वृत्तपत्रातील अग्रलेखाबाबत काही निरिक्षणे.

विकि's picture
विकि in काथ्याकूट
11 Mar 2009 - 11:47 pm
गाभा: 

वृत्तपत्रात दररोज प्रसिध्द होणार्‍या अग्रलेखाबाबत काही निरीक्षणे मिपावर लिहीत आहे. याला आपण छोटासा सर्वेक्षण अहवालही म्हणू शकता.

वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजे त्या त्या वृत्तपत्राच्या संपादकाने होऊन गेलेल्या बातमीवर अथवा होणार्‍या घडामोडींवर(निवडणूक,निवडणूकीचे निकाल,साहीत्य संमेलने,इ) केलेले परखड भाष्य. अनेक नवे जुने संदर्भ अग्रलेखात सामाविष्ठ असतात. वृत्तपत्रक्षेत्रात अग्रलेखाला असणारे महत्त्वाचे स्थान ल़क्षात घेऊन हा विषय येथे लिहावासा वाटला.
महत्त्व : वृत्तपत्रक्षेत्रात अग्रलेखाचे महत्त्वाचे स्थान अबाधीत आहे कोणतीही घटना घडल्यास(जास्त करून राजकीय) वाचक त्या त्या दिवशी म्हणजेच दुसर्‍या दिवशी या बाबत संपादकाचे मत काय असेल याबाबत खुप उत्सुक असतो. याचे कारण कोणतेही वृत्तपत्र हे अपवाद सोडून कोणत्या ना कोणत्या राजकीय विचारांना वाहीलेले असते अशी प्रत्येक वाचकाची ठाम धारणा असते. त्यामुळे कोणतेही वृत्तपत्र घ्या त्या वृत्तपत्रात अग्रलेख हा असतोच. काही वृत्तपत्रांचा खप हा अग्रलेखांमुळे होतो.यावरून अग्रलेखाचे वृत्तपत्रातील महत्त्व लक्षात येते. अग्रलेखाची व्याती खुप मोठी आहे. काही अग्रलेख हे समाजमनावर परीणाम करणारे असतात(उदाहरणार्थ कोणाच्या भावना दुखावणे वैगेरे)त्यातुनच मग त्या वृत्तपत्राच्या अंकांची होळी करणे , वृत्तपत्रकार्यालयावर हल्ला करणे,कधी कधी तर थेट संपदकालाच लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यातुनच मग त्या वृत्तपत्रावर खटले भरणे इ.प्रकार घडतात. अग्रलेखाला थेट संपादकच जबाबदार असतो.त्यामुळे अग्रलेख लिहीताना संपादकाला चहूबांजूनी विचार करावा लागतो. अग्रलेख लिहीताना त्यात अनेक नव्या जुन्या संदर्भांचा त्यात समावेश करावा लागतो.त्यासाठी संपादकही तेवढ्या ताकदीचा असावा लागतो.यावरूनच अग्रलेखाची व्याप्ती लक्षात येते.
बहुसंख्य वाचकांच्या मते अग्रलेखातील लेखन संपादक आपल्या सोईनुसार करतात.
त्याचे तीन प्रकारे वर्गिकरण करता येईल. १)राजकीय विचार २) तटस्थ भुमिका ३) प्रसिद्ध व्यक्तीस मानाचा पुरस्कार मिळाल्यास अथवा प्रसिध्द व्यक्ती मरण पावल्यास लिहीण्यात येणारे अग्रलेख.
१) राजकीय विचार- बहुसंख्य वृत्तपत्र हे ठराविक राजकीय विचारांना वाहीलेले असतात अस वाचकांचे ठाम मत असते. उदा.काही वृत्तपत्रे धर्मनिरपेक्ष,धार्मिकता,साम्यवाद यांनुसार चालतात अर्थात साम्यवादाला जवळ करणारी वृत्तपत्रे फार कमी आहेत अथवा नाहीत. राजकीय विचारांना वाहीलेले वृत्तपत्रे व त्यातील अग्रलेख यांचे वाचकांना फार आकर्षण असते. एखादी घटना घडल्यास दुसर्‍या दिवशीच्या संपादकीयांत काय लिहीले आहे याची वाचकांस उत्सुकता असते. त्यावरून मग वाचकांच्या विचारांची देवाण घेवाण होते.उदाहरणार्थ एखाधा वाचकाने धर्मनिरपेक्ष विचार मानणार्‍या वृत्तपत्रातील अग्रलेख वाचल्यास व दुसर्‍या वाचकाने धर्मांध विचार मानणारे वृत्तपत्र वाचल्यास आणि या दोन्ही वाचकांनी एकामेकांशी संवाद साधल्यास त्यांत आजच्या या वृत्तपत्राच्या अग्रलेखात अस अस लिहीलय त्यावरून मग चर्चा आणि त्यावरून अखेरीस आपापल्या राजकीय विचारांस चालना मिळण्यास मदत होते.
तसेच बर्‍याचदा वृत्तपत्रातील अग्रलेख आताआतापर्यंत ठराविक राजकीय विचारांवर चालणारे तसेच एखाद्या राजकीय विचारांना अथवा पक्षाला विरोध करणारे त्यांचे अग्रलेख अचानक त्यांच्या बाजूने लिहू लागतात.त्यांना वाचक संपादकाने राजकीय सोईनुसार बदललेली भुमिका असे म्हणतात किंवा कधी कधी एखादया पक्षाने (संपादक ज्यांचे विचार मानत नाही तो) चांगले काम केल्यास संपादक त्यांविषयी अभिनंदनपर अग्रलेख लिहीतो. त्यावेळी अस न वाचण्याची सवय असल्याने वाचकांस धक्का बसतो.

२) तटस्थ भुमिका - वृत्तपत्रातील अग्रलेख हे कधी कधी तटस्थ भुमिका घेताना आढळून येतात. एखादी राजकीय घटना अथवा केंद्र,राज्य सरकारचे बजेट असल्यास अग्रलेखात विरोधी भुमिका न घेता तटस्थ भुमिका घ्यावी लागते. कोणालाही विरोध न करणे वा त्या बाजुनेही न उभे राहणे यांमुळे अग्रलेखात आपली भुमिका चांगल्या प्रकारे माडता येते.तटस्थ भुमिकेतील अग्रलेख कोणावरही आगपाखड न करणारे,शिवराळ,एकतर्फी नसतात. या प्रकारच्या अग्रलेखामुळे वाचकांस विचार करण्यास अधिक वाव मिळतो.

३) प्रसिद्ध व्यक्तीस मानाचा पुरस्कार मिळाल्यास अथवा प्रसिध्द व्यक्ती मरण पावल्यास लिहीण्यात येणारे अग्रलेख - एखादा प्रसिध्द व्यक्तीस मानाचा पुरस्कार मिळाल्यास त्यांना वृत्तपत्राच्या प्रथम पानावर बातमी मिळतेच पण त्या व्यक्तिबाबत अग्रलेखात संपादक आपली मते मांडतो. आवश्यक संदर्भ देऊन त्या व्यक्तिस मिळालेला पुरस्कार कसा योग्य आहे किंवा नाही याबाबत शहानिशा अग्रलेखात केली जाते.पुरस्कार प्राप्त व्यक्तीची प्रशंसाही केली जाते.त्याचप्रमाणे एखादी प्रसिध्द व्यक्ती मरण पावल्यास शोकसंदेशपर अग्रलेख लिहीले जातात. त्या त्या व्यक्तीचे समाजजीवनातील स्थान,त्याचे कार्ये याबाबत अग्रलेखात लिहीले जातात. याबाबत एक सांगावेसे वाटते जुन्या जमान्यातील एखादी प्रसिध्द व्यक्ती मरण पावल्यास तिच्यावर गौरवपर अग्रलेख लिहून त्या व्यक्तीबाबत विस्तृत स्वरुपात माहीती लिहिली जाते.त्यामुळे वाचकांस त्या व्यक्तिबाबत माहीती मिळण्यास मदत होते.
अग्रलेख हे संपादकीय भुमिकेवर अवलंबून असतात.संपादक कोणत्या विचारांचा आहे त्यावर अग्रलेखात भुमिका मांडली जाते असे वाचकांचे मत असते. अग्रलेखात मांडलेली प्रत्येक भुमिका वाचकांस पटेलच असे नाही.वाचकांस न पटलेली अनेक मते वाचक वृत्तपत्र कचेरीत पत्रे पाठवून व्यक्त करत असतात.प्रत्येक वृत्तपत्रे - त्यातील अग्रलेख हे वृत्तपत्राचे महत्वाचे स्थान असते. संपादकाने दिलेले योग्य संदर्भ ,मांडलेली मते यांमुळे वाचकाचे ज्ञान वाढते त्याचप्रमाणे अग्रलेख हे प्रामुख्याने राजकीय घडामोडींना वाहीलेले असल्याने अश्या प्रकारच्या अग्रलेखांमुळे वाचकांची राजकीय मते बदलण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे वाचकाच्या घरी येणारे वृत्तपत्र कोणत्याही एका नावाचे एकच येत असते.त्यात वाचक बदल करत नसतो.घरी येणारे वृत्तपत्र त्यांतील अग्रलेख वाचक दररोज वाचत असतात. यांखेरीज जर दुसर्‍या वृत्तपत्रात काही घटनांमुळे त्यातील अग्रलेख त्या दिवशी गाजत असेल तर वाचक कुतुहलापोटी ते वृत्तपत्र विकत अथवा एखाधा सहकार्‍या कडून घेतो.अग्रलेख हे राजकीय विषयाला वाहीलेले असल्यामुळे वाचकांना त्याची सवय जडलेली असते. कधीकधी आर्थिक ,सामाजिक,खेळ,इ. यांविषयावरील अग्रलेख प्रसिध्द होतात. तेव्हा असे अग्रलेख वाचताना वाचक कधीकधी कंटाळतात.
मराठी वृत्तपत्रांपैकी काही वृत्तपत्रात एकच अग्रलेख लिहीला जातो(उदा-दै.लोकसत्ता,दै.आपलं महानगर) तर काही वृत्तपत्रात दोन अग्रलेख लिहीले जातात (उदा-दै.प्रहार,दै.महाराष्ट्र टाईम्स)
आपला
कॉ.विकि

प्रतिक्रिया

आपला अभिजित's picture

11 Mar 2009 - 11:53 pm | आपला अभिजित

पण लेखाचा विषय वाचून वाटले, विविध व्रुत्तपत्रांच्या राजकीय, सामाजिक धोरणांवर काही भाष्य करणार आहात तुम्ही. तसे केले असते, तर अधिक योग्य ठरले असते.

असो.

बाय द वे,

वृत्तपत्रातील अगेलेखाबाबत म्हणजे?

`अग्रलेखाबाबत' असे म्हणायचेय ना?

विकि's picture

12 Mar 2009 - 12:09 am | विकि

चूक निदर्शनास आणल्याबाबत धन्यवाद.
तुम्ही लिहीलेल्या प्रतिसादाचा जरूर विचार करेन आणी त्याबाबत भाष्य करेन.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 12:01 am | बिपिन कार्यकर्ते

विकि, सर्वप्रथम, बर्‍याच दिवसांनंतर तुम्ही काही लिहिलेले वाचले. लिहित जा.

ही एक लेखमाला होणार आहे का? कारण या भागात तुम्ही फक्त उत्तम निरीक्षणे / वर्गिकरण केले आहेत. तुमचे भाष्य वाचणे आवडेल.

बिपिन कार्यकर्ते

धनंजय's picture

12 Mar 2009 - 12:04 am | धनंजय

विचारपूर्वक लिहिले आहे.

पण हा "तटस्थ भूमिकेतील अग्रलेख" प्रकार समजला नाही.

तथ्याचे इतिवृत्त बातम्यांतच येते. ज्या बातमीबद्दल "असे हवे/नको" मत असते, कुठल्या तरी बाजूला वाचकाचे मन वळवणे संपादकाला महत्त्वाचे वाटते, त्याच बातमीबद्दल, तोच कल घेऊन, अग्रलेख लिहिला जातो.

"आगपाखड न करणारे,शिवराळ नसणे, इ.इ." शालीनतेचे गुण असतात. पण "कुठलीच बाजू न घेतली" तर बातमी आणि अग्रलेखात फरक तो काय राहिला?

विकि's picture

12 Mar 2009 - 12:05 am | विकि

ही लेखमाला नाही आहे. निरीक्षण करताना जे महत्वाचे वाटले ते लिहीले आहे.

विकास's picture

12 Mar 2009 - 2:02 am | विकास

चांगला आढावा घेतला आहेत. वर बिपिनने म्हणल्याप्रमाणे, लिहीत जा. तसेच "आपला अभिजीत" ने म्हणल्याप्रमाणे भाष्य करण्याचा पण विचार करा. मराठी माणसांमधे मराठी अग्रलेख जितके लोकप्रिय आहेत तितके (बंगाल सोडल्यास) इतरत्र आहेत का हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल.

अग्रलेख हा प्रकार महाराष्ट्रात आणि मराठी मनात लोकप्रिय केला तो अर्थातच लोकमान्य टिळकांनी आणि त्यांच्याच बरोबरीने जरी लोकनिंदेचे धनी झाले असले तरी गोपाळ गणेश आगरकरांनी. स्वतःला मराठी येत नसताना देखील या दोघांनी "स्वराज्य/स्वकीयांबद्दलची तळमळ जर असेल तर ही मराठी लेखणीत उतरवता आलीच पाहीजे" हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे आव्हान, दोघांनी नेटाने पेलले. माहीती, मथळा आणि विचार याद्वारे लोकशिक्षण कसे करावे ह्या संदर्भात दोघांकडून आजही शिकण्यासाखे बरेच काही आहे.

आज महाराष्ट्रात अग्रलेख हा एक साहीत्य प्रकार आहे असे वाटण्यासारखे अनेक दिग्गज होऊन गेलेत. त्यातील पटकन आठवणारे म्हणजे: "काळ" कर्ते परांजपे, केसरीचेच नंतरचे संपादक न.चिं.केळकर, मराठाचे आचार्य अत्रे, म.टा. चे महाजनी-गोविंद तळवळकर, गोमांतक-मुंबई सकाळ-लोकसत्ताचे माधव गडकरी, साप्ताहीक सोबतचे ग.वा. बेहरे, नवाकाळचे खाडीलकर, लोकसत्ताचे कुमार केतकर आणि अर्थातच सामनाचे बाळ ठाकरे.

अग्रलेखाने काय होऊ शकते याची दोन उदाहरणे म्हणजे (ऐकीव/वाचलेल्या माहीतीप्रमाणे): अत्र्यांच्या अग्रलेखांतील बोचरी टिका तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवार पचवू शकले नव्हते. ("कन्नमवार की कंडमवार", "कन्नमवार झाडू मार" अशी काहीशी नावे होती) माधव गडकरींच्या अग्रलेख अंतुल्यांना भोवले.

बाकी आपल्याकडच्या विचित्र नियमांमुळे अग्रलेख कधी कधी भोवतात. कुठल्याही लोकप्रतिनिधींच्या सभागृहात घडलेल्या घडामोडींवर लिहील्यास "हक्कभंगाचा ठराव" येऊन तुरूंगात घालता येते. माधव गडकरीविरुद्ध असा ठराव झाला होता. त्याला कोर्टात सहजासहजी (अथवा अजिबातच) दाद मागता येत नाही. अग्रलेख न आवडल्याने होणार्‍या गुंडगिरीपेक्षाही लोकशाहीतील ही गंभीर दादागिरी आहे असे वाटते. जनतेच्या गुंडगिरीचे उदाहरण म्हणजे ग.वा. बेहर्‍यांना शिवसेनेवर ("सेनापती की शेणपती" असाच काहीसा मथळा) लिहीलेल्या अग्रलेखानंतर बसलेला मार... अर्थात नंतर त्यांचे नंतर एकमेकांशी चांगले जमले हा भाग वेगळा.

वर धनंजयने म्हणल्याप्रमाणे "तटस्थ" अग्रलेख हा प्रकार पटला नाही. वास्तवीक असे लिहीणारे फारतर कुंपणावरचे म्हणले पाहीजेत.

मृत्यूंनंतर लिहील्या गेलेल्या अग्रलेखांना मृत्यूलेख असे म्हणतात. तसे अग्रलेख लिहीणे ही एक कला आहे. अत्र्यांनी लिहीलेल्या केवळ मृत्यूलेखांवर ३ पुस्तके प्रकाशीत झालेली आहेत. (हुंदके, समाधीवरील अश्रू, आणि नेहरूंवरचे सुर्यास्त) ती वाचनीय आहेत. परस्पविरोधी व्यक्तीमत्वे त्यात असतील पण ती सहजतेने तोलली आहेत. गोविंद तळवळकर, माधव गडकरी आणि कुमार केतकर यांनी लिहीलेले मृत्यूलेखपण वाचनीय आहेत. कायमचे संबंध तात्विकभेदांनी तुटल्यावरही आगरकर गेल्यावर (त्यांच्या आठवणीत लिहील्या प्रमाणे) लेखनिकास डोळ्यातील अश्रू न आवरता सांगितलेला टिळकांनी लिहीलेला मृत्यूलेखपण वाचनीय आहे. तसाच त्यांचा गोपाळ कृष्ण गोखल्यांवरील अग्रलेख.

मराठी वृत्तपत्रांमधे साम्यवादी विचारांचे कमी संपादक अथवा विचार असतील मात्र इंग्रजी वृत्तपत्रात साम्यवादी नाही, पण डाव्या विचारसरणीचे समजले जाणारे अनेक आहेत. "दि हिंदू"चे एन राम हे त्याचे ठळक उदाहरण आहे. तसेच इतर अनेक डावे विचारवंत पत्रकार-संपादक-स्तंभलेखक म्हणून इंग्रजी वृत्तपत्रात असतातासे म्हणता येईल...

असो. जाता जाता वृत्तपत्रात आणि विशेष करून अग्रलेखात होणार्‍या टिकेसंदर्भात एकदा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी अशा अर्थी म्हणाल्या होत्या की "वृत्तपत्रे काय आज वाचली तरी उद्या त्यांची रद्दीच होते." वास्तवीक पंचमस्तंभाची ही अनावश्यक हेटाळणी होती. कालांतराने त्यांच्या निर्घृण हत्येनंतरची वृत्तपत्रे जेंव्हा रद्दीच्या दुकानात दिसली तेंव्हा whatever goes around comes around ह्या उक्तीचा अर्थ समजला :-)

नंदा's picture

12 Mar 2009 - 3:43 am | नंदा

अग्रलेख आणि तत्सम संपादकीय व विश्लेषणात्मक लेख यांचे अस्तित्व आजकालच्या वृत्तपत्राततर अत्यावश्यक आहे. यांशिवाय वृत्तपत्रांचे मूल्यच ते काय? केवळ घडामोडी आणि बातम्या आज आंतरजालावर, दूरचित्रवाणीवर, किंवा आकाशवाणीवर सहज वाचायला/पाहायला/ऐकायला मिळू शकतात. पण त्या घटनांचा अर्थ, त्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परस्परसंबंध, त्यांचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम यांचा संपादकांच्या दृष्टिकोनातून केलेला उहापोह प्रबोधक असतो. माझ्या मतेतर आजुबाजूंला घडणार्‍या घटनांचा माझ्या जीवनावर काय आणि कसा परिणाम होईल हे ठरवायला मला अशा लेखांचा फार उपयोग होतो. ठाकर्‍यांसारखे संपादक त्यांच्या सामनासारख्या मुखपत्रांतील अग्रलेखांचा उपयोग त्यांच्याच अनुयायांच्या भावना उद्दिपीत करण्यासाठी पण करतात. टिळकांनी त्यांच्या अग्रलेखांतून हेच पण वेगळ्या संदर्भात (ब्रिटीश राजवटीविरोधात) केले.

सहज's picture

12 Mar 2009 - 6:57 am | सहज

सर्वप्रथम विकि लेखाबद्दल अभिनंदन.

तुमचा अग्रलेख लवकर वाचायला मिळो. दुर्दैवाने महत्वाची वृत्तपत्रे कुठल्या न कुठल्या पक्षाशी बांधली गेली आहेत म्हणुन अग्रलेखाला- अग्रलेख येउन ध्रुवीकरण चालू आहेच. येथील "तटस्थ अग्रलेख" असा उल्लेख म्हणजे बहुदा कोण्या एका पक्षाशी डोळे झाकून सहमत नसणे असावा.

सत्य, सामान्य मनुष्य, भविष्यातील परिणाम व प्रबोधन यांच्याशी इमान राखून "तटस्थ" अग्रलेख लिहता यावा.

विकि अजुन येउ दे.

सुनील's picture

12 Mar 2009 - 9:31 am | सुनील

उत्तम आढावा.

तरीही संपादकीयात घेतली गेलेली तटस्थ भूमिका या विषयी अन्य काही सदस्यांनी घेतलेल्या आक्षेपाशी सहमत. संपादकीयात एखादा विचार हा मांडावाच लागतो, तेव्हा तटस्थ भूमिका घेणे शक्य नाही. अगदी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे उदाहरण घेतलेत तरी, असा हल्ला होण्यामागची कारणमिमांसा, पुन्हा असे न होण्यासाठी घेण्यासाठी घ्यायची खबरदारी, याविषयी एखादी विशिष्ट भूमिका ही संपादकीयात घ्यावीच लागते. तेव्हा ते तटस्थ राहूच शकत नाही. सामाजिक/सांस्कृतिक विषयांवरील अग्रलेखातदेखिल अशी तटस्थ भूमिका घेतल्याचे उदाहरण मिळणार नाही (उदा. सॅन होजे संमेलन).

पूर्वी वृत्तपत्र हे संपादकावरून ओळखले जाई. आजमितीस इंग्लिश वृत्तपत्राबाबत तरी हे लयास गेलेले आहे. मराठी वृत्तपत्रांबद्दल अद्यापतरी तसे झालेले नाही, पण होऊ शकते. टाईम्समध्ये तीन अग्रलेख असतात. पैकी तीसरा अग्रलेख हा "ह घ्या" पद्धतीचा असतो. याचाच परिणाम म्हणून की काय, मटामध्येही दोन अग्रलेख असतात, त्यामुळे कोणत्या एका विषयाला पूर्ण न्याय मिळाला असे दिसत नाही.

जाता जाता - मृत्युलेखांबाबत. मेल्यानंतर वैर ठेऊ नये, या संकेताचे पालन नेहेमीच केलेले दिसते, हे उत्तम. आता वाचायला किंचित क्रूर वाटेल पण "अपेक्षित" लोकांचे मृतुलेख सर्वच वृत्तपत्रात लिहून तयार असतात आणि त्यात वेळोवेळी संपादनही केले जात असते. कारण जेव्हा खरोखरच "वेळ" येते, तेव्हा संपादकांना लिहायला वेळ असेलच असे नाही.

विकिसाहेब, अजून लिखाण येउद्यात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

12 Mar 2009 - 1:00 pm | चिरोटा

आता वाचायला किंचित क्रूर वाटेल पण "अपेक्षित" लोकांचे मृतुलेख सर्वच वृत्तपत्रात लिहून तयार असतात आणि त्यात वेळोवेळी संपादनही केले जात असते. कारण जेव्हा खरोखरच "वेळ" येते, तेव्हा संपादकांना लिहायला वेळ असेलच असे नाही.

१९७८/७९ च्या सुमारास जयप्रकाश नारायण ह्यान्च्या बाबतित हे झाले होते.त्याना डायालिसिस वर ठेवले होते.आणी ते गेले ही अफवा पसरली.काही व्रुत्तपत्रानी दुसर्या दिवशी तसे अग्रलेख पण दिले.खरे म्हणजे हे अग्रलेख आधिच तयार होते.
अग्रले़ख वाचनिय असणे हे केवळ सम्पादकावर अवलम्बुन नसते.बर्याच व्रुत्तपत्रान्चे मालक सम्पादकावर प्रत्य़क्ष्/अप्रत्य़क्ष् रीत्या दबाव आणीत असतात.दबाव राजकिय,व्यैयक्तिक स्वरुपाचे असु शकतात.हल्लिच्या काळात Times Of Indiaचे H.K. Dua ह्या माजी सम्पादकाचे उदाहरण देता येइल.९/१० वर्षापुर्वि FERA/FEMA ह्या कायद्यामुळे अतिधनाढ्य लोकान्ची पन्चाइत झाली होती.देशाबाहेर किति पैसा ठेवावा/किति आणावा ह्या सन्दर्भात ते कायदे होते.आणि ह्या कचाट्यात Times समुहाचे मालक अशोक जैन अडकले होते.Times ने हा कायदा रद्द व्हावा म्हणुन अनेक पत्रकाराना 'कामाला' लावले होते.H.K. Dua ह्यानापण तसे अग्रलेख लिहिण्यास सान्गण्यात आलें. नकार देताच त्याना काढुन टाकण्यात आले.

हेरंब's picture

12 Mar 2009 - 1:32 pm | हेरंब

विचारवंतांचे लेख असेच येत राहिले पाहिजेत्.तुम्ही अजुन लिहा. विशेषतः, वर्तमानपत्रांतील अग्रलेखांच्या घसरणार्‍या दर्जाबद्दल पण लिहा. हल्लीचे बरेच संपादक हे ' पंत गेले म्हणून राव चढले' या पध्दतीने झाले आहेत. त्यामुळेच ही घसरण झाली असावी. शिवाय निस्पृहपणा हा गुण लोप पावल्यामुळे कुणाचा तरी पट्टा बांधावाच लागतो.

नितिन थत्ते's picture

12 Mar 2009 - 1:36 pm | नितिन थत्ते

अग्रलेखात मांडलेली मते संपादकाचा जो कल असतो त्याप्रमाणे असली तरी बहुतेक वेळा संपादकाचे मत आणि वृत्तपत्राच्या मालकांचे मत/हितसंबंध यात संघर्ष असेल तर संपादकाला मालकांचेच मत मंडावे लागते नाहीतर राजीनामा द्यावा लागतो.
काही वेळा बदललेल्या हितसंबंधांचा धक्काही वाचकांना बसतो. एक धक्का मलाही बसला होता.
इंडियन एक्सप्रेस गटाची वृत्तपत्रे ८० च्या दशकात रिलायन्स समूहाचे राजकीय लागेबांधे आणि कायदा वाकवून्/तोडून केलेले व्यवहार यांवर सातत्याने लेख्/टीका प्रकाशित करीत होती. विळ्याभोपळ्याचे सख्य होते. नंतर ९० च्या दशकात एक ऑफर एक्सप्रेस वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली. एक्सप्रेस गटाच्या कोणत्याही वृत्तपत्राची एक वर्षाची वर्गणी भरल्यास रिलायन्स मोबाईल मोफत अशी ती ऑफर होती. ती पाहून मला मोठा धक्का बसल्याचे आठवते.
तसेच कोणत्यातरी कॉन्फरन्स मध्ये तत्कालीन मंत्री अरूण शौरी यांना 'रिलायन्सने नेहमीच कायद्याची कक्षा ओलांडली. पण आता असे वाटते की ते कायदेच चूक होते' असे विधान करताना ऐकले तेव्हाही या बदललेल्या हितसंबंधांची जाणीव झाली.
अवांतरः ८० च्या दशकात जेव्हा रिलायन्सविरोधी मोहीम चालू होती तेव्हा रिलायन्सच्या प्रतिस्प्र्धी कंपनीचे नस्ली वाडिया हे एक्स्प्रेसच्या संचालक मंडळात होते. हा योगायोगच असावा ;)

खराटा
(रंग माझा वेगळा)

शिवापा's picture

12 Mar 2009 - 6:01 pm | शिवापा

एक्स्प्रेसवाले असेच काहितरी संशायास्पद करीत रहातात पण त्यांचा वाचकवर्ग लय लॉयल वैगेरे आहे. कुठल्याही रॅडम डे ला एक्सप्रेस आणि टाइम्सच्या अग्रलेखांची तुलना केली तर दोन वेगवेगळ्या देशांची व्रुत्तपत्र वाचतो आहोत का असा संशय येतो. पण काहि गोष्टि ज्यांना एक्स्प्रेस ने वाचा फोडली ते काम टाइम्स कधिच करु शकले नसते. एवढेच काय व्यवस्थेच्या विरोधात एवढे मोठे धाडस एक्स्प्रेस करीत असतांना टाइम्स त्याची साधी बातमी सुद्धा बनवत नसे. बाकी अग्रलेखांच्या बाबतीत बोलयाचे झाले तर एकेकाळी पेपर घेउन मुख्य मथळा न वाचता फक्त दोन कॉलम्सची घडि दुमडुन थेट अग्रलेख वाचणारे लोक मी बघितले आहेत. या माणसांबद्द्ल मला प्रचंड आकर्षण वाटायचे. अलीकडे ना तर अग्रलेखांची पिढि राहिली ना तर वाचनारांची. (सामान्यपणे)

२५ जून १९७५ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून आणिबाणी जाहीर करण्यात आली. एक्सप्रेस समुहाच्या त्यासंदर्भातील भुमिकेची कल्पना असल्याने दोन दिवस त्यांची वीज बंद करून टाकली. जेंव्हा २७ ला वीज परत जोडण्यात आली तेंव्हा एक्सप्रेस समुहाचे सर्वेसर्वा संस्थापक रामनाथ गोएंका यांनी त्यांचा ऐतिहासीक अग्रलेख लिहीला - कोरा स्तंभ!

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 9:03 pm | बिपिन कार्यकर्ते

हे पण ऐकून होतो... याची देहि याची डोळा बघायला मिळाले आज. खरं तर सुसंस्कृत समाजात राज्यकर्त्यांच्या थोबाडावर एवढी वाईट कोणी मारली नसेल कधी.

बिपिन कार्यकर्ते

विकि's picture

12 Mar 2009 - 1:56 pm | विकि

तुम्ही बहुतेक जण बोललात लिहीत जा हे वाचून आनंद झाला आणि बरेही वाटले.
आणि आपल्या प्रतिसादांमुळे माझ्याही ज्ञानात भर पडण्यास मदत झाली.
तटस्थ भुमिका येथे मला माझी चूक दिसून आली पण कधीकधी असे होऊ शकते.शेवटी संपादकाची भुमिका आणी वृत्तपत्र ज्यांच्या मालकीचे आहे त्यांची इच्छा महत्वाची.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2009 - 4:34 pm | प्रकाश घाटपांडे

प्रकाटाआ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मुत्सद्दि's picture

12 Mar 2009 - 7:06 pm | मुत्सद्दि

विकि,
सर्व प्रथम एका चांगल्या चर्चेला सुरुवात केल्याबद्दल आपले अभिनंदन.
आपलि सर्व निरिक्षणे वाचलि व काहिशी पटलिहि.
वास्तविक पाहता अग्रलेख कशासाठी वाचायचा हे चित्र हल्ली फार धुसर होउ लागलेय.
मराठीतील काहि प्रमुख वृत्तपत्रे पाहिलीत तर,
महाराष्ट्र् टाईम्स- पुर्वी काँग्रेस व आता शिवसेना,
सकाळ- राष्ट्रवादी कॉंग्रेस
सामना- शिवसेना,
लोकसत्ता- काँग्रेस,
लोकमत- दर्डा साहेबांचा जो असेल तो पक्ष,
प्रहार-राणे साहेबांचा जो असेल तो पक्ष,

जवळपास प्रत्येक वृत्तपत्र हे एखाद्या राजकीय पक्षाने ओलीस धरले आहे.
ह्या परिस्थितीत विषेशतः राजकीय व सामाजिक घटनांवर आधारित तटस्थ व दिशादर्शक अग्रलेख मिळणे अतिशय अवघड आहे.

मुत्सद्दि.

विनायक पाचलग's picture

12 Mar 2009 - 10:15 pm | विनायक पाचलग

म्हणुनच मला
केतकरांशिवाय लोकसत्ता
रावुतांशिवाय मटा
आणि दुसर्‍या राउतांशिवाय सामना आवडतो
आणि
महत्वाचे म्हणजे
आम्हाला
माझ्या गावच्या पुढारी या वृत्तपत्रातील अग्रलेखाशिवाय दुसरे काहीच आवडत नाही
(चायला काय लिवतात माहिती आहे का ..कोल्हापुरी मारतात साले....मानल बाबा त्यास्नी)
बाकी सविस्तर प्रतिक्रिया नंतर

दुर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझीमते
केव्हा केवळ भणाणारा पिसाटलेला पिवुन वारा
अनवाणी पायानी वनवणते
कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते
सा रे ग म प.......................

विना

मेघना भुस्कुटे's picture

12 Mar 2009 - 7:45 pm | मेघना भुस्कुटे

असेच म्हणते. एकाच लेखावर न थांबता अग्रलेख, वृत्तपत्रांच्या राजकीय भूमिका (आणि कोलांट्या!), बातम्यांच्या निवडीतून घेतली जाणारी (किंवा न घेतली जाणारी!) भूमिका ... या सगळ्यावर लेखमाला वाचायला आवडेल.

टायबेरीअस's picture

17 Mar 2009 - 12:57 am | टायबेरीअस

पिवळ्या पत्रकारितेचा विजय असो.