१४ एप्रिल १८६५, वेळ सायंकाळी अंदाजे १० वाजता -
सायंकाळी पीटरसन हाउस, वॉशिंग्टन डी. सी. येथील फोर्ड नाट्यगृहात सायंकाळी Our American Cousin नावाचा एक विनोदी कार्यक्रम रंगात आला होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष अब्राहम लिंकन कार्यक्रम पाहण्यासाठीआपली पत्नी मेरी टॉड लिंकनसहीत वेळेवर नाट्यगृहात पोहोचले. त्यांची बसण्याची व्यवस्था वरच्या मजल्यावर एका स्वतंत्र आरक्षित दालनात केली होती. त्यांच्या बरोबर क्लेरा हॅरिस व तिचा नियोजित वर, मेजर हेन्री रॅथबोन, हे सुद्धा होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष लिंकन यांनी अनेकांना निमंत्रण दिले होते. परंतु बहुतकांनी ते नाकारले होते.
तेथे एकजण त्यांची प्रतीक्षा करीत थांबला होता. अध्यक्षांच्या आरक्षित दालनाबाहेर एकही सुरक्षारक्षक नाही हे पाहून सुमारे १० वाजून २० मिनिटांच्या सुमारास तो बाहेरील दार उघडून आरक्षित दालनाच्या मुख्य दारापाशी पोहोचला. आत आल्या आल्या त्याने बाहेरील दार आतून लावून घेतले आणि काही वेळ थांबून तो हळूच आरक्षित दालनात पोहोचला. नाटकात एक विनोदी संवाद येईपर्यंत तो दबा धरून थांबला, हेतू हा की संवादानंतरच्या हास्यकल्लोळात गोळीचा आवाज दडपला जावा. त्यानंतर त्याने अचानक ०.४४ कॅलिबर डेरिंजर पिस्तुलाने लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तात्काळ कोमात गेले. नंतर त्याने लगेच खिशातील सुरीने मेजर रॅथबोन यांच्या खांद्यावर वार केला. दोन्ही हल्ले क्षणार्धात उरकल्यानंतर त्याने पळण्यासाठी वरून थेट खाली प्रेक्षागृहात उडी मारली. या प्रयत्नात त्याचा डावा पाय मोडला (काहीजणांचे मत होते की पाय त्यावेळी मोडला नव्हता, पण नंतर मोडला होता). पण तरीही न थांबता रंगमंचाच्या बाजूला असलेल्या दारातून बाहेर पळला. तेथे त्याच्यासार्ठी आधीच एक घोडा तयार ठेवला होता. त्यावर बसून तो पसार झाला. गोळी मारण्याच्या आधी तो “Sic semper tyrannis” (“Thus always to tyrants,” the state motto of Virginia) or “The South is avenged!” or both, असे ओरडत होता असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नाट्यप्रयोगाची जाहिरात
________________________________________________________________________________________________
सप्टेंबर १९६३ -
सप्टेंबर १९६३ च्या अखेरीस हेमंत ऋतुच्या प्रारंभी अमेरिकेचे अध्यक्ष डेमॉक्रेटिक पक्षाचे जॉन फिझगेराल्ड केनेडी व त्यांचे राजकीय सल्लागार पुढील वर्षाच्या अखेरीस होणार असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या तयारीस प्रारंभ करीत होते. १९६० ची अध्यक्षीय निवडणुक जरी केनेडी ५२२ पैकी ३०३ एलेक्टोरल मते मिळवून मोठ्या अंतराने जिंकले होते, तरी त्यांना प्रत्यक्षात प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे रिचर्ड निक्सन यांच्यापेक्षा फक्त १,१८,५५० मते जास्त मिळाली होती (एकूण ६ कोटी ९० लाख नागरिकांनी मत दिले होते). या अतिशय चुरशीच्या निवडणुकीत अगदी थोडी जास्त मते मिळाल्याने पुढील १९६४ मधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी खूप आधीच तयारी सुरू करायची होती.
अध्यक्ष जॉन केनेडी
सप्टेंबर १९६३ संपेपर्यंत केनेडींनी एका आठवड्यात पश्चिमेकडील ९ राज्यांचा दौरा केला. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक शांतता या आपल्या आवडत्या मुद्द्यांवर भर दिला.
एक महिन्यानंतर केनेडींनी बॉस्टन व फिलाडेल्फिया येथे डेमॉक्रेटिक पक्षाच्या मेळाव्यात भाषण केले. १२ नोव्हेंबर १९६३ ला त्यांनी आपल्या राककीय सल्लागारांसोबत एक बैठक घेऊन अध्यक्षीय निवडणूक जिंकण्यासाठी फ्लॉरिडा व टेक्सस जिंकणे आवश्यक आहे हे आवर्जून सांगितले. त्यासाठी पुढील २ आठवड्यात आपण या दोन्ही राज्यांचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले.
या दौर्यात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जॅकलीन केनेडी सुद्धा असणार होत्या. ३ महिन्यांपूर्वीच ऑगस्टमध्ये त्यांचा नवजात पुत्र पॅट्रिकचे निधन झाले होते. त्यानंतर सौ, केनेडींचा हा पहिलाच सार्वजनिक सहभाग असणार होता. ठरल्याप्रंमाणे केनेडी दांपत्य २१ नोव्हेंबर १९६३ या दिवशी एअर फोर्स १ या अध्यक्षांसाठी राखीव असलेल्या विमानातून टेक्ससच्या २ दिवसांच्या दौर्यावर निघाले. ते टेक्सस राज्यातील ५ शहरांना भेट देणार होते. टेक्ससमधील त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही नेत्यांमध्ये परस्पर वाद झाला होता. निवडणुकीपूर्वी केनेडींना कोणत्याही किंमतीत हा वाद संपवायचा होता.
त्या काळात टेक्ससमध्ये काही जहाल मतवादी लोकांमुळे काहीसे तणावाचे वातावरण होते व केनेडींना त्याची कल्पना होती. विशेषतः डॅलसमध्ये ते जहाल मतवादी आपले अस्तित्व दाखवून देतील असा त्यांचा अंदाज होता. डॅलसमध्येच एक महिन्यापूर्वी अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधी अॅडलाई स्टिव्हन्सन यांना एका भाषणानंतर मारहाण झाली होती.
________________________________________________________________________________________________ (क्रमशः)
(सूचना - ही लेखमाला लिहिण्यात माझे संशोधन शून्य आहे. काही लेख, आंतरजाल इ. च्या माध्यमातून मी घटना एकत्रित स्वरूपात लिहिल्या आहेत.)
प्रतिक्रिया
9 Jan 2025 - 10:16 pm | मुक्त विहारि
पुभाप्र...
10 Jan 2025 - 11:49 pm | सौंदाळा
वाचतोय
पुभाप्र
11 Jan 2025 - 9:51 am | विजुभाऊ
हे लिखाण " लेख" या ऐवजी "चर्चा" या विभागात का लिहिले आहे.
11 Jan 2025 - 3:20 pm | श्रीगुरुजी
पुढील भाग "लेख" या विभागात लिहेन.
11 Jan 2025 - 3:57 pm | टर्मीनेटर
शीर्षक वाचून जॉन अब्राहाम नावाच्या 'ठोकळ्या' अभिनेत्यावर मालिका? आणि लेखकाचे नाव वाचल्यावर त्यावर मालिका लिहिण्याएवढे श्रीगुरुजी त्याचे 'फॅन' आहेत ह्याचे आश्चर्य वाटल्याने धागा उघडला, परंतु हे जानराव भलतेच निघाले की 😀