केंजळगड.....पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला एक डोंगरी किल्ला. केळंजा या नावानेही ओळखला जाणारा हा किल्ला, वाई तालुक्यात, वाई शहरापासून वायव्येस साधारणपणे ३० किलोमीटर अंतरावर, तर पुण्याहून भोरमार्गे अंदाजे ९० किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. यादवकाळात वाईभोवती बांधण्यात आलेल्या, पांडवगड, वैराटगड, कमळगड यांच्याच मांदियाळीतील एक गड अशी याची ओळख. समुद्रसपाटीपासूनची उंची अदमासे ४२७५ फुट भरावी. गडाच्या पश्चिम बाजूला रायरेश्वराचे प्रचंड पठार गडापेक्षाही जास्त उंचीवर म्हणजे साधारणपणे ४५०० फुट उंचीवर पसरलेलं आहे. स्वराज्याची जन्मभुमी अशी ओळख सांगणारे रायरेश्वर पठार तर वाईचा पाठीराखा म्हणुन उभा असा केंजळगड हे एका खिंडीने विलग झालेले इतिहासपुरुष.
यंदाच्या शिवजयंतीचा सुर्य, देव श्री. रायरेश्वराच्या साक्षीने उगवताना पाहायचा संकल्प तसेंच बरोबरीने केंजळगडाचीही भटकंती करण्याचा मनसुबा आखला गेला.
आदल्या दिवशी सकाळी लवकर सुरवात करून, केंजळगड मोहीम पार पाडून, शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला रायरेश्वर गाठायचं, रायरेश्वरावर मुक्कामी राहून, शिवजयंतीदिनी, भल्या सकाळी स्वराज्याच्या जन्मभुमीला वंदन करीत छत्रपतींना मुजरा घालून परतीच्या प्रवासात आंबवड्यात देव श्री. नागेश्वर दर्शन, सरदार कान्होजी नाईक जेधे व जिवाजी महाले तथा शंकराजी नारायण समाधी दर्शन व कारी येथील नाईकांच्या वाड्याला भेट असा बेत निश्चित केला.
पहाटेस सुरुवात करून, पुण्याहून सासवड मार्गे भोर गाठले, भोरमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याला वंदन करीत आंबवडेमार्गे वडतुंबी-कोर्लेला पोहोचलो. आंबवड्याच्या पुढे, म्हाकोशीपासूनच केंजळगडाचा कातळ खुणावू लागला होता तर त्याच्या उजव्या बाजूला रायरेश्वराची प्रचंड भिंत लक्ष वेधून घेत होती. पुर्वी कोर्ले (ता. भोर, जि. पुणे) हेचं गडाच्या पायथ्याचे गाव होतं व कोर्ले मधुन रायरेश्वरच्या पुर्व बाजुच्या डोंगर उताराने चढत केंजळगड गाठावा लागे. आता काही वर्षांमागे कोर्लेच्या पुढे डोंगरातून काढलेला, पुर्वीचा कच्चा पण आता पक्का डांबरी झालेला वळणा-वळणांचा घाटरस्ता हा वाई तालुक्याच्या हद्दीत मोडणाऱ्या छोट्याशा 'ओहोळी' नामक खेड्यातून पुढे जात केंजळगड आणि रायरेश्वर डोंगराच्या मुख्य डोंगररांगेला एका छोट्या खिंडीने जोडत पलीकडे धोम धरणाच्या जलाशयाच्या काठाने धोम-मेणवलीमार्गे वाई शहराकडे गेला आहे. कोर्ले गावातून पाहिल्यास, केंजळगड हा डावीकडे, तर रायरेश्वर उजवीकडे दिसून येते. या रस्त्यामुळे केंजळगड आता सोपा झाला आहे. पुर्वी कोर्लेतून लागणारी तीनएक तासाची चढाई आता फक्त अर्ध्या- पाऊण तासावर आलीय.
कोर्ले-ओहोळी- रायरेश्वर रस्त्यावर एका वळणावर पाखिरे वस्ती असा फलक दिसतो. त्या फलकाच्या मागील बाजूस चढाचा डांबरी रस्ता आपल्याला या पाखिरे वस्ती वा केंजळ माची म्हणुनही ओळखल्या जाणाऱ्या दहा-बारा घरांच्या छोट्याशा वस्तीवजा गावात घेऊन जातो. घरांच्या विरुद्ध बाजुला काही अंतरावर प्रशस्त असे आधुनिक बांधकामाचे केळंजाई माता मंदिर आहे, आजूबाजूला प्रशस्त आवार आहे. याठिकाणी गाडी लावून, केंजळमाची गावातील घरांसमोरून जाणारी पाऊलवाट, त्यातील शेवटून दुसऱ्या घराच्या मागुन आपल्याला गर्दझाडीत घेऊन जाते. सुरवातीची ही चढण बऱ्यापैकी खडी असून हे अंतर पार करण्यास सामान्य वकुबाच्या व्यक्तींना अंदाजे अर्धा तास पुरेसा आहे. झाडी व चढण संपताच आपण एका मोकळ्या जागेत येतो, ही जागा म्हणजे केंजळगडचा कातळकडा व त्याच्या पुर्वेकडे असणाऱ्या डोंगराला जोडणारी धार आहे. या धारेवर समोर धोम धरणाचा विस्तृत जलाशय दिसतो.धरणाच्या भिंतीपलीकडील धोम गावही स्पष्ट दिसतं. धरणाकडेच्या शेतांनी हिरव्या रंगांच्या अनेकानेक छटांचे जणु प्रदर्शनचं भरवलेलं भासतं. इथुन पश्चिमेकडे तोंड करून हलक्याशा चढाने चालत आपण केंजळगडाच्या कातळभिंतींना भिडतो. उजव्या हाताने चालत गडाच्या पहिल्या उद्धवस्त दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाची एकचं बाजू थोडीबहुत उभी असून बाकी अवशेष आजूबाजूला पडलेले आहेत. दरवाजाला लागून असलेली छोटीशी देवडी मात्र शाबूत आहे. दोन व्यक्ती आरामात बसु शकतील इतपतचं तिचा विस्तार आहे. या दरवाजाच्या पुढे गेल्यावर, केंजळगड ज्या एका अखंड कातळावर उभा आहे त्याच्या बुंध्यात खोदलेली एक गुहा समोर येते, तिथेचं एक पाण्याचे टाके ही दिसते. टाक्याच्या बाजूस काही दगडी बांधकामाचे अवशेष दिसतात. गुहा ही बहुदा आरपार खोदलेली आहे, ऊंची विशेष नाही पहिल्या पंधरा-वीस फुटानंतर आत वळलेली, अंधारी आणि त्यापुढे जायचंच असेल तर जवळपास रांगतचं जावे लागेल अशी आहे. गुहेपासुन पुढे गेल्यावर गडावरील प्रमुख आकर्षण असणाऱ्या कातळ खोदीव पायऱ्या आहेत. अखंड कातळात खोदून काढलेल्या या पन्नासेक पायऱ्या अतिशय रुंद आणि प्रशस्त आहेत. दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही पायऱ्यांचा खडक थंडगार होता.
या पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा सध्या फक्त अवशेष रूपात शिल्लक असलेला अजून एक दरवाजा दिसतो. सदर दरवाज्याचा पायाचा दगड फक्त लक्षात येतो व यावरून तिथे कधीकाळी दरवाजा होता असा अंदाज लावता येतो. याचं उद्धवस्त दरवाजातून आपला गडाच्या मुख्य भागात प्रवेश होतो.
केंजळगड हा पूर्व-पश्चिम पसरलेला असून याचा विस्तार छोटासाच आहे. मुख्य दरवाजाच्या उजव्या हाताला जुन्या केळंजाईमाता मंदिराचे अवशेष दिसतात, तिथे आणखी ही अनेक देवतांच्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. सद्यस्थितीत सर्वच उघड्यावर आहेत पण मंदिराचा नुकताच खोदलेला पाया आणि खालुन वाहून आणलेले चिरे, खडीची कच या वस्तु जिर्णोद्धार काम सुरू असल्याचे दर्शवतात, अर्थात हे काम सरकारी नसुन दुर्गप्रेमी गटांमार्फत श्रमदानातून करण्यात येत असावे हे स्पष्टपणे समजुन येते. गडावर आमच्याखेरीज कुणी नसल्याने याबाबतीत जास्तीची व खात्रीची माहिती मिळू शकली नाही.
मंदीर अवशेषांच्याजवळून पश्चिमेकडे चालत जात, मागील बाजुस काही अंतरावर एक चुन्याचा घाणा आहे. घाण्याचा दगड सुस्थितीत आहे. पुढे काही अंतरावर गडावरील एकमेव उभी अशी इमारत दिसते. ही वास्तू दगड आणि विटा मिळून बांधलेली एक छोटीशी खोली आहे. दारुखाना म्हणुन ओळखली जाते असली तरी विस्तार त्यामानाने छोटा आहे व खाली दगड आणि वरती विटा असं बांधकाम दिसते. उत्तर पेशवाईत बहुदा दुरुस्ती झाली असेल. गडावर पाण्याचे दोन तलाव असून खोदीव टाकी देखील आहेत. गडावरील तलाव जवळपास बुजलेले असून आत पावसाळ्याखेरीज पाणी साठत नसावे. गडावर थोडेफार तटबंदीचे अवशेष आढळून येतात. संपुर्ण गड साधारणपणे साठ ते ऐंशी फूट उंचीच्या एकाचं अखंड कातळावर उभा असल्याने तटबंदीची फारशी गरज भासली नसावी. रायरेश्वर बाजुचे गडाचे टोक वैशिष्ट्यपुर्ण आकाराचे आहे, हे टोक आणि इतर किल्ल्याचा भाग याला एका खड्डयासारख्या खोलगट भागाने वेगळे केले आहे. दुरून पाहता गडाचा आकार होडीसारखा वा गांधी टोपीच्या आकाराचा दिसून येतो.
गडावरून विस्तृत परिसर नजरेस पडतो, खाली धोम धरणाचा फुगवटा, जांभळी बंधारा तसेच जांभळी, खवली, आसरे, रेनावळे ही गावे, समोर कोल्हेश्वराचे पठार, कमळगड व त्याखालील वासोळे, तुपेवाडी, कोंढवळे ही गावे, त्यापलीकडे महाबळेश्वर डोंगररांग, अलीकडे पाचगणी व पाचगणीचे पठार, त्यापलीकडे वैराटगड, पुर्वेला पांडवगड, खाली धोम, मेणवली व वाई शहर, विरुद्ध दिशेला कोर्ले, वडतुंबी, म्हाकोशी गाव व बंधारा, मांढरदेव डोंगर एवढा परिसर दृष्टिक्षेपात येतो. कोर्ले गावात सुरू असलेले बंधाऱ्याचे काम ही वरून दिसते. तिथे वापरात असणाऱ्या यंत्रसामुग्रीचा आवाज गडावर अगदी सहज ऐकू येतो.
किल्ला यादवकालीन असला तरी बरेच दिवस ओस असावा, ज्ञात इतिहास हा साधारण सोळाव्या शतकापासुनचा आहे. आधी निझामशाही आणि नंतर आदिलशाही यांची सत्ता होती. मराठ्यांनी १६७४ साली हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला व त्यानंतर तो १८१८ पर्यंत मराठ्यांच्याच अमलाखाली राहिला. औरंगजेबाच्या स्वारीवेळी किल्ल्याच्या ताब्याविषयी स्पष्टता नाही शिवाय १६७४ चा अपवाद वगळता आधी आणि नंतर ही विशेष असा संघर्ष किल्ल्यावर झाल्याची नोंद अजूनपर्यंत मिळालेली नाही.
गडफेरी आटोपुन पायऱ्यांवर आलो, पायऱ्यांकडेने काही माकडे बसलेली होती. तेथील आल्हाददायक थंडपणाने थोडा वेळ मोहात पडून तिथेच बसून जेवण करावे असे वाटले पण राजगडावरील माकडांनी पाडलेला दगड डोक्यात पडून झालेली दुर्घटना आठवली आणि तो मोह आवरून गुहा ओलांडून खाली असणाऱ्या देवडीपाशी आलो. लहानशा देवडीत बसून जेवण उरकले व काही वेळ आराम करून उतरणीची वाट धरली.
पुन्हा धारेवर आल्यावर किल्ल्याच्या धोम धरणाच्या बाजूने दिसणारे टाक्याचे अवशेष व गुहेचा या बाजूचा भाग पाहण्यासाठी म्हणुन तिकडे चालू लागलो, मार्ग कड्याच्या उताराच्या टोकावरून व म्हणुनच थोडा धोकादायक होता पण तसेंच पुढे गेलो आणि जागीचं थबकलो. कड्याला तीन प्रचंड मोठी अशी मधमाशांची पोळी लटकत होती. दोन आठवड्यापुर्वी इथुन जवळच्याच पांडवगडावर मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आठ ट्रेकर्स आठवले आणि लगेचचं मागे फिरलो. भर दुपारच्या वेळी, कुठलाही आडोसा आसपास नसताना, डोंगरधारेच्या टोकावर असा धोका पत्करण्यात काहीचं हशील नव्हता.
तिथुन गड उतार व्हायला पंधरा मिनिटे पुरली. केंजळमाची वस्तीवरील केळंजाई माता मंदिरापाशी पोहोचून पंधरा मिनिटे आरामात बसलो व मग गाडी काढून रायरेश्वराच्या दिशेने मार्गस्थ झालो.
रायरेश्वर
केंजळमाची मधून निघुन पुढच्या पंधरा मिनिटांत, तिथुन पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रायरेश्वराच्या शिडीच्या वाटेपाशी पोहोचलो. शिडीच्या वाटेने पंधरा वीस मिनिटांची चढण आपल्याला रायरेश्वराच्या भव्य पठारावर घेऊन जाते. खाली गाडी लावून 'रायरेश्वर फोर्ट कॅपिंगचा' संचालक असणारा आमचा तरुण मित्र संदीप जंगमला फोन केला. आजच्या मुक्काम आणि जेवणाच्या व्यवस्थेची जबाबदारी संदीपवर होती. त्याला आमच्या पोहोचण्याची वर्दी दिली आणि भर दुपारच्या कडक ऊन्हात चढणीचा रस्ता जवळ केला.
रायरेश्वराच्या दक्षिणेला सातारा जिल्ह्याची हद्द लागते. रायरेश्वर आणि महाबळेश्वर यांच्या दरम्यान कृष्णा नदीचे उगमाजवळचे खोरे आहे. पुण्याहून भोर मार्गे रायरेश्वरला जाता येते. पुणे ते भोर ६५ किलोमीटर तर भोरहून रायरेश्वर ३० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच वाईहून रायरेश्वर २५ किलोमीटर अंतरावर आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेले रायरेश्वर हे गिरिस्थान शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या साथीदारांसह येथे येऊन सोडलेल्या स्वराज्य निर्मितीच्या संकल्पासाठी विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळं वळणं देण्याची सुरवात असणारा दिवस म्हणजे २७ एप्रिल १६४५ होय. याच दिवशी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती. बारा मावळ खोऱ्यातुन वेचून आणलेल्या निवडक सवंगड्यांसह शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात दर्शनाला आले. यावेळी त्यांच्यासोबत कान्होजी नाईक जेधे, बाजी नाईक पासलकर ,जिवाजी महाले, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, हिरडस मावळचे देशपांडे नरसप्रभू गुप्ते, बाजी मुद्गल इत्यादी शिवरायांच्या स्वराज्य संकल्पाला बळ देण्यासाठी साक्षीदार म्हणून रायरेश्वराच्या मंदिरात उपस्थित होते असे सांगितले जाते.
पुढच्या पंधरा मिनिटात पठारावर पोहोचलो व थोडा वेळ बसुन पुढे मार्गस्थ झालो. पठारावरील माळरानातून जाणारी पायवाट आपल्याला मंदीर परिसराकडे घेऊन जाते. याचं वाटेवर, मंदीरापासून थोडं अलीकडे संदीपचे हॉटेल शिवशंभू तथा रायरेश्वर फोर्ट कॅपिंगचे मैदान आहे. चहा-नाश्ता, जेवण तसेच स्वच्छ व प्रशस्त टेंट्समधून निवासाची उत्तम व्यवस्था आहे. जवळपास स्वच्छतागृहांचीही सोय केलेली आहे.
कडक ऊन्हातून हॉटेल शिवशंभूला पोहोचताच संदीपने थंडगार लिंबू-सरबत देऊन आमचे स्वागत केले. नंतर चटईवर जाड स्लीपिंग मॅट्स टाकून देऊन आमच्या आरामासाठी उत्तम व्यवस्था करून दिली. यावेळी त्याचा मोठा भाऊ सुनीलही तिथे उपस्थित होता. दक्षिणेकडून येणारे गार वारे अनुभवत आम्ही तिथे तासभर निवांत पडून राहीलो. साडेचारच्या सुमारास उठून मंदीर परिसराकडे निघालो. मंदीर परिसरातून संदीपबरोबर रायरेश्वर परिसराची छोटीशी सहल, गोमुख कुंड, परिसरातील विशिष्ट वनस्पतींची माहीती, सात रंगांची माती, रायरेश्वरावरून दिसणारे विविध किल्ले, डोंगर, जलाशय यांचे अवलोकन आणि नंतर रायरेश्वरावरील नितांतसुंदर सुर्यास्त अनुभवणे असा भरगच्च कार्यक्रम पुढे होता.
सर्वप्रथम लागते ते गोमुख कुंड, रायरेश्वरावरील जंगम वस्तीला वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पवित्र स्थान, झऱ्यातून पाझरणारे पाणी एका दगडी गोमुखातून जिर्णोध्दारीत कुंडात करंगळी एवढ्या धारेने वर्षभर पडत असते. देव श्री. रायरेश्वराच्या पूजाअर्चेला येथीलच पाणी जाते तसेच संपुर्ण जंगमवाडी येथूनच पिण्यासाठी पाणी नेते. कुंडाच्या पुढे, पाच मिनिटांच्या चालीवर, देव श्री. रायरेश्वराचे तीन खणी पुर्वाभिमुख देवालय आहे. सध्या पुरातत्व खात्यामार्फत मंदीराचा जीर्णोद्धार सुरू असल्याने मंदीर बंद आहे, बाहेरून दर्शन घ्यावे लागते. मंदिराच्या पुरातन इतिहासाला साजेस काम इथे सुरू असून ते पुर्ण झाल्यावर परिसराचं सौंदर्य अनेक पटीने वाढेल यात शंका नाही. खोल गाभारा, व त्यासमोर खांबावर तोललेला सभामंडप, दोन शिखरे अशी रचना आहे. सभामंडपाच्या भिंतीवर इसवी सन १८८३ सालचा एक शिलालेख आहे.तो असा--
'श्री शंकर रायरेश्वर दापधर मौजे राइर येथील समस्त पाटील भाऊपणी, यांचे वडील संकर लिंग यांनी पूर्वी शिवालय बांधले. त्यात सुमारे दोनशे वर्षे जालि. याचा जीर्णोद्धार हारी यांनी बांधिले. यास खर्च रुपये 700'
म्हणजेचं छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे शपथ घेतल्यानंतर मौजे रायरी येथील पाटलांनी किमान दोन वेळा या मंदीराचा जीर्णोद्धार करून मंदिर राबते ठेवले.
मंदीरासमोर थोडं उंचीवर जननी मातेचे मंदीर आहे, या मंदिराचाही जीर्णोद्धार प्रस्तावित आहे. समोरील बाजूस एका चौथऱ्यावर शिवरायांचा पश्चिमाभिमुख अर्धपुतळा आहे. मंदीर परिसरात काही वेळ घालवून संदीपबरोबर त्याच्या घरी गेलो, तिथे चहा घेऊन रायरेश्वर ट्रेलवर मार्गस्थ झालो. चालता-चालता, परिसरात आढळणाऱ्या फ्लोरा-फ़ौनाविषयी मोलाची माहिती संदीप देत होता. रायरेश्वरावरील वस्त्या, प्राणी, सभोवतालचा परिसर, रायरी, कारी, धानिवली अशा पुणे बाजूच्या पायथ्याच्या गावांची माहिती, नीरा-देवघर धरणाचा जलाशय, राजगड-तोरणा जोडगोळी, लिंगाण्याचा सुळका, विरुद्ध बाजूचे, कमळगड,वैराटगड, पांडवगड, केंजळगड, नवरा-नवरीचे सुळके ही सर्व भौगोलिक स्थाने पाहत, अनुभवत सात रंगांची माती आढळून येणाऱ्या परिसरात आम्ही पोहोचलो. सात रंगाच्या मातीच्या अस्तित्वामागे व्हॉल्क्यानिक इरप्शन ही भौगोलिक संकल्पना आहे. लाल, आकाशी निळा, तपकिरी, पांढरा, हिरवा, पिवळा अशा रंगछटा येथे सहजतेनं दिसून येतात.
एव्हाना सुर्यास्ताची वेळ जवळ येत चालली होती म्हणुन सात मातीच्या मागील बाजूच्या टेकडीवर चढून गेलो. तिथुन समोर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचा अस्ताला जाणारा सुर्य दिसत होता. पश्चिम बाजू भगव्या रंगात न्हाऊन निघाली होती. डोळ्यांना दिसत होती पण कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये नीटशी पकडली जात नव्हती तेव्हा तो नाद सोडून देऊन शांत बसुन हा सुर्यास्त अनुभवला. अनेक विचार तरंग यावेळी मनात उमटत होते.
छत्रपती जेव्हा या परिसरात आले तेव्हा त्यांनीही या मातीत पावलं उमटवली असतील, येथील सुर्योदय-सुर्यास्त अनुभवला असेल. इथुन दिसणारा आसमंत, परिसर न्याहाळला असेल. कान्होजी नाईक, बाजी नाईक, मालुसरे बंधु, जिवाजी, नरसप्रभु अशा दिग्गजांबरोबर ते या परिसरात फिरलेही असतील. शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर एकेकाळी साक्षात शिवप्रभूंचे पाय लागलेल्या भूमीवर हजर असणे हे मोठं भाग्याचं, गेली काही वर्षे शिवजयंतीला रायगड, राजगड, तोरणा, शिवनेरी, प्रतापगड अशा ठिकाणी हजर राहुन हे भाग्य पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न मी करतोय. शहरात शिवजयंतीच्या नावाखाली केलं जाणारं विकृत विकारांचे प्रदर्शन, DJ लेझर लाईटचा कृत्रीम गोंगाट, घराण्याच्या रथांच्या शोभायात्रांच्या नावाखाली स्वतःचं छटाकभर कर्तृत्व नसताना, पुर्वजांच्या पराक्रमाचे दाखले देत उगाचंच छाती फुगवीत फुकाचा अहंकार कुरवळणाऱ्या उपटसुंभांच्या गर्दीपासून दूर डोंगराच्या माथ्यावर साजरी होणारी शिवजयंती मला आपली वाटते. आमचा हा महान राजा जन्मलाही डोंगरावर, खेळला बागडला अगदी लढलाही डोंगरावर, छत्रपती झाला तो ही डोंगरावरचं आणि शेवटी शेवटचा श्वास घेता झाला तो ही डोंगरावरचं...त्याच्या आयुष्यातील महत्वाच्या दिवसांची आठवण जागवण्यासाठी जातीच्या मावळ्यांना याचं डोंगर-दऱ्यांच्या आश्रयाला यावसं वाटणं अगदी नैसर्गिक आहे.
असो... सुर्यास्तानंतर पुन्हा जंगमवाडीतील संदीपच्या घरी पोहोचलो, गरमागरम कांदाभजी व चहाचा आस्वाद घेऊन संदीपला बरोबर घेऊन कॅम्प साईटवर आलो. गप्पा मारत वेळ मजेत गेला. एव्हाना संध्याकाळपासुनचं रायरेश्वरावर गावोगावच्या शिवजयंती मंडळांची शिवज्योत नेण्यासाठीची लगबग सुरु झाली होती. शिवप्रभूंचे पाय लागलेल्या बहुतेक किल्ल्यांवर शिवजयंती पूर्वसंध्येला आसपासच्या पाच-पन्नास किलोमीटर घेऱ्यातील गावांमधून आबालवृद्ध शिवज्योत नेण्यासाठी येत असतात. गडावरील मुख्य ठिकाणी पोहोचून महाराजांच्या जयघोषात बरोबर आणलेली मशाल पेटवली जाते व मग तरुण मंडळी अनवाणी पायाने व आळीपाळीने ही प्रतिकात्मक शिवज्योत अजिबात न थांबता धावत-पळत तसेच विझू न देण्याची काळजी घेत आपआपल्या गावापर्यंत वाहून नेतात. याचं शिवज्योतीच्या साक्षीने मग गावातील शिवजयंती चा कार्यक्रम पार पडतो. शिवज्योत म्हणजे शिवप्रभूंचा अंश असा मान तिला दिला जातो. अत्यंत चैतन्यदायी व तरुणाईचा कस जोखणारी ही पद्धत मला कौतुकास्पद वाटते.
रायरेश्वरावर संध्याकाळपासून सुरू झालेला हा कार्यक्रम आता अगदी रात्रभर चालणार होता. गटागटाने येणारे आबालवृद्ध, लगबगीने येत, शिवज्योत सोबत घेत लगेचंच परततही होते. मंदीर परिसर शिवप्रभूंच्या जयजयकाराने दुमदुमून गेला होता.
या चैतन्यदायी वातावरणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभल्याबद्दल देव श्री. रायरेश्वराचे आभार मानून जेवणासाठी संदीपच्या घराकडे गेलो. गरमागरम नाचणीची भाकरी, पिठलं, वांग्याची रस्सा भाजी, भात-वरण असं भरपेट जेवण झालं. परतीच्या वाटेवर अनेक शिवजयंती मंडळांशी संवाद साधत कॅम्प साईटवर आलो.
एव्हाना आकाश चांदण्यांनी फुलून गेले होते, आकाश निरीक्षण आणि इकडून तिकडे पळणाऱ्या चांदण्यांचा खेळ पाहत तासभर घालवला, दरम्यान शिवज्योत नेणाऱ्या मंडळींचा राबता अखंड सुरुचं होता. सरतेशेवटी बाराच्या ठोक्याला झोपायला टेंट्समध्ये गेलो.
सकाळी सहाच्या आसपास शिवजयघोषाच्या आवाजानेचं जाग आली, उजाडलं नव्हतंच तरी ही टेंटमधून बाहेर पडलो. वारा अगदीचं पडलेला होता तरीही हवेत गारठा होता. दाट अंधारातून उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या शिवभक्तांच्या झुंडी मंदीर परिसराकडे लोटतचं होत्या. एरव्ही, राजगड-रायगड सारख्या किल्ल्यांवर शिवदर्शनासाठी व शिवज्योत नेण्यासाठी बहुतांश तरुण मुलांचा भरणा असतो, रायरेश्वराची चढण जास्त वेळ घेणारी नसल्याने इथे येणाऱ्यांमध्ये मात्र आबालवृद्ध, महिलावर्ग सर्वांचा भरणा दिसत होता. शहरात शिवजयंती म्हणजे DJ च्या तालावर अचकट-विचकट अंगविक्षेप करीत चालणाऱ्या मिरवणुका हे चित्र एकीकडे तर शिवघोषात शिवज्योतीच्या मागे चालणारे उत्साही आबालवृद्ध हे चित्र दुसरीकडे....
मंतरलेल्या वातावरणात काही काळ निःशब्दतेत गेला आणि मग झुंजूमंजू होण्याची चाहुल लागली. पुर्वेकडचा आसमंत केशरी रंगात परावर्तित होऊ लागला, नारिंगी रत्नप्रभा उधळीत हिंदुपदपातशहास वंदन करणारा शिवजन्मोत्सव दिनाचा भगवा सुर्यगोल क्षितिजावर अवतीर्ण झाला....
शिवजयंतीचा सुर्य उगवला...
झटपट आन्हिके उरकली आणि तयार होऊन मंदीर - परिसराकडे निघालो. शिवज्योत नेणारे फारसा वेळ दवडीत नव्हते व मंदीरही दर्शनासाठी बंद असल्याने गर्दीचा फार काही प्रश्न नव्हता. देव श्री. रायरेश्वराचे बाहेरून दर्शन घेतले, जननी मंदीर उघडलेलं असल्याने तिथे मात्र आत जाऊन व्यवस्थित दर्शन घेतले व तद्नंतर समोर छत्रपतींच्या पुतळ्यासमोर गेलो. फुलांची सुंदर आरास, त्यासमोर तेवणारी भलीमोठी समई व सकाळच्या कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघालेली शिवप्रतिमा आणि आजुबाजूचे जिवंत चैतन्यमयी वातावरण... अजून काय हवे शिवजयंती साजरी करायला ???
थोडा वेळ या जादुई वातावरणाचा अनुभव मनात साठवुन कॅम्प साईटवर आलो. नाश्ता उरकुन संदीपचा निरोप घेतला बॅगा उचलल्या आणि रायरेश्वर पायउतार होण्यास कूच करते झालो. १५ मिनिटांत शिडीवर पोहोचलो, याठिकाणी भोर-मावळचे आमदार शंकरभाऊ मांडेकर कार्यकर्त्यांसह शिडी चढून रायरेश्वराकडे निघाले होते, त्यांना 'जय शिवराय' करून आम्ही आमची वाट धरली.
खालीही मोठी गर्दी होती, शे-सव्वाशे वाहने दूरपर्यंत उभी होती. त्या गर्दीतून गाडी काढली आणि आंबवड्याची वाट धरली. ओहोळी-कोर्ले-वडतुंबी मार्गे अर्ध्या-पाऊण तासात आंबवड्यात पोहोचलो. रस्त्यात ठिकठिकाणी शिवजयंतीचे उत्साही आयोजन नजरेस पडले.
कारी-आंबवडे परिसर, नागेश्वर देवालय, आंबवडे
आंबवड्यात सर्वप्रथम देव श्री. नागेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी गेलो. अतिशय पुरातन असे हे देवालय आहे. वेळोवेळी जिर्णोद्धार होऊन सद्यस्थितीत मंदीर दिमाखाने उभे आहे, एका रुंद ओढ्याच्या काठावर, खोलगट जागेत वसलेल्या मंदिरात पोहोचायला अनेक पायऱ्या उतरून जावे लागते, इथे ओढ्यात छोट्या धबधब्याप्रमाणे प्रवाह तयार झाला आहे, या प्रवाहाचा आवाज सतत कानावर पडत असतो. मंदिराच्या सभोवती दाट झाडी आहे, दोन बाजूने पायरीमार्ग मंदिरात उतरतो, एक प्राथमिक आरोग्यकेंद्रापासुन तर दुसरा गावच्या मध्यवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून नागेश्वर विद्यालयाच्या बाजूने येऊन पायरीमार्गाला जोडणारा असे मार्ग आहेत. ऊंच चौथऱ्यावर बांधलेले पश्चिमाभिमुख मंदीर, आधी दगडी नंदीमंडप त्यापुढे दगडी खांबांवर तोललेला सभामंडप व मग पायऱ्या उतरून खाली खोलातील गाभारा अशी मंदिराची रचना आहे. मंदिरावर अनेक कोरीव शिल्पे आहेत. थोडीफार अस्वच्छता जाणवत असली तरी पवित्र, शांत, धीरगंभीर वातावरणात न्हाऊन निघालेला भव्य असा हा परिसर आहे.
भोरचे शंकराजी नारायण पंतसचिव यांची समाधी ही मंदीर परिसरात आहे. जवळच कुंड आहे जिथून एका गोमुखातून पाण्याची धार निरंतर कुंडात पडत असते. पावसाळ्यात कुंड ओसंडून यातील पाणी संपुर्ण मंदीर परिसरातुन वाहत जात ओढयाला मिळते. मंदीर परिसरातील आणखी एक आकर्षण म्हणजे आंबवड्याच्या ओढ्यावर बांधलेला चार फूट रुंदीचा आणि अंदाजे १५० फूट लांबीचा लोखंडी झुलता पुल ( Jijisaheb Suspension Bridge). भोरच्या संस्थानिकांनी १९३६-३७ साली हा पुल बांधला व अलीकडे त्याचे नूतनीकरणही झाले आहे. यावर चालत मध्यावर गेल्यावर छोटेखानी थरार नक्कीच अनुभवता येतो.
सरदार कान्होजी नाईक जेधे आणि जिवाजी महाले समाधी
मंदीर परिसरातून बाहेर पडून सरदार कान्होजी नाईक जेधे आणि जिवाजी महाले यांच्या समाधीदर्शनासाठी निघालो. मंदीरापासून साधारण ५०० मीटर अंतरावर आंबवड्याच्या प्राथमिक शाळेशेजारी मागील बाजूस, सरदार कान्होजी जेधे आणि जिवाजी महाले यांच्या छोटेखानी समाध्या शेजारी-शेजारी आहेत. समाध्या दाटीवटीत वसलेल्या आणि अस्वच्छतेने वेढल्या आहेत. समाधीला लागुनच एक सभागृह बांधण्यात आलेले आहे ज्याला कान्होजी जेधे यांचे नाव दिलेले आहे, ते ही कमालीचे अस्वच्छ आणि दरवाजाही नसलेले असे आहे. एकुणात, एकेकाळी महाराजांचे उजवे हात मानले जाणारे कान्होजी तसेच प्रतापगडच्या युद्धात महाराजांवरचा वार परतवून सय्यद बंडाला यमसदनी धाडणारे जिवाजी यांच्या समाधीस्थानांबद्दल एकुणात उदासीनता जाणवली. दोन्ही महापुरुषांच्या समाधींवर नतमस्तक होऊन कारीच्या जेधे-वाड्याच्या रस्त्याला लागलो.
कारी-जेधेवाडा
आंबवड्यातून घोरपडेवाडी- सांगवी मार्गे पुढच्या अर्ध्या-पाऊण तासात कारी गावी पोहोचलो. कारी गाव रायरेश्वराच्या उत्तर पायथ्याला आहे व पठाराच्या उतारालाच सरदार कान्होजी नाईक जेधे देशमुख यांचा वाडा आहे. अलीकडील काळात वाड्याची जुन्या धर्तीवर पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे. वाड्यासमोर मोकळी जागा आहे. समोरील बाजूस एक अलीकडील काळात बांधलेले मंदीर आहे. नाईकांचे सध्याचे वंशज यशवंत आबासाहेब जेधे देशमुख यांचे कुटुंबियांसह इथे वास्तव्य आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा जेधे देशमुख हे त्यांच्याकडे येणाऱ्या काही सरकारी अधिकाऱ्यांची वाट पाहत वाड्याच्या दिंडी-दरवाजात थांबले होते. त्यांच्या परवानगीने, त्यांच्याचं सोबत वाड्याच्या आत गेलो, दरवाजातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला बैठकीची व्यवस्था, समोर चौक व पलीकडे निवासाच्या खोल्या अशी रचना, डाव्या सोप्यात तांदळाचे कट्टे रचून ठेवलेले दिसतात. याच डाव्या बाजूने आत जात उजवीकडे वळले की भिंतीला लागुन जेधे नाईकांचे पोलादी चिलखत, त्यावर काही तलवारी आणि खाली पुर्वी घराण्याच्या वापरात असणाऱ्या पुरातन वस्तू, भांडी, देवाच्या कावडी मांडून ठेवल्या आहेत. त्यापुढील देवघरात पुजेतील पुरातन मुर्ती, टाक आहेत. डाव्या कोपऱ्यातून एक दरवाजा रायरेश्वराच्या दिशेने काढलेला आहे व तिथे बाजूला आतील खोलीत भलेमोठे पितळी शिवलिंग आहे. बाहेरच्या बाजूने रायरेश्वराचा अनुपम नजारा दिसतो.
सरदार कान्होजी नाईक जेधे देशमुख यांची काही नव्याने महाराष्ट्राला ओळख करून देण्याची गरज नाही, स्वराज्यासाठी आपल्या वंशपरंपरागत वतनावर पाणी सोडणारे स्वराज्याच्या आधारस्तंभांपैकी एक वीर योद्धे म्हणुन ते सर्वपरिचित आहेत पण त्यांचे बालपणापासूचे आयुष्य हे संघर्षानीचं भरले होते हे बऱ्याच जणांना ठाऊक नसेल.
कान्होजींचे वडील तसे त्यांच्या इतर चार भावंडात धाकटे पण काही अनपेक्षित घटनांनी देशमुखीचा कारभार त्यांच्याकडे वडिलांच्या हयातीतचं आला. यातून सख्ख्या भावंडाशी त्यांचे वितुष्ट येऊन आपल्याचं भावंडांकरवी त्यांचा खुन झाला. त्यावेळी कान्होजी आईच्या पोटात होते, मुलगा झाला तर त्याच्या नावाने कान्होजींची आई देशमुखी शिक्का चालवेल असा सरकारातून आदेश झाला. कान्होजींचा जन्म झाला व देशमुखी कारभार त्यांची आई पाहू लागली. त्यावेळी कान्होजींच्या भावकीने पाळण्यातील कान्होजी आणि त्यांची आई यांच्यावर मारेकरी घातले. यात कान्होजींची आई मारली गेली पण कान्होजींना दस महाला यांनी वाचवले, जिवाजी महाले बहुदा याचं दस महाला न्हावी यांच्या घराण्यातील असावेत. जेधे-महाले ऋणानुबंध असे मागील पिढीपासून असलेले येथे स्पष्ट होते.
याचं, दस महाला यांनी कान्होजींना मोसे खोऱ्याचे देशमुख बाजी पासलकर यांच्या आश्रयाला पोहोचवले. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत पासलकरांच्या संरक्षणाखाली राहुन व बाजी पासलकरांच्या मुलीशी विवाह झाल्यावर कान्होजी देशमुखीवर परत आले व देशमुखी ताब्यात घेऊन कारभार करू लागले. त्यांनी जीवावर उदार होऊन त्यांना वाचवणाऱ्या दस महाला यांना आंबवडे गाव इनाम दिला. पुढे पुणे प्रांत महाबली शहाजी महाराज यांच्याकडे गेल्यावर त्यांच्याकडे चाकरीत रुजू होऊन कान्होजी त्यांचे विश्वासु झाले व जेव्हा शिवाजी महाराज मुलखावर आले तेव्हा शहाजीराजांनी कान्होजींना त्यांच्या दिमतीला पाठवले.
दरम्यान कान्होजी आणि पिसावऱ्याचे कृष्णाजी नाईक बांदल देशमुख यांचा हद्दीच्या वादावरून अनेकदा रक्तरंजित संघर्ष झाला. तब्बल सहावेळा ते समोरासमोर उभे ठाकले पण निकाल लागला नाही. सातव्या वेळी बांदलांकडून हजार-बाराशे माणूस तर जेधेंकडून पाचशे ते सहाशे माणूस हातघाईला येऊन निरेकाठी मोठे रणकंदन झाले, जेधेंकडचे तब्बल तीनशे लोक ठार झाले, बांदलांचेही मोठे नुकसान झाले. या संघर्षानंतर मात्र दोघांनी आपसातील शत्रुत्व संपवलं. त्यानंतरचा शिवकाळातील जेधे-बांदलांचा दैदीप्यमान इतिहास महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत आहेच.
असो, वाडा पाहून झाल्यावर काही मिनिटे जेधे देशमुखांशी थोडी बातचीत करून व त्यांच्याकडील नोंदवहीत अभिप्राय नोंदवून त्यांचा निरोप घेतला.
आता परतीच्या वाटेवर मार्गक्रमण चालू होतं. भोरमधील शिवपुतळ्याचे दर्शन घेऊन पुढचा मार्ग धरला, इंगवली जवळील नेकलेस पॉईंट आणि बांदल समाधी दर्शन घेत कपूरहोळ-सासवड मार्गे घरच्या शिवजयंतीसाठी संध्याकाळच्या आत घर गाठले. शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर केंजळगड - रायरेश्वर - आंबवडे - कारी - भोर परिसराची ही भटकंती मनस्वी समाधान देऊन गेली.
प्रतिक्रिया
28 Feb 2025 - 7:30 pm | चक्कर_बंडा
सदर लेख भटकंती सदरात हलवावा अशी संपादक मंडळास विनंती
28 Feb 2025 - 8:44 pm | कर्नलतपस्वी
लेख आवडला पण आपली महाराजांवर असलेली भक्ती आणी प्रेम व पाठपुरावा करण्याचा दृढनिश्चय बघून हेवा वाटला.
1 Mar 2025 - 11:30 am | कंजूस
समाधान वाटले वाचून.
1 Mar 2025 - 3:03 pm | रीडर
छान