उडीद डाळीच्या पु-या व बटाट्याची भाजी

मिना भास्कर's picture
मिना भास्कर in पाककृती
28 Feb 2009 - 10:34 pm

ही रेसिपी दिल्ली ला ब्रेकफास्ट साठी केली जाते व या नंतर गरम गरम जिलेबीवर ताव मारतात. ( ही माहीती ऐकीव आहे.)

१ वाटी उडीद डाळ
२ टे.स्पून लाल मिरची पावडर
१ टे.स्पून जिरे पावडर
१ टे.स्पून बडीशेप
१ टे.स्पून धने
१ टे.स्पून गरम मसाला
१ टे.स्पून ओवा
१ टे.स्पून हळद
मीठ चवीपुरते
कणीक
तेल

उडीद डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवावी. नंतर पाणी काढून टाकून मिक्सर मधून बारीक करावी. बडीशेप व ओवा जाडसर पावडर करावी. वाटलेल्या डाळीत सर्व मसाले , मीठ घालून एकत्र भिजवावे. या डाळीत बसेल इतकी कणीक घालून नेहमीप्रमाणे कणीक भिजवावी. पु-या लाटून तेलात तळून घ्याव्यात. या पु-या जास्त पातळ लाटू नये. कडक होतात.
या पु-या बरोबर खाली दिलेली बटाट्याची भाजी छान लागते.
४ मध्यम बटाटे,
२ टे.स्पून गरम मसाला
१ टे.स्पून मिरची पावडर
मीठ चवीपुरते
तेल, मोहरी, जिरे, हळद, कोथींबीर
बटाटे उकडून घ्या . बारीक तुकडे करा. ग्रेव्ही जर घट्ट आवडत असेल तर थोड्या फोडी कुस्करून घ्या. फोडणी साठी तेल गरम करा. जिरेमोहरी , हळद टाकून बटाटे टाका सर्व मसाले टाकून मीठ टाकून छान हलवून घ्या. २ वाट्या पाणी टाका. पाणी आवडी नुसार कमी जास्त टाका. ग्रेव्ही थीक हवी असेल तर कुस्करलेला बटाटा टाका. कोथींबीर बारीक चिरून टाका. एक उकळी काढा. गरम गरम पुरी बरोबर सर्व करा.

प्रतिक्रिया

रेवती's picture

28 Feb 2009 - 10:57 pm | रेवती

साधारण अश्याच प्रकारचा ब्रेकफास्ट माझ्या दिल्लीकर मैत्रिणीने मागच्या विकांताला सर्व्ह केला होता.
फोटू, फोटू, फोटू!

रेवती

रामदास's picture

28 Feb 2009 - 11:13 pm | रामदास

रश्शाला झासी रस्सा पण म्हणतात.सकाळच्या खाण्यात जाम मजा येते.इकडे मुंबईच्या हवेत हा प्रकार न्याहारीला थोडा हेवी होतो.
चला, उद्या रविवार आहे.

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 12:18 am | विसोबा खेचर

आम्ही बिनफोटूच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही! क्षमस्व..

जर आपल्याला आमच्या मौल्यवान प्रतिसादाची गरज असेल तर फोटू अवश्य टाकावा ही विनंती! नायतर राहिलं..!

तात्या.

समिधा's picture

1 Mar 2009 - 1:26 am | समिधा

मस्त वाटतायत, करुन बघायला हव्यात

सुक्या's picture

1 Mar 2009 - 4:06 am | सुक्या

बंगालमधे असतना जवळ्पास दीड वर्षे रोज सकाळी हाच नाश्ता करत होतो. ५ रुपायात ४ पुर्‍या आणि बटाट्याची भाजी. त्यानंतर दोन रसगुल्ले किंवा गुलाबजामुन. अहाहा . . काय ते दिवस होते . . कसलीही चिंता नव्हती . . आजकाल कॅलरी पाहुन जेवण घ्यावे लागते :-(

बाकी पाकॄ छान आहे. तेवढ फोटु टाकायचं बघा. बिनाफोटुची पाकॄ पाहीली की चुकल्यासारखं वाटतं.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

शितल's picture

1 Mar 2009 - 6:05 am | शितल

पु-या आणी भाजी उद्याच करते आणी कळवते .
वेगळ्या प्रकारच्या पाककृतीसाठी धन्यवाद मिनाताई. :)

प्राजु's picture

1 Mar 2009 - 6:39 am | प्राजु

वेगळ्या प्रकारची पाकृ आहे. होईलच लवकर घरी. लेकाच्या डब्यासाठी आणखी एक नव्या प्रकारची पुरी मिळाली. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मिना भास्कर's picture

1 Mar 2009 - 8:01 pm | मिना भास्कर

ए कोणी तरी फोटो टाका ग ! म्हणजे तात्यांच्या डोळ्याचे पारणे फिटेल. मी ट्राय केला पण नाही जमले.

चकली's picture

2 Mar 2009 - 3:54 am | चकली

आपल्या नेहमीच्या पूरी भाजी पेक्षा वेगळी आहे..
चकली
http://chakali.blogspot.com

<या डाळीत बसेल इतकी कणीक घालून नेहमीप्रमाणे कणीक भिजवावी.>

बर्‍याच पाकक्रियांमधे "यात मावेल किंवा बसेल इतकी कणीक किंवा कसलेतरी पीठ वापरा" असे म्ह्टले जाते. माझ्यासारख्या नवशिक्या स्वयंपाक्याला हे मोजमाप कळत नाही. कोणी खुलासा करेल काय?

मिना भास्कर's picture

11 Mar 2009 - 4:06 am | मिना भास्कर

नंदा ताई डाळीत बसेल इतकी म्हणजे आपण पोळ्या साठी जशी कणीक भिजवतो, तसा कणकेचा गोळा होई पर्यंत , ज्या वेळी डाळ मिश्रित कणीक लाटण्याजोगी होईल तेव्हा समजावे, प्रमाण योग्य आहे. डाळ वाटताना जितके कमी पाणी घालाल, तेवढी कमी कणीक लागेल, आणी चवही छान येईल.

पिवळा डांबिस's picture

11 Mar 2009 - 5:22 am | पिवळा डांबिस

डाळ वाटताना जितके कमी पाणी घालाल, तेवढी कमी कणीक लागेल,
करेक्ट!
म्हणजेच "बसेल इतकी" याचा अर्थ...
खुर्चीत बसेल इतपतच....
फतकल मारून बसेल इतकी नाही....
होय ना?:)
(ह. घ्या)

स्वाती राजेश's picture

12 Mar 2009 - 12:48 am | स्वाती राजेश

वेगळी चव....नक्की करून पाहीन...पण या करून ठेवता येणार नाहीत ना? ऐनवेळी तळाव्या लागतील ना?

प्रभाकर पेठकर's picture

12 Mar 2009 - 3:27 pm | प्रभाकर पेठकर

१ वाटी उडीद डाळ
२ टे.स्पून लाल मिरची पावडर
१ टे.स्पून जिरे पावडर
१ टे.स्पून बडीशेप
१ टे. स्पून धने
१ टे. स्पून गरम मसाला
१ टे. स्पून ओवा
१ टे.स्पून हळद

एक वाटी उडदाच्या डाळीला 'दोन टेबलस्पून' लाल मिरची पावडर' आणि 'एक टेबलस्पून' प्रत्येक मसाला हे प्रमाण जास्त नाही वाटत? की 'एक टी स्पून' असे प्रमाण आहे?

४ बटाट्यांना 'दोन टेबलस्पून' गरम मसाला आणि १ टेबलस्पून तिखंट?
खाणार्‍याचा 'काजवा'च होईल.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

मिना भास्कर's picture

13 Mar 2009 - 12:42 am | मिना भास्कर

पेठकर, डाळ नुसती नाही , त्यात कणीक ही येते ना! आणि चवी नुसार कमी जास्त ति़खट करण्याची मुभा आहेच की, टेबल स्पून म्हणजे भाजी वाढण्याचा स्पून नाही हे लक्षात असू द्यात. :)

प्रभाकर पेठकर's picture

13 Mar 2009 - 12:21 pm | प्रभाकर पेठकर

टेबल स्पून म्हणजे भाजी वाढण्याचा स्पून नाही हे लक्षात असू द्यात.

बरे झाले सांगितलेत. मी आत्तापर्यंत टेबलवर जेवताना भाजी वाढण्याच्या स्पूननेच जेवत होतो. आता सुधारणा करीन. धन्यवाद.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

स्वाती राजेश's picture

13 Mar 2009 - 6:39 pm | स्वाती राजेश

बरे झाले सांगितलेत. मी आत्तापर्यंत टेबलवर जेवताना भाजी वाढण्याच्या स्पूननेच जेवत होतो. आता सुधारणा करीन. धन्यवाद.

मस्त प्रतिक्रिया दिलीत...आम्हाला सुद्धा सुधारणा करता येइल.:) :) :) :)