संपादकीय - दिवाळी अंक २०२४

गवि's picture
गवि in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 7:18 am

आपलं मिसळपाव यंदा अठरा वर्षांचं झालं! मिपा मालक, चालक, वाहक आणि व्यवस्थापन यांच्यासाठी मिपा हे अपत्यच आहे. अपत्य हा शब्द जरा जड झाला. लहान पोर म्हणता येईल. पण बघता बघता हे पोर अठरा वर्षांचं झालंसुद्धा. इतर पोरं जन्मतः निरागस असतात. ती हळूहळू बिघडत जातात. इथे मात्र उलटी गंगा होती. हे कार्टं जन्मतःच इरसाल होतं. सज्जनांच्या शेंडीला झिणझिण्या आणणाऱ्या आणि त्यांचा कासोटा सटकन सोडणाऱ्या शिव्या देत त्याचं बालपण सुरू झालं. जन्मतःच समोर दिसणाऱ्या नर्सकडे बघून हे बालक तिच्या सौंदर्याला दाद देत असे, असं म्हणतात.

बा*** भें** वगैरे बोबडे बोल बोलत बोलत हे बाळ इतरांच्या विपरीत, वाढत्या वयानुसार सज्जन होत गेलं. सोळाव्या-सतराव्या वर्षी तर अगदी गुणी बालक, सौम्य प्रकृती वगैरे दिसायला लागली.

अठरा वर्षं पूर्ण झाल्याचं जेव्हा सर्वांना एकदम जाणवलं, तेव्हा हाही विचार मनात आला की आता याला जरा शिकवणी लावावी लागते की काय! की बाबा, तू आता मोठा झालास. कविता, ललित, पाककृती हे सगळं ठीकच आहे. पण अठरा वर्षांचा झाल्यामुळे तुला आता काही गोष्टी समजल्या पाहिजेत. तू सगळं विसरून गेला आहेस.

अठराचं वय म्हणजे क्या केहने? त्या वाढदिवसाला तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या एकदम एक मोठ्ठं कपाट आपल्याला खुलं होतं. इतरही अनेक पर्क्स मिळतात या वेळी. एकूण यादी येणेप्रमाणे..

मतदान - उभ्या राहिलेल्या लोकांत कोणी लायक असो वा नसो. माझा हक्क बजावण्यासाठी तरी एकदा तर्जनी काळी करून येणार आणि तिचा फोटो माझ्या चेहऱ्याच्या बाजूला धरून व्हायरल करणार.

ड्रायव्हिंग (गियरसह) - स्कूटी वगैरे तडजोडी आता नाहीत. आता मीच जॉन अब्राहम. घसरत्या सीटवर मागे पोरीला बसवून घाटात जायला मोकळा. सगळ्या नव्हे, पण अनेक मुलीसुद्धा आता अठराच्या झाल्या की फक्त पोरांच्या मागच्या सीटवर बसण्याऐवजी त्यांच्या गँगमध्ये सामील होत स्वतःची बाइक सुसाट दामटताना दिसतात. त्यांचे चेहरे झाकलेले नसतील, तर त्यावर जी स्वातंत्र्याची झिंग दिसते, ती लाजवाब असते. कधी कधी तिच्यामागे तिचा जॉन अब्राहम घाबरून पिळवटलेल्या चेहऱ्याने घट्ट बसलेला दिसतो.

बियर - नाही नाही. यासाठी आणखी वाट बघावी लागणार. तरीही अठराचे झाल्यावर बहुतेक पोरट्यांनी आधीच ही देखील स्कूटर बेताबेताने आणि पोलिसांपासून लपून छपून गल्लीतून फिरवलेली असते. ती राजरोस शंभरच्या स्पीडने पळवण्याचं लायसन आणि व्हिस्की-व्होडकासाठी मात्र आणखी तीन वर्षे कळ सोसणे प्राप्त.

सेक्स - याला सोज्ज्वळ प्रतिशब्द सापडत नाही. मराठीत तर आणखीच गडद होतात छटा, म्हणून इंग्लिश बरं. तर वय सतरात आणि मदन गात्रात... त्यामुळे मदन एक वर्ष आधीच आपल्या झाडाला धरून बसलेला असतो. पण अठराचा जादुई नंबर आला की कायदेशीरदृष्ट्या तुम्ही प्रौढ होता. जर उभयपक्षी राजीखुशी असेल (असतात असेही भाग्यवान) तर किमान तुमचं तारुण्यसुलभ 'कृत्य' बेकायदेशीर ठरत नाही. बाकी यापुढे अजाण म्हणून गुन्ह्यापासून थोडक्यात होणारी सुटका मात्र होणे नाही. त्यामुळे जबाबदारी हीदेखील त्या वाढदिवसाची एक गिफ्ट असते.

या सर्व नवीन हक्कांतील प्रत्येक हक्क आपण एका वेळी एक असा बजावू शकतो. एकाच वेळी अनेक बजावणं तांत्रिकदृष्ट्या शक्य असेल, पण प्रत्यक्षात अवघड. बहुसंख्य बिचाऱ्या पोरापोरींना हे सर्व हक्क फक्त कागदावर मिळतात. प्रत्यक्षात अंमलबजावणीची चांगलीच बोंब असते. त्यांना मतदानावरच समाधान मानावं लागतं. कारण ते फुकट आणि सहज.

तर हे गुऱ्हाळ आटोपतं घेत मूळ विषयाकडे येतो. मिपा अठरा वर्षांचं झालं. मिपा बिचारं वरील हक्कांपैकी कोणताही हक्क बजावण्याचं सुख घेऊ शकत नसल्याने या वेळच्या दिवाळी अंकासाठी थीम ठेवताना १८+ साहित्य आणि निवडणुका असे विषय घ्यावे, असं मिपा पालकांनी ठरवलं. शिवाय नुकताच मराठी भाषेला बऱ्याच काळाच्या विलंबाने का होईना, पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्याबद्दलही वैचारिक घुसळण, ऊहापोह व्हावा या दृष्टीने तोही विषय त्यात टाकला. बाकी ऊहापोह हा शब्द खूप चविष्ट आहे. वरून खोबरं-कोथिंबीर पेरलेले गरमगरम कांदेपोहे डोळ्यासमोर येतात.

वाचकांनी आणि सदस्यांनी दिवाळी अंकाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नेहमीप्रमाणे भरभरून लेखन पाठवलं. निमंत्रित लेखकांनीदेखील कोणतेही आढेवेढे न घेता लिखाण दिलं. अठरा+ असा विषय असूनदेखील कोणीही उघड्यावाघड्या अश्लीलतेच्या निसरड्या प्रदेशात पाऊल न पडू देता सफाईदारपणे संयत पण धीट लेखन केलं.

या अंकासाठी नेहमीप्रमाणे पडद्याआड राबणारे हात असंख्य आहेत. सर्वांचा उल्लेख करण्यात स्क्रोल बार वाढत जाईल आणि तरीही कोणीतरी राहून जाईल, याचा ताण मनावर येतो. तरीही आवर्जून उल्लेख करावा असे शिलेदार म्हणजे सजावट आणि अंकाची निर्मिती करणारे टर्मीनेटर, मुद्रितशोधनाची किचकट जबाबदारी स्वतःहोऊन खांद्यावर घेऊन वेळेत पूर्ण करणारे सुधांशुनूलकर, सर्वांशी संपर्क आणि संवाद ठेवत ठेवत वेळेवर साहित्य गोळा करणारे प्रशांत आणि त्याचं साहाय्यक संपादक मंडळ, दिवाळी अंकाच्या वेळी मिसळपाव सर्व्हर व्यवस्थित चालू राहावा म्हणून जे काही लागेल ते करणारा नीलकांत. (या वेळी कुठेतरी नवस बोलून ठेवला होतान आणि पुढच्या महिन्यात फेडायला जाणार आहे म्हणतात).

सर्व सदस्य आणि वाचक यांच्यामुळे दर वर्षी हा अंक निघत आला आहे. कोणताही इतर मोबदला नसताना अनेक लोक वेळात वेळ काढून यासाठी कष्ट घेतात ते केवळ तुमच्यासाठी.. कारण तुमच्या कौतुकाचा एक शब्ददेखील पुरेसा आहे ही धुनी चालू ठेवण्यासाठी. कोण रे तो धुणी म्हणतोय.. बाहेर नेऊन करेक्ट कार्यक्रम करा त्याचा.

अंक तयार आहे. तुमच्यासाठी आधीच प्रकाशित झाला आहे. हे संपादकीयरूपी आंत्रपुच्छ तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमच्या कौतुकाचे शब्द मोकळेपणाने आणि भरभरून प्रतिसादात द्यावेत, अशा विनंतीसाठी. तुमच्या मिसळपावसाठी अठराव्या वर्षाचं हेच सर्वात अमूल्य गिफ्ट ठरेल. त्याच्या अमृतमहोत्सवाच्या वेळीदेखील हे गिफ्ट टिकून असेल आणि आपण पुन्हा पुन्हा ते बघत राहू. पुन्हा पुन्हा नवीन दिवाळी अंकासाठी जोश मिळवत राहू.

सगळे फटाके आणि फुलबाज्या संपवून टाका. काही शिल्लक ठेवू नका पुरचुंडीत..
पुढच्या वर्षी नवीन फटाके..

एन्जॉय.. सर्वांची दिवाळी आनंदाची जावो..

- मिपा परिवार.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

31 Oct 2024 - 10:27 am | प्रचेतस

उत्तम आणि हटके संपादकीय.
ह्यावेळी दिवाळी अंक प्रकाशित होईल की नाही ही शंका असताना दिवाळी अंक प्रकाशित झालाही आणि उत्तमोत्तम लेखांनी सजलाही.

कंजूस's picture

31 Oct 2024 - 11:09 am | कंजूस

छान साधंसोपं रूप आवडलं.

गवि नेहमीच्या शैलीत धुतात.

कर्नलतपस्वी's picture

31 Oct 2024 - 11:27 am | कर्नलतपस्वी

हायला, नाही म्हणता म्हणता दिवाळी अंक मस्तच सजलायं. बल्ले बल्ले.

फराळाचे तिखट मीठ चाखलयं.आता आरामशीर कोपर्‍यात बसून आस्वाद घेईन.

दिवाळी अंक संपादन करून वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याचे मनापासून आभार.

लाँग लिव्ह मिपा........

सौंदाळा's picture

31 Oct 2024 - 11:27 am | सौंदाळा

यंदाच्या थीमला साजेसे संपादकीय.
सुंदर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2024 - 1:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! अंकाला साजेसं मस्त खुसखुशीत संपादकीय. मिपाचं बालपण जाऊन तारुण्य सुलभ वयात पदापर्ण करणा-या मिपाचं चित्र तुम्ही उभं केलं आहे. आपल्यासारखे जाणकार मिपाकर हे मिपाचं वैभव म्हणून असे वेगवेगळे विषय मिपावर येतात. सर्व अंक टीम आणि आपलंही अभिनंदन. दीपावलीच्या शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

पाषाणभेद's picture

31 Oct 2024 - 2:17 pm | पाषाणभेद

केवळ मराठी साहित्याशी जवळीक असावी त्यासाठी काही जण पदराला खार लावून लष्कराच्या भाकर्या भाजण्यासारखे असलेले हे मिपाचे व्रत हौसेने चालवत आहेत. मिपाच्या दिवाळी अंकाचे स्वागत!!

श्वेता२४'s picture

31 Oct 2024 - 3:10 pm | श्वेता२४

दिवाळी अंक नेहमीप्रमाणेच वैविध्यपूर्ण आहे. याचा चवीचवीने आस्वाद घेणार. संपादक मंडळाने सदर अंक प्रकाशित करण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! सर्वांना शुभ दिपावली !!!!

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2024 - 5:36 pm | चौथा कोनाडा

झकास फर्मास संपादकीय !
अगदी आटोपशीर .. थोडेफार १८+धीट !

दिवाळीचा खुसखुशीत फराळ आता साजेश्या सजावट केल्लेल्या सुंदर तबकातून पुढं आलाय ...
एकेक करत सर्व पदार्थांची चव चाखायची ...
.... काही पदार्थ पटकिनी तोंडात टाकुन लगेच पावती द्यायची
.... काही पदार्थ दमादमानं चाखत चेहरा उजळवुन दाखवायचा ...
.... काही पदार्थ निवांत चरत चरत खायचे अन तृप्तीची ढेकर देत पसंती सांगायची

... मात्र फराळ कसा झालाय हे आवर्जून सांगाच्यचं .. म्हणजे पुढच्या दिवाळीला असाच खमंग फराळ मिळणार याची १०१ % खात्री !

अंकात सहभागी झालेल्या सर्व साहित्यिक, कलाकारांचे मनपासून अभिनंदन !

दिवाली अंकासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल मिपा मालक, मिपा संपादक, दिवाळी अंक साहित्य संयोजक आणि इतर पडद्यामागच्या कलाकारां :पूर्वक आभार !!
सर्वांना शुभ दिपावली !!!!

(तटी: अर्रर्र ... माझा लेखही समाविष्ट झाला हा आनंद व्यक्त करायचाच राहिला की !
चांगभेले, बल्ले बल्ले, चियर्स ! चौको खुष हुवा)

सर्वांची दिवाळी आनंदाची जावो.

प्रसाद गोडबोले's picture

31 Oct 2024 - 6:00 pm | प्रसाद गोडबोले

अनुक्रमणिका ?

अनुक्रमणिका कुठाय ?
अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२४ https://www.misalpav.com/node/52441
त्या ध्याग्यावर क्लिक केल्यास असे दिसत आहे .

Access denied
You are not authorized to access this page.

हे असं काहीतरी थोडक्यात पण भन्नाट लेखन तुम्हीच करू शकता हो गविशेठ!
मस्त मार्मिक संपादकीय लिहिलंय 👍

नंदन's picture

1 Nov 2024 - 8:22 pm | नंदन

उत्तम आणि नेटकं संपादकीय!
आता अंक सावकाश वाचतो. मिपाच्या समस्त वाचक-लेखकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

अथांग आकाश's picture

2 Nov 2024 - 12:16 pm | अथांग आकाश

आटोपशीर आणि नेटकं संपादकीय!
समस्त मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

बिपीन सुरेश सांगळे's picture

2 Nov 2024 - 6:09 pm | बिपीन सुरेश सांगळे

गवि
आणि सर्व सर्व संपादक मंडळ ,

खूप आनंद आहे आणि आपले सर्वांचे खूप अभिनंदन !

अंकासाठी काम केलेल्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालं .

संपादकीय उत्तमच !

सर्व मिपा सदस्यांना दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा !

शेखरमोघे's picture

3 Nov 2024 - 8:07 am | शेखरमोघे

"दिवाळी अन्क २०२४" ची वानगी दाखवणारी "सम्पादकीय" ही नान्दी अन्काइतकीच खुसखुशीत आणि चटकदार - मस्त ! !

स्वधर्म's picture

5 Nov 2024 - 9:20 pm | स्वधर्म

अंक वाचून प्रतिक्रीया देईनच. दिवाळी अंकाच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि आभारसुध्दा. केवळ तुम्हा सर्वांमुळे दर्जेदार लेखन वाचायला मिळतंय.

गोरगावलेकर's picture

6 Nov 2024 - 12:46 pm | गोरगावलेकर

सर्व संपादक मंडळाचे अभिनंदन .

झकासराव's picture

6 Nov 2024 - 4:09 pm | झकासराव

मनमोकळं थेट संपादकीय

सविता००१'s picture

7 Nov 2024 - 12:25 pm | सविता००१

आता वाचते सगळं.

चांदणे संदीप's picture

7 Nov 2024 - 1:28 pm | चांदणे संदीप

फ्लेमिंगोंचा थवा उंच आकाशात
गविकाकांचा लेख मिपाच्या नकाशात
(काहीच्या काही) =))

यावर्षी दिवाळी अंक येणार नाही असंच मला(ही) वाटलेलं पण एक ठिणगी पडली आणि शेकोटी मस्त पेटली. काय छान ऊबदार वाटतंय आता. संपादकीय सुद्धा अ ति श य कमी वेळेत, तेही इतके उत्तम! देऊन गविकाकांनीही चार चांद लावले त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. ___/\___

सं - दी - प

दिवाळी अंक छान आहे पण संपादकीय खूप आवडले.सुरुवातीपासून आजपर्यंतचा साकलयाने व वास्तव आढावा घेतलाय, मी सुरूवातीपासूनची सभासद नाही पण सुरुवातीचे काही छान विनोदी लेख खूप,सुंदर विनोदी काही गंभीर पण माहिती होईल व छान लिहिलेले लेख वाचलेत व आवडलेही.

श्रीरंग_जोशी's picture

19 Nov 2024 - 8:41 am | श्रीरंग_जोशी

प्रसंगोचित थेट भाष्य करणारं हलक्याफुलक्या भाषेतलं संपादकीय भावलं.