नमस्कार मिपाकरांनो,
सुमारे तीन वर्षांपूर्वी (२२ डिसेंबर २०२१ रोजी) मी ही लेख मालिका लिहायला सुरुवात केली होती. ह्या मालिकेतला नववा भाग २४ मार्च २०२३ रोजी प्रकाशित केला होता त्याला आता जवळपास पावणे दोन वर्षे उलटली आहेत. ज्या मामे बहिणीच्या घरी ह्या सहली दरम्यान गोव्यात मुक्काम केला होता आणि तिचे अनेक उल्लेख व एखाद-दोन फोटोही ह्या मालिकेतील गोवा विषयीच्या भागांमध्ये आले आहेत, नेमक्या त्याच सुमारास कर्करोगामुळे तिची प्रकृती अतिशय खालावली होती आणि मे महिन्यात तिचे अकाली निधन झाले. आपल्या अतिशय जिवाभावाची व्यक्ती कायमसाठी आपल्यातुन निघून जाते तेव्हा काय मनःस्थिती होते ह्याची आपल्या सर्वांना कल्पना असेलच. तर तशीच काहीशी मनःस्थिती त्यावेळी माझीही झाल्याने भावनिक कारणामुळे ह्या मालिकेचे पुढचे भाग काही त्यावेळी माझ्याकडून लिहिले गेले नाहीत त्यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.
काल गोरगावलेकर ताईंच्या दक्षिण गोव्यावरील मालिकेच्या तिसऱ्या भागावर तळकोकणा विषयी थोडी चर्चा झाली. त्या चर्चेतून माझ्या अपूर्ण राहिलेल्या ह्या मालिकेतले तळकोकणा बद्दलचे भाग आधी केवळ कॅप्शन सहित फोटोज आणि काही छोट्या छोट्या व्हिडीओजचा समावेश करून 'तळकोकणाचे चित्ररूप दर्शन - देवबाग, तारकर्ली, वालावल' आणि 'तळकोकणाचे चित्ररूप दर्शन - तेरेखोल, रेडी, शिरोडा, उभादांडा' अशा शीर्षकाने दोन धागे प्रकाशित करावेत आणि बाकीच्या वर्णनाचे तपशील त्यात नंतर भरून ते सुधारित धागे ह्या मालिकेचे पुढचे दोन भाग म्हणून प्रकाशित करून ही अर्धवट राहिलेली मालिका पूर्ण करावी अशी कल्पना सुचली होती, परंतु मग असा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा आधीच्या भागांप्रमाणे फार तपशिलात न जाता फोटो आणि व्हिडिओंच्या जोडीला धावते वर्णन करून ही मालिका ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करावी असे ठरवले आहे. आता बऱ्याच अवधीनंतर पुढचे भाग लिहीत असल्याने मालिकेशी किती समरस होता येईल ह्याविषयी थोडा साशंक असलो तरी आजपर्यंत मिपाकरांनी वेळोवेळी मला सांभाळून घेतले आहे तसेच ह्या वेळीही मोठया मनाने सांभाळून घेतील ह्याचीही खात्री आहे!
आपला क्षमाभिलाषी - टर्मीनेटर
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १०
दुपारी तीनच्या सुमारास पणजी मार्केटमधली आपल्या मुलासाठीची गोवा स्पेशल कपडे आणि खेळण्यांची खरेदी एकदाची आटपून भाऊ मी बसलो होतो त्या मांडवी नदी किनाऱ्यावरील 'वॉटरमार्क' ह्या फ्लोटिंग लाउंज & बार मध्ये येऊन पोचला तोपर्यंत नुकतीच मी दुसरी बिअर ऑर्डर करून झाली होती. आरामात बसून ती रिचवेपर्यंत साडेतीन वाजून गेले. मग तिथून उठून नदीच्या पलीकडे थोड्या अंतरावर दिसणारा 'रिस मागोस' किल्ला पाहायला आम्ही निघालो.
वॉटरमार्क मधून नदीच्या पलीकडे दिसणारा रिस मागोस किल्ला जवळ वाटत असला तरी रस्त्याने मोठा वळसा घेऊन जावे लागत असल्याने ते अंतर आठ किमी भरले. टेकडीवर असलेल्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोचल्यावर तिथल्या रखवालदाराने उद्या ह्या ठिकाणी कोणा केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत गोवा सरकारचा कुठलासा शासकीय कार्यक्रम होणार असून आत त्याची तयारी सुरु असल्याने आज दुपारी एक नंतर पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश बंद असल्याचे सांगितले. अर्थात किल्ल्याच्या आत जाण्यास परवानगी नसली तरी वरती त्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊन टेकडीवरून आसपासचा नजारा बघता येणार असल्याने आमच्या सामानाची राखण करण्याची जवाबदारी त्या रखवालदारावरच सोपवून वरती जाऊन काही फोटो काढले.
वरच्या फोटोत ज्याची माहिती दिली आहे ते झाड
मी हा किल्ला आधी बघितलेला होता पण भावाला तो बघता आला नाही म्हणून त्याचा मात्र थोडा हिरेमोड झाला! मिपाकर दुर्गविहारी ह्यांनी 'रेइश मागुश/रीस मागोस/रइस मॅगोज/Reis Magos fort आणि ग्यास्पर दियश ( Gaspor Dios )' ह्या त्यांच्या लेखात रिस मागोस किल्याची छान सविस्तर आणि सचित्र माहिती दिली आहे, इच्छुकांनी ती जरूर वाचावी.
रिस मागोस किल्ला परिसरात थोडेफार फोटो काढून साडेचारच्या सुमारास आम्ही कुडाळच्या दिशेने प्रस्थान केले.
पेडण्याला पेट्रोल भरण्यासाठी एक थांबा घेऊन बाईकची टाकी फुल केल्यावर पत्रादेवी चेकपोस्ट जवळ आल्यावर गोव्याच्या हद्दीतच माझीही टाकी फुल करून घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या 'रवींद्र बार अँड रेस्टोरंट' येथे दुसरा थांबा घेतला तेव्हा पावणे सहा वाजत आले होते. रिस मागोस किल्ला बघायला न मिळाल्याने बराच वेळ वाचला होता त्यामुळे तिथून फारतर पस्तीस-चाळीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कुडाळ मुक्कामी इतक्या लवकर पोहोचून तरी काय करायचे असा विचार करून ह्याठिकाणीच निवांतपणे 'बसून' नंतर तिथेच पोटपूजा उरकून मगच पुढे जाण्याचे ठरवून टाकले.
आज दुपारपासून चालकाची भूमिका स्वीकारायला लागलेल्या भावाला मात्र रेस्ट हाऊसवर पोहोचेपर्यंत 'कोरडा' उपवास घडणार होता, पण त्याच्या मनाची तेवढी तयारी झालेली होती.
जवळपास दोनेक तास तिथे निवांतपणे बसून 'पान-खान' उरकल्यावर तिथूनच एक काजु फेणीचे बाटली पार्सल घेऊन आठच्या सुमारास पुढचा प्रवास सुरु करून बैलगाडीच्या वेगाने रस्ता कापत करत नऊच्या थोडे आधीच कुडाळला रेस्ट हाऊसवर पोचलो. बंधुराजांचा फेणीचा दुसरा पेग संपायच्या आतच लोळत पडून टीव्ही बघता बघता मला केव्हातरी झोप लागून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला आम्हाला चांगलाच उशीर झाला होता त्यामुळे आधी नाश्ता आणि त्यानंतर अंघोळी पांघोळी वगैरे उरकेपर्यंत दुपारचे साडे बारा वाजून गेले होते. आज तळकोकण दर्शनाची सुरुवात 'देवबाग' पासून करायचे ठरवून पाऊणच्या सुमारास आम्ही बाहेर पडलो.
रेस्ट हाऊस पासून देवबाग पर्यंतचा चाळीस किमी अंतराचा प्रवास दीडेक तासात रमत-गमत पूर्ण करून साधारण सव्वादोनच्या सुमारास देवबागला ज्या ठिकाणी कर्ली नदी अरबी समुद्राला येऊन मिळते त्या 'संगम पॉईंट' जवळ पोचलो.
संगम पॉईंटकडे जातानाच्या रस्त्यावर 'मोबरेश्वर' मंदिरापर्यंत गाड्या जाऊ शकतात. मंदिराजवळ सावलीत बाईक पार्क करून, मोबरेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही संगमावर जायला निघालो.
देवबागला जाऊन आलेल्यांना त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीची कल्पना असेल परंतु तिथे न गेलेल्यांना त्याची व्यवस्थित कल्पना यावी म्हणून जालावरून घेतलेली एक ड्रोन इमेज खाली देत आहे.
वरच्या फोटोत डावीकडे अरबी समुद्र, उजवीकडे कर्ली नदी आणि मध्ये सफेद-सोनेरी वाळूचा सुंदर किनारा लाभलेला 'संगम पॉईंट'
संगम पॉईंटवरून टिपलेली कर्ली नदीकडच्या बाजूची आणि अरबी समुद्राची काही विलोभनीय दृश्ये ▼
संगम पॉईंटवर लावलेला एक फलक
कोकणात-तळकोकणात अनेक समुद्र किनाऱ्यांवर देवस्थाने आहेत त्यामुळे असे फलक दृष्टीस पडले तरी त्यामुळे पर्यटकांना विचलित व्हायचे कारण नाही!
ह्याच देवबागमध्ये अरबी समुद्राच्या बाजूची जी किनारपट्टी आहे (वरती दिलेल्या द्रोण इमेजमध्ये डावीकडे दिसणारी) त्यावर अनेक स्थानिकांनी प्रायव्हेट बीचची सुविधा असलेले होम स्टे'ज, कॉटेजेस, आणि काही हॉटेल्स आणि बीच रिसॉर्ट्सही बांधली आहेत. त्याठिकाणी मुक्काम केल्यास कल्पनेपलीकडच्या सुविधा अनुभवता येऊ शकतात.
आम्ही तीन मित्रांनी २०१५ मध्ये इथल्या एका पाच-सहा कॉटेजेस असलेल्या 'गावठी' रिसॉर्टमध्ये २ रात्री मुक्काम केला होता त्यावेळी खूप छान अनुभव आला होता.
त्या कॉटेज वाल्याने आम्हाला मद्यपानासाठी सुरुवातीला झावळ्यांच्या छपराखाली लावून दिलेल्या ह्या टेबल खुर्च्या जसे ऊन उतरू लागले तशा पायाचा घोटा बुडेल इतक्या पाण्यात नेऊन लावून दिल्या.ओहोटीची वेळ असल्याने लाटा आमच्यापासून सात आठ फूट लांब अंतरापर्यंत येऊन परतू लागल्या कि त्याचा कर्मचारी स्वतःहून येऊन आमचे टेबल खुर्ची पुढे नेऊन लावून द्यायचा आम्ही फक्त आपापले ग्लास त्यावेळी उचलून उभे राहायचो, आणि टेबल खुर्च्यांची पुढे मांडणी झाली की त्यावर जाऊन बसायचो. बऱ्यापैकी अंधार पडल्यावर हा खेळ थांबला तेव्हा मागे वळून बघितल्यावर लक्षात आले आपण आपल्या कॉटेज पासून किती लांब आलोय ते!
काही जोडपी आणि एक सात-आठ फक्त महिलांचा ग्रुपही त्यावेळी त्याठिकाणी मुक्कामाला होते. पण कोणालाच कोणाचा काही त्रास नव्हता, सगळेजण आपापल्या विश्वात मश्गुल होऊन 'एंजॉय' करत होते.
त्यानंतर प्रत्येकवेळी कुडाळ येथे मुक्काम करूनच ह्या परिसरात फिरणे झाले त्यामुळे इच्छा असूनही ह्या ठिकाणी पुन्हा मुक्काम काही करता आला नाही. अर्थात तळकोकण फिरण्यासाठी कुडाळ येथे मुक्काम करून आसपासचा परिसर फिरणेच पर्यटकांना सर्वच दृष्टीने सोयीस्कर पडते. पण वॉटरस्पोर्टस आणि सकाळी लवकर करायच्या काही ऍक्टिव्हिटीज साठी देवबागला एखाद रात्रीचा मुक्काम करणे देखील आनंददायी ठरू शकते. परंतु मद्यप्रेमी मंडळींनी मात्र तारकर्ली असो की देवबाग ह्या ठिकाणी किंवा तळकोकणातल्या (मालवण,कुडाळ, कणकवली सोडून) अन्य कुठल्या ठिकाणी मुक्काम असेल तर आपापला दारुगोळा सोबत नेणे उत्तम, हॉटेल/रिसॉर्टवाल्यांकडून घेतल्यास अवाच्या सव्वा किंमत तर आकारली जातेच पण हवा तो 'ब्रँड' मिळेलच ह्याची कोणतीही शाश्वती नसते, "त्यांच्याकडे जे असेल तेच मिळेल"!
असो... करोना काळातले निर्बंध शिथिल झाल्यावर गोव्यात पर्यटक येण्यास सुरुवात झाली असली तरी सिंधुदुर्गात येण्यास फारसे कोणी उत्सुक नसावे बहुतेक, त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स, अन्य ऍक्टिव्हिटीज आणि बीच रिसॉर्ट्स वगैरे सगळे काही बंद होते आणि आम्ही दोघेजण सोडून त्यावेळी देवबागमध्ये अन्य कोणीच पाहुणे दिसले नाहीत. अर्धा-पाऊण तास संगम पॉईंटवर मजेत घालवून तिथल्याच 'हॉटेल नरेंद्र सावली' ह्या सुरु असलेल्या एकमेव उपहारगृहात मिसळ पाव आणि बटाटा भजी हे उपलब्ध असलेले दोन पदार्थ खाऊन आणि कोकम सरबत पिऊन थोडीशी पोटपूजा उरकून घेतली आणि सहा किमीवर असलेल्या तारकर्ली बीचकडे मोर्चा वळवला
वीसेक मिनिटांत तारकर्ली बीच जवळ पोचलो तर समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे दगड धोंडे रचून तो तात्पुरता बंद केल्याचे दिसले. मग बाईक तिथेच ठेऊन त्या दगडांवरून थोडी कसरत करत फार आत पर्यंत न जाता काही अंतरावरूनच थोडेफार फोटो काढले.
▲तारकर्ली बीचवरुन लांबवर दिसणारा मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला (फोटो झूम करून काढल्याने दूर अंतरावरचा किल्ला पुरेसा स्पष्टपणे दिसत नाहीये)
सामान्य परिस्थितीत पर्यटकांची भरपूर वर्दळ असणारा परंतु त्यावेळी नजर जाईल तिथपर्यंत अक्षरशः चिटपाखरूही दृष्टीस न पडलेला तारकर्ली बीच पाहून कसेसेच वाटल्याने त्याठिकाणी पाच-सात मिनिटांपेक्षा अधिक वेळ न घालवता तिथून पस्तीस किमी अंतरावर असलेल्या वालावलला जायला निघालो. मधेच काही चांगले दिसले तर थांबून फोटो काढत प्रवास सुरु होता.
तारकर्लीचे श्री दत्त मंदिर
कर्ली नदीवरील पूल
पुलाच्या डाव्या बाजूचे निसर्ग सौंदर्य (१)
पुलाच्या डाव्या बाजूचे निसर्ग सौंदर्य (२)
पुलाच्या उजव्या बाजूचे निसर्ग सौंदर्य १
पुलाच्या उजव्या बाजूचे निसर्ग सौंदर्य २
त्यावेळी उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेला चिपी विमानतळ
मस्तपैकी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस असलेल्या दुसऱ्या द्वाराजवळ जवळ पोचल्यावर ऐतिहासिक वास्तू/वस्तू/मूर्ती/शिल्पे अशा गोष्टींविषयी प्रचंड आस्था असल्याने त्याठिकाणी उकिरड्यावर टाकून दिलेली एक वीरगळ पाहून सुन्न झालो.
आसपासच्या फुलं, नारळ, पूजासाहित्य विकणाऱ्या दुकानदारांकडे त्या प्रकाराबद्दल विचारणा केल्यावर कोणालाच त्या ऐतिहासिक ठेव्याविषयी काडीचीही किंमत असल्याचे जाणवले नाही. त्यामुळे त्यावेळी पहिल्यांदाच बाईक घेऊन ह्या ठिकाणी आल्याचा पश्चाताप झाला. चारचाकी नेली असती तर सरळ ती वीरगळ गाडीत टाकून घरी घेऊन आलो असतो!
असो, वालावलचे हे लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्याचा परिसर खूप छान आहे.
लक्ष्मीनारायण मंदिर
लक्ष्मीनारायण मंदिराला लागून असलेल्या तलावाकाठचे लहानसे शिव मंदिर
लक्ष्मीनारायण मंदिराला लागून असलेला तलाव
तलावाच्या पाण्यात दिसणारी मावळत्या सूर्याची दोन प्रतिबिंबे
लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्याचा परिसर पाहून झाल्यावर तिथून अर्धा किमी अंतरावर असलेल्या कर्ली नदीवरच्या फेरी बोटींच्या धक्क्यावर पोचलो.
कर्ली नदी
कर्ली नदीतले काळसे बेट
ह्याठिकाणी कर्ली नदीतल्या खाजगी मालकीच्या बेटाभोवती बोटीतून फेरी मारत एकाबाजूला खारफुटी तर दुसऱ्या बाजूला कांदळवन पाहणे हा खूप छान अनुभव असतो परंतु आम्हाला ह्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला होता आणि तोपर्यंत बोटिंग बंद झाले होते त्यामुळे काठावरूनच आसपासचे निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून घेऊन कुडाळ मुक्कामी परतण्यासाठीचा प्रवास सुरु केला.
साधारण अर्ध्या तासात ११ किमीचा प्रवास करून सातच्या सुमारास रेस्ट हाऊसवर पोचलो. बऱ्यापैकी वेळेत पोचल्यामुळे रेस्ट हाऊसच्या आचाऱ्याला माझ्यासाठी मालवणी वडे आणि भावासाठी पोळ्या अशा विशेष सूचनांसहित आमच्या दोघांसाठी शाकाहारी जेवणाची व्यवस्था करायला सांगितली आणि काल गोव्याहून परतताना आणलेली काजू फेणीची बाटली काढुन तिचा आस्वाद घेता घेता उद्याच्या तेरेखोल, रेडी, शिरोडा, उभादांडा अशा भटकंतीचा कार्यक्रम ठरवून टाकला. साडेनऊच्या सुमारास रेस्ट हाऊसच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण झाल्यावर थोडावेळ टीव्ही बघत टाईमपास करून साडेदहा-पावणे आकाराला निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
क्रमशः
प्रतिक्रिया
27 Dec 2024 - 4:36 pm | श्वेता२४
क्रमशः वाचुन आन॑द झाला.
27 Dec 2024 - 5:01 pm | मुक्त विहारि
वाखुसा
27 Dec 2024 - 5:45 pm | Bhakti
संगम ठिकाण खुपच मस्त आहे.वालावल लक्ष्मी नारायण विषयी ऐकून आहे.
27 Dec 2024 - 7:10 pm | कंजूस
सुंदर.
वालावल, काळसे, धामापूर हा परिसर पाहिला आहे. रम्य आहे. हाऊस बोटी बंद होत्या का?
27 Dec 2024 - 8:35 pm | अथांग आकाश
मस्तच! पुभाप्र!!
27 Dec 2024 - 10:36 pm | सौंदाळा
मेंदूचे कार्य खरोखरच विस्मयजनक आहे. इतक्या अंतराने हा भाग टाकूनसुध्दा मध्ये खंड पडलाय असे जाणवलेच नाही. आवडत्या गोष्टी बरोब्बर लक्षात राहतात.
गोव्यात खूप वेळा जाऊन पण कधी अग्वादा आणि चापोरा सोडून बाकी किल्ले बघितले नाहीत. फेब्रुवारीत जायचा प्लॅन आहे तेव्हा प्रयत्न करेन.
तळकोकणाबद्दल काय बोलायचे. सुंदर वर्णन, फोटो आणि जबरदस्त भटकंती. २०११ एकदिवसीय विश्वचषकाच भारत वी. श्रीलंका सामना देवबागेत जे फोटोत सुमद्रात घुसलेले जमिनीचे टोक आहे तिकडून केवळ १००,१५० मीटर अंतरावर असलेल्या एका होम स्टे मध्ये पहिला होता आणि जिंकल्यावर रात्री त्या टोकावर जावून केलेली धमाल अगदी अविस्मरणीय सहल होती.
त्यानंतर २०२१ दिवाळी सुट्ट्यांमध्ये गेलो होतो. धावती भेट होती. संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवबाग पासून वायरी भूतनाथ मार्गे मालवणला १० किमिसाठी तब्बल दीड तास लागला. असो.
समुद्राच्या लाटा पायाला चुंबत असताना मदिरापान, वाह मानले तुम्हाला.
पुभाप्र.
28 Dec 2024 - 9:17 am | चंद्रसूर्यकुमार
मस्त लेख आणि फोटो. या लेखाचा आधी बॅक-अप घेऊन ठेवला होता का? कारण तिथे जाऊन आलात त्याला तीन वर्षाहून जास्त काळ उलटला आहे असे वाटत नाहीये. अगदी कालपरवाच तिथून परतलात असे वाटत आहे. बॅक-अप घेतला नसेल तरी हे सगळे स्मरणशक्तीतून लिहित असाल तर मात्र साष्टांग दंडवत.