दिवाळी अंक २०२५ - एआय हे करू शकेल? - लेख

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in दिवाळी अंक
20 Oct 2025 - 12:00 am

एआय हे करू शकेल?

जवळजवळ कालपर्यंत आपल्या हाताशी मायक्रोसॉफ्ट ऑफिस, गूगल, गूगल स्कॉलर, ग्रामरली एवढीच आयुधे होती. विविध अभ्यासक्रमात महाजालसाक्षरता, ITIL, जालावरची आचारसंहिता, समाजमाध्यमे, महाजालीय पणन (मार्केटिंग), IoT, AI, वगैरे विषय होते. एय अजून विकसित झाले नव्हते. हिंटनसाहेबांच्या विचारांनी आपण सारे प्रभावित झालो होतो. काही वर्षांपूर्वी आयझॅक अ‍ॅसिमॉव्हच्या फाउंडेशन मालिकेतल्या कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यातल्या काही कल्पनांनी आता आकार घेतला होता.
आता एआय ही जादूची कांडी आपल्या हातात आली आहे. त्यामुळे माझ्या नजरेसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
शिक्षण - आता चॅट जीपीटी, ग्रोक यासारख्या जवळजवळ तीसेक सेवा उपलब्ध आहेत. घरबसल्या आपण विविध विषयातले पीएचडी, एमडी, एमएस, एमटेक अशा उच्चविद्याविभूषित व्यक्तीलाच समजू शकेल अशा उच्च पातळीवरचे ज्ञान मिळवू शकतो. फक्त त्यातल्या विविध संकल्पना, संज्ञा, तर्कसंगती, गणिती सूत्रे इ. समजण्याची कुवत आपल्याकडे असायला हवी. या सेवा वापरून आपण बौद्धिक प्रबंध लिहू शकतो. आंतरजालावरील अनेक संस्थळांवर शिक्षण/प्रशिक्षण दिले जाते, तर काही मान्यवर संस्थादेखील आंतरजालावरूनच परीक्षा घेतात आणि त्वरित गुणपत्रिका/निकालपत्र देतात. परंतु दहावी, बारावी, विविध पदविका, पदव्या इ. परीक्षांत घोळ होतात, निकाल लांबणीवर पडून विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तर मग शाळा/महाविद्यालये, शिक्षक/प्राध्यापक, शिक्षणमंडळे/विद्यापीठे यांची गरजच काय? एक भाषा एक विद्यापीठ असेही घडू शकते.

कायदा-साहाय्य - जर आपण शोधनिबंध बनवू शकतो, तर आपण स्वत:ला कायद्याचे अजिबात ज्ञान नसताना एआयच्या मदतीने कोर्टातील वकिली दाव्याच्या भाषणाचे किंवा आरोपपत्राच्या उत्तराचे शब्दांकन करू शकू का? पूर्वीच्या समान दाव्यांतल्या निर्णयांचे संदर्भ देऊ शकू का? त्यातले शब्दोच्चार आरेखित करू शकू का? जर उत्तर होय असेल, तर आपल्या लॅपटॉपमधील एआय वकील आपली केस लढू शकेल का? तसेच विरुद्ध दावेदाराच्या वकिलाचे भाषण ऐकून समर्पक, बिनतोड उत्तर त्वरित देऊ शकेल का?

न्यायदान - जर दाव्याचे वकिली काम एआय सांभाळू शकेल, तर न्यायाधीशाचे कामही एआय करू शकेल? आज भारतातील न्यायालयात कोट्यवधी दावे प्रलंबित आहेत. अनेक दावे दावेदारांच्या हयातीत निकाली निघण्याची शक्यता नसलेले आहेत. एआय जर हे करू शकेल, तर हे प्रलंबित दावे लवकर, दावेदारांच्या हयातीत निकालात निघतील? हे जर होऊ शकत असेल, तर वकील आणि न्यायाधीश वगळता याला बाधा आणणारे घटक कोणते?

प्रशासन - सरकारी कार्यालयातून अनेक परवाने जारी केले जातात. त्यासाठी केलेला अर्ज प्रशासकीय, तांत्रिक तसेच निर्णयकारी विभागातील किमान चार-पाच व्यक्तींकडून तपासला जातो. या चार-पाच व्यक्तींचे जवळजवळ साचेबद्ध काम एक एआय करू शकेल? जर करू शकेल, तर या कामातला भ्रष्टाचार कमी होईल?

वृत्तप्रसारण - ओरिसा दूरदर्शनने भारतातली पहिली एआय वृत्तनिवेदिका बनवली आहे. मग वृत्तनिवेदक/निवेदिका, वृत्तसंकलक, वृत्तसंपादक यांची गरजच काय? घराला आग लागल्यासारख्या स्वरात बातम्या न देणारी, मृदू स्वभावी अशी एखादी एआयचलित वृत्तपत्रवाहिनी लवकरच पाहायला मिळेल, असे वाटते.

कायदेमंडळ - आज लोकांचे विविध प्रश्न नगरसेवक, आमदार, खासदार इ. लोकप्रतिनिधींकडे जातात. लोकप्रतिनिधी हे प्रश्न नगर्पालिकेत, विधिमंडळात वा संसदेत मांडतात. त्यावर कायदेमंडळे, मंत्रीमंडळे निर्णय घेतात. लोकप्रतिनिधींची आणि कायदेमंडळांची कामे एआयने केली, तर प्रत्येक निर्वाचित उमेदवारामागे एक एआय प्रतिनिधी आणि या प्रतिनिधीला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळणारा उमेदवार नियंत्रित करूं शकेल. असे खरेच होऊ शकेल? उत्तर सकारात्मक असेल, तर याला बाधा आणणारे घटक कोणते?

'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये' आणि 'वकील कोर्टात काळ्याचे पांढरे करतात' असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोंत. आज अनेक राजकीय नेते, पत्रकार, निर्लज्जपणे जाहीररीत्या धादांत खोटे बोलताना दिसतात. काही लोकप्रतिनिधी सभागृहाला तद्दन खोटी माहिती देतात. सभागृहात वा कोर्टात सादर केलेली माहिती खरी आहे की खोटी, हे एआय तत्काळ तपासू शकेल.

साहित्य - आपण एआय वापरून लालित्यपूर्ण कथा-कादंबर्‍या वा कवितांचे साहित्य निर्माण करू शकतो. मिपावर आताच असे बरेच साहित्य उपलब्ध आहे.

कला, निव्वळ कला – अ‍ॅबसोल्यूट आर्ट अणि अभिव्यक्ती कला परफॉर्मिंग आर्ट - आपण रेखाचित्रे काढू शकतो. चित्रे, व्यंगचित्रे काढू शकतो, पडद्यावर दिसणारे चित्रपट, स्टॅन्ड अप कॉमेडी निर्माण करू शकतो. आपण कोणतेही एक वाद्य वा अनेक वाद्ये एआयच्या मदतीने असामान्य कौशल्याने वाजवल्याचा आभास निर्माण करू शकतो वा तसे संगीत निर्माण करूं शकतो. आपण पडद्यावर दिसणारा मन हेलावून सोडणारा अगदी खराखुरा संगीतसोहळा वा कॉन्सर्टदेखील निर्माण करू शकतो.
नमुन्यादाखल अशाच एका अगदी खरे वाटणार्‍या, आपल्याला अंतर्बाह्य हलवून टाकणार्‍या संगीतसोहळ्याचा दुवा खाली देतो आहे. हे एआयनिर्मित कृत्रिम आहे, यावर विश्वासच बसत नाही.

आणि सूर्य कोसळला - १४.३३ मि.
https://www.youtube.com/watch?v=KSNWJNXWl0M

या चित्रध्वनिपटाची वा दृकश्राव्यपटाची परिणामकारकता ध्यानात घेता काल्पनिक, खोट्या संकल्पनांवर - अफवांवर आधारित अशा पटांचा वापर करून एखादे साम्राज्य उलथून टाकायची ताकद आहे, हे ध्यानात येते.
खेळ हे मानवी शारीरकुवतींवर आधारित असल्यामुळे खेळांना विश्लेषण, व्यूहरचना, विविध डावपेचांचे फायदेतोटे, सिम्यूलेशन, सल्ला, समुपदेशन इ. स्तरांवरच मदत घेता येईल.
आणखीनही अनेक प्रश्न आहेत. पण सध्यां एवढेच पुरे. एक गोष्ट नक्की की एवढे प्रबळ शस्त्र हाती आल्यामुळे आपल्यावर ते हाताळण्याची जोखीम वा जबाबदारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. चुकीचे एक पाऊल सामाजिक सर्वनाशाला कारण ठरूं शकेल. हे सारे सांभाळताना येणारा बौद्धिक आणि भावनिक ताण हाताळण्यासाठी खास प्रशिक्षण घ्यावे लागेल. बौद्धिक ताण पेलायच्या वैयक्तिक क्षमतेचे मापन करून आज जसा IQ निश्चित केल जाऊ शकतो, तसेच भावनिक ताण पेलायच्या क्षमतेचे मापन करून EQ – भावनांक निश्चित केला जाणे आवश्यक आहे. अर्थात या चाचण्याही सिम्यूलेशनद्वारा संगणकच करू शकेल.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग – यूजीसीने ‘जीवनकौशल्ये’ - ’लाईफ स्किल्स’ हा अभ्यासक्रम जवळजवळ सर्व अभ्यासक्रमांत अंतर्भूत केला आहे. औपचारिक शैक्षणिक पात्रता – (Educational Qualification – EDU-Q) आणि रोजच्या व्यवहारातील कार्यकौशल्य व काम करण्याची तयारी Work Readiness - WR) यातली दरी कमी करणे हा मुख्य उद्देश. याबद्दल वि.अ. आयोगाला धन्यवाद द्यावे लागतील.
या अभ्यासक्रमात ‘जागतिक मानवी जीवनमूल्ये’ – ‘Universal Human Values’ हा एक विषय आहे. या अभ्यासक्रमाचे महत्त्व आता नक्कीच कळते आहे. अन्यथा अशी काही शाश्वत मूल्ये असतात, हेच पुढील पिढ्यांना कळणार नाही. या विषयाच्या समावेशाबद्दल वि.अ. आयोगाला खूपच धन्यवाद द्यावे लागतील.
असो. वरील सारी चर्पटपंजरी वाचल्याबद्दल वाचकांना अनेक अनेक धन्यवाद.

प्रतिक्रिया

AI चा छान रेव्यू घेतला आहे,
मला ही लिहायची इच्छा होती पण जमले नाही.
हा लेख वाचून छान वाटले.
धन्यवाद!