अमेरिकेचे अध्यक्ष

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
20 Jan 2025 - 9:57 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे आज, २० जानेवारी २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजता डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दुसर्‍यांदा शपथ घेतील. अमेरिकेचे अध्यक्ष आणि संबंधित विषयांमध्ये मला भलताच रस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष या विषयावर सगळी एकत्रित माहिती मिपावर असावी या उद्देशाने हा धागा काढला आहे. लिहिण्यासारखे खूप काही आहे. मात्र सगळे काही आजच लिहिले तर हा धागा विनाकारण लांबलचक होईल म्हणून आज पहिले पाच मुद्दे लिहिणार आहे आणि साधारण दर दोन दिवसांनी एक नवा मुद्दा प्रतिसादांच्या स्वरूपात लिहिणार आहे. ही सगळी माहिती मी वेगवेगळ्या स्त्रोतांमधून वाचलेली किंवा बघितलेली आहे. या धाग्यात त्या माहितीचे एकत्र संकलन असणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष या विषयावर वाचन/ युट्यूब किंवा अन्य ठिकाणी व्हिडिओ/डॉक्युमेंटरी बघणे चालूच असते. त्यातून नवीनवी माहिती गोळा होत असते. जशीजशी नवी माहिती कळेल त्याप्रमाणे प्रतिसादांमधून ते लिहिणार आहे. त्यामुळे हा धागा तसा 'ऑनगोईंग' ठेवायचा प्रयत्न असेल.

सगळे मुद्दे आज लेखाला सुरवात करत असताना लिहित आहे तितक्यात खोलात जाऊन लिहायचा प्रयत्न असेल. तर करूया सुरवात-

मुद्दा १
आज डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतील. एकसलग नसलेल्या दोन कारकिर्दींमध्ये अध्यक्षपद भूषविलेले ट्रम्प दुसरे अध्यक्ष असतील. यापूर्वी ग्रोव्हर क्लिव्हलँड हे १८८५ ते १८८९ आणि १८९३ ते १८९७ या काळात अनुक्रमे २२ वे आणि २४ वे अध्यक्ष होते. त्यानंतर २०१७ ते २०२१ या काळात ट्रम्प ४५ वे अध्यक्ष होते आणि आज २० जानेवारी २०२५ रोजी ते ४७ वे अध्यक्ष म्हणून सुत्रे हाती घेत आहेत. ग्रोव्हर क्लिव्हलँड आणि डॉनल्ड ट्रम्प यांचे नाव अध्यक्षांच्या यादीत दोनदा आल्याने ट्रम्प जरी ४७ वे अध्यक्ष असले तरी आतापर्यंत अध्यक्षपद ४५ व्यक्तींनीच भूषविले आहे.

Grover
ग्रोव्हर क्लिव्हलँड- २२ वे अध्यक्ष (१८८५ ते १८८९) आणि २४ वे अध्यक्ष (१८९३ ते १८९७)

१९३३ पूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ४ मार्चला शपथ घेत असत. मात्र, अध्यक्षीय निवडणुकीनंतरचा चार महिन्यांचा कालावधी खूपच मोठा असल्याने, १९३७ मध्ये फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्या दुसऱ्या कार्यकाळापासून शपथविधीची तारीख २० जानेवारी केली गेली. जर २० जानेवारीला रविवार असेल, तर अध्यक्ष त्या दिवशी खाजगी समारंभात शपथ घेतात आणि पुढील दिवशी सार्वजनिक समारंभ होतो. त्यामुळे जेम्स मनरो यांनी ५ मार्च १८२१ रोजी, झॅकेरी टेलर यांनी ५ मार्च १८४९ रोजी, ५ मार्च १८७७ रोजी रूदरफोर्ड हेस यांनी, ५ मार्च १९१७ रोजी वुड्रो विल्सन यांनी, २१ जानेवारी १९५७ रोजी ड्वाईट आयसेनहॉवर यांनी, २१ जानेवारी १९८५ रोजी रॉनाल्ड रेगन यांनी तर २१ जानेवारी २०१३ रोजी बराक ओबामा यांनी वॉशिंग्टन डी.सी मध्ये कॅपिटॉल इमारतीत परत एकदा सार्वजनिक समारंभात शपथ घेतली होती.

कडाक्याच्या थंडीमुळे डॉनल्ड ट्रम्प भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे आज रात्री शपथ घेतील तेव्हा तो समारंभ कॅपिटॉल इमारतीत उघड्यावर न होता आत घेण्यात येणार आहे अशी बातमी आहे. शपथ घेतल्यानंतर राष्ट्राला उद्देशून भाषण करतात ते कसे करणार आहेत ते बघायचे. कारण आतापर्यंत जे शपथग्रहण समारंभ टिव्हीवर बघितले आहेत त्यात आतापर्यंतच्या समारंभांमध्ये भरपूर लोक उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.. जर ट्रम्प राष्ट्राला उद्देशून भाषण बंद खोलीतून करणार असतील तर मग लोक बाहेर जमणार की स्क्रीनवर भाषण बघणार की कसे हे काही तासात कळेल.

मुद्दा २
अध्यक्ष त्या पदावर जास्तीतजास्त आठ वर्षे राहू शकतात असे आपल्याला वाटते. पण अध्यक्ष त्या पदावर जास्तीतजास्त दहा वर्षे राहू शकतात. त्याविषयीचा नियम असा की कोणीही व्यक्ती अध्यक्ष म्हणून जास्तीतजास्त दोनदा निवडली जाऊ शकते. मात्र अध्यक्ष म्हणून निवडली न गेलेली पण अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळलेल्या कोणीही व्यक्तीने (अध्यक्षांच्या मृत्यूनंतर किंवा राजीनाम्यानंतर उपाध्यक्ष अध्यक्ष झाल्यास तसे होते) तसा कार्यभार दोन पेक्षा अधिक वर्षे पाहिला असेल तर ती व्यक्ती अध्यक्षपदावर एकदाच निवडून जाऊ शकते.

जॉन केनेडींनी अध्यक्ष म्हणून आणि लिंडन जॉन्सन यांनी उपाध्यक्ष म्हणून २० जानेवारी १९६१ रोजी शपथ घेतली. केनेडींची हत्या झाल्यावर लिंडन जॉन्सन अध्यक्ष झाले २२ नोव्हेंबर १९६३ रोजी. ते केनेडींचा उर्वरीत कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत म्हणजे २० जानेवारी १९६५ पर्यंत अध्यक्ष होते. हा काळ दोन वर्षांपेक्षा कमी होता. त्यामुळे ते आणखी दोनदा अध्यक्ष म्हणून निवडले जायला पात्र होते. १९६४ ची निवडणुक ते जिंकले आणि १९६८ ची निवडणुक लढवायलाही ते पात्र होते. सुरवातीच्या प्रायमरी त्यांनी लढविल्याही होत्या. मात्र व्हिएटनाम युध्दामुळे जनतेत असलेल्या नाराजीमुळे आपण निवडून येणे तितके सोपे नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी १९६८ मध्ये निवडणुक लढविणार नाही अशी घोषणा केली. समजा ते १९६८ ची निवडणुक लढवून जिंकले असते तर ते २० जानेवारी १९७३ पर्यंत म्हणजे ९ वर्षे आणि जवळपास २ महिने अध्यक्ष राहिले असते.

Johnson
लिंडन जॉन्सन (३६ वे अध्यक्ष- १९६३ ते १९६९)

त्यामुळे डॉनल्ड ट्रम्प तांत्रिकदृष्ट्या आणखी सहा वर्षे अध्यक्षपदावर राहू शकतील. आज २० जानेवारी २०२५ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर २० जानेवारी २०२९ पर्यंत चार वर्षांची आपली कारकिर्द ते पूर्ण करू शकतातच. समजा २०२८ मध्ये जे.डी.व्हान्स किंवा अन्य कोणी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार बनेल त्याचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून समजा डॉनल्ड ट्रम्प यांनी निवडणूक लढवली तर ते उपाध्यक्ष बनतील. त्यानंतर २० जानेवारी २०३१ रोजी २०२८ मध्ये निवडून आलेल्या अध्यक्षांनी राजीनामा दिला तर त्या जागी २० जानेवारी २०३१ ते २० जानेवारी २०३३ पर्यंत डॉनल्ड ट्रम्प राज्यघटनेच्या कोणत्याही तत्वाचे उल्लंघन न करता परत अध्यक्ष राहू शकतील. प्रत्यक्षात तसे होणे फारच कठीण असले तरी तांत्रिकदृष्ट्या तसे करता येणे शक्य आहे.

मुद्दा ३
पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी चार वर्षांच्या दोन कारकिर्दी झाल्यानंतर निवृत्ती स्विकारली आणि तिसर्‍या कारकिर्दीसाठी निवडणुक लढवली नाही. त्यामुळे अध्यक्षांनी जास्तीतजास्त दोन टर्म पदावर राहावे असा पायंडा पडला. मात्र तसा राज्यघटनेत नियम नव्हता. त्यामुळे आठ वर्षे त्या पदावर राहिल्यानंतर काही अध्यक्षांनी परत निवडणुक लढवली होती/ लढवायचा प्रयत्न केला होता.

१८६९ ते १८७७ या काळात आठ वर्षे अध्यक्षपदावर राहिल्यानंतर युलिसिस ग्रँट यांनी १८८० मध्ये प्रायमरी लढविल्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळविण्यात यश मिळाले नाही आणि रिपब्लिकन पक्षाने जेम्स गारफिल्ड यांना उमेदवारी दिली.

१९०१ ते १९०९ या काळात अध्यक्ष राहिलेल्या थिओडोर रूझवेल्ट यांनी १९१२ मध्ये निवडणुक लढवली. अर्थात ते १९०० च्या निवडणुकांमध्ये अध्यक्ष म्हणून निवडून आले नव्हते. सप्टेंबर १९०१ मध्ये विलिअम मॅकिन्ली यांची हत्या झाल्यानंतर ते अध्यक्षपदावर विराजमान झाले. म्हणजे त्यांनी पूर्ण ८ वर्षे नाही तरी साडेसात वर्षे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांनी १९१२ च्या निवडणुकांमध्ये विद्यमान अध्यक्ष रिपब्लिकन विलिअम हॉवर्ड टाफ्ट आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन यांच्या बरोबर स्वतःची प्रोग्रेसिव्ह पार्टी काढून निवडणुक लढवली. त्यात टाफ्ट आणि थिओडोर रूझवेल्ट या दोघांचाही पराभव झाला आणि वुड्रो विल्सन जिंकले. या निवडणुकांविषयी डेल कार्नेगींच्या How to win friends and influence people या पुस्तकातही उल्लेख आहे.

फ्रँकलीन रूझवेल्ट १९३२ आणि १९३६ च्या निवडणुकांमध्ये जिंकले. नोव्हेंबर १९४० मध्ये निवडणुक आली तेव्हा दुसरे महायुध्द सुरू झाले होते. तसेच १९२९ च्या महामंदीतून अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्ण सावरली होती असे नाही. त्या महामंदीतून सुटका करण्यासाठी फ्रँकलीन रूझवेल्ट यांनी न्यू डील या नावाने नवे आर्थिक धोरण आणले होते. अशा स्थितीत सरकारी धोरणांमध्ये सातत्य ठेवायला आपणच अध्यक्षपदी राहिल्यास चांगले या उद्देशाने त्यांनी १९४० आणि १९४४ च्या निवडणुकाही लढवल्या.

१९५१ मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत २२ वी दुरूस्ती करून याआधीच्या मुद्द्यात उल्लेख केल्याप्रमाणे अध्यक्षांची कारकिर्द जास्तीतजास्त १० वर्षे किंवा दोनदा निवडून जाणे अशी मर्यादित करण्यात आली. ही घटनादुरूस्ती सुरवातीला १९४७ मध्ये संसदेत मांडण्यात आली आणि प्रत्यक्षात १९५१ मध्ये संमत करण्यात आली. ही घटनादुरूस्ती आणण्याचे कारण हिटलरसारखा क्रूरकर्मा लोकशाही मार्गाने आफ्रिकेतील कोणत्या बनाना रिपब्लिकमध्ये नाही तर जर्मनीसारख्या सुसंस्कृत देशातून पुढे आला. जे जर्मनीत झाले ते अमेरिकेतही व्हायला नको, कोणीही अध्यक्ष हुकुमशहा बनायला नको या उद्देशाने अध्यक्षांच्या कार्यकाळावर ही मर्यादा घालण्यात आली. अधिक काळ सत्तेत राहिलेला अध्यक्ष हुकुमशहा व्हायची शक्यता जास्त हे त्यामागचे कारण.

मुद्दा ४
अमेरिकेचे अध्यक्ष शपथ घेतात त्या शपथेचा मसुदा पुढीलप्रमाणे: I, (Name of the person), do solemnly swear (or affirm) that I will faithfully execute the office of the President of the United States and will to the best of my ability, preserve, protect and defend the constitution of the United States. So help me God. आतापर्यंत फ्रँकलीन पिअर्स (१४ वे अध्यक्ष- १८५३ ते १८५७) यांनीच do solemnly affirm अशी शपथ घेतली आहे. इतर सगळ्या अध्यक्षांनी do solemnly swear अशीच शपथ घेतली आहे. फ्रँकलीन पिअर्स हे क्वेकर या ख्रिश्चन पंथाचे होते आणि धार्मिक कारणांमुळे क्वेकर पंथीय व्यक्ती swear असे म्हणणे टाळत आल्या होत्या म्हणून फ्रँकलीन पिअर्स यांनी शपथ solemnly affirm म्हणून घेतली. मात्र रिचर्ड निक्सन हे पण क्वेकर असूनही त्यांनी solemnly swear अशीच शपथ घेतली होती.

काळाप्रमाणे या शपथेच्या स्वरूपात फरक झाले आहेत. सुरवातीच्या काळात शपथ देणारा "Do you (Name of the person) solemnly swear that you will faithfully execute the office of President of the United States...." असा प्रश्न विचारून शपथ घेणार्‍या अध्यक्षांनी केवळ I do किंवा I swear एवढेच म्हणणे अपेक्षित होते. १८८१ मध्ये अध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्या हत्येनंतर चेस्टर आर्थर या त्यांच्या उपाध्यक्षांनी शपथ घेतली तेव्हा ते नुसते I do किंवा I swear असे न म्हणता "I will. So help me God" असे म्हणाले. तेव्हापासून So help me God हे चार शब्दही शपथेचा भाग करण्यात आले. अर्थात चेस्टर आर्थर यांनी नक्की ते चार शब्द उच्चारले. काहींच्या मते जॉर्ज वॉशिंग्टन आणि अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांनी शपथ घेतानाही ते शब्द उच्चारले होते. त्यामुळे नक्की कोणत्या अध्यक्षापासून ते चार शब्द शपथेचा भाग झाले याविषयी मतभेद आहेत.

त्यानंतर शपथ आताच्या स्वरूपात- म्हणजे Do you अशी प्रश्नार्थक सुरवात न करता थेट I... पासून सुरवात केली जाऊ लागली आणि शपथ देणार्‍याने एक वाक्य म्हणायचे आणि ते शपथ घेणार्‍या अध्यक्षांनी जसेच्या तसे म्हणायचे या प्रकारची सुरवात झाली. त्यातही थोडेफार फरक करण्यात आले होते. उदाहरणार्थ १९३३ मध्ये अध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्टना शपथ देताना मुख्य न्यायाधीश चार्ल्स ह्युजेस यांनी पूर्ण शपथ म्हटली आणि मग अध्यक्षांनी परत तीच शपथ म्हटली. १९६१ मध्ये जॉन केनेडींना शपथ देताना मुख्य न्यायाधीशांनी You John Fitzerald Kennedy do solemnly swear... अशी द्वितीय पुरूषी सुरवात केली. मग जॉन केनेडींनी "I, John Fitzerald Kennedy do solemnly swear..." अशाप्रकारे एकेक वाक्य म्हटले.

अध्यक्ष शपथ घेताना उजवा हात कोपरापासून ९० अंशात उंचावतात. त्यांची पत्नी (आणि पत्नी नसल्यास बहिण किंवा अन्य कोणी स्त्री नातेवाईक) हातात बायबल धरतात. त्या स्त्री नातेवाईकास 'फर्स्ट लेडी' म्हणतात. अजूनपर्यंत अध्यक्षपदावर कोणी स्त्री आलेली नाही. मात्र राज्यांच्या गव्हर्नर पदावर स्त्रिया आलेल्या आहेत. त्यांच्या शपथेच्या वेळेस त्यांचे पती असे बायबल हातात धरतात आणि त्यांना 'फर्स्ट जंटलमन' असे म्हणतात. त्या बायबलवर अध्यक्ष आपला डावा हात ठेवतात आणि शपथ घेतात. अर्थात असे बायबल वापरणे बंधनकारक नाही. १८०१ मध्ये थॉमस जेफरसन, १९०१ मध्ये थिओडोर रूझवेल्ट आणि १९२३ मध्ये केल्व्हिन कुलीज यांनी बायबलचा वापर केला नव्हता. तर १८२५ मध्ये जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स यांनी कायद्याचे पुस्तक वापरले होते. त्यामुळे भविष्यात ख्रिस्ती नसलेला अध्यक्ष झाल्यास तसा काही प्रश्न येणार नाही.
Trump inauguration
डॉनल्ड ट्रम्प यांचे शपथग्रहण (२० जानेवारी २०१७)

२००९ मध्ये बराक ओबामांनी अध्यक्षपदाची पहिल्यांदा शपथ घेतली होती तेव्हा त्यांनी शपथेच्या मजकुरातील शब्द उच्चारताना क्रमात चूक केली आणि ते चुकून I, Barak Hussein Obama , do solemnly swear that I will execute the office of the President of the United States faithfully असे म्हणाले होते. म्हणजे faithfully हा शब्द त्यांनी शेवटी उच्चारला होता. त्यामुळे त्यांना दुसर्‍या दिवशी व्हाईट हाऊसमध्ये एका खाजगी समारंभात परत एकदा शपथ देण्यात आली होती.

१९३३ मधील फ्रँकलीन रूझवेल्ट यांनी शपथ घेतल्यापासून २०२१ मधील जो बायडन यांनी शपथ घेतल्यापर्यंत सगळ्या अध्यक्षांनी घेतलेल्या शपथा युट्यूबवर https://youtu.be/MCl3iD50ofk?si=355ig7osfzKiHg1d इथे बघता येतील.

मुद्दा ५
अध्यक्षांना शपथ कोणी द्यावी याविषयी काहीही नियम नाहीत. सामान्यतः अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश अध्यक्षांना शपथ देतात मात्र त्यांनीच शपथ द्यायला हवी असा नियम नाही. २२ नोव्हेंबर १९६३ रोजी जॉन केनेडींची टेक्सस राज्यात डॅलस येथे हत्या झाली. त्यावेळेस उपाध्यक्ष लिंडन जॉन्सनही डॅलस येथेच होते. अध्यक्ष म्हणून लिंडन जॉन्सन यांनी लवकरात लवकर शपथ घेणे गरजेचे होते. त्यामुळे केनेडींचे निधन झाले हे डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर ९० मिनिटात डॅलस विमानतळावर अमेरिका सरकारकडून अध्यक्षांना दिल्या जाणार्‍या विमानात (एअरफोर्स वन) डॅलसच्या स्थानिक न्यायालयातील न्यायाधीश सारा ह्युजेस यांनी लिंडन जॉन्सनना अध्यक्षपदाची शपथ दिली होती आणि नवे अध्यक्ष म्हणून लिंडन जॉन्सन वॉशिंग्टनला परतले.
Johnson
लिंडन जॉन्सन एअरफोर्स वनमध्ये शपथ घेताना (२२ नोव्हेंबर १९६३)

त्याव्यतिरिक्त इतरही अनेक अध्यक्षांना मुख्य न्यायाधीश सोडून इतरांनी शपथ दिली होती. सगळ्यात रोचक उदाहरण आहे अध्यक्ष केल्व्हिन कुलीज यांचे. १९२१ मध्ये वॉरन हार्डिंग यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि केल्व्हिन कुलीज यांनी उपाध्यक्षपदाची. १९२३ मध्ये अध्यक्ष वॉरन हार्डिंग यांचे सॅन फ्रान्सिस्को येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यावेळेस उपाध्यक्ष केल्व्हिन कुलीज व्हरमाँट राज्यातील प्लायमाऊथ नॉच या ठिकाणी आपल्या घरी होते. त्यांच्या घरी वीज नव्हती आणि फोनही नव्हता. त्यामुळे अध्यक्ष वॉरन हार्डिंग यांचे निधन झाल्याची बातमी त्यांना एका निरोप्याकरवी रात्री उशीरा कळविण्यात आली. मग त्यांनी रात्री पावणेतीनला आपल्या घरीच अध्यक्षपदाची शपथ घेतली. आणि त्यांना शपथ देणारे कोण होते? तर त्यांचे वडील जॉन कुलीज. त्यांचे वडील व्हरमाँटमध्ये एका स्थानिक न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश आणि पब्लिक नोटरी होते.

त्याचप्रमाणे १९०१ मध्ये अध्यक्ष विलिअम मॅकिनली यांच्यावर न्यू यॉर्क राज्यात बफेलो या शहरात गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर आठ दिवसांनी त्यांचे निधन झाले. अध्यक्षांचे निधन झाल्यानंतर उपाध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांना बफेलो येथेच स्थानिक न्यायाधीशांनी शपथ दिली.

अध्यक्षांना मुख्य न्यायाधीश सोडून अन्य न्यायाधीशांनी शपथ द्यायचे इतर प्रसंगही आहेत. त्याविषयी परत कधीतरी.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Jan 2025 - 10:22 am | माईसाहेब कुरसूंदीकर

छान माहिती दिलीस रे चंसुकु.
अमेरिकन अध्यक्षांचा बुद्ध्यांक, त्यांचे सामान्य ज्ञान ह्याचा कधी अभ्यास झाला आहे का? अनेक अमेरिकन राजकारण्यांना जगाच्या नकाशावर महत्वाचे देश दाखवता येत नाहीत असे वाचले होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Jan 2025 - 12:27 pm | चंद्रसूर्यकुमार

अमेरिकन अध्यक्षांचा बुद्ध्यांक, त्यांचे सामान्य ज्ञान ह्याचा कधी अभ्यास झाला आहे का?

अध्यक्षांच्या बुध्यांकाविषयी काही अनधिकृत अभ्यास झाले आहेत. अनधिकृत अशा अर्थी की ते अमेरिकन सरकारकडून झाले नव्हते- आणि तसे होणारही नाहीत. त्या अभ्यासाप्रमाणे जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स १७५ बुध्यांक असलेले सर्वात हुषार अध्यक्ष होते, थॉमस जेफरसन १६० बुध्यांक असलेले दुसर्‍या क्रमांकावर वगैरे वगैरे. पण माझे वैयक्तिक मत असे की अध्यक्षांचा बुध्यांक हा त्यामानाने निरर्थक विषय असतो. खूप जास्त हुषार असलेला अध्यक्ष चांगला असेलच असे नाही. त्यापेक्षा अध्यक्षाचा उद्देश अधिक महत्वाचा. उद्देश वाईट असेल आणि बुध्यांक जास्त असेल तर असा अध्यक्ष वाईट कृत्य अधिक हुषारीने करेल. ते आणखी धोकादायक.

जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स एवढे हुषार होते पण त्यामानाने तुसडे आणि लोकांना बरोबर घेऊन जायची क्षमता कमी असलेले होते. असा अध्यक्ष तितका कामाचा नाही. थॉमस जेफरसन असतील इतके हुषार. पण अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिणारे आणि त्यात All men are created equal and all men are endowed by their creator certain unalienable rights- among these life, liberty and pursuit of happiness असे तत्वज्ञान झोडणारे थॉमस जेफरन स्वतः गुलाम बाळगून होते. तसेच थॉमस जेफरसनचे गुलाम स्त्रीबरोबर अनैतिक संबंध होते. त्यातून त्यांना अनौरस संततीही होती. आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांच्या वंशजांची The Society of Presidential Descendents म्हणून आहे. माजी अध्यक्षांचे वंशजच त्या सोसायटीचे सदस्य बनू शकतात. ते सगळे वंशज मधूनमधून भेटत असतात. त्यांच्या मेळाव्यात फक्त थॉमस जेफरसनच्या त्या अनौरस संततीचे वंशज गोरे नसतात. जे काही असेल ते असेल. पण असले प्रकार करणे आणि विशेषतः एकीकडे all men are endowed by their creator certain unalienable rights असे म्हणायचे आणि दुसरीकडे गुलाम बाळगायचे यात काही विसंगती आहे हे थॉमस जेफरसनच्या गावीही नव्हते. अर्थात अध्यक्ष म्हणून थॉमस जेफरसनने चांगली कामेही नक्कीच केली. पण हा बट्टा त्यांच्या नावावर नक्कीच आहे.

अनेक अमेरिकन राजकारण्यांना जगाच्या नकाशावर महत्वाचे देश दाखवता येत नाहीत असे वाचले होते.

२०१७ मध्ये मोदी डॉनल्ड ट्रम्पना पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये भेटले तेव्हा 'तुमची कुठे चीनबरोबर सीमा आहे' असे ट्रम्पने मोदींना म्हटल्यावर मोदी अवाक झाले होते असा दावा एका पुस्तकात आला आहे- https://www.business-standard.com/article/international/donald-trump-did... तेव्हा त्या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ पण उपस्थित होते. तेव्हा ते हाताने खाणाखुणा करून मोदींना या विषयी काही बोलू नका असे सांगायचा प्रयत्न करत होते म्हणे :) खरेखोटे ते ट्रम्प जाणोत, मोदी जाणोत आणि माईक पॉम्पिओ जाणोत.

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Jan 2025 - 12:44 pm | चंद्रसूर्यकुमार

थॉमस जेफरसन यांचे गोर्‍या आणि आफ्रिकन अमेरिकन वंशजांविषयी https://www.youtube.com/watch?v=hZPwxJpXuy8&t वर अधिक.

थॉमस जेफरसन व्हर्जिनिया राज्यात मॉन्टेसिलो इस्टेट म्हणून एका प्रासादतुल्य घरात राहायचे. ते घर अजूनही आहे आणि तिथे पर्यटक जातात. -
Jefferson
थॉमस जेफरसन- ३ रे अध्यक्ष (१८०१-१८०९) यांचे व्हर्जिनियातील मॉन्टेसिलो इस्टेट हे घर

याच घरातील एका खोलीत थॉमस जेफरसनचे उद्योग चालायचे.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2025 - 10:35 am | श्रीगुरुजी

धन्यवाद! खूपच छान माहिती.

शपथेच्या शेवटी So help me god असे म्हणतात की So help us god असे म्हणतात?

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Jan 2025 - 12:28 pm | चंद्रसूर्यकुमार

शपथेच्या शेवटी So help me god असे म्हणतात की So help us god असे म्हणतात?

अध्यक्ष शपथ घेताना So help me god असे शपथेच्या शेवटी म्हणतात help us असे नाही.

मुक्त विहारि's picture

20 Jan 2025 - 4:52 pm | मुक्त विहारि

वाखूसा..

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jan 2025 - 12:44 am | अमरेंद्र बाहुबली

मस्त मनोरंजक माहिती. अमरेकीचा अध्यक्ष म्हणजे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती नी शक्तिशाली पद. आणखी येऊद्या ही विनंती!
प्रेसिडेंट ह्या शब्दाचा अर्थ मराठीत अध्यक्ष कसा होतो?

कॉमी's picture

21 Jan 2025 - 10:23 am | कॉमी

मस्त लेख.
पुभाप्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2025 - 11:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. पुभाशु.

-दिलीप बिरुटे

चांगला उत्सुकतापूर्ण विषय आहे .चांगली माहिती मिळाली.

चौथा कोनाडा's picture

21 Jan 2025 - 11:57 am | चौथा कोनाडा

अ त्यंत अभ्यासपुर्ण लेख !
धन्यवाद चं सु कु !

जाणकार मिपाकरांच्या प्रतिसादाच्या आणि चर्चेच्या प्रतिक्षेत !

यश राज's picture

21 Jan 2025 - 1:36 pm | यश राज

मस्त लेख

आंद्रे वडापाव's picture

21 Jan 2025 - 1:55 pm | आंद्रे वडापाव

मोदीजी आणि मोदाणी , आता मागालँडला कधी भेट देतील ?

टर्मीनेटर's picture

21 Jan 2025 - 3:07 pm | टर्मीनेटर

आता मागालँडला कधी भेट देतील ?

८२ वर्षीय थेरडा 'जो 'बुढ्ढेन' पायउतार झाला आहे, 'डस्टबिन' ट्रूडोचा बाजार जवळपास उठल्यात जमा आहे, आता लवकरच 'बेग'दिमिर झेलेन्स्कीची घटिका भरली कि मोदी आणि अदानींच्या MAGA लँड भेटीसाठी चांगला मुहूर्त लाभेल असे भाकीत काही राजकीय ज्योतिषी वर्तवत आहेत. जॉर्ज सोरेस, त्याच्या आश्रित एनजिओज. त्यांचे कुत्र्यांपेक्षा जास्त ईमानी समर्थक आंदोलक/कार्यकर्ते आणि समस्त डाव्या डुकरांचा लवकरात लवकर बंदोबस्त होण्यासाठी का होईना पण त्या ज्योतिषांचा अंदाज खरा ठरावा अशी मनापासून ईच्छा आहे 😀

आंद्रे वडापाव's picture

21 Jan 2025 - 4:22 pm | आंद्रे वडापाव

:)

लैच अपेक्षा बॉ तुमच्या !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Jan 2025 - 8:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

२०२३ साली ४० हजार गुज्जुनी अमेरिकेत प्रवेश केला. त्याआधीही अनेक वर्षे साधारण हाच आकडा आहे. ट्रम्प ह्यांनी त्याना पुन्हा भारतात धाडायला चालु केले तर केंद्र सरकार आणी गुजरात सरकार स्वागतच करतील अशी अपेक्षा बाळगुया.कारण त्यांना कुणी वाचवायचा प्रयत्न केला तर त्यांची गणना डाव्या डुकरातच होणार आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Jan 2025 - 8:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ही संख्या झोल/अवैधरित्या जाणार्यांची आहे.

वामन देशमुख's picture

21 Jan 2025 - 3:27 pm | वामन देशमुख

चंसुकु व श्रीगुरुजी, दोघांचेही लेख व लेखमाला वाचत आहे. माहितीचा धबधबा वाहतोय!

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jan 2025 - 7:01 pm | अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरूजीना इथे ओढून पुन्हा लिहिते केल्याबद्दल मला शाबासकी द्या. :)

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Jan 2025 - 9:32 am | चंद्रसूर्यकुमार

मुद्दा ६
अमेरिकेचे आतापर्यंत आठ अध्यक्ष त्या पदावर असताना मरण पावले आहेत.

१. विलिअम हेनरी हॅरीसन १८४० ची निवडणुक जिंकून ४ मार्च १८४१ रोजी अध्यक्ष झाले. त्या दिवशी वॉशिंग्टन डी.सी मध्ये बर्फ पडला होता. तरीही त्यांनी ओव्हरकोट न घालता शपथ घेतली आणि त्यानंतर जवळपास दोन तासांचे आतापर्यंतचे सर्वाधिक मोठे अध्यक्षीय भाषण केले. तसेच अध्यक्ष झाल्यानंतर तीन आठवड्यांनी ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते तेव्हा जोरात पाऊस आला. त्यात ते भिजले तरी परतल्यावर त्यांनी ओले कपडे बदलले नाहीत. मुळात वयोमानानुसार त्यांची प्रकृती खंगलेली होतीच. त्याकाळी ६८ हे वय बरेच जास्त समजले जात असे. त्यामुळे त्यांना निमोनिया झाला. आणि अध्यक्ष झाल्यानंतर एक महिन्यात त्यांचे निधन झाले. त्यांचे उपाध्यक्ष जॉन टायलर हे अध्यक्षांचे निधन झाल्यानंतर स्वतः अध्यक्ष झालेले पहिले उपाध्यक्ष होते.
harrison
विलिअम हेनरी हॅरीसन (९ वे अध्यक्ष: १८४१)

२. झॅकेरी टेलर १८४८ ची निवडणुक जिंकून ४ मार्च १८४९ रोजी अध्यक्ष झाले. त्यांचे १८५० मध्ये पचनसंस्थेच्या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे उपाध्यक्ष मिलार्ड फिलमोर अध्यक्ष झाले.
Taylor
झॅकेरी टेलर (१२ वे अध्यक्षः १८४९-१८५०)

३. अ‍ॅब्रॅहॅम लिंकन १८६० आणि १८६४ ची निवडणुक जिंकून ४ मार्च १८६१ पासून अध्यक्ष होते. अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांना त्यांची गुलामगिरीविरोधातील धोरणे न पटलेल्या अभिनेत्याने, जॉन विल्क्स बूथने १४ एप्रिल १८६५ रोजी रात्री वॉशिंग्टनमधील फोर्ड थिएटरमध्ये गोळी घातली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी १५ एप्रिल १८६५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचे निधन झाले.हत्या झालेले ते पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांचे उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन अध्यक्ष झाले.
Lincoln
अ‍ॅब्रॅहॅम लिंकन (१६ वे अध्यक्षः १८६१-१८६५)

४. जेम्स गारफिल्ड १८८० ची निवडणुक जिंकून ४ मार्च १८८१ रोजी अध्यक्ष झाले. जुलै १८८१ मध्ये अध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांना वॉशिंग्टन डी.सी मधील एका रेल्वे स्थानकात गोळी घालण्यात आली. त्यांना गोळ्या घालणार्‍या चार्ल्स गिट्यूचा दावा होता की त्याने जेम्स गारफिल्डना १८८० च्या निवडणुकीत जिंकायला भरपूर मदत केली होती पण त्या बदल्यात त्याला अध्यक्षांकडून काहीही मिळाले नाही या रागातून त्याने अध्यक्षांना गोळी घातली. अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांचे पुत्र रॉबर्ट लिंकन गारफिल्ड यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. अध्यक्ष गारफिल्डना गोळी घातली तेव्हा ते त्याच रेल्वे स्टेशनवर होते. कदाचित अध्यक्षांना गोळी घातली जाताना त्यांनी बघितलेही असावे. आपल्या वडिलांना १६ वर्षांपूर्वी गोळी घालण्यात आल्यानंतर परत अध्यक्षांना गोळी घातली गेल्याने त्या घटनेचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला होता. जेम्स गारफिल्ड त्यानंतर सुमारे अडीच महिने होते. त्यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायक स्थितीत झाला. दरम्यान टेलिफोनचा शोध लावणारे अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी अगदी प्राथमिक मेटल डिटेक्टर तयार केला होता त्याचा वापर करून अध्यक्षांच्या शरीरात गोळी नक्की कुठे आहे हे तपासायचा प्रयत्न त्यांनी केला पण तो अयशस्वी ठरला. जेम्स गारफिल्ड यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे उपाध्यक्ष चेस्टर आर्थर अध्यक्ष झाले.
Garfield
जेम्स गारफिल्ड (२० वे अध्यक्ष: १८८१)

५. विलिअम मॅकिन्ली १८९६ आणि १९०० च्या निवडणुकांमध्ये जिंकले. सप्टेंबर १९०१ मध्ये ते न्यू यॉर्क राज्यात बफेलो या ठिकाणी एक औद्योगिक प्रदर्शन बघायला गेले असताना लिऑन झोलगोस्झ या मनुष्याने त्यांना गोळी घातली. त्यानंतर आठ दिवसांनी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे उपाध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट अध्यक्ष झाले.
McKinley
विलिअम मॅकिन्ली (२५ वे अध्यक्षः १८९७-१९०१)

६. वॉरन हार्डिंग १९२० च्या निवडणुकांमध्ये जिंकले. जुलै १९२३ मध्ये त्यांचे सॅन फ्रान्सिस्को येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या प्रशासनात भ्रष्टाचार बोकाळला होता. त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री अल्बर्ट फॉल यांना भ्रष्टाचाराबद्दल न्यायालयाने तुरूंगात धाडले. वॉरन हार्डिंगचे निधन झाल्यानंतर त्यांचे उपाध्यक्ष केल्व्हिन कूलीज अध्यक्ष झाले. असे म्हणतात की त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा त्यांना ताण आला आणि त्यातून त्यांचे निधन झाले. हे खरे होते की खोटे याविषयी आता काहीच सांगता येणार नाही. मात्र त्यांच्या प्रशासनात भ्रष्टाचार असला तरी अध्यक्षांची प्रतिमा चांगलीच राहिली. त्यांच्या अंत्यसंस्काराला हेनरी फोर्ड, थॉमस अल्वा एडिसन वगैरे दिग्गजही हजर होते.
Harding
वॉरन हार्डिंग (२९ वे अध्यक्षः १९२१-१९२३)

७. फ्रँकलीन रूझवेल्ट १९३२, १९३६, १९४० आणि १९४४ च्या निवडणुकांमध्ये जिंकले होते. ते २० जानेवारी १९३३ ते १२ एप्रिल १९४५ रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते अध्यक्ष होते. सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांचा आहे. एक चित्रकार त्यांचे चित्र काढत असताना ते खुर्चीत बसले होते. तेव्हा आपले डोके खूप दुखत आहे अशी तक्रार त्यांनी केली. त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे उपाध्यक्ष हॅरी ट्रुमन अध्यक्ष झाले.
Roosevelt
फ्रँकलीन रूझवेल्ट (३२ वे अध्यक्षः १९३३-१९४५)

८. जॉन केनेडी १९६० ची निवडणुक जिंकून २० जानेवारी १९६१ रोजी अध्यक्ष बनले. त्यांची २२ नोव्हेंबर १९६३ रोजी टेक्सस राज्यात डॅलस शहरात हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन अध्यक्ष झाले.
Kennedy
जॉन केनेडी (३५ वे अध्यक्ष: १९६१-१९६३)

Curse of Tippecanoe
अमेरिकन अध्यक्षांच्या मृत्यूविषयी एक गोष्ट (किंवा योगायोग किंवा अन्य जे काही असेल ते) ध्यानात घेणे गरजेचे आहे. झॅकेरी टेलरचा अपवाद वगळता त्या पदावर असताना मरण पावलेल्या अध्यक्ष २० च्या पटीत असलेल्या कॅलेंडर वर्षात नक्कीच निवडून गेले होते. विलिअम हेनरी हॅरीसन १८४० मध्ये, अ‍ॅब्रॅहॅम लिंकन १८६० मध्ये, जेम्स गारफिल्ड १८८० मध्ये, विलिअम मॅकिन्ली १९०० मध्ये, वॉरन हार्डिंग १९२० मध्ये, फ्रँकलीन रूझवेल्ट १९४० मध्ये तर जॉन केनेडी १९६० मध्ये. यामागे एक वदंता आहे. १८४१ मध्ये अल्पकाळासाठी अध्यक्ष झालेले विलिअम हेनरी हॅरीसन १८११ मध्ये अमेरिकेच्या सैन्यात असताना त्यांनी इंडियाना प्रदेशात (त्यावेळेस इंडियाना राज्य झाले नव्हते) टिप्पेकॅनो काऊंटीमध्ये मूलनिवासी अमेरिकन्सच्या सैन्याचा एका लढाईत पराभव केला होता. गोरे विरूध्द मूलनिवासी या लढाया अमेरिकेची स्थापना झाल्यापासून पहिली ७०-८० वर्षे चालू होत्या. त्या टिप्पेकॅनोच्या लढाईत विलिअम हेनरी हॅरीसनने शॉनी या मूलनिवासी अमेरिकन जमातीचे नेते टेकुमसेह आणि त्यांचे बंधू टेन्सकवटावा यांचा पराभव केला. त्यानंतर या टेन्सकवटावा यांनी 'मोठ्या गोर्‍या साहेबाला' शाप दिला आणि त्या शापामुळे २० ने भाग जाणार्‍या वर्षात निवडून गेलेले अध्यक्ष त्या पदावर असताना मरण पावले अशी वदंता आहे. त्या शापाला Curse of Tippecanoe म्हणतात.

तो शाप अजूनही चालू राहिला असता तर १९८० मध्ये निवडून गेलेले रॉनाल्ड रेगन, २००० मध्ये निवडून गेलेले जॉर्ज डब्ल्यू बुश आणि २०२० मध्ये निवडून गेलेले जो बायडन यांच्या जीवाला धोका उत्पन झाला असता. तसे झाले का? ते बघू पुढील मुद्द्यात शुक्रवारी २४ जानेवारी २०२५ रोजी.

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Jan 2025 - 10:24 am | चंद्रसूर्यकुमार

मागच्या मुद्द्यात आपण Curse of Tippecanoe म्हणजे काय हे बघितले आणि १८४० ते १९६० या काळात प्रत्येक २० ने भाग जाणार्‍या वर्षात निवडून गेलेले अध्यक्ष त्या पदावर असताना मरण पावले होते हे बघितले. तो शाप समजा नंतरही सुरू राहिला असता तर १९८० मध्ये निवडून गेलेले रॉनाल्ड रेगन, २००० मध्ये निवडून गेलेले जॉर्ज डब्ल्यू बुश आणि २०२० मध्ये निवडून गेलेले जो बायडन यांच्या जीवाला धोका उत्पन व्हायला हवा होता. तसे झाले का?

१९८० मध्ये अध्यक्षीय निवडणुकांमध्ये लढत झाली होती तत्कालीन अध्यक्ष डेमॉक्रॅटिक पक्षाचे जिमी कार्टर आणि त्यांना आव्हान देणारे रिपब्लिकन पक्षाचे रॉनाल्ड रेगन यांच्यात. मतदानाला एक महिना राहिलेला असताना ओहायो राज्यात डेटन या शहरात 'ओपन हाऊस' कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष जिमी कार्टर यांना त्या शापाविषयी विचारले गेले आणि तुम्ही त्यामुळे चिंतीत आहात का असा प्रश्न विचारला गेला. त्यावर कार्टर म्हणाले की त्या शापाविषयी मी वाचले आहे. तसे काही होणारच असेल तरीही मी अध्यक्ष नक्कीच बनेन आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अध्यक्ष म्हणून शक्य तितके चांगले काम करेन. अर्थातच निवडणुकीच्या तोंडावर 'हो मी त्या शापाला घाबरलो आहे' असे कार्टरना (किंवा अन्य कोणालाही) जाहीरपणे म्हणता येणे शक्यच नव्हते. तसे म्हटले असे तर ती राजकीय आत्महत्याच ठरली असती. त्यातूनही ते 'माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही- ती एक अंधश्रध्दा आहे' असे म्हणाले नव्हते. त्यामुळे कार्टर जे काही म्हणाले तसे म्हणाले असले तरी ते कितपत 'पोस्चरींग' होते आणि कितपत मनापासून म्हणाले होते याची कल्पना नाही. असो.

रॉनाल्ड रेगन (४० वे अध्यक्षः १९८१-१९८९)

तर १९८० च्या निवडणुकांमध्ये रॉनाल्ड रेगन यांनी जिमी कार्टर यांचा धुव्वा उडवला. इलेक्टोरल कॉलेजमधील ५३८ पैकी ४८९ मते रेगनना मिळाली होती. त्यानंतर २० जानेवारी १९८१ रोजी रेगन अध्यक्षपदावर विराजमान झाले. त्यानंतर दोन महिन्यात म्हणजे ३० मार्च १९८१ रोजी अध्यक्ष रेगन यांचे वॉशिंग्टन डी.सी मधील हिल्टन हॉटेलमध्ये एक भाषण होते. ते भाषण संपवून ते व्हाईट हाऊसला परत जायला म्हणून हॉटेलमधून बाहेर पडले. ते त्यांच्या लिमोझीनजवळ गेले असताना जॉन हिंकली जुनिअर नावाच्या मनुष्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी लिमोझीनला घासल्याने थोडी दिशा बदलून अध्यक्षांच्या डाव्या हाताखाली लागली. त्यात त्यांची एक बरगडी जायबंदी झाली आणि फुफ्फुसाचे थोडे नुकसान झाले. या घटनेनंतर जॉन हिंकली जुनिअरला लगेच पकडले गेले. अध्यक्ष जखमी झाले असले तरी ते स्वतःच्या पायाने चालत हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी/इमरजन्सी विभागात गेले खरे पण अंतर्गत रक्तस्त्राव बराच झाला होता आणि त्यावेळेस ते मृत्यूच्या बरेच जवळ गेले होते. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ११ एप्रिलला त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.

जॉन हिंकली जुनिअरने अध्यक्षांच्या दिशेने केलेल्या गोळीबारात व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेम्स ब्रॅडी, अध्यक्षांच्या सिक्रेट सर्व्हिसचे टिमोथी मॅकार्थी आणि वॉशिंग्टन डी.सी पोलिस विभागाचे थॉमस डेलहांटी हे तिघे जखमी झाले. तिघेही वाचले मात्र जेम्स ब्रॅडींच्या मेंदूला दुखापत झाली आणि ते कायमचे अपंग झाले. त्यांचे २०१४ मध्ये निधन झाले तेव्हा त्यापूर्वीच्या ३३ वर्षांपैकी बराचसा काळ ते कोमात होते :( या घटनेनंतर अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर १९९३ मध्ये अल्प प्रमाणावर 'गन कंट्रोल' कायदा संमत झाला त्याला 'ब्रॅडी हँडगन व्हायोलन्स प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट' असे म्हणतात आणि त्या कायद्याला जेम्स ब्रॅडींचे नाव देण्यात आले.

बरं जॉन हिंकलीने अध्यक्षांवर हल्ला का केला? त्याचे कारण त्याने १९७६ मध्ये जोडी फोस्टर नावाच्या हॉलीवूड नायिकेचा टॅक्सी ड्रायव्हर हा चित्रपट बघितला आणि त्यानंतर तो वेड्यासारखा तिच्या प्रेमात पडला. त्याने तिला कित्येक पत्रे लिहिली होती पण एकाही पत्राचे उत्तर तिने दिले नाही. म्हणून तिला 'इंप्रेस' करायला काहीतरी अचाट करून दाखवायला तो निघाला. आणि ते अचाट काय होते? तर थेट अमेरिकेच्या अध्यक्षांची हत्या करायची!!

hinckley
जॉन हिंकली जुनिअर

jodie
टॅक्सी ड्रायव्हर चित्रपटात जोडी फोस्टर

जॉन हिंकली जुनिअरचे पुढे काय झाले? त्याला मृत्यूदंड झाला का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. तो मनोरूग्ण असल्याने एका हॉलीवूड अभिनेत्रीवरील एकतर्फी प्रेमातून त्याने ते कृत्य केले हे न्यायालयाला पटवून देण्यात त्याच्या वकिलांना यश आले. त्यामुळे त्याला तुरूंगात न पाठवता मनोरूग्णालयात पाठविले गेले. तो अजूनही आहे. सध्या त्याचे वय ७० आहे. तो एक चांगला कलाकार आहे. २०१६ पर्यंत तो त्याची कला आपले नाव गोपनीय ठेऊन प्रसिध्द करत असे. २०१६ मध्ये तो आता स्वतःला आणि अन्य कोणालाही धोका पोचवायच्या स्थितीत नाही हे लक्षात आल्यावर त्याला मनोरूग्णालयातून सोडण्यात आले आणि त्याला आपली कला स्वतःच्या नावाने प्रसिध्द करायची परवानगी देण्यात आली. तरीही त्याच्यावर एजन्सीच्या लोकांची नजर होती. २०२२ मध्ये त्याच्यावरील सगळे निर्बंध काढण्यात आले. तो आपला स्वतःचा John Hinckley नावाचा युट्यूब चॅनल चालवतो आणि त्यावर आपले गिटार वाजवतानाचे व्हिडिओ त्याने टाकले आहेत (https://www.youtube.com/@johnhinckley6860)

रॉनाल्ड रेगन यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे. ते https://youtu.be/N1Jid5uRFo4?si=zqJeAAWHh2jeOzhp वर एका ५ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये बघता येईल.

९ ऑक्टोबर १९८० रोजी अध्यक्ष जिमी कार्टर टेन्नेसी राज्यात नॅशव्हिलला गेलेले असताना जॉन हिंकलीला नॅशव्हिल विमानतळावर बंदुकांसह अटक करण्यात आली होती. आणि त्याला ५० डॉलरचा दंड ठोठावून त्याला सोडून देण्यात आले होते. अमेरिकेत असलाही ढिसाळपणा असतो.

रॉनाल्ड रेगनवर १९८५ मध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती या गोळीबाराशी संबंधित कारणाने नव्हती. भविष्यात कर्करोग होऊ शकेल या कारणाने त्यांच्या आतड्याचा काही भाग काढण्यात आला होता. त्यावेळेस ते ७४ वर्षांचे होते. तेव्हा त्यांची पत्नी नॅन्सी रेगन यांनी आपल्या पतीचे त्या शापापासून रक्षण करण्यासाठी काही psychics आणि ज्योतिषी बोलावले होते असे म्हणतात. नॅन्सी आणि रॉनाल्ड रेगन हे व्हाईट हाऊसमधील वैवाहिक जीवनात सगळ्यात सुखी जोडपे होते असे म्हणायला हवे. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि ते एकमेकांना अगदी पूर्ण समर्पित होते.

जॉर्ज डब्ल्यू बुश (४३ वे अध्यक्षः २००१-२००९)
जॉर्ज डब्ल्यू बुशच्या हत्येचा प्रयत्न झाला होता पण तो रेगनच्या हत्येच्या प्रयत्नाइतका नाट्यमय नव्हता. जॉर्जियाची राजधानी बिलसी (Tbilisi) या ठिकाणी ते आणि जॉर्जियाचे अध्यक्ष मिखाईल साकाश्व्हिली एका कार्यक्रमात भाषण करणार होते तेव्हा तिथे एक ग्रेनेड फेकण्यात आला होता. तो ग्रेनेड व्यासपीठापासून १९ मीटरवर पडला आणि फुटला नाही.

जो बायडन (४६ वे अध्यक्षः २०२१-२०२५)
माजी अध्यक्ष जो बायडन यांच्या वयोमानानुसार प्रकृतीच्या बर्‍याच तक्रारी होत्या. मात्र त्यांना जीवाला धोका उत्पन्न होईल असे काही झाले नाही.

समजा अध्यक्ष त्या पदावर असताना मरण पावला तर पुढे कोण अध्यक्ष होते? तर अर्थात उपाध्यक्ष. समजा उपाध्यक्षांचीही हत्या झाली (जसे लिंकनबरोबरच उपाध्यक्ष अ‍ॅंड्र्यू जॉन्सन यांच्याही हत्येचा कट होता) तर मग पुढे कोण अध्यक्ष होते? ते बघू पुढील मुद्द्यात रविवारी २६ जानेवारी २०२५ रोजी.

मुक्त विहारि's picture

24 Jan 2025 - 10:33 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jan 2025 - 1:02 pm | अमरेंद्र बाहुबली

छान माहिती.

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Jan 2025 - 10:30 am | चंद्रसूर्यकुमार

आतापर्यंत आपण बघितले की ८ अध्यक्षांच्या पदावर असताना मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या उपाध्यक्षांनी अध्यक्ष म्हणून कार्यभार स्विकारला. तसेच ३७ वे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी वॉटरगेट प्रकरणात आपल्याला समर्थन द्यायला आपल्याच पक्षाचे फार थोडे संसद सदस्य बाकी राहिले असल्याने आपण नक्कीच इम्पीच होणार हे लक्षात घेऊन ८ ऑगस्ट १९७४ रोजी राजीनामा देत आणि तो राजीनामा दुसर्‍या दिवशी दुपारी १२ पासून अंमलात येईल अशी घोषणा केली. ९ ऑगस्ट १९७४ रोजी उपाध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांनी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. १४ एप्रिल १८६५ रोजी १६ वे अध्यक्ष अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांच्यावर गोळी झाडली गेली आणि त्यांचे दुसर्‍या दिवशी सकाळी १५ एप्रिल रोजी निधन झाले. अध्यक्षांवर गोळी झाडली गेली तेव्हा उपाध्यक्ष अ‍ॅंड्र्यू जॉन्सन यांचीही हत्या करायचा कट होता. पण आयत्या वेळेस उपाध्यक्षांवर हल्ला करायचे धाडस संबंधित व्यक्तीला झाले नाही म्हणून ते बचावले. समजा उपाध्यक्षांचीही हत्या झाली असती तर एकाच वेळेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोघेही मरण पावले अशी स्थिती आली असती. अशा परिस्थितीत कोण अध्यक्ष बनणार? याविषयी पहिला कायदा १७९२ मध्ये करण्यात आला. त्यात १८८६ आणि १९४७ मध्ये बदल करण्यात आले. त्या कायद्याप्रमाणे पुढील 'Order of succession' आणण्यात आली.

अध्यक्ष काही कारणाने पदावरून दूर झाल्यास (मृत्यू, इम्पीच झाल्यास, राजीनामा वगैरे) पुढील क्रमाने व्यक्ती अध्यक्ष बनतील-
१. उपाध्यक्ष
२. हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हचे सभापती
३. सिनेटचे प्रेसिडेंट प्रो टेम्पोर (उपाध्यक्ष सीनेटचे पदसिध्द अध्यक्ष असतात. त्यांच्या अनुपस्थितीत सिनेटचे कामकाज प्रेसिडेंट प्रो टेम्पोर चालवतात).
४. सेक्रेटरी ऑफ स्टेट (परराष्ट्रमंत्री)
५. सेक्रेटरी ऑफ ट्रेजरी (अर्थमंत्री)
६. सेक्रेटरी ऑफ डिफेन्स (संरक्षणमंत्री)
७. अ‍ॅटर्नी जनरल
८. सेक्रेटरी ऑफ इंटिरिअर (हे गृहमंत्र्यांना समकक्ष नसतात. यांची जबाबदारी केंद्र सरकारच्या मालकीची जमिन तसेच नैसर्गिक स्त्रोतांचे रक्षण, जिऑलॉजिकल सर्व्हे, नॅशनल पार्क वगैरे सांभाळणे हे असते)
९. सेक्रेटरी ऑफ अ‍ॅग्रीकल्चर (कृषीमंत्री)
१०. सेक्रेटरी ऑफ कॉमर्स (वाणिज्यमंत्री)
११. सेक्रेटरी ऑफ लेबर (कामगारमंत्री)
१२. सेक्रेटरी ऑफ हेल्थ अ‍ॅन्ड ह्युमन सर्व्हिसेस (आरोग्यमंत्री)
१३. सेक्रेटरी ऑफ हाऊसिंग अ‍ॅन्ड अर्बन डेव्हलेपमेंट
१४. सेक्रेटरी ऑफ ट्रान्सपोर्टेशन (दळणवळणमंत्री- नितीन गडकरींना समकक्ष)
१५. सेक्रेटरी ऑफ एनर्जी (उर्जामंत्री)
१६. सेक्रेटरी ऑफ एज्युकेशन (शिक्षणमंत्री)
१७. सेक्रेटरी ऑफ व्हेटेरन अफेअर्स (माजी सैनिकांचे कल्याण)
१८. सेक्रेटरी ऑफ होमलँड सेक्युरीटी

या कायद्यात वेळोवेळी बदल केले गेले आहेत. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरीटी ९/११ च्या हल्ल्यांनंतर अध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी अस्तित्वात आणले. ३६ वे अध्यक्ष लिंडन जॉन्सन (१९६३-१९६९) यांनी अमेरिकेतील गरीबीविरूध्द युध्द पुकारले होते (वॉर ऑन पॉवर्टी) आणि त्याच्या अंतर्गत लोकांना स्वस्तातील घरे अमेरिका सरकारकडून उपलब्ध करून दिली जायला सुरवात झाली. मला वाटते सेक्रेटरी ऑफ हाऊसिंग अ‍ॅन्ड अर्बन डेव्हलपमेंट हे पद त्यानंतर अस्तित्वात आले. अशी नवी पदे अस्तित्वात आल्यावर त्यांचा समावेश या 'Order of succession' मध्ये करण्यात आला.

म्हणजे ही १८ जणांची लांबलचक यादी आहे. अध्यक्ष आणि सगळेच्या सगळे १८ लोक एकाच वेळेस गारद होतील ही शक्यता फारच थोडी. त्यामुळे अमेरिकेत सरकार अस्तित्वात नाही ही वेळ येणे प्रॅक्टिकली शक्य नाही. तरीही अशी वेळ येऊ शकते का? तर तांत्रिकदृष्ट्या येऊ शकते. अध्यक्ष दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'स्टेट ऑफ द युनियन' हे भाषण संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे करतात. अध्यक्ष केवळ तेव्हाच संसदेत जातात. भारतात पंतप्रधान आणि मंत्री संसदेत उपस्थित असतात तसे अमेरिकेत नसते. त्या स्टेट ऑफ द युनियन भाषणाला हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्ह्जचे सगळे ४३५ सदस्य, सीनेटचे सगळे १०० सदस्य आणि सगळे मंत्रीमंडळ अमेरिकन संसदेच्या इमारतीत (वॉशिंग्टन डी.सी मधील कॅपिटॉल इमारत) हजर असतात. अशावेळेस समजा काही घातपात घडला- दहशतवादी हल्ला, भूकंप, आग किंवा अन्य कोणतेही कारण तर सगळे लोक मारले जाऊन देशात अराजक माजू शकते. तसे व्हायला नको म्हणून या १८ जणांपैकी एक 'डेजिग्नेटेड सर्व्हायव्हर' बनविला जातो आणि संबंधित व्यक्ती स्टेट ऑफ द युनियन भाषणाला उपस्थित राहात नाही. सरकारी यंत्रणा त्या व्यक्तीला वॉशिंग्टन डी.सी मध्ये अज्ञात ठिकाणी घेऊन जातात. समजा काही घातपात घडला आणि कॅपिटॉल इमारतीत सगळेच्या सगळे मारले गेले तर 'डेजिग्नेटेड सर्व्हायव्हर' अध्यक्ष बनणार अशी व्यवस्था आहे. २००९ पासून अध्यक्षांच्या शपथग्रहण समारंभालाही असा 'डेजिग्नेटेड सर्व्हायव्हर' ठेवला जातो. आतापर्यंत एकदाही 'डेजिग्नेटेड सर्व्हायव्हर' ला अध्यक्ष बनायची वेळ सुदैवाने आलेली नाही.

नेटफ्लिक्सवर 'डेजिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणून एक वेबसिरीज नेमक्या याच कल्पनेवर आधारीत आहे. अध्यक्षांच्या अशाच स्टेट ऑफ द युनियन भाषणाच्या वेळेस कॅपिटॉल इमारतीवर दहशतवादी हल्ला होतो आणि अध्यक्षांसह तिथे हजर असलेले सगळे लोक मारले जातात. मग 'डेजिग्नेटेड सर्व्हायव्हर' बनलेले सेक्रेटरी ऑफ हाऊसिंग अ‍ॅन्ड अर्बन डेव्हलपमेंट ध्यानीमनी नसताना अध्यक्ष होतात. त्या वेबसिरीजचे मी १५ भाग बघितले पण नंतर काल्पनिक गोष्टी अती ताणल्या जायला लागल्या असे वाटल्याने कंटाळून पुढेचे भाग आणि सिझन बघितले नाहीत.

आता आणखी एक प्रश्न- अध्यक्षांचे समजा निधन झाले किंवा त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना इम्पीच करून पदावरून काढले गेले तर 'त्या' १८ जणांपैकी उपाध्यक्ष नाही तर पुढचे लोक त्या क्रमाने अध्यक्ष बनतील हे ठीक आहे. पण समजा अध्यक्ष हयात असतील पण आपले काम बघण्यास अक्षम असतील तर? २२ नोव्हेंबर १९६३ रोजी जॉन केनेडींवर हल्ला झाला त्यात ते मरण पावले. पण समजा ते जखमी झाले असते/ कोमात गेले असते तर? कोमात माणूस काही दिवसांपासून कित्येक वर्षे पण राहू शकतो. अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांची हत्या झाली त्यापूर्वी त्यांचे अपहरण करायचाही बेत होता. त्यावेळेस अध्यक्षांची सुरक्षाव्यवस्था अगदीच ढिसाळ होती. अध्यक्ष एकटे सुध्दा घोड्यावरून वॉशिंग्टन डी.सी मध्ये फिरायचे. अशावेळेस त्यांचे अपहरण होणे अगदी अशक्य नव्हते. आताच्या काळात असे होणे अशक्य. पण तांत्रिकदृष्ट्या तसे समजा झाले तर? म्हणजे अध्यक्ष हयात आहेत पण आपला कार्यभार बघण्यास सक्षम नाहीत. अशावेळेस काय करायचे? ते बघू पुढील प्रतिसादात मंगळवारी २८ जानेवारी रोजी.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jan 2025 - 6:38 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. माहितीची गंगाच वाहतेय जणू!

चंद्रसूर्यकुमार's picture

28 Jan 2025 - 7:59 pm | चंद्रसूर्यकुमार

याविषयी एक राहिलेला मुद्दा म्हणजे अध्यक्षांनंतर उपाध्यक्ष आणि इतर १७ जणांची त्या क्रमाने 'Order of succession' ची यादी आहे. त्यापैकी कोणीही समजा कोणत्याही कारणाने अध्यक्ष बनायला पात्र नसेल तर ती व्यक्ती त्या पदावर राहू शकते पण वेळ पडल्यास अध्यक्षपदावर जाणार नाही तर त्या १८ जणांच्या यादीतील त्यापुढील क्रमांकावरील व्यक्ती अध्यक्ष बनेल. उदाहरणार्थ चौथ्या क्रमांकावर सेक्रेटरी ऑफ स्टेट (परराष्ट्रमंत्री) आहेत. बिल क्लिंटन यांच्या दुसर्‍या कारकिर्दीत सेक्रेटरी ऑफ स्टेट पदावर मॅडेलाईन अलब्राईट होत्या. त्या जन्माने अमेरिकन नागरिक नव्हत्या. त्यांचा जन्म प्रागचा (झेकोस्लाव्हाकिया). त्यामुळे 'Order of succession' मध्ये चौथ्या क्रमांकाचे (आणि अध्यक्षांनंतर पाचव्या क्रमांकाचे) पद भूषवत असल्या तरी वेळ पडली असती तर त्या अध्यक्ष बनू शकल्या नसत्या आणि सेक्रेटरी ऑफ ट्रेजरी (अर्थमंत्री) रॉबर्ट रूबिन (१९९९ पर्यंत) किंवा लॅरी समर्स (१९९९ पासून) यांना अध्यक्षपद मिळाले असते. तीच गोष्ट १९७३ ते १९७७ या काळातील सेक्रेटरी ऑफ स्टेट हेनरी किसिंजर यांची. त्यांचा जन्म जर्मनीतला असल्याने ते जन्माने अमेरिकन नागरिक नव्हते त्यामुळे अध्यक्षपद त्यांना न मिळता सेक्रेटरी ऑफ ट्रेजरीला मिळाले असते.

टर्मीनेटर's picture

26 Jan 2025 - 2:22 pm | टर्मीनेटर

'ऑनगोईंग' धागा फॉलो करतोय... प्रतिसादांतुनही चांगली माहिती मिळत आहे.
मला ह्या विषयांत फारसा रस नसला तरी कधी संदर्भाची गरज पडल्यास हा माहितीपुर्ण धागा नक्कीच उपयोगी पडेल म्हणुन वाचनखुण साठवुन ठेवली आहे.
धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

5 Feb 2025 - 2:02 am | मुक्त विहारि

सेम हियर..

वाखूसा

diggi12's picture

26 Jan 2025 - 5:17 pm | diggi12

माहितीपूर्ण धागा

माहितीपूर्ण धागा; उत्कंठावर्धक प्रतिसाद!

सौंदाळा's picture

28 Jan 2025 - 10:13 am | सौंदाळा

वाचतोय

मुद्दा ९- अध्यक्ष हयात असतील पण समजा आपला कार्यभार सांभाळण्यास अक्षम असतील तर?

अमेरिकन संसदेत राज्यघटनेत २५ वी घटनादुरूस्ती करायचे विधेयक १९६५ मध्ये मांडले गेले आणि १९६७ मध्ये ती घटनादुरूस्ती मान्य करण्यात आली. ती घटनादुरूस्ती आणायचे कारण होते जॉन केनेडींची त्यापूर्वी काही काळ झालेली हत्या. अध्यक्षांचा मृत्यूच झाला तर प्रश्न नाही. त्या जागेवर उपाध्यक्ष जातील. ठीक आहे. पण समजा अशा हल्ल्यात अध्यक्ष जबर जखमी झाले असते किंवा कोमात गेले असते तर? म्हणजे अध्यक्ष हयात तर आहेत पण ते आपला कार्यभार सांभाळण्यास अक्षम आहेत. अशावेळेस उपाध्यक्ष अध्यक्ष बनू शकत नव्हता कारण अध्यक्ष हयात होते. आणि स्वतः अध्यक्ष आपले काम बघायच्या स्थितीत नसल्याने सगळेच काम अडणार. अशा स्थितीत काय करावे याविषयी ही घटनादुरूस्ती आहे.

अशावेळेस समजा उपाध्यक्ष आणि मंत्रीमंडळातील बहुसंख्य सदस्यांनी हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्ह्जचे अध्यक्ष (स्पीकर) आणि सीनेटचे प्रो-टेम स्पीकर (उपाध्यक्ष सीनेटचे पदसिध्द अध्यक्ष असतात- जसे आपले उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष असतात. त्यांच्या अनुपस्थितीत सीनेटचे कामकाज हे प्रो-टेम स्पीकर चालवतात) यांना लिखित स्वरूपात कळविले की अध्यक्ष आपला कार्यभार सांभाळण्यास अक्षम आहेत तर उपाध्यक्ष कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम बघू शकतात. २५ वी घटनादुरूस्ती (सेक्शन ४) चा वापर उपाध्यक्षांनी मंत्रीमंडळातील बहुसंख्य सदस्यांच्या मदतीने केला तर अध्यक्ष पदच्युत होत नाहीत. ते अध्यक्षपदावरच राहतात. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष अध्यक्षांचे सगळे अधिकार वापरू शकतात.

आता उपाध्यक्ष असे कार्यवाहक अध्यक्ष बनले तर ते किती काळ त्या पदावर राहतील? तर अध्यक्षांच्या उरलेला कार्यकाळ संपेपर्यंत. अध्यक्षांचा कार्यकाळ संपायच्या अडीच महिने आधी ठरल्याप्रमाणे निवडणुक होईल आणि नवे अध्यक्ष निवडले जातील. मधल्या काळात समजा अध्यक्ष आपला कार्यभार सांभाळण्यास परत सक्षम झाले तर? म्हणजे समजा जखमी झालेले/कोमात गेलेले अध्यक्ष त्या स्थितीतून बाहेर आले आणि आपला कार्यभार बघायच्या स्थितीत गेले तर काय होईल? अशा परिस्थितीत अध्यक्षांनी हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्ह्जचे अध्यक्ष (स्पीकर) आणि सीनेटचे प्रो-टेम स्पीकर यांना लिखित स्वरूपात आपण परत आलो आहोत आणि कार्यभार सांभाळण्यास सक्षम झालो आहोत असे कळवायचे. त्यानंतर चार दिवसात अध्यक्ष आपले अधिकार परत वापरायला सुरवात करू शकतात आणि कार्यकारी अध्यक्ष झालेले उपाध्यक्ष परत आपल्या उपाध्यक्ष पदावर परत जातात. समजा मधल्या चार दिवसात कार्यकारी अध्यक्ष असलेले उपाध्यक्ष आणि मंत्रीमंडळातील बहुसंख्य सदस्यांनी अध्यक्ष अजूनही आपला कार्यभार बघायला सक्षम झालेले नाहीत असा आक्षेप घेतला तर प्रकरण संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे जाणार. त्यापुढील २१ दिवसात दोन्ही सभागृहांनी दोन-तृतियांश बहुमताने अध्यक्ष पुरेसे सक्षम झालेले नाहीत असा निवाडा दिला तर अध्यक्ष परत आपल्या अधिकारांचा वापर करू शकणार नाहीत आणि उपाध्यक्षच कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम बघतील.

६ जानेवारी २०२१ रोजी सीनेटमध्ये २०२० च्या निवडणुकीतील इलेक्टोरल कॉलेजमधील मते मोजली जाणार होती आणि अध्यक्ष ठरणार होता. त्यावेळी डॉनल्ड ट्रम्प समर्थकांनी तो निकाल फिरवायच्या उद्देशाने कॅपिटॉल इमारतीवर हल्ला केला आणि त्यामागे स्वतः ट्रम्प होते हे लपून राहिले नव्हते. तो नक्कीच अश्लाघ्य प्रकार होता. तेव्हा उपाध्यक्ष माईक पेन्स सीनेटचे पदसिध्द अध्यक्ष या नात्याने मतमोजणी करणार होते. त्यांनाही तो प्रकार पसंत पडला नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर उघडपणे जो बायडन-कमला हॅरीसचे पोस्टर लावले होते. त्यावेळेस वाचले होते की उपाध्यक्ष माईक पेन्सवर दबाव होता की २५ वी घटनादुरूस्ती (सेक्शन ४) वापरून अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची मनस्थिती ठीक राहिली नसल्याने ते कार्यभार बघण्यास सक्षम राहिलेले नाहीत या कारणाने स्वतः अध्यक्षपदाची सुत्रे हाती घ्यावीत. पण समजा ट्रम्प यांची मनस्थिती ठीक राहिली नाही हे कारण दिले असते तर त्यांच्यावर या कारणाने नंतर खटला चालवता आला नसता. बहुदा त्या कारणाने उपाध्यक्षांनी तसे करायला नकार दिला असे वाटते.

अमेरिकेच्या अध्यक्षांची निवड इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य करतात हे सगळ्यांनाच माहित आहे. इलेक्टोरल कॉलेजमध्ये ५३८ सदस्य असतात. समजा २६९-२६९ अशी बरोबरी झाल्यास अध्यक्ष कसा निवडतात? असे आतापर्यंत कधी झालेले नाही. ते आपण मुद्दा क्रमांक ११ मध्ये बघू. त्यापूर्वी एक महत्वाचा मुद्दा बघावा लागेल आणि तो म्हणजे १८०० सालच्या निवडणुकांनंतरची परिस्थिती. त्या परिस्थितीमुळे आताची पध्दत अस्तित्वात आली. त्यापूर्वीही इलेक्टोरल कॉलेज होते पण वेगळ्या स्वरूपात. ते नक्की कसे होते आणि १८०० साली अध्यक्षीय निवडणुकांमध्ये नक्की काय झाले होते हे आपण बघू मुद्दा क्रमांक १० मध्ये गुरूवार ३० जानेवारी २०२५ रोजी.

सोत्रि's picture

29 Jan 2025 - 9:45 am | सोत्रि

अत्यंत माहितीपूर्ण लेख!

लेखाऐवजी प्रत्येक मुद्याचा एक लेख करून लेखमाला केली असती तर बरं झालं असत.

- (पुढील मुद्याच्या प्रतिक्षेत असलेला) सोकाजी

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Jan 2025 - 10:44 am | चंद्रसूर्यकुमार

मुद्दा १०- १७९६ ची अध्यक्षीय निवडणुक

अमेरिकेत सगळ्यात पहिली अध्यक्षीय निवडणुक झाली १७८८-८९ मध्ये आणि दुसरी अध्यक्षीय निवडणुक झाली १७९२ मध्ये. दोन्ही निवडणुकांमध्ये अध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन आणि उपाध्यक्ष म्हणून जॉन अ‍ॅडम्स बिनविरोध निवडून आले. १७९६ ची निवडणुक ही खर्‍या अर्थाने पहिली निवडणुक होती कारण त्यात एकापेक्षा अधिक उमेदवार होते.

पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. मात्र त्यांच्या अध्यक्षकाळात विचारसरणीप्रमाणे दोन पक्ष उदयास आले. पहिला पक्ष होता फेडरेलिस्ट तर दुसरा पक्ष होता डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष. फेडरेलिस्ट पक्ष मते केंद्र सरकारला अधिक अधिकार द्यायच्या बाजूने होता तर डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष राज्यांना अधिक अधिकाय द्यायच्या बाजूने होता. फेडरेलिस्ट पक्षात उपाध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स आणि पहिले अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टन होते तर डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षात थॉमस जेफरसन आणि जेम्स मेडिसन हे 'फाऊंडिंग फादर्स' पैकी दोघे. १७८५ ते १७८९ या काळात अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी थॉमस जेफरसनना अमेरिकेचे फ्रान्समधील राजदूत म्हणून नेमले होते. १७८९ मध्ये पहिले सरकार स्थापन होताना वॉशिंग्टन यांनी थॉमस जेफरसनना अमेरिकेत परत बोलावून आपल्या पहिल्या मंत्रीमंडळात परराष्ट्रमंत्री नेमले. थॉमस जेफरसन १७८५ ते १७८९ म्हणजे फ्रान्समधील राज्यक्रांती व्हायच्या आधीच्या काळात फ्रान्समध्ये होते. त्यांनी तिकडचे वातावरण स्वतः बघितले होते. त्यामुळे ते फ्रेंच राज्यक्रांतीच्या बाजूचे होते. एकूणच ते फ्रान्सच्या बाजूचे अधिक होते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात फ्रान्सने अमेरिकेला केलेल्या मदतीची जाण ठेऊन अमेरिका सरकार फ्रान्सच्या बाजूचे असावे असे त्यांचे मत होते. तर आपण मूळचे ब्रिटिशच आहोत त्यामुळे आपण इंग्लंडच्या बाजूचे असावे असे अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टन यांचे मत होते. १८ व्या शकतात युरोपात इंग्लंड आणि फ्रान्स हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी देश होते. त्याचे प्रतिबिंब अमेरिकेच्या राजकारणातही उमटले.

या मुद्द्याबरोबरच आणखी मतभेदाचे दोन मुद्दे होते- पहिला मुद्दा हा अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टन यांचे मत होते राज्यांचे कर्ज केंद्र सरकारने आपल्या डोक्यावर घ्यावे. हे फेडरेलिस्ट अजेंड्याला साजेसे होते. तर त्याला राज्यांना अधिक अधिकार असावेत या मताच्या थॉमस जेफरसन यांचा विरोध होता. दुसरा मुद्दा होता नव्या देशाची राजधानी कुठे असावी. अलेझांडर हॅमिल्टन यांच्या मते राजधानी उत्तर पूर्वेतील मोठी शहरे न्यू यॉर्क, बॉस्टन, फिलाडेल्फिया या भागात कुठेतरी असावी. तर थॉमस जेफरसन यांच्या मते (अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचेही तेच मत होते) राजधानी थोडी दक्षिणेला व्हर्जिनियाजवळ असावी. शेवटी १७९० मध्ये तडजोड झाली आणि राज्यांच्या कर्जाविषयी अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टन यांचे मत तर राजधानीविषयी थॉमस जेफरसन यांचे मत ग्राह्य धरावे. त्याप्रमाणे पोटोमॉक नदीच्या किनारी नव्या राजधानीचे काम सुरू झाले. १७९० ची तडजोड झाली तरीही राज्यांच्या कर्जाच्या मुद्द्यावरून थॉमस जेफरसन आणि अलेक्झांडर हॅमिल्टन यांच्यातील मतभेद कायम राहिले. शेवटी एक वेळ अशी आली की अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांना थॉमस जेफरसनना मंत्रीमंडळातून काढावे असे वाटू लागले. त्यानंतर जेफरसन यांनी स्वतःच राजीनामा दिला. त्यानंतर १७९३-९४ च्या सुमारास थॉमस जेफरसन आणि त्यांचे सहकारी जेम्स मेडिसन यांनी डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली.

१७९६ च्या तिसर्‍या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी तिसर्‍या टर्मसाठी आपल्याला स्वारस्य नसल्याने आपण निवडणुक लढविणार नाही असे जाहीर केले. त्यामुळे फेडरेलिस्ट पक्षातर्फे पहिले उपाध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स आणि साऊथ कॅरोलायनाचे माजी गव्हर्नर थॉमस पिंकनी यांना उमेदवारी दिली गेली तर डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षातर्फे थॉमस जेफरसन आणि न्यू यॉर्कचे सिनेटर अ‍ॅरन बर यांना उमेदवारी दिली गेली.

१७९६ च्या निवडणुकांमध्ये आणि आता होतात त्या निवडणुकांमध्ये पुढील दोन फरक मोठे होते.
१. त्यावेळेसही इलेक्टोरल कॉलेज होते पण त्या इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य नेमायची पध्दत वेगळी होती. प्रत्येक राज्यातील सदस्यांची नियुक्ती त्या त्या राज्यातील विधीमंडळे करत असत. आपापल्या राज्यातील इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य कसे नियुक्त करायचे हे प्रत्येक राज्यावर सोडले होते. काही राज्यातील विधीमंडळे अध्यक्षीय निवडणुकांमध्ये मतदान न घेता विधीमंडळेच इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य नियुक्त करत असत, काही राज्ये त्या राज्यातील 'पॉप्युलर व्होट' अनुसार तर काही राज्ये राज्यातील हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हजच्या मतदारसंघनिहाय इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य ठरवत असत. त्यामुळे काही राज्यात पॉप्युलर व्होट जिंकलेल्या उमेदवाराला सगळी इलेक्टोरल कॉलेजमधील मते मिळत असत तर काही राज्यात एका उमेदवाराला थोडी, दुसर्‍याला थोडी अशी मते मिळत असत.

आता केवळ मेन आणि नेब्रास्का या राज्यात काँग्रेसशनल डिस्ट्रीक्टप्रमाणे इलेक्टोरल कॉलेजमधील मते ठरवली जातात. इतर सगळ्या राज्यांमध्ये 'विनर टेक्स ऑल'.

२. सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे तेव्हा निवडणुक होताना थॉमस जेफरसन/ जॉन अ‍ॅडम्स हे आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि अनुक्रमे अ‍ॅरन बर/थॉमस पिंकनी हे आमचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार असे पक्ष जाहीर करत नसत. तर दोन पक्ष केवळ दोन उमेदवारांची नावे जाहीर करत असत- म्हणजे फेडरेलिस्ट पक्षाकडून जॉन अ‍ॅडम्स आणि थॉमस पिंकनी तर डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षाकडून थॉमस जेफरसन आणि अ‍ॅरन बर हे उमेदवार. आता तसे नसते- कोण अध्यक्षपदाचा आणि कोण उपाध्यक्षपदाचा उमेदवार हे आधीच स्पष्ट केलेले असते. इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य दोन मते देत असत. सगळी मते मो़जून झाल्यावर ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील तो अध्यक्ष आणि ज्याला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळतील तो उपाध्यक्ष होणार अशी व्यवस्था होती. त्यावेळेस सगळ्या राज्यातील मिळून १३८ इलेक्टोरल कॉलेज सदस्य होते म्हणजे एकूण २७६ मते.

इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांनी मतदान केले तेव्हा काहीसे आश्चर्यजनक चित्र उभे राहिले. इलेक्टोरल कॉलेजमधील फेडरेलिस्ट पक्षाशी संबंधित सदस्यांनी एक मत जॉन अ‍ॅडम्सना आणि दुसरे थॉमस पिंकनींना तर डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षाशी संबंधित सदस्यांनी एक मत थॉमस जेफरसनना तर दुसरे मत अ‍ॅरन बरना देणे अपेक्षित होते. पण तेव्हा 'क्रॉस व्होटिंग' झालेले दिसते आणि इलेक्टोरल कॉलेजमध्ये पुढीलप्रमाणे निकाल लागले (राज्यनिहाय)

1796

त्यामुळे फेडरेलिस्ट पक्षाचे जॉन अ‍ॅडम्स यांना सर्वाधिक ७१ मते मिळून ते अध्यक्ष तर डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षाचे थॉमस जेफरसन यांना दुसर्‍या क्रमांकाची ६८ मते मिळून ते उपाध्यक्ष झाले.

जॉन अ‍ॅडम्स आणि थॉमस जेफरसन हे दोघे अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यात सहकारी होते. मात्र नंतरच्या काळात त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. आणि आता जॉन अ‍ॅडम्स अध्यक्ष आणि थॉमस जेफरसन उपाध्यक्ष झाले. सरकारमध्ये एकत्र काम करताना त्यांच्यातील मतभेद अधिक वाढले. उपाध्यक्ष थॉमस जेफरसननी अध्यक्षांच्या फेडरेलिस्ट निर्णयांवर जाहीर टीका केली. तर थॉमस जेफरसन यांच्या अ‍ॅरन बर बरोबरच्या जवळीकीमुळे अध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स दुखावले गेले. १८०० साली पुढील निवडणुक झाली तेव्हा परत एकदा हेच दोघे उमेदवार समोरासमोर आले. त्या निवडणुकीत थॉमस जेफरसन जिंकले. मात्र जॉन अ‍ॅडम्स आणि थॉमस जेफरसन यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले असल्याने ४ मार्च १८०१ रोजी थॉमस जेफरसन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली त्या समारंभाला जॉन अ‍ॅडम्स उपस्थित राहिले नाहीत आणि आधीच वॉशिंग्टन डी.सी सोडून मॅसॅच्युसेट्समधील आपल्या घरी निघून गेले होते.

त्यापुढील १०-११ वर्षे थॉमस जेफरसन आणि जॉन अ‍ॅडम्स यांनी एकमेकांशी पूर्णपणे बोलणे टाकले होते. १८०९ मध्ये थॉमस जेफरसन आपली अध्यक्षपदाची कारकिर्द संपवून व्हर्जिनियात आपल्या मॉन्टेसिलो या प्रासादतुल्य घरी राहायला गेले तर जॉन अ‍ॅडम्स आधीच मॅसॅच्युसेट्समध्ये राहायला गेले होते. शेवटी १८१२ मध्ये दोघांचेही मित्र असलेल्या डॉ. बेंजामिन रश यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर दोघांमध्ये परत संवाद सुरू झाला. दोघांनी त्यापुढील १४ वर्षात दीडशेपेक्षा जास्त पत्रे एकमेकांना लिहिली आणि राजकारण, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द, भविष्य, तत्वज्ञान वगैरे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. इतिहासातील तो एक खूप मोठा ठेवा आहे. योगायोग असा की दोघांचेही निधन एकाच दिवशी झाले- ४ जुलै १८२६ रोजी म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्याला ५० वर्षे झाली त्या दिवशी. थॉमस जेफरसन गेले आणि त्यानंतर काही तासातच जॉन अ‍ॅडम्सपण गेले. थॉमस जेफरसन यांचा मृत्यू झाला आहे हे जॉन अ‍ॅडम्सना माहित नव्हते. तेव्हा इतिहासाने नोंद केलेले जॉन अ‍ॅडम्स यांचे शेवटचे शब्द होते- Thomas Jefferson still survives.

आता यापुढील मुद्द्यात १८०० सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये काय झाले ते बघू.

अत्यंत माहितीपूर्ण आणि उत्सुकता वाढवणारे लिखाण

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jan 2025 - 12:00 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त मस्त आणी मस्तच माहिती!

वामन देशमुख's picture

30 Jan 2025 - 12:41 pm | वामन देशमुख

विकिपीडिया, नव्हे चंसुकुपीडिया मधील पाने काढून इथे एकेका प्रतिसादात डकवली आहेत का?

_/\_

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Jan 2025 - 1:19 pm | चंद्रसूर्यकुमार

सर्वच प्रतिसाद देणार्‍यांना मनापासून धन्यवाद. प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद म्हणून प्रतिसादांची संख्या दुप्पट करून धाग्याचा टी.आर.पी वाढविण्यापेक्षा एकदाच सगळ्यांना धन्यवाद म्हणतो.

विकिपीडिया, नव्हे चंसुकुपीडिया मधील पाने काढून इथे एकेका प्रतिसादात डकवली आहेत का?

या सगळ्या माहितीत नवे काहीही नाही. आतापर्यंत कोणालाच माहिती नसलेले असेही इथे काहीच नाही. माझ्या खूप आवडीच्या असलेल्या या विषयावरील विविध ठिकाणी असलेली माहिती एकत्र गोळा करून लिहित आहे इतकेच.

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Feb 2025 - 10:51 pm | चंद्रसूर्यकुमार

मुद्दा ११- १८०० ची अध्यक्षीय निवडणुक

मागच्या मुद्द्यात आपण बघितले की १७९६ साली एकापेक्षा अधिक उमेदवार असलेली खर्‍या अर्थाने पहिली अध्यक्षीय निवडणुक झाली. त्यावेळेस इलेक्टोरल कॉलेजचा प्रत्येक सदस्य दोन मते देत असे आणि सर्वाधिक मते मिळालेला अध्यक्ष तर दुसर्‍या क्रमांकाची मते मिळालेला उपाध्यक्ष होत असे. या नियमांमुळे फेडरेलिस्ट पक्षाचे जॉन अ‍ॅडम्स अध्यक्ष तर डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षाचे थॉमस जेफरसन उपाध्यक्ष अशी विचित्र स्थिती निर्माण झाली.

१८०० साली तर पुढील अध्यक्षीय निवडणुकांमध्ये आणखी विचित्र स्थिती निर्माण झाली. या निवडणुकांमध्ये लढत झाली फेडरेलिस्ट पक्षातर्फे अध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स आणि साऊथ कॅरोलायनाचे माजी गव्हर्नर थॉमस पिंकनी विरूध्द डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षातर्फे उपाध्यक्ष थॉमस जेफरसन आणि अ‍ॅरन बर यांच्यात. म्हणजे दोन्ही पक्षांनी १७९६ चेच दोन उमेदवार दिले. १७९६ मध्ये जसे क्रॉस व्होटिंग झाले आणि अध्यक्ष एका पक्षाचा तर उपाध्यक्ष दुसर्‍या पक्षाचा अशी विचित्र स्थिती आली तशी व्हायला नको याची खबरदारी दोन्ही पक्षांनी घेतली होती आणि आपापल्या इलेक्टोरल कॉलेज सदस्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मते द्यायची हे ठरले होते. पण सगळ्या फेडरेलिस्ट सदस्यांनी जॉन अ‍ॅडम्स आणि थॉमस पिंकनी यांना तर सगळ्या डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन सदस्यांनी थॉमस जेफरसन-अ‍ॅरन बर यांना मते दिली असती तर मग आपल्याच पक्षाच्या दोन उमेदवारांना सारखी मते मिळून अध्यक्ष कोण होणार आणि उपाध्यक्ष कोण होणार हा गोंधळ निर्माण झाला असता. ते टाळायला म्हणून दोन्ही पक्षांच्या इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांनी ठरविले होते की त्यांच्यापैकी एका सदस्याने आपले एक मत पाचवा जॉन जे म्हणून उमेदवार होता त्याला द्यायचे.

पण आयत्या वेळेस सगळ्या डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन इलेक्टोरल कॉलेज सदस्यांनी आपापले एक मत थॉमस जेफरसन यांना तर दुसरे मत अ‍ॅरन बर यांना दिले. तर फेडरेलिस्ट पक्षाच्या एका इलेक्टोरल कॉलेज सदस्याने ठरल्याप्रमाणे आपले मत थॉमस पिंकनी यांना न देता जॉन जे या पाचव्या उमेदवाराला दिले. त्यातून पुढील विचित्र स्थिती निर्माण झाली

इलेक्टोरल कॉलेज सदस्य-१३८
इलेक्टोरल कॉलेज मते- २७६
थॉमस जेफरसन- ७३
अ‍ॅरन बर - ७३
जॉन अ‍ॅडम्स- ६५
थॉमस पिंकनी- ६४
जॉन जे - १

म्हणजे थॉमस जेफरसन आणि अ‍ॅरन बर या दोघांनाही सारखीच मते मिळाली. आता त्यांच्यापैकी अध्यक्ष कोण होणार आणि उपाध्यक्ष कोण होणार? अशा स्थितीत हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हज अध्यक्षाची निवड करणार अशी तरतूद आहे. या तरतूदीचे नियम काहीसे गुंतागुंतीचे आहेत. त्याप्रमाणे हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हजच्या एका सदस्याला एक मत नसायचे तर एका राज्याला एक मत असायचे- अजूनही असते. प्रत्येक राज्यातील सगळे हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हज मधील सगळे खासदार एकत्र येऊन त्यांच्यात्यांच्यात मतदान घेणार की थॉमस जेफरसन आणि जॉन अ‍ॅडम्स यांच्यापैकी कोणाला मत द्यायचे. ज्या उमेदवाराला अधिक मते मिळतील त्याला त्या राज्याचे मत समजले जायचे- अजूनही जाते. आता समजा एखाद्या राज्यातील बरोबर अर्ध्या खासदारांनी थॉमस जेफरसनना आणि उरलेल्या अर्ध्या खासदारांनी अ‍ॅरन बरना मत दिले तर काय करायचे? तर त्या राज्याला कोणालाही मत देता यायचे नाही. त्यावेळेस अमेरिकेत १६ राज्ये होती. त्यापैकी बहुमत- म्हणजे किमान ९ राज्ये ज्या उमेदवाराच्या बाजूने असतील तो अध्यक्ष आणि दुसरा उमेदवार उपाध्यक्ष बनणार अशी व्यवस्था होती.

मागच्या प्रतिसादात बघितले की १७९६ मध्ये पहिले अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टन अध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स यांचे समर्थक होते. हॅमिल्टनना वाटले होते की अध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स आपण म्हणू ते ऐकतील पण अध्यक्षांनी अलेक्झांडर हॅमिल्टनच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या नाहीत तर स्वतःचे स्वतंत्र धोरण राबवले. त्यामुळे अलेक्झांडर हॅमिल्टन जॉन अ‍ॅडम्सच्या विरोधात गेले होते. त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस जॉन अ‍ॅडम्स ऐवजी थॉमस पिंकनी अध्यक्ष व्हावेत म्हणून आतून प्रयत्न केले होते. पण अधिक इलेक्टोरल कॉलेज सदस्य जेफरसन-बर यांच्या जोडीला मिळाले त्यामुळे थॉमस पिंकनी अध्यक्ष होणे शक्य नव्हते. थॉमस जेफरसन हे फेडरेलिस्ट पक्षाचे शत्रू होतेच पण स्वतः अलेक्झांडर हॅमिल्टन थॉमस जेफरसन पेक्षाही अ‍ॅरन बरना आपला मोठा शत्रू मानत असत आणि त्यांचा अ‍ॅरन बरना अधिक विरोध होता. त्यातल्या त्यात बरा उमेदवार म्हणून थॉमस जेफरसन निवडून यावेत यासाठी हॅमिल्टन प्रयत्न करू लागले.

११ फेब्रुवारी १८०१ रोजी अध्यक्ष निवडायला हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्ह्जच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत थॉमस जेफरसनना ८ राज्यात (जॉर्जिया, केंटकी, न्यू जर्सी, न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, नॉर्थ कॅरोलायना, व्हर्जिनिया आणि टेन्नेसी) तर अ‍ॅरन बरना ६ राज्यात (डेलावेअर, साऊथ कॅरोलायना, कनेक्टिकट, मॅसॅच्युसेट्स, न्यू हॅम्पशायर आणि डेलावेअर) विजय मिळाला. तर मेरीलँड आणि व्हरमॉन्ट या दोन राज्यांत खासदारांच्या मतांमध्ये थॉमस जेफरसन आणि अ‍ॅरन बर यांच्यात बरोबरी झाल्याने त्या दोन राज्यांना मत देता आले नाही. कोणत्याही उमेदवाराला जिंकायला गरजेची असलेली ९ राज्ये जिंकता न आल्याने परत एकदा मतदान घ्यावे लागले. परत तीच परिस्थिती आली. मग परत मतदान घ्यावे लागले. परत तीच परिस्थिती आली. असे करता करता मतदानाच्या तब्बल ३५ फेर्‍या झाल्या तरी परत परत जेफरसन ८ राज्यात तर बर ६ राज्यात जिंकत होते आणि २ राज्ये- मेरीलँड आणि व्हरमाँट ना मत देता आले नाही.

दरम्यान अलेक्झांडर हॅमिल्टन थॉमस जेफरसन अध्यक्ष व्हावे यासाठी प्रयत्न करतच होते. ते आपल्या पक्षाच्या खासदारांना जेफरसनना मत द्या यासाठी आग्रह धरून होते. शेवटी मतदानाच्या ३६ व्या फेरीत कोंडी फुटली. पूर्वी डेलावेअर राज्य अ‍ॅरन बरनी जिंकले होते कारण तिकडचे एकमेव खासदार जेम्स बायर्ड यांनी अ‍ॅरन बरना मत दिले होते. त्यांनी ३६ व्या फेरीत कोणालाही मत दिले नाही. त्यामुळे डेलावेअर राज्याला मत देता आले नाही आणि ते एक राज्य अ‍ॅरन बरच्या पारड्यातून बाद झाले. पूर्वी साऊथ कॅरोलायनातील ४ पैकी ३ खासदारांनी अ‍ॅरन बरना मत दिले होते तर एकाने जेफरसनना. त्यामुळे ते राज्य अ‍ॅरन बरने जिंकले होते. त्या चौघाही खासदारांनी कोणालाच मत दिले नाही. त्यामुळे त्या राज्याला मत देता आले नाही ते एक राज्य अ‍ॅरन बरच्या पारड्यातून गेले. तर पूर्वीच्या फेरीत बरोबरी झाल्याने मत देऊ न शकलेल्या मेरीलँड आणि व्हरमॉन्ट या राज्यांतील अ‍ॅरन बरना पूर्वी मत दिलेल्या खासदारांनी ३६ व्या फेरीत मत दिले नाही. त्यामुळे ती दोन राज्ये थॉमस जेफरसनना मिळाली. या सगळ्यामागे अलेक्झांडर हॅमिल्टन होते- त्यांनी आधी जेम्स बायर्डना आणि जेम्स बायर्डनी इतर खासदारांना प्रभावित करून पूर्वी अ‍ॅरन बरना मते दिलेल्या या खासदारांनी ३६ व्या फेरीत मते दिली नाहीत. त्यामुळे थॉमस जेफरसनना १० राज्ये तर अ‍ॅरन बरना ४ राज्ये अशी परिस्थिती आली आणि १७ फेब्रुवारी १८०१ रोजी थॉमस जेफरसन अध्यक्षपदावर निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.

१७९६ आणि १८०० या दोन निवडणुकांमध्ये गोंधळ झाल्याने १८०४ मध्ये अमेरिकन राज्यघटनेत १२ वी दुरूस्ती करण्यात आली आणि आधीच अध्यक्षपदाचा आणि उपाध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे स्पष्ट केलेले असावे असा नियम आला. तसेच इलेक्टोरल कॉलेजच्या प्रत्येक सदस्याने अध्यक्षपदासाठी एक मत द्यावे आणि उपाध्यक्षपदासाठी एक मत द्यावे असा नियम आला.

या अलेक्झांडर हॅमिल्टनचे पुढे काय झाले? तो इतिहास बराच रोचक आहे. तो याच प्रतिसादाला उपप्रतिसाद म्हणून बघू. त्याचा वेगळा मुद्दा करत नाही कारण ते अध्यक्षपदाशी संबंधित नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Feb 2025 - 12:31 am | अमरेंद्र बाहुबली

छान माहीती.

चंद्रसूर्यकुमार's picture

2 Feb 2025 - 2:23 pm | चंद्रसूर्यकुमार

मागच्या मुद्द्यात बघितले की १८०० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळेस पहिले अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी अ‍ॅरन बर यांच्याविरोधात मते द्यावीत असा प्रचार आपल्या पक्षाच्या खासदारांमध्ये केला आणि अ‍ॅरन बर यांना अध्यक्षपद मिळू दिले नाही. अलेक्झांडर हॅमिल्टन यांचा अ‍ॅरन बर यांच्यावर दात पूर्वीपासूनच होता. १७९१ मध्ये अ‍ॅरन बर यांनी अलेक्झांडर हॅमिल्टन यांचे सासरे फिलीप शुलियर यांचा न्यू यॉर्क राज्याच्या सीनेटर पदाच्या निवडणुकीत पराभव केला होता. अर्थात अ‍ॅरन बरवर राग असायचे ते एक कारण होते असे नाही तर अ‍ॅरन बर हे स्वार्थी असून कोणतीही विचारधारा त्यांच्याकडे नाही, आपल्या स्वार्थासाठी ते कोणाशीही हातमिळवणी करू शकतील असे मत अलेक्झांडर हॅमिल्टन यांचे होते. त्यामानाने विरोधी मताचे असले तरी थॉमस जेफरसन अधिक तत्वनिष्ठ होते असे अलेक्झांडर हॅमिल्टन यांचे मत होते. त्यामुळे १८०० साली अ‍ॅरन बर अध्यक्ष व्हायला नकोत म्हणून अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी प्रयत्न केले.

१८०१ मध्ये जेफरसन अध्यक्ष आणि अ‍ॅरन बर उपाध्यक्ष झाले खरे. पण वर म्हटल्याप्रमाणे ती निवडणुक हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्ह्जमध्ये ३६ फेर्‍यातील मतदानात झाली. जेफरसन हे अ‍ॅरन बरना अधिक वरीष्ठ होते तसेच लोकांनी मतदान केले तेव्हा अध्यक्ष म्हणून त्यांचेच नाव पुढे केले गेले होते. त्यामुळे अ‍ॅरन बर माघार घेतील आणि आपल्याला सुखासुखी अध्यक्ष होऊ देतील असे थॉमस जेफरसनना वाटत होते. पण अ‍ॅरन बरनी माघार घेतली नाही. त्यामुळे विरोधी फेडरेलिस्ट पक्षाच्या मदतीने अ‍ॅरन बर स्वतः अध्यक्ष व्हायचा प्रयत्न करत होते असा ग्रह जेफरसनचा झाला. तर अलेक्झांडर हॅमिल्टनच्या मदतीने जेफरसननी निवडणुक चोरली असे अ‍ॅरन बरना वाटायला लागले. त्यामुळे १७९७ ते १८०१ या काळात झाले तसेच १८०१ ते १८०५ या काळातही झाले- अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यात मतभेद कायम राहिले. अध्यक्ष जेफरसननी उपाध्यक्ष अ‍ॅरन बरना निर्णयप्रक्रीयेत फारसे सहभागी करून घेतले नाही. १८०४ च्या निवडणुकीत जेफरसन अ‍ॅरन बरना आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार बनविणे शक्य नव्हते. त्यामुळे १८०४ मध्ये अ‍ॅरन बर न्यू यॉर्क राज्याच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीला उभे राहिले. त्या निवडणुकीमध्येही अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी अ‍ॅरन बरविरोधात प्रचार केला.

त्यामुळे अ‍ॅरन बर आणि अलेक्झांडर हॅमिल्टन यांच्यातील मतभेद आणखी टोकाला गेले. शेवटी अ‍ॅरन बरनी अलेक्झांडर हॅमिल्टनना बंदुकीने द्वंद्वयुध्दासाठी आव्हान दिले. असे द्वंद्व पूर्वी खेळले जात असे. १८०१ मध्ये अशाच एका द्वंद्वात अलेक्झांडर हॅमिल्टन यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. असे द्वंद्व न्यू यॉर्क राज्यात खेळणे बेकायदेशीर होते. म्हणून ते द्वंद्व न्यू जर्सी राज्यात खेळले गेले. त्या काळी असे द्वंद्वाला आव्हान देणे अगदी टोकाचे मतभेद असतील तरच केले जायचे. आणि एकदा आव्हान दिले तर ते न स्विकारणे हे दुबळेपणाचे लक्षण समजले जायचे. त्या पध्दतीनुसार ११ जुलै १८०४ रोजी म्हणजे न्यू यॉर्क राज्याच्या गव्हर्नर पदाची निवडणुक व्हायच्या काही महिने आधी हे द्वंद्व झाले. त्या द्वंद्वात अ‍ॅरन बरनी झाडलेली गोळी अलेक्झांडर हॅमिल्टनना लागली पण हॅमिल्टननी झाडलेली गोळी अ‍ॅरन बरच्या डोक्यावरून गेली त्यामुळे त्यांना इजा झाली नाही. जखमी झालेल्या अ‍लेक्झांडर हॅमिल्टनना न्यू यॉर्क शहरात जेम्स बायर्ड यांच्या घरी नेण्यात आले. तिथे त्यांचे दुसर्‍या दिवशी म्हणजे १२ जुलै १८०४ रोजी निधन झाले.

म्हणजे एका अर्थी अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी माजी अर्थमंत्र्यांना ठार मारले. त्याबद्दल अ‍ॅरन बरना शिक्षा झाली नाही पण त्यांची राजकीय कारकिर्द मात्र संपली. न्यू यॉर्क राज्याच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला. नंतर त्यांच्यावर देशद्रोहाचाही खटला भरण्यात आला पण त्यातून ते निर्दोष सुटले. नंतर त्यांनी काही काळ न्यू यॉर्क शहरात वकिली केली. शेवटी त्यांचे १८३५ मध्ये निधन झाले.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Feb 2025 - 4:01 pm | अमरेंद्र बाहुबली

इतक्या मोठ्या पदावरील लोक असे बंदूकयुद्ध खेळले विश्वास बसत नाही. छान माहिती!

मुक्त विहारि's picture

11 Feb 2025 - 1:33 pm | मुक्त विहारि

छोटया छोट्या गोष्टींवर, केवळ इगो साठी, प्रचंड प्रमाणात वेळ, पैसा आणि श्रम , करणारी मंडळी खाजगी आणि सरकारी क्षेत्रांत बघितली आहेत....

तुमची जशी जशी पदोन्नती होईल, तसे तसे तुम्हाला असे नमुने भेटतील....

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Feb 2025 - 12:17 pm | चंद्रसूर्यकुमार

मुद्दा १२- अध्यक्षांसाठीचे गीत

अध्यक्षांसाठीचे स्वतःचे एक 'गीत' असते. अध्यक्ष कुठेही जातात तेव्हा ते गीत अमेरिकेच्या मरीन पथकाचे जवान वाद्यांवर वाजवतात. त्या गीताचे बोल पुढीलप्रमाणे:

Hail to the Chief we have chosen for the nation,
Hail to the Chief! We salute you, one and all.
Hail to the Chief, as we pledge cooperation,
In proud fulfillment of a great, noble call.

Yours is the aim to make this grand country grander,
This you will do, that is our strong, firm belief.
Hail to the one we selected as commander,
Hail to the President! Hail to the Chief!

सर्वात पहिल्यांदा १८२९ मध्ये अध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांच्यासाठी ते गीत वाजविले गेले. १८३७ मध्ये मार्टिन व्हॅन ब्युरेन यांच्या शपथग्रहण समारंभापासून ते गीत प्रत्येक वेळेस शपथग्रहण समारंभात वाजविले जाते. अध्यक्षांनी शपथ घेतल्यानंतर लगेच ते गीत वाजविले जाते ते पहिल्यांदा. तसेच मावळते अध्यक्ष नव्या अध्यक्षांच्या शपथग्रहण समारंभात सहभागी व्हायला व्हाईट हाऊस शेवटच्या वेळेस सोडतात तेव्हा ते गीत वाजविले जाते ते शेवटून दुसर्‍यांदा. त्यानंतर अध्यक्षांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेसही ते गीत शेवटच्यांदा वाजविले जाते. १८८१ ते १८८५ या काळातील अध्यक्ष चेस्टर आर्थर यांना ते गीत आवडायचे नाही. म्हणून त्यांनी आपल्यासाठी वेगळे गीत बनवून घेतले होते. तो एक अपवाद वगळला तर अँड्र्यू जॅक्सन पासून प्रत्येक अध्यक्षांसाठी ते गीत वाजविले जाते.

१४ एप्रिल १८६५ रोजी रात्री अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांच्यावर वॉशिंग्टन डीसी मधील फोर्ड थिएटरमध्ये गोळी झाडण्यात आली. ते तिथे गेल्यावरही त्यांच्यासाठी 'हेल टू द चीफ' हे गीत वाजविण्यात आले होते.

आपल्याकडे पूर्वीच्या काळी राजे दरबारात जायचे तेव्हा महाराज पधार रहे है... अशा घोषणा दरबारात दिल्या जायच्या त्याप्रमाणे कोणत्याही समारंभात किंवा कुठेही अध्यक्ष जातात तेव्हा Ladies and gentlemen, President of the United States and Mrs. Trump (बरोबर असल्यास) अशी घोषणा दिली जाते आणि मग hail to the chief हे गीत वाजविले जाते.

जुलै १९८२ मध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी अमेरिकेला भेट दिली होती तेव्हा त्यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांनी केले तेव्हा अध्यक्ष येत आहेत ही घोषणा, आणि मग त्यांच्यासाठी 'hail to the chief' हे गीत वाजविणे हे सगळे https://www.youtube.com/watch?v=QHk9zoG6PXw या व्हिडिओमध्ये बघता येईल.

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Feb 2025 - 12:27 pm | चंद्रसूर्यकुमार

मुद्दा १३
आतापर्यंत दोन पितापुत्रांच्या जोड्या अध्यक्ष झाल्या आहेत. जॉन अ‍ॅडम्स १७९७ ते १८०१ या काळात तर त्यांचे पुत्र जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स १८२५ ते १८२९ या काळात अध्यक्ष होते. तर जॉर्ज बुश १९८९ ते १९९३ या काळात तर त्यांचे पुत्र जॉर्ज डब्ल्यू बुश २००१ ते २००९ या काळात अध्यक्ष होते. तर एक आजोबा-नातवाची जोडी आतापर्यंत अध्यक्ष झाली आहे. १८४१ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेऊन महिन्याभरात मरण पावलेले विलिअम हेनरी हॅरीसन यांचे नातू बेंजामिन हॅरीसन १८९३ ते १८९७ या काळात अध्यक्ष होते. १९०१ ते १९०९ या काळात अध्यक्ष असलेले थिओडोर रूझवेल्ट यांचे बरेच दूरचे चुलतबंधू फ्रँकलीन रूझवेल्ट १९३३ ते १९४५ या काळात अध्यक्ष होते.

मुद्दा १४
१९०९ ते १९१३ या काळात अध्यक्ष असलेले विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे मुळचे नावाजलेले वकिल आणि ओहायो राज्याच्या न्यायालयात न्यायाधीश होते. १९२१ मध्ये अध्यक्ष वॉरन हार्डिंग यांनी त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून केली. अध्यक्ष आणि मुख्य न्यायाधीश या दोन्ही पदांवर राहिलेले विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे एकमेव व्यक्ती आहेत. पुढे त्यांनी १९२५ मध्ये केल्व्हिन कूलिज आणि १९२९ मध्ये हर्बर्ट हूव्हर यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. जेव्हा अध्यक्ष वॉरन हार्डिंग यांनी माजी अध्यक्ष टाफ्ट यांच्याशी सर्वोच्च न्यायालयावर नेमणूक करण्याविषयी चर्चा केली तेव्हा 'मला मुख्य न्यायाधीश म्हणून नेमले तरच मी जाईन' अशा स्वरूपाची अट टाफ्ट यांनी घातली होती. त्याचे कारण हे की टाफ्ट अध्यक्ष असताना त्यांनी नियुक्त केलेले न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात होते. त्यांच्यापेक्षा कनिष्ठ (कारण त्यांच्यानंतर नियुक्ती झालेले) न्यायाधीश म्हणून काम करणे त्यांना मान्य नव्हते.

मुद्दा १५
अध्यक्ष विलिअम मॅकिन्ली यांच्या हत्येनंतर अध्यक्षपदावर विराजमान झालेले थिओडोर रूझवेल्ट हे सर्वात कमी वयात अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळलेले अध्यक्ष होते. त्यांनी वयाची ४३ वर्षे पूर्ण व्हायच्या आधी कार्यभार सांभाळला. मात्र ते अध्यक्ष म्हणून निवडून गेले नव्हते. सर्वात कमी वयात अध्यक्ष म्हणून निवडून जायचा मान जॉन केनेडींचा. ते वयाची ४३ वर्षे पूर्ण आणि ४४ चालू असताना अध्यक्ष म्हणून निवडून गेले. तर अध्यक्षपदाची सुरवात करताना सर्वात वयोवृध्द असलेले आहेत डॉनल्ड ट्रम्प. २० जानेवारी २०२५ रोजी त्यांनी अध्यक्षपदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली तेव्हा ते आतापर्यंतच्या इतिहासात अध्यक्षपदाची शपथ घेणारे सर्वात वयोवृध्द व्यक्ती होते (वय वर्षे ७८ पूर्ण आणि ७९ चालू). मात्र त्यांनी यापूर्वी अध्यक्षपदाची एकदा शपथ घेतली आहे तेव्हा ते ७० पूर्ण आणि ७१ चालू वयाचे होते. त्यामुळे पहिल्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेणारे सर्वात वयोवृध्द अध्यक्ष आहेत जो बायडन. त्यांनी २० जानेवारी २०२१ रोजी शपथ घेतली तेव्हा ते ७८ पूर्ण आणि ७९ चालू वयाचे होते. पण २० जानेवारी २०१२ रोजी जो बायडन होते त्यापेक्षा ट्रम्प आज २० जानेवारी २०२५ रोजी वयाने काही दिवसांनी मोठे आहेत.

मुद्दा १६
आतापर्यंत उपाध्यक्षपदावर असताना अध्यक्षपदाची निवडणुक लढवून जिंकलेले दोघेच आहेत. १८३६ ची निवडणुक जिंकून १८३७ ते १८४१ या काळात अध्यक्ष असलेले मार्टिन व्हॅन ब्युरेन आणि १९८८ ची निवडणुक जिंकून १९८९ ते १९९३ या काळात अध्यक्ष असलेले जॉर्ज बुश. उपाध्यक्षपदावरून पायउतार झाल्यावर निवडणुक लढवून जिंकणारे उपाध्यक्ष दोनच- १९५३ ते १९६१ या काळात उपाध्यक्ष असलेले रिचर्ड निक्सन १९६८ ची निवडणुक जिंकले आणि १९६९ ते १९७४ या काळात अध्यक्ष होते. तर २००९ ते २०१७ या काळात उपाध्यक्ष असलेले जो बायडन २०२० ची निवडणुक जिंकले आणि २०२१ ते २०२५ या काळात अध्यक्ष होते.

मुद्दा १७
अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यावर सर्वाधिक काळ हयात असलेले अध्यक्ष होते जिमी कार्टर. ते १९७७ ते १९८१ या काळात अध्यक्ष होते. त्यांचे अलीकडेच २९ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. म्हणजे ते जवळपास ४४ वर्षे माजी अध्यक्ष म्हणून वावरले. सध्या हयात असलेले सर्वात वयोवृध्द माजी अध्यक्ष आहेत बिल क्लिंटन. त्यांना अध्यक्षपद सोडून २४ वर्षे झाली आहेत. समजा ते आणखी जवळपास २० वर्षे हयात राहिले तर ते जिमी कार्टरचा विक्रम मोडतील.

मुद्दा १८
अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यापैकी कोणतीही निवडणुक न जिंकता अध्यक्ष झालेले एकमेव अध्यक्ष आहेत जेराल्ड फोर्ड. रिचर्ड निक्सननी राजीनामा दिल्यावर १९७४ ते १९७७ या काळात ते अध्यक्ष होते. १९७२ च्या निवडणुकीत निवडून गेलेले रिचर्ड निक्सन यांचे उपाध्यक्ष स्पिरो टी. अ‍ॅगन्यू यांनी १९७३ मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर रिचर्ड निक्सन यांनी जेराल्ड फोर्ड यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीला सिनेटने मान्यता दिली. त्यामुळे ते उपाध्यक्ष म्हणूनही निवडून गेले नव्हते. १९६५ मधील घटनादुरूस्तीप्रमाणे उपाध्यक्ष पद रिकामे झाल्यास त्या जागेवर नव्या उपाध्यक्षांची नियुक्ती करायचा अधिकार अध्यक्षांना देण्यात आला. त्यापूर्वी उपाध्यक्षपद रिकामे झाल्यास पुढील निवडणुकीपर्यंत ते पद रिकामेच ठेवले जायचे.

मुद्दा १९
लागोपाठच्या तीन अध्यक्षांनी सलग आठ वर्षे अध्यक्षपद भूषविले असे आतापर्यंत दोनदा झाले आहे. १८०१ ते १८०९ या काळात थॉमस जेफरसन, १८०९ ते १८१७ या काळात जेम्स मेडिसन आणि १८१७ ते १८२५ या काळात जेम्स मनरो हे लागोपाठचे तीन अध्यक्ष एकसलग आठ वर्षे अध्यक्षपदावर राहिले. त्यानंतर १९९३ ते २००१ या काळात बिल क्लिंटन, २००१ ते २००९ या काळात जॉर्ज डब्ल्यू बुश आणि २००९ ते २०१७ या काळात बराक ओबामा हे तीन अध्यक्ष असेच एकसलग आठ वर्षे अध्यक्षपदावर राहिले. डॉनल्ड ट्रम्प २०२० ची निवडणुक जिंकले असते तर एकसलग आठ वर्षे अध्यक्षपदावर राहिलेले लागोपाठचे चार अध्यक्ष असे उदाहरण पहिल्यांदा झाले असते. पण ट्रम्प यांचा २०२० मध्ये पराभव झाल्याने तो विक्रम होता होता राहिला. आता डॉनल्ड ट्रम्प २०२५ ते २०२९ पर्यंत अध्यक्ष राहतील. त्यानंतरचे तीन अध्यक्ष समजा एकसलग आठ वर्षे त्या पदावर राहिले तर त्यातील तिसर्‍या अध्यक्षाचा कार्यकाळ संपेल २०५३ मध्ये. आणि त्यापुढील अध्यक्ष आणखी आठ वर्षे सलग अध्यक्ष राहिले तर त्यांचा दुसरा कार्यकाळ संपेल २०६१ मध्ये आणि तो एक विक्रम होईल.

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Feb 2025 - 12:35 pm | चंद्रसूर्यकुमार

जॉन टायलर हे १८४१ ते १८४५ या काळात अध्यक्ष होते. निवडून आलेल्या अध्यक्षांचे कार्यकाळात निधन होणे हे पहिल्यांदा झाले १८४१ मध्ये. वरील एका मुद्द्यात लिहिल्याप्रमाणे ४ मार्च १८४१ रोजी अध्यक्ष झालेल्या विलिअम हेनरी हॅरीसन यांचे शपथ घेतल्यावर अवघ्या ४० दिवसात निधन झाले. त्यानंतर त्यांचे उपाध्यक्ष जॉन टायलर अध्यक्ष झाले आणि त्यांनी अध्यक्ष हॅरीसन यांची उरलेली कारकिर्द पूर्ण केली. जॉन टायलर यांचे यादवी युध्दादरम्यान १८६२ मध्ये निधन झाले. ते मुळचे व्हर्जिनियाचे होते. त्यांचे राज्य व्हर्जिनिया हे दक्षिणेच्या फुटून निघणार्‍या राज्यांमध्ये एक महत्वाचे राज्य होते. त्या राज्याची राजधानी रिचमंड ही फुटून निघालेल्या राज्यांनी स्थापन केलेल्या कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाची राजधानी होती. त्यांचे रिचमंडमध्येच निधन झाले. व्हर्जिनिया फुटल्यावर त्यांनी आपल्या राज्याबरोबर अर्थात कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिका या फुटून निघालेल्या देशाबरोबर राहणे पसंत केले आणि एका अर्थी त्यांनी राष्ट्रांतर केले. त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्या शवपेटीवर कॉन्फेडरेट स्टेट्सचा झेंडा गुंडाळला होता. कोणाही माजी अध्यक्षांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शवपेटीवर अमेरिकेचा सोडून दुसरा कोणता झेंडा गुंडाळला जायचे ते एकमेव उदाहरण आहे.

जॉन टायलर अमेरिकेचे १८४१ ते १८४५ या काळात अध्यक्ष होते. त्यांचा जन्म १७९० मध्ये झाला. समजा कोणी सांगितले की त्यांचे नातू अजूनही हयात आहेत तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण असेल. पण ती सत्य परिस्थिती आहे. जॉन टायलर यांचे नातू हॅरीसन टायलर आजही हयात आहेत आणि त्यांचे वय ९६ वर्षे आहे. १९२८ मध्ये त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील लियॉन टायलर ७५ वर्षांचे तर त्यांची आई सुजन टायलर ४० वर्षांची होती. १८५३ मध्ये त्यांचे वडील लियॉन टायलर यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील (हॅरीसन टायलर यांचे आजोबा) आणि माजी अध्यक्ष जॉन टायलर ६३ वर्षांचे आणि त्यांची आई ज्युलिया टायलर ३३ वर्षांची होती. या तीन पिढ्यांमध्ये अमेरिकेचा जवळपास सगळा इतिहास बघितला आहे. आपल्यापैकी बहुतेकांचे आजोबा आपल्यापेक्षा ५५-६० वर्षांनी मोठे असतील. पण या हॅरीसन टायलर यांच्या आजोबांचा त्यांच्यापेक्षा तब्बल १३८ वर्षांपूर्वी जन्म झाला होता.

याविषयी https://www.youtube.com/watch?v=dGiL2PgC17A या व्हिडिओमध्ये अधिक. तो व्हिडिओ ६ वर्षांपूर्वीचा आहे. त्या व्हिडिओमधील हॅरीसन टायलर आजही हयात आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Feb 2025 - 2:08 pm | अमरेंद्र बाहुबली

अरे वा! रविवार सार्थकी लागला, मस्त माहितीपुर्न मेजवानी.

diggi12's picture

17 Feb 2025 - 1:44 pm | diggi12

वाह