांगतोय-

फार पुर्वी मी एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरामुळे मला ती संधी नाकारली गेली होती. मला विचारले गेले, "तुम्ही आमच्या कार्यपद्धतीत काय सुधारणा घडवून आणू शकता?"
उत्तर, "कॉपर मेल्टींग प्लांटमधून जर प्रदुशित पाणी बाहेर जात असेल तर तेथपासून ...."
मुलाखतकार, "आभारी आहे, आम्ही तुम्हाला लवकरच कळवू."
अतिशहाणपणा नडला असे म्हणता येईल का?

दुसऱ्या एका प्रसंगात आम्ही अमेरीकेत निर्यात केलेल्या स्टीलच्या उत्पादनावर [गंजू नये म्हणून मान्यता असलेले सीवर्दी तेल] तेलाचा एक पातळ थर देऊन पाठवला होता. तेथील कंपनीने तक्रार केली की, तेथील कामगार जेव्हा ते उत्पादन त्यावर वेल्डींग करण्यासाठी घेतात तेव्हा त्या तेलाचा धूर होतो आहे व त्यामुळे कामगारांनी त्यावर काम करणे थांब्वले आहे. आम्हाला २ कामगार तेथे पाठवून सगळ्या उत्पादनावर प्रक्रिया करुन ते तेल काढावे लागले.

रामपुरी's picture

23 Aug 2009 - 12:08 pm | रामपुरी

प्रतिक्रियांतूनही बरीच माहीती मिळाली. विशेषतः नळ्जोडणीबद्दल. आतापासून नक्कीच काळजी घेईन. सर्वाना धन्यवाद...

नीधप's picture

23 Aug 2009 - 1:35 pm | नीधप

खूप महत्वाच्या माहीतीबद्दल लेख लिहिणार्‍याचे आणि प्रतिसाद देणार्‍यांचे पण आभार.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ए.चंद्रशेखर's picture

23 Aug 2009 - 3:05 pm | ए.चंद्रशेखर

याच घटनेवर मी माझ्या ब्लॉगमधे दोन दिवसापूर्वी एक पोस्ट टाकले होते. त्यात या घटनेबद्दल जास्त माहिती व फोटो आहेत. कोणाला बघायचे असले तर या दुव्यावर ते बघू शकतात.
चंद्रशेखर

बहुगुणी's picture

23 Aug 2009 - 3:56 pm | बहुगुणी

आतापर्यंत या महत्वाच्या विषयावर उपयुक्त चर्चा करणार्‍या सर्वांचेच आभार!

आणि चीन मधील विवक्षित दुर्घटनेबद्दल विस्तृत माहिती पुरवणार्‍या आपल्या ब्लॉगचा दुवा देणार्‍या ए. चंद्रशेखर यांनाही धन्यवाद! फक्त आपण लिहिलेल्या शिस्याच्या प्रमाणाच्या माहितीत ["आरोग्यतज्ञांच्या मताने, रक्तात 100 मायक्रोग्रॅमपर्यंत शिसे असणे फारसे धोकादायक नसते. पण हेच शिसे 200 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्ती झाल्यास, त्या व्यक्तीच्या नर्व्हस सिस्टीमसाठी ते अत्यंत धोकादायक बनते."], आणि मला माहीत असलेल्या आणि मी इतरत्र वाचलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याने मी माझी माहिती परत तपासून पाहिली. [आपण १००/२०० मायक्रोग्रॅम म्हणता ते किती व्हॉल्युम रक्तात आहे ते लिहिलं नाहीत -dL की L, त्यामुळे वाचकांचा गैरसमज होऊ शकतो असं वाटतं.] Blood chemistry च्या textbook मधून आधिक विशिष्ट माहिती मिळू शकेल, पण इथे मिळालेल्या माहितीनुसार हे कळतं की: The normal level of blood lead is zero, as there is no safe level of lead. Health department surveillance puts its greatest efforts on identifying cases where the BLLs exceeds 10 (10>µg/dL). As the level goes up, the potential for serious developmental problems escalate. BLLs above 15, require specific action be taken by the health deparment in most states. BLL above 30 become serious basis for concern and BLLs above 70 create a probability of seizure, profound disability and even death.

यापुढे असंही म्हंटलं आहे: The most important thing to remember is that any lead can be potentially harmful.

"थोडंसं शिसं हरकत नाही, चलता है..." असा गैरसमज होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण देतोय इतकंच. माहितीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

ए.चंद्रशेखर's picture

23 Aug 2009 - 4:22 pm | ए.चंद्रशेखर

१०० मायक्रोग्राम पर्यंत शिसे असल्यास ते सेफ असते हे जेंव्हा मी वाचले तेंव्हा मलाही ते खटकले होते. परंतु ब्लूमबर्गने तर ही लेव्हल १०० मिलिग्राम/लिटर अशी दिली होती. जास्त वाचन केल्यावर असे लक्षात आले की चिनी डॉक्टर्सच्या मते १०० मायक्रोग्राम ही सेफ लेव्हल आहे. चीनमधे २५० मायक्रोग्रामपेक्षा जास्त शिसे असले तरच ती विषबाधा समजतात. या घटनेतील बहुतेक मुलांची लेव्हल २००च्या आसपास असल्याने त्यांना वैद्यकीय मदत मिळणेही कठिण बनले आहे. नवीन बातमीप्रमाणे आता त्या साठी या मुलांचे पालक आंदोलन करत आहेत.
चंद्रशेखर

पाषाणभेद's picture

24 Aug 2009 - 10:07 am | पाषाणभेद

छान लेख. प्रदुषण नियंत्रण मंडळ हा लेख वाचाण्याची तसदी घेईल काय?

रस्त्याने चालतांना उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकेल.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

धनंजय's picture

25 Aug 2009 - 1:38 am | धनंजय

घडवून आणल्याबद्दल बहुगुणी यांचे आभार.

ऋषिकेश's picture

25 Aug 2009 - 11:10 am | ऋषिकेश

चांगली चर्चा घडवून आणल्याबद्दल बहुगुणी यांचे आभार.

असेच म्हणतो. लेख व प्रतिक्रीयांतून बरीच नवी माहिती मिळाली

ऋषिकेश

सहज's picture

27 Aug 2009 - 7:36 am | सहज

उत्तम चर्चा!

दिपाली पाटिल's picture

25 Aug 2009 - 11:57 am | दिपाली पाटिल

उपयुक्त माहिती मिळाली...

दिपाली :)

भडकमकर मास्तर's picture

27 Aug 2009 - 12:00 am | भडकमकर मास्तर

एका बातमीच्या आधारे कष्ट घेऊन, जालावरील माहिती उपसून मिपा वाचकांसाठी जी चर्चा घडवून आणलीत त्यामुळे उत्तम माहिती मिळाली.
...
धन्यवाद बहुगुणीसाहेब...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

अजुन कच्चाच आहे's picture

2 Sep 2009 - 5:43 pm | अजुन कच्चाच आहे

लेड पॉयझनींग आता फक्त परदेशापुरते राहीलेले नाही. इथे महाराष्ट्रात, पुण्याजवळ, ज्ञानदेवाच्या आळंदी शेजारी, मरकळ येथिल टंडन मेटल्स या कंपनीच्या लेड प्रदुषणामुळे झालेले मरकळवासीयांचे हाल फारच विदारक होते.

पुण्यातील 'आरोग्यसेनेने' याविरूद्ध लढा देऊन त्यांना चार अ‍ॅन्टीपोल्यूटींग सिस्टिम्स बसवण्यास भाग पाडले.
http://www.arogyasena.org/issue.htm
अर्थात त्यामुळे ते प्रदुषण काही अजून पुर्णपणे थांबले असे नाही.

@पाषणभेद
पोल्युशन बोर्डाने त्यांना आधीच क्लिअरन्स सर्टिफिकेट दिले होते.

.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

लिखाळ's picture

11 Sep 2009 - 4:43 pm | लिखाळ

वा !! महत्वाचा विषय आणि चांगली चर्चा.
बहुगुणींचे आभार.

-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?