आहुपे - चिंब पावसाळी भटकंती

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
26 Jun 2025 - 9:38 pm

पावसात भिजलेले सह्याद्रीतले चिंब रस्ते, धुक्यात हरवलेली गूढरम्य देवराई आणि खोलवर कोसळणारे कडे; याहून अधिक सुंदर काही असतं का? पुणे, नगर, नाशिक, सातारा कोणत्याही जिल्ह्यांच्या पश्चिमेकडे या दिवसांत जावं, सर्वत्र थोड्या फार फरकाने असंच दृश्य सगळीकडे दिसत असतं. पण पुण्याचा पश्चिम भाग त्यामानाने जवळ, एका दिवसांत अगदी आटोपशीपणे उरकणारा त्यामुळे यंदा ऐन पावसाळ्यात जायचं ठरवलं ते आहुप्याला. खरं तर खूप पूर्वी आहुपे घाटातून कोकणात खोपीवलीला उतरलो होतो पण नंतर ह्या नितांतसुंदर ठिकाणी जाणं झालंच नव्हतं. मात्र काही योग येतात ते असे अचानकच.

आहुपे तसं पुण्याला जवळ. घरापासून जेमतेम सव्वाशे किमी. सहज जाता येईल असा पल्ला. मात्र डिंभ्यापासून ह्याचा दुर्गम भाग सुरु होतो. तिथून वळणावळणाच्या रस्त्याने आपल्याला पुढे तासाभरात तो आपल्याला आहुप्याला नेऊन पोचवतो. डिंभे धरणापासून डाव्या बाजूचा रस्ता भीमाशंकरला जातो तर उजव्या बाजूने जाणारा रस्ता आहुपे गावात जातो. डिंभे अगदी ओसंडून भरलं होतं आणि विसर्ग चालू होता. घाट चढून डिंभे धरणाच्या वरच्या अंगाला आलो. समोरच्या किनार्‍यावर पडणार्‍या पावसाला वारा आता इकडे ओढून आणत होता.

a

मोकळा मोकळा दिसणारा रस्ता हळूहळू चिंब व्हायला लागला

a

a

a

आहुप्याला जाणारा रस्ता लांबचा असला तरी रस्ता एकदम सुंदर आणि नीटनेटका आहे, वाटेत निसर्ग त्याचे असंख्य विभ्रम दाखवत असतो. दूरवर कुठेतरी आडरानात पावसात भिजणारी रानं वार्‍यावर डोलत असतात.

a

चहूबाजूंनी हिरवं हिरवं झालेलं होतं.

a

आहुप्याला जाताता सतत बाजूला डिंभेचं पाणलोट क्षेत्र आपली साथ देत असतं. चढउतार तर असंख्य आहेत. डोंगर चढून येताच एक अनोखे नवल येथे आहे. दोन्ही बाजूला खोल दरी, मधूनच जाणारा चिंचोळा रस्ता, खाली दिसणारं डिंभेचं पाणी. निव्वळ सुपर्ब. पावसकाळात सर्वोत्तम दृश्य जे आहे ते इथेच आहे.

a

जिथे मिळेल तिथून वाट पकडून जलौघ धरणात येत असल्यामुळे पाणी गढूळलेलं आणि ढवळलेलं दिसत होतं.

a

अचानक उग्ररूप धारण केलेला पाऊस आहुप्याच्या शीवेवर येताच शांत झाला होता.

a

a

आहुपे गाव सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर वसलेले शेवटचे गाव. इथपर्यंत एसटी येते. सह्याद्रीतल्या ह्या निसर्गरम्य गावाला प्रशस्त पठार लाभले आहे. आणि त्याच्या टोकाला आहेत ते कोकणात खोलवर कोसळणारे कडे. इथेच आहे आहुपे घाट जो घाटावरच्या आहुपे गावाला कोकणातल्या खोपिवली गावाला जोडतो. ह्याच्या अगदी जवळच भैरवनाथ दार, डोणीचे दार अशा असंख्य घाटवाटा आहेत मात्र सर्वांना सुलभ अशी सौम्यशी घाटवाट आहे ती आहुपेचीच.

प्रशस्त पठारावर वसलेलं आहुपे गाव

a

कोकणात कोसळणारे कडे

a

इथवर येईपर्यंत पाऊस उणावून उन पावसाचा खेळ सुरु झाला होता.

a

खालचं कोकण नयनरम्य दिसत होतं.

a

आहुपे घाटाने कोकणात उतरवल्यावर घाटवाटेचा संरक्षक दुर्ग कोकणात उभा आहे तो म्हणजे गोरखगड आणि त्याच्या शेजारचा मच्छिंद्र सुळका. पठारावरच कड्याच्या थोड्या अधिक जवळ गेल्यास त्याचे मनोज्ञ दर्शन होते.

a

गोरखगड (डावा) आणि मच्छिंद्र सुळका (उजवा)

a

गोरखचा मुकुट

a

इतका वेळ उन्हात न्हात असलेल्या पठारावर आता काळे ढग वेगाने आक्रमण करु लागले होते.

a

पावसाने पठारावर अशी लहानमोठी तळी भरली होती.

a

a

a

सह्याद्रीच्या बदलत्या हवामानाने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आणि धूम धूम पाऊस सुरु झाला. उन्हात न्हालेला प्रदेश क्षणार्धात धुकटाच्या दाट पडद्याआड दडला गेला.

a

आहुपेच्या पठाराच्या बाजूलाच आहे आहुपेची देवराई. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं रान. गावाच्या सीमेलगत, डोंगरकड्यावर किंवा एखाद्या निर्जन भागात असलेली अशी वनराई, जिथे मानवी हस्तक्षेप नसतो. या जागेला 'देवाची जागा' मानली जाते. म्हणूनच येथे झाडे तोडली जात नाहीत, माती खणली जात नाही, अगदी पानही सहजासहजी तोडले जात नाही. या वनक्षेत्रावर गावाचा, गावकऱ्यांचा आणि देवाचा एक अघोषित करार असतो "जपशील तू मला, मी जपेन तुला." सह्याद्रीत अशा अनेक देवराया आहेत. दुर्गाची देवराई मागे आपण पाहिली. मावळातली अजिवली, आंबा घाटातली देवराई अशा कित्येक मी पाहिल्यात. प्रत्येक देवराईत एक मंदिर असतेच असते. येथे आहे ते भैरवनाथाचे. येथूनच खालती उतरते ती भैरवनाथ दाराची अवघड घाटवाट.

इथल्या धुव्वाधार पावसात दाट ढगांमध्ये बुडालेली ही देवराई खूपच गूढरम्य भासत होती. भैरवनाथ मंदिर ढगांमध्ये लुप्त होत होतं.

a

a

गूढरम्य रान

a

दोन्ही बाजूला असलेली राई

a

धूम धूम बरसून पाऊस आता मोकळा होऊ लागला

a

आम्हीही आता परतीच्या वाटेवर निघालो.

a

a

रस्त एकदम स्वच्छ झाले होते.

a

परत डिंभ्यापाशी पाणी मस्त गढूळले होते.

a

पाऊसही पूर्ण थांबून आकाश स्वच्छ झाले होते.

a

निसर्गरम्य अशी ही भटकंती संपवून घोडेगाव मंचर मार्गाने घरी परतलो.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

27 Jun 2025 - 1:40 am | राघवेंद्र
राघवेंद्र's picture

27 Jun 2025 - 1:40 am | राघवेंद्र

ही सहल म्हणजे निसर्गाच्या कुशीतला एक स्वर्गीय अनुभव! सगळी हवा, धुके, धबधबे आणि हिरवळ मनाला आल्हाददायक वाटली. आठवणीत राहणारी, मन भरून टाकणारी एक अप्रतिम ट्रिप!

कंजूस's picture

27 Jun 2025 - 4:42 am | कंजूस

अगदी गार गार वाटतंय.

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी

झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी
रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी
झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी
झाकू नको कमळनबाई, चांदणं गोंदणी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी
झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी

ना धो महानोर आठवले (आठवले क्रियापद)

सुंदरच! अजिबात गर्दी दिसत नाही.इथे फुलं नाहीत उमलली अजून?

फुलं इथं सप्टेंबरात उमलतात.

कर्नलतपस्वी's picture

28 Jun 2025 - 11:38 am | कर्नलतपस्वी

फुलं आली की पक्षी येतील.

किल्लेदार's picture

29 Jun 2025 - 8:10 am | किल्लेदार

सुंदरच. आणि मुख्य म्हणजे तीट लावण्यापुरताही मनुष्यप्राणी दिसत नाही त्यामुळे दृष्ट लागण्याएवढे सुंदर.

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Jun 2025 - 11:54 am | राजेंद्र मेहेंदळे

प्रचि बघुनच गारेगार वाटले. मस्त केलीत भटकंती. गोरख मच्छिन्द्राचे सुळके बघुन अंगावर रोमांच आले. जुने दिवस आठवले :)

एका फोटोत पंच दिसली. समाधान वाटले. सुंदर....

गोरगावलेकर's picture

1 Jul 2025 - 1:09 pm | गोरगावलेकर

फोटो अप्रतिम

जुइ's picture

1 Jul 2025 - 8:21 pm | जुइ

फोटो खूपच आवडले! भटकंती एकदम झक्कास झाली.

गवि's picture

2 Jul 2025 - 11:51 am | गवि

मस्त रे प्रचु.

श्वेता व्यास's picture

2 Jul 2025 - 3:24 pm | श्वेता व्यास

वाह, छान नेत्रसुखद फोटो आहेत !