काही प्रयत्नानंतर साहित्य आणि ललिता यांना "कोकणातील स्वप्नातील एक फार्म हाऊस" हवे असणारा ग्राहक मिळला. थोडे नुकसान झाले, पण साहित्य आणि ललिता त्यातून बाहेर पडले.
काही वर्षे गेली.
आता साहित्य, ललिता आणि त्यांनी त्यांच्या "कोकणातील त्यांच्या फार्म हाऊस वर दुपारी केलेल्या "एन्जॉयमेंट" मुळे झालेली त्यांची ५ वर्षाची मुलगी असा संसार सुरु होता.
मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळी काही थोडे कॉम्प्लिकेशन झाले, खर्च झाला पण साहित्य च्या कंपनीचा मेडिक्लेम इन्शुरन्स होता म्हणून तो बराचसा वसूल झाला. कंपनीचा इन्शुरन्स असल्यामुळे साहित्य आणि ललिता यांनी स्वतःचा स्वतंत्र मेडिक्लेम इन्शुरन्स घेतलेला नव्हता.
साहित्यचे बाबा [म्हणजे ललिताच्या दृष्टीतले डस्टबिन] यांनी साहित्य आणि ललिताला स्वतंत्र मेडिक्लेम पण घेऊन ठेवा असे एक दोन वेळा सांगितले. पण ललिताचे म्हणणे असे पडले की कंपनीचा इन्शुरन्स असताना कशाला अजून एक मेडिक्लेम हवा? साहित्य चे पण हेच मत पडले. मग तो विषय तिथे थांबला.
साहित्य नोकरीत यशाच्या पायऱ्या चढत होता. एक दोन जॉब बदलून तो आता सेल्स ला जॉईन झालेला होता.
कस्टमर बरोबरच्या पार्ट्या, ड्रिंक्स .... सुरु होते.
[काय करणार ? कस्टमर ने ऑफर केली की घ्यायलाच लागत असे.]
पण आता साहित्यला नोकरी चा कंटाळा आलेला होता. त्याचे कॉन्टॅक्टस इतके झाले होते की स्वतःचा बिसनेस ज्याला हल्ली स्मॉल स्केल म्हणतात ते सुरु करायचे त्याच्या मनात होते. आणि ते त्याने सुरुही केले. हळूहळू कस्टमर येत होते, व्यवसाय वाढत होता. नोकरी सोडल्याचे दुःख सोडाच पण एक आनंदच होता. मधल्या काळात साहित्य ने एका नामांकित कंपनीकडून मेडिक्लेम घेतला.
याला एक सव्वा वर्ष होऊन गेले.
.... साहित्यला गेले दोन महिन्यांपासून दम लागत होता. अंगावर सूज आली होती.
.... आणि तो दिवस उजाडला.....
साहित्यला इतका दम लागला होता की चालता येईना. ललिताने त्याला जवळच्या हॉस्पिटलात नेले. त्याची अवस्था पाहून आणि असेसमेन्ट करून डॉक्टरांनी त्याला ऍडमिटच करून घेतले. मग सगळ्या टेस्ट , ग्राफ़ीज करून घेतल्या. सोनोग्राफीत त्याच्या पोटात पाणी साचलंय आणि लिव्हर वर खूप सूज आहे असे कळले. मग गॅस्ट्रो ला बोलावले. त्याने फॅब्रो स्कॅन करून घेतला. मधल्या काळात ललिताने साहित्यने ज्या मेडिक्लेम कंपनीतून इन्शुरन्स घेतलेला त्यांना त्याच्या ऍडमिशन बाबत कळवले. फॅब्रो स्कॅन मध्ये साहित्यला लिव्हर सिरॉसिस आहे असे समजले. फॅब्रोचा LSM स्कोअर १८ आला. म्हणजे जवळपास लिव्हर सिरॉसिस ची पहिली पायरी. या स्टेज मधून लिव्हर पुन्हा नॉर्मलला येत नाही फक्त अजून डॅमेज होणार नाही असे उपचार करता येतात. किंवा लास्ट रिसॉर्ट म्हणजे लिव्हर ट्रांसप्लांट.
साहित्यच्या पोटातून नळी घुसवुन पाणी काढण्यात आले. एंडोस्कोपिक बँड लिगेशन ही प्रोसिजर करण्यात आली. युरीन वाटे शरीरातील साचलेले पाणी निघून जाईल यासाठी औषधे देण्यात आली. खर्च वाढत होता. दरम्यान ललिता मेडिक्लेम कंपनीशी कॅशलेस क्लेम साठी प्रयत्न करत होती. जवळपास १५ दिवसांनी साहित्य च्या डिस्चार्ज चा दिवस उगवला. पण आता खूप बंधने येणार होती, अगदी पाणी पिण्याच्या प्रमाणावर सुद्धा!
इकडे मेडिक्लेम कंपनीतून ललिताला कळवण्यात आले की त्यांचा क्लेम रिजेक्ट केला गेला आहे. पाहिजे तर ते नंतर री-इंबर्स साठी परत क्लेम करू शकतात. मग हॉस्पिटलचे बिल जवळपास ७ लाख ललिता, तिचे वडील आणि साहित्याचे बाबा यांनी भरले.
[डस्टबिन कडे पैसे मागताना ललिताला खूप ओशाळल्या सारखे झाले असेल का? पण झाले असले तरी इलाज नव्हता.]
घरी स्थिर स्थावर झाल्यावर परत ललिताने मेडिलकम कंपनीकडे री-इंबर्स साठी परत क्लेम अर्ज भरला. तिने अगदी व्यवस्थित फाईल बनवली, त्याची झेरॉक्स आपल्याकडे ठेवली आणि कंपनीला पाठवली. महिन्यात परत क्लेम रिजेक्ट झाला. कारण साहित्य चा आजार "प्री एक्सिस्टिंग डिसीज" म्हणून कंपनीने गृहीत धरला. ललिताने मग कंपनीच्या ombudsman कडे तक्रार केली आणि तिथेही अपयश आले.
मग अचानक साहित्यला त्याच्या कौस्तुभ पोंक्षे या मित्राची आठवण झाली. साहित्य या पोंक्षेशी अधून मधून इनव्हेसमेंट बाबत बोलत असे.
[हा कौस्तुभ पोंक्षे स्वतः आयटी त कमला होता पण त्याला लोकांना फुकट सल्ले द्यायची खूप हौस होती.]
साहित्य आणि ललिताने या पोंक्षे ला एका हॉटेल मध्ये भेटून ["बसून" नव्हे] सगळी घटना सांगितली.
[ वस्तूत: ललिताला हा पोंक्षे अजिबात आवडत नसे, कारण मागे त्या "कोकणातील फार्म हाऊस" घ्यायच्या वेळी या पोंक्षेने घेऊ नकोस असा सल्ला दिलेला. . . .
. . . .आणि या पोंक्षेच्या नकारात्मक सल्ल्याने निगेटिव्ह व्हाइब्स तयार झाले आणि त्यांना ते फार्म हाऊस विकावे लागले असे तिचे ठाम मत होते. पण साहित्य ने फारच आग्रह केला म्हणून ती या पोंक्षेला भेटायला तयार झाली. ]
हॉटेल मध्ये भेटल्यावर पोंक्षे ने विचारले की जेव्हा मेडिकल इन्शुरन्स साठी अप्लिकेशन केले तेव्हा त्यात एक कूलिंग पिरियड असतो त्याच्या क्लॉज वाचलेला का ?
साधारण पॉलिसी घेतली की पहिले ३ वर्षे काही आजार कंपनी कव्हर करत नाही. साहित्यला लिव्हर सोरायसिस झाला होता. हा आजार एक दोन महिन्यात अचानक होत नाही. पहिल्याने फॅटी लिव्हर ग्रेड १,ग्रेड २, ग्रेड ३, फायब्रोसिस आणि मग सिरॉसिस असा तो प्रवास असतो जो काही वर्षे असतो, त्यामुळे, मेडिक्लेम कंपनीने "प्री एक्सिस्टिंग डिसीज" म्हणून क्लेम रिजेक्ट केलाय तो बरोबर आहे. पोंक्षेने त्याच्या वकील मित्राशी पण चर्चा केली आणि वकील मित्राने पण तेच सांगीतले.
एकुणात क्लेम रिजेक्ट झालाय हे साहित्यने आणि ललिताने स्वीकारले आणि हा विषय संपवला.
पण या हॉटेलच्या भेटीत पोंक्षेने काही मेडिक्लेम घेण्याबाबत महत्वाच्या टिप्स दिल्या.
१. मेडिकल इन्शुरन्स आणि टर्म इंशुरंस घेताना जो पहिला फॉर्म असतो त्यात नेहमी खरी माहिती द्यावी. इन्शुरन्स घेण्यापूर्वी नेहमी स्वतःची एक मेडिकल टेस्ट स्वखर्चाने करून घ्यावी. त्यात जे काही रिपोर्ट्स आलेत ते स्वतःच्या फॅमिली डॉक्टर ला दाखवून, चर्चा करून मगच तो फॉर्म भरावा. जे आजार आहेत ते प्रामाणिक पणे लिहावेत. ड्रिंक्स , तंबाखू सेवनाबाबतचे प्रश्न प्रामाणिकपणे उत्तरावेत.
२. मेडिकल इन्शुरन्स शक्यतो फॅमिली फ्लोटर असावा की जेणेकरून त्यात संपूर्ण कुटुंब [नवरा, बायको आणि त्यांची मुले] ही कव्हर होतील.
३. मेडिकल इन्शुरन्स घेताना फक्त कमी प्रीमियम हा निकष लावू नये. खालील गोष्टी अवश्य बघाव्या.
१. कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे ?
२. नेटवर्क हॉस्पिटलस कशी आहेत?
३. ज्या एजंट कडून इन्शुरन्स घेणार त्याचे रेप्युटेशन काय आहे, तो किती वर्षे अजून काम करणार आहे?
४. कोणते आजार कव्हर आहेत, कोणते नाहीत, कोणते आजार कूलिंग पिरियड नंतर कव्हर होणार आहेत?
५. क्लेम आला तर किती टक्के रक्कम इन्शुरन्स कंपनी देणार आहे आणि किती स्वतःला बेयर करायचीय?
६. क्लेम मध्ये कोणत्या गोष्टी कव्हर आहेत? [जसे काही कंपन्या ग्लोव्ह , डायपर याचे पैसे देत नाहीत] ते बघावे.
७. कव्हर घेताना किती कव्हर घ्यावे हे आपल्या फायनांशियल प्लॅनर शी बोलून मग ठरवावे.
४. अनेकजण ज्या कंपनीत जॉब करत असतात तिथे त्या कंपनीचा मेडिक्लेम असतो, त्यामुळे स्वतःचा स्वतंत्र मेडिक्लेम इन्शुरन्स घेत नाहीत.
यात काही बाबी लक्षात घ्येतल्या जायला हव्यात.
कंपनीचा मेडिक्लेम:
फायदे :
१. बहुतेक कंपनीच्या मेडिक्लेम मध्ये तुम्ही, तुमची पत्नी / पती, तुमची मुले ही कव्हर असतातच. पण त्याबरोबर तुमचे आई, बाबा किंवा सासू सासरे हे पण अतिरिक्त प्रीमियम देऊन कव्हर करता येतात. कंपनीच्या मेडिक्लेम मधून मिळणारा हा खूप महत्वाचा फायदा आहे. त्याचा लाभ जरूर घ्यावा. कारण आपले आई बाबा किंवा सासू सासरे हे बऱ्यापैकी वयस्क असतात आणि त्यांना बाहेर स्वतंत्र मेडिक्लेम मिळत नाही, मिळला तरी खूप मर्यादा असतात आणि अटी शर्ती असतात.
२.कंपनीच्या मेडिक्लेम मधून मिळणारा अजून एक फायदा असा की यात बहुतेक वेळा कूलिंग पिरियड नसतो. आणि प्री एक्सिस्टिंग आजार कव्हर होतात.
३. कंपनीने नेमलेल्या मेडिक्लेम कंपनीवर शक्यतो क्लेम सेटलमेंट करायचे थोडे दडपण असते, कारण मिळणारा बिसनेस मोठा असतो.
तोटे:
१. जोवर त्या कंपनीत तुम्ही जॉब करत असता तोवरच तो मेडिक्लेम व्हॅलिड असतो. कंपनी सोडली किंवा बदलली की तो रद्द होतो. म्हणजे नवी कंपनी तिथला नवीन मेडिक्लेम, त्याचे नवीन आणि वेगळे नियम. काही कंपन्यांतून पोर्टेबलीटी मिळते पण अगदी काही.
२. वरील साहित्य च्या केस मध्ये जसे झाले तसे जर तुम्ही नोकरी सोडून व्यवसायात पडलात किंवा आहे ती नोकरी गेली तर तुम्ही कव्हर लेस होता. आणि मग ऐन वेळी हॉस्पिटलायझेशन आले तर अडचण येते. शिवाय तुमचे जसजसे वय वाढते तसतसे तुम्ही मेडिकेलमच्या जास्त प्रीमियमच्या महाग स्लॅब मध्ये जाता. शिवाय वयानुसार येणारे आजार हे मग कव्हर होत नाहीत, ते कूलिंग पिरियड मध्ये जातात.
३. आज तुम्ही मेडिक्लेम इन्शुरन्स घेतला आणि लगेच पहिल्या दुसऱ्या वर्षी क्लेम आला तर कंपनीचे नुकसान असते त्यामुळे कदाचित कंपनीला क्लेम देण्याच्या स्वाभाविकते मध्ये थोडी अडचण येऊ शकते [असा पोंक्षे यांचा एक अंदाज]
४. लक्षात ठेवा , तुम्ही जोवर निरोगी आहात तेव्हाच मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स काढून घ्या.
५. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की जर हॉस्पिटलायझेशन झालंच नाही तर प्रीमियम वाया जातील. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्हाला जर हॉस्पिटलायझेशन लागलं नाही तर तुम्ही भरलेले प्रीमियम वाया गेले हे दुःख करत बसण्यापेक्षा तुम्ही निरोगी आयुष्य जगत आहात यात आनंद माना.
६. कंपनीचा मेडिक्लेम शक्यतो पालकांसाठी वापरावा आणि स्वतःचा इन्शुरन्स स्वतःसाठी वापरावा.
७. आपण घेतलेल्या मेडिक्लेम पॉलिसी ची माहिती घरातल्या सर्वांना देणे आवश्यक आहे. बरेचदा असे होते की अशा पॉलिसी ची माहिती फक्त घरातल्या कमावत्या पुरुषालाच माहिती असते आणि प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा तो कमावता पुरुषच आजारी पडतो कधी कोमात असतो त्यामुळे अशा पॉलिसीची माहिती जर घरातल्या मंडळींना नसेल तर त्या मंडळींची फारच ससेहोलपट होते. आणि हे फक्त मेडिक्लेम पॉलिसी बाबत नाहीये तर घरातल्या कर्त्या पुरुषाने आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कोणत्या कोणत्या मेडिक्लेम पॉलिसी आपण घेतलेल्या आहेत, आपल्यावर किती कर्ज आहे? ते कोणाकोणाचे आहे. या आणि अशा सर्व बाबींची माहिती घरातल्या इतर मंडळींना देणे आवश्यक वाटते.
अनेक घरातील कर्त्या पुरुषाचा असा समज असतो की बायकांना काय कळते, त्यांनाही माहिती देण्याची गरज काय? हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा असून घातक आहे. घरातल्या सर्व आर्थिक बाबींची माहिती आपल्या जोडीदाराला असणे मला तरी खूप आवश्यक वाटते.
८. जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला रुग्णालयाची गरज पडली आणि मेडिक्लेम पॉलिसी वापरावी लागली तर त्या वेळी कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, पॉलिसी नंबर त्याचे ओळखपत्र या सर्व गोष्टींची माहिती एका कागदावर लिहून तो सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावा. किमान तीन महिन्यात नाही एकदा तरी त्याचा रिव्ह्यू घ्यावा.
९. मेडिक्लेम पॉलिसी विकणाऱ्या एजंटने सुद्धा आपल्या क्लायंटची निदान सहा महिन्यातून एकदा बोलावे आणि त्यांना त्यांच्या पोलिसी बद्दल काही शंका अडचणी आहेत का याची विचारणा करावी.
असे अनेक सल्ले या फुकट सल्लागार कौस्तुभ पोंक्षेने साहित्य आणि ललिताला दिले. हॉटेलचे बिल पोंक्षेनेच दिले.
[पोंक्षेच्या या सवयीसाठी त्याला घरी बरेच ऐकावे लागत असे ........ पण सुधारेल तो कौस्तुभ पोंक्षे कसला?] ....
आणि ... पुन्हा कधीतरी भेटायचे [बसायचे नव्हे] असे ठरवून साहित्य, ललिता, कौस्तुभ पोंक्षे असे तिघेही त्या हॉटेलातून हसत हसत बाहेर पडले...
[कौस्तुभ पोंक्षे [८००७६०५०८२] याच्या डायरीतून.... ]
प्रतिक्रिया
7 Jun 2025 - 6:22 am | कंजूस
बरोबर.
>>जोवर निरोगी आहात तेव्हाच मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स काढून घ्या>>.....
आणि वय पंचेचाळीस किंवा पन्नासच्या आत असताना.
साठ होण्याच्या वेळी बंद करावा (माझा लेख आहे) हे माझे मत. प्रत्येक पाच वर्षांनी प्रिमिअम वाढवत नेतात आणि क्लेमवर कॅपिंग असते रोगाप्रमाणे. यूट्यूबवर विडिओ आहेत ते टाकावेत. प्रकाश राज वगैरे यांचे. सिजीएचएस स्किमचे रोगी येणे म्हणजे डॉक्टरांना घबाडच सापडते. त्यांचा वर्षाला सहा लाख फंड असतो तो काढायचा.
7 Jun 2025 - 2:54 pm | सस्नेह
उत्तम टिप्स .
7 Jun 2025 - 4:04 pm | प्रकाश घाटपांडे
खर तर पोंक्षाने बिल दिल्यानंतर ललिताला वाटले की उगीचच या पोंक्षाविषयी आपण ग्रह करुन घेतले होते. त्या कोकणातल्या फार्महाउसचा सल्ला देखील त्याने बरोबर दिला होता पण मन मानायला तयार नव्हत Cognitive dissonance दुसरे काय?
7 Jun 2025 - 6:19 pm | मारवा
पोंक्षे उच्चतम दर्जाचा उत्कृष्ठ सेल्समन आहे.
7 Jun 2025 - 6:35 pm | गवि
उत्तम उपयुक्त माहिती देण्याचा रंजक मार्ग. अगदी साहित्यिक, लालित्यपूर्ण..
7 Jun 2025 - 7:32 pm | सुबोध खरे
तुम्ही जोवर निरोगी आहात तेव्हाच मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स काढून घ्या
पहिला भाग बरोबर.
टर्म इन्शुरन्स तुम्ही कमवायला लागलात कि सरळ ३० वर्षाचा (किंवा ६० वर्षाचे होईपर्यंतचा ) काढून घ्या. कारण तरुण असताना टर्म इन्शुरन्स ची किंमत कमी असते आणि हि किंमत पुढची सर्व वर्षे तेवढीच राहते
7 Jun 2025 - 7:35 pm | सुबोध खरे
मेडिक्लेम बद्दलची माहिती अतिशय उत्तम आहे.
सर्वानी यावर नक्कीच कार्यवाही करावी. विशेषतः घरच्यांना आपल्या मेडिक्लेम (आणि इतर विमा सुद्धा) बद्दल पूर्ण माहिती द्यावी आणि त्याची कागदपत्रे सुद्धा कुठे ठेवलेली आहेत ते दाखवून ठेवावे.
8 Jun 2025 - 11:19 pm | फारएन्ड
ही साहित्य व ललिता वाली सिरीज मस्त होत आहे. नावासकट :) येउ द्या अजून.
9 Jun 2025 - 12:22 pm | अनामिक सदस्य
"अनेक घरातील कर्त्या पुरुषाचा असा समज असतो की बायकांना काय कळते, त्यांनाही माहिती देण्याची गरज काय? हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा असून घातक आहे. घरातल्या सर्व आर्थिक बाबींची माहिती आपल्या जोडीदाराला असणे मला तरी खूप आवश्यक वाटते."
अनेक घरातील महिलाना आर्थिक बाबीत खर्च करण्यापुरता रस असतो. त्याना आर्थिक व्यवस्थापन कन्टाळवाणे वाटते आणि सान्गून सुद्धा लक्श देत किन्वा घालत नाहीत.