नोकरी नोकरी नोकरी ...

kvponkshe's picture
kvponkshe in काथ्याकूट
3 May 2025 - 12:32 pm
गाभा: 

नोकरी नोकरी नोकरी ...

कौस्तुभ पोंक्षे
(८००७६०५०८२)

अनेक पोस्ट्स बघत असतो. त्यात मला इतक्या वर्षांचा अमुक नामांकित कंपनीतील अनुभव आहे, इतकं शिक्षण झालंय गेल्या अमुक वर्षांपासून जॉब चेंज साठी प्रयत्न करतोय पण जॉब मिळत नाही असे सर्व साधारण मुद्दे त्यात असतात.

दुसऱ्या प्रकारच्या पोस्ट्स मध्ये कांहींनी या ना त्या कारणाने , जसे पगार कमी, नोकरीतील त्रास, जास्त काम आणि त्यामानाने पगार कमी, आरोग्य विषयक तक्रारी किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे आधीच जॉब सोडला आहे आणि आता नवा मिळत नाहीये अशा केसेस दिसतात.

तिसरा प्रकार, म्हणजे जे नवीनच पदवीधर झालेत आणि पहिलाच जॉब शोधत आहेत आणि त्यांना मनासारखा जॉब मिळत नाहीये अशा प्रकारची तरुण पिढी.

मुळात नोकरी किंवा अधिक सन्मानकारक भाषेत जॉब मिळणे किंवा न मिळणे हे कोणत्याही एकाच घटकावर अवलंबून नसते. एखादा जॉब (यापुढे मी जॉब हाच शब्द वापरणार आहे) मिळण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक असतात.
१. एखाद्या ठिकाणी (मग हे किराणा मालाचे दुकान असो वा एखादी MNC) मुळात काही काम असायला हवे. मग ते काम करण्यासाठी काही मनुष्यबळाची आवश्यकता असायला हवी. कोणत्याही जॉब ओपनिंग ची ही अत्यंत मूलभूत गरज आहे. कोणतीही कंपनी (यात सगळे आले, यापुढे फक्त कंपनी हाच शब्द वापरीन) कोणालाही बिन कामाचा फुकट पगार देणार नाही हे कटू सत्य आहे.
२. मग त्या कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी त्या कंपनी कडे पैसे हवेत. म्हणजे बजेट. कोणतीही कंपनी कोणालाही बिन कामाचा फुकट पगार देणार नाही हे जसे कटू सत्य आहे तितकेच कोणीही कोणत्याही कंपनीसाठी फुकट काम करणार नाही हे ही तितकेच कटू सत्य आहे.
३. एकदा हे विशिष्ट काम, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ निश्चित झाले की मग येते त्या जॉब साठी आवश्यक असलेले स्किलसेट किंवा कौशल्य. आता या स्किल सेट मध्ये अनेक पैलू येतात.

१. किमान आणि कमाल वयाची अट.
२. शारीरिक आणि मानसिक आरोग्य.
३. शिक्षण आणि ते काम करण्याचे कौशल्य
४. जर त्या कामासाठी काही किमान अनुभव आवश्यक असेल तर तो. (हि जर अट असेल तर इथे सगळे फ्रेशर्स अपात्र होतात.) काही वेळा एखादी ओपनिंग फक्त
फ्रेशर्स साठीच असू शकते. याला कारणे अनेक असू शकतात, जसे कमी बजेट, कंपनीला नवीन उत्साही तरुण मनुष्यबळाची आवश्यकता असणे वगैरे.
५. जॉब चे लोकेशन
६. फिरतीची जॉब असेल तर उमेदवार त्यासाठी उपयुक्त आहे का?
७. येणाऱ्या भाषा आणि त्या भाषांवरील उमेदवाराचे प्रभुत्व.
(वरील यादी सर्वसमावेशक आणि कोणत्याही विशिष्ठ क्रमाने नाही)

४. एकदा का वरील तिन्ही बाबी निश्चित झाल्या की या वरील तीन बाबींचा परिणाम म्हणून जॉब ओपनिंग निर्माण होते. ती ओपनिंग पूर्ण करण्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागवले जातात. हे अर्ज मागवण्याचे आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्या पैकी काही खाली देतोय.
१. जॉब्स पोर्टल्स
२. लिंक्डइन किंवा तत्सम सोशल मीडियावर पोस्ट टाकून उमेदवारांचे अर्ज मागवणे.
३. ओळखी-ओळखीतून अर्ज मागवणे
४. पेपर ला जाहिरात देऊन
५. इंटर्नल ट्रान्सफर (वरील यादी सर्वसमावेशक नाही)

५. वरील प्रकारे अर्ज आलॆ की त्यांचातून त्या त्या जॉब्स साठी वर मुद्दा क्रमांक ३ मध्ये दिलेल्या पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची लिस्ट बनवणे. भारतात उपलब्ध ओपनिंग आणि त्यासाठी येणारे अर्ज यांचे गुणोत्तर विषम आहे. म्हणजे एका ओपनिंग साठी हजारो अर्ज येतात. मग कंपनीला वेगवेगळे फिल्टरस लावून त्यातले काही मोजके अर्जच निवडावे लागतात. हे फिल्टर्स अनेक प्रकारचे असतात.
१. ऍप्टीट्यूड टेस्ट
२. शैक्षणिक फिल्टर ( जसे काही कंपन्या डिप्लोमा होल्डर्स,इयर डाऊन आणि ATKT मिळवून पास झालेले उमेदवार, सर्व सत्रात प्रथम श्रेणीत पास न झालेले
उमदेवार यांचे अर्ज विचारातच घेत नाहीत). उलट काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त शिक्षण किंवा अनुभव असेल त्यांचे अर्ज बाद केले जातात.
३. शारीरिक आणि मानसिक तपासण्या
४. मुलाखतींच्या अनेक फेऱ्या. (टेक्निकल आणि व्यवस्थापकीय)
५. संबंधित कामाचे प्रात्यक्षिक परीक्षा(वरील यादी सर्वसमावेशक नाही)

६. वरील फिल्टर्स लावून काही मोजक्या उमेदवारांची यादी बनवली जाते. आणि मग या उमेदवारांचा प्राध्यान्य क्रम ठरवला जातो. यात मुख्यतः खालील बाबी प्रमुख भूमिका बजावतात.
१. वरील प्रक्रियेत सर्वोत्तम कामगिरी केलेला उमेदवार.
२. वशिल्याचा (सभ्य भाषेत रेफेरेंस वाला)उमेदवार
३. कमीत कमी पगार मागणारा उमेदवार
४. लवकरात लवकर जॉईन होऊ शकणारा उमेदवार
५. लोकेशन ची अडचण नसलेला उमेदवार (वरील यादी सर्वसमावेशक आणि कोणत्याही विशिष्ठ क्रमाने नाही)

वरील सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर योग्य उमेदवार (एक किंवा अधिक ओपनिंग नुसार) निवडून त्यांना जॉब ऑफर केली जाते.
हे सगळे सांगायचे कारण म्हणजे एखादी संधी आणि ती एखाद्याला मिळणे किंवा न मिळणे यात किती गुंतागुंत आणि वेगवेगळे घटक आहेत हे सगळ्यांना समजावे.

उमेदवारांच्या अडचणी : (माझा अनुभव कॉर्पोरेट मधील आहे म्हणून त्या संबंधितच अडचणी मी सांगू शकतो)

१. एखाद्या पोसिशन ला अप्लाय केलं तरी कॉल येत नाही.
२. महिनोन महिने ती ओपनिंग दिसत राहाते पण आपल्या अर्जाचे काय झाले हे समजत नाही.
३. दर आठवड्याला तीच ती ओपनिंग वेगवेगळ्या पोर्टल वर नव्याने येते.
४. कधी कधी HR चा कॉल येतो, HR बेसिक डिटेल्स घेतो आणि "विल गेट बॅक टू यु" म्हणून गायब होतो.
५. कधी सगळे राउंड क्लियर होतात आणि HR ऑफर रिलीज करते (करतो) म्हणून सांगतात आणि नंतर काहीच होत नाही.
६. भारतात नोटीस पिरियड ६० ते ९० दिवसांचा असतो. अनेक कंपन्या इतके थांबायला तयार नसतात. अशा कंपन्या आधीच नोटीस पिरियड सुरु असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात. मग दोन कंपन्यांच्या HR मध्ये शर्यत सुरु होते. हा काळ मात्र उमेदवारासाठी सुगीचा काळ असतो. मग उमेदवार "जिकडे भेळ तिकडे खेळ" या तत्वाला जागून फायदेशीर ऑफर स्वीकारतो. याला ऑफर शॉपिंग असं संबोधले जाते.
७. HR उमेदवाराचे अप्लिकेशन रिजेक्ट झालय असेही स्पष्ट सांगत नाहीत. HR उत्तर देत नाही, कॉल ब्लॉक करतो तेव्हाच उमेदवाराने समजून घ्यायचे असते की आपली उमेदवारी अपात्र ठरली आहे.

HR लोकांच्या अडचणी:
१. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे एका पोसिशन साठी हजारो अर्ज येतात आणि त्यातून छाननी करून पात्र उमेदवारांना शॉर्ट लिस्ट करणे. या छाननीत चुकून एखादा पात्र उमेदवार रिजेक्ट होणार नाही याची ही काळजी HR ला घ्यायला लागते.
२. असे शॉर्ट लिस्टेड अर्ज संबंधित पॅनल कडे पाठवून त्यातून अजून शॉर्ट लिस्टेड अर्ज कोणते याची वाट पाहत HR ला बसावे लागते. इकडे कॅन्डीडेट फोन वर फ़ोन करून, ई-मेल वर HR ला पिडत असतो. पण पॅनल कडून जोवर काही येत नाही तोवर HR उमेदवाराला काहीच सांगू शकत नाही.
३. पॅनल कडून शॉर्ट लिस्ट आली की मग interview अरेंज करणे, उमेदवार interview ला येईल हे पाहणे, ही कामे करावी लागतात. interview अरेंज करताना पॅनल ची आणि उमेदवाराची उपलब्धता पाहून interview वेळ ठरवणे ही एक डोकेदुखी असते.
४. एखादा उमेदवार पूर्ण शॉर्टलिस्ट झाला की मग व्यवस्थापनाचे अप्रूव्हल , ऑफर रिलीज करून घेणे या गोष्टी असतात. ह्यात व्यवस्थापन स्वतःचा वेळ घेते. आणि कँडिडेट HR ला दोष देतो.
५. ऑफर रिलीज केल्यावर सुद्धा तो उमेदवार जॉईन करेलच अशी खात्री नसते. ऑफर शॉपिंग करून अगदी जॉइनिंगच्या दिवशी कल्टी मारणारे उमेदवार HR साठी मोठा ताप असतात. अशा ऐनवेळी झालेल्या नो शो कॅन्डीडेट मुळे HR ला अनेकदा बोल ऐकावे लागतात. अशा ऐन वेळी कल्टी मारणाऱ्या उमेद्वारांमुळे प्रोजेक्ट पण प्रभावित होतो. परिणामी HR , प्रोजेक्ट मॅनेजर यांचा KPI नकारात्मक रित्या प्रभावित होतो.
६. असे नो शो झाले तर HR ना प्लॅन B तयार ठेवावा लागतो. अशा प्लॅन बी तील उमेदवारांना धड तुम्ही रिजेक्ट झालाय असं सांगता येत नाही आणि धड ऑफर पण रिलीज करता येत नाही.
७. अनेकदा उमेदवार जॉईन करतो आणि आणि जॉब, किंवा कंपनी किंवा वातावरण पटले नाही म्हणून किंवा अधिक पगाराची ऑफर आली म्हणून महिन्यात राजीनामा देतो. मग परत सगळी प्रोसेस सुरु करावी लागते.
८. कधी कधी उमेदवार जॉईन करतो पण त्याच्या BGV त अडचण येते आणि त्याला टर्मिनेट करावं लागत.

काही उपाय :
१. ऑफर शॉपिंग कायद्याने बंद करावे. हे जर व्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लन्घन वाटत असेल तर असं ऑफर शॉपिंग करणाऱ्या उमेदवाराला कायमचे ब्लॅक लिस्ट करावे.
२. भारतातील सगळ्या कंपन्यांचा नोटीस टाइम ३० दिवस (दोन्ही कडून) करावा. (याने काही प्रमाणात ऑफर शिपिंग कमी होईल असे मला वाटते)
३. कंपनीने त्यांच्या जॉब पोर्टल वर कॅन्डिडेचर स्टेटस जे काही असेल ते उपडेट करावे. (जसे अंडर कॉन्सिडरेशन, अंडर कॉन्सिडरेशन बट इन प्लॅन बी , रिजेक्टड विथ रिजन वगैरे).
४. रेंजेक्टड उमेदवारांना HR ने स्पष्ट सांगून टाकावं की तुम्ही रिजेक्ट झालात म्हणून. एकदाच विषय संपतो.
५. आधीच नोटीस सर्व्ह करणार्यांना ऑफर करायची नाही हे कंपन्यांनी ठरवावे.
६. जॉब प्रोफाइल नीट अगदी काळजी पूर्वक बनवून घ्यावे. अनेकदा JD मध्ये एक लिहिलेलं असतं आणि जॉईन झाल्यावर भलतेच काम असते. मग तो उमेदवार टिकत नाही आणि मग बॅक टू स्केयर झिरो पासून सुरुवात करावी लागते. (मी गेल्या २ वर्षात या अनुभवातून गेलोय).

सध्याची नोकरी सोडताय ?

भारतात जॉब पोसिशन आणि उमेदवार यांचे गुणोत्तर विषम आहे हे मी नव्याने सांगायला नको. आहे तो जॉब सोडताना शंभर वेळा विचार करावा हाच सल्ला मी सगळ्यांना देऊ इच्छितो. मी स्वतः जॉब लेस असण्याचा अनुभव घेतलाय.
आहे तो जॉब सोडण्याची अनेक कारणे असतात:
१. पगार कमी आणि जास्त काम:
समीक्षा: आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कंपनी ही नफा कमवायला बसली आहे. आपल्याला जसं कमी कामात अधिक पगार हवा असतो तसच कंपनीला कमी पगारात अधिक काम देणारा नोकर हवा असतो. आपला नोकर जर १०० रु पगार घेत असेल तर त्याने त्याच्या कंपनीला २०० रु चे आउटपुट दिले तरच तो नोकर कंपनीला फायदेशीर ठरतो. त्यामुळे आपण आपल्या कंपनीसाठी एक मौल्यवान असेट कसे बनू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या नेहमीच्या कामाव्यतिरिक आपण कंपनीला काय value ऍड देऊ शकतो यासाठी कायम प्रयत्न करत राहावे.
या उलट आपल्या कडे काम करत असलेल्या नोकराला जर त्याच्या त्याच कामाचे अधिक पैसे दुसरे कोणी देत असेल तर तो नोकर तिकडे जाणार हे कटू सत्य आहे. त्यामुळे आपल्या नोकराचे पगाराव्यतिरिक्त वर्क लाईफ बॅलन्स कसे उत्तम राहील, त्याला मेडिकल किंवा अशा काही सुविधा देऊन खुश ठेवता येईल हे कंपन्यांनी पहिले तर बरे होईल.
२.नोकरीतील / मॅनेजरचा त्रास:
समीक्षा: याकारणामुळे नोकरी सोडत असाल तर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मॅनेजर शी एकदा बोलून त्याच्या अपेक्षा काय आहेत आणि तुम्ही कुठे कमी पडत आहात यावर काम करावे असे मला वाटते. यात काही सकारात्मक निघाले तर कदाचित दोन एक महिन्यात तुम्हाला तुम्ही नोकरी आवडू लागेल. मॅनेजर हा सुद्धा कंपनीचा नोकर आहे हे लक्षात घेतले तर त्याच्या जबाबदाऱ्या पण कळतील आणि वाद सुसंवादात बदलू शकेल. आणि समजा संवादातूनही काही निघाले नाही तर दुसरीकडे जॉब शोधूनच मग पहिला सोडावा.
माझा अनुभव: मी माझ्या सुरुवातीच्या काळात असाच तिरीमिरीत जॉब सोडला आणि ८ महिने बेकार होतो. तेव्हा मित्र, नातेवाईक समाज यांच्यात बेकाराची किंमत शून्य असते हे मला कळले. या बेकारीच्या काळातील टोमणे, त्या कुत्सित नजरा यापेक्षा तो पगार घेऊन नोकरीतील त्रास परवडला या मताला मी आलो.

लक्षात ठेवा: जो कमावतो त्यालाच समाज किंमत देतो. बेकाराच्या पदरी पडते ती केवळ अवहेलनाच .... अगदी आपल्या जवळच्या माणसाकडून सुद्धा !
४. आरोग्य विषयक तक्रारी (जसे न झेपणारी नाईट शिफ्ट किंवा बदलती शिफ्ट, बाळंतपण):
समीक्षा: आपल्याला आहे ती नोकरी जर आरोग्यविषयक तक्रारींमुळे जमत नसेल तर थेट नोकरी सोडण्याआधी तुमच्या मॅनेजरला विश्वासात घेऊन त्याच्याशी बोला. कदाचित काही उपाय निघेल. अगदीच काही नाही उपाय निघाला तर तुमच्या तब्येतीस मानवेल असे कोणते जॉब्स आहेत आणि ते मिळवायला काय कौशल्ये तुम्हास मिळवावी लागतील याचा अभ्यास करा. त्यावर काम करा. कदाचित तुम्हास पगारात तडजोड करावी लागेल, पण सर सलामत तो नोकरी पचास हे सत्य स्वीकारा. आपले आरोग्य विकून पगार खरेदी करण्यात काही अर्थ नाही.
५. कौटुंबिक जबाबदाऱ्या ( घरातील आजारी व्यक्ती, मुलाची मुलीची दहावी):
समीक्षा: तुमच्या मॅनेजरला विश्वासात घेऊन त्याच्याशी बोला. कदाचित काही उपाय निघेल. जसे काही महिने घरुन काम, अर्धवेळ ऑफिस आणि अर्धवेळ घरून काम असं काही. अंतिम उपाय नोकरी सोडणे हा आहेच. पण मग त्याबरोबर येणाऱ्या रिस्कस पण स्वीकाराव्या लागतील.
६. बिसनेस सुरू करायचंय म्हणून नोकरी सोडणे:
समीक्षा: मी स्वतः बिजनेस कधीही केलेला नाही त्यामुळे यावर मी काही जास्त लिहीत नाही. पण यासाठी नोकरी सोडताना आपण सुरु करणार असलेल्या व्यवसायाचा नीट अभ्यास करून, कॉन्टेंगेंसी बनवून मग नोकरी सोडून व्यवसायात पडावे.
७. फ्रेशर्स साठी: प्रत्येकाला कॅम्पस मध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार नाही ही वस्तुस्तिथी आहे. प्रत्येकाला सगळं उत्तम, कमी कष्टात आणि लगेच हवंय सध्या. आपण कुठे आहोत हे जेवढ्या लवकर आपण ओळखू तितके लवकर प्रगतीच्या मार्गाला लागू. कॅम्पस मध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली नाही तर आयुष्य व्यर्थ वगैरे समजातून बाहेर पडून उमेदवारी करून अनुभव घ्यावा. कौशल्ये वाढवून वेळोवेळी आपल्या कामगिरीचा आढावा घ्यावा. एकदा जॉब लागला की त्यातून पुढे पुढे मार्ग मिळत जातो.
लक्षात ठेवा: कॅम्पस मध्ये जॉब न मिळालेले पण पुढे आपापली कौशल्ये वाढवून आपापल्या क्ष्रेत्रात यश मिळवलेले लोक जास्त आहेत.

नोकरी असताना :
१. सगळ्यांनी किमान तीन महिन्यांचा कॉन्टेगेंसी फंड बनवून ठेवावा. त्यासाठी लाइफस्टाइल मध्ये तडजोड स्वीकारावी.
२. आपापले स्किलसेट वाढवत राहावे.
३. जोवर आपले काम आणि आपला पगार आपल्याला आवडतोय, आणि जोवर आपले काम कंपनीला आवडतंय आणि आपल्याला असणारा पगार कंपनीला परवडतोय तोवर विनाकारण जॉब बदलायची काही गरज नसते या मताला मी आलोय.
४. नवीन जॉब शोधायच्या प्रक्रियेत तुमचा सध्याचा नोटीस पेरिएड किती आहे आणि तुम्ही त्या नवीन कंपनीत जॉईन व्हायला किमान किती दिवस नोटीस तुम्हाला सर्व्ह करावी लागणार आहे हे नवीन कंपनीला इंटरव्यू मध्येच स्पष्ट सांगा. नंतर फार मनस्ताप होतो. माझा अनुभव बघता कोणतीही कंपनी त्यांच्या कामगाराला नोटीस पूर्ण केल्या शिवाय सोडत नाही. अपवाद जर तुम्ही बेंच वर असाल आणि कंपनीला आधीच जड झालेले असाल तर मग तुम्हास लवकर रिलीझ केले जाते.
कंपनीच्या ऑफर लेटर मध्ये नोटीस किती दिवसाचा आहे ते स्पष्ट लिहिलेले असते. तो बाय बॅक करण्याचा किंवा न करण्याचा संपूर्ण अधिकार कंपनीचा असतो हे विसरू नये.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

4 May 2025 - 6:54 pm | अमरेंद्र बाहुबली

नेहमीप्रमाणे पोंक्षे साहेबांचा जबरजस्त माहितीपूर्ण लेख! खासगी नोकरी म्हणजे टांगती तलवार असते, एकदा माझ्याकडून एक “costly” चूक झाली आय डोळ्यापुढे तारे चमकू लागले, ज्यांनी शिव्या घालायला हव्यात असे लोक सहानुभूती दाखवायला
लागल्यावर आणखीच तंतरली, पण मॅनेजरने पहिली चूक आहे म्हणून सोडतोय सांगितले नी जीवात जीव आला, नुकसान तसेही झाले नव्हते कारण पार्ट्स खराब झाले नव्हते पण धडा घेतला.
लेखात नोकरी लागण्यासंदर्भात

१. जॉब्स पोर्टल्स
२. लिंक्डइन किंवा तत्सम सोशल मीडियावर पोस्ट टाकून उमेदवारांचे अर्ज मागवणे.
३. ओळखी-ओळखीतून अर्ज मागवणे
४. पेपर ला जाहिरात देऊन
५. इंटर्नल ट्रान्सफर (वरील यादी सर्वसमावेशक नाही)

ही माहिती दिली आहे, पण रिक्रूटमेंट एजन्सीमधूनही मोठी भरती होत असते, माझ्या डीके मित्राने धुळ्यात रिक्रूटमेंट एजन्सी उघडली आहे, आता पुण्यातही शाखा उघडलीय नी मुंबईतही ऑफिस शोधतोय, आता पर्यंत ८ हजार कँडिडेट प्ली केलेत, त्याला ५० हजार फॉलोवर्स झालेत linkedin वर, व त्याच्या एजन्सीची वार्षिक उलाढाल आता ३ कोटींवर गेलीय!
तर रिक्रूटमेंट एजन्सी थ्रू त्यांची फी (एक पगार किंवा वरून काही) जॉब लागू शकतो ना? (मला अनुभव नाही)

माहितगार's picture

4 May 2025 - 9:32 pm | माहितगार

रिक्रुटमेंट एजन्सी मधले पहिले तीन मुख्य फरक लक्षात घेतले पाहीजेत १) कँडीडेटला चार्ज न करता (किंवा कँडीडेटच्या पगारातून कपात न करणार्‍या आणि केवळ कंपनीला चार्ज करणार्‍या रिक्रुटमेंट एजन्सी २) प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कँडीडेटला चार्ज करणार्‍या रिक्रुटमेंट एजन्सी ३) कँडीडेटला जॉबरोलवर ठेवणार्‍या रिक्रुटमेंट एजन्सी तिसर्‍या प्रकारचे काम पहिल्या दोन प्रकारातील काही रिक्रुटमें एजन्सी करतात काही करत नाहीत.

पहिल्या प्रकारातील म्हणजे कँडीडेटला चार्ज न करणार्‍या रिक्रुट्मेंट एजन्सी कडून मिळणार्‍या कामांचा आणि कंपन्यांचा दर्जा चांगला असतो पण सर्वसाधारणपणे किमान १ ते ३ वर्षाचा अनुभव व अगदी चांगली स्किल सेट्स असलेल्या उमेदवारांनाच अशा रिक्रुटमेंट एजन्सीकडून संधी उपलब्ध होतात. ज्या कँडीडेटकडे चांगला अनुभव आहे आणि चांगली स्किल्सेट्स आहेत तेही रिक्रुटमेंट एजन्सीना पैसे देण्यास सहाजिक तयार होत नाहीत.

दुसर्‍या प्रकारच्या कँडीडेटला चार्च करणार्‍या रिक्रुटमेंट एजन्सीजचा असरा सहसा मॅनेजमेंट स्तरावर आत्मविश्वास नसलेल्या छोट्या कंपन्या तसेच सहसा मनुष्यबळाला सांभाळून घेण्याच्या कौशल्यात कमी पडणार्‍या कंपन्या आसरा घेतात आणि अशा रिक्रुटमेंट एजन्सी कडे जाणार्‍या कँडीडेटचे स्किलसेट्स कमी पडत असणे किंवा फ्रेशर असणे अशा शक्यताही असतात. यातीलच क्वचीत काही रिक्रुटमेंट एजन्सीज नावाने बोर्ड लावणारे कॅण्डीडेटच्या फसवणूकीचे किंवा कँडीडेटचे सर्टीफिकेट्स ठेऊन घेऊन वेठबिगारासारखे वागवणे असेही अनुचित प्रकार करतानाही आढळून येतात नाही. असे नाही.

आता पर्यंत ८ हजार कँडिडेट प्ली केलेत, त्याला ५० हजार फॉलोवर्स झालेत linkedin वर, व त्याच्या एजन्सीची वार्षिक उलाढाल आता ३ कोटींवर गेलीय!
अशा एजन्सीत कॅंडीडेट्सची आणि कंपन्यांची सॅटीस्फॅक्शन लेव्हल काय असेल हा अधिक अभ्यासाचा विषय असावा.

लेख एका चांगल्या विषयावर आहे. कँडीडेट सर्चींग मधला एक महत्वाचा भाग इथे राहीलाय तो म्हणजे बॉस त्याच्याच आधीच्या कंपनीतील कलीग्स आणि ज्युनियर्स ना हायर करतो. एका चांगल्या बॉसचे लक्षणच हे कि एखादा कर्मचारी अचानक सोडून गेला तर त्याच्या एका फोनवर त्याच्या सोबत काम केलेली दुसरी व्यक्ती आनंदाने काम करण्यास तयार होणे. या बाबत कँडीडेट्सनी काय करायला हवे. तुमच्या जुन्या बॉसेसच्या संपर्कात रहाणे. (इव्ह्नन जॉब मध्ये काही वेळा तात्कालिक मतभेद झाले असले तरीही, काही वेळा व्यक्तीगत वेव्हलेन्थ मॅच करत नसेल पण स्कील सेट असतील तर माहित नसलेल्या माणसापेक्षा माहित असलेला माणूस प्रिफर केला जातो. तसेच जॉब बदलणे निकडीचे झाले त्या प्रसंगीही याच रिलेशनशीप कामाला येतात. जेव्हा अनुभव १५ वर्षेपेक्षा अधिक होतो तेव्हाही जॉब मिळवण्याचे इतर मार्ग कमी होऊन व्यक्तिगत प्रोफेशनल रिलेशनशीपवरचे अवलंबीत्व वाढत असते.

माहितगार's picture

4 May 2025 - 9:49 pm | माहितगार

तीन महिन्यांचा नियम. हातात जॉब नसताना तीन महिन्याच्या आत त्यातल्या त्यात बेस्ट मिळेल तो जॉब घेतला पाहीजे. सहसा तीन महिन्यापेक्षा अधिक काळ जॉबलेस असणे ठिक नव्हे. तीन महिन्यापेक्षा अधिक वेळ गेला तर स्वतःच्या स्वयंरोजगाराचा विचार करणे अधिक उचित असावे.

बर्‍याच कंपन्यांमधील बर्‍याच व्यक्तींना स्वतःची स्किलसेट्स अपडेट करण्यासाठीही वेळ न मिळण्या एवढे २४ तास बिझी केले जाते किंवा टुरीगचे जॉब असतील त्याना स्कील सेट अपडेट करणे कठीण जाते पण ज्यांच्या कडे वेळ आणि स्कीलसेट अपडेट कडे दुर्लक्ष करतात ते इतरांशी नव्हे स्वतःच्या भविष्याशी अक्षम्य गुन्हा करत असतात.