श्री गणेश लेखमाला २०२४ - आनंदाचा कोपरा-माझी बाल्कनी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in लेखमाला
15 Sep 2024 - 3:09 pm

sr

मोहम्मदवाडीचा सुर्योदय

कवीवर्य अभिजित दाते यांची गझल सेवानिवृत्त मंडळींची कथा,व्यथा नेमक्या शब्दांत मांडते.

गोंजारतो अताशा माझ्याच वेदना मी
सांगा तरी नशा ही दुसर्‍या कशात आहे
खेळात या नव्याने माझ्यात जन्मतो मी
माझ्या शहास अंती माझीच मात आहे

सेवानिवृत्तांकडे लोकांचे फारसे लक्ष नसते, जणू साईडला टाकलेली मालगाडी. त्यांचा वापर सोईनुसार होत असतो.मला तरी काही यात गैर वाटत नाही.खरंतरआत्ममग्नहोण्याचा काळ.प्रत्येक सेवानिवृत्त,क्षमता,विचार, वेळ व इतर बंधने सांभाळून कालव्यय किंवा अपव्यय करत असतो.मी ही अपवाद नाही. सेवानिवृत्त म्हणजे अर्थार्जना साठी कुठलेही चाकोरीबद्ध काम न करणारा,पुर्णत: रिकामा व्यक्ती असा अर्थ अभिप्रेत आहे.

प्राप्त परिस्थितीत आनंदी रहाणे व उर्वरित आयुष्य कसे सुखकर होईल या साठी प्रयत्न करणे हाच एकमेव उद्देश सेवानिवृत्ती नंतर असावा असे माझे मत आहे. या साठी बराच त्याग,तडजोड करावी लागते.कधी कधी मन दु:खी होते. कंटाळाही येतो पण उर्वरित प्रवास मात्र आरती प्रभू म्हणतात त्याप्रमाणेच व्हावा असेच वाटते.

अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणी सरावा प्रवास सारा

-आरती प्रभू

सेवानिवृत्तीनंतर "नवा गडी नवे राज्य",असेच काहीसे दिवस. प्रत्येक दिवस वेगळा. इतके दिवस अनेक कामांची यादी,कौटुंबिक चिता, भविष्याची काळजी इत्यादी विचारांचा धुडगूस एकदम थांबतो.मुलं आपापल्या दिशेने निघून गेलीली असतात. आयुष्यातले रिकामेपण, पाणी ओसरून गेलेल्या पावसाळी नदीच्या पात्रा सारखे. मन, चित्त एकदम शांत, मोकळे मोकळे.नदीपात्रातील खड्डय़ात साठलेल्या पाण्यासारखे काही विचार मनात अजूनही तग धरून असतात,बाकी वाळवंटच.

बाकीबाब यांच्या कवीते प्रमाणे मन स्वताची समजूत घालत असते,

काय सांगावे नवल दुर रानिची पाखरे
ओल्या आंगणी नाचता होती माझीचं नातरे
मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे
जिथे असाल तिथे हो नांदतो मी तुम्हांसवे

असो,मुळ मुद्द्यावर येतो.म्हणतात ना, "ओल्ड हॅबिटस् डाय हार्ड",त्याप्रमाणे सकाळी लौकर, ब्राह्ममुहूर्तावर जाग येणं ही सवय अंगात भिनलेली,कितीही ठरवले तरी साडेचार, पाच नंतर बिछान्यावर लोळत पडणे कठीण. याला कारण तरुणपणी प्रशिक्षण घेताना प्रशिक्षक सकाळीच चार वाजता पार्श्वभागावर फटके देऊन प्रशिक्षार्थींना उठवायचा आणी स्वतः झोपून जायचा.तीच आठवण कायम मनावर कोरली गेली.
आता हा अभिशाप का वरदान माहीत नाही. पहाटेस झोप चाळवते कोकिळेच्या मधुर आवाजाने. कधी कधी मनात येते पुर्वीचे राजे महाराजे भाट,सनईच्या सुमधूर आवाजाने जागे होत असत. हे ही तसेच नाही का! क्षणभर का होईना हा विचार मनास सुखावून जातो.आळस झटकून बाल्कनीत येवून बसणे हा नित्यक्रम झालायं.सुर्यवंशी होण्याचे सुख, सुर्यवंशीच जाणो.

घरात व बाहेर आसमंतात निरव शांतता चहुकडे काळोखातल्या मानवीवस्तीच्या धुसर खुणा,टिमटीमणारे रातदिवे,मधूनच ऐकूयेणारी कोंबड्याची बांग.एक प्रकारचे गुढ वातावरण, अशा शांत वातावरणात मन प्रसन्न आणी आनंदी न होईल तर नवल.

आमचं घर पाचव्या मजल्यावर असल्याने खुप दुरवर नजर जाते.घर उत्तर दक्षिण असल्याने उगवती,मावळतीचे सौंदर्य मनमुराद लुटता येते.सूर्योदय,सुर्यास्त खुप भन्नाट दिसतात. तिन्ही बाजूस दुरवर डोंगर रांगा व आजूबाजूस थोड्याश्या उंच इमारती,बाकी सारी एक, दोन मजली बसकी घरे.मुख्य रस्त्यापासून आत म्हणून वाहतुकीचा त्रास नाही.गावात जुनी मंदिरे, अध्यात्मिक,उत्सवाचे वातावरण नेहमी असते. बाल्कनीतून पहाटेच्या रामप्रहरी विठ्ठल मंदिरातील काकड आरती,गाव गंधर्वाचे गायन भजनाचे स्वर मनामधे सकारात्मक विचार, उर्जा भरून जातात.

उगवतीकडे डोंगर, दक्षिणोत्तर वन बिभागाचे सुरक्षित जंगल.पायथ्याला पारंपारिक शेत जमिनी.भरपूर वनराई,हिरवळ असल्याने गावातच रहात आहे असे वाटते. सोसायटी बर्‍यापैकी मोठी,उंच इमारती जरी असल्या तरी विखुरलेल्या,भरपुर देशी विदेशी झाडे. सातपर्णी,आकाश शेवगा,बहावा, पळस, कडुलिंब,गुलमोहोर,सायरी,उंबर,वड,पिंपळ,चाफा,सोनचाफा,प्राजक्त,चेरी ब्लासम,रोज शाॅवर,टोकोमा,ज्याकरांडा अशी आणी इतरही अनेक झाडे सोसायटीचे सौंदर्य तर वाढवतात. पर्यावरण संवर्धन सुद्धा करतात. तरणताल (स्वीमिंग पुल) असल्याने पक्षांसाठी पाण्याची प्रचुर उपलब्धता.

वनराई सदृश्य वातावरणात विभिन्न पक्षांचे आवाज कानाला सुखावून जातात. कोंबड्यांन दिलेली बांग,ग्रीष्मातील कोकीळचे कुहूकुहू, मे महिन्याच्या शेवटी "पेरते व्हा,पेरते व्हा", आशी आवर्जुन कानी पडणारी पावश्याची साद मान्सूनच्या आगमनाची वर्दी देऊन जाते. थोडं झुंजूमुंजू झालं की डोंगर रांगा प्रकाशू लागतात. आजुबाजूच्या घरातील मंद दिवे हळूहळू विझू लागतात तर उगवतीच्या गालावर गुलाबी रंगाची पसरण व्हायला सुरवात होते. डोंगराच्या मागुन हळूहळू वर येणारे सूर्याचे लालभडक मोठे बिंब कवी सुधीर मोघ्यांच्या "फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश ",या गीताची आठवण करून देते. अक्षरशा: या गाण्यातली प्रत्येक ओळ इथे साकार होताना दिसते. "सुर्य डोंगरी जन्मता संगे जागल्या सावल्या" किंवा "चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक".

चारही बाजूला बर्यापैकी घनदाट झाडी,विवीध पक्षांचा अधिवासा साठी पोषक वातावरण. सर्व प्रथम कोकीळ,कोकीळा आपली हजेरी लावतात. बरोबरच कोंबडाही आपली तान मिसळतो.जणू संदेश देतात,

भोर भये पंछी, धुन ये सुनाए
जागो रे गई रितु, फिर नहीं आए

-मजरुह सुलतानपुरी,पंचम आणी लता दिदी

पहिल्या सुर्यकिरणा बरोबर सुर्यपक्षी,राखी वटवट्याची वटवट,तर दयाळ पक्षाची सुंदर शिळ कानी येते. शिंप्याचे चिवचिवणे चालू होते. भारद्वाज पक्षाचा भारदस्त आवाज व तांबट पक्षाची ठक ठक चालू होते. कावळे, चिमण्या,कबुतरं,मैना,बुलबुल,पोपट,वेडा राघू, चिरक, लाल गाल्या बुलबुल,हळद्या, नाचण, चष्मेवाला,राखाडी धनेश, बया,माळमुनिया क्वचित खंड्या असे अनेक पक्षी बाल्कनीतून सहज दृष्टीस पडतात. कधी कधी रेड नेप्ड इबीस,ग्रे हेराॅन आणी काळ्या मानेचे शराटी पण दर्शन देतात. जसजसा सुर्य वर येतो तस तसे शिकारी पक्षी उंच आभाळात घिरट्या घालू लागतात. सगळ्यात शेवटी पोपटराव आणी वहिनी दिसतात. यांची कोर्टशीप बघण्यासारखी असते. बघत असताना "गेले ते दिन गेले", असा विचारही मनात डोकावून जातो.

सकाळचा बाल्कनीतला माझा तो एक तास म्हणजे चार्जिगला लावलेला जणू मोबाईलच.ऋतूचक्रानुसार या वातावरणात फरक पडतो. ग्रीष्मात पानगळीत झाडांच्या काट्या बोराट्या होतात.आजूबाजूस उजाड,रखरखाट जाणवू लागतो. कवीवर्य वा रा कांत याची एक कवीता मनाला सकारात्मक संकेत देऊन जाते.

खुशाल गळता गळा दळांनो
हसत सरा माझीया क्षणांनो
बघे क्षणांच्या पानझडीत मी,
अक्षय पण उमले...
झुळूक आणखी एक...

मग "नेमीच येतो मग पावसाळा",असे सतत चालू असते. इथेच बसून पाऊस बघताना "पावसाचं वय", ही कवीता सुचली.
पावसाचं वय
संध्याकाळी "या चिमण्यांनी परत फिरा रे, घराकडे आपुल्या",हे चित्र दिसते.सुर्य अस्ताला जाताना सुद्धा सकारात्मक उर्जा देवून जातो. एक विशेष गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सगळे कावळे आणी बगळे संध्याकाळी पश्‍चिम दिशेला जाताना दिसतात तर सकाळी पुर्व दिशेकडे,याचे गौडबंगाल काही कळाले नाही. पण हे रोजचेच आहे.

ग्रीष्माचा पहाट वारा
श्रावणातल्या झरझर धारा
शरदातले टिपूर चांदणं तर,
शिशीरातलं कोवळ्या उन्हाचं नांदणं .

पावसाळ्यातली थंडी वेगळी,उन्हाळ्यातला पहाटवारा वेगळा तर थंडी मधली थंडी वेगळी. असाच वर्षभर अनुभव. न चुकता बाल्कनीत बसणे व न जमल्यास चुकल्या चुकल्या सारखे वाटणे हा अनुभव गेले बारा वर्षांपासून घेतो आहे.पण तरीही असे वाटते...

" सारे रोजचे तरिही, नवा सुवास सुवास....".

अशा माझ्या आनंदाच्या कोपर्‍यातून
टिपलेली काही छायाचित्रे इथे डकवतो. कदाचित आपल्याला आवडतील ... पक्शाचा आवाज डकवता आला नाही.

gm1

मोहोम्मदवाडीचा सूर्यास्त
-
gm2
-
gm2
-
gm4
-
gm5
-
gm6
-
gm7
-
gm8
-
gm9
-
gm10
-
gm11
-
gm12
-
gm2
-
गणतीबाप्पा मोरया

प्रतिक्रिया

कंजूस's picture

15 Sep 2024 - 4:10 pm | कंजूस

अगदी सुरेख परिसर.

पक्ष्यांची चित्रे सुंदर.

श्रीगणेशा's picture

15 Sep 2024 - 4:16 pm | श्रीगणेशा

आनंदाचा कोपरा आवडला!
खूप छान वर्णन केलं आहे. असा समृद्ध निसर्ग बाल्कनीतून अनुभवायला मिळणं, ही आजच्या शहरी जीवनातील खूप मोठी दुर्मिळ गोष्ट.

कोतवाल, पावश्या,तांबट,बगळे,कबुतरं, मैना,शिक्रे आणी वर वर्णन केलेली मंडळी दररोजच दर्शन देतात. यांचे आवाज वेगवेगळे आणी एकत्र रिकाॅर्ड केले आहेत.

कावळा,बुलबुल, नाचण,शिंपी आणी बया यांची घरटी सुद्धा आसपासच दिसतात.

माळमुनीया तर कबुतरांना रोखण्या साठी जाळी लावली आहे त्यात घुसून बाल्कनीत घरटे बनवले होते. दोन आले होते चार होऊन उडून गेले.

सर्व वाचकांचे धन्यवाद.

श्वेता२४'s picture

15 Sep 2024 - 7:52 pm | श्वेता२४

निसर्ग समृद्ध जागी घर असणे हे आताच्या काळात मोठे सूख आहे.....फोटो अतीशय सुंदर...

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Sep 2024 - 10:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

फार दिवसांनी मिपावर आलो आणि गलेमा मधील काही लेख वाचले.
लेख उत्तम जमलाय. फोटोही मस्तच.

एंजॉय माडी

चित्रगुप्त's picture

16 Sep 2024 - 3:31 am | चित्रगुप्त

लेखन आणि फोटो खूपच सुंदर. भाग्यवान आहात.

MipaPremiYogesh's picture

16 Sep 2024 - 5:51 am | MipaPremiYogesh

मस्तच लेख सर..अप्रतिम..पक्षी निरीक्षण जोरात चालू आहे तर..

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2024 - 9:20 am | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2024 - 12:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान, लेख आवडला, फोटू लैच आवडले
पैजारबुवा,

लेख खूपच आवडला. सतत समोरच्या सृष्टीचे निरीक्षण करणे आणि ती नोंदवून ठेवणे हे फारच आवडले. आपल्या आवडीला सलाम.

नूतन's picture

17 Sep 2024 - 11:17 pm | नूतन

आमच्या घराभोवतीही असाच निसर्ग आहे. त्यामुळे लेखातील वर्णनं आणि अनुभूती अगदी जवळची वाटली. प्रकाश चित्रंही खूप सुंदर.

चौकस२१२'s picture

18 Sep 2024 - 9:29 am | चौकस२१२

मस्त कोणत्या मोठ्या शहराजवळ एवढा निसर्ग दिसतो ?
सातारा ? रत्नागिरी? चिपळूण ? नाशिक च्या जवळ?

महादेववाडी,पुणे.

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2024 - 5:19 pm | चौथा कोनाडा

व्वा ... खूप सुरेख आनंदी कोपरा .... सुंदर पक्षी, त्यांची प्रचि, वर्णन आणि कविता देखिल !
... म्हणूनच एवढं सुंदर लिखाण करता कर्नल साहेब !

झकासराव's picture

24 Sep 2024 - 2:55 pm | झकासराव

सुंदरच लेख
फोटोही छान

सुबोध खरे's picture

24 Sep 2024 - 8:19 pm | सुबोध खरे

लेखन आणि फोटो दोन्ही खूपच सुंदर.

शहरात असूनही निसर्गाच्या सान्निध्यात राहताय.

भाग्यवान आहात.

परमेश्वराची कृपा आहे.

कर्नलतपस्वी's picture

24 Sep 2024 - 9:42 pm | कर्नलतपस्वी

भगवंताची कृपाच म्हणायची. काल तर चक्क African Love Bird दारात येवून बसला होता.
कुणाचा तरी पाळीव असावा. काय भन्नाट पक्षी.
वेगळा लेख डकवेन म्हणतो.

प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद.

जुइ's picture

9 Oct 2024 - 8:39 pm | जुइ

फोटो आणि वर्णन खूप आवडले. अगदी निसर्गरम्य ठिकाणी राहत आहात! कधी हिवाळ्यातील पहाटेचेही / ऊगवतीचेही फोटो पाहायला आवडतील.

केला. नोव्हेंबर मधे दोन झाडाच्या मधून वर येणारे सुर्य बिंब अप्रतिम दिसते. याच महिन्यात उगवतीचे आकाश निरभ्र असते. विविध रंगांची पखरण खुपच सुंदर असते. याच लेखातील पहिले प्रकाश चित्र या प्रसंगाचे क्षणचित्र आहे. चित्रफित सुद्धा केली आहे. तू नळीवर टाकली तर लिंक देईन.

सर्व वाचकांचे आभार.

जुइ's picture

10 Oct 2024 - 7:01 pm | जुइ

हिवाळ्यातील उगवतीचा फोटो खूप सुंदर आहे.

मस्त लेख! पक्षांचे फोटोज तर अगदी A1 👍