वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
13 May 2025 - 2:43 am

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे
प्रस्तावना

कॉर्पल पांडे — ह्या नावामागे केवळ एक वायुसैनिक नव्हे, तर एक सच्चा देशभक्त, एक कवी मनाचा चित्रकार, माणुसकीची जाण असलेला निष्ठावान कार्यकर्ता, अशी एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस आहे. माझ्या हवाई दलातील काळात मदतीचा हात मागितला. दिलेल्या मदतीचे त्याने सोने केले. त्यांच्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत. त्यांची निष्ठा, कार्यतत्परता, आणि माणुसकीची ऊब — या सर्वांचे प्रतिबिंब या चार भागांमध्ये मी जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.

ही लेखमाला म्हणजे केवळ आठवणींचा धागा नसून, एका वायुसैनिकाच्या जीवनातील आदर्शांचा दस्तऐवज आहे. वाचकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, आणि देशसेवेतील 'मौन नायकां'चे स्मरण व्हावे, हीच सदिच्छा.
भारत पाकिस्तान लढाईच्या पार्श्वभूमीवर हवाईदलाच्या गौरवमय कामगिरीला सॅल्यूट...

– विंग कमांडर शशिकांत ओक (नि.)
....

(विद्याधरने कॉपल पांडे जो फक्त इंग्रजीतील बोलत असे ते संवाद मराठीत रुपांतर करताना देवनागरीत ठेवूया असे सुचवले म्हणून तसे ठेवले आहे.)

वायुसेनेतील आठवणी – भाग १
कॉपल पांडे जी.एस.
कृपया Cpl चा उच्चार 'कॉपल' (कॉर्पोरल / ’kɒp(ǝ)l/) असा करा, C.P.L. नाही.

काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि कायमची छाप सोडतात. अशाच एका व्यक्तिची आठवण म्हणजे कॉपल पांडे गौरी शंकर.
ही गोष्ट आहे १५ ऑगस्ट २००० ची. मी हेड ऑफ अकाउंट्स डिपार्टमेंट म्हणून पुण्यातील एअर फोर्स स्टेशनच्या एअरमन मेसमध्ये 'बडा खाना' या कार्यक्रमात उपस्थित होतो. नॅशनल हॉलिडेच्या दिवशी असे कार्यक्रम नेहमीच असतात.
तिथे एक सुंदर फ्लोरल डेकोरेशन आणि कॅलिग्राफीमध्ये लिहिलेला विचार पाहून मी आकर्षित झालो. हे सगळं कोणी केलं, हे शोधताना मला भेटला कॉपल पांडे. त्याच्या नम्र स्वभावाने मी प्रभावित झालो आणि लगेच त्याला विचारलं:
"उद्या माझ्या अकाउंट्स सेक्शनमध्ये ये आणि काही डिझाइन्स तयार कर."
तो म्हणाला:
"सर, आय विल कम. बट सर, आय हॅव ऑलरेडी कमिटमेंट्स. माय ड्युटीज आर इन शिफ्ट्स. इफ माय सीओ अलाऊज, मी रात्री येतो आणि काम करतो. आय अॅम स्टुडंट ऑफ अभिनव आर्ट कॉलेज पुणे."
(सर, मी येईन. पण सर, माझ्याकडे आधीचे काही कमिटमेंट्स आहेत. माझ्या ड्युटीज शिफ्टमध्ये आहेत. जर माझे कमांडींग ऑफिसर परवानगी देतील, तर मी रात्री येईन आणि काम करीन. मी अभिनव आर्ट कॉलेज पुण्याचा विद्यार्थी आहे.)
दुसऱ्या दिवशी तो आला नाही. नंतर कळलं की त्याच्या बॉसने त्याला परवानगी दिली नव्हती.
काही महिने गेले.

२६ जानेवारी २००१ रोजी भुजमध्ये भीषण भूकंप झाला. पुणे स्टेशनवर मदतीचं प्रचंड ओझं आलं. आम्हा सर्वांची टारमॅकवर शिफ्ट ड्युटी लागली होती. त्यासाठी मी AN-32 च्या पार्किंग बेजवळ उभा होतो, कार्गो लोडिंग बघत होतो. सायंकाळची वेळ एक जण माझ्या दिशेने येताना दिसला. त्याने सॅल्यूट केला आणि म्हणाला:
"सर, डु यू रिमेंबर मी? आय एम कॉपल पांडे. आय एम सॉरी सर, लास्ट टाइम ऑफिस वर्कमुळे मी आलो नाही."
मी गंभीरपणे विचारलं:
"आत्ता इथे तू काय करत आहेस?"
तो म्हणाला:
"सर, आय वाँट टू गो इन धिस एअरक्राफ्ट टू भुज!"
मी म्हणालो:
"व्हाय? तुला माहित आहे तिथे किती बिकट परिस्थिती आहे?"
तो म्हणाला:
"सर, आय नो. बट आय वाँट टू हेल्प द अफेक्टेड पीपल."
मी ठामपणे सांगितलं:
"नो नीड. आपले लोक तिथे आहेत."
त्याने शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं:
"सर, देअर इज नो वन ऑफ माय फॅमिली. बट सर, डु वी नीड टू हॅव ओन्ली ब्लड रिलेशन्स टू हेल्प? ऑल ह्युमन्स आर अवर्स. आय वाँट टू गो. आय कॅन नॉट सिट हिअर. आय विल गो अ‍ॅट एनी कॉस्ट!"
(सर, तिथे माझं कोणी नातेवाईक नाहीत. पण सर, फक्त रक्ताचे नातेसंबंध असले तर मदतीसाठी धावायला हवे का? तिथे अडकलेली सर्व माणसं हाडामांसाची आपलीच आहेत ना. मला जायचं आहे. मी इथे असा हातावर हात धरून बसून राहू शकत नाही. मी कोणत्याही परिस्थितीत त्या असहाय्य लोकांच्या मदतीला जाईन!)
त्याचे कठोर पण आतून भिडणारे शब्द ऐकून माझ्या गणवेशात थरकाप झाला. मी असा विचार कधीच केला नव्हता. रस्त्यावर आणि ढिगाऱ्याखाली शेकडो मृत आणि जखमी लोक होते – ती पण माझ्यासारखी माणसंच होती.
ते माझे नातेवाईक नव्हते का? की फक्त रक्ताने आणि कर्मकांडाने जोडलेलेच माझे आप्त आहेत? मग अपरिचित लोकांच्या वेदनेने मला काहीच का वाटत नाही?
जर माझं मन इतकं संवेदनशील नसेल, तर त्याच्या भावना मला कशा समजणार? किमान मी त्याच्या मदतीच्या सादेला प्रतिसाद तरी देऊ शकत होतो का?
या विचारांच्या गुंत्यात अडकून गेलो. काही बोलता आलं नाही. फक्त मान डोलावली... आणि डोळ्यांत पाणी आलं. म्हणालो:
"कॉपल पांडे, गो अहेड. वेळ वाया घालवू नकोस."
तो म्हणाला:
"यस सर! आय हॅव टेकेन १५ डेज लीव्ह. आय हॅव बॉरोड मनी फ्रॉम फ्रेंड्स. आय हॅव अ कॅमेरा. आय एम रेडी. प्लीज सर, पुट मी इन द नेक्स्ट रेस्क्यू एअरक्राफ्ट!"
(यस सर! मी १५ दिवसांची रजा घेतली आहे. मित्रांकडून पैसे उसनं घेतले आहेत. माझ्याकडे एक कॅमेरा आहे. मी तयार आहे. कृपया मला पुढच्या रेस्क्यू विमानात पाठवा सर!)
मी गंभीर होत म्हणालो:
"लेट मी ट्राय."
तेवढ्यात दुसरं विमान आलं. क्रू खाली उतरले आणि एक जण म्हणाला:
"सर, हॉरिबल आहे तिथे. स्टेशन इज इन शॅम्बल्स. आय एम टायर्ड."
मी पांडेकडे वळून म्हणालो:
"यू वेट हिअर. आय विल टॉक टू द कॅप्टन."
तो आनंदाने म्हणाला:
"यस सर, आय विल ब्रिंग माय हँडबॅग."
तो गर्दीत नाहीसा झाला. मी ऑफिसमध्ये जाऊन फोन लावला:
"क्रूरूम सर?"
"प्लीज कॉल फॉर कॅप्टन ऑफ AN-32 जस्ट लँडेड."
थोड्या वेळाने आवाज आला:
"हॅलो?"
मी म्हणालो:
"विंग कमांडर ओक बोलतोय." थोडक्यात त्याला सगळे सांगितले.
कॅप्टन म्हणाला:
"लेट मी ट्राय सर."
मी फोन ठेवला आणि पांडे जवळ आलो. त्याला थम्ब्स अप केलं, आणि त्याने लांबून सॅल्यूट केलं.
घरी परतताना विचार करत होतो… हा आता विमानात असेल भुजला जायला...

पण तसे घडणार नव्हते! ... पुढे चालू...

व्यक्तिचित्रसद्भावना

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

13 May 2025 - 8:27 am | श्रीरंग_जोशी

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्चाची ओळख करून देणार्‍या अनुभवकथनमालिकेची उत्तम सुरुवात. धन्यवाद ओक साहेब.
पुभाप्र.

कॉमी's picture

13 May 2025 - 9:36 am | कॉमी

लिखाण आवडले.
पुभाप्र!

शशिकांत ओक's picture

13 May 2025 - 10:58 am | शशिकांत ओक

धाग्यावर प्रतिसादाबद्दल
१

पुढील भागाची उत्सुकता. मीही साधारण त्याच काळात पुणे विमानतळावर सिव्हिल एअरलाइनमधे नोकरी करत होतो. रोजच्या रोज दोन वेळा, अगदी रविवार धरून रोज, त्या ATC टॉवरमध्ये फ्लाईट प्लॅन फाईल करायला आणि ADC वगैरे क्रमांक मिळवायला मला जावे लागे. माझी बाईक घेऊन मी त्या सुखोई, जागवार विमानांच्या अगदी जवळून एप्रन एरिया ओलांडून टॉवरमधे जात असे. एरवी ही विमाने दुरून देखील बघायला मिळणे दुरापास्त. त्या आवारात हेल्मेट अत्यावश्यक होते आणि एन्ट्री पास.

टॉवरमध्ये वरती प्रत्यक्ष कंट्रोलवर फ्लाईट लेफ्टनंट, विंग कमांडर असे, बहुधा वयाने बरेच सिनियर असे अधिकारी असत. एक शिडी खाली उतरून पोटमजला होता, त्यात कॉपल लेव्हलचा कर्मचारी फ्लाईट प्लॅनच्याच कामासाठी बसलेला असे. त्या सर्वांशी फार चांगली मैत्री झाली होती. कॉपल कनोजिया हा अत्यंत सुस्वभावी आणि स्नेहपूर्ण स्वभावाचा अधिकारी तिथे नेहमी असायचा. त्याच्याशी गप्पा रंगत असत.

मुळात फार थोड्या सिव्हिल सर्विस लोकांना एअरफोर्स स्टेशनमधे इतक्या आत जाण्याचे भाग्य लाभते. पुणे, गोवा अशा एअरफोर्स विमानतळावरच ते शक्य आहे. एअरपोर्ट फी, चार्जेस या निमित्ताने अकाऊंट विभागात आणि मेटार (हवामान रिपोर्ट) साठी हवामान विभागात देखील जाणे येणे असे. तिथेही बहुतांश लोक सार्जंट आणि कॉपल असत.

लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

शशिकांत ओक's picture

14 May 2025 - 2:26 pm | शशिकांत ओक

वाचून आनंद झाला.

सौंदाळा's picture

14 May 2025 - 7:57 pm | सौंदाळा

छानच लिहिले आहे.
कॉपल पांडे सारखे निस्वार्थी लोक विरळाच.
पुभाप्र

शशिकांत ओक's picture

15 May 2025 - 4:34 pm | शशिकांत ओक

धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल. आपण म्हणता ते बरोबर आहे. कॉपल पांडे सारखे लोक विरळा असतात. म्हणून ते लक्षात राहतात.

नमस्कार,
'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा पहिला भाग वाचून खूप आनंद झाला. विंग कमांडर शशिकांत ओक (नि.) यांनी मांडलेली ही प्रस्तावना आणि पहिला भाग वाचकांना खिळवून ठेवतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे:

प्रस्तावना: एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन
प्रस्तावना वाचकाला कॉर्पल पांडे नावाच्या एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. पांडे हे केवळ एक वायुसैनिक नसून, ते एक देशभक्त, कवी मनाचे चित्रकार, माणुसकीची जाण असलेले आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे लेखक सांगतात. 'एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस' ही उपमा त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवते. लेखकाने पांडे यांच्याकडून घेतलेली मदत आणि त्या मदतीचे 'सोने' झाल्याचे नमूद करून, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्ठेवर प्रकाश टाकला आहे. ही लेखमाला केवळ आठवणी नसून, एका सैनिकाच्या आदर्शांचा दस्तऐवज आहे आणि त्यातून वाचकांनी प्रेरणा घ्यावी, अशी लेखकाची सदिच्छा आहे. ही प्रस्तावना वाचकांच्या मनात कॉर्पल पांडे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण करते आणि पुढील भागांची प्रतीक्षा करण्यास प्रवृत्त करते.
पांडे यांनी माणुसकीची खरी व्याख्या समजावून सांगितली. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन, केवळ माणूस म्हणून दुसऱ्या माणसाच्या वेदनेशी एकरूप होण्याची त्यांची ही भावना लेखकाला निशब्द करते. "रस्त्यावर आणि ढिगाऱ्याखाली शेकडो मृत आणि जखमी लोक होते – ती पण माझ्यासारखीच माणसंच होती. ते माझे नातेवाईक नव्हते का?" या विचारामुळे लेखकाच्या डोळ्यांत पाणी येते. पांडे यांचा निर्भीडपणा, सेवाभाव आणि करुणा स्पष्ट दिसते.
शेवटी, पांडे यांनी १५ दिवसांची रजा घेतल्याचे, मित्रांकडून पैसे उधार घेतल्याचे आणि कॅमेरा सोबत घेऊन मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. लेखकाने त्यांना पुढच्या बचाव विमानात पाठवण्यासाठी कॅप्टनशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कथानकात एक अनपेक्षित ट्विस्ट आहे: "पण तसे घडणार नव्हते!" यामुळे पुढील भागाबद्दलची उत्सुकता अधिक वाढते.

एकंदरीत, हा भाग कॉर्पल पांडे यांच्या कलात्मकता, नम्रता, शिस्त, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची अद्वितीय माणुसकी आणि सेवावृत्ती अधोरेखित करतो. विंग कमांडर ओक यांनी अत्यंत प्रभावीपणे कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला पैलू उलगडला आहे.

वरील रसग्रहण जेमिनी विद्याधर यांनी केले आहे.