दिवाळी अंक २०२४ - चिखलात सापडलेली ती पिवळी वस्तू!

मार्गी's picture
मार्गी in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

चिखलात सापडलेली ती पिवळी वस्तू!

लहानपणापासून रोहित अगदी वेगळा होता. इतर मुलं खोडकर असतात तसा तर तो होताच, त्याबरोबर खूप उद्योगी, धडपड्या आणि चौकससुद्धा होता. सतत काही‌ ना काही उचापत्या करणारा. पण मित्र म्हणून जीव लावणारासुद्धा. मीच पहिले खेळणार, असं न म्हणता सगळ्यांना सोबत घेणारा. खेळाची आवड असल्यामुळे सतत खेळणार्‍या सवंगड्यांमध्ये असलेला! रोहित बोरिवलीत वाढला, तरी त्याचे बालपणीचे काही दिवस गावामध्ये गेले होते. त्याच्यावर खूप वेगवेगळे संस्कार झाले. एकत्र कुटुंबामध्ये आणि खूप वेगवेगळ्या मित्रांच्या सहवासामध्ये तो वाढत गेला. त्यामधून त्याचं व्यक्तिमत्त्व तयार झालं. तो केवळ एकाच दिशेने पुढे जाणारा नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक वेगवेगळे पैलू घडत गेले.

... तो दिवस काही‌ वेगळाच होता. बोरिवलीत सकाळपासूनच पावसाने लय पकडली होती. पावसाची तुफान बॅटिंग सुरू होती. आकाश ढगांनी भरून गेलं होतं. कुठेही प्रकाशाची तिरीप दिसत नव्हती. दिवसभर पाऊस थांबण्याची वाट बघूनच रोहित दमला. शेवटी त्याने पावसाचा विचार सोडून दिला. तो घरी आला. "शॅ, काय बोअरिंग दिवस आहे" असं त्याला वाटत होतं. घरी आल्यावर आळस देत त्याने त्याचे बूट काढले. त्याचं सामान एका बाजूला ठेवून दिलं. त्याच्या घरचे दिवे गेलेले होते. त्यामुळे त्याला टीव्हीही लावता आला नाही. तो थोडा ताजातवाना झाला. पुढच्या दिवसांची तयारी कशी करायची, ही चिंता त्याला सतावत होती. आजच्या खेळामध्ये खूप कमकुवत टीमने रोहितला व त्याच्या मित्रांना हरवलं होतं. रोहित आणि त्याचे मित्र खूप पक्के भिडू होते. पण ऐन वेळी त्यांच्यात सामंजस्य कमी पडलं. दोन जण उगीच एकमेकांशी भांडत बसले. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढच्या रविवारी असं होऊन चालणार नाही, रोहित स्वत:ला सांगत होता. दमलेला रोहित ह्या चिंतेमध्ये बसला असतानाच त्याच्याही नकळत त्याचा डोळा लागला.

रोहित बोरिवलीत जिथे राहत होता, त्या परिसरामध्ये एक वेगळीच घटना त्याच वेळी घडत होती. खरं तर त्या घटनेशी रोहितचा काहीच संबंध नव्हता. पण ही घटना रोहितच्या व त्याच्या सवंगड्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. ज्या सोसायटीत रोहितचं घर होतं, तिथून दोन गल्ल्या समोर एक जुनं मैदान होतं. म्हणजे कोणे एके काळी मैदान होतं. आता तिथे कचरा डेपो, भंगार, वाढलेलं गवत आणि चिखल अशा गोष्टींचं साम्राज्य होतं. पावसाळ्यामध्ये तर चिखलामुळे तिथे कोणी खेळूही शकत नव्हतं. आजूबाजूला थोडी झोपडपट्टी होती. जेव्हा दिवस थोडे बरे असायचे, तेव्हा ह्या झोपडपट्टीमधली काही मुलं तिथे खेळायला यायची. पावसाळ्यामध्ये तर तिथे कोणी जायचंच नाही. माणसंच नाही, तर कुत्रे-गायी-डुकरं अशा प्राण्यांचाही वावर नसायचा. एकेकाळी मुंबईमध्ये आढळणारा ओसाड असा तो भाग होता! पावसाळ्यात तर अगदीच निर्जन.

त्या चिखलाच्या मैदानाजवळ छोटू चहावाल्याचं घर होतं. जवळच त्याचं चहाचं दुकानही होतं. पाऊस - तोही मुंबईचा पाऊस! पावसाची तुफान बॅटिंग सुरू असायची. पण त्याबरोबरच त्याच्या दुकानात तेजीही असायची. असा तो संध्याकाळी चहाचे वापरून झालेले कप फेकायला तिथल्या कचराकुंडीजवळ आला. त्याच्या तुटक्या बादलीत जमा झालेले कप त्याने ओतले व बादली रिकामी‌ केली. आता तो वळणार, तितक्यात त्याला काही तरी चमकलेलं दिसलं. त्या मैदानामध्ये मातीमध्ये कोणती तरी वस्तू चमकत होती. एक क्षण त्याने दुर्लक्ष केलं. जणू त्याची पावलं परत फिरण्यासाठी उचललीच गेली होती. पण तो थांबला. त्याला काहीतरी जाणवलं. तिथे एक पिवळी वस्तू अगदी वेगळी चमकत होती! नकळत त्याचे पाय तिकडे ओढले गेले.

तशी ती वस्तू चिखलातच रुतली होती. तिच्यावर पाणीही साचलं होतं. पण तिचा एका टोकाचा भाग पाण्यावर होता. आणि नेमके त्या टोकावर पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याचे किरण परावर्तित होत होते! असा पिवळा गडद रंग छोटू चहावाल्याने कधी बघितलाच नव्हता! त्याचे डोळे चमकले! तो आणखी पुढे गेला. त्याने जवळून ती वस्तू नीट बघितली. अगदी थोडाच भाग वर असल्यामुळे नीट कळत नव्हतं. आधी त्याला तो एक पुठ्ठा वाटला. वस्तूला हात लावण्याची हिंमत त्याला लगेच झाली नाही. पुठ्ठा? नाही. कदाचित पिवळा पत्रा. हळूच तो खाली वाकला. जवळून बघितलं. नक्कीच, हा पिवळा पत्रा दिसतोय. चिखलामध्ये रुतलेला दिसतोय.

छोटू ओणवा झाला. आता त्याची भीड चेपली. चिखलातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने त्याने जोर लावला! पण काय आश्चर्य! ती वस्तू अगदीच हलकी होती! पत्रा नाही, पुठ्ठ्याएवढंसुद्धा नाही, तर त्या वस्तूचं‌ वजन जेमतेम एखाद्या स्टिकरएवढं होतं! पण ती वस्तू स्टिकर नक्कीच नव्हती. एक गडद पिवळा रंग आणि त्यावर त्रिकोणाची एक आकृती. त्यावर काही चिन्हंही होती. पण चहावाल्याला ती कळत नव्हती. पण हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे, हे त्याला सतत जाणवत होतं. त्या वस्तूमध्ये एक गूढ आकर्षण जाणवत होतं. त्या वस्तूचा स्पर्शही काही वेगळाच लागत होता. एक वेगळी आभा व एक वलय जाणवत होतं! हा नक्की काय प्रकार आहे हे काहीच त्याला कळत नव्हतं. पण हे जे काही आहे, ते फार वेगळं आहे, हे मात्र अगदी स्पष्ट जाणवत होतं. थोडा वेळ त्याने विचार केला. तिथेच तो उभा राहिला. मग त्याने मनाशी काही ठरवलं आणि एक उसासा सोडला.

छोटू आपल्या दुकानात आला. परत तो पिवळा पत्रा बघितला! नक्कीच! हा पत्रा नाहीय. पत्रा इतका हलका नसतो, इतका चमकत नसतो! हे नक्कीच काही‌तरी वेगळं आहे. एकदम त्याला जाणीव झाली. त्याने हलक्या हाताने पाण्याने पत्रा धुतला. तसा तो आणखी चमकायला लागला. काही विचार करून त्याने तो पत्रा एका जिलेटिन पेपरने झाकला. मग एका पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवला. त्याला काहीतरी आठवलं. त्याने घड्याळात बघितलं. पावणेसहा होत आले होते. अजूनही वेळ आहे. त्याच्या दुकानाच्या दोन पावलं पुढे इसाकची खोली होती. तिथे गेल्या गेल्याच त्याला इसाक दिसला. तो लगबगीने बाहेर पडला होता. छोटूच्या लक्षात आलं की घाई केली पाहिजे. नाइट ड्युटीवर जाण्याच्या आधी इसाकला हे सांगितलं पाहिजे. त्याने इसाकला गाठलं. त्याला सांगितलं. आधी दोन मिनिट इसाकने खांदे उडवले. "तू क्या बोलता रे, मेरे को क्यों ये देता रे?" असाच त्याचा सूर होता. पण जेव्हा छोटूने तो पत्रा - ते जे काय होतं ते - त्याला दाखवलं व त्याच्या हातात दिलं, तेव्हा इसाकही चकित झाला! हे काहीतरी विलक्षण आहे, त्याला लगेच जाणवलं.

इसाक तसा त्या वस्तीमध्ये अगदी फिट न बसणारा! बोरिवली नॅशनल पार्कमध्ये रात्रपाळीचा वॉचमन! पण वॉचमन असला, तरी फक्त वॉचमनच नव्हता. वॉचमनचाच एक गुण त्याने खूप वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता! वॉचमनचं काम म्हणजे अखंड पहारा. अखंड सजगता आणि जागरूकता! तसा तो सजग झाला. रात्री झोप येऊ नये म्हणून पुस्तक वाचायचा. त्यामधून पुस्तकांची खूप गोडी लागली. बोरिवली नॅशनल पार्कमुळे डोंगर, पर्वत, निसर्गसृष्टी, लेण्या अशीही एक आवड निर्माण झाली. छोटूने नकळत त्या वस्तूसाठी अगदी योग्य माणूस शोधला होता. हातात घेतल्या घेतल्या इसाकला त्या वस्तूचं वेगळेपण कळलं. त्याने तो पत्रा निरखून बघितला! पिवळा गडद रंग. असा पिवळा रंग, जो नेहमी बघण्यात येत नाही. त्यावर एक त्रिकोण! काय बरं असेल हा त्रिकोण? आणि काही चिन्हं! पण ती अस्पष्ट झाली होती. त्यामुळे त्याला कळली नाहीत. "छोटू, तू तो बहुत काम की चीज़ लाया रे," छोटूला धन्यवाद देऊन तो निघाला! आता काय करावं हा प्रश्न त्याला पडला. पण त्याने तो लगेचच सोडवला.

इन्स्पेक्टर समीर! बोरिवली नॅशनल पार्कच्या समोरच्या चौकीत इन्स्पेक्टर समीरची ड्युटी असायची. इसाक तिथे पोहोचला, तेव्हा समीर ड्यूटीवर नव्हता. पण तिथल्या शिपायाकडे त्याने पत्र्याची ती छोटूने दिलेली पिशवी ठेवली. खिशातून कागद काढून त्याने समीरसाठी तिथेच एक चिठ्ठी लिहिली. हे काय आहे, कुठे सापडलं हे थोडक्यात लिहिलं. त्याच्या मनामध्ये जी शंका आली होती, तीसुद्धा त्याने लिहिली. पिशवी व चिठ्ठी शिपायाकडे देऊन इसाक रात्रपाळीला निघाला. पण त्याच्या मनामध्ये विचार सुरू झाले होते. त्याला ती वस्तू किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट कळून चुकलं होतं! त्याचे डोळे आता चमकत होते.

"भाऊ, पाणी घ्या जरा!" समीर खूप उशिरा आला, तेव्हा दमलेला होता. दोन क्षण त्याने दम घेतला. पाय लांब केले. डोळे मिटले. डोळे उघडले, तेव्हा त्याला ती चिठ्ठी दिसली. त्याने एका झटक्यात ती वाचली. त्याच्या टेबलच्या खणातून ती पिशवी बाहेर काढली! टेबलावर ठेवून त्याने तिचं निरीक्षण केलं. त्याला प्रश्न पडला की, इसाक इतका हुशार आहे, पण त्याने हरवल्याची तक्रार का केली नाही? कदाचित घाई असेल. आता आपल्यालाच ते काम करावं लागणार. तो किंचित नाराज झाला. रजिस्टर उघडून त्यावर तो नोंद करणार, तेवढ्यात शिपाई त्याला म्हणाला, "साहेब ती वस्तु फक्त एकदा बघा तरी." इसाककडून ती वस्तू घेऊन टेबलाच्या खणात ठेवणार्‍या शिपायालाही तिचं‌ वेगळेपण जाणवलं होतं!

समीरने एक क्षण तो पत्रा हातात घेतला आणि त्यालाही त्याचं वेगळेपण कळलं! खरंच! आणि ती वस्तू अगदी आल्हाददायक वाटतेय! एक वेगळाच स्पर्श जाणवतोय! हे काहीतरी वेगळं आहे. पत्राच आहे, पण रंग किती वेगळा? धातू कोणता असेल? आणि वजन किती कमी आहे? नाही, ही वस्तू चोरली गेलेली किंवा हरवलेली नाही. मिसिंगची तक्रार नाही होऊ शकणार. हे काहीतरी वेगळंच आहे. लिपीसुद्धा वेगळी दिसतेय. कोणाकडे जाऊ? समीर विचारात पडला. पण त्याचा चेहरा आनंदाने खुललासुद्धा. रोजच्या त्याच त्या कामापेक्षा एक वेगळं काम त्याच्यापुढे आलं होतं.

...इन्स्पेक्टर समीरचे एक मित्र - विकास राजे पुरातत्त्व शाखेत काम करत होते. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांच्या घरी जाऊन त्याने त्यांची भेट घेतली. त्यांना तो पत्रा दाखवला. कुठे मिळाला, कसा मिळाला हे सांगितलं. तेही असा पत्रा बघून आश्चर्यचकित झाले! "हा तर ताम्रलेख दिसतोय एक प्रकारचा! पण खूप वेगळा वाटतोय. कधी अशी वस्तू बघण्यात आली नाही!" त्यांनी आपलं मत दिलं. त्यांनाही ती लिपी ओळखू आली नाही. समीर आणि विकास बोलत असताना विकास राजेंचा मुलगा अजयही तिथे आला. लगेचच त्या वस्तूने त्याचं लक्ष आकर्षित केलं! त्यालाही तिचं वेगळेपण जाणवलं. त्याच्या डोळ्यांनी बारकाईने त्या वस्तूचं निरीक्षण केलं. वेगळेपणा इतका होता की, तो अगदी मनावर ठसला. प्राथमिक बोलणं झाल्यावर समीर ती वस्तू विकास राजेंच्या ताब्यात देऊन निघून गेला. नंतर त्यांनी अजयला शाळेमध्ये सोडलं.

इकडे शाळा सुरू झाली, तास सुरू झाले, तरी अजयचं लक्ष त्या वस्तूमध्येच अडकलं होतं. ती काही त्याच्या नजरेसमोरून जात नव्हती. केवळ शरीराने तो वर्गामध्ये होता, पण मनाने त्या पत्र्यासमोर होता. त्यावरची चिन्हं त्याच्या डोळ्यांपुढे येत होती. शाळेतले तास पुढे जात राहिले, तो तिथेच घुटमळला. आणि मग शेवटचा खेळाचा तास आला. तेव्हा कुठे त्याला त्याच्या जिवलग मित्रांशी बोलण्यासाठी मोकळीक मिळाली. रोहित मेश्राम! त्याचा जिवलग मित्र! शाळेतला कब्बडी चँपियन! कब्बडी खेळताना सगळ्यांना एकत्र कसं ठेवायचं, प्रत्येकाचं मन कसं राखायचं, शक्तीबरोबर युक्तीने कसं लढायचं हे रोहितला बरोबर कळायचं! त्यामुळे तो शाळेत सगळ्यांचा लाडका होता. थोडे फुरसतीचे क्षण मिळाले, तेव्हा अजयने रोहितला गाठलं. त्याच्याबरोबर तेव्हा सहावी ब मधले इतरही काही जिवलग मित्र होते. कधी एकदा हे सांगतो असं झालेल्या अजयने भराभर सगळं वर्णन केलं! ऐकणारे मित्रही चकित झाले.

तेवढ्यात तिथे मिनी आली. तिने अजयला परत सांगायला लावलं. त्याला त्या लिपीचं वर्णन करायला सांगितलं. अजयला गणिताची आवड नसली, तरी विज्ञानातल्या आकृत्या चांगल्या लक्षात राहायच्या. त्याने त्यांचं वर्णन केलं. पत्र्याचं वर्णनही केलं. तोपर्यंत सगळ्यांनी त्याचं नाव 'ताम्रलेख' असं करून टाकलं.

"अजय, तू जे सांगतो आहेस, ते काहीसं ओळखीचं वाटतंय रे. पण नक्की कळत नाही." रोहित म्हणाला.

"म्हणजे कसं रे? तू बघितलाय का असा ताम्रलेख कधी?" मिनी म्हणाली.

"नाही बघितलाय, पण मला ह्याच्यासारखं काहीतरी बघितलं असावं असं वाटतंय." रोहित.

"अरे, तुमच्यापैकी कोणाला हे बघून काही आठवतंय का सांगा ना." अजय म्हणाला.

"अरे, मला वाटतं हे कदाचित खूप लांबचं असेल. म्हणजे अजिंठा-वेरूळचं किंवा अगदी हंपीसारख्या ठिकाणचं." टिंग्या म्हणाला.

"आपण एक काम करू मग. आपल्या मित्रांपैकी ज्यांना अशा दूरच्या काही वस्तू माहीत असतील, त्यांना हे वर्णन सांगू. त्यांना विचारू. बघू, कोणाला काही माहीत असेल तर. आणि अजिंठा-वेरूळ किंवा हंपीच कशाला! आपण आणखी जास्त अंतरही विचारात घेऊ. अगदी ईस्टर आयलंड किंवा नाझका लाइन्स वगैरे!" रोहित म्हणाला. त्याने डोळा मिचकावलेला फक्त टिंग्याला दिसला!

"मी एक काम करतो, मी शाळेतून घरी गेल्यावर त्या ताम्रलेखाचं एक स्केच करून आणतो. त्यावरच्या आकृत्या काढून आणतो. बघू कुठल्या पुस्तकात त्या सापडतात का?" अजय म्हणाला. "गुड आयडिया!" सगळे म्हणाले. संध्याकाळी कब्बडी सरावाच्या वेळी भेटायचं ठरवून ते पांगले. सगळ्यांना एक वेगळा उद्योग मिळाल्याचं खूप समाधान वाटत होतं!

"हे बघ. ह्याच त्या आकृत्या. ही लिपी ओळखूच येत नाहीय. देवनागरी नाही आणि कन्नडही नाही." अजय सगळ्यांना हातातला कागद दाखवून म्हणाला.

"और तमिल भी नही है!" सतीशन म्हणाला. तोही‌ रोहितच्या कंपूत होता.

"ओह्. मला ही लिपी थोडी ओळखीची वाटतेय! म्हणजे कोणती आहे कळत नाहीय, पण किंचितशी ओळखीची वाटतेय." मिनी उत्तेजित होऊन म्हणाली. "अरे, माझ्या बिल्डिंगमधला विन्या नुकताच कुठेतरी लांब जाऊन आला. त्याने तिकडच्या काही वस्तू आणल्या आहेत. तशा काही वस्तूंवर मला काहीशी अशीच लिपी दिसल्यासारखी वाटली!" मिनी म्हणाली.

"छ्या! काहीही सांगतेस. ही धड लिपीच नाहीय. ही फक्त चिन्हं आहेत!" अजय म्हणाला.

"असू शकेल. पण लिपीही असू शकेल. आणि एकच लिपी अनेक प्रकारेही लिहिता येते! आपली मराठीच पाहा ना. मोडी लिपीमध्ये अक्षरं वेगळी दिसतात. आणि इंग्लिशमध्येही कर्सिव्ह लिपी असतेच ना. अक्षरं थोडी वेगळी केली तर अगदी वेगळी लिपी वाटू शकते." रोहित म्हणाला.

"आणि ही वस्तू जर शेकडो वर्षं जुनी असेल, तर काही अक्षरं पुसलीही गेली असू शकतात. शिवाय हा ताम्रलेख चिखलात पडला होता. त्यामुळेही अस्पष्ट होऊ शकतात." मिनी म्हणाली. "मी एक काम करते, आत्ता सायकल घेऊन जाते आणि विन्याला बोलावून आणते. त्याने आणलेल्या गोष्टीही आपण आणू. मग आपल्याला कळेल लगेच ते एकसारखं आहे का." उत्तेजित स्वरात बोलून मिनी निघालीसुद्धा!

विन्या आधी तयारच नव्हता. त्याने मिनीला उडवून लावलं. पण मिनीच्या चेहर्‍यावरची आतुरता, तिची जिद्द बघून तो यायला तयार झाला. त्याने त्याच्या पिकनिकमध्ये एक लालसर वस्त्र आणलं होतं. मिनीला वाटत होतं ती तीच लिपी असली पाहिजे. सायकल पळवत दोघं लवकरच मैदानात पोहोचले. सगळ्यांनी तो ताम्रपट व ते लालसर वस्त्र एकमेकांसमोर ठेवलं. त्या वस्त्रावरही एक वेगळी लिपी होती. पण ती तिबेटी लिपी होती. रोहितला व विन्याला तिबेटी लिपी माहीत होती.

"छे रे! काहीच तर साम्य नाहीय! उगीचच काहीही म्हणत होतीस." अजय मिनीला म्हणाला. पण रोहितने त्याला थांबवलं.

"नीट बघा रे. आधी शांतपणे बघा. डोकं थंड ठेवा. काही पॅटर्न्स दिसतात का ते पाहा. एखादं अक्षर तरी कॉमन दिसतं का पाहा." काही क्षण सगळ्यांनी निरीक्षण केलं. हळूहळू मिनीने मान हलवली. छे, काहीच सारखं नाहीय!

"एक मिनिट थांबा. हे बघा! हे चिन्ह दोन्हीकडे आहे!" अत्यंत उत्तेजित स्वरात रोहित म्हणाला. तसं सगळ्यांनी परत तपासलं. परत परत तुलना केली.

"अबे अज्या, तू स्केच नीट काढलं आहेस ना?" सतीशन म्हणाला.

"हो रे, मी स्केच जसं होतं तसंच काढलंय. विश्वास ठेव."

"अरे रोहित, हो रे. बघ, हे चिन्ह सारखं आहे खरंच!" मिनी म्हणाली. सगळ्यांनी परत तपासलं. खरंच! तो सिंबल दोन्हीकडे सारखा दिसत होता! त्याच्या पुढचं अक्षरही सारखं आहे, असं त्यांना दिसलं. सगळेच एकदम पेटले! पण पुढची अक्षरं मात्र मॅच होत नव्हती. क्रम नाही, पण पॅटर्न व सुटी अक्षरंही मॅच होत नव्हती.

"रोहित, तू ते मोडी लिपीचं काय म्हणत होता रे?" अजयने विचारलं.

"मोडी लिपी! म्हणजे मराठीचा किंवा देवनागरीचाच एक प्रकार आहे. आहे ती मराठीच. तरीही एकदम वाचली तर कळत नाही! आणि तसंच कर्सिव्ह रायटिंग असतं. त्यामध्ये थोडी वेगळी शैली किंवा नक्षी वापरून लिहिलं जातं. त्यामुळे कधीकधी l, I 1 अशी अक्षरं / संख्या सारखी दिसतात. येस! हे कर्सिव्ह तर नसेल? विन्या, तू कुठे गेला होतास व हे लालसर वस्त्र नक्की काय आहे, ते आधी सांग. कदाचित त्यावरून आपल्याला क्ल्यू मिळेल!" आता रोहितही उत्तेजित झाला होता.

"अरे, मी लदाखमध्ये गेलो होतो! तिथे काही दिवस पिकनिक होती. तेव्हा तिथल्या एका मठामध्ये - म्हणजे एका गोंपामध्ये मला हे लालसर वस्त्र मिळालं. त्याला ते मंत्र पताका म्हणतात. तिकडे सगळीकडे ते असतं. आणि तो मंत्रही असतो त्यावर- ॐ मणि पद्मे हुम्!" विन्याने माहिती दिली.

"ओह! अरे, हे ॐ तर अगदी जुळतंय. आणि आपल्या ॐशी मॅच होतंय. पुढची अक्षरं बघू बरं. हे पाहा, मणि लदाखच्या भाषेत असं लिहिलंय. पण आपल्या ताम्रपटावर ते तसं नाहीय. खूपच वेगळं काही‌तरी आहे!"

"ओह, येस, बिंगो! अरे, हे तेच तर आहे! तुम्ही फक्त लदाखमधल्या अक्षरांना थोडं तिरपं करून पाहा. असं, इकडे वळण द्या आणि बघा!" अजय म्हणाला!

"अरे हो! खरंच, आता बरीच अक्षरं सारखी दिसत आहेत! ही तीच लदाखी लिपी तर नाही? पण मग काही अक्षरं अगदीच वेगळी आहेत!" विन्या म्हणाला.

"अरे, मुळात लदाखच्या मंत्र पताकेवरची लिपी ही लदाखी नाहीय, तर तिबेटी आहे! लदाख-हिमाचल-नेपाळ ते थेट अरुणाचल प्रदेश ही तिबेटी लिपी असते! पण ही अक्षरं त्या लिपीमध्ये मॅच होत नाही आहेत. त्यामुळे नक्की सांगता येत नाहीय." रोहित म्हणाला.

"अरे रोहित! नेपाळ ते अरुणाचल! पण समजा, ही पताका अगदी त्याच भागात नाही, तर थोड्या दूरच्या भागामध्ये बनवली, तर काही फरक पडला असेल ना? म्हणजे जर एखादी मंत्र पताका किंवा असं ताम्रपत्र बिहारमध्ये बनवलं गेलं, तर ते थोडं वेगळं होईल ना?" अजय म्हणाला.

"बिंगो! अरे बिहार नाही, थोडं आणखी पुढे! बंगाल किंवा आसाम! आसाम तिबेटी भागाला लागूनच तर आहे! नक्कीच, ही अक्षरं बंगाली प्रभाव असलेली तिबेटी आहेत!" उत्तेजित स्वरात मिनी म्हणाली. ह्या बाजूने विचार केला, तर आणखी काही अक्षरं दोन्ही पत्रांवर सारखी‌ दिसत होती! आणि इतकी अक्षरं सारखी असणं काही योगायोग नाही! मुलं खूप उत्तेजित झाली! त्यांना नक्कीच काही‌तरी सापडलं होतं!

"बरं विन्या, मला सांग, तिकडे तू काही त्रिकोणाचं बघितलं होतंस का? म्हणजे तीन बिंदू असलेलं? त्रिमूर्तीसारखं?" रोहितने विचारलं.

"त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश?" विन्या म्हणाला.

"ते नाही रे. तिथल्या मठामध्ये तुला तीन गोष्टी अशा कुठे दिसल्या का? म्हणजे अ, ब आणि क?" टिंग्या म्हणाला. विन्या थोडा विचारात पडला.

"तिकडे पाहा, त्या मठांमध्ये तिबेटी भाषेतले असे प्रेयर फ्लॅग्ज होते. काही चक्रं असायची. आणि बुद्धमूर्ती असायची. एका वेळेमध्ये मी गोंपामध्ये सगळ्यां साधूंना "बुद्धम् शरणम् गच्छामि" असं म्हणताना ऐकलंय. बाकी तीन गोष्टी..." विन्या बोलतानाच मिनीने त्याला अडवलं! तिला काही तरी सापडलंय, हे सगळ्यांना कळालं!

"फक्त तेवढं नसतं ते! "बुद्धम् शरणम् गच्छामि, संघम् शरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि" असं असतं ते! तीन असतात! म्हणजेच त्रिरत्न!" मिनीचा सूर बदलला होता!

"नक्कीच! त्रिरत्न! आणि म्हणून हा त्रिकोण! भारी मिनी, तू तर हे गूढ सोडवलंस पूर्ण!"‌ रोहित म्हणाला. मग सगळ्यांनी परत एकदा दोन्ही वस्तू तपासल्या. साधारण ६०% अक्षरं सारखी आहेत, असं त्यांना कळलं. त्रिकोणाचाही एक संभाव्य अर्थ कळला. पण अजूनही बरीचशी अक्षरं - नव्हे, चिन्हं कळत नव्हती.

"अरे, येस! हे अगदी तसंच आहे! नीट बघा. विन्या, तू आणलेला प्रेयर फ्लॅग लालसर रंगाचा आहे. आणि हा ताम्रपट पिवळ्या रंगाचा आहे. फरक आहे. पण दोन गोष्टीही वेगळ्या आहेत ना. आणि प्रेयर फ्लॅगवर तर तसे इतरही रंग असतात. पण हा लालसर रंग जर काळाच्या ओघात पुसट झाला, तर कसा होईल? फिकट होईल! आणि बघ, हा पिवळा रंग. तोही आपला टिपिकल पिवळा नाहीय. तोही किंचित केशरी दिसतोय! त्यावर केशरी छटा अजूनही आहेत पाहा!" रोहित म्हणाला.

"खरंच की!" विन्या उद्गारला.

"आणि जशी काही अक्षरं ही थोडी बंगालीसारखी आहेत, तशी इतर काही अक्षरं किंवा चिन्हं बंगाल- आसामच्या थोडं पुढे असलेल्या ब्रह्मदेशातल्या बर्मी लिपीतली असू शकतात. कदाचित थायलंडच्याही भाषेतली असू शकतात. आणि काही चिन्हं ही तत्कालीन मठातील रिवाजांप्रमाणे असू शकतात!" मिनी म्हणाली!

"आता एकच मुख्य प्रश्न उरतो, तो म्हणजे हा ताम्रलेख इथे बोरिवलीच्या त्या चिखलामध्ये कसा काय आला? आणि ह्या ताम्रलेखाचा पूर्ण अर्थ काय आहे?" रोहितने सगळ्यांना परत विचार करायला प्रवृत्त केलं. आणखी थोडा वेळ त्यांनी चर्चा केली. अजयने एका कागदावर सगळे मुद्दे लिहिले. उरलेली अक्षरं व हे इथे आलं कसं हे मात्र कसं शोधावं.. त्यांना कळत नव्हतं.

"अरे, आपल्याकडे एखादी बौद्ध मठांचं माहिती देणारं ग्रंथालय आहे का? तिथे आपल्याला एखादा क्ल्यू मिळेल!" मिनी म्हणाली.

"अरे हो! तरीच. मला सारखी एक गोष्ट मघाशी आठवत होती. पण कोणती ते कळत नव्हतं! अरे, आपल्या बोरिवलीपासून जवळच - खाडीच्या पलीकडे गोराईला पॅगोडा आहे ना! तिथे मिळेल सगळी माहिती!" टिंग्या म्हणाला. इतका वेळ तो फक्त विचारात पडला होता.

"येस, बिंगो!" रोहित म्हणाला. "चला तर मग. उद्या सुट्टीचा दिवस आहे. कब्बडी झाल्यावर जाऊ या गोराईला. पॅगोडामध्ये नक्कीच काही पुस्तकं असतील. पण तिथे आपल्याला शोधावं लागेल."

"आणि मी आपली सगळी चर्चा बाबांना सांगतो. नक्कीच त्यांना ते पटेल." अजय म्हणाला!

त्यानंतर दोन दिवस गेले. अजयच्या बाबांनी - विकास राजेंनी 'ताम्रलेख' पुरातत्त्व खात्याच्या केंद्रामध्ये दिला होता. त्यांनीही बरीच माहिती काढली. त्यांचं समाधान झाल्यावर त्यांनी रोहित, विन्या, टिंग्या, मिनी व अजय आणि त्यांच्या आई-बाबांनाही पुरातत्त्व खात्याच्या ऑफिसात बोलावून घेतलं! मुलांनी गोराईला जाऊन बरीच माहिती काढली होती, तीसुद्धा त्यांना सांगायची होतीच.

"मेश्रामजी, रोहित आणि तुम्ही सगळे! तुमचं खूप कौतुक आहे रे मुलांनो! तुम्ही किती लवकर हे शोधून काढलंत! खरंच कमाल केली. आम्हाला हे शोधायला तर अनेक महिने किंवा वर्षं लागली असती! कारण आम्ही मोठी माणसं खूप मर्यादित विचार करतो. अनेक गोष्टींमध्ये अडकलेलो असतो. आधी तर ह्या ताम्रलेखाला ह्या ऑफिसातून त्या ऑफिसात जावं लागलं असतं!‌ किंवा फाइलमध्ये अडकून राहावं लागलं असतं! पण तुम्ही मुलांनी अगदी चुटकीसरशी हे सोडवलं! कारण तुमचं मन खूप निरभ्र आहे! तुमच्या मनावर अजिबात मळभ नाही. त्यामुळे तुम्हाला अशा खूप गोष्टी दिसू शकल्या, ज्या आम्हाला कळूच शकल्या नाहीत!" मुलं ऐकत होती, पण बोलायला कधी मिळतं ह्याची‌ वाटही बघत होती.

"मुलांनो, तुम्ही खरंच हे कोडं बरचसं उलगडलंय. आता पुढे आम्ही ते सोडवू! इथे मी तुम्हाला कौतुक करण्यासाठी बोलावलंय. आणि हो, ती तिसरी भाषा ब्रह्मदेशचीच प्राचीन लिपी आहे! आणि तुम्ही म्हणालात तसं हे लिहिण्याची शैलीच किंचित वेगळी आहे. कारण हे आसाम किंवा बंगालमध्ये लिहिलं गेलं होतं. इतक्या लवकर हे साम्य तुम्हांला कसं कळलं, हे मात्र माझ्यासाठी गूढच आहे! आता उरलेल्या ज्या गोष्टी आहेत - की हे इथे आलं कसं, त्याचा उद्देश काय होता हे आम्ही शोधून काढू. त्यासाठी मी हा ताम्रलेख खास व्यवस्थेने पाठवण्यासाठी दिल्लीला पत्र पाठवणार."

"बाबा, आम्ही तेसुद्धा शोधलंय!" इतर कोणी बोलत नाहीय हे बघून अजय मध्येच बोलला!

"काय सांगतोस? ते कसं?" विकास राजेंनी विचारलं.

"काका, मी सांगतो. आणि केवळ ह्या ताम्रलेखावरची चिन्हं किंवा अक्षरं हेच गूढ नव्हतं. आत्ता आम्ही ह्याला पहिल्यांदाच बघतोय. त्याच्या आजूबाजूला एक वेगळंच वलय जाणवतंय. एक वेगळी व्हाइब त्या ताम्रलेखावर जाणवतेय. कदाचित त्याचंही स्पष्टीकरण आम्ही देऊ शकतो! गेले दोन दिवस आम्ही बरंच काम केलं." रोहितने सांगायला सुरुवात केली. "मी व विन्या गोराईला पॅगोडामध्ये गेलो. तिथे सुरुवातीला आम्हाला खूपच शोधाशोध करावी लागली. पण मग एक विभाग सापडला. एका खोलीत पुस्तकंच पुस्तकं होती. एक दिवस आम्ही पुस्तकं शोधत होतो. पण काहीच मिळत नव्हतं. दुसर्‍या दिवशीही आम्ही खूप तास तिथे होतो. पण काहीच मिळत नव्हतं. आम्ही कंटाळलो होतो. तेवढ्यात तिथे एक कोरियन भिक्षुणी आल्या. त्या सकाळपासून आम्हाला बघत होत्या. आमचं काम, तळमळ बघत होत्या. मग त्यांनी आमची विचारपूस केली. विचारलं की आम्ही काय करतोय." रोहितने थोडा श्वास घेतला.

"त्यांना आम्ही मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये सगळी गोष्ट सांगितली. वर्णन केलं. आणि त्या कमालीच्या आश्चर्यचकित झाल्या! त्या कोरियातल्या एका मठामध्ये अनेक वर्षं साधना करून भारतामध्ये सत्संगासाठी आल्या होत्या. त्यांना त्या मठातल्या गुरूंनी एका प्रथेची माहिती दिली होती. तिबेटन बौद्ध धर्मामध्ये एक प्रथा आहे. त्यानुसार मठामधल्या किंवा गोंपामधल्या जुन्या वस्तूंची प्रतिकृती केली जाते. जुन्या ग्रंथांना नवीन रूपामध्ये लिहिलं जातं. जशी भगवद्गीतेवरून ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरीवरची आत्ताची पुस्तकं आहेत तसंच. ज्या वस्तू ज्ञानी व्यक्तींच्या सहवासामधल्या होत्या, त्यांची प्रतिकृती केली जाते. त्याद्वारे त्या व्हाइब्ज जतन केल्या जातात. अगदी ह्याच हेतूने बोधिवृक्षही जतन केला गेला. जेव्हा तो भारतामध्ये नामशेष झाला, तेव्हा श्रीलंकेतून त्याची शाखा आणली गेली. आणि ह्या गोराईच्या पॅगोडामध्येही स्वत: बुद्धांचे अवशेष (रेलिक्स) ह्याच व्हाइबच्या हेतूने जतन केलेले आहेत." रोहित बोलत होता आणि सगळे अवाक झाले होते!

"तर त्या कोरियन भिक्षुणींनी आम्हांला हे सांगितलं. आणि मग त्यांनी हेही सांगितलं की, साधारण बाराशे वर्षांपूर्वी ल्हासामधल्या एका गोंपाच्या वस्तुंची प्रतिकृती करण्यात आली होती. आणि ती प्रतिकृती करणारे लामाही उच्च पातळीचे होते. त्यांनी आसाममधल्या एका गोंपामध्ये ही प्रतिकृती केली. आणि पुढे अनेक शतकं तिथल्या मठामध्ये व साधनेच्या केंद्रामध्ये तो ताम्रलेख होता. आणि शेकडो भिक्षू व भिक्षुणी त्या मठामध्ये ध्यान करत होत्या. पण कालांतराने तो ताम्रलेख तिथून नाहीसा झाला, असा उल्लेख आहे. तो कुठे गेला, नंतर कुठल्या मठामध्ये गेला ह्याचा संदर्भ सापडत नाही. पण हा एक न सुटलेला प्रश्न म्हणून बौद्ध ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे!" रोहित एकदाचा बोलायचा थांबला. त्या कोरियन भिक्षुणीने त्यांना पुढची दिशा दाखवली होती. अजयचे बाबा विकास राजे फक्त ऐकत होते!

"आणि बाबा, तो ताम्रलेख इतका वेगळा का आहे, त्यावर एक वलय का जाणवतं, एक शांत व्हाइब का जाणवते, हेही ह्यावरून कळतं! ज्या मठामध्ये अनेक शतकं लोक ध्यान करत होते, तिथे तो ठेवलेला होता. निश्चित तिथल्या व्हाइब्ज त्यावर असणार. आणि त्याची निर्मिती व बनावट ही तिबेटी पद्धतीची आहे. त्यामुळे तो इतका हलका आहे व इतका काळ टिकला आहे." अजय म्हणाला.

"तुम्ही हे सांगताय, हे खरं तर वाटतंय! पण मग मला सांगा, इतक्या दूरच्या मठातला तो ताम्रपट इथे बोरिवलीच्या चिखलामध्ये काय करेल? तेव्हा तुमचं म्हणणं बरोबर असलं, तरी हे तर शोधावंच लागेल. पण तुम्ही आता काळजी करू नका. ते काम आमच्यावर सोपवा." विकास राजे समजावणीच्या सुरामध्ये बोलले.

"मी सांगते काका." इतका वेळ शांत असलेली मिनी म्हणाली. "मी सांगते. मीसुद्धा पॅगोडाच्या पुस्तकांच्या खोलीत गेले होते. तेव्हा तिथे काही पुस्तकं मी चाळली. त्यामध्ये मला एक माहिती मिळाली की, पूर्वीच्या काळी ह्या परिसरातही अनेक बौद्ध मठ होते. आज जे नालासोपारा आहे, ते पूर्वीचं सुप्पारक बंदर! बुद्धांचा एक ज्ञानप्राप्ती झालेला शिष्य - पूर्ण - तो ह्या सुप्पारकचाच होता. त्यामुळे इथेही बौद्ध भिक्षू व मठ होते. त्यामुळे दाट शक्यता आहे की, तो सुप्पारक किंवा अशा जवळपासच्या मठामध्ये आणला गेला असेल. कालांतराने- एखाद्या पुरामध्ये किंवा भूकंपामध्ये तो मठ कोसळून ताम्रपट बाहेर आला असेल. वाहत वाहत इथे आला असेल. कधी गाडला गेला असेल. पावसाच्या दबावामुळे किंवा माती सरकल्यामुळे वर आला असेल."

आता उत्तेजित होण्याची पाळी विकास राजेंची होती! "मुलांनो! काय अचाट शोध घेतलाय तुम्ही! तुम्ही इतक्या बाजूंनी विचार केला! तो आम्ही नाही करू शकलो! आणि करूही शकणार नाही! तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असू शकेल. निश्चितपणे असू शकेल. कारण तुम्हाला मिळालेली माहिती व तुम्ही सांगत आहात ते मुद्दे बरोबर आहेत. असं असू शकेल!" मुलं आनंदित झाली!

"पण आता मी एक गोष्ट करणार आहे. तुम्ही तसं गूढ बरचसं उलगडलं आहेच. पण ज्या गोष्टी अजून प्रमाणित व्हायच्या आहेत, त्या गोष्टींसाठी पुढचं संशोधन करावं लागेल. आणि तुम्ही जे म्हणताय, त्यासाठी पुरावे गोळा करावे लागतील! बोला, आहात त्यासाठी तयार? आमचे लोक काम करतीलच, पण आम्हाला तुमचीही मदत हवी. कारण तुम्ही जितका खुला विचार करू शकता, जितका सर्व दिशांनी विचार करू शकता, तितका आम्ही करू शकत नाही! हे खरं आहे! आणि हो, तुम्ही एकमेकांनी मिळून खूप वेगवेगळे पर्याय शोधले. एकमेकांना मदत केली. हेसुद्धा आम्ही करू शकत नाही. आम्हा मोठ्यांना हेच वाटत असतं की, हे तर आमचं किंवा आमच्या विभागाचं कामच नाही! पण तुम्ही असे नाही आहात. तुमच्या मनावर कोणतंही मळभ नाहीय! तुमचं मन अगदी uncluttered आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा! आणि तुम्ही जे शोधून काढलंच आहे, तेच फक्त सिद्ध करा!"

"हो काका!" सगळी मुलं आनंदाने चित्कारली! अशी रोहित व त्याच्या सवंगड्यांची ही विलक्षण खेळी ठरली! दृष्टिआड गेलेली गोष्टसुद्धा थोड्या दृष्टीने व दृष्टीकोनाने कशी परत मिळते, हे त्यांनी दाखवून दिलं. बुद्धांनी सांगितलेला ज्ञान मार्ग म्हणजे विपश्यना - विशेष बघणं! विशेष दृष्टी. सजगता. जागरूकता. ती रोहितने व त्याच्या सवंगड्यांनी दाखवून दिली. कोणताही चश्मा किंवा पडदा न लावता सत्य बघण्याचा व जाणून घेण्याचा प्रयत्न केला व त्यांना त्यात असं यश मिळालं! ध्यान व शांतीच्या एनर्जी फील्डमधला चार्ज्ड ताम्रलेख आजच्या काळातल्या जनतेसाठी खुला झाला.

- निरंजन वेलणकर 09422108376.

Translator and Author
www.niranjan-vichar.blogspot.com

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

1 Nov 2024 - 2:31 pm | पाषाणभेद

सुरुवातीला काहीतरी परग्रहावरील वगैरे वाटले होते. पण नंतर कलाटणी मिळाली.

चौथा कोनाडा's picture

6 Nov 2024 - 8:22 pm | चौथा कोनाडा

व्वा ... जबरदस्त आहे कथा .... ओघवत्या शैलीमुळं सुरुवात केली ते शेवटालाच थांबलो !
भा रा भागवत, फास्टर फेणेची आठवण झाली !
रोहित त्या सर्व मुलांचं अ ति शय कौतुक वाटलं ती लिपी, त्यातली चिन्हं, गोराई, ग्रंथालय .... असा मागोवा घेत मुलं त्या वस्तूचा शोध घेत्तात भारी वाटलं !

एक नंबर, मार्गी !
मजा आली !

सविता००१'s picture

7 Nov 2024 - 12:40 pm | सविता००१

मस्त कथा आहे. खूप आवडली

श्वेता२४'s picture

9 Nov 2024 - 2:02 pm | श्वेता२४

छान कथा आहे. माझ्या मुलाला वाचून दाखवली. त्यालाही आवडली.

श्रीगणेशा's picture

10 Nov 2024 - 8:52 am | श्रीगणेशा

छान कथा!
मुलाला वाचून दाखवेल आजच!!

मार्गी's picture

12 Nov 2024 - 11:28 am | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

7 Dec 2024 - 10:13 pm | मुक्त विहारि

मस्त