फसवणूक
पिंटीची आई शैला गर्भवती होती. परवाच तिचा नववा महिना भरला होता. प्रसूतीसाठी तिने गावातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नावही नोंदवलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या तारखेला आता फक्त सात-आठ दिवसच राहिले होते.
त्या दिवशी पिंटी शाळेसाठी निघाल्यावर, शैलाने तिला एक किल्ली दिली आणि म्हणाली, "वरच्या मजल्यावर टेबल आहे ना? त्याच्या ड्रॉवरमध्ये खाकी रंगाचा एक लिफाफा आहे, तो मला आणून दे."
नऊ वर्षांची पिंटी धावत गेली आणि तो लिफाफा घेऊन आली. शैलाने त्यातून काही नोटा काढल्या आणि दहा रुपयांची नोट पिंटीच्या हातात सरकवत म्हणाली, "हे घे, माझी तब्येत बरी नाहीये आज. तुझा डबा काही बनवता आला नाही. बघ, शाळेच्या कँटीनमध्ये जाऊन काही खाऊन घे."
लिफाफा परत ठेवताना, त्या ड्रॉवरमध्ये पडलेली तिच्या वडिलांची डायरी पिंटीच्या नजरेत भरली.
पिंटीचे वडील - नवनाथ - एका टूरिस्ट कंपनीत ड्रायव्हर होते. निरनिराळ्या गावांहून येणाऱ्या प्रवाशांना जवळपासची प्रेक्षणीय स्थळं दाखवायची, नाहीतर गावातल्या बड्या व्यक्तींना बाहेरगावी कुठेही घेऊन जायचं आणि सुखरूप परत घेऊन यायचं, हे त्यांचं रोजचं काम होतं. कंपनीच्या असल्या ड्युटीमुळे, बऱ्याचदा त्यांना चार चार दिवस घराबाहेर राहायला लागायचं.
कामावरून घरी आल्यावर ते सर्वात आधी त्यांच्या ड्रॉवरमधल्या त्या डायरीत नोंदी करत.
पिंटीला त्या डायरीचं नेहमीच खूप कुतूहल वाटायचं. तिने त्यांना एकदा विचारलं होतं, "बाबा, हे तुम्ही काय लिहिता?"
त्यावर तिचा गालगुच्चा घेत ते म्हणाले होते, "अगं पिंटे, तुला शाळेत कसा गृहपाठ लिहावा लागतो, तसाच मलाही करावा लागतो. या डायरीत मी माझ्या पगाराचा हिशोब, घरखर्च, ड्यूटीला गेल्याच्या आणि आल्याच्या वेळेची, त्या वेळच्या गाडीच्या रनिंगच्या नोंदी लिहितो. मला ठेवायलाच लागतात, नाहीतर घोटाळा होऊ शकतो.”
त्याच कुतूहलापोटी पिंटीने आज वडिलांच्या परोक्ष ती डायरी उचलली आणि पानं उलटू लागली. जमाखर्चाच्या नोंदीत तिला एक विचित्र शब्द वारंवार दिसू लागला. तिने तो शब्द तिच्या रफ वहीत लिहून घेतला आणि डायरी परत ड्रॉवरमध्ये ठेवली.
शाळेत गेल्यावर तिच्या इंग्लिशच्या शिक्षिकेला तिने तो शब्द दाखवला. शिक्षिका म्हणाली, "केमोथेरपी... म्हणजे कॅन्सर झालेल्या रुग्णाचा एक उपचार असतो. असले उपचार मोठ्या शहरातल्या बड्या हॉस्पिटलमध्ये होतात. आपल्या गावात तो कुठेही होत नाही."
संध्याकाळी घरी आल्यावर पिंटीने आईला ओरडतच विचारलं, "आपल्या घरात कुणाला कॅन्सर झालाय?"
डोकं हलवत शैला म्हणाली, "मला नाही माहीत."
"सांग ना आई.. कशाला नाही म्हणतेस? मला सांग, त्याशिवाय मी आज जेवणारच नाही." पिंटी हट्टालाच पेटली होती. आपण जर काही बोललो नाही, तर आपली ही लाडकी मुलगी उपाशी राहील, याची शैलाला काळजी वाटली आणि मग तिला बोलावंच लागलं.
"ऐक, तुझ्या बाबांची एक नातेवाइक होती, अनुपमा.. तिला झाला होता कॅन्सर. पण ती वारली, गेल्याच वर्षी."
"असं का? मग बाबा आजही दर महिन्याला शहरातल्या त्या कॅन्सर हॉस्पिटलला दहा हजार रुपये का पाठवतात?" पिंटीने स्पष्ट विचारलं.
"दहा हजार? बाप रे.. तुला गं कसं कळलं?" शैलाचा चेहरा पांढराफटक पडला होता.
"मला चावी दे. मी बाबांची डायरी आणते आणि दाखवते तुला." पिंटीने ठामपणे सांगितलं.
शैलाला इंग्लिश येत नव्हतं, पण इंग्लिश आकडे ओळखता येत होते. डायरीतल्या नोंदी बघताक्षणीच तिला धस्स झालं. डोळ्यांवर अंधारी आली. आजूबाजूचं काही दिसेना. ती बेशुद्ध झाली.
पिंटी घाबरून गेली. तिने शेजारच्या शिंदेकाकूंना बोलावलं. शिंदेकाकू धावत आल्या. त्यांच्या लक्षात आलं की दिवस भारत आलेल्या शैलाची शुद्ध हरपली आहे. शैलाने बाळंतपणासाठी सरकारी दवाखान्यात नाव नोंदवलंय, हे त्यांना माहीत होतं. त्यांनी लगोलग रिक्षा बोलावली आणि शेजारच्या आणखी दोघींना मदतीला घेऊन शैलाला त्या दवाखान्यात नेलं.
त्यांच्यामागोमाग शिंदेकाकाही पिंटीला घेऊन दवाखान्यात गेले.
दवाखान्यातल्या डॉक्टरबाईंनी शैलाला तपासलं आणि सांगितलं, “होईल थोड्या वेळात मोकळी.”
हॉस्पिटलच्या नर्सेसनी शैलाला डिलिव्हरी रूमध्ये नेलं.
पिंटी अवाक होऊन सगळं पाहात होती. आईच्या किंकाळ्या तिला ऐकू येत होत्या. थोड्याच वेळात तिला एका बाळाचं रडणं ऐकू आलं. पिंटीला शिंदेकाकू म्हणाल्या, “पिंटी, आता तू आईची एकुलती एक लेक राहिलेली नाहीस. तुझ्याशी खेळायला आता एक भाऊ आलाय.”
त्या संध्याकाळी नवनाथ घरी आला. त्याला ती बातमी समजली आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने अंघोळीचं पाणी गरम केलं आणि लगोलग स्वच्छ आंघोळ केली. प्रवाशांना घेऊन गावोगावी फिरताना त्याच्या अंगावर घामाची आणि धुळीची पुटं चढलेली असायची. रोज सकाळी गाडी धुताना हातांना चिखलही लागलेला असायचा. आपल्या नवजात बाळाला स्पर्श करताना आपण स्वच्छ पाहिजे, अंगावर धुळीचा कणही नको, असं त्याला मनोमन वाटत होतं.
हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी त्याने हलवायाकडून चांगले किलोभर पेढे विकत घेतले.
मोठ्या आनंदात तो बाळंतीण बायकांच्या वॉर्डमध्ये गेला. त्या खोलीत आणखी पाच माता होत्या. त्यांच्या खाटांना बांधलेल्या पाळण्यांमध्ये त्यांची बाळं झोपवली होती.
नवनाथ शैलाच्या खाटेपाशी गेला. त्याने लपकन बाळाला दोन्ही हातांनी उचलून छातीशी घेतलं.
आईच्या शेजारी उभी राहिलेली पिंटी आसुसलेल्या नजरेने कधी वडिलांकडे, तर कधी त्यांच्या हातातल्या बाळाकडे बघत होती.
नवनाथ तिला म्हणाला, "बघ, पिंटी, तुझा भाऊ कसा हसतोय, त्याचं नाक ना अगदी तुझ्या आईसारखं आहे." बाळाचे डोळे मिटलेले होते, पण ते दोन्ही पाय हलवत होतं. मध्येच ते हसलं, त्याच्या हसऱ्या बोळक्या तोंडाकडे बघून पिंटीही खुदकन हसली.
"बाबा, बाबा, बाळाचं तोंड इतकं छोटं आणि हसणं केवढं मोठं आहे ना?” टाळ्या वाजवत पिंटी म्हणाली.
"हं.. या हसऱ्या मुलाला देवाने आपल्याकडे सात दिवस आधीच आणून सोडलंय." नवनाथ हसला आणि शैलाच्या शेजारी पलंगावर बसला.
तो बसताच, एवढा वेळ तिथेच पडून नवनाथकडं बघणाऱ्या शैलाने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं.
हातातल्या बाळाशी लाडे लाडे बोलत नवनाथ म्हणाला, "माझ्या बाळा, माझ्या छकुल्या, मला ना उद्या दोन कामं करायची आहेत. तू आल्याचा आनंद म्हणून तुझ्या आईला सोन्याच्या बांगड्या आणायच्यात आणि तिच्या आईला, म्हणजे तुझ्या आजीला इथे आणायचंय."
"आईला इथे आणू नका. मलाच तिच्याकडे सोडा." असं म्हणत शैला मुळूमुळू रडू लागली.
तिचं रडणं पाहून नवनाथ चकित झाला. त्याला रागही आला. तो म्हणाला, "ही काय वेळ आहे रडायची? बाईसाहेब, आपण हॉस्पिटलात आहोत..”
"तुम्ही माझी एवढी मोठी फसवणूक केलीत.. मी रडू नको तर काय हसून टाळ्या वाजवू? केसाने गळा कापलात तुम्ही माझा, मग मी कशी आनंदी राहू?" शैलाचा आवाज कापरा झाला होता.
"फसवणूक? कसली? कुणाची?" आता मात्र नवनाथचा राग अनावर होऊ लागला.
"तुमची अनुपमा जिवंत असताना ती मेलीये, असं मला का सांगितलं तुम्ही? मला तर फसवलंच, पण माझ्या आईवडिलांचीसुद्धा फसवणूक केलीत ना?"
"कोण म्हणतंय ती जिवंत आहे?" नवनाथचा आवाज खाली आला होता, त्याच्या चेहऱ्यावरचा रंगही उडाला होता.
"तुमच्याच त्या डायरीत वाचलं मी. पिंटीने ड्रॉवर उघडला आणि तुमची डायरी मला दाखवली. तुमचं सगळं खोटंनाटं वागणं उघड झालंय.” शैलाच्या आवाजात तुच्छता ठासून भरली होती.
नवनाथ गहिवरून गेला. काहीही न बोलता त्यांने बाळाला पाळण्यात ठेवलं आणि तो वॉर्डच्या बाहेर निघून गेला.
"अनुपमा कोण आहे आई?" पिंटीने आईला विचारलं.
"जा, विचार तुझ्या बापाला.” रागाने आणि दुःखाने पेटलेली शैला, आयुष्यात पहिल्यांदाच पिंटीवर एवढं डाफरून ओरडली.
पिंटी खोलीबाहेर गेली. बाहेरच्या व्हरांड्यातल्या बाकड्यावर नवनाथ बसला होता. धावत जाऊन ती नवनाथच्या गळ्यात हात घालून त्याला चिकटली.
"अगं पिंटे, काय हे?" नवनाथने तिचे हात बाजूला केले. पिंटीचे हात थरथर कापत होते.
"बाबा सॉरी. मला माफ करा," पिंटीचे डोळे पाण्याने भरले होते. "मी तुमची डायरी बघायला नको होती."
"ठीक आहे बेटा, काही हरकत नाही." तिच्या पाठीवर थोपटत नवनाथ म्हणाला.
"पण बाबा, अनुपमा कोण आहे?" पिंटीने परत विचारलं.
आता मात्र नवनाथ पूर्ण गलितगात्र झाला. तरी स्वतःला सावरत म्हणाला, "ती माझी पहिली बायको. तुझ्या आईच्या आधी माझं तिच्याशी लग्न झालं होतं. तिला कॅन्सर झाला होता. तिला शहरातल्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं, “आजार खूप वाढलाय. तिला केमोथेरपी द्यावी लागेल. दर पंधरा दिवसांनी आणायला लागेल." तिचं माहेर शहराजवळ होतं, तिच्या माहेरचं घरही छोटं होतं. तिला तिथेही ठेवणंही अशक्य होतं."
"म्हणून तुम्ही तिला हॉस्पिटलमध्येच ठेवलं? एवढे दिवस?”
"नाही गं बेटा. हॉस्पिटलचा खर्च मला परवडणारा नव्हता. हॉस्पिटलजवळच्या वस्तीत तिची एक मावशी राहते. तिच्याच नावाने मी दरमहा पैसे पाठवतोय. तिच्या उपचारांसाठी."
"मी आईला सांगून येऊ का?" पिंटीला हे सगळं आईला सांगून तिचा राग दूर करायची घाई झाली होती.
"हो, सांग की.. पण तिला हेही सांग, अनुपमा आता मरणार आहे. लवकरच मरणार आहे, दोन-चार दिवसांचीच सोबतीण आहे ती आता." बोलता बोलता नवनाथने एक हुंदका दिला आणि त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले.
पिंटी परत आईकडे गेली. ती अजूनही रडतच होती. "आई, रडू नकोस गं." आसवांनी ओल्या झालेल्या तिच्या गालांवर हात फिरवत ती म्हणाली.
"आई, अनुपमा मरणार आहे. बाबा म्हणतात, ती दोन-चार दिवसांत मरणार आहे."
ते ऐकताच शैलावर जणू वीजच कोसळली. रडणं थांबवून ती खाटेवर उठून बसली. पिंटीच्या गालावर एक हलकी चापट मारत म्हणाली, "गप बस मूर्खे. स्वतःच्या आईचं असं नाव घेतं का कुणी? आणि आईबद्दल असं अशुभ बोलतात का?"
तिच्या आवाजात राग नव्हता, एक विलक्षण शांतता होती. एका गौप्याचं ओझं.. जे तिने आजवर वाहिलं होतं.. आता पुन्हा एकदा ते वाहण्याची एक अनोळखी जबाबदारी तिला जाणवू लागली होती.
***
लेखक - डॉ. अविनाश भोंडवे
संपर्क क्रमांक- 9823087561
प्रतिक्रिया
20 Oct 2025 - 10:15 pm | स्वधर्म
शेवट नीटसा कळला नाही, पण कथा आवडली. ओघवती शैली.
21 Oct 2025 - 9:29 pm | अमरेंद्र बाहुबली
कथा आवडली.
21 Oct 2025 - 11:04 pm | सौन्दर्य
शैलाचेच माहेरचे नाव अनुपमा होते का? आणि कॅन्सर तिलाच झाला आहे का? थोड्या स्पष्टीकरणाची गरज आहे .
21 Oct 2025 - 11:14 pm | सुक्या
पिंटी अनुपमा ची मुलगी आहे आणी अनुपमा अजुन जिवंत आहे परंतु नवनाथने शैला ला ती मेलिये असे संगीतले होते.
असो ... फसवणुक कुणाची ? पिंटी की अनुपमा ची?