गातंया एक मन
काय देखलं भोगलं
आलं खपली होऊन
बघ एकदा येऊन
कोण गातंया कुठून?
बसलेला कोण एक
गावापल्याड माळावर
गवतात कुसळांत
काळ्या काळ्या शिळंवर
जिथं लाविलं जिवाला
दगा दिला त्या जिवानं
त्यानं पिळलं काळीज
गळ्यातून गळलं सोनं
रान कामात गुतलं
पाखरं भिरी पिकावर
मोट हाकी एक गडी
बैलजोडी हिरीवर
गर्दी तिथंच करून
पोरं पव्हती पाण्यात
सूर मारिती मुटका
पाठपाठनं जोरात
दाटीवाटीनं बसल्या
हाकलेल्या राखलेल्या
वढ्यातल्या डबक्यात
म्हशी साऱ्या निवलेल्या
बांधावर चिच्चखाली
बाळ मारितो किक्काळी
त्याच्या मायेनं निजाया
केली पातळाची झोळी
वढा वाहे झुळझुळ
त्यात उडती म्हातारी
तिला धरिलं बोटात
पुन्हा दिली वाऱ्यावरी
खाल्ल्या वरंगाळावर
पांढरा फुफ्फाटा होतो
पोरासोरांचा घोळका
निक्का धुमाट पळतो
सांडली आभाळी लाली
मिचमिच झाली सांज
हळूहळू वाढत जाय
रातकिड्यांचा आवाज
एकला त्यो बसलेला
न्याहाळीत सारं सारं
एकला त्यो एकलाच
पडलेल्या देवळाम्होर
सार जिथल्या तिथंच
घडणारं जाई घडून
पण एकलं होऊन
त्याचं, गात राही मन
- संदीप भानुदास चांदणे
प्रतिक्रिया
31 Oct 2024 - 11:36 am | कर्नलतपस्वी
सुंदर रेखाटले आहे. अगदी असेच वातावरण असते.
इथेच आणी या बांधावर अशीच शामल वेळ आणी अशाच शामल वेळी जीवाला जीव लावणारी नसल्यास मनाचं भिरभीरं होतय बघा.
31 Oct 2024 - 3:02 pm | पाषाणभेद
चित्रदर्शी kavitaa
31 Oct 2024 - 4:05 pm | श्वेता२४
वढा वाहे झुळझुळ
त्यात उडती म्हातारी
तिला धरिलं बोटात
पुन्हा दिली वाऱ्यावरी
माझं बालपण आठवलं
बांधावर चिच्चखाली
बाळ मारितो किक्काळी
त्याच्या मायेनं निजाया
केली पातळाची झोळी
मस्तच
31 Oct 2024 - 5:06 pm | कंजूस
जमली आहे.
1 Nov 2024 - 11:42 am | जव्हेरगंज
एकदम सुंदर जमली आहे. फार दिवसांनी काहितरी दर्जेदार वाचलं.
3 Nov 2024 - 11:36 am | चौथा कोनाडा
चित्रदर्शी रचना आवडली !
3 Nov 2024 - 6:38 pm | अथांग आकाश
सुरेख जमली आहे!
9 Nov 2024 - 2:57 pm | कवी मुक्तविहारी
खूप छान चित्रण केले आहे. सुंदर कविता!