स्वनियंत्रण, संयम - एक प्रस्ताव

विकास's picture
विकास in काथ्याकूट
18 Jun 2009 - 7:30 pm
गाभा: 

नमस्कार,

सर्वप्रथम हा प्रस्ताव - चर्चा म्हणून तसेच व्यावहारीक आचरण म्हणून मी नेहमीप्रमाणेच केवळ एक मिपासदस्य म्हणून मांडत आहे. त्याचा संबंध जरी माझ्यासकट सर्वांनी जनात आणि मनात कसे वागावे याच्याशी मुख्यत्वे मर्यादीत असला तरी मिपा संबंधात संपादकांचे विशिष्ठ धागे संपादन करताना धोरण काय असावे या संदर्भात देखील आहे.

हा वेगळा काथ्याकुटाचा धागा सुचण्याचे तात्कालीक कारण जरी हिमानी सावरकरांचे पत्र असले तरी तशा अनेक चर्चा येथे चालू असतात. या संदर्भात प्रथम मला सांगायचे आहे की हिमानी सावरकरांचे पत्र आणि विचार मला अजिबात पटले नाहीत आणि मान्य देखील नाहीत. याचा अर्थ त्या धाग्यातील त्यांच्यावर टिका करणार्‍यांचे म्हणणे मान्य आहे असा अजिबात करून घेऊ नये. पण, स्वतःला स्वातंत्र्यवीरांच्या नात्यातील म्हणत असताना सावरकरांच्या तत्वाच्या पूर्ण विरुद्ध ह्या विचार पसरवत आहेत आणि हे जास्त खटकते. द्रष्टे, नेते, पुढारी यांच्या जवळील व्यक्तींनी वास्तवीक जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा असते. अर्थात तसे न वागून हिमानी सावरकर ह्या अपवाद नसल्याचेच जास्त करून सिद्ध करत आहेत. असो.

प्रयोजन:

आपण कुठेही राहात असलो तरी आज इथे म्हणजे मिपावर येताना केवळ मराठीची आवड आणि त्या भाषेत संवाद साधण्यासाठी येतो. संवाद पण अशांबरोबर ज्यांना आपण कधी पाहीलेले नाही अथवा वास्तवात भेटलेलो नाही. बर्‍याचदा एकमेकांची नावेपण माहीत नसतात, आडनावे तर अजूनच दूर आणि जात तर त्याहूनही माहीत असणे दूर असते/असायला हवे. मात्र मग चर्चा विषय असे शोधले जातात अथवा बातम्याच अशा असतात ज्यातून आडून अथवा प्रत्यक्ष जातीवरून भांडणे, वाद सुरू होतात.

माझे व्यक्तिगत मत मी बर्‍याचदा इथे आणि इतरत्र लिहीले आहे आणि जिथे शक्य असते तिथे प्रत्यक्षात देखील मांडतो, आचरतो. आपण आता स्वतःला सुशिक्षित, अधुनिक वगैरे सर्व समजतो आणि समजत असलो नसलो तरी २१ व्या शतकातील अधुनिकतेला अनुसरून आपण स्वतःला "मनापासून" बदलणे आवश्यक आहे. त्यातील सर्वाता महत्वाचा भाग म्हणजे मनापासून जात हा विषय आधी टाळायला लागणे. हळू हळू तो आपल्या आणि इतरांच्या मनातून आपोआप जाऊ लागेल याची खात्री आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे जो काही कुणाला कुळाचार वगैरे करायचा असेल, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कुटूंबातील दैनंदीन (खाण्यापिण्यासहीत कशाचाही) सवयी असतील त्या बदलायच्या अथवा त्यात स्वतःला/इतरांना कमी-जास्त मानावे. पण तो कुळाचार असुंदेत "जातीचार" नाही. शिवाय आज आपल्यातला कोणीही पुर्णपणे अगदी आपल्या आई-वडीलांच्या वेळपर्यंतचे संस्कार आत्मसात करून वागत नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे. मग केवळ हे जातीचे बिरुद अथवा जातीचे चष्मे कशाला ठेवावेत?

जात आणि जातीचा विषय, हे त्या संदर्भात असे एक विष आहे जे चघळताना कुठलीतरी धुंदी चढते आणि एकमेकांशी शिरजोरी करत असताना नकळत स्वतःच झुंज देणारे बैल अथवा कोंबड्या होतो. तो खेळ कोण करत असते, बघत असते आणि त्याचा वापर करते हे वेगवेगळ्या वेळेस वेगळे असू शकतात आणि तो एक वेगळ्याच चर्चेचा विषय आहे. पण ह्या झुंझीच्या धुंदीत आपण समाज म्हणून रक्तबंबाळ होत असतो आणि स्वतःचे, संपुर्ण समाजाचे एका परीने नजिकच्या आणि दूरच्या भविष्याकरता नुकसानच करत असतो. कारण शेवटी विष ते विष. आज एकाला भोवले तर उद्या दुसर्‍याला आणि परवापर्यंत सर्वांनाच... म्हणून हा विषय गांभिर्याने घ्यावात अशी विनंती आहे.

प्रस्तावः

आपण एका दिवसात जग बदलू शकणार नाही. जगच कशाला स्वत:ला अगदी प्रकृतीच्या कारणासाठी पण चांगल्या सवयी लावताना अवघड जाते. तर ह्या संदर्भातील बदल सोपे कसे म्हणता येतील? पण एक साधी सुरवात म्हणून किमान मिपासंदर्भात (आणि शक्य झाल्यास इतरत्र स्वतःसंदर्भात) तरी आपण काही गोष्टी पाळाव्यात असे म्हणावेसे वाटते:

  1. सगळ्यात सोपे जातीविषयक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिसाद देणे सोडणे आणि चर्चा त्या मार्गाला जात असेल तर कितीही चांगले (जातीविरहीत) स्वतंत्र मुद्दे माहीत असले तरी अशा चर्चांमधे न पडणे आणि स्वतः तशा चर्चा सुरू न करणे. त्यामुळे निदान स्वतः मुळे ती चर्चा आणि त्यातून नकळत पडणारी फूट वाढत नाही...(एक कारण हात शिवशिवत असूनही हिमानी सावरकरांच्या पत्रावरील चर्चेत मी पडलो नाही ते).
  2. दुसरा भाग म्हणजे अशा चर्चा जेंव्हा मूळ प्रस्ताव सोडून वाहवत जातात तेंव्हा संपादकांनी पूर्णपणे काढून टाकणे.

थोडक्यात पहीला मुद्दा हा स्वनियंत्रणाचा तर दुसरा सेन्सॉरशिपचा. मला स्वतःला पहीला मुद्दा जास्त योग्य वाटतो पण दुसरा "काही पर्यायच नाही म्हणून" नक्कीच ठेवावासा वाटतो आणि तसा तो संपादकांच्या हातात आजही आहे.

  1. आता असा प्रश्न येऊ शकतो की असे बरेच विषय असतात ज्यांच्या संदर्भात लिहीणे म्हणजे जातीय ठरू शकेल, पण उद्देश तसा नसेल. उ.दा. कोणी अमुक एका पद्धतीचे माशाचे कालवण अथवा तमुक पद्धतीची पुरणपोळी, असे काही लिहीणे म्हणजे जातीय आहे का? माझ्या लेखी नाही. कारण वर आधीच म्हणल्याप्रमाणे त्यात बर्‍याचदा कुटूंबातील अथवा पुर्वीच्या (जातींमुळे तयार झालेल्या) समाजातील पद्धती आहेत ज्या आजकाल सर्वसमाजात खाण्याच्या हौशीने एकत्रीत होत आहेत. चायनीज फ्राईडराईस म्हणताना जसे त्यात राष्ट्रीयत्वापेक्षा पद्धत असते तसेच काहीसे या बाबतीत होते. असे इतरही काही या संदर्भात बसणारे मुद्दे असू शकतात.
  2. दुसरा भाग हा ऐतिहासीक गोष्टींसंदर्भात आहे. ज्यांना कुठल्याही ठोस पुराव्यानिशी कुठल्याही बाजूने जुनी अथवा नव्याने आलेली माहीती मांडायची असेल त्यांनी मांडावी पण उगाच कुठल्याच बाजूने पुरावा काय म्हणत वाद घालणे अयोग्य वाटते. तसे विषय चालू करणे तर त्याहूनही अयोग्य वाटते. पण कुठल्याही संदर्भात माहीतीपूर्ण (स्कॉलर्ली) चर्चांवर परत जातींविषयक स्वतःपुरते नियम पाळत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाद, टोमणे न घालता माहीतीपूर्ण (स्कॉलर्ली) चर्चा करावी अथवा त्या पूर्णपणे दुर्लक्षित करून सोडून द्याव्यात. उ.दा. आंबेडकरांचे, गांधीजींचे, सावरकरांचे आणि तसेच इतर अनेक समाजधुरीणांचे विविध विचार, ऐतिहासिक चुका यांवर कोणी संदर्भासहीत लिहीले (संदर्भ मिळणे बर्‍याचदा सोपे आहे) तर तो विषय अभ्यासू ठरेल. पण संदर्भाविना, मुद्दामून "आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट" जर कोणी लिहू लागले तर ते योग्य नाही. असे अनेक विषय असू शकतात. पण संयम न सोडता त्यावर अभ्यासू लेखन होऊ शकते याची खात्री आहे.
  3. त्यातूनही जर कोणाला जातीसंदर्भात पोटतिडकीने लिहायचेच असेल तर त्यांनी स्वत:च्या खर्‍या नावाने (जमल्यास छायाचित्रासहीत :) ) लेखन प्रकाशित करावे. उगाच कुठली तरी नावे तयार करून विरुद्ध, बाजूने अथवा एकमेकांमधे विष कालवले जाईल असे लिहू नये. (अर्थात तसे लिहीले गेले तर एका सोपी लिंक संपादकांच्या हातात आहेचः "रद्द" )

हे आणि असे बरेच काही करून जातीभेद आणि त्याचे दुष्परीणाम याचे "कन्स्ट्रक्टीव्ह डिस्ट्रक्शन" करता येऊ शकते असे वाटते. इतरत्र नाही तरी किमान मिपावर आणि स्वतःच्या आयुष्यात तरी...मग "आधी केले मग सांगितले" असे इतरांना सांगताना पण. किमान असे वागताना आपण जे जातीचे राजकारण करत आहेत त्यांच्या हातातील खेळणे तरी होणार नाही.

तुम्हाला वरील प्रस्तावा संदर्भात काय वाटते? त्यात अजून काही मुद्दे घालता येतील का? आहेत त्यात बदल सुचवता येतील का? का काही स्वनियंत्रण, संयम अथवा थोडीफार सामाजीक जबाबदारी यातील कशाचीच गरज नाही असे वाटते? का तुमची तशी (संयमाने) वागायची तयारी आहे?

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

18 Jun 2009 - 10:11 pm | नितिन थत्ते

लेखातील विचारांशी पूर्णपणे सहमत. संपादन करण्याची वेळ लिहिणार्‍यांनी आणू नये हे सर्वात उत्तम.
पण कोणतेही संस्थळ हे समाजनिरपेक्ष अस्तित्वात असू शकत नाही. त्यामुळे समाजास हानिकारक लेखन होत असल्यास नियंत्रक यंत्रणांकडून संस्थळ चालवणार्‍या व्यक्तींना विनाकारण त्रास होऊ शकतो. म्हणून संपादकाची कात्रीही आवश्यकच. त्यात समतोलपणा राहील अशी अपेक्षा आहे.
अजूनपर्यंत तरी मला आक्षेपार्ह संपादकीय कात्री चालल्याचे दिसलेले नाही. (हिमानीबाईंच्या धाग्यावरील एक प्रतिसाद वाचण्यापूर्वीच संपादित झाला त्यामुळे त्यावर भाष्य करता येत नाही).

लेखन करताना किंवा प्रतिसाद देताना (विशेषत: सामाजिक विषयांवर) डोळ्यावर चष्मा असणे स्वाभाविक आहे पण व्यक्तिगत निंदा टाळावी. तसेच वाद करताना शत्रुत्वाची भावना असू नये.

खराटा
(रंग माझा वेगळा)

आम्हाघरीधन's picture

19 Jun 2009 - 10:53 am | आम्हाघरीधन

मिसळपाव हे एक मराठी संकेतस्थळ आहे आणि सर्व मराठी माणसाला आपले वाटावे यासाठी प्रयत्न व्हावेत अशी माझी वैयक्तिक भावना आहे.
जशी ती विकासच्या/खराटाच्या लेखनातुन दिसुन आली आहे.

हे संकेत्स्थळ तसे पाहता मर्यादित व्यक्तिच वापर करतात हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. याची सभासद सन्ख्या कशी जास्तीत जास्त वाढविता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. केवळ अभिजात मंडळिंचे संकेतस्थळ अशी याची हेटाळणी झालेली आपणाला मान्य आहे काय?

आपण कुठे जन्माला येणे आपल्या हातात नसते हे आपणाला मान्य आहे तसेच इतरांवर जातीच्या आधारावर टोकाची टिका करणे सुद्धा मान्य नसावे. गुणदोष जरूर दाखवावे परंतु त्यात द्वेष नसावा.

शेवटी...
तुमचे आमचे नाते काय?
जय जिजाऊ जय शिवराय

प्राजु's picture

18 Jun 2009 - 10:52 pm | प्राजु

त्यामुळे निदान स्वतः मुळे ती चर्चा आणि त्यातून नकळत पडणारी फूट वाढत नाही...(एक कारण हात शिवशिवत असूनही हिमानी सावरकरांच्या पत्रावरील चर्चेत मी पडलो नाही ते).

एक्झॅक्टली!! म्हणूनच मी ही काहीही लिहिलं नाहीये त्या धाग्यात. मीच काय.. पण विकासदादा तुम्हीही!! चतुरंग यांनी संपादक म्हणूनच कारवाई केली आहे फक्त.. स्वत:च मत मांडलेलं नाही. तात्या, बिरूटेसर, आदिती यांनीही काहीही लिहिलेलं नाहीये. ज्या चर्चातून काही निष्पन्न होणार नाही किंवा आपण इथे चर्चा करून प्रत्यक्ष काम करणारे लोक जसे त्या हिमानी बाई आणि संभाजी ब्रिगेडवाले लोक.. यांना काहिही फरक पडणार नाही अशा चर्चातून आपल्याच लोकांशी काय भांडायचं?? सोडून देणे, दुर्लक्ष करणे हेच योग्य. मी तरी कुठेही अशी चर्चा वाचली की पान पलटून टाकणे हेच योग्य समजते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

18 Jun 2009 - 11:10 pm | रेवती

तेच म्हणतीये!
आधीही असेच काही धागे येऊन गेले तिकडे लक्ष दिले नाही. आपण त्यात भाग घेत नसलो तर जातीयवाद वगैरे चर्चा किती फोल आहेत हे लगेच लक्षात येते. हिमानीबाईंच्या पत्राचा धागा सुरू झाल्यावर माझेही हात शिवशिवले, अर्थात प्रतिसादाचा अर्थ वेगळा होता, पण आज बघते तर धाग्याचे रिळ बरेच घरंगळले होते.;)
आपले विचार बरोबर आहेतच पण आता हात शिवशिवले तरी अश्या धाग्यांकडे मी फिरकणार नाही.

रेवती

यशोधरा's picture

18 Jun 2009 - 11:15 pm | यशोधरा

आवडला हा लेख.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 12:27 am | विसोबा खेचर

विकासरावांचा हा अभ्यासपूर्ण प्रस्ताव पाहून मी किती सुयोग्य व्यक्तिची संपादक म्हणून निवड केली आहे याबद्दल माझे मलाच खूप समाधानी वाटले!

मिपा अत्यंत योग्य व्यक्तिंच्या (संपादकांच्या) हाती आहे असे अगदी आनंदाने म्हणू इच्छितो..

आणि खरे सांगायचे तर मिपाच्या सुरवातीपासूनच,

"मिपाला सर्वच जाती, धर्म, पंथ याबद्दल नितांत आदर आहे परंतु मिपावर या संदर्भात कुठलीही चर्चा अथवा लेखन होऊ नये असे धोरण आहे!"

असे वेळोवेळी म्हटले आहे..

असो,

मालक, तसेच एक सामान्य मिपाकर या नात्याने माझा विकासरावांच्या वरील चर्चाप्रस्तावाला संपूर्ण पाठिंबा आहे...

आपला,
(समाधानी) तात्या.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 12:37 am | विसोबा खेचर

या निमित्ताने मी चतुरंग, मुक्तसुनीत, केशवसुमार, प्राजू, विकास, चित्रा, मृदुला, नीलकांत, बिरुटेसर, नंदन, प्रियाली या सर्वच संपादकांचा ऋणी आहे असे म्हणू इच्छितो...

तात्या.

अडाणि's picture

19 Jun 2009 - 12:43 am | अडाणि

सुंदर विचार... आपल्या मॅचुरीटीची ओळख करून देतात....

-
अफाट जगातील एक अडाणि.

हिमानी सावरकरांवरचा धागा वाचताक्षणीच काल माझ्या मनात त्याचे पुढे काय होणार आहे ह्याचे चित्र आलेच होते - दुर्दैवाने तसेच घडले. चर्चा भरकटत गेली, जातीयवादी झाली आणि शेवटी तुझ्या प्रस्तावाला जन्म देऊन गेली! (ह्यातली फक्त शेवटली गोष्ट चांगली झाली! :) )

'आधी केले मग सांगितले' ह्याचे तातडीचे पालन म्हणून मी तो धागा अप्रकाशित करुन टाकला आहे!

तू म्हणतोस ते खरे आहे की जातीयवादाचा तिढा हा आपल्या मनातून ह्या गोष्टी हळूहळू हद्दपार करत नेण्यानेच सुटणार आहे. हे एका पिढीत घडेल असे नव्हे पण आपण सुरुवात तर करायलाच हवी तरच मुले शिकणार.
सध्यातरी मला एवढेच सुचते आहे. पुढे आणखी काही मुद्दे सुचल्यास टाकेनच.

चतुरंग

छोटा डॉन's picture

19 Jun 2009 - 7:19 am | छोटा डॉन

हिमानी सावरकरांवरचा धागा वाचताक्षणीच काल माझ्या मनात त्याचे पुढे काय होणार आहे ह्याचे चित्र आलेच होते - दुर्दैवाने तसेच घडले. चर्चा भरकटत गेली, जातीयवादी झाली

सौ टके की बात रंगाशेठ.
आम्हीही ह्या धाग्याचे भविष्य आधीच वाचले होते म्हणुन टंकवा ( टंकायचे कष्ट वाया ) घालवले नाहीत, युसलेस काम आहे अशा विषयांवर वाद घालणे ...

असो, विकासराव तुमचा प्रस्ताव आवडला.
आपल्या विचारांचे कौतुक आहे.
आम्ही आधीपासुनच जातीय व धार्मिक ( म्हणजे २ धर्मातील तेढ वगैरे , एखाद्या धर्मातील अनिष्ठ प्रथांविरुद्ध हरकत नाही ) वादात "पडायचे नाही" असे स्वतःलाच बंधन घालुन घेतले आहे.
पाहु आता किती फरक पडतो आहे तुमच्या प्रस्तावाचा ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

धनंजय's picture

19 Jun 2009 - 1:49 am | धनंजय

पण जसे मुद्दे मांडले आहेत तशा मुद्देसूदपणे उत्तर देता येत नाही. म्हणून काही ढोबळ आणि सैल विचार. (या सैल विचारांत लेखाशी असहमती नाही :-) )

हिमानी सावरकर यांच्या पत्रातील मुद्दे मला पटले नाहीत, पण त्यांची पोटतिडिक मला प्रामाणिक वाटली. (हिमानी सावरकर माझ्या ओळखीच्या नाहीत. पण साधारण अशा प्रकारची, माझ्या मतांच्या विरोधातली, कळकळ प्रामाणिकपणे असलेले लोक मला माहीत आहेत.) हात शिवशिवत असून मी त्या चर्चेत भाग घेतला नाही. कारण चर्चा करण्यासाठी इथपासून सुरुवात करावी लागते - "या बाबतीत आपले पटत नाही, तरी मूलभूत अशा अमुक बाबतीत आपले पटते." मग तिथून चर्चा वाढवत जाता येते.

बर्‍याच लोकांना आपले स्वतःचे बोलणे/वागणे कमालीचे न्याय्य वाटते. त्यामुळे "आपण नेहमीच अत्यंत नियंत्रित बोलतो, रागावतो तेव्हा रास्तच रागावतो" असे त्यांना वाटते. स्वनियंत्रणाचा हा सुज्ञ सल्ला ऐकून अनेक वाचक (म्हणजे मीसुद्धा!) लगेच सहमत होतील, पण वागण्यात मोठा फरक मात्र काही करणार नाहीत.

अशा परिस्थितीत संपादकीय धोरण महत्त्वाचे. थोडीशी अतिरंजित चर्चा, थोडासा आक्रसताळेपणा चालू द्यायचा, पण (संपादन मंडळाच्या दृष्टीने) अतिरेक झाला की (शल्यचिकित्सकासारखा बेतलेला) हस्तक्षेप करायचा, हा मार्ग अपरिहार्य दिसतो.

("जात" या विषयाबद्दल वागण्यात व्यक्तीने निरपेक्ष व्हावे, याबाबत मी सहमत आहे. पण समाजात सांख्यिकी दृष्टीने बघताना "समानतेची किती प्रगती झाली आहे?" हे वेळोवेळी मुद्दामून जोखावे, असेही मला वाटते. म्हणजे व्यक्तिगत वागण्यातली निरपेक्षता हवी पण सामाजिक आंधळेपणा नको. पण हा अर्धवट असहमतीचा मुद्दा वेगळा आहे. स्वनियंत्रण+सुज्ञ संपादन धोरण या विषयाबद्दल माझी सहमती आहे.)

चित्रा's picture

19 Jun 2009 - 7:31 am | चित्रा

बरेचसे मुद्दे मान्य. (मी स्वत: हिमानीबाईंच्या चर्चेत भाग न घेण्याचे कारण म्हणजे तो धागा कसा पुढे जाणार याची साधारण कल्पना आधीच आली होती आणि त्यात वेळ दवडण्याची इच्छा झाली नाही. ) एक मोठा प्रतिसाद लिहीला होता (कधी नव्हे ते) पण तो प्रकाशित करण्याआधीच माझ्या हातून पुसला गेला.

त्यामुळे अधिक खोल न जाता प्रस्तावाबद्दल एकदोन मुद्दे मांडते.

ऐतिहासिक किंवा तशा विषयांसंबंधी बोलत असताना जातींचे आणि त्यासंबंधीचे विषय येतात. त्यामुळे संपूर्णपणे वरील धोरण पाळणे शक्य होणे कठीण दिसते.

शिवाय अशा चर्चा न केल्याने किंवा विषय टाळल्याने काय होईल? आधीची मते/पूर्वग्रह बदलण्याची कितपत शक्यता उरेल? समेटाची काय शक्यता उरेल? निदान या चर्चांद्वारे लोकांची मते कळतात. अर्थात हे सर्व एका मर्यादेत असावे ही अपेक्षा रास्त आहे. जेव्हा लिखाणाच्या सामान्य मर्यादा सोडून लिहीले जाते तेव्हा ते संपादन करावे असे म्हणणे ठीक आहे असे मला वाटते. बाकीच्या वेळी शक्यतो लिहू द्यावे.

आता बरेच काही उलटेसुलटे लिहीले गेले आहे. म्हणून समेटाचा एक जुना विकीवरील माहितीप्रमाणे) प्रयत्न हल्लीच वाचला त्यावरून लिहीते -

सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई असे कादंबर्‍यांमध्ये वाचले होते. पण ती जन्माने कदाचित चांद्रसेनीय कायस्थ प्रभू असावी हे विकीवरून कळले (यात विकीवरच म्हटल्याप्रमाणे संदेह आहे, ती ब्राह्नण होती का सीकेपी). हा विवाह शाहू महाराजांनी लावून दिल्याचे कळते. याला पेशव्यांनी विशेष विरोध केला नाही, अर्थातच गोपिकाबाईंना ही भावजय विशेष पसंत नव्हती. तसेच नंतर नानासाहेबांच्या मुलास - विश्वासराव पेशव्यांस जी वधू नेमस्त केली गेली तीही याच पार्वतीबाईंची नात्यातील मुलगी -राधिकाबाई - गुप्ते घराण्यातील. (या घराची /विशेषतः स्त्रियांची नंतर पानिपतानंतर दुर्दैवाने फरफट झाली. सदाशिवरावांची मुलगी काशीबाई ही आई आणि विश्वासरावांच्या नियोजित वधूबरोबर उत्तरेत असताना ज्यांच्याकडे आश्रयास होती त्या पंजाबी सरदार घरातल्या मुलाशी करून दिले गेले). हे अर्थात विकीवरची माहिती आहे, तपासलेले नाहीत. पण असे असल्यास समेटाचा/आंतरजातीय विवाहांचा सुयोग्य पायंडा घालण्याचा प्रयत्न त्या कर्मठ काळातही शाहूमहाराजांनी केला असे म्हणता येते.

अशी हल्लीचीही उदाहरणे आहेत, ती आशादायक आहेत. हल्लीच एका मिपाकराकडून अशीच आनंददायी आणि आशादायक बातमी मिळाली आहे. त्यामुळे सतत जुने हेवेदावे करीत राहायचे यात कसलेही शहाणपण नाही एवढेच एक बोलावे असे वाटले.

शिवाय अशा चर्चा न केल्याने किंवा विषय टाळल्याने काय होईल? आधीची मते/पूर्वग्रह बदलण्याची कितपत शक्यता उरेल? समेटाची काय शक्यता उरेल? निदान या चर्चांद्वारे लोकांची मते कळतात.

हे महत्त्वाचे. चर्चेत भान न घेउन काहीच साध्य होत नाही. पण योग्य प्रकारच्या सहभागाने एकाचे जरी मतपरिवर्तन (योग्यदिशेने) होत असेल तर मी ते चर्चेचे यशच म्हणेन.

जरी तुमचा प्रस्ताव पटण्यासारखा असला तरी "टाईम पर्सन ओफ दी इयर" असलेल्याला( :) ) असा प्रस्ताव थांबवु शकतो असे मला वाटत नाही. आणि जर अश्या वेळी जाणकारांनी चर्चा दुर्लक्षिल्या तर त्या चर्चेतुन चुकीचा संदेश दिला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही(अर्थात हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न झाला की चर्चेत सहभागी व्हायचे की नाही.) त्यामुळे संपादन व (मर्यादीत)संयम हा मार्ग ठीक वाटतो.

शाहरुख's picture

19 Jun 2009 - 7:40 am | शाहरुख

विकास,
तुमचे स्वनियंत्रण व संयमाचे उत्तम रितीने मांडलेले विचार आवडले, पटले आणि आचरणात आणण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल (माझ्यामते मी प्रामाणिकपणे करतोय, पण धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे मला माझे म्हणणे कमालीचे न्याय वाटत असावे). जर माझ्या प्रतिसादाने सभासद "पेटले" असतील तर जाहीर माफी !!माझे शिवशिवणारे हात समज कमी असल्याने कळफलकाकडे गेले.

संपादनाबद्दल मात्र माझी काहीशी वेगळी मतं आहेत...असो.

बाकी, ड्रुपल मधे सोय असल्यास, धागे अतिरंजितपणा आणि आक्रस्ताळपणा याची मर्यादा ओलांडतात तेंव्हा थांबवावेत, अप्रकाशित करू नयेत असे वाटते...अशाने आपण 'इतिहास' पुसुन टाकत आहोत :-)

~शाहरूख भाई

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2009 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकासरावांचा चर्चा प्रस्तावातील स्वनियंत्रणाचा मुद्दा अगदी मान्य. हिमानी सावरकराच्या पत्राबाबतची चर्चा वेगवेगळे संदर्भ देत चांगली करता आली असती, पण मागील काही चर्चे प्रमाणे ती अधिक वयक्तीक होत गेली. जातीचा अभिमान बाळगून अशा चर्चेत सहभागी झाले की, ती चर्चा वेगळे वळण घेते, असे होऊ नये, असे मात्र प्रामाणिकपणे वाटते.

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

19 Jun 2009 - 11:25 am | नितिन थत्ते

हिमानीबाईंचा धागाच उडवलेला दिसतो.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मराठमोळा's picture

19 Jun 2009 - 11:51 am | मराठमोळा

वा! विकासरावांचे अभिनंदन!
ह्याला म्हणतात खर्‍या अर्थाने सुशिक्षित माणसाचे लिखाण.

काही लोकं स्वत:ला सुशिक्षित म्हणवतात परंतु जातीचा विषय निघाला कि जनावरासारखे वागतात. हा पत्राचा धागा प्रकाशित झाला तेव्हाच प्रतिसाद देऊन तो धागा उडवण्याची विनंती लेखकाला करणार होतो.पण ते म्हणजे जन्मतः अंध व्यक्तीला सुर्योदय कसा दिसतो हे समजावुन सांगण्यासारखे होते, त्यामुळे टाळले.
आपल्या पिढित जरी हे जातीयवादाचे विष मुरलेले असले तरी ते पुढच्या पिढीपर्यंत पोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

विकास's picture

20 Jun 2009 - 7:40 am | विकास

सर्वप्रथम सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद! माझा चर्चेचा मुळ उद्देश या संदर्भात पण चर्चा होणे महत्वाचे आहे असा होता. जेंव्हा मी संयम, संपादन या संदर्भात बोलतो आणि जात या विषयावर बोलूच नये म्हणतो तेंव्हा त्यात मला कल्पना आहे की टोकाची भुमिका वाटू शकेल आणि तशी ती असते देखील. मात्र असे म्हणायचे कारण इतकेच की इतिहास उकरून काढण्याच्या निमित्ताने आपण सगळेच कुठेतरी जाती पेक्षा जातियता अडमुठेपणाने टिकवून ठेवायचा प्रयत्न करत नाही आहोत ना या वर सामुदायीक परीक्षण व्हावे. बर्‍याचदा असले मुद्दे - जातीय, प्रांतिय आणि धार्मिक हे राजकारणी आणि उद्योग धंदे हे स्वतःच्या स्वार्थासाठी करतात आणि त्यात सर्व पक्ष कधी ना कधी स्वत:ची मलई काढून घेतात. सामान्य मतदार मात्र त्यात स्वतःला फसवून घेतो आणि सामाजीक नुकसान करतो....असो, थोडक्यात वर आलेल्या काही मुद्यांसंदर्भातः

  1. "चतुरंग म्हणतो: जातीयवादाचा तिढा हा आपल्या मनातून ह्या गोष्टी हळूहळू हद्दपार करत नेण्यानेच सुटणार आहे...." - हेच म्हणायचे आहे. यातील हळूहळू या शब्दास देखील "हद्दपार" या शब्दाइतकेच महत्व आहे. सामाजीक बदल हे क्रांतीने होतात अथवा उत्क्रांतीने. माझे म्हणणे चतुरंगप्रमाणेच "उत्क्रांती"वर (हळूहळू हद्दपार) आधारीत आहे. तसेच मत मराठमोळा यांचे दिसले.
  2. धनंजय, चित्रा, nile आणि कर्कः मोकळी चर्चा होणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच मी अशा चर्चांमधे असाच सूर लावला तरी त्या काढून टाकाव्यात असे म्हणले नाही. पण कुठेतरी तसे करत असताना सामाजीक प्रौढत्व येणे गरजेचे आहे. ज्यांना जातीचा अभिमान बाळगायचा असेल, त्यांनी स्वत: नक्की आज आपण नक्की काय जातीमुळे आलेले कुळाचार पाळतो याचा विचार करून बोलावे. ज्यांना इतर जातींचा तिरस्कार आहे त्यांनी नक्की आपल्याला, आपल्या पिढीला, व्यक्तिगत इतर जातींकडून काय त्रास झाला या संदर्भात विचार करून बोलावे. बिरूटेसरांनी म्हणल्याप्रमाणे अशा प्रकारच्या चर्चा ह्या संदर्भांचे आदानप्रदान करत करायला काही हरकत नाही. न पेक्षा मिपा अथवा इतर अशी अनेक संस्थळे ही असल्या जातिय भांडणाला "सेफ हेवन्स" ठरतील.
  3. शहारूख यांची कल्पना चांगली आहे: एखादी चर्चा ताळतंत्र सोडत असल्यास अप्रकाशीत करण्याऐवजी लॉक करायची कल्पना आणि त्यामुळे ती वाचकांना दिसेल अशी व्यवस्था करणे महत्वाचे वाटते. (हिमानीबाईंचा धागा अप्रकाशित केला आहे - मी नाही पण चर्चा घसरत चालली हे पाहून इतर कोणी सुजाण संपादकाने).

सरतेशेवटी हिमानी सावरकरांबद्दलः हिमानी सावरकरांचा उद्देश हा द्वेष पसरवणे नक्कीच नसावा मात्र त्यांच्या अ‍ॅक्शनची परीणती जर त्यातच होत असेल तर त्याला पाठींबा देणे योग्य वाटत नाही. त्यांच्या काकांचे (नथुराम गोडसेंचे) म्हणणे आणि गांधींजींबद्दलचे राजकीय मुद्दे कुणाला कितीही मान्य असले/होवू शकले तरी त्यांच्या अ‍ॅक्शनचे परीणाम आपण आजही सर्वत्र भोगत आहोत असे वाटते. सावरकरांचे वाक्य वाचल्याचे आठवते की स्वतंत्र (लोकशाही) राष्ट्रात विरोध हा बॅलटने दाखवावा बुलेटने नाही. पण त्यांच्या पुतणसुनेचे तसे विचार वाटत नाही. हिंदू राष्ट्र ह्याचा सावरकरी अर्थ त्यांना समजला आहे असे वाटत नाही. पण तो वेगळ्या वादाचा मुद्दा आहे.

आणि दादोजी कोंडदेवांसंदर्भात - माझ्याकडे ब्रिटीशकालीन संदर्भ आहेत. मात्र मी येथे त्यावरून नवीन धागा काढू इच्छित नाही. ज्यांना "अभ्यासासाठी" हवे असतील त्यांनी अवश्य व्य.नि. करा. (कुरघोडीसाठी वापरू नये ही विनंती).

धन्यवाद.

Nile's picture

20 Jun 2009 - 8:08 am | Nile

शहारूख यांची कल्पना चांगली आहे: एखादी चर्चा ताळतंत्र सोडत असल्यास अप्रकाशीत करण्याऐवजी लॉक करायची कल्पना आणि त्यामुळे ती वाचकांना दिसेल अशी व्यवस्था करणे महत्वाचे वाटते.

+१. अनेक संस्थळावरती quarantine forum असते तिथे वाचक पोहोचु शकतो पण प्रतिसाद देउ शकत नाही. हा मार्ग मला तरी जास्त योग्य वाटतो. लोक त्या चर्चेतुन अनेक गोष्टी शिकु शकतात. (अर्थात ड्रुपल वर ही सोय करणे किती अवघड आहे माहीत नाही, bb va phpbb फोरम्स मध्ये ही सोय अगदी सहजगत्या करता येते.)

अ-मोल's picture

20 Jun 2009 - 1:03 pm | अ-मोल

प्रस्तावाचे स्वागत.
या धाग्याला मीही प्रतिक्रिया दिली होती.
मात्र, अशा चर्चा फोल असतात, हेही लगेच ध्यानात आले.
धागा उडवला हे बरेच झाले.

(जातीने आता जाते म्हणायलाच हवं!)

ऋषिकेश's picture

20 Jun 2009 - 6:28 pm | ऋषिकेश

धागा उशीराच वाचला .. आवडला... पटला.
सार्वजनिक स्थळांवरून कायद्याने, जबरदस्तीने वगैरे जात जाईल याची वाट बघण्यापेक्षा स्वतःपासून सुरवात करणे केव्हाही उत्तम.

स्वनियंत्रणाच्या बाबतीत प्रस्तावास सक्रिय अनुमोदन राहील.
तेव्हढं संपादनाचं तुम्ही (पक्षी: संपादकांनी) बघा ;)

बाकी जातीने आता जाते म्हणायला हवं ह्या अ-मोल यांच्या वाक्यावरही +++१.. :)

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे