मला व्यसन लागलंय लिहायचे.. कुठेही गेले फिरायला की डोक्यात संवाद सुरू .. अरे हे मस्त ठिकाण आहे.. लिहीता येईल याच्यावर..फोटोज काढले की हा चांगलाय.. असला मॅक्रो कोणीच काढला नसेल.. टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली/मिपावर वगैरेवर.. किंवा चक्क जोक झाला तरी मला तो पटकन ब्लॉगवर टाकावासा वाटतो..
तसं प्रत्येक वेळेला करता येत नाही, आणि होत नाही तेच बरं.. नाहीतर प्रत्येक महीन्याची मे सारखी परिस्थिती व्हायची!पण काल हाईट झाली! म्हणजे खरंच हाईट.. मला मानसोपचारतद्न्याकडे जावं लागेल.. काल रात्री अर्धवट झोपेत मला या पोस्टचा विषय सुचला.. नुसताच विषय नाही! तर सगळं पोस्ट मी झोपेत फ्रेम केले.. सुरवात अशी.. मग असं लिहूया वगैरे... मी लिटरली (अर्धवट)झोपेतून जागी होऊन बघायला लागले.. काय होतंय नक्की?? मग मला पोस्ट सुचलं हे कळल्यावर तेव्हा उठून मी पोस्ट टाईप करणार होते.. पण जरा अतीच झाले असते ते.. मग राहीले...
आता आठवल्यावर लिहीले पाहीजे ना तसे.. पण सुरवात काही आठवत नाही आता.. इतकी छान होती ती झोपेतली सुरवात... आता जाऊदे...
तर ... ते पोस्ट फार भारी नसून साध्या आपल्या रंगांवर होते.. येस्स... आठवली सुरवात! क्या बात है भाग्यश्री! त्वाडा ज्वाब न्नै.. ( वगैरे जे काय असेल ते.. मला मराठी धड येते.. बाकीच्या भाषा नाहीत! )
हां.. मी लहान असताना.. म्हणजे इयत्ता ४थी वगैरे.. तेव्हा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळ घालवायला (आणि आईच्या मागची भूणभूण कमी करायला ) मी आणि दादा एका नाट्य-शिबीराला जायचो.. झांबोकाका नामक माणूस ती शिबीरं घ्यायचा.. आय नो, नाव खूप कॉमेडी आहे... पण यात काहीही माझी क्रिएटीव्हीटी नाही! माझ्याकडे त्या शिबिरातून मिळालेली सर्फितिकिट्स सुद्धा आहेत! ( हो.. स-र-फि-ति-की-ट !! लहानपणचा माझा दावा असा, की फिकीट असा शब्द नसतो परंतू तिकीट असतो, तेव्हा तो वर्ड सर्फितिकीट असाच आहे!! ) तर ते झांबोकाका मस्तपैकी नाटकं लिहायचे, बसवायचे.. ती नाटकं मग भरत नाट्य मंदिरात सादर व्हायची.. इतक्या मुलांना घेऊन नाटक करणे म्हणजे खाऊ नाहीये... आदर वाटतो मला त्यांचा.. असो..
बरीच नाटकं केली.. हिमगौरी आणि सात बुटके, जसा राजा तशी प्रजा(ही नाटकाची थीम होती.. असं नाव नव्हतं.. श्या, नाव आठवतच नाहीए.. :( ).. आणि, रंग-रंगिले छैल छबिले !!
तर हे पोस्ट रंग-रंगिले छैल-छबिले बद्दल...
एकंदरीत असा प्लॉट होता.. (आईशप्पथ.. कसलं भारी वाटतंय.. एकदम कलाकार अभिनेत्री दिग्दर्शक वगैरे झाल्यासारखे!! )
प्लॉट असा होता , की एका चित्रकाराच्या रंगपेटीतले रंग एके दिवशी बोलायला लागले.. मग सगळे आपली महती सांगायला लागले.. त्याची मस्त गाणी रचली होती... हो, झांबोकाकांनी.. अजुन एक मुलगी होती मदतीला.. तिनेही रचली असावीत , कल्पना नाही... तर सगळे रंग आपली महती सांगतायत.. बाकीचे त्याची थट्टा करतायत.. पांढर्याची जास्तच.. मग शेवटी चित्रकार(म्हणजे माझा दादा) येऊन सगळ्यांना लेक्चर देतो, की तुम्ही सगळेच महत्वाचे आहात.. मग देवी सरस्वती येऊन पांढर्याची बाजून घेऊन सगळ्यांना झापते.. प्रार्थना होते.. आणि नाटक संपते!! :)
आठवतील तशी करूनच टाकते पोस्ट.. काही दिवसांनी विसरीन.. खरं म्हणजे हेच नाटक मी परत आमच्या कॉलनीच्या गणेशोत्सवात केले होते.. इन-फॅक्ट आत्ता तेच डोळ्यासमोर आहे.. त्याची व्हीडीओ कॅसेटही केली होती.. पण व्हीसीआर न वापरल्यामुळे कॅसेट खराब.. सो लिहून ठेवते आता...
मी निळी झाले होते.. ड्रेस नवीन आणला होता निळा.. हेबरबॅंड म्हणजे आपला हेअरबॅंड तो निळा.. पायात मोजे निळे.. इतकेच काय? गालाला निळे रूज आणि केसात निळी चमकी ओतली होती!! मी पुढे येउन गाणं म्हटलं होतं!! (किती त्रास श्रोत्यांना!! )..
"आभाळ निळे, डोंगर निळे .. निळासावळा.. कृष्णकन्हैय्या.. लालालाअलाअ.. (आठवत नाही.. ) शिवशंकर.. तो ही निळा... " (चाल: जीना यहॉं, मरना यहॉं.. इसके सीवा जाना कहा! म्हणून पहा! )
मग सगळ्या बाकीच्या कलर्सनी मला चिडवायचे.. for example , नीळू बाई नीळू नको आता पिळू! वगैरे...
मग लाल.. तो गजू होता.. त्याने तर काय कॉमेडी ड्रेस घातला होता.. त्याचा लाल टीशर्ट, माझीच लाल स्लॅक्स, वर लाल टोकाची टोपी , हातात लाल छ्डी आणि हो..गालाला लाल चमकी! :)) ..
गाणं होतं : "लाल टांगा घेऊन आला लाल टांगेवाला.. ऐसा लाला गाणे गातो, लल्लाल्ललालल्ला.. घोडा लालेलाल, त्याची शेपूट लालेलाल (आमचा कोरस : हेहॉ!" ) वगैरे... त्याला तांबड फुटलंवरून चिडवलं सगळ्यांनी!
पिवळा चिंटू.. त्याला गळ्यात सोनेरी कागदाचा केलेला हार.. बाय डिफॉल्ट येणारी त्या रंगाची चमकी.. आणि खाली चक्क काकूंची पिवळी जरतारी साडी, धोतर म्हणून ! तसा तो नाचत होता..
"पिवळा पितांबर नेसुनी लालालाला.. गरुडावर बैसोनी माझ्या कैवारी आला" वगैरे... काय होतं देव जाणे.. आरती टाईप होतं..
हिरवा ओंकार.. त्यालाही हिरवी टोपी, हिरवा टीशर्ट, हिरवी चमकी आणि माझा हिरवा स्कर्ट! त्यावरून हिरवी अशोकाची पाने... हाता-पायावर हिरव्या रंगाने चट्टेपट्टे.. !
गाणं : "हिरवे हिरवे गार गालिचे.. हरिततृणांच्या मखमालिचे .. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती!" याला काय चिडवलं आठवत नाहीये!
जांभळा : नचिकेत दादा.. त्याने कुठून तरी जांभळा पठाणी ड्रेस पैदा केला होता.. वर कोणाची तरी जांभळी ओढणी डोक्याला बांधली होती! गाणं अर्थातच ,
"जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजतो..हो हो हो ढोल..वाजतो, कोणाचा वाजतो!!"
त्याने जांभळ्याची महती सांगताना जांभूळ, करवंदं इत्याआडि टेस्टी प्रकार सांगितले होते ! आणि इतकी मस्त खायची ऍक्टींग करत..
काळा: आदित्य.. कॉस्चुम डिझाईनिंगला सगळ्यात सोप्पा रोल ! काळा टीशर्ट, काळी जिन्स.. संपलं! हो, ती चमकी आहेच...
"हम काले है तो क्या हुवा , दिलवाले है! (आमचा कोरस: अय्यो अय्यो!")
काळा रंग काय महत्वाचा आहेच! काळी माती, काळा फळा, विठोबा काळा वगैरे !
पण त्याला काय रिडिक्युल केलं आम्ही(नाटकात म्हणजे!) .. तू काळा आहेस.. तू बाजूला हो..वगैरे ! हेहे..
स्नेहल पांढरी.. ती आपली इतकी बिच्चारी दाखवली होती.. तिच्याकडे काही बोलायला पण नव्हतं.. गाणं तिनेही म्हटले पण ती इतकी दुर्लक्षित की मला आता आठवत नाही! तिलाही नाटकात इतका त्रास दिला! तुला काही रंगच नाही.. कॅन्व्हासवर आम्ही सगळे कसे छान उठून दिसतो.. तूझा काय उपयोग वगैरे...
मग ती रडायला लागते.. मग सर/चित्रकार येऊन सगळ्यांना ओरडतो.. समजावतो..
मग सगळे रंग सरस्वती देवीची प्रार्थना करतात.. ती प्रसन्न होते.. थोडं लेक्चर देते.. त्या कॅन्व्हास वर प्रत्येक रंगाला उडी मारायला सांगते.. कॅन्व्हास सगळा खराब होतो... मग ती म्हणते तुमच्या सर्वांमुळे हा खराब झाला! तो परत पूर्वीसारखा करून द्या आता?? सगळे मान खाली घालतात! पण पांढरा खुष असतो.. मग सरस्वती म्हणते, तुम्ही खराब केलेला कॅन्व्हास हा पांढराच पूर्ववत करू शकतो! मग त्याने तसे केल्यावर सर्व रंगांना आपली चूक उमगते.. ते पांढार्याला आपल्यात घेतात, आणि गातात.. "रंग-रंगिले छैल-छबिले" !!
खरंतर शेवटीही गाणं होतं एक.. ते ही विसरले.. :)
फार बालिश आहे हे.. पण माझं बालपण फार मस्त केलं या आणि अशा गोष्टींनी.. कॉलनीच्या गणेशोत्सवासाठी आईने बसवले होते हे नाटक.. तिला ते लिहीण्यासाठी मदत मी केली होती.. तेव्हा सगळी गाणी आठवत होती! त्यामुळे अगदी निर्मितीपासून भाग घेतलेले हे नाटक माझ्यासाठी फार आवडीचे !
प्रतिक्रिया
17 Jun 2009 - 2:10 am | बिपिन कार्यकर्ते
क्या बात है भाग्यश्री!!! मुक्तक शैलीत छानच लिहिलंय. लहानपणी (वय वर्षे ५) मी एका नाटकात 'शहरातला माणूस' झालो होतो. माझ्या आजोबांनी हौसेने बेल बॉटम पँट घेतली होती, त्यावर फुलाफुलांचं डिज्जायन होतं... अजून लक्षात आहे. या लहानपणच्या आठवणी आपल्या मेंदूतल्या 'रॉम' वर पर्मनंटली स्टोअर झालेल्या असतात. पटकन कधीही रिट्रिव्ह होतात. :)
बिपिन कार्यकर्ते
17 Jun 2009 - 10:28 am | पर्नल नेने मराठे
मला लहानपणी कृष्ण केले होते. पिताम्बर वैग्रे नेस्वुन स्टेजवर जायला
लावले. मी गेले तोच पब्लि़क मधे हशा.. :S
कारण माझे कॅनवासचे बुट तसेच पायात होते.. :D
वर पिताम्बर व खाली कॅनवासचे बुट काय पात्र दिसत असेल नाहि 8}
चुचु
17 Jun 2009 - 10:30 am | भाग्यश्री
हेहे सहीच गं चुचु!! :)
http://www.bhagyashree.co.cc/
19 Jun 2009 - 1:21 pm | विनायक प्रभू
असेच बोल्तो.
फक्त शहरातला माणुस च्या ठीकाणी
पोस्ट ऑफिसचा डब्बा.
17 Jun 2009 - 3:24 am | Nile
same pinch!!! त्यामुळे आता जीमला जायला सुरुवात केलीये! ;)
बाकी एकदम लहानपणीचे रंग आठवले. एकदा मला असच बळजबरीने स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात घेतलं होतं आणि मग मी काय रंग उधळले होते हे न सांगणेच बरे. :D
17 Jun 2009 - 4:22 am | लंबूटांग
मी पण ह्या नाटकात काम केले होते. पण खूपच छोटा रोल होता :P ..
सरांचा..
पहिले आणि सगळ्यात शेवटी फक्त काम होते. पण सॉलिड मजा आली होती काम करताना सगळ्यांबरोबर...
त्यानंतर अजून एक केले होते कसले तरी फळ भाज्यांचे (नाव आठवत नाहीये आत्ता पट्कन).. त्यात पडवळाचे काम केले होते.. लंबूटांग ना आम्ही :)
17 Jun 2009 - 7:46 am | क्रान्ति
सुरुवात खूपच आवडली. सर्फितिकिट पण भारी! लहानपणी एखादा शब्द स्वतःला हवा तस्साच बदलून म्हणायची सवय किती मजेदार असते नै! मस्त रंगरंगील्या आठवणी! बालपणात घेऊन जाणा-या. शाळेत असताना कधीतरी एकांकिकेत छोट्या स्वप्नाळू मुलीची भूमिका केली होती, त्यानंतर कुणाची हिंमत नाही झाली अभिनय कर असं सांगायची!
;)
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
17 Jun 2009 - 7:58 am | संदीप चित्रे
माझ्याही लहानपणीचं आवडतं गाणं होतं.
माझ्या मामीने शिकवलं होतं.
लेखाचा विषय आणि शीर्षक दोन्ही आवडलं.
------
सही तयार करण्याच्या वेबसाईटबद्दल स्पेशल धन्स. आता जरा प्रयत्न करून बघतो सही सही 'सही' करता येतेय का ते :)
माझ्यातर्फे एक मॉर्ल्टन चॉकलेट नक्की ... कधी भेटतेस सांग :)
17 Jun 2009 - 8:15 am | टारझन
आठवणी के व ळ अ प्र ति म !!!!
-(टारंगिला)
17 Jun 2009 - 8:03 am | यशोधरा
मस्त लिहिलंस गं :)
17 Jun 2009 - 9:07 am | भाग्यश्री
सगळ्यांना थॅंक्स माझे बालिश चिमखडे बोल ऐकून घेतल्याबद्दल..!! :)
यशो,क्रांती,नाईल, बिपिनदा धन्यवाद!
लंबूटांग तूही झांबोकाकांकडेच जायचास की काय! बायदवे, मीही त्या भाज्यांच्या नाटुकलं/गाण्यात भाग घेतला होता.. मी भेंडी का वांगे होते.. :))
रंगीत प्रतिसादासाठी धन्यवाद टारंगिला!
संदीप मोल्टन केक साठी वाट्टेल ते! :) बीएमएमला येऊ का सांग!
http://www.bhagyashree.co.cc/
17 Jun 2009 - 9:34 am | यन्ना _रास्कला
टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली/मिपावर वगैरेवर
आप्ल मिपा तिस्र्या नंबरावर? :(
आसो.
सहि मराठीमंदी करा कि, पिलिज.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
17 Jun 2009 - 10:03 am | भाग्यश्री
का बुआ या दोन्ही गोष्टींचा अट्टहास?? मी "यादी आवडीनुसार" असे लिहीले नाहीये..
तसेच सही कुठल्या भाषेतून रादर लिपीतून करावी हा वैयक्तिक प्रश्न आहे माझा..
धन्यवाद एनीवेज..
http://www.bhagyashree.co.cc/
17 Jun 2009 - 10:16 am | यन्ना _रास्कला
तुमी त रागावले. घुस्सा थूक दो. चिढु नका. मी आप्ल आसच बोल्लो.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
17 Jun 2009 - 11:28 am | स्वाती दिनेश
शीर्षक वाचून हे नाटुकलेच आठवले आणि चक्क तू त्याच्यावरच लिहिले आहेस आणि मस्त लिहिले आहेस.
माझ्या बहिणीने ह्या नाटकात काम केले होते आणि ते नाटक कुमारकलाकेंद्राच्या स्पर्धेत नेले होते,गडकरीला स्पर्धा झाली होती, मी विंगेत .. सगळे नीट होते की नाही पहात.. २रे बक्षिस मिळाले होते नाटकाला.. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या..मस्त वाटलं..
स्वाती
17 Jun 2009 - 8:02 pm | सुबक ठेंगणी
भाग्यश्री, छान जसं सुचलं तसं लिहिलं आहेस्...बाकी झोपेत पोस्ट मला पण होतं कधी कधी...
बाकी ती 'सही' साईट कुठली बरं?
17 Jun 2009 - 9:02 pm | गणा मास्तर
भाग्यश्रीच्या सहीवर टिचकी मारा म्हणजे उघडेल ती 'सही' साईट
आपला अंगठाछाप
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
17 Jun 2009 - 8:27 pm | सूहास (not verified)
लेख झोपेत लिहील्या सारखा वाटत नाही...
<<गालाला निळे रूज आणि केसात निळी चमकी ओतली होती!>>
एकदम निलाश्रीच की...
मला माझ्या मास्तरानी घेतल होत ते राधा म्हणुन्,,,आणी मला घागरा-चोलीच ते जाड-जुड कापड.काय -काय त्याला लावलेल घालुन ऊभ केल होत ,ती चोली सारखी बोचत होती..त्यादिवशी सर्वा॑ना अ॑ग खाजविण्यार्या राधेच दर्शन घडल होत्..कृष्ण म्हणजे साक्षात माझे बधु॑राज्..तो अजुन कधी-कधी "सुराधा खाजवेकर" म्हणतो..
सुहास
17 Jun 2009 - 9:29 pm | भाग्यश्री
हेहे सुराधा खाजवेकर!! :)) भारी किस्सा!
बायदवे मी लेख झोपेत लिहीलाच नाहीये! लिहीला तेव्हा चांगली टळटळीत दुपार होती, रामराणा जन्मला ती! :)
सर्वांना धन्यवाद! एकुणात झोपेत पोस्ट्स सुचणे आणि हे नाटक, या दोन्ही गोष्टी मला नविन असल्या आणि एकदम वेगळ्या वाटल्या तरी बर्याच जनतेला माहीत आहेत/आधीपासून होतात अशी नव्याने माहीती कळली! हे नाटक इतके फेमस आहे याची कल्पना नव्हती.. रंगसप्तक नावाने हेच नाटक सादर होतं असंही कळले..
असो.. सर्वांना धन्यवाद! :)
http://www.bhagyashree.co.cc/
17 Jun 2009 - 10:08 pm | घाटावरचे भट
रंगपुराण आवडेश...
17 Jun 2009 - 10:10 pm | प्राजु
सह्ही! रंगबिरंगी लेखन आवडलं.
सर्फीतीकीट तर मस्तच!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Jun 2009 - 11:27 pm | रेवती
हीहीही!
छोटी मुले नाटक सादर करतायत असं डोळ्यासमोर आलं.
आपण लहान असताना फक्त नाटकासाठी म्हणून वापरायचे कपडे असेच कुणाकुणाकडून जमवायला लागायचे, आजकाल लगेच विकत आणताना बघते.
रेवती
19 Jun 2009 - 1:04 pm | विसोबा खेचर
रंगीबेरंगी लेख आवडला..!
आपला,
(भाग्यश्रीचा फ्यॅन) तात्या.