लोणचं वगैरे करणं हा माझ्या आईचा खास प्रांत आहे.त्यात आवळ्याचे लोणचे तुम्ही करत असाल ,पण आईनं खुप सुंदर आवळ्याचा छुंदा केला.
अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ लागतो.यानुसार आवळ्याच्या छुंद्याला आवळे:गुळ १:१ असे प्रमाण असावे.
आवळे इडली पात्रात वाफवून घ्यायचे.वाफवल्यानंतर बिया काढून टाकायच्या.आता फोडी गार करून मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या, तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकता किंवा किसून घेऊ शकता.गुळ आणि बारीक आवळा एकत्र करायचा.कढईत मंद गॅसवर परतायला सुरू करायचे.त्यात मसाले - बारीक केलेली चिमूटभर मिरी, धनेपूड ३ चमचे,लाल तिखट आवडीनुसार,काळं मीठ,वेलची पूड टाकायचा.हे मिश्रण छान परतल्यावर ,जरासे घट्ट व्हायला लागल्यावर गॅस बंद करा.
*नंतर एक लिंबाचा रस त्यात पिळून घ्यायचा.छुंदा गार करून काचेच्या बरणीत भरायचा.
बरोबरीने कोवळ्या तुरीचे उकडून परतलेले दाणे,मेथीचे पराठे होते.मग तुम्ही कधी करता हा थंडीचा बेत😊
प्रतिक्रिया
30 Dec 2024 - 2:53 pm | कंजूस
जमला आहे तुला. थाळी ताट चांगलं सजलं आहे.
30 Dec 2024 - 4:15 pm | गवि
रायआवळे की डोंगरी आवळे?
कैरीचा छुंदा कॉमन आहे. आवळ्याचा प्रथम ऐकला. नवीन प्रकार कळला. एकास एक प्रमाणात गूळ म्हणजे गुळांबाच म्हणता येईल. आवळ्याचा मुरब्बा मिळतो.
30 Dec 2024 - 5:01 pm | Bhakti
डोंगरी आवळा ,ज्यात बी मोठे असतात.होय मुरांबात,गुळांबात केवळ गुळ असतो छुंद्यात तिखट ,मसाले(मिरी) टाकायची.
30 Dec 2024 - 6:07 pm | कर्नलतपस्वी
पिझ्झा बर्गरच्या जमान्यात जुन्या खाद्यपदार्थांच्या रेसिपीज वाचून तो.पा.सू.
1 Jan 2025 - 4:18 am | चित्रगुप्त
मस्त. प्राठ्ठ्याचा आकार पण फार आवडला. (दिल्लीकडे 'प्राठ्ठा' असा उच्चार करतात)
या दिवसात आवळे मिळतात त्यामुळे पाच-सहा किलो आवळ्याचा रस (ज्यूसर मधून काढलेला) काचेच्या बाटल्यांमधे साठवून ठेवतो आणि उन्हाळ्यात रोज थोडा थोडा घेतो. हा रस हलकासा पिवळट पांढरा निघतो आणि थोड्या वेळाने पांढरा दाट भाग बाटलीच्या खाली बसून अगदी पारदर्शक रस वर रहातो तर पतंजलीचा आवळा ज्यूस काळपट असतो (वाळवलेल्या आवळकंठीत पाणी मिसळून करत असावेत, आणि तो काळपटपणा लपवायला गडद रंगाच्या प्लास्टिक बाटलीत भरून विकतात)
आवळ्याचे तुकडे केल्यावर बियांभोवती शिल्लक रहाणारा गर उकडवून त्याचे असेच काहीतरी कालच बायकोने केले आहे. (नंतर बघतो काय आहे ते)
1 Jan 2025 - 9:53 am | गोरगावलेकर
थाळीही छानच दिसतेय .
8 Jan 2025 - 3:47 am | जुइ
आवळ्याच्या छुंदयाची पाकृ आवडली. इथे ताजे मिळाल्यास नक्की करेन.
11 Jan 2025 - 12:24 pm | टर्मीनेटर
आवळ्यापासुन बनणारे मोरावळा, च्यवनप्राश, लोणचे, आवळा सुपारी, सरबत वगैरे पदार्थ माहिती आहेत आणि आवडतेही आहेत. कैरीचा छुंदा हा देखील आवडीचा प्रकार, पण 'आवळ्याचा छुंदा' बद्दल पहिल्यांदाच वाचले! निर्मिती प्रक्रीयाही कैरीच्या छुंद्याच्या तुलनेत एकदम 'झटपट' प्रकारची आहे.
एक शंका हा छुंदा (भरपुर गुळ घातला असला तरी) चवीला काहिसा तुरट लागतो का?
11 Jan 2025 - 12:26 pm | Bhakti
हो ,पण जास्त नाही.अर्थात हा पदार्थ आवळ्याचा आहे हे १००% समजतेच ;)
11 Jan 2025 - 12:44 pm | टर्मीनेटर
बेस्ट... कारण ते समजले पाहिजे हेच अपेक्षीत होते! मला आवळ्याची तुरट चव आवडते.
तसेही गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट ह्या सहा रसांचा कमी-अधिक प्रमाणात समावेश असलेल्या अन्नपदार्थांची मजाच काही वेगळी असते!