गझल

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
8 Jul 2024 - 10:27 pm

गझल

संध्याकाळची वेळ . मोठं रोमँटिक वातावरण ! बाहेर मुसळधार पाऊस. धरतीशी लडिवाळ नाही तर जोरकस सलगी करणाऱ्या आषाढसरी !
त्या सभागृहात कार्यक्रम रंगात आला होता . गझलांचा कार्यक्रम. शांतपणे ,आतल्या अगदी आतल्या जखमा कुरवाळणारा .
तुडुंब गर्दी होती. त्यातही तरुणाईची खरी गर्दी . बाकी थोडीफार पिकली पानं होती ; पण ती घरी वेळ जात नाही म्हणून आलेली .
कारण तसंच होतं ना. कार्यक्रम शामकुमारचा होता . तरुण , राजबिंडा ,नवोदित गझल गायक . पण तयारी अशी की पार बुजुर्ग वाटावा .
त्यामुळेच तर गर्दी होती आणि तरुण मुलांची जास्त अन हो मुलींचीही . असतं वय एखाद्यावर जीव टाकायचं . येड लागायचं . एखादी अप्राप्य गोष्ट म्हणल्यावर तर पोरी जास्तच जीव टाकतात आणि तो जो कोणी असतो ना तोही इमानेइतबारे त्यांचा जीव काढत असतो.
तो एकेक गझल पेश करत होता . अंतरात्म्यातून. एखादी मराठीही. पाऊस, विरह अन प्रेम. बाहेर पाऊसच पाऊस . पण आतही लोक भावनांच्या वर्षावात भिजून गेले होते .
तो आज भलताच मूडमध्ये होता आणि रसिकही .एकेक फर्माईश चालली होती . पण वेळ संपत आली होती. आता थांबायला हवं होतं. आयोजकांचा तसा निरोपही आला होता .
शेवटची गझल- तसं त्याने अनाऊन्स केलं .
ती मात्र कातिल हवी होती. कार्यक्रमाचा कळस ! ती गझल कुठली हे त्याने आधी ठरवलेलं होतं .
पण त्याने ती अचानक बदलली .
तो गाऊ लागला. भैरवीचे सूर छेडत .

फिर मिलोगे कहीं यूं
ये पता न था ....

कमाल ! कमाल शब्द , कमाल धून अन कमाल आवाज. हरवलेल्या प्रेमाला साद घालणारा, काळीज चिरणारा ,डोळ्यांत पाणी आणणारा …
जणू प्रेमाचा मेघमल्हारच ! काही पोरीतर डोळे टिपू लागल्या .
त्याच्या या आताच्या आवाजात काहीतरी वेगळी जादू होती . त्याचा आवाज काही वेगळाच लागला होता . दैवी . कातर !
बाहेर खतरनाक पाऊस .त्या शांत गझलेला द्रुतलयीत ताल देणारा .
लोकांनी वन्स मोअर दिला -
तो पुन्हा तीच गझल गाऊ लागला .
पण नाही - ती आधीची कशिश या आवाजात नव्हतीच . त्या गझलपुरता आधी तो - तो नव्हताच जणू. कोणी वेगळाच . हा बदल त्याला स्वतःलाच कळला . पण त्याने गझल पूर्ण केली .
त्याने ऐनवेळी दुसरीच गझल गायली होती. कारण -
ऐकायला ती आली होती - जिला त्याची नजर नेहमीच शोधत असे . चिरल्या काळजाने. त्याच्या दिलातला दर्द तीच तर होती . आधीही अन आताही .
अन ती नजरेला पडावी . कधी ? तर शेवटच्या गझलला. कंबख्त नसीब !
अन वन्स मोअरला ती निघूनही जावी ना . तो येडा पाऊस गपकन थांबल्यासारखी ! काही क्षण तसेच अधुरे ठेवून … तिच्या नव्याबरोबर.
पैसेवाल्या आयोजकांच्या पोराबरोबर.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2024 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सायंकाळ, बाहेर पाऊस, तीची आठवण, आणि गझल.
सगळं लेखनात जुळवून आणलं तुम्ही पण..

काही खास ओळी, शायरी, अशी मैफिल
तुम्हीही लेखनात रंगवायला पाहिजे होती असे वाटले.

”कौन है इस रिम-झिम के पीछे छुपा हुआ
ये आँसू सारे के सारे किस के हैं”’

-दिलीप बिरुटे
( पाऊस आठवणीतला )

अब ज़माना है बेवफ़ाई का
सीख लें हम भी ये हुनर शायद

अमीता परसुराम मीता

चौथा कोनाडा's picture

10 Jul 2024 - 5:58 pm | चौथा कोनाडा

सुंदर !

चित्रगुप्त's picture

10 Jul 2024 - 11:11 pm | चित्रगुप्त

हाण्ण त्यजायला.
-- तो कोण शामकुमार का कोण, त्याचा अगदी के.एल.पी.डी. पोपट झाला. लई माज आला होता त्याहिले. पोरगीबी लईच चॅप्टर. मजा आली.
कोणीतरी असा पोपट होण्याबद्दलच्या गजला, शेर टाका असले तर.

वाचकाला अगदी गुंगावत ठेऊन अगदी शेवटी अनपेक्षित वळण घेऊन संपणारी कथा लाजवाब.

अथांग आकाश's picture

12 Jul 2024 - 9:03 am | अथांग आकाश

के.एल.पी.डी. हे लघुरुप वाचल्यावर कॉलेजचे दिवस आठवले :)

अथांग आकाश's picture

12 Jul 2024 - 9:01 am | अथांग आकाश

कथा आवडली!

बिपीन सुरेश सांगळे's picture

13 Jul 2024 - 12:02 am | बिपीन सुरेश सांगळे

वाचकमंडळी
आपला ऋणी आहे .