कलिवर्ज्य- भाग-२

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
25 May 2025 - 6:42 pm
गाभा: 

History of Dharmastra या विख्यात ग्रंथाच्या तिसर्‍या भागात कलिवर्ज्य नावाचे एक प्रकरण विस्तारपुर्वक मांडुन झाल्यावर कलिवर्ज्यावरमहामहोपाध्याय भारतरत्न पांडुरंग वामन काणे खालील त्यांचे मत किंवा भुमिका नोंदवतात ती त्यांच्याच शब्दात खालीलप्रमाणे ( जाड ठसा मुळचा नाही माझा आहे )

The chapter on Kalivarjya can be employed as a very effective answer to those who trot out the theory of the "Unchanging East". Social ideas and practices undergo substantial changes even in the most static societies. Many of the practices that had the authority of the Veda ( which was supposed to be self-existent and eternal ) and of such ancient smritis as those of apstamb, manu, and yadnyawalkya smriti. had either come to be given up or had become obnoxious to popular sentiment. This fiction of great men meeting together and laying down conventions for the Kali Age was the method that was hit upon to admit changes in religious religious practices and ideas of morality.

The Kalivarjya texts are also a complete answer to those who hold fast to the notion that dharma (particularly Achardharma) is immutable and unchangeable ( aparivartaniya). This chapter on Kalivarjya unmistakable shows how the most authoritative dicta of the Veda and of ancient sages and law-givers were set aside and held to be of no binding authority because they ran counter to prevailing notions and furnishes a powerful weapon in the hands of those who want to introduce reforms in the incidents of marriage, inheritance, and other matters touching modern Hindu society.

काणे यांचा परीचय

यांचा थोडा परीचय देणे इथे आवश्यक आहे.वरील लेखक महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे हे आत्यंतिक विद्वान असे गृह्स्थ होते यात कुठलीच शंका नाही. त्यांच्या संस्कृत इंग्रजी भाषेच्या असामान्य प्रभुत्वाविषयी, त्यांच्या गहन व्यासंगाविषयी तर काय बोलावे. त्यांचे त्या काळाचे शिक्षण हे एम.ए. एल. एल. एम. असे होते. मुंबई उच्च न्यायालयाचे ते वकील होते. बॉम्बे एशियाटीक सोसायटी या संस्थेचे ते प्रेसीडेंट होते. तत्कालीन आधुनिक जगाचे त्यांना सखोल ज्ञान होते सर्व सुधारणावादी मोहिमा, दोन महायुद्धे त्यांच्यासमोर झालेली होती. फुले शाहु आंबेडकर आणि सुधारणावादी चळवळी त्यांना सर्व सर्व चांगल्या प्रकारे माहीती होते. भारतरत्न हा सर्वोच्च सम्मान मिळवणारे काणे हे पहीले मराठी माणुस होते. ( ही बाब अनेकांना माहीत नसते ) तर अशा व्यक्तीने इतक्या पात्र व्यक्तीने केलेले वरील विधान जेव्हा मी पहील्यांदा वाचले तेव्हा मला मोठा धक्काच बसला. ज्यांना सर्व सर्व काही माहीती आहे त्यांनी याचे समर्थन अशा प्रकारे करावे याचा मला तरी मोठा खेद वाटला.

पुनुरुज्जीवनवादाचा प्रभाव

महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध भारतात तेव्हा पुनुरुज्जीवनवाद जोरात होता. ब्रिटीशांनी त्यांच्या आधुनिक ज्ञानाने विज्ञानाने अनेक जुन्या समजुतींना मोठा धक्का दिलेला होता. तेव्हा एक जोरदार त्वेषपुर्ण प्रतिक्रीया भारतीय विद्वानांकडुन दिली जात असे की आमचीही प्राचीन शास्त्रे काही कमी नाहीत . काणे यांचा वरील विधानांतील टोन याला साजेसा असाच आहे. वरील विधानात काणे म्हणतात की आमचे प्राचीन कायदे काही स्थितीशील नव्हते ते परीवर्तनीय होते आणि कलिवर्ज्य हे आमच्या प्राचीनांची कायद्यात सुधारणा बदल करण्याचे amendment चे साधन होते. ते पुढे म्हणतात की वेदा सारख्या आणि प्राचीन धर्मसुत्रासारख्यातील कायद्यांना सुद्धा कलिवर्ज्य द्वारे बदलण्यात येण्याची मुभा होती. आणि पुढे सर्वात मोठी बाब म्हणजे या कलिवर्ज्याने ज्या सुधारकांना समाजात सुधार आणायचा आहे त्यांच्या हातात कलिवर्ज्याच्या रुपाने एक शक्तीशाली शस्त्र च जणु देऊन ठेवलेले होते. हे सर्व ते ब्रिटीशांना किंवा त्यांच्या बाजुने जे प्राचीन ग्रंथावर टीका करतात त्यांना "सुनावत" आहेत असे दिसते.

कलिवर्ज्याने नेमका काय reform साध्य केला ?

मात्र जेव्हा आपण त्यांनीच त्याच प्रकरणात कलिवर्ज्याने नेमके कोणते बदल जुन्या कायद्यात केले व त्याने नेमका कोणता "सुधार" किंवा " प्रगती" झाली हे बघतो तेव्हा नेमके विरुद्ध चित्र आपल्याला दिसते. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की काणे यांना हे सगळे कळुनही ते इतके धडधडीत चुकीचे विधान कसे करु शकतात ? याला एका लेखात शरत पाटील हे जेव्हा "हयवदन" या गिरिश कार्नाड यांच्या नाटकाची समीक्षा करत होते तेव्हा त्यांनी कार्नांडासाठी वापरलेले एक विशेषण इथे वापरण्याचा मोह होतो. ते लेखाचे शिर्षक असे होते की " नेणीवेने परतवलेली प्रतिभेची झेप " असेच जेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी सारखी व्यक्ती त्र्यंबकेश्वराच्या अभिषेकासाठी किंवा नरहर कुरुंदकरा सारखे महान विचारवंत मुंज वगैरे की काय करतात तेव्हा आठवते ते असो तर

काणे असे म्हणतात कलिवर्ज्याने सुधारकांना सुधार करण्यासाठी साधन दिले. सुधारसाठी त्यांचा शब्द आहे reform या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ होतो
In Webster's Dictionary, "reform" means to change from bad to good; to remove that which is bad or corrupt, as in to reform abuses or vices. It implies a process of improvement or betterment through correction of faults or abuses.
भारतात सुधारणावादी आगरकर, रॉय इत्यादीना reformist म्हटले जाते. यात बदल जो होतो तो चांगल्यासाठी होणे अपेक्षीत आहे प्रगती साठी अपेक्षीत आहे.
प्रत्यक्षात बघितले तर असा बदल कलिवर्ज्याच्या नियमानुसार बहुतांश ठिकाणी झालेलाच नाहीये ( सर्वच ठिकाणी सकारात्मक झाला नाही असे म्हणत नाही कृपया लक्षात घ्यावे ) याच्या उलट कलिवर्ज्याचे बहुतांश नियम हे समाजाला मागे नेणारे , प्रतिगामी, असे आहे. अनेक ठिकाणी तर त्याहुन किमान काही शतके जुन्या असलेल्या धर्मग्रंथाच्या उदार नियमांना किंवा असे म्हणु काळाच्या मानाने शिथिल नियमांना ही कलिवर्ज्य आवर्जुन संपवण्याचा प्रयत्न करतो.

तर आता थोडे इथे क्रमाने काही नियमांचा आढावा घेऊ या त्यांनी नेमका काय रीफॉर्म साध्य केला बघु

नियम क्रं-१

उदा. वरील नियम क्र. १ बघा जुन्या नियमानुसार स्त्री ला किमान ५ आपत्तीत तरी का होइना पुनरविवाहाची परवानगी दिलेली होती. आणि ती देखील खरे म्हणजे पुरेशी नव्हती पण ठिक आहे आपण समजुन घेउ की त्या काळानुसार ते तसे होते. पण कलिवर्ज्य तर वरील पाच गंभीर आपत्तीत सुद्धा पुनरविवाह करण्याचे स्त्रीचे स्वातंत्र्य हिरावुन घेतो आहे म्हणजे अगदी नपुंसक असला किंवा मृत जरी झाला तरी कलिवर्ज्य त्या स्त्रीला जुन्या कायद्यांनी दिलेला काहीसा उदार माणुसकी असलेला असा अधिकार जो अगोदरच अपुरा आहे तो सुद्धा हिसकावुन घेतो. तिला कायमस्वरुपी विधवेचे जिणे जगण्यास भाग पाडतो. यात काणेंना कुठला सुधार दिसला ? उलट विधवा विवाह हा एक सुधारकांच्या अनेक पैकी एक महत्वाच कार्य मानले गेलेले आहे. इथे कलिवर्ज्य नेमका मागे पावले टाकतोय.

नियम क्रं -२

वरील नियम क्रं २ जो आहे तो उघड उघड उच्चवर्णीय ब्राह्मणांनी वा सनातनीनी बनवलेला दिसतो. पुर्वीच्या पुन्हा उदार धर्मग्रंथानी जी किमान अपुरी अनुलोम विवाहाची परवानगी दिलेली होती ती कलिवर्ज्य काढुन रद्द करतो. यामागे वर्णाश्रम व्यवस्थेला अधिकाधिक बळकटी आणणे व सनातन्यांच्या द्रुष्टीने "आवश्यक" अशी स्वातंत्र्याचा संकोच करणारी मुलभुत अधिकार नाकारणारी वर्णाश्रम व्यवस्था दृढ करणे हेच उद्देश या कलिवर्ज्याने साध्य होते. याने काय रीफॉर्म साधला ?

नियम क्रं -६

वरील नियम क्र ६ तर फारच उदार असा प्राचीनांचा नियम होता. त्याविषयी तर आश्चर्य वाटते की (काळाच्या मानाने उदार असे म्हणतोय विनंती आहे की हे लक्षात घ्या ) बलात्कारीत स्री ला पुन्हा पाळी आली की त्यानंतर ती शुद्ध होते असे मानले जात असे व त्यानंतर तिला समाजात वावरण्याची पुर्ण परवानगी असे. खरे तर हा ही एक आक्षेपजनक होता पण सध्या कलिवर्ज्य शी तुलना महत्वाची आहे तर त्यावरच बोलु. तर कलिवर्ज्याने मात्र अशा कुठल्याही बलात्कार झालेल्या स्त्री ला जी खरे म्हणजे स्वतः victimआहे. तिला पुन्हा पवित्र न मानता तिच्या सर्व प्रकारच्या सामाजिक स्वातंत्र्यावरती बंधने आणलेली आहेत. या अशा कलिवर्ज्य ने केलेल्या बदलाला आपण काय म्हणावे रीफॉर्म झाला ? प्रगती झाली सुधारणा झाली ?

नियम क्रं -७

वरील नियम क्र.७ हा किमान काही लोकांचा अपवाद ठेवत असे व ब्राम्हणाला त्यांच्या कडे भोजन घेण्याची परवानगी देत असे. नंतरचा काळ पाहीला व आज जरी तुम्ही कुठल्याही सनातनी व्यक्तीला सांगा की बाबा एके काळी ब्राम्हण किमान काही अपवाद का होइना शुद्र व्यक्तीच्या इथे भोजन करत असे तसे त्याला धर्मशास्त्राने मान्यता दिलेली होती. मी खात्रीपुर्वक सांगतो की त्यांना या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही की प्राचीन धर्मग्रंथ ब्राम्हणाला किमान काही बाबतीत सुट देत होती. पुन्हा इथे सनातनी वर्गाने कलिवर्ज्य चा वापर करत वर्णाश्रम व्यवस्था बळकट करण्यासाठी ब्राम्हणाला सर्व प्रकारच्या शुद्राकडे कुठल्याही परीस्थित्तीत अन्न घेउ नये असे बजावतो. याने रीफोर्म झाला का ? याने उलट भेदभाव घट्ट झाला नाही का ?

एक रोचक बाब इथे नमुद करतो कलिवर्ज्य चा काळ हा इसवी सन चे १० वे शतक आहे, म्हणजे हे कलिवर्ज्य चे नवे "सुधारु नियम" साधारणपणे नेमके नाही दहाव्या शतकात अस्तित्वात आले निर्मिती झाली. आणि ज्या जुन्या धर्मसुत्रांचे स्म्रुतींचे नियम हे कलिवर्ज्य बदलत आहेत तोडत आहेत ते किमान इ.स. पुर्व ५ व्या शतकातले साधारण आहेत. म्हणजे जुने परवडले म्हटल्यास गैर काय ? तर बघा त्यानंतर पुढे इ.स. १२९० च्या सुमारास साधारण ज्ञानेश्वरी येते. आता कलिवर्ज्य चा प्रभाव पहा.

आता बघा वरील नियम क्र ७ चा प्रभाव पुढच्यांवर कसा पडतो एकदा वरील नियम क्र ७ पुन्हा वाचा आणि आता ही खालेल ओवी बघा.

स्वधर्म आचरण्यास कीतीही कठीण वाटला तरी परधर्मापेक्षा तो आचरणेच कसे योग्य श्रेयस्कर आहे ( परधर्मो भयावह:) चे उदाहरण पटवुन देतांना दिलेल्या ओव्या.

सांगे शुद्रघरीं आघवीं, पक्वान्ने आहाती बरवीं, तीं द्विजें केंवी सेवावीं, दुर्बळु जरी जाहला.
हे अनुचित कैसेनी कीजे, अप्राप्य केवीं, इच्छिजे, अथवा इच्छिलेंही पाविजे, विचारीं पां

अर्थ- मला असे सांग, शुद्राच्या घरी मधुर चवीची पक्वान्ने आहेत, आणि एखादा दरिद्री ब्राह्मण आहे म्हणुन त्याने ती सेवन करावी का ? असे अनुचित कृत्य दरिद्री ब्राह्मणाने कसे बरे करावे? जे घेण्यास योग्य नाही अशा गोष्टीची का इच्छा करावी ? इच्छा करुन अशा पक्वान्नांची प्राप्ती जरी झाली तरी त्याचे सेवन करावे का ?
(अ-३-ओ-२२१-२२२-२२४)

आता या नंतर कोण येतात ? यानंतर सावरकर रत्नागिरीत एक चळवळ चालवतात सामुदायिक सहभोजनाची. ज्यात समाजातील सर्व घटक एकत्र येउन सहभोजन घेतात. हे म्हणजे इथुन सुरुवात करावी लागते. ही बाब जरी फार साधी वाटली तरी तिला तेव्हा फार मोठा विरोध त्याकाळी झालेला होता हे कृपया लक्षात घ्यावे. या मुळ नियमांना अजुन शिथील करुन किंवा जुन्या कठोर नियमांना बाद जर कलिवर्ज्याने केले असते तर सुधार झाला असे आपण म्हणु शकलो असतो. हे एक उदाहरण आहे सावरकर नाही तर दुसरे कोणी ही सुधारक घ्या मला असे म्हणायचे आहे की त्यांची वाट अशा प्रतिगामी नियमांनी अधिक खडतर होत जाते. जर ते कलिवर्ज्य खरेच योग्य रीतीने वापरल्रे गेले असते तर आज चित्र नक्कीच आशादायक आनंददायी झाले नसते का ?

नियम क्रं- ९

कृपया वरील ९ वा नियम बघा सर्वसाधारणपणे पुर्वीच्या काळात साधु सन्यासी हा जो आहे तो काही प्रमाणात वर्णाश्रमाच्या कठोर बंधनातुन मुक्त केला जात असे किंवा मानला जात असे. जाति ना पुछो साधु कि असे कबीर म्हणतो ते बघा या संदर्भात . मात्र हा कलिवर्ज्य वर्णाश्रमाला बळकटी आणत आता साधु संन्यासी यति जरी असला तर त्यालाही शुद्राकडुन भिक्षा न घेण्याचे बंधन घालतो. म्हणजे जे या व्यावहारीक समाजजीवनाचा तसे जवळचा भाग नाहीत बाहेरचे आहेत त्यांनाही हा कठोर नियम का केले असेल ? तर हा कच्चा दुवा राहुन जाउ नये म्हणुन इथुन पुन्हा काही शुद्र मान्यता मिळवतील या भयाने इथुन पुन्हा काही साधु विरोधात जातील म्हणुन. त्यांना याचे कठोर पालन सर्वच स्तरातुन हवे होते असे दिसते.

नियम क्र.-१०

वरील १० वा नियम बघा ब्राम्हणाला जरी तो आततायिन असेल म्हणजे हिंसक किंवा मर्यादा सोडुन रागाच्या भरात येउन शुद्राला अगदी जिवे मारावयास जरी आलेला आहे, तो ब्राह्मण शस्त्रसज्ज जरी असला तरीसुधा अशा ब्राम्हणाला स्वरक्षणासाठी सुद्धा मारले तरीही ती ब्रह्महत्याच मानली जाईल. या कलिवर्ज्यच्या द्वारे शुद्रांचा अगदी मुलभुत स्वतःचे जीवन वाचवण्याचा अधिकारही जो त्याला जुन्या ग्रंथांनी दिलेला होता तो अधिकार कलिवर्ज्य काढुन घेतो. म्हणजे हिंसक ब्राह्मणाच्या हातुन मरण आले तरी चालेल आणि याला अशा कलिवर्ज्यला काणे powerful weapon in the hands of those who want to introduce reforms असे संबोधतात त्याचे सखेद आश्चर्य वाटते.

नियम क्रं-१६

वरील नियम १६ प्रमाणे ब्राम्हणाने महापातक जरी केले तरी त्यासाठीची जी पुर्वीची कठोर शिक्षा मृत्युदंडाची होती ती कलिवर्ज्याने केवळ ब्राम्हणासाठी कॅन्सल केलेली आहे. इथे मृत्युदंड देणे हेच मुळात मानवतेच्या महान मुल्ल्यानुसार चुक आहे वगैरे उद्दात्त आधुनिक विचार नाहीत किंवा हा कलिवर्ज्य यातुन प्रेरीत नाहीत. याचे कारण जर हा उदात्त हेतुतुन प्रेरीत असता तर इतर तीन वर्णाना महापातक केल्यावर तीच शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे. केवळ ब्राम्हणाला काळजीपुर्वक यातुन वगळण्यात आलेले आहे. इम्युनिटी देण्यात आलेली आहे. हा रीफॉर्म आहे का ? याला काय म्हणावे ?

आता कलिवर्ज्याने चांगले बदल केलेच नाहीत का ? किंवा कलिवर्ज्य वर तत्कालिन बौद्ध धर्माच्या जैन धर्माच्या सकारात्मक बाबींचा दबाव आलाच नाही व त्यातुन त्यांनीही स्वतःच्य कायद्यात बदल केलेच नाहीत असे मी अजिबात म्हणत नाहीये. वरती सर्व च दिलेले आहेत त्यातले काही कलिवर्ज्याने केलेले बदल सकारात्मकच आहेत. तर कलिवर्ज्याची प्रेरणा ही तत्कालिन इतर जैन बौध्द धर्माचा प्रभाव बदलती राजकीय सामाजिक व्यवस्था हा देखील विचार करुन केलाच पाहीजे. त्याची जाणीव मला आहे मात्र या भागात मी सर्वच कव्हर करु शकत नाही माझा तितका अभ्यास ही नाही. पण जो सर्वाधिक महत्वाचा मुद्दा मला वाटला तो मी इथे अधोरेखीत केला. व चर्चेतुन मला इतर बाबी इतर पैलु जाणुन घेण्यात रस आहेच. म्हणजे हेच तर आपण चर्चेतुन अपेक्षा करतो की इतर पैलु कळावेत तर

नियमांचे वर्गीकरण

एकुण कलिवर्ज्याच्या सुमारे मोजक्या ५५ नियमांचे मी सोयीकरीता चार प्रकारात वर्गीकरण करतो



पुर्णपणे अधोगतीकडे नेणारे- जे मागील उदार नियमांना एकतर पुर्ण बाद करतात किंवा त्यांना निष्प्र्भ करतात. आणि पुर्णपणे समाजाला मागे नेतात असे high impact असणारे नकारात्मक आपण म्हणु.


खरोखर सकारात्मक कलिवर्ज्याचे नियम जे नुसतेच चांगले नाहीत मोठा high impact असलेले सकारात्मक नियम म्हणु या. जे समाजाला पुढे नेतात किंवा जुन्या नकारात्मक नियमांना निष्प्रभ तरी किमान करतात.


म्हणजे निरुपद्रवी स्वरुपाचे कलिवर्ज्य नियम हाय काय आणि नाय काय टाइपचे उदा. नियम क्रं ३५ श्रोताग्निला तोंडाने फुंकर मारुन प्रज्वलित करणे , किंवा ३३ नं चा कमंडलु सतत बाळगणे यावर कलिवर्ज्य बंदी आणतो. तर याने काही मोठा फरक पडत नाही low impact आपण म्हणुया बाळगला काय कमंडलु आणि नाही बाळगला काय खेळ बाबा हवा तसा. या नियमांच्या असण्याने नसण्याने कोणाच्या जीवनावर काही मोठा परीणाम होत नाही.



हे थोडे विशेष आहेत हे काय impact चे आहेत हा मुद्दा गौण आहे. हे एकुण चांगले आहेत की वाईट हे पण बिनमहत्वाचे ठरते हे एकुण वर्णाश्रम व्यवस्थेला बळकटी आणतात की शिथील करतात या दृष्टीकोणातुन जास्त महत्वाचे आहेत. आणि यांचा beneficiary कोण आहे व तो exclusive आहे आरक्षण घेतलेला की नाही. यावरुन एकूण खरे कलिवर्ज्य धोरण स्पष्ट होते. म्हणजे इथे exclusive beneficiary कोण आहे कलिवर्ज्य चा आणि एकुण धोरण कुठे नेतोय हा नियम ?
हे प्रश्न हा शोध घेणे आवश्यक आहे. त्यातुन खरे धोरण नियम कर्त्यांचे कळण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे हे तर दिसत आहे पण मी न्युट्रल शोधाच्या बाजुने आहे
एक उदाहरण दिले किंवा हायपोथेसीस म्हणुन वर्णाश्रम व्यवस्था बघा . जे सत्य असेल ते शोधु या.

आता माझ्या वरील विवेचनात मी अर्थातच केवळ अ प्रकारातील नियमांचा उहापोह केला. ज्यांचा high impact आहे आणि पुर्णपणे नकारात्मक असे नियम आहे ते आहे. पण एक लक्षात घ्या वरील नियम सर्वात जास्त प्रभावी परीणाम कारक आहे म्हणजे जीवनाला प्रभावित करणारे या अर्थाने

आता माझे असे म्हणणे आहे की बाकी ब क आणि ड वर पण आपण येउच आणि त्याचे ही विश्लेषण करुच आणि सर्व चार प्रकारांचा एकूण काय परीणाम झाला ते पाहु. पण सध्या इथे थांबतो आणि इतकेच म्हणतो की जरी केवळ इतकेच नियम जरी घेतले लक्षात तर तुम्ही याला रीफॉर्म झाला असे मानता का ?
कलिवर्ज्य हे समाज सुधारणा साध्य करणार महान साधन होत का ? कलिवर्ज्याने पुढील सुधारकांची वाट सोपी केली की अवघड केली ? हे प्रश्न विचारुन बघा. मला तरी असे झाले असे दिसुन येत नाही.

थोडा उरबडवेपणा

आणि काणे सारखे खरोखर ज्ञानी आदरणीय महान व्यक्ती जेव्हा असे विधान करतात . हेच जर कोणी इतर सनातनी व्यक्तीने केले असते किंवा कोण्या सामान्य माणसाने केले असते तर वेगळी गोष्ट होती ? याचा मला मोठाच खेद वाटतो. त्याच प्रमाणे मी कुठेही आजपर्यंत कलिवर्ज्य वर लेख किंवा चर्चा किंवा साधा उल्लेख वाचलेला नाहीये. अर्थात माझे वाचन आणि आवाका मर्यादीत असल्याने कदाचित माझ्या नजरेत हा विषय आला नसावा. पण एरवी इतका खोल वर आढावा घेणारे संस्कृतचे पंडीत या बाबी वर का लिहित नाहीत बोलत नाहीत ? मी तर म्हणतो माझे वरील आकलन पुर्ण चुकीचे जरी असले तरी हरकत नाही उलट तसे आढळल्यास आनंदच होइल. पण एरवी संस्कृतीच्या अध्यात्मिक भागा वर इतका फोकस करतांना त्यांच्या सामाजिक अंगाकडे जे दुर्लक्ष केले जाते ते अनाकलनीय आहे. खरे पाहता माणसांचे प्रत्यक्ष जीवन तुम्ही बघा या सामाजिक अंगाने रोज प्रभावित होत असते. जसे शुद्र वैश्य आदी रोज एका भेदभावाला आजही सामोरे जात असता. जे ब्राह्मण दोन्ही सनातनी असतील तरी किंवा सुधारक असतील तरी त्यांच्य रोजच्या प्रत्यक्ष जीवनावर या घटकांचा प्रत्यक्ष परीणाम क्षणोक्षणी होत असतो तो मानसिक स्वरुपाचा असेल किवा इतर पण जणु हे अस्तित्व अस्तित्वात्च नाहीत हा ट्रॅफिक जॅम च जणु अस्तित्वात नाही असे वागणे याला काय अर्थ आहे ?
हा स्पिरीच्युअल बायपासींग नाही तर काय आहे ?
असो
तर चर्चकांचे आणि टीकाकारांचे मनापसुन स्वागत आहे.