बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ
ऐहोळे २: त्र्यंबकेश्वर मंदिर, जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर समूह
ऐहोळे ४: रावणफडी आणि हुच्चीमल्ली मंदिर
ऐहोळे ५: मेगुती टेकडीवरील बौद्ध, जैन मंदिरे आणि अश्मयुगीन दफनस्थळे
पट्टदकल १: काडसिद्धेश्वर, जांबुलिंग, चंद्रशेखर, गळगनाथ आणि संगमेश्वर मंदिरे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मलप्रभेच्या खोर्यात चालुक्यांनी मंदिरांच्या निर्मितीला सुरुवात केली, बदामीच्या शैलमंदिरांपासून सुरुवात करुन ऐहोळेतील प्राथमिक मंदिर निर्माणाच्या कार्यशाळेत अभ्यास करुन एकाहून एक सरस मंदिरे ते बांधतच गेले. नंतर राष्ट्रकूटांनीही येथे काही भर घातली. काशी विश्वेश्वर हे मंदिर याच परंपरेतले. आठव्या शतकात बांधल्या गेलेल्या ह्या छोटेखानी मंदिरात पुढे निर्माण झालेल्या एकाहून एक सरस शिल्पपटांची बीजे दिसतात असे मानण्यास काहीच हरकत नाही.
नागर शैलीतल्या ह्या मंदिरांचा मुखमंडप आज पडून गेलाय मात्र येथे मंदिराच्या पुढ्यात नंदीप्रतिमा अजूनही दिसते. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह ह्यांनी युक्त असलेल्या ह्या मंदिराचा आज रेखानागर शिखरावरील आमलक आणि त्यावरील कळसही आज अस्तित्वात नाही मात्र तरीही मंदिराचे मूळचे देखणेपण उणावत नाही. मंदिराच्या शुकनासीवर नटराज शिव आणि पार्वतीची मूर्ती आहे.
काशी विश्वेश्वर मंदिर व शुकनासीवर असणारा नटराज
द्वारशाखांच्या तळाशी गंगा यमुना आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर देखील गंगा यमुना आणि निधी आणि सेवक असून ललाटबिंबार दोन्ही हातात नाग पकडलेला गरुड दिसतो आणि आतमध्ये शिवलिंग आहे.
अंतराळ आणि गर्भगृह, ललाटबिंबावर असलेला गरुड
ह्या मंदिराचे खरे सौंदर्य आहे ते मात्र येथील सभामंडपात असणार्या स्तंभांवरील शिल्पपटात. तेच आता एकेक करुन आपण पाहूयात.
रावणानुग्रह
कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे दर्शन घेण्यास येतो. शिवपार्वतीची क्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो. आपल्या सर्व हातांनी कैलास पर्वत तळापासून उचलायला लागतो. तर शंकर मात्र भयभीत पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरतो. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावण प्राणांची भीक मागून शिवस्तुती गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो अशी याची थोडक्यात कथा.
गजासुरवध
अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होते. अंधकासुराच्या प्रभावाने हैराण झालेले देव शंकराकडे अभय मागण्यासाठी जातात त्याच वेळी नीलासुर नावाचा राक्षस हत्तीचे रूप धारण करून शंकराचे पूजन करणार्या ऋषींना त्रास देतो. शंकर आधी गजासुराचा वध करून त्याच एक दात उपटतो आणि त्यानंतर त्याचे गजचर्म अंगाभोवती गुंडाळून एका हाती वाडगा धरून त्रिशुळाने अंधकासुराचा वध करतो. येथे मात्र अंधकासुरवध दाखवला नसून पूर्ण प्रसंग फक्त गजासुरवधाचा आहे.
सोमास्कंद शिवमूर्ती
शिवपार्वती आणि पार्वतीने कडेवर घेतलेला कार्तिकेय अर्थात स्कंद अशी ही उमेसहित स्कंद असलेली प्रतिमा अर्थात सोमास्कंद शिवमूर्ती.
लिंगोद्भव शिवमूर्ती
एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळ शोधायला गेला तर ब्रह्माने हंसरूप घेऊन आकाशात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून शिवाने लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.
ह्या शिल्पपटात खालील बाजूस वराहरूपी विष्णू स्तंभाचा तळ शोधत असताना दाखविले आहेत तर वरील बाजूस उजवीकडे चतुर्मुखी ब्रह्मदेव स्तंभाचा वरील भाग शोधत आहेत. आदी अंताचा कसलाही थांग न लागल्याने शेवटी ते लिंगरूपी स्तंभातून प्रकट झालेल्या शिवाला शरण गेलेले आहेत. अष्टदिक्पाल हे शिवाचे कौतुक पाहायला आलेले आहेत.
त्रिपुरांतक शिव
ही येथील एक अतिशय देखणी प्रतिमा. तारकासुराचे तीन मुले विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून आकाशगामी असलेली अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि लोहमय अशी तीन फिरती पुरे प्राप्त करून घेतली. ही तिन्ही पुरे एकाच रेषेत असतांनाच एकाच बाणाने ह्यांचा विध्वंस करू शकणाराच त्रिपुराचा वध करू शकेल असा वर त्यांनी मिळविला. तीन फिरत्या पुरांमुळे अतिशय बलवान झालेल्या ह्या तीनही असुरांचा शंकराने पृथ्वीरुपी रथ धारण करुन, त्याला सूर्यचंद्ररूपी चक्रे लावून, चार वेदरुपी अश्व जोडून, ब्रह्मदेवाला सारथी करुन आणि बाणाच्या जागी विष्णूला स्थापित करुन करून त्यांचा नाश केला अशी ही थोडक्यात कथा. येथे रथात पार्वतीसह गणपतीही बसलेला दिसतो.
कल्याणसुंदर शिवमूर्ती
शिवपार्वती विवाहाचे अंकन दाखवणार्या मूर्तीस कल्याणसुंदर मूर्ती म्हणतात. ह्या मूर्तींमध्ये शिवाने पार्वतीचा हात आपल्या हाती घेतलेला असतो. ब्रह्मदेव हा भटाचे काम करत असतो तर दिक्पाल, विष्णू आदी देव शिवाच्या विवाहाप्रित्यर्थ आलेले असतात. हिमालय हा गडू घेऊन कन्यादान करताना दिसतो.
गंगावतरण
आपल्या शापित पूर्वजांना गंगेच्या तर्पणाने मुक्ती मिळावी म्हणून भगीरथ प्रयत्न करून स्वर्गातून आणलेल्या गंगेला शिव आपल्या जटा मोकळ्या करत गंगेला पृथ्वीवर जाण्यास जागा मोकळी करून देत आहे. डाव्या बाजूस पार्वती उभी असून उजव्या बाजूस भगीरथ बाजूस एका पायावर तप करीत आहे. तर उजव्या बाजूस पाताळात भस्मीभूत होऊन पडलेले सगरपुत्र हात जोडून मुक्तीची याचना करीत आहेत.
ह्या शिवलीलांसहित कृष्णलीलाही येथील स्तंभांवर कोरलेल्या दिसतात.
गोवर्धन गिरीधारी
इंद्रोत्सव साजरा न करता गोवर्धनपूजन केल्याने संतप्त झालेल्या इंद्राने घनघोर वृष्टी सुरु केली. तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून त्याखाली संपूर्ण गोकुळाचे रक्षण केले अशी ह्याची थोडक्यात कथा. उपरोक्त शिल्पपटात उजव्या बाजूस गोवर्धन प्रसंग कोरला असून वरच्या बाजूस अनंतशयनी विष्णू आहे, तर डावीकडे विष्णू बळीराजाच्या मस्तकावर तिसरा पाय ठेवत त्याचे त्रिविक्रम रूप दाखवत आहे.
कृष्णजन्म व काही लीला
यशोदा पलंगावर झोपलेली असून वसुदेव कृष्णाला गोकुळात घेऊन जात आहे. खालच्या बाजूस कृष्णाच्या लहानपणीचे काही प्रसंग असून कालियामर्दनाचा देखावा कोरलेला आहे.
कृष्णलीला
खालच्या बाजूस असलेल्या शिल्पपटात डाव्या बाजूस मथुरेच्या राजरस्त्यावर बेभान होऊन चालून असलेल्या कुवलयापीड हत्तीला कृष्ण थोपवत आहे तर त्याच्या शेजारी घोड्याच्या रूपाने आलेल्या केशी दैत्याचे कृष्ण निर्दालन करत आहे. वरील बाजूस उखळाचा प्रसंग आणि काही बाललीला दाखवल्या आहेत.
दैत्यनिर्दालन
वरच्या बाजूस शिंकाळ्यातील लोणी खाणे, चक्राच्या रूपात आलेल्या शकटासुराचा वध, काकासुराचा वध आणि झाडांच्या रुपात आलेल्या वृक्षरूप धारण केलेल्या यमलाजुर्नांना कृष्ण दुभंगून टाकत आहे. तर खालच्या बाजूस बैलाच्या रुपात आलेल्या धेनुकासुराचा कृष्ण वध करत असून त्याच्या शेजारीच पुतनेला मारताना कृष्णाचे मनोहारी स्वरुप येथे दाखवले आहे.
याखेरीज शिव आणि कृष्णाच्या जीवनांतील इतरही शिल्पपट येथे आहेत पण त्या सर्वांचे वर्णन करणे विस्तारभयास्तव कठीण आहे. स्तंभांवर असणार्या ह्या पटांशिवाय येथे भिंतींच्या आतल्या भागात विविध व्याल प्रतिमा देखील येथे कोरलेल्या आहेत त्या येणेप्रमाणे
ह्याखेरीज मंदिराच्या बाह्यांगाचे सुरेख दर्शन आपल्याला विविध कोनांतून घेता येते.
मधले काशी विश्वेश्वर, डावीकडे गळगनाथ तर उजवीकडे भव्य मल्लिकार्जुन मंदिर
काशी विश्वेश्वर
नागर शैलीचे उत्तम उदाहरण
छोटेखानी काशी विश्वेश्वर मंदिरची इतके परीपूर्ण आहे तर येथील दोन भव्य मंदिरे विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन काय असतील त्याविषयी पाहू पुढच्या भागात.
क्रमशः
प्रतिक्रिया
11 Jun 2025 - 7:35 pm | दुर्गविहारी
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख !
या मंदीरातील शिल्पकामाचा दर्जा मात्र आयहोळ किंवा बदामी तसेच पट्टदकलमधील इतर मंदीराच्या तुलनेत उणावलेला वाटतो. कदाचित हे मंदीर आधी बांधले गेले असावे. पुढे उत्तम दर्जाची शिल्प कोरण्याचा सराव इथे झाला असावा हि शक्यता आहेच.
राष्ट्रकुटांनी कोरलेल्या वेरुळच्या तुलनेत रावणानुग्रह शिल्पपट खुपच साधा वाटतो. गजासुरवधाचा घारापुरी लेणीतील पट किंवा हळेबीडूमधील शिल्पपट खुपच अप्रतिम आहेत. लिंगोदभव प्रसंगात ब्रह्मदेव खोटे बोलला कि शिवशंकराचा वरच्या बाजुला असलेले टोक पाहिले, म्हणून शंकराने त्याला शाप दिला कि त्याची पुजा होणार नाही.
कल्याणसुंदर शिव हा शिल्पपट देखील फारसा स्पष्ट नाही. वास्तविक कल्याणसुंदर शिव या पटात ब्रह्मदेव बर्याचदा पौरोहित्य करताना खाली बसलेला दाखवला असतो तसेच विष्णू पार्वतीचे कन्यादान करताना दाखवला असतो. जमीनीवर विवाह प्रसंगी अग्नी म्हणून ज्वाळा तर काही वेळ अग्नीचे मुख दाखवले असते. वरील शिल्पपट तुलनेने ओबडधोबड असल्यामुळे खाली दाखवलेले अग्नीचे मुख असावे. विवाहप्रसंगी वराच्या हातात वधुचा हात असतो,मात्र इथे पार्वतीने शिवशंकराचा हात हातात घेतलेला दिसतो.
सोमास्कंद मुर्तीची शिल्पपट दक्षिण भारतात उत्तम आहे, गंगैकोंड्चोलापुरम किंवा इतर ठिकाणी खुप सुंदर शिल्पपट आहेत.
मंदिर ज्या देवाचे आहे, त्याच देवासंदर्भात शिल्प शक्यतो मंदीरावर कोरलेली असतात. मात्र इथे मंदीर शंकराचे असून देखील विष्णुशी संबधीत शिल्प म्हणजे कृष्ण अवताराची शिल्प बघायला मिळतात हे विशेष.
शरभ शिल्प हि फारशी रेखीव नाहीत.
असो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
16 Jun 2025 - 7:13 am | प्रचेतस
काशी विश्वेश्वर मंदिरातील शिल्पांचा दर्जा काहीसा सामान्य आहे मात्र येथीलच विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिरातील शिल्पांचा दर्जा अतिशय उच्च आहे. विरुपाक्ष मंदिरातील सूर्य आणि महिषासुरमर्दिनी ह्यांच्या मूर्ती तर प्रचंड सुंदर आहेत.
स्तंभशिल्पांच्या बाबतीत हे अगदी प्राथमिक काळातले मंदिर असल्याने येथे सराव करून पुढील मंदिरांत उत्तमोत्तम शिल्पे निर्मिली गेली असे मानता येते.
वेरूळच्या कैलास मंदिरातील सोमास्कंद मूर्ती देखील अप्रतिम आहे.
30 Jun 2025 - 1:49 pm | अभ्या..
अगदी अगदी.
हा आमच्या हिस्टरी ऑफ इंडीयन आर्टस च्या सिल्याब्सातला धडा आहे.
नागर शैलीतले आणि दक्षिणेतले मंदीर हा तर योग आहेच.
11 Jun 2025 - 7:59 pm | कर्नलतपस्वी
वाचताना विद्यार्थ्याची भुमिका असते. सुंदर प्रचि, माहितीपूर्ण.
बादवे,अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होते.
याचेच नाव रक्तबिज असे पण आहे का?का तो वेगळा कुणीतरी?
धन्यवाद.
16 Jun 2025 - 7:15 am | प्रचेतस
अंधकासुर कथा प्राचीन आहे, रक्तबीजाची कथा मात्र ह्यावरून प्रेरणा घेऊन नंतर देवीमहात्म्यात आली.
11 Jun 2025 - 8:59 pm | कंजूस
शिल्पं पाहिल्यावर पौराणिक कथा समोर दिसू लागतात. इतर देवळांच्या तुलनेत ती ओबडधोबड वाटतात हे मान्य. पण हे देवळं बांधण्याचे /घडवण्याचे प्रयोग होते.
सुंदर.
13 Jun 2025 - 7:40 am | Bhakti
वाह! सुरेखच! इथले शिव दृश्य पट वेगळेच वाटत आहेत.मी ६ व्या शतकापर्यंतच्या शिव दृश्य स्वरूप अभ्यासात हे शिवपट म्हणजे सामान्यांसाठी हे दाखवतात की,युद्ध,विवाह सारीपाट,संसार हे प्रसंग शिवाच्याही आयुष्यात होते.परंतू त्यात तो जसा धीराने वागला तसा सामान्यांनी वागायचा प्रयत्न करावा.हे गोष्टीऐवजी कोरलेल्या शिल्पातून पहायला मिळतात.
शिवलिंग ब्रम्ह, विष्णू गोष्टही नवीनच समजली होती :)
15 Jun 2025 - 10:37 am | खिलजि
Sundar varnan bhau.. dandvat swikaaraa..
Aamachi maay marathi harvali aahe...
Ataparyant aamhi tich giravali aahe...
Shodhat aahe pan sapdat naahi...
Kuthali Kal dabaavi tech kalat nahi..
Tuzya lekhaani mala punha uthavale...
Maay marathila, englishne sajavale...
Rup gojire, nave balase...
Bhavanaa pochlya ki naahi
Te lavkar kalavane....
16 Jun 2025 - 7:15 am | प्रचेतस
खूप वर्षानंतर आलात खिलजीभाऊ.
19 Jun 2025 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिल्प, मंदिरं, माहिती सांगतांना विस्तारभयाची काळजी करु नये. आपल्या लेखनामुळे त्या त्या स्थळाची महिमा कळतो. बाय द वे, द्वारशाखांच्या तळाशी आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर देखील गंगा यमुना आणि निधी आणि सेवक असून ललाटबिंबार आहेत. हे शिल्प ओळखायचे कसे ? यावर एक सविस्तर लेख लिहा. हा ललाटाबिंबार कुठे असतो त्याचे काही वैशिष्ट्ये ? त्याच्या कामाचं स्वरुप ? तपशीलवार माहिती प्लीज.
रावणानुग्रहाचं शिल्प' या आयडियाची कल्पना आमच्या वेरुळपासून तिकडे आलेली दिसते. आमच्या वेरुळचं शिल्प अधिक रेखीव आणि अधिक आकार ऊकार आणि सुंदर आहेत असे वाटते. (दुवा )पार्वतीने कडेवर घेतलेला कार्तिकेय अर्थात स्कंद तुम्हाला ओळखू येतो. ( नमस्कार करतो पाय करा इकडे ) तारकासूर त्याची लेकरं, त्यांची ती नावे, सगळं लिहायचं म्हणजे लै अभ्यास लागतो, आणि तो तुमच्याकडे आहे तेव्हा लिहिते राहावे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
19 Jun 2025 - 7:20 pm | प्रचेतस
धन्यवाद सर,
आपल्या प्रोत्साहनामुळे लिहिण्याचा नेहमीच हुरुप येतो.
द्वारशाखा म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराचा दोन्ही बाजूस असणारा भाग. सहसा द्वारशाखेवर गंगा यमुना, निधी (जल, पाणी, पैसा आणणारे सेवक) इत्यादी कोरलेले असतात, बहुतकरुन नक्षीदेखील आढळते.
ललाटबिंब म्हणजे मंदिराच्या किंवा द्वाराच्या ललाटावरील (कपाळावरील भाग). उदाहरणार्थ येथील मंदिराच्या ललाटबिंबावर (द्वाराच्या वरच्या बाजूस) आणि शिखराच्या खालच्या बाजूस मध्यभागी कोरलेला नटराज शिव. तर द्वारशाखेवरील ललाटबिंब म्हणजे सर्वसाधारणपणे कोणत्याही मंदिराच्या द्वारावर असणारी गणेशपट्टीतील मध्यभागी असलेली गणेशप्रतिमा. वेरुळच्या कैलास मंदिराच्या ललाटबिंबावर लिंगिन शिवमूर्ती (शिवानेच शिवलिंंग हाती धारण केलेली मूर्ती) कोरलेली आहे.
हे मंदिर वेरुळच्या लेणीपेक्षाही कमी अधिक प्रमाणात जुने असावे. तुम्ही दिलेल्या दुव्यातील चित्र वेरुळच्या २९ क्र. (धुमार) लेणीतले आहे, मात्र ह्यापेक्षाही सर्वोत्तम रावणानुग्रह कैलास एकाश्ममंदिरात आहे त्याची तुलना कशाशीच नाही, इतके प्रचंड बारकावे त्यात आहेत.
बाकी शिल्पं ओळखणे तसे सोपे असते. निरिक्षण मात्र खूप लागते.
22 Jun 2025 - 8:03 am | सौंदाळा
सुंदर लेख आणि फोटो आणि त्या अनुषंगाने दिलेली पुराणकथांची माहिती
काशी विश्वेश्वर मंदिर — अशी किती विश्वेश्वर मंदिरे आहेत? (अजून पण एक ऐकले आहे पण आता पटकन कुठे ते आठवत नाही) वाराणसीकचे काशी विश्वेश्वर हे मूळ मंदिर आणि त्याची प्रेरणा घेऊन हे मंदिर बनवले असेल का? आता जसे प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी मंदिरे आहेत त्याप्रमाणे.
22 Jun 2025 - 12:43 pm | प्रचेतस
काशी विश्वेश्वर किंवा काशी विश्वनाथ ह्या नावाने देशभरात भरपूर आहेत, अगदी आपल्या वाईला देखील काशी विश्वेश्वर आहे. काशी वरूनच प्रेरित आहेत हे उघड आहे मात्र पट्टदकल येथील काशी विश्वेश्वर मंदिराचे ते मूळ नाव नसावे. येथील मंदिरे सुरुवातीला वेगळ्या नावाने होती, नंतर अलीकडची नावे पडली. उदा. लोकमहादेवी वरून लोकेश्वर मंदिर तर त्रैलोक्य महादेवीवरून त्रैलोकेश्वर अशी अनुक्रमे विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिरांची मूळ नावे होत.
22 Jun 2025 - 10:19 am | गवि
लेख उत्तम. आकाशगामी तीन पुरे, एकाच बाणाने , एका ओळीत वगैरे कल्पना कोणाला कशा सुचत असाव्यात ?
लिहीत रहा. भटकत रहा.
22 Jun 2025 - 3:36 pm | कंजूस
{देवदानवांच्या}पौराणिक कथा ,गौतम बुद्धाच्या जातक कथा, तिर्थंकरांच्या ऐतिहासिक कथा या वाचाव्यात लागतात. मग शिल्पे समजतात.
26 Jun 2025 - 8:05 am | MipaPremiYogesh
कमाल चालू आहे लेखमाला वल्लीशेठ...काय अप्रतिम आहे हे सगळे..best
1 Jul 2025 - 1:05 pm | गोरगावलेकर
लेखमाला छानच सुरु आहे .
"आपले लेख म्हणजे शंभर नंबरी सोनं असतयं बघा"
कर्नलतपस्वी यांच्याशी पुरेपूर सहमत .