षड्रिपुनिर्दालन चुटकीसरशी केल्याचा दावा करणाऱ्या माझ्या दोस्ताने _ सोम्यागोम्याने _आपलं यश कायप्पा वर मला कळवलं
मग दसऱ्याचा मुहूर्त बघून मीही ठरवलं
आज षड्रिपुंचा नाश करायचाच वडिलोपार्जित_कोळीष्टकविभूषित_अहंभावरूपी म्यानातील_ बुद्धिरूपी तलवारीने
"काम" वधासाठी म्यानावगुंठित तलवार हाती घेतली
(म्यानाचा शेप .... आय हाय!)
"क्रोध" वधासाठी तलवार उपसू लागलो.
(निघेचना xxxx म्यानातून.... या तलवारीच्या....)
उपसेन तलवार तेव्हा पहिला "लोभाचा" खातमा करेन म्हटलं
(पण काही होवो..अशाच मुठीच्या आणखी दोन तरी तलवारी पायजेतच आपल्याकडे)
सप्पकन उपसलेली तलवार आता "मद" वधासाठी
वापरेन म्हणालो
(मी म्हणून उपसली ...शंभर जणांना पेलणार नाय ही असली जड तलवार)
"मोह" थोडा हार्ड आहे वध करायला म्हणतात
(त्यापायी इतकी मस्त तलवार तुटली तर पंचाईत व्हायची फुकट. जपून घाव घालायला पायजे)
"मत्सर" वध फार काय मोठा विषय नाहीये. जमणारच मला
(पण त्या xx xxxxसोम्यागोम्याला माझ्या अगोदर जमलंच कसं?)
मग आठवलं, अरे, दसऱ्याला तर शस्त्रपूजा करतात.
मग घेतली तलवार पुजायला.
बघू षड्रिपुनिर्दालन नंतर कधीतरी.
प्रतिक्रिया
7 Oct 2025 - 5:34 pm | गामा पैलवान
अनंतयात्री,
अहो, इतके निराश नका होऊ. मी काय म्हणतोय की ते षड्रिपुंचा वधबिध जाउद्या. त्यांना मित्रं बनवायला काय हरकत आहे? म्हणजे मला म्हणायचंय की वेळेप्रसंगी षण्मित्रांनी आपल्या बाजूस उभं राहावं, आणि इतर वेळेस उगीचंच त्रास देऊ नये.
आ.न.,
-गा.पै.
7 Oct 2025 - 9:29 pm | सोत्रि
झक्कास!
फक्कड जमलंय!!
- (दसऱ्याला तर शस्त्रपूजा करणारा) सोकाजी
8 Oct 2025 - 10:51 am | अनन्त्_यात्री
षड्रिपुंना षण्मित्र बनवायला थोडा वेळ लागेल.
पण षण्मासिचा वायदा पक्का.
8 Oct 2025 - 12:37 pm | विजुभाऊ
षड्रिपुंचा वध कशा करताय. ते जगण्सायाठी अत्यावश्यक आहेत
कामः हा हवाच . सर्वात मोठा मोटिवेशनल फोर्स.
क्रोध : हा आपल्याला निर्णय क्षमता देतो.
लोभ : हा असेल तर त्यानिमित्ताने आपण काहितरी करायला उद्यूक्त होतो.
मोह : असेल तर आपण आपल्या भविष्याची काळजी घेतो.
मद : हा नसेल तर लीडरशिप , नेतृत्व गुण लयाला जातील
मत्सरः हा आपल्याला प्रगतीसाठी प्रोत्साहीत करतो. इतरांच्या पुढे असावे ही इर्षा निर्माण करतो.
हे सगळे आपल्याला मिळवून देणारे षड्रिपु ही मानवासाठी वरदानच आहेत.
षडरिपु नसणारा मानव हा चलते फिरते प्रेत. कशाचीच आसक्ति नाही. अहं नाही , वेदना नाही कोणातीच अभिलाषा नाही., क्रोध नाही. याना मित्र नाहीत शत्रु नाहीत भावना नाहीत. दगडात आणि यांच्यात फरक तो काय.
8 Oct 2025 - 1:35 pm | सोत्रि
विजुभौ,
तुम्ही हे मुद्दे दुसऱ्या एका धाग्यावरही मांडले होते आणि तिथे मी प्रतिसाद दिला होता, तो धागा आता नेमका आठवेना, नंतर मिळाला की प्रतिसादाची लिंक देतो, तो पर्यंत ही पोच.
- (दगड आणि मुक्त यांत फरक करणारा) सोकाजी
8 Oct 2025 - 1:44 pm | सोत्रि
https://www.misalpav.com/comment/1197179#comment-1197179
8 Oct 2025 - 2:14 pm | अनन्त्_यात्री
शिरेस्ली घेतले जातेय हे बघून एकदम डोळेच भरून आले.
(कपाळ बडवून घेणारी स्मायली)
8 Oct 2025 - 2:25 pm | सोत्रि
अहो, विजुभौ आणि माझं अवांतर मनावर घेऊ नका.
मुळ धाग्याच्या गाभ्यापासून फारकत घेऊन अवांतर चर्चा केली नाही तर मिपावर आल्यासारखं वाटत नाही!
:=))
- (अवांतर स्पेशीयालिस्ट) सोकाजी