नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग ४ (काठमांडू)

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
21 Jul 2024 - 2:39 am

आधीचे भाग:

"सर्व प्रवाशांचे बोर्डिंग झाल्यावर तीन वाजता म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने विमान काठमांडूच्या दिशेने झेपावले..."

विमानातून घडलेले काठमांडू शहराचे विहंगम दर्शन ▼

समुद्रसपाटीपासून जवळपास २४० फूट उंचीवरच्या जनकपूर पासून जवळपास ४३०० फूट उंचीवर असलेल्या काठमांडू पर्यंतचे अंतर सुमारे २२४ कि.मी. आहे. 'चुरिया' (शिवालिक टेकड्या) ह्या हिमालयाच्या बाह्य पर्वतरांगेच्या डोंगराळ भागातून, वळणा वळणांच्या रस्त्यावरून बस किंवा खाजगी वाहनाने पूर्ण करण्यास सात ते नऊ तास लागणारा हा काहीसा खडतर आणि वेळखाऊ प्रवास हवाईमार्गे केवळ २५ मिनिटांत पूर्ण करून साडेतीनच्या सुमारास आम्ही काठमांडूच्या 'त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर' (Tribhuvan International Airport) पोचलो.

प्रवास पंचवीस मिनिटांत पूर्ण झाला असला तरी बॅगेज कलेक्शनसाठी मात्र एक तासापेक्षा थोडा अधिक वेळ लागला. हा खोळंबा होण्यामागे ५३ एअरपोर्टसच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांना अंतर्देशीय विमानसेवेने जोडताना वर्षभरात सुमारे तीन लाख 'टेक ऑफ्स' आणि तेवढीच 'लँडिंग्ज' होणारा नेपाळमधला हा सर्वात 'बिझी' एअरपोर्ट असणे हे एक प्रमुख कारण तर आहेच पण, अंतर्देशीय विमानप्रवास तुलनेने किफायतशीर असल्याने पर्यटकांप्रमाणेच देशाच्या ग्रामीण भागातील लोकही सर्रास विमानप्रवास करताना आढळतात आणि ह्या गावकऱ्यांनी कार्गोमध्ये टाकलेल्या ज्यूट/प्लॅस्टिकच्या गोण्यांत भरलेल्या वस्तूंच्या कुठून गोलाकार तर कुठून टोकदार भागाने डोके वर काढल्याने गोल, लंबगोल, चौरस, आयत अशा कुठल्याही भौमितीय आकारात न बसणाऱ्या ओबडधोबड सामानामुळे तांत्रिक समस्या उद्भवणे हे दुसरे कारणही आहे!

डोमेस्टिक अरायव्हलसाठी येथे असलेली कन्व्हेअर बेल्टची यंत्रणा थोडी जुनाट आहे, त्यामुळे त्याच्या 'प्रदक्षिणा' मार्गात असलेल्या वळणांवर हे ओबडधोबड सामान अडकून बेल्ट निश्चल होण्याचे प्रकार वारंवार घडतात. मग तिथल्या एका कर्मचाऱ्याने बेल्टचा विद्युतपुरवठा बंद केल्यावर दुसऱ्याने असे अडकलेले सामान सोडवल्यावर सुरु केलेली यंत्रणा पुन्हा दुसऱ्या कोणाची 'निर्गुण निराकार' गोण अडकून बंद पडणे ही त्या कर्मचाऱ्यांसाठी नित्याची बाब असली तरी प्रवाशांसाठी मात्र कंटाळवाणी ठरते. आमच्या राशीत कुठले ग्रह बलस्थानी होते माहिती नाही, पण त्यांच्याकृपेने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या दोन्ही डोमेस्टिक लँडिंग्जच्या वेळी हा 'नित्य योग' अनुभवण्याचे भाग्य आम्हाला लाभले होते 😀

विस्तीर्ण आवार असलेल्या त्रिभुवन विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी तेथे उपलब्ध असलेल्या शटल बस सेवेचा वापर करून रिंग रोडवरच्या 'एंट्री-एक्झिट' गेटच्या कमानीपाशी उतरून प्रचंड रहदारीचा तो हमरस्ता ओलांडल्यावर समोरच असलेल्या भव्य अशा 'हॉटेल एरो'च्या तळमजल्यावरील त्यांच्याच उपहारगृहात वडील आणि भाच्याला चहा-नाश्त्यासाठी बसवून, तिथून अगदी जवळ असलेल्या, जनकपूरच्या हॉटेल व्यवस्थापकाने काठमांडूतील मुक्कामासाठी सुचवलेल्या एअरपोर्ट जवळच्या तीन-चार चांगल्या हॉटेल्सपैकी एक असलेल्या 'हॉटेल गंबु पॅलेस' मध्ये पोचलो.

नेपाळमध्ये चांगल्या हॉटेल्सची अजिबात कमतरता नाही पण बहुतांश चार-पाच मजली हॉटेल्समध्ये लिफ्टची सुविधा नसणे हि एक समस्या प्रकर्षाने जाणवते. हॉटेल गंबु पॅलेसही त्याला अपवाद नव्हते पण नुकतेच अंतर्बाह्य रंगरंगोटीचे काम पूर्ण झालेल्या ह्या हॉटेलच्या स्वच्छ, टापटीप असलेल्या प्रशस्त रूम्स आवडल्या होत्या आणि "लिफ्ट नसली तर रूम्स शक्यतो पहिल्या मजल्यावरच असाव्यात" हि अपेक्षाही पूर्ण होत होती.

आमच्या तिघांच्या त्या रात्रीच्या मुक्कामासाठी एक आणि दुसऱ्या दिवशी बाकीची मंडळी आम्हाला जॉईन झाल्यावर पुढच्या दोन रात्रींसाठी तीन + पोखराहून परतल्यावर पुन्हा काठमांडूत होणाऱ्या दोन रात्रींच्या मुक्कामासाठी साठी तीन रूम्स एकगठ्ठा बुक करण्याचा प्रस्ताव दिल्यावर व्यवस्थापकाने कॅल्क्युलेटरवर काही आकडेमोड करून दाखवलेला सवलतीच्या दरातील 'ठोक रकमेचा' आकडा समाधानकारक वाटल्याने सौदा 'फायनल' केला आणि हॉटेलच्याच सात-आठ टेबल्स असलेल्या, चहा-कॉफी आणि वेळेनुसार मर्यादित खाद्यपदार्थ मिळणाऱ्या लहानशा उपहारगृहात 'ब्रेड बटर आणि कॉफी' अशी हलकीशी पोटपूजा करत बसलो असताना दिलेल्या निर्देशांनुसार हॉटेलचा कर्मचारी सामानासहित वडील आणि भाच्याला घेऊन तिथे पोचला.

दुसऱ्या दिवसापासून पुढच्या सर्व मुक्कामासाठी दर्शनीभागाकडील रूम्स मिळणार असल्या तरी त्या रात्रीसाठी हॉटेलच्या मागच्या बाजूला मिळालेल्या रूममध्ये स्थिरस्थावर झाल्यावर तिच्या बाल्कनीत उभे राहून आजूबाजूचा परिसर न्याहाळत असताना हॉटेलच्या मागच्या भागाला लागूनच असलेल्या एका मोठया एक मजली घराच्या चांगल्या लांब-रुंद परसबागेत, सामायिक कुंपणालगत, आपल्यासमोर हारीने रचून ठेवलेल्या मातीच्या कुंड्या छोट्या स्टुलावर बसून लालभडक रंगात रंगवणारा साठीच्या आसपास वयाचा गंजीफ्रॉक आणि हाफपँट परिधान केलेला एक मनुष्य, आणि भिन्न जातीच्या दोन झकास कुत्र्यांच्या गळ्यातल्या पट्ट्यात अडकवलेल्या साखळ्या हातात धरून त्याच्याशी गप्पा मारत उभा असलेला एक बावीस-तेवीस वर्षीय युवक दिसला.

दोन दशकांपूर्वी एका भटक्या कुत्र्याकडून विनाकारण 'श्वानदंश' झाल्यावर पाच इंजेक्शन्सच्या रूपाने दोन-सव्वादोन हजारांचे 'चंदन' दंडावर लावून घ्यायला लागल्यापासून भटक्या कुत्र्यांविषयी माझ्या मनात दया, माया, कणव, सहानुभूती वगैरेचा लवलेशही उरला नसला तरी उत्तम प्रकारे निगा राखलेल्या 'जातिवंत' पाळीव कुत्र्यांविषयीचा स्नेहभाव मात्र किंचितही कमी झालेला नाही. त्यामुळे माझ्यासारख्या 'अंशतः' श्वानप्रेमी माणसाला त्या दोन कुत्र्यांपैकी एक 'रॉटविलर' असल्याचे ओळखता आले असले तरी दुसऱ्या, सर्वांगावर पांढऱ्या आणि काहीशा निळसरपणाकडे झुकणाऱ्या राखाडी रंगाचे, वीतभर लांबीचे केस असलेल्या गुबगुबीत, गोंडस आणि दिसायला अतिशय देखण्या कुत्र्याविषयी जाणून घेण्याची आणि त्याला कुरवाळण्याची इच्छा झाली तिथे, मतलबी माणसांपेक्षा मुके प्राणीच जास्त प्रिय असलेल्या भाच्याला तशी इच्छा झाली नसती तरच नवल होते!

त्या दोन इसमांचे लक्ष आमच्याकडे गेल्यावर हसून हाय-हॅलो-नमस्ते झाल्यावर वडिलांना इथल्या थंड, आल्हाददायक हवेत नको असलेला रूममधला ए.सी. आणि त्यांना टीव्ही बघण्याची अजिबात आवड नसल्याने तोही बंद करून, त्यांच्या आवडीचे ब्लॅक अँड व्हाईट 'पुराने नगमे' युट्युबवर बघण्या/ऐकण्यासाठी आणि 'बुढाऊ' लोकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर टाईमपास करण्यासाठी त्यांचा फोन वाय-फायला कनेक्ट करून दिल्यावर आम्ही खाली उतरून हॉटेलच्या मागच्या कंपाउंड वॉलजवळ जाऊन पलीकडल्या त्या दोन इसमांशी संवाद साधला.

प्राथमिक संभाषणातून 'वीरप्रताप' नावाचा तो मनुष्य दीड महिन्याने येऊ घातलेल्या 'दशैन' ह्या नेपाळमधील सर्वात मोठ्या सण /उत्सवाच्या तयारीसाठी आधीपासूनच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये वाढवलेल्या फुलझाडांच्या रोपांचे त्यात पुन:रोपण करून घर आणि आवाराची शोभा वाढवण्यासाठी मातीच्या कुंड्या रंगवण्याचे काम करत असल्याचे आणि 'प्रॉमिस' नामक त्याच्या पुतण्याच्या दोन्ही 'जर्मन ब्रीड' कुत्र्यांपैकी रॉटविलरचे नाव 'कुरो' तर दुसऱ्या देखण्या 'इलो' जातीच्या कुत्र्याचे नाव 'अकामारू' असल्याचे समजले.

लोकं आपल्या पाळीव प्राणी/पक्षांची नावे काय वाट्टेल ती ठेवतात. कोणे एकेकाळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मांजरीचे नाव 'इंडिया' असल्याचे वाचल्यावर मी जर भविष्यात कधी एखादी कुत्री पाळली तर तिचे नाव 'अमेरिका' ठेवण्याचा निश्चय केला होता, म्हणजे तिला कोणी 'Bitch' म्हंटले कि आपोआप अमेरिकेला शिवी दिल्यासारखे होईल असा बालिश विचार त्यामागे होता 😀 पण इथे गोष्ट वेगळी होती!

मला त्या 'कुरो' आणि 'अकामारू' अशा कुत्र्यांच्या नावातून काहीही अर्थबोध झाला नसला तरी ज्याला व्हायचा त्याला म्हणजे भाच्याला तो झाला आणि त्या नावांच्या जपानी 'मांगा', 'नारूटो' आणि तत्सम 'कॉमिक्स/अ‍ॅनीमे'शी असलेल्या कनेक्शन बद्दल त्याने पृच्छा केल्यावर अत्यानंदित झालेल्या 'प्रॉमिस' आणि त्याच्यात 'त्या' विषयावरून अशी काही चर्चा सुरु झाली की त्यातून 'समान शीले व्यसनेषु सख्यम्' म्हणतात त्याप्रमाणे अल्पावधीतच त्या दोघांमध्ये जे मैत्र निर्माण झाले ते पाहिल्यावर "भांजा कुछ मामलों में तो मामाके 'नक़्श-ए-क़दम' पर चल रहा हैं" हे बघून समाधान वाटले!

काहीवेळ औपचारिक संभाषण झाल्यावर "असे लांबून कशाला बोलताय, उडी मारून या इकडे..." असे वीरप्रताप उद्गारल्यावर भाच्याने पडत्या फळाची आज्ञा मानत कुंपणाच्या भिंतीवरून पलीकडे उडी मारून कुरो आणि अकामारूशी खेळायला सुरवात देखील केली. तीन-साडेतीन फूट उंचीची ती भिंत एका ढांगेत ओलांडून पलीकडे जाणे सहजशक्य असले तरी मला मात्र तसे करणे प्रशस्त वाटेना, त्यामुळे दोन-अडीचशे मीटर्स अंतराचा वळसा पडला तरी हरकत नाही पण 'राजमार्गाने' तिथे येतो असे त्याला सांगितले. तसेही मला हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर पाहण्याची इच्छा आणि आज हॉटेल बुकिंगसाठी अदा केलेली बयाणा रक्कम वगळता उर्वरित रकमेचा भरणा उद्या करायचा असल्याने नेपाळी चलन घेण्यासाठी मनी एक्स्चेंजमध्येही जायचे होतेच!

सहा-सव्वा सहाच्या सुमारास सूर्य मावळून संधीप्रकाश पडल्यावर रंगकाम थांबवणाऱ्या 'काकाशी' माझ्या कुंपणाच्या अलीकडून आणि भाच्याच्या 'पुतण्याशी' कुंपणाच्या पलीकडे गप्पा सुरूच होत्या. रस्त्याने तिथे कसे यायचे ह्याविषयीच्या सूचना मला देऊन ते तिघे घराच्या पुढच्या बाजूला निघून गेल्यावर मी रूमवर एक फेरी मारून वडिलांना रात्रीच्या जेवणासाठी काय हवे-नको त्याची विचारपूस करून वीरप्रतापच्या घरी जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडलो.

त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी समोर, काठमांडू महानगरातील 'सिनामंगल' ह्या निवासी विभागातल्या आमच्या हॉटेलच्या परिसरात कित्येक लहान-मोठी हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस, लॉजेस, होम स्टे'ज आणि उपहारगृहांच्या बरोबरीनेच, मुख्यत्वे एरपोर्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासी इमारती, स्वतंत्र लहान-मोठे बंगले आणि बैठी घरेही भरपूर असल्याने ठिकठिकाणी जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानांचीही रेलचेल होती.

हॉटेलच्या गेटमधून बाहेर पडून उजवीकडे वळून शंभरेक मीटर्सवरच्या तिठ्ठ्यावर पुन्हा उजवीकडे वळल्या वळल्या दोन मोठी 'बफ' शॉप्स लागली. बरें तर बरें, रेड्याचे मांस विकणारी हि दुकाने एअरपोर्ट ते आमच्या हॉटेलच्या रस्त्यावर नव्हती, नाहीतर उद्या बहीण आणि बायको आल्यावर त्या रस्त्यावरून येता-जाता ह्या दुकानांत टांगलेलली ती भलीमोठी धुडे आणि हॉट चिप्स, केक, पेस्ट्रीज किंवा फरसाण विकणाऱ्यांच्या दुकानातल्या दर्शनी बाजू काचेची असणाऱ्या डिस्प्ले काउंटर सारख्या बहुखणी काउंटर्सच्या विविध खणांमध्ये ठेवलेले रेड्याच्या मांसाचे लहान-मोठे तुकडे आणि अन्य विक्रीयोग्य अवयव अशी दृष्ये त्यांच्या नजरेस पडली असती तर माझी काही खैर नव्हती, कदाचित हॉटेल बदलायची वेळही येऊ शकली असती 😀

एक 'संभाव्य' बाका प्रसंग आपसूक टळल्याच्या नुसत्या कल्पनेनेच मनोमन खूष होत पन्नासेक मीटर्सवर पुन्हा उजवीकडे वळून थोडे चालल्यावर 'एकता गेस्ट हाऊस' असे नाव लिहिलेल्या आणि उजवीकडे बाण दाखवणाऱ्या एका मोठ्या पाटीखाली कुरोची साखळी धरलेला प्रॉमिस आणि अकामारूची साखळी धरलेला भाचा त्यांच्यासाठी अनंतकाळ पुरेल अशा 'त्या' सामायिक आवडीच्या विषयावर चर्चा करत उभे असलेले पाहिल्यावर हे दोघे इथे काय करतायत? हा प्रश्न पडला होता पण त्यांच्याबरोबर आत गेल्यावर त्याचे उत्तर मिळाले.

एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या प्रॉमिसच्या परिवारातील (तो सोडून) नोकरीयोग्य वयाचे सर्व पुरुष 'सिव्हील एव्हीएशन ऍथॉरिटी ऑफ नेपाळ (CAAN)' चे आजी-माजी कर्मचारी आहेत. त्यापैकी वीरप्रताप हा त्याचा थोरला चुलता सेवानिवृत्त झाला असला तरी प्रॉमिसचे वडील, धाकटा चुलता आणि वीरप्रतापचे दोन्ही पुत्र ह्या सरकारी सेवेत कार्यरत आहेत. वीसेक वर्षांपूर्वी CAAN ने सिनामंगल विभागातल्या आपल्या मालकीच्या अतिरिक्त जमिनीवर प्लॉटिंग करून आपल्या कर्मचाऱ्यांना निवासी भूखंड उपलब्ध करून देण्याची जी योजना आणली होती त्या योजनेत वीरप्रताप आणि त्याच्या दोन्ही धाकट्या भावांनी सलग असे तीन भूखंड खरेदी केले होते.

इथून सातेक किलोमीटर अंतरावरील आपली जन्मभूमी असलेल्या जुन्या काठमांडू शहरातील त्यांच्या मूळ घरातून 'त्रिभुवन एअरपोर्ट' ह्या आपल्या कर्मभूमीजवळच्या नव्या घरात स्थलांतरित होताना ह्या हिंदू 'नेवार' कुटुंबाने आपली पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती जपली आणि तीन स्वतंत्र घरे न बांधता तीन प्लॉट्सवर मिळून डाव्याबाजूला एक चांगले मोठे घर आणि उजव्याबाजूला एक मजली गेस्ट हाऊस बांधून बाकीच्या जागेत छानपैकी बागबगीचा तयार केला आहे.

त्यांचे हे 'एकता गेस्ट हाऊस' पण जरा 'हटके' आहे! अन्य हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस, लॉजेस, होम स्टे'ज प्रमाणे इथे चोवीस तास किंवा ठराविक 'चेक इन', 'चेक आउट'च्या वेळेनुसार किंवा अमुकेक रात्रींसाठी अशा हिशोबाने पर्यटक आणि अन्य कामासाठी काठमांडूला येणाऱ्या मंडळींना रूम्स किंवा डॉर्मेटरीतले बेड्स दिले जात नाहीत, मुळात हा त्यांचा ग्राहकवर्गच नाही.

मलेशिया आणि कतार, सौदी अरेबिया, यूएई, कुवेत अशा आखाती देशांत नोकरी करणाऱ्या नेपाळी मजूर/कामगार/कर्मचाऱ्यांची संख्या एकवीस लाखांपेक्षा जास्त, म्हणजे त्या देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे साडेसात टक्के इतकी मोठी आहे. त्याव्यतिरिक्त वर्षानुवर्षे भारतात रोजगारासाठी राहणाऱ्या नेपाळी नागरिकांचा आकडाही जवळपास तीस लाखांच्या घरात भरतो. तसेच शिक्षणासाठी दरवर्षी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, न्यूझीलंड, जपान, भारत आणि युनायटेड किंगडम ह्या देशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही एक लाखापेक्षा जास्त आहे. त्यातले परदेशातून सुट्टीवर मायदेशी परतणारे आणि सुट्टी संपवून परदेशी जायला त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्लाईट घेण्यासाठी काठमांडूला आलेले मजूर/कामगार/कर्मचारी आणि विद्यार्थी असे काही तासांचे 'पाहुणे' हाच 'एकता गेस्ट हाऊस'चा खरा ग्राहकवर्ग!

परदेशातून मायदेशी परतताना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या दमल्या-भागल्या प्रवाशांना दूर अंतरावरच्या आपल्या गावी जाण्यासाठी दुसऱ्या अंतर्देशीय विमानाची किंवा संध्याकाळी/रात्री सुटणाऱ्या बसची वेळ होईपर्यंतच्या आठ-दहा तासांच्या प्रतीक्षाकाळात तसेच रात्री-अपरात्रीच्या फ्लाईटसाठी नेपाळच्या कानाकोपऱ्यातून सकाळ/दुपार/संध्याकाळपासूनच बस किंवा अंतर्देशीय विमानप्रवास करून काठमांडूत पोचलेल्या प्रवाशांना विमानतळापासून अगदी जवळ काही तास आराम करण्यासाठी पहिल्या मजल्यावरील प्रत्येकीत आठ कॉट्स असलेल्या चार डॉर्मेटरींमधली एक कॉट ५०० नेपाळी रुपये आणि तळमजल्यावरच्या सिंगल बेडच्या वीस केबिन टाईप छोट्या स्वतंत्र रूम्स प्रत्येकी ७५० नेपाळी रुपये अशा अतिशय वाजवी भाड्यात जास्तीतजास्त बारा तासांसाठी दिल्या जातात. ह्या भाड्यात चहा आणि नेपाळी लोकांच्या रोजच्या आहारातील 'ट्रिनिटी' म्हणून ओळखले जाणाऱ्या 'डाळ-भात-भाजी' ह्या तीन मुख्य अन्नपदार्थांचा समावेश असलेले एकवेळचे अमर्याद शाकाहारी भोजनही अंतर्भूत असते आणि ७ सीटर 'इको' व्हॅनने एरपोर्टचे गेट ते गेस्ट हाऊस आणि उलट अशी २४ तास खाजगी पिकअप/ड्रॉप सेवाही माफक अतिरिक्त शुल्क आकारून पुरवली जाते.

विशेष म्हणजे १२ तासांच्या एका सायकलमध्ये ५२ पाहुणे हाताळण्याची क्षमता असणाऱ्या ह्या गेस्ट हाऊसमध्ये २४ तासात असे अल्पकालीन वास्तव्यासाठी येणारे सरासरी ८० ते ९० 'गेस्ट्स' रोज येत जात असतात. त्यांच्या भोजन आणि चहापाण्याची व्यवस्था कुटुंबातील पाच सदस्यीय महिला मंडळ सांभाळते आणि निवृत्त वीरप्रताप पूर्णवेळ तर बाकीची चार सरकारी नोकरदार पुरुष मंडळी आपल्या शिफ्ट ड्युटीच्या वेळापत्रकानुसार वेळेचे नियोजन करून गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापनात आपआपले योगदान देतात.

आपल्या राहत्या घराच्या आवारातच कुटुंबियांची मेहनत आणि एक ड्रायव्हर आणि तीन हरकामे गडी अशा केवळ चार पगारी निवासी कर्मचाऱ्यांच्या बळावर सर्व खर्च वगळून माझ्या व्यावहारिक आकलनानुसार महिन्याकाठी कमीत कमी साडेसात ते आठ लाख नेपाळी रुपये म्हणजे जवळपास पाच लाख भारतीय रुपयांचे उत्पन्न मिळवून देणारे त्यांचे हे 'फॅमिली बिझनेस मॉडेल' मला खूप आवडले.

असो... प्रॉमिस आणि भाच्याबरोबर गेटमधून आत शिरलो तेव्हा उजवीकडे असलेल्या एकता गेस्ट हाऊसच्या (खरंतर ह्याला 'एकटा' गेस्ट हाऊस म्हणणे जास्त योग्य ठरेल 😀) पहिल्या मजल्याच्या स्लॅबला लागून पुढ्यात उभारलेल्या लांब-रुंद पत्र्याच्या शेड मध्ये इमारतीच्या मधोमध असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला रिसेप्शन काउंटरवर आता पूर्ण कपड्यांत उभे असलेले वीरप्रताप 'साहेब' रजिस्टर मधल्या नोंदी पाहून कामगारांना पाहुण्यांच्या रात्रीच्या जेवणाविषयी काहीतरी सूचना देत उभे होते तर डाव्या बाजूला पाहुण्यांच्या जेवणखाण आणि चहापाण्याची व्यवस्था म्हणून तीन लांबलचक डायनिंग टेबल्स एकमेकांना जोडून त्यांच्या भोवती मांडलेल्या वीस-पंचवीस प्लॅस्टिकच्या खुर्च्यांपैकी दहा-बारा खुर्च्यांवर बसून इथे उतरलेली काही नेपाळी पाहुणे मंडळी रूफ माउंटेड स्टँडवर लावलेल्या टीव्हीवर आशिया कप स्पर्धेतला भारत विरुद्ध पाकिस्तानचा पावसामुळे रखडलेला सामना बघत आणि त्यावर तावातावाने चर्चा करत बसली होती.

काउंटरजवळ उभ्या उभ्या वीरप्रताप बरोबर आणखीन थोड्या औपचारिक गप्पा झाल्यावर त्याच्याबरोबर गेस्ट हाऊसचा तळ आणि पहिला मजला पाहून पुन्हा खाली आल्यावर आमचे चहा-पाणी चालू असताना कुत्रे बांधायला शेजारीच असलेल्या त्यांच्या घरी गेलेली दोन्ही पोरं तिथे आली ती आज रात्री काठमांडूतली 'मोस्ट हॅपनिंग प्लेस' असलेल्या 'थामेल' विभागात जाऊन 'चिल' मारण्याचा प्लॅन घेऊनच! पोरांचा प्लॅन मला अर्थातच आवडला असला तरी आज वडिलांना हॉटेलवर मध्यरात्रीपर्यंत एकटे सोडून जाणे योग्य वाटत नसल्याचे सांगून "आज इथेच जवळपास थोडाफार टाईमपास करू आणि उद्या बाकीची मंडळी त्यांच्या सोबतीला आल्यावर हवेतर रात्रभर थामेलमध्ये काय मारायचे तेवढे चिल मारू" असे सांगून त्यांची समजूत काढली आणि साडेसातच्या सुमारास वीरप्रतापचा निरोप घेऊन आम्ही तिघे आसपासचा परिसर फिरायला म्हणून तिथून बाहेर पडलो...

मगाशी इथे येताना आलो होतो त्याच मार्गाने परत जात रिंग रोडवर पोचलो. तिथे असलेल्या तीन-चार मनी एक्स्चेंजपैकी एकात भारतीय चलनाच्या बदल्यात नेपाळी चलन घेतले, ह्या ठिकाणी जयनगर पेक्षा १० पैसे कमी भाव मिळाला. चलनाचे काम झाल्यावर रहदारीने गजबजलेल्या रिंग रोडवर लांबपर्यंत एक फेरी मारत असताना, दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईहून ११:२५ च्या फ्लाईटने येणारी बाकीची मंडळी दुपारी २:२० ला काठमांडूत लँड होणार होती त्यामुळे दुपारी त्यांना आणायला एरपोर्टवर जाईपर्यंत जो मुबलक वेळ हाताशी होता त्या रिकाम्या वेळात जवळपासचे काही पाहता येईल का ह्या विषयावर प्रॉमिसशी झालेल्या चर्चेअंती सिनामंगल परिसरातच, आमच्या हॉटेलपासून उण्यापुऱ्या एखाद किमी अंतरावर असलेले 'एव्हिएशन म्युझिअम' पाहण्याचा कार्यक्रम ठरला.

साडेआठच्या सुमारास आमच्या हॉटेलच्या थोडे अलीकडे असलेल्या एका सरदारजीच्या, रुंदीला कमी पण लांबीला जास्त अशा गाळ्यात रेल्वेच्या बोगी सारखी कल्पक अंतर्गत रचना केलेल्या आणि सत्तर-ऐंशी प्रकारचे पराठे मिळणाऱ्या 'पराठा एक्सप्रेस' नामक 'डाइन इन अँड टेक अवे' उपाहारगृहात शिरलो. आधी वडिलांना चावता येईल ह्याची खात्री करून घेतल्यावर त्यांच्यासाठी 'आलू-चीज-पनीर पराठ्याची' टेक-अवे ऑर्डर देऊन तो हातात पडेपर्यंत आम्ही तिघे कोकाकोला रिचवत बसलो. पंधरा-वीस मिनिटांत पार्सल मिळाल्यावर पोरं ते हॉटेलवर वडिलांपर्यंत पोचवून येतात-न-येतात तोच आमच्यासाठी ऑर्डर केलेले 'मिक्स व्हेज पनीर पराठा', 'आलू-गोबी चीज पराठा' आणि 'मुली-गोबी पनीर पराठा' असे तीन पराठे, मस्त घट्ट मलईदार दही, टोमॅटो केचप, एक थोडी कमी तिखट अशी आंबट-गोड लाल चटणी आणि एक भरपूर मिरच्या, पुदिना आणि आलं-लसूण वापरून बनवलेल्या झणझणीत तिखट हिरव्या चटणीच्या साथीने टेबलवर सर्व्ह झाले.

खरंतर प्लेन, आलू, मुली, गोबी, मेथी, प्याज, मश्रुम, चीज, पनीर, एग आणि चिकन अशा दहा-बारा पराठ्याच्या मूळ प्रकारांचे, त्यातल्या मुख्य घटक पदार्थांचे एकमेकांशी कॉम्बिनेशन करून पुन्हा त्याला गार्लिक, शेजवन आणि चॉकलेट अशा फ्लेवर्सची जोड दिल्याने मेनूकार्डवर पराठ्याच्या प्रकारांची संख्या सत्तर ते ऐशींच्या घरात भरत असल्याने त्यांची निवड करण्यास थोडा वेळ लागला असला तरी मागवलेले तिन्ही पराठे चवीला अप्रतिम होते. प्रॉमिसला घरी जाऊन जेवायचे असल्याने त्याने केवळ कंपनी द्यायला म्हणून एखाद दोन तुकडे खाल्ल्याने ह्या ऑर्डरमध्येच आमचे दोघांचे व्यवस्थित पोट भरले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे आवरल्यावर रिंग रोडवरून एव्हिएशन म्युझिअमला जाण्यापेक्षा मागच्या बाजूने गल्ली बोळांतून गेल्यास ते अधिक जवळ पडत असल्याने आधी त्याच्या घरी जाऊन मग तिथून म्युझिअम पाहायला जायचे असे ठरल्यावर साडेनऊच्या सुमारास आमचा निरोप घेऊन प्रॉमिस आपल्या घरी निघून गेला.

------

आदल्या रात्री थोडे लवकर झोपल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी जागही तशी लवकरच आली होती. खाली जाऊन हॉटेलच्याच उपहारगृहात आमचा तिघांचा चहा-नाश्ता-चहा झाल्यावर पुन्हा रूमवर येऊन आंघोळी-पांघोळी उरकल्यावर बाल्कनीतून प्रॉमिसही तयार असल्याचा त्याचा संदेश मिळाल्यावर पुन्हा खाली उतरलो आणि म्युझिअम पाहून थेट एरपोर्टवर जाऊन बाकीच्या मंडळींना घेऊन हॉटेलवर परतायला आम्हाला तीन-सव्वातीन वाजून जाणार असल्याने कुठलीतरी पोथी वाचत बसलेल्या वडिलांसाठी साडे बारा वाजता रूमवर जेवण पाठवून देण्याची सूचना रिसेप्शन काउंटरवर देऊन पावणे दहाच्या सुमारास आम्ही काल रात्री ठरल्या प्रमाणे प्रॉमिसच्या घरी जायला निघालो.

गेस्ट हाउसवर पोचलो तेव्हा प्ले-ग्रुप, नर्सरी ज्या कशात असतील त्याला आज रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने वीरप्रतापच्या थोरल्या मुलाचा एक आणि धाकट्या मुलाचा एक असे दोघांच्या वयात काही महिन्यांचाच फरक असलेले 'अ‍ॅबी' आणि 'करण' नावाचे त्याचे दोन भयंकर मस्तीखोर चिमुरडे नातू गेस्ट हाऊसच्या आवारात दंगामस्ती करण्यावरून सकाळी सकाळीच त्याचा चांगला ओरडा आणि धपाटे खाल्याने शेडच्या कंपाउंडकडील बाजूच्या कोपऱ्यात तिथल्या कर्मचाऱ्याला झोपण्यासाठी असलेल्या बेड जवळच्या टेबलवर रडवेल्या चेहऱ्याने पत्त्यांचा डाव मांडून गपगुमान आपला जीव रमवत होते.

वीरप्रतापच्या पुतण्याचे नाव 'प्रॉमिस' आणि नातवाचे नाव 'अ‍ॅबी' असल्याचे ऐकल्यावर तिबेटी वंशाच्या बुद्धिस्ट नेपाळी लोकांमध्ये मुलांची इंग्लिश नावे ठेवण्याची फॅशन तशी जुनी आहे पण आता हे फॅड नेपाळी हिंदूंमध्येही आले आहे कि काय अशी शंका तेव्हा आली होती, पण नंतर गप्पांच्या ओघात प्रॉमिसकडे त्याबद्दलची विचारणा केली तेव्हा त्यांच्या ह्या नावांमागची कहाणी समजल्यावर खुलासा झाला.

झाले असे होते की प्रॉमिसचे आपण ज्याला पाळण्यातले नाव म्हणतो तसे राशीवरून ठेवलेले मूळ नाव 'प्रमेष' होते पण त्याची आजी म्हणजे वीरप्रतापची आई तिच्या नेपाळी-नेवारी अ‍ॅक्सेंटमध्ये प्रमेषचा उच्चार 'प्रोमेस' असा करायची. घरच्या सगळ्या मंडळींच्या कानावर सतत प्रोमेस... प्रोमेस... हा नामोच्चार पडत असल्याने अल्पावधीतच त्याचा आणखीन अपभ्रंश होऊन त्यांच्याकडून ते प्रॉमिस असे उच्चारले जाऊ लागले आणि त्यातून कागदोपत्रीही त्याच नावाची नोंद झाल्याने ह्या मूळच्या 'प्रमेष' ला 'प्रॉमिस' हे नाव अधिकृतरीत्या कायमस्वरूपी चिकटले 😀

पण त्याच्या मानाने 'अ‍ॅबी' जास्त नशीबवान म्हणायचा. त्याच्या जन्माच्या वेळीही ती म्हातारी हयात होती आणि त्याच्या 'अभय' ह्या नावाचा उच्चार ती 'अभे/अबे' असा करायची त्याचे घरच्या मंडळींनी अ‍ॅबी करून टाकले, पण ते केवळ घरात हाक मारायचे नाव म्हणूनच राहिले, कागदोपत्री ते अभय असेच आहे.

असो... गेस्ट हाऊसवर फार वेळ न घालवता त्यावेळी तिथे उपस्थित असलेला वीरप्रताप आणि घरात असलेले प्रॉमिसचे आई वडील आणि लहान बहीण व वाहिन्या आणि दोन काकूंना हाय-हॅलो-नमस्ते करून चहा-पाण्यासाठी न थांबता आम्ही तिघे एव्हिएशन म्युझिअमला जायला निघालो आणि काहीशी रस्त्यावरून आणि बरीचशी अरुंद गल्ली बोळांतून पदयात्रा करत आठ-दहा मिनिटांत त्याठिकाणी पोचलो.

नेपाळी युवा पिढीत विमानचालनाबद्दल स्वारस्य निर्माण करणे आणि जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या हवाई क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे असे मुख्य उद्दिष्ट ठेऊन 'वेद उप्रेती ट्रस्ट' आणि 'सिव्हील एव्हीएशन ऍथॉरिटी ऑफ नेपाळ (CAAN)' ह्यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर २०१७ मध्ये निर्माण झालेले हे 'एव्हिएशन म्युझियम' पाहण्यासाठी शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्रधारक विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी १५०/-, नेपाळच्या आणि सार्क देशांच्या नागरिकांसाठी ३००/-, अन्य परदेशी नागरिकांसाठी ५००/- नेपाळी रुपये प्रवेश शुल्क आणि CAAN चे कर्मचारी, एअरलाइन क्रू (पायलट आणि फ्लाइट अटेंडंट) ह्यांना प्रवेश निःशुल्क होता.

पदवी शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात असताना वैचारिक अपरिपक्वतेतून घडलेल्या एका गंभीर प्रमादामुळे समाजात 'बॅड बॉय' अशी प्रतिमा निर्माण झालेला आणि CAAN ची चाकरी करण्याची खानदानी परंपरा असलेल्या कुटुंबातला 'प्रॉमिस' आमच्याबरोबर असल्याने आम्हालाही ह्या म्युझियममध्ये निःशुल्क प्रवेश मिळाला. गेटवरच्या सिक्युरिटी गार्डपासून तिकीट खिडकीतले कारकून, संग्रहालयाचे कर्मचारी आणि व्यवस्थापकापर्यंत सर्वच जण एकतर त्याच्या आजूबाजूला राहणारे किंवा फॅमिली फ्रेंड्स असल्याने व्यक्तिगत परिचयाचे होते.

साडे दहाच्या सुमारास आत जाऊन पाहायला सुरुवात केलेल्या ह्या संग्रहालयाच्या उत्पत्ती मागे एका विमान अपघाताची पार्श्वभूमी असलेली कहाणीही रोचक आहे...

३ मार्च २०१५ रोजी इस्तंबूलहुन काठमांडूला येणारे टर्किश एरलाईन्सचे Airbus A330-300 विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगच्या अंतिम टप्प्यात आले असताना अचानक विमानतळ दाट धुक्याने झाकला गेल्याने दृष्यमानता शून्यवत होऊन वैमानिकांना धावपट्टी दिसेनाशी झाल्याने टचडाऊनच्या वेळी डाव्या बाजूचा 'मेन गिअर' धावपट्टीच्या बाहेर जाऊन टायर्स फुटल्याने विमान सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत धावपट्टीवर घसपटत गेले.

ह्या अपघातग्रस्त विमानात त्यावेळी असलेले २२३ प्रवासी, १ अर्भक आणि ११ क्रू मेम्बर्सना स्लाईड्स वरून बाहेर काढतेवेळी केवळ एका प्रवाशाला किरकोळ दुखापत होण्यावर निभावले. सुदैवाने ह्या क्रॅश लॅण्डिंगमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही पण घसरत जाताना विमानाचा 'नोज गिअर' निखळून पडल्याने त्याचे पंख, कॉकपीट, दोन्ही इंजिन्स आणि 'फ्युजलाज' (विमानाचा मुख्य सांगाडा) चे मात्र भरपूर नुकसान झाले आणि धावपट्टीही क्षतीग्रस्त झाल्याने आजघडीला काठमांडू, पोखरा आणि लुम्बिनी असे तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ असले तरी त्यावेळी नेपाळमधले एकमेव असलेले हे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ तब्बल चार दिवस बंद राहिल्याने अपघाताच्या दिवशी जगभरातले सुमारे चाळीस हजार प्रवासी नेपाळमध्ये अडकून पडले होते आणि तेवढ्याच संख्येने पुढच्या दिवसाच्या विमान तिकिटांचे रद्दीकरण झाले होते.

दूरपर्यंत वेगात घसपटत गेलेले हे अपघातग्रस्त विमान अशा ठिकाणी जाऊन थांबले होते कि शेजारची दुसरी धावपट्टी वापरणेही अशक्य झाले होते. अवघड ठिकाणी फसलेले हे विमान तिथून हटवून धावपट्ट्या मोकळ्या करण्याचे काम नेपाळच्या आवाक्याबाहेरचे असल्याने ह्या शेजाऱ्याच्या मदतीसाठी ५ मार्च २०१५ रोजी भारताने आपले कच्च्या किंवा खराब धावपट्ट्यांवरही टेकऑफ आणि लँडिंग करण्याची क्षमता असलेले 'हर्क्युलस C-130' हे विमान 'एअरक्राफ्ट रिमूव्हल किट' सहित पाठवले होते.

पुढे अपघाताची चौकशी आणि विमानाचे सखोल तांत्रिक परीक्षण/तपासणी वगैरे औपचारिकता पूर्ण होण्यात अनेक महिने गेले. वर्षभराहून अधिक काळ त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पडून राहिलेले आणि केवळ आठच महिने प्रत्यक्ष सेवेत असल्याने तसे पाहिले तर नवीन म्हणता येईल असे हे विमान दुरुस्त करून पून्हा सेवेत न घेता ते थेट मोडीत काढण्याचा निर्णय टर्किश एअरलाईन्सने घेतला होता.

माजी नेपाळी वैमानिक, विमानचालन प्रशिक्षक आणि परीक्षक, एरियल फोटोग्राफर, 'Everest: From the Air' ह्या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक आणि समाजसेवक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या 'वेद उप्रेती' (Bed Upreti) ह्यांनी नेपाळचे 'नागरी उड्डयन प्राधिकरण (CAAN)' आणि 'टर्किश एअरलाईन्स' कडे सदर विमान भंगारात न काढता त्याचे आपल्या 'वेद उप्रेती ट्रस्ट' ह्या कर्करोगी रुग्णांना मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या सेवाभावी ट्रस्ट मार्फत 'विमानचालन संग्रहालयात' रूपांतर करण्याची ईच्छा व्यक्त केली होती.

वेद उप्रेती ह्यांनी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून २०१४ साली पश्चिम नेपाळ मधल्या धनगढी येथे 'कॉस्मिक एअर' ह्या दिवाळखोरीत गेलेल्या काठमांडूस्थित अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या कंपनीच्या ताफ्यातील मोडीत काढलेले 'फॉकर १०० जेट' (Fokker 100 jet) हे विमान भंगारात विकत घेऊन त्यात नेपाळमधले पहिले 'एअरक्राफ्ट म्युझिअम' सुरु केले होते (ते गेल्यावर्षी पूर्वीची जागा कमी पडत असल्याने महेंद्रनगर (भीमदत्त नगर) येथे मोठ्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे). ह्या एअरक्राफ्ट म्युझिअम पासून मिळणारे उत्पन्न कर्करोग्यांच्या मदतीसाठी वापरले जाते.

वेद उप्रेतींचा हा पूर्वानुभव विचारात घेऊन CAAN ने सिनामंगल भागातल्या आपल्या मालकीच्या जमिनीपैकी थोडी जमीन ह्या एव्हिएशन म्युझियमसाठी उपलब्ध करून देऊन आणि टर्किश एअरलाईन्सने आपले विमान ह्या चांगल्या कार्यासाठी अत्यल्प किमतीत देऊ करून त्यांच्या इच्छेचा मान राखला आणि त्यातून हे संग्रहालय जन्माला आले.

त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या हॅंगरमध्ये टर्किश अभियंत्यांच्या टीमने दीड महिना राबून ह्या विमानाला १० तुकड्यांमध्ये विभाजित केल्यावर ट्रक्सवर हे तुकडे लादून संग्रहालयाच्या जागेवर आणून ते पुन्हा जोडण्यास त्यांना आणखीन दोन महिने लागले. विमानाच्या नुकसानग्रस्त भागांची डागडुजी करून त्याचे एव्हिएशन म्युझियममध्ये रूपांतर करण्यासाठी ट्रस्टला आलेल्या एकूण सात कोटी नेपाळी रुपयांच्या खर्चापैकी चार कोटी तीस लाख रुपये ​​कॅप्टन वेद उप्रेती ह्यांनी आपल्या वैयक्तिक कष्टार्जित कमाईतून दिले आणि दोन कोटी तीस लाख रुपये एव्हरेस्ट बँकेकडून कर्जाऊ घेण्यात आले होते.

ह्या संग्रहालयातले प्रमुख आकर्षण असलेल्या ६३.६६ मीटर्स म्हणजे सुमारे २०९ फूट लांबीच्या भल्यामोठ्या आणि खऱ्याखुऱ्या विमानाचे कॉकपीट शैक्षणिक दृष्टिकोनातून मूळ स्वरूपात ठेवण्यात आले आहे. बिझनेस क्लास मध्ये राईट बंधूंच्या यशस्वीरीत्या आकाशात भरारी मारलेल्या पहिल्या विमानाचे मॉडेल ठेवले आहे. इकॉनॉमी क्लास मध्ये तीन विभाग करून त्यातल्या एकात ५०-६० जण बसू शकतील असे विमानोड्डाणाचा आजपर्यंतचा इतिहास दर्शवणारी डॉक्युमेंटरी फिल्म दाखवणारे छोटे थिएटर, दुसऱ्यात जगभरातल्या प्रवासी एअरलाईन्स आणि हवाईदलांच्या वेगवेगळ्या विमानांची १५० पेक्षा जास्त मिनिएचर मॉडेल्स प्रदर्शित केली आहेत तर तिसऱ्या विभागात वेद उप्रेती ह्यांनी टिपलेल्या हवाई चित्रांचे प्रदर्शन करणारी 'एरिअल फोटो गॅलरी' आणि शेपटीकडच्या भागात एक महागडे उपहार गृह आहे.

'विमानचालन संग्रहालय' असल्याने इथले सर्व स्त्री-पुरुष गाईड्स आणि अन्य कर्मचारी 'फ्लाईट अटेंडंट'च्या गणववेषात वावरतात. ५० रुपये भाड्याने मिळणारा कॅप्टनचा गणवेष (शर्ट आणि टोपी) घालून कॉकपिटमध्ये हेडफोन्स वगैरे लावून फोटोसेशन करून अनेकजण आपले लहानपणी बघितलेले 'पायलट' होण्याचे स्वप्न फोटोरूपाने का होईना पण पूर्ण करून घेताना दिसतात.

सेवेतून बाद झालेले एक खरेखुरे हेलिकॉप्टर हे इथले आणखीन एक आकर्षण आहे आणि मोठ्या बागेचे स्वरूप असलेल्या ह्या संग्रहालयात बाळगोपाळांना आवडतील अशा घसरगुंड्या, झोपाळे आणि काही वैज्ञानिक खेळणी अशा अन्य गोष्टीही इथे आहेत.

एव्हिएशन म्युझियमचे काही फोटोज ▼

कॉकपीट ▼

डॉक्युमेंटरी थिएटर ▼

जगभरातल्या प्रवासी एअरलाईन्स आणि हवाईदलांच्या वेगवेगळ्या विमानांची मिनिएचर मॉडेल्स ▼

विमानोड्डाणाचा इतिहास दर्शवणारी डॉक्युमेंटरी छानच आहे, एरिअल फोटो गॅलरीतले काही फोटोज अप्रतिम आहेत आणि जवळपास सगळ्याच विमानांची मिनिएचर मॉडेल्स प्रेक्षणीय असली तरी एकंदरीत पाहता लहान मुले आणि विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन शैक्षणिक दृष्टिकोनातून निर्माण केलेले हे संग्रहालय लहान मुलांना खूप आवडेल ह्यात शंकाच नाही पण मोठ्या माणसांना एक 'संग्रहालय' म्हणून त्याकडे पाहताना ते कितपत आवडेल ह्याविषयी मात्र थोडा साशंक आहे. बाकी 'संग्रहालयाला' मोठ्यांकडून दाद मिळो की न मिळो, पण 'एअरहोस्टेस'च्या वेशभूषेत वावरणाऱ्या इथल्या एक से बढकर एक अशा सुंदर सुंदर नेपाळी गाईड मुली पाहिल्यावर ह्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करणाऱ्याच्या सौंदर्यदृष्टीला मात्र भरभरून दाद मिळेल एवढे नक्की 😀

असो... दीड वाजत आला होता आणि भुकेची जाणीवही व्हायला लागली होती. अडीच-पावणे तीन वाजेपर्यंत एअरपोर्टवर पोचायचे असल्याने आता इथेच काहीतरी खाऊन मगच निघू अशा विचाराने विमानाच्या शेपटीतल्या उपहारगृहाकडे आम्ही मोर्चा वळवला.

आकाशात उडणाऱ्या विमानात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमतींशी स्पर्धा करतील अशाच आता कधीही आकाशी झेप न घेऊ शकणाऱ्या ह्या जमिनीवरील विमानातल्या उपहारगृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती असल्या तरी एका चांगल्या उद्देशाने वेद उप्रेतींनी सुरु केलेल्या ह्या संग्रहालयात विनामूल्य प्रवेश मिळाल्याने त्या उद्देशाला हरताळ फासण्यापेक्षा ह्या ना त्या रूपाने आपल्याकडूनही त्याला काहीतरी हातभार लागावा असा विचार मनात आल्यावर त्यात काहीच गैर वाटले नाही.

ग्रिल्ड सँडविचेस, व्हेज पफ्स आणि कोल्ड कॉफी असे पदार्थ ग्रहण करून पोटोबा शांत झाल्यावर साडेतीन तास मजेत व्यतीत करून काहीतरी चांगले आणि 'नेत्रसुखद' पहायला मिळाल्याचे समाधान घेऊन दोनच्या आसपास संग्रहालयातून बाहेर पडून रिंग रोडवर येऊन एअरपोर्टच्या दिशेने जाणारी खाजगी प्रवासी वाहतूकदाराची बस पकडून जेमतेम पाच-सहा मिनिटांत आम्ही एअरपोर्टच्या गेटवर पोचलो. बसचे छापील तिकीट बिकिट असे काही लाड नाहीत, कुठे उतरायचे ते सांगितल्यावर तो सांगेल तेवढी भाड्याची रक्कम दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या कंडक्टरला द्यायची आणि आपल्या स्टॉपचा पुकारा झाला कि उतरायचे. किमान प्रवास भाडे २० रुपये मात्र.

गेटवरून 'इंटरनॅशनल अरायव्हल' कडे जाणारी शटल बस पकडून आम्ही तिथे पोचलो आणि निर्धारित वेळेवर लँड झालेली आमची मंडळी बाहेर येण्याची वाट बघत थांबलो...

टीप: टर्किश एरलाईन्सच्या Airbus A330-300 ह्या अपघातग्रस्त विमानाचे फोटोज जालावरून साभार.

क्रमशः

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

21 Jul 2024 - 11:04 am | कर्नलतपस्वी

थोड्याच वेळात अनोळखी प्राॅमिसच्या घरण्याची पाळे मुळे खणून काढलीत या बद्दल एक कडक सॅल्युट. हे कौशल्य पाहून असे वाटले की आपण राॅ किवां बनारस येथील पंडा असायला हवे होते. विना सहकार नही उद्धार ही उक्ती इथे साकार होताना दिसते.

कॅ उपरेती यांना सुद्धा एक कडक सॅल्युट. अफलातून समाज कार्य करत आहेत.

लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.

उत्साहवर्धक प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

"थोड्याच वेळात अनोळखी प्राॅमिसच्या घरण्याची पाळे मुळे खणून काढलीत"

थोडा वेळ नाही हो कर्नलसाहेब, तब्बल पाच रात्री आणि सहा दिवसांच्या काठमांडूतील एकूण वास्तव्यकालात रोजच भेट होणाऱ्या वीरप्रताप आणि आमच्यातलाच एक होऊन गेलेल्या प्रॉमीसकडून तुकड्या तुकड्यांत मिळालेली माहिती एकत्रितरीत्या लिहिल्याने ती कमी वेळात मिळाल्यासारखे वाटणे साहजिक आहे!

मागच्या भागावरच्या सौंदाळा ह्यांच्या प्रतिसादावर दिलेल्या उपप्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे माझा गाढ विश्वास असलेल्या 'योगायोगातुन' ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या एका रात्रीसाठीच आम्हाला हॉटेलच्या मागच्या बाजूची रूम मिळणे, तिथून वीरप्रताप, प्रॉमिस आणि त्याचे ते दोन झकास कुत्रे दिसणे, त्या कुत्र्यांची नावे टॉमी, रॉकी, जॅकी वगैरे सारखी पठडीतली नसून ती कुरो आणि अकामारू सारखी सर्वसामान्यपणे अपरिचित अशी असणे, त्यांचा जपानी कॉमिक्स/ऍनिमेशी असलेल्या संबंधाचा विषय निघण्यातून दोन समानछंदी व्यक्तींमध्ये तात्काळ जवळीक निर्माण होणे वगैरे वगैरे अशी एक प्रकारची चेन रिऍक्शनच सुरु होण्यातून पुढच्या गोष्टी घडत गेल्या असे म्हणता येईल हवेतर. अन्यथा जगाच्या पाठीवर अशा नावांचे इसम अस्तित्वात आहेत हे देखील कधी समजले नसते.

अर्थात समोरच्या व्यक्तीही मक्ख, खडूस, तिरसट, माणूसघाण्या नसून मनमिळाऊ असल्याने त्यांच्याशी वेव्हलेंथ छान जुळली हे देखील तितकेच महत्वाचे 😀

श्वेता२४'s picture

21 Jul 2024 - 12:48 pm | श्वेता२४

प्रमेश आणि अभय यांच्या नावाचा झालेला अपभ्रं श याबद्दलची माहिती दिली ते वाचून हसून डोक्याला हातच लावला. संग्रहालयाची माहिती आवडली. काही भाग खूप खूपच आवडला

मुक्त विहारि's picture

21 Jul 2024 - 6:12 pm | मुक्त विहारि

पुभाप्र ...

प्रचेतस's picture

22 Jul 2024 - 9:11 am | प्रचेतस

तुमचे लिखाण म्हणजे नुसती प्रवासवर्णने नसून त्यात आलेल्या अनुभवांचा एक खजिनाच असतो. ठिकाणांचे तपशीलवार वर्णन, भेटलेल्या विविध व्यक्तींची चित्रणे आदी सर्व काही डोळ्यांसमोर उभे राहते आणि त्यामुळे तुमच्यासोबत आमचीही सफर होत राहते.

खुपच सुंदर लिहिलंय! तुम्ही नेपाळचेच आहात असं वाटतेय 😁
अनेक लेखांमध्ये अनेक बिझनेस आराखडा(model) तुम्ही ज्या पद्धतीने मांडता ना.. की भारीच !!
नावांची गंम्मत खासच!

श्वेता२४ । मुवि काका । प्रचेतस । भक्ति
उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

"तुम्ही नेपाळचेच आहात असं वाटतेय"

😂
ह्या वाक्यावरून बारा-तेरा वर्षांपूर्वी कुठल्याशा सेवाभावी संस्थेने मदतनिधी उभारण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला रंगभूमी गाजवणाऱ्या दिग्गज कलावंतांचा सहभाग असलेला एक मस्त विशेष कार्यक्रम मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात पाहिला होता त्यातले एक स्किट आठवले. मला नाटक हा प्रकार अजिबात आवडत नसल्याने रंगभूमीवरचे फारसे कलाकार नावानेही माहिती नाहीत पण टीव्ही आणि चित्रपट माध्यमांमुळे परिचित झालेले विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, सतीश तारे असे काही गुणी (दिवंगत) कलाकारही त्या कार्यक्रमात असल्याचे आठवते.

एका बसच्या अंतर्भागाचा सेट उभारून त्यात 'बॉम्बे टू गोवा' ह्या हिंदी किंवा त्याची भ्रष्ट नक्कल असलेल्या 'नवरा माझा नवसाचा' ह्या मराठी चित्रपटाप्रमाणे एका बस प्रवासात घडणारे प्रसंग सादर करणारी छोटी छोटी विनोदी स्किट्स असे स्वरूप असलेल्या त्या कार्यक्रमात विजय चव्हाण आणि माझ्यासाठी अपरिचित अशा अन्य कलावंतांनी सादर केलेल्या छोट्याशा विनोदी प्रसंगात, एका थांब्यावर बसमध्ये चढलेली एक सुंदर तरुणी बसच्या खिडकीवाल्या सीटवर बसलेल्या विजय चव्हाणांच्या शेजारी येऊन बसणार एवढ्यात तिच्या मागून चढलेला मक्ख चेहऱ्याचा एक वयस्कर मनुष्य तिला ती सीट ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्याचे सांगून स्वतः त्या सीटवर बसतो. एक सुंदर तरुणी शेजारी येऊन बसत असताना तिला हुसकावून हा खत्रूड म्हातारा आपल्या शेजारी येऊन बसल्याने त्याच्यावर वैतागलेले विजय चव्हाण त्या म्हाताऱ्याला छळण्यासाठी ज्या अनेक गमती जमती करतात त्यातली हि एक...

हाताची घडी घालून निर्विकार चेहऱ्याने समोर बघत बसलेल्या त्या वयस्कर व्यक्तीच्या दंडावर अचानकपणे थोपटून "आजोबा तुम्ही नेपाळी आहात काय हो?" असा प्रश्न विजय चव्हाण विचारतात.
त्यावर दचकलेली ती व्यक्ती "नाही" असे उत्तर देते.
आपले मोठे डोळे आणखीन विस्फारत आश्चर्यचकित झाल्याचा अभिनय आणि हातवारे करत काहीक्षण खिडकीतून बाहेर बघत बसल्यासारखे करून पुन्हा त्यांच्या दंडावर थोपटून "आजोबा तुम्ही... नको राहूदे..." असे म्हणत नकारार्थी मान हलवत प्रश्न अपुरा सोडून ते पुन्हा बाहेर बघत बसतात.
अचानक दचकवण्याचा हा प्रकार अजून तीन-चार वेळा झाल्यावर मात्र ते स्थितप्रद्न्य आजोबा वैतागतात आणि काही वेळाने विजय चव्हाण पुन्हा त्यांच्या दंडावर थोपटून पुढे काही विचारणार एवढ्यात ते आजोबा त्यांना हाताने इशारा करुन थांबवत,
"हे बघा मिस्टर, मी नेपाळी आहे का? हेच विचारायचय ना तुम्हाला? तर हो, मी नेपाळीच आहे... झालं तुमचं समाधान?" असा प्रतिप्रश्न विचारतात.
त्यावर क्षणभर त्या आजोबांच्या चेहऱ्याचे बारकाईने निरीक्षण केल्यासारखे करून आपल्या चेहऱ्यावर परम आश्चर्याचे भाव आणत विजय चव्हाण त्यांना "काय म्हणता, तुम्ही नेपाळी आहात? पण खरं सांगतो तुमच्या चेहऱ्यावरुन तसे अजिबात वाटत नाही..." असे उद्गारतात तेव्हा नाट्यगृहात प्रचंड हशा पिकाला होता.

वास्तविक अतिशय मोजकी वाक्ये आणि शब्द असलेल्या त्या संवाद/प्रसंगात एक पैशाचाही शाब्दिक विनोद नव्हता पण केवळ आपल्या चेहऱ्यावरचे विनोदी हावभाव, आवाज आणि संवादफेकीच्या विशिष्ट शैलीच्या जोरावर स्वर्गीय विजय चव्हाण आणि त्यांना तेवढीच तोला मोलाची साथ देणाऱ्या आजोबांच्या भूमिकेतल्या कलाकाराने त्या प्रसंगात 'जान' आणून तो कमालीच्या विनोदी पद्धतीने सादर केला होता!

झकासराव's picture

22 Jul 2024 - 5:30 pm | झकासराव

लिखाण शैली फारच छान आहे.
आवडतंय.
अनुभवाची पोतडी उघडताय छानपैकी.
Virtual टूर होते त्यामुळे.
लेख फार उशिरा आला :)
नियमित येऊद्या

लेख फार उशिरा आला :)
नियमित येऊद्या

येस्स सर... मधल्या काळात अचानक दोन लेख 'पाडले' गेल्याने हा भाग येण्यास उशीर झाला त्यासाठी दिलगीर आहे!
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

स्मिता श्रीपाद's picture

22 Jul 2024 - 5:33 pm | स्मिता श्रीपाद

मस्त लिखाण आहे. प्रसंग रंगवुन सांगण्याची तुमची हातोटी नेहेमीच आवडते.
अनोळखी कुटुंबाशी इतकी छान ओळख करुन घेतलीत. भारीच.
एक सुचना करावीशी वाटते. प्लीज राग मानु नका. लिहिताना जरा लहान लहान वाक्य लिहिलीत तर वाचायला अजुन मजा येइल. तुमची वाक्य खुपच मोठी मोठी, काही ठीकाणी ४ ओळींनंतर पुर्णविराम येतो आहे :-)
बाकी लेखन मस्तच. फोटो अजुन असते तर मजा आली असती.

छे हो त्यात राग काय मानायचा, उलट लेखनातील त्रुटी/उणिवा निदर्शनास आणून देणाऱ्या दर्दी मिपाकरांच्या सूचनांचे मी मनापासून स्वागतच करतो 👍

"तुमची वाक्य खुपच मोठी मोठी, काही ठीकाणी ४ ओळींनंतर पुर्णविराम येतो आहे :-)"

माझ्या लेखांत ३५-४० शब्दांची मोठी वाक्ये असतात ही गोष्ट मागे मिपा वाचकांनी लक्षात आणून दिली होती. आज तुमचा प्रतिसाद वाचल्यावर ह्या लेखातली अशी मोठी वाक्ये शोधायला घेतली तेव्हा ३५-४० शब्द हा आकडा खूपच मागे पडून ७०-८० शब्दांचे वाक्यही सापडले आणि कहर म्हणजे एका वाक्यात तर तब्बल ११६ शब्दांनंतर पूर्णविराम आल्याचेही आढळले 😀
लोकं शंभर शब्दांत कथा (शशक) वगैरे लिहितात आणि इथे शंभरपेक्षा जास्त शब्दांचे एक वाक्य म्हणजे अतिरेकच झालाय म्हणायचा. लिहिण्याच्या ओघात माझ्याकडून शब्दसंख्येकडे विशेष लक्ष दिले जात नाही हे खरे, पण आपली सूचना लक्षात ठेऊन ती अमलात आणायचा प्रयत्न नक्कीच करण्यात येईल!
मार्गदर्शक प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

पर्यटन कसे करावे आणि लिहावे याचा नमुना.

अगं अगं म्हशी xxx कुत्र्या मला कुठे नेशी हा किस्सा मार्गदर्शक आहे देश कसा पाहावा आणि जाणावा याचा. आपण अगोदर वाचलेली ऐकलेली माहिती याचाच कित्तेघोटीव उपयोग न करणे हे आवडले.
बाबांचा हॉटेल रुममध्येच राहून वाटसप गीता वाचत राहण्याचा{आणि संजयला मुक्त सोडण्याचा }सोशिकपणाही आवडला.

टर्मीनेटर's picture

25 Jul 2024 - 4:03 pm | टर्मीनेटर

कुत्र्या मला कुठे नेशी हा किस्सा मार्गदर्शक आहे

पण त्या कुत्र्यांच्या निमित्ताने माझ्या काठमांडुतील वास्तव्याला चार चांद लागले खरे!
आणि हे बरं आहे, बाबांचा सोशिकपणा तेवढा दिसला पण आम्ही स्वेछेने पाळलेल्या १ - १.५ किलोमिटरच्या त्रिज्येच्या मर्यादेचे काय 😀
अर्थात त्या मर्यादेत 'मुक्त' रहाण्याचा संजयचा तो शेवटचा दिवस होता, एकदा का बाकिची काळजीवाहु मंडळी त्यांच्या सोबतीला आली कि मग त्या रात्रीपासुन तो 'मोकाट' सुटणार होता 😂

किल्लेदार's picture

24 Jul 2024 - 6:16 am | किल्लेदार

हिमालय कुठंय? आला नाही अजूनसा. ही सर्व ठिकाणं हिमालयाच्या कुशीत नसल्यामुळे केली नाहीत. बरंय आयती ट्रिप घडतेय.

टर्मीनेटर's picture

25 Jul 2024 - 4:22 pm | टर्मीनेटर

शाबजी, वो पोखरा मे आयेगा... उसको थोडा टाइम लगेगा... 😀

गोरगावलेकर's picture

24 Jul 2024 - 11:48 am | गोरगावलेकर

अतिशय रंजकपणे सर्व माहिती सांगितली आहे.

सौंदाळा's picture

24 Jul 2024 - 1:17 pm | सौंदाळा

प्रॉमिस आणि कुटूंबियांचे बिजनेस मॉडेल आवडले.

तुमचे चाकोरीबाहेरचे प्रवासावर्णन वाचणे हा नेहमीच आनंददायक अनुभव असतो!
वाचकाला गुंतवून ठेवणारी चित्रदर्शी लेखनशैली, सुंदर फोटो आणि प्रवासात भेटलेल्या लोकांची व्यक्तिचित्रणे या बद्दल प्रत्येकवेळी काय वेगळं बोलणार? निव्वळ अप्रतिम!!

नोव्हेंबर महिन्यात सहकुटुंब नेपाळ सहल करायचा विचार आहे. एका प्रसिद्ध यात्रा कंपनीकडून 7N/ 8D साठी माणशी ७४,००० रुपयांचे कोटेशन मिळाले आहे. तुमची परवानगी असल्यास सहलीचा कार्यक्रम आणि काही प्रश्न तुम्हाला व्य. नि. करतो. कृपया त्याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे हि विनंती.

टर्मीनेटर's picture

25 Jul 2024 - 4:44 pm | टर्मीनेटर

गोरगावलेकर । सौंदाळा । अथांग आकाश
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ अथांग आकाश
त्यासाठी परवानगी कशाला हवी, पाठवा व्य. नि. वर बिनधास्त. त्याविषयी जेवढी माहिती असेल ती नक्कीच शेअर करीन!

अथांग आकाश's picture

26 Jul 2024 - 4:56 pm | अथांग आकाश

धन्स! आज पाठवतो!!