"गण्या, ऊठ! मुडद्या, रामपार व्हायला आली, तरी लोळतोय घोडा." आक्का करवादून म्हणाली. गावाच्या एका टोकाला असलेल्या घरात हा माता-पुत्राचा सकाळी सकाळी चाललेला प्रेमळ संवाद. रामा थोराताचे हे घर, त्याला एकुलती एक बायको उर्फ आक्का आणि एकुलता एक पोरगा, अर्थात गण्या. आक्का म्हणजे मूळ नाव सीमा, पण आख्खा गाव तिला आक्का म्हणायचा, तर नवसासायासाने झालेला मुलगा म्हणजे गणेश अर्थातच गण्या!
रामाची बागायती पाच एकर जमीन होती, अर्थातच गडी पैशाकडून भक्कम होता. मात्र एकुलत्या एक मुलाचे लहानपणापासून लाड केल्यामुळे गण्या बिघडला होता. हीच एक डोकेदुखी रामाला होती. लहानपणापासून पैसा हातात खेळत असल्यामुळे गण्याचे शाळेत अजिबात लक्ष नव्हते.कसाबसा चौथी पास झाल्यावर गण्याची गाडी पंक्चर झाली आणि तसेही शिकून शेतीच करायची असल्यामुळे त्याने शिक्षणाचा नाद सोडला आणि गावातल्या उनाड टोळक्यात आणखी एका नगाची भर पडली.
गण्या तसा अंगाने धट्टाकट्टा होता. अभ्यासात नसले, तरी व्यवहारात डोके सुपीक होते. पैशाची ददात नसल्यामुळे अंगावर भारी कापडं, डोळ्याला गॉगल आणि बुलेटवरून फिरायचा. मात्र इतके सगळे असले, तरी गण्याचे लग्न जमत नव्हते. बाकी सगळे ठाकठीक असले, तरी गड्याची शिक्षणाकडून लंगडी बाजू होती. मुलींना कमी शिकलेला नवरा नको होता. लग्न जमत नसल्यामुळे गण्या वैतागला होता.
ऊस लावला आणि पिकाला पाणी सोडले की गण्या रिकामा असायचा. खिसा कायम गरम, त्यामुळे सोबत मित्राचे टोळके गराडा घालून बसलेले. गाड्या काढायच्या आणि जवळच्या शहरात जाऊन टिवल्याबावल्या करत फिरायचे, हाच धंदा. त्यात लवकरच गण्याच्या हातात स्मार्ट फोन आला. मग गण्याला अचानक शिक्षणाचे महत्त्व जाणवू लागले. फोनवाल्याकडून मराठी की बोर्ड टाकून घेतला, तरी फोनमधील बरीच माहिती इंग्लिशमध्येच असायची. आता गण्याला इंग्लिश शिकायची निकड जाणवायला लागली. संध्याकाळी सातनंतर इंग्लिश बाटली चालत असली, तरी फोनमधील इंग्लिशमधले इंग्लिश मात्र झेपेना. शाळा चौथीत सोडल्यामुळे गण्याचा इंग्लिशशी तसा फार संबंध आला नव्हता.
फोनमध्ये मात्र बर्याच गमतीजमती होत्या. फोन तर करता यायचाच, तसेच व्हिडिओ कॉलने समोरचा माणूस प्रत्यक्ष बघता यायचा. यू ट्यूबवर आणि इन्स्टावर तर लई भारी बायांचे रील्स बघायला मिळायचे. बायका त्यांच्या गरगरीत बॉड्या लेटेस्ट गाण्यावर लचकवून नाचायच्या. शेतात गेले की गड्यांना काम सांगून गण्या फार्महाउसवर जाऊन रील्समध्ये डोके घालू लागला. त्यात व्हॉट्सअॅप घेतल्यावर गण्याला भारी भारी व्हिडिओ बघायला मिळू लागले. त्यात सनी लिओनीवर तर त्याचा लईच जीव बसला. रात्री स्वप्नातही त्याला सनीच दिसू लागली. हे सगळे छान चालले असले, तरी गण्याला मुख्य अडचण होती ती इन्स्टावर पोरींची अकाउंट हुडकण्याची. कारण या आयटम पोरी त्यांची नावे इंग्लिशमध्येच लिहीत. गण्याला ते काय समजत नसे. बरे, दर वेळी कोणत्या मित्राकडे जावे, तर तो टवाळ्या करून गण्याला खिजवायला कमी करत नसे. गण्या खजील होई, पण पर्याय नसे. इंग्लिश येत नसल्यामुळे त्याला मित्राचे पाय धरावेच लागत.
अशा उनाडक्यांत झकास दिवस चालले असताना, एके दिवशी गण्या श्रावणात नागपंचमीला बत्तीस शिराळ्याच्या यात्रेला गेला. तिथे नागाची पूजा करून मिरवणूक काढलेली आणि बाकी साप प्रदर्शनात ठेवलेले बघायला मिळाले. गण्याला एकदम थ्रिल वाटले. वास्तविक कधीतरी त्याच्या शेतात, सटीसहामाही एखादा साप निघायचा, गावात कोणी सर्पमित्र असला तर सापाला पकडून लांब सोडले जायचे, नसेल मात्र त्या सापाचे मरण ठरलेले. पण आता गण्याला अचानक सापात इंटरेस्ट निर्माण झाला. साप पकडायला शिकायचेच असे त्याने ठरवले. शिराळ्यावरून परत आल्यावर त्याने गावातील सर्पमित्राला - म्हणजे संज्या पाटलाला गाठून त्याला साप पकडायला शिकवण्याची गळ घातली. संज्याबरोबर बराच भटकून त्याने अखेर ही कला साध्य केली. आता गण्या शेतात साप दिसला, तर त्याला न मारता पोत्यात घालून लांब सोडत असे. साप पकडल्यावर आजूबाजूची माणसे लांब पांगत. हे बघून गण्याला थ्रिल आणि आपल्या धाडसाबद्दल अभिमान वाटे. मात्र आक्का यावरून गण्यावर चिडत असे. "मेल्या, गारुड्याच्या पोटाला जन्माला आलायस काय? चांगल्या बागायीत शेतकर्चा मुलगा तू, आणि या नाग-सापाच्या नादाला लागतोस?" अर्थात आईचे बोलणे गण्या कानामागे टाकी आणि पुन्हा साप पकडायची संधी मिळाली तर सोडत नसे.
हे सगळे असले, तरी गण्या समाधानी नव्हता. इन्स्टावरच्या पोरी त्याला खुणावत. यांना गटवायचे तर इंग्लिश यायला पाहिजे. आपले सापाचे व्हिडिओ टाकले तर या पोरी पटवता येतील, असे त्याला वाटायचे. शेवटी इंग्लिश शिकायचेच असे त्याने ठरवले.
आता यासाठी त्याला पुन्हा शाळेत जाणे भाग होते. गण्याने कित्येक वर्षांनी त्या इमारतीत पाऊल टाकले. गण्याने शाळा सोडली तेव्हाची तिची स्थिती आणि आता झालेली सुधारणा यात जमीनअस्मानाचा फरक होता. गण्या मुख्याध्यापकांच्या खोलीत गेला. त्याने आपली अडचण मुख्याध्यापकांना सांगितली. त्यावर त्यांनी त्याला संध्याकाळच्या प्रौढ शिक्षण वर्गाची माहिती दिली. ज्यांना शिकायचे आहे, त्यांच्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली होती. आता या प्रौढ शिक्षणाचे वर्ग नुकतेच सुरू होणार होते. गण्याने आपले नाव नोंदवले आणि पुढील आठवड्यात सुरू होणार्या वर्गाची तो वाट पाहू लागला.
गावच्या पाटलांच्या हस्ते एकदा या वर्गाचे उद्घाटन झाले आणि दुसर्या दिवशी संध्याकाळपासून शाळेच्या एका खोलीत तास सुरू होणार होते. इंग्लिश आणि गणिताचे तास घेतले जाणार होते. जवळच्या शहरातून एक शिक्षिका शिकवण्यासाठी गावात येणार होती. गण्या शाळेच्या पहिल्या तासाला एक वही आणि पेन घेउन जाऊन बसला. गावातील बरेच रिकामटेकडे आणि थोडे शिकण्याची आस्था असलेले लोक बसले होते. काहींंना बँकेच्या व्यवहारात, तर काहीना कागदपत्रात अडचणी आल्यामुळे शिकण्याची निकड झाली होती.
आणि अचानक तिने वर्गात प्रवेश केला. स्नेहा मॅम! एखादी परी अवतरावी अशी स्नेहा दारातून आत आली. साडेपाच फूट उंच, डोक्यामागे केसाची पोनी बांधलेली, भरगच्च अंगाची, गव्हाळ वर्णाची, पिवळ्या रंगाचा चुडीदार घातलेली स्नेहा वर्गात आली, तेव्हा एखादी सुंगधी वार्याची झुळूक आल्याचा भास गण्याला झाला. पहिल्याच नजरेत तो कामातून गेला. काहीसे बदामी डोळे असलेल्या, आणि फारसा मेकप न केलेल्या स्नेहाने हसून सर्वांना नमस्कार केला आणि स्वतःची ओळख करून दिली. लांब विदर्भातील एका गावातील ही मुलगी डी.एड. होऊन शासकीय नोकरीत रुजू झाली आणि तिची पहिली बदली या भागात झाली होती. जवळच्या शहरात खोली घेऊन सकाळी एका शाळेत जाऊन शिकवणार्या स्नेहाला प्रौढ शिक्षणाअंतर्गत आता या गावात येऊन वर्ग घ्यायचे होते.
गण्या तर बघतच राहिला. अर्थात स्नेहाने इंग्लिश शिकवण्यास सुरुवात केली आणि फळ्यावर काढून अक्षर ओळख करण्यास सुरुवात केली, तशी गण्या भानावर आला आणि त्याने वहीत अक्षर लिहायला सुरुवात केली. मात्र त्या दिवसापासून गण्याचा नित्यक्रम बदलला. शेतीचे काम आटोपून टिंगलटवाळ्या करायला पारावर जाणारा गण्या बुलेटवरून तातडीने शाळेकडे जाऊ लागला. अचानक त्याला शिक्षणाचे महत्त्व समजले. अर्थात वहीतील प्रगती यथातथाच असली, तरी गण्याचे डोळे सदैव स्नेहावर खिळलेले असत. आज तिने कोणते कपडे घातले आहेत, पावडरचा वास, तिचे बोलणे यातच गण्या बुडून जाई. भानावर येई, तेव्हा थोडा अभ्यास होई. पण आता गण्याला बर्याच शंका येऊ लागल्या. त्याला प्रश्न पडायला लागले, जे वर्ग संपल्यावर स्नेहाला विचारायचे असत. सारखे सारखे संपर्कात आल्यावर आग आणि लोणी यांचे जे होईल, तेच स्नेहा आणि गण्या यांच्यात झाले.
स्नेहालाही नकळत गण्या आवडू लागला. गण्याने हळूहळू विषय इंग्लिशकडून स्नेहाच्या खाजगी आयुष्याकडे वळवला. तिचा मोबाइल नंबर शंका विचारण्यासाठी घेतला, मात्र मेसेज वेगळेच फिरू लागले. एकदा गण्या शहरात गेल्यावर काम आटोपल्यानंतर वेळ मिळाल्यावर त्याने स्नेहाला फोन केला. ती मोकळीच होती, तेव्हा हा भेटायला तिच्या रूमवर गेला. स्नेहाची रूम पार्टनरदेखील विदर्भातील लांबच्या गावची होती आणि घरात आलेल्या काही इमर्जन्सीमुळे घरी परत गेली होती. त्या दिवशी गण्या आणि स्नेहाच्या गप्पा झाल्या. स्नेहा आपल्याला पटणार याची गण्याला खातरी पटली. त्याने स्नेहाला प्रपोज मारण्याचे ठरवले.
पण प्रपोज करायचे तर काहीतरी भन्नाट करायला हवे, स्नेहाने पटकन हो म्हटले पाहिजे. काय करावे? गण्या नेहमीप्रमाणे शेतावर गेला. नुकतीच काढणी झाली होती आणि गडी रानातील तण काढत होते. दुपारची वेळ होती. अचानक गलबला उडाला. कामाला आलेल्या बायका किंचाळू लागल्या. काय झाले म्हणून गण्या धावत गेला, तर एक लांब पिवळीधमक धामीण निघाली होती, तिला बघूनच बायका कालवा करीत होत्या. हुश्श! गण्याने नि:श्वास सोडला आणि पोते आणायला तो फार्महाउसकडे धावला. पोत्यात त्या धामिणीला घालून दुसर्या दिवशी म्हसोबाच्या डोंगरात सोडायचे, असे ठरवून तो आडवा होऊन मोबाइल बघू लागला, तोच त्याच्या डोक्यात एक जबरी आयडिया आली. हीच धामीण नेऊन स्नेहाला दाखवली, तर? आपल्याकडे डिग्री नसली, तरी आपले धाडस बघून तरी स्नेहा नक्कीच खूश होईल, आपल्याला घट्ट मिठी मारेल, तिचे ते गच्च अंग आपल्या अंगाला भिडेल, तिच्या अंगाला येणारा वास आपल्याला लईच आवडतो, तिचे केस आपण मोकळे करू, तिच्या मुखडा जवळ घेऊन मस्त किस करायचा आणि..
त्याच्या कल्पनाशक्तीचा घोडा चौखूर उधळत होता. अंगावर रोमांच उभे राहिले. स्नेहाच्या जागी त्याला सनी दिसू लागली. गड्याचे अंग गरम झाले. थोडा वेळ तो त्याच धुंदीत होता. आणखीही काही वेळ राहिला असता, मात्र कामावरचे गडी परत निघाले होते, त्यांच्या हाकेने तो स्वप्नातून वास्तवात आला.
ठरले तर मग! त्याने धामीण असलेले पोते उचलले आणि धामिणीला एका सॅकमध्ये भरून घरी नेऊन ठेवले. दुसर्या दिवशी शहरात काम होते, म्हणून धामण असलेली सॅक घेऊन निघाला. आज स्नेहाला प्रपोज करायचे होते, म्हणून त्याने विशेष जामानिमा केला. नवीनच घेतलेला शर्ट, जीन्स, बूट घालून भरपूर परफ्यूम मारूनच तो निघाला. शहरात जाऊन त्याने बँकेतील कामे संपवली आणि लगेच किक मारून स्नेहाच्या रूमकडे निघाला. पाठीवरच्या सॅकमधील धामीण अजून तरी शांत होती. काल शेतात बहुतेक उंदरांचा फराळ केल्यामुळे ती निवांत असावी. गण्या एकदाचा रूमवर पोहोचला.
दारावरची बेल वाजवली. गण्याला एकेक सेकंद एका एका युगासारखे वाटत होते. कधी एकदा स्नेहाला प्रपोज करतोय असे त्याला झाले होते. स्नेहाने दार उघडले. आज बहुधा सकाळचे क्लास नसल्यामुळे ती थोडी निवांत उठली होती. नुकतीच अंघोळ आटोपून, केस पुसून डोक्याला टॉवेल गुंडाळून, घरातील साधेच कपडे घालून स्नेहा दार उघडायला आलेली होती. इतक्या सकाळी गण्याला बघून तिला थोडे आश्चर्य वाटले. मात्र तिने त्याला आत घेतले आणि दार बंद करून घेतले. दार बंद झाल्यावर प्रपोज करायच्या कल्पनेने गण्याला घाम फुटला. काल त्याने प्रपोजवरचे बरेच रील्स बघून काय करायचे, ते ठरवले होते. मात्र प्रत्यक्षात पोटात गोळा आला. पण कसाबसा धीर एकवटून गण्याने बाहेर विकत घेतलेला लाल गुलाब स्नेहासमोर धरला आणि त्याने मोठ्या अपेक्षेने स्नेहाकडे बघितले. लाल गुलाबाचा अर्थ स्नेहाला समजला आणि तिच्या चेहर्यावर हसू आले. गेल्या काही दिवसांतील गण्याचे वागणे बघून स्नेहाला अंदाज आलेलाच होता. स्नेहाच्या चेहर्यावरचे हसू बघून गण्याला हायसे वाटले आणि त्याने थरथरत्या हाताने स्नेहाचा हात हातात घेतला. स्नेहाकडून कोणताही प्रतिकार न झाल्याने त्याने तिला जवळ ओढले. स्नेहा अलगद मिठीत आलेली बघून त्याचा धीर आणखीनच चेपला आणि तिच्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली. स्नेहाचे दोन्ही हात गण्याच्या छातीवर आले. हळूच हात वर नेऊन तिने डोक्यावर गुंडाळलेला टॉवेल काढून बाजूला फेकला. तिच्या अजून ओल्या केसांतून पाण्याचे थेंब ओघळत होते. तिचे रूप बघून गण्याला राहवलेच नाही. त्याने दोन्ही हातात तिचा चेहरा घेतला आणि आता किस करावा म्हणून ओठ जवळ केले, तोच सॅकमध्ये जोरदार हालचाल झाली. त्यामुळे धुंद झालेल्या स्नेहाचे लक्ष तिकडे वेधले. अचानक गण्याला थांबवून तिने त्याला सॅकमध्ये काय आहे ते विचारले. गण्याही या जिवंत नागिणीच्या नादाने सॅकमधल्या धामिणीला विसरला होता. धामिणीला बाहेर काढून स्नेहाकडून आपल्या डेरिंगबाजपणाचे कौतुक करावे, म्हणून त्याने स्नेहाला सांगितले, "एक गंमत आहे." "कोणती?" स्नेहाने कुतूहलाने विचारले.
"थांब"
असे म्हणून गण्या सॅककडे गेला आणि त्याने चेन उघडून झपकन धामीण बाहेर काढली. कालपासून बंद पोत्यात आणि नंतर सॅ़कमध्ये बसून धामीण वैतागली होती. जरा मोकळी हवा मिळताच, गण्याच्या हातातच तिने जोरदार वळवळ केली. स्वप्नातही कल्पना केली नसणारी गोष्ट गण्याला हातात घेऊन बघितल्याने स्नेहा हादरलीच. तिला सापाची लहानपणापासून भयंकर भीती वाटत होती. त्यात अवघ्या काही फुटांवर गण्या लांबलचक पिवळ्या रंगाची धामीण घेऊन उभा होता. एक क्षणभर स्नेहा जमिनीला खिळून राहिली आणि दुसर्या क्षणी भयंकर भीतीने तिने किंकाळी फोडली. भीतीने तिचे अंग घामाने चिंब झाले. गण्याला एक क्षणभर काही कळेचना. त्याला वाटले होते तसे स्नेहा खूश न होता, घाबरून थरथरत होती. तिची किंकाळी एकून तो दचकलाच. अगदी ती धामीणही दचकली असावी, कारण ती सुटायची म्हणून वळवळ करत होती. स्नेहाची किंकाळी ऐकून आजूबाजूची माणसे जमायच्या आत गण्याने घाईघाईने धामिणीला सॅकमध्ये घातले आणि गडबडीने तो दार उघडून बाहेर पडला. काय अपेक्षेने तो इथे आला आणि काय झाले होते..
तो कसाबसा घरी पोहोचला आणि त्याने रागाने धामीण सॅकबाहेर काढून लांब नेऊन फेकून दिली.
यानंतर स्नेहाने गण्याच्या गावातील प्रौढ शिक्षण वर्गाला जाण्यास नकार कळवला. गण्याचे इंग्लिश अजूनही अर्धवटच आहे. त्या दिवशीपासून त्याचे अखिल सर्प जमातीशी वैर सुरू झाले. आता गण्याच्या शेतावर साप निघाल्यास त्याला गण्या न चुकता ठेचून जाळतो. त्या आगीत त्याला स्नेहाचा चेहार दिसतो.
प्रतिक्रिया
31 Oct 2024 - 2:39 pm | पाषाणभेद
शेवट अनपेक्षीत केलात.
31 Oct 2024 - 5:51 pm | कंजूस
दणकून गुलीगत कथा झालीय.
31 Oct 2024 - 6:11 pm | अमरेंद्र बाहुबली
हाहाहा.
31 Oct 2024 - 8:15 pm | टर्मीनेटर
पाव्हणे लैच दिवसांनी लिहिते झाले...
कथा आवडली 👍 लिहिते राहा!
1 Nov 2024 - 1:16 am | शशिकांत ओक
गण्याने चवताळलेली वळवळणारी धामीण पटकन सॅकमधे टाकली...
रंगतदार ग्रामीण भागाचे दर्शन करवणारी कथा आवडली.
बालपणी वडिलांच्या खांद्यावर बसून शिराळ्यात साप गळ्यात घालून घेतला होता,,,
1 Nov 2024 - 9:09 am | कर्नलतपस्वी
सतरा,आठरा एकोणीस मधे असचं असतयं.
कुठं काय दाखवायचं ते कळतच नाही.नाही त्या ठिकाणी नाही ते दाखवलं जातं आणी असा घोळ होतो.
आमचा पण असाच काहीसा घोळ झाला अन धामणं हातातून निसटली. कथे मुळे आठवण झाली. कुठं असलं बरं ,आता ठावं नाय.
कथा आवडली.
1 Nov 2024 - 9:42 am | अमरेंद्र बाहुबली
मीही कन्फेशन देतो. माझ्याकडून असा झालंय. :(
1 Nov 2024 - 10:19 am | गवि
दैव देते आणि कर्म नेते.
विनाशकाले विपरीत बुद्धी
गीदड की जब मौत आती है तब..
अति शहाणा त्याचा..
इतरही अनेक म्हणी लागू होतील.
कथा भारी. वाक्यरचना तर क्या केहने.. !!
1 Nov 2024 - 11:23 am | श्वेता२४
शेवटी जाम हसले....
3 Nov 2024 - 9:47 pm | सस्नेह
झकास ! गण्याचं गणित चुकलंच म्हणा की.
4 Nov 2024 - 6:16 pm | सिरुसेरि
सुरेख विनोदी कथा . आवाज दिवाळी अंकांमधील कथांची आठवण झाली .
11 Nov 2024 - 3:17 pm | अथांग आकाश
कथा आवडली!
25 Dec 2024 - 12:59 pm | चौथा कोनाडा
खतरी रंगवलीय कथा !
मस्त, आवडली..
गुलाबी तडका पण झकास दिलाय !
लिहित रहा ... यात पुढील भागचा स्कोप दिसतोय :
उदा: असंच एक दिड वर्षे गेली .. गण्याला स्नेहाची जाम आठवण येत रहायची. आक्का नं दोन चार पोरी दाखवल्या .. पण गण्याचं मन स्नेहातच अडकलं होतं ..... त्याला कळून चुकलं होतंं की "धामण सरप्राइझ. प्रपोझ" हा टोट्ल बावळटपणा झाला.... प्रौढ शिक्षण वर्गाला आता सुप्रिया ताई खुळे शिक्षिका म्हणून आल्या होत्या. मध्यमवयीन मायाळू .. विद्यार्थ्यांना जीव लावणार्या .. त्यांना कळलं गण्यानं शाळा सोडलीय.. त्या गण्याच्या घरी गेल्या अन त्याची समजुत काढली .. अन गण्या परत शाळेत जाऊण सिन्सिअरपणे शिकायला लागला .... जीव तोडून अभ्यास केला अन इंगलिश फुल्ल आत्मसात केली...
गण्या आता व्हीलॉगर झाला होता .. आजूबाजूचा निसर्ग , प्राणी, पक्षी किटक यावर व्हिडिओ बनवु लगला ... मोठा रीलस्टार झाला ...
... अन एक दिवस अचानक त्याला स्नेहा भेटली ...कुठं भेटली ? कशी भेटली ? कधी भेटली ?
दोघांचं प्रेम परत जुळलं का ?
जाणुन घेण्यासाठी वाचा : मिपा दिवाळी अंक २०२५ ????