मिपा कला संग्रहालय - १. पुराणकथांचे चित्रण

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in मिपा कलादालन
8 Jul 2024 - 8:59 pm

नमस्कार मिपाकर हो!

मिपा कला संग्रहालय - ०. प्रस्तावना ह्या प्रस्तावनेच्या लेखात म्हणल्याप्रमाणे हे मिपावरील कलासंग्रहालय सुरु करत आहोत.

हा धागा पुराणकथांचे चित्रण ह्या विषयाला धरुन आहे. इथे कोणत्याही पौराणिक कथांशी संबंधित जसे की ग्रीक-रोमन पुराणकथा, उत्तर युरोपच्या पुराणकथा, कृष्णलीला, रामायण - महाभारत, देवी देवतांचि चित्रे, आफ्रिकन, चिनी वगैरे वर आधारित असलेली चित्रे देता येतील.

चित्रे देताना खालील टेम्प्लेटचा वापर केल्यास धागा दर्जेदार राहील आणि भविष्यात चित्रे शोधण्यास मदतही होईल.

प्रतिसाद शीर्षक : चित्राचे नाव
प्रतिसाद :
चित्राचे नाव
चित्रकाराचे नाव (कालखंड)
चित्रशैली
इंटरनेटवरील लिंक
पर्यायी लिंक
सर्व चित्रांची लिंक उपलब्द असल्यास त्याची लिंक
चित्र (शक्यतो फुल्ल साईझ)
टिप्पण्णी : हे चित्र तुम्हाला का आवडते किंव्वा तुमची चित्राविषयी काही मते असल्यास.

उपप्रतिसादात - सदर चित्राशी निगडीत चित्रे असावीत. सदरहु चित्रकाराची सर्वच्या सर्व चित्रे उपलब्द असल्यास ती देऊ नयेत , केवळ त्यांची लिंक द्यावी. अर्थात चित्रकाराचे अजुन काही प्रसिध्द चित्र असल्यास ते स्वतंत्र प्रतिसादात जरुर द्यावे.

आपल्या सुचनांचे स्वागत आहेच !

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

8 Jul 2024 - 9:35 pm | प्रसाद गोडबोले

चित्राचे नाव : राम भरत भेट
चित्रकाराचे नाव (कालखंड) : श्री.भवानराव पंतप्रतिनिधी - बाळासाहेब - अर्थात "औंधाचा राजा"
इंटरनेटवरील लिंक: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/b/be/Rama-Bharata-Paduka.jpg
सर्व चित्रांची लिंक : https://commons.wikimedia.org/wiki/Category:Chitra_Ramayana
चित्र:
ram
टिप्पण्णी : श्री. भवानराव पंतप्रतिनिधी अर्थात बाळासाहेब ह्यांनी रामायणातील प्रसंगांवर काढलेले चित्ररामायण हे नितांत सुंदर पुस्तक. त्यातील रामायणातील सर्वात सुंदर क्षणावरील हे सुंदर चित्र ! हे पुस्तक हार्डकॉपी स्वरुपात संग्रही असावे अशी खुप इच्छा आहे पण अनेकदा औंध संस्थानात जाऊन देखील हे पुस्तक काही मिळाले नाही. बघु, रामाच्या मनात येईल तेव्हा नक्की मिळेल हे पुस्तक !

मुक्त विहारि's picture

8 Jul 2024 - 9:35 pm | मुक्त विहारि

मस्तच...

या चित्रातल्या स्त्रिया पाचवारी साड्यांत का दाखवल्या आहेत हा प्रश्न पडला.

प्रचेतस's picture

9 Jul 2024 - 9:24 am | प्रचेतस

चित्राचे नाव : नहुषाचे पतन (अगत्स्य महिमा)
चित्रकाराचे नाव : खराटे एम
ठिकाणः अगत्स्य ऋषी आश्रम, अकोले

a

महाभारतातील वनपर्वातील आजगर उपपर्वात ह्याचे सविस्तर वर्णन आहे.

तदैश्वर्यं समासाद्य दर्पो मामगमत्तदा |
सहस्रं हि द्विजातीनामुवाह शिबिकां मम ||

ऐश्वर्यमदमत्तोऽहमवमन्य ततो द्विजान् |
इमामगस्त्येन दशामानीतः पृथिवीपते ||

न तु मामजहात्प्रज्ञा यावदद्येति पाण्डव |
तस्यैवानुग्रहाद्राजन्नगस्त्यस्य महात्मनः ||

आपल्या तपसामर्थ्याने स्वर्गात गेलेला नहुष गर्वोन्मत्त झाला आणि सहस्त्र द्विज त्याची पालखी वाहू लागले. मदांध झालेल्या नहुषाने पालखी वाहणार्‍या अगस्त्यांना लाथ मारली. रोधित अगस्त्यांनी नहुषाला सर्प होऊन पृथ्वीवर पतन होण्याचा शाप दिला.

धर्मराजमुटके's picture

11 Jul 2024 - 9:50 pm | धर्मराजमुटके

तुम्ही तर आमच्या तालुक्याच्या ठिकाणाच्या मंदिरापर्यंत पोहोचलात. धन्य आहे तुमची !

धर्मराजमुटके's picture

11 Jul 2024 - 10:00 pm | धर्मराजमुटके

सहस्त्र द्विज त्याची पालखी वाहू लागले की कसे याबद्द्ल साशंक आहे. बहुधा सप्तर्षी (सात ऋषी होते) त्यातील एक अगस्त्य मुनी होते.

अती अवांतर : अगस्त्य मुनींनी समुद्र प्राशन केल्याच्या प्रसंगाचे वर्णन होते काय मंदिरात तुम्ही गेले त्यावेळेस ?

प्रचेतस's picture

11 Jul 2024 - 10:39 pm | प्रचेतस

सहस्त्र हे केवळ अतिशयोक्त वर्णन, मुळात ही संपूर्ण कथाच अगस्त्य महिमा दाखवते. मुळात अगस्ती सप्तर्षींपैकी नव्हेत. वशिष्ठ, विश्वामित्र, अत्री, गौतम, कश्यप जमदग्नी, भारद्वाज हे ते सात ऋषी. दक्षिणेकडील प्रभावी ऋषी एकच ते म्हणजे अगस्त्य. रामायण, महाभारतात अगस्त्य महिमा खूपदा वर्णिला आहे.

बाकी तुमचे तालुक्याचे ठिकाण खूपच छान. अगस्त्याने केलेले समुद्रमंथन, अगस्त्यजन्म, वातापीचा वध, रामास केलेला उपदेश आदी खूपशी चित्रे तेथे आहेत. सुंदर आहे आश्रम.

अगस्त्याने केलेले समुद्रमंथन, अगस्त्यजन्म, वातापीचा वध, रामास केलेला उपदेश आदी खूपशी चित्रे तेथे आहेत.

धर्मराज मुटके यांनी गावातली ती चित्रे फोटो काढून आणून इथे द्यावीत, अशी विनंती करतो.

प्रचेतस's picture

12 Jul 2024 - 9:14 am | प्रचेतस

अगस्त्य जन्म

मित्र- वरुणाने आपले तेज एका घड्यात सोडले आणि त्या घड्यातून अगस्त्यांचा जन्म झाला अशी ही कथा

a

अगस्तींद्वारे समुद्रप्राशन

a

अगस्त्यांकडून वातापीचा वध

a

सुवर्णामुखरी नदीचे अवतरण- ही अगस्त्यांनी विंध्यात निर्माण केलेली नदी

a

अगस्त्यांकडून रामाला आदित्यहृदय स्तोत्राचा उपदेश

a

राम लक्ष्मण सीता अगस्ती आश्रमात दर्शनाला जातात.

a

धर्मराजमुटके's picture

12 Jul 2024 - 9:29 am | धर्मराजमुटके

धन्यवाद प्रचेतस !

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2024 - 8:00 pm | चौथा कोनाडा

व्वा . किती सुंदर चित्रमालिका आणि विवरण !

धन्यवाद, प्रचेतस !

चित्राचे नाव-चिडलेला रावण कैलास पर्वत उचलायचा प्रयत्न करतांना
चित्रकाराचे नाव-ओंकार रविंद्र जोशी(आधुनिक काळ)
चित्रांसाठी इन्स्टाग्रामवर दुवा-ओंकाराच्या रेषा
https://www.instagram.com/bharatiya_chitrakatha?igsh=MWk0bTBnZnl6YmVkdw==
चित्रशैली -पेन्सिल रेखाटन आणि रंगभरण
अ
चित्रकथा-
रावणाने शिव आणि नंदीची थट्टा केली. आपल्या स्वामीच्या अपमानामुळे संतप्त झालेल्या नंदीने रावणाला शाप दिला की वानर त्याचा नाश करतील. या बदल्यात, रावणाने नंदीच्या शापाने चिडलेल्या कैलासला उखडून टाकण्याचा निर्णय घेतला आणि पुढे जाण्यास असमर्थता दर्शविली. त्याने आपले सर्व वीस हात कैलासाखाली ठेवले आणि ते उचलायला सुरुवात केली.
***
काय आवडले
चित्रकार ऐतिहासिक प्राचीन पौराणिक कथा,देवी देवता यांचे निरागस पेन्सिल रेखाटन करत त्यात गडद लाल,निळे ,हिरवे रंग भरतात.साकारलेले रेखाटन निरागसतेने भरलेले असते तसेच आताच्या काळातील मुला मुलींना ही सहज आकर्षून घेते.
***
इतर आवडलेली चित्रे म्हणजे माहेरवाशीण पार्वती आणि चैत्र गौर यात कांचनहिरव परकर पोलके,ठसठशीत नथ,अंबाडा, चेहरा त्यावरील सुमधुर हास्य कायम प्रसन्न वाटत राहते.
चैत्रगौर
आ

माहेरवाशीण पार्वती
इ

प्रचेतस's picture

10 Jul 2024 - 11:53 am | प्रचेतस

चित्राचे नाव-चिडलेला रावण कैलास पर्वत उचलायचा प्रयत्न करतांना

रावणानुग्रहाचं हे चित्र बघताना आपल्या प्राचीन शिल्पकारांनी किती बारकाईने विचार केलाय हे समजते. वेरुळ तसेच इतर काही लेण्यातील रावणानुग्रहाच्या शिल्पांत कैलास उचलण्याचा प्रयत्न करणार्‍या रावणाची पाठ दाखवलेली आहे. पाठमोर्‍या अवस्थेशिवाय पर्वत उचलताच येणार नाही हे साहजिकच आहे. वरील चित्रात मात्र रावण सरळ असूनच पर्वत उचलत आहे.

धन्यवाद प्रचेतस! या प्रसंगाचे 'रावणानुग्रह ' हे नाव आठवतच नव्हते.दुसरे नाव ' रावण कैलास आंदोलन ' आहे.
खरच चित्र/शिल्पांमध्ये काही गोष्टी प्रामुख्याने पाहिजेच/असतात.
१.रावणाने कैलासाच्या ओझ्याने एक गुडघा जमिनीवर टेकवला.
२.कैलास पेलतांना मान किंचित तिरपी.
३.वीस हात जमिनीवर/कैलास पर्वत पेलताना विविध दिशांना असणे.
४.शंकर पायाच्या अंगठ्याने रावणाला घाली दातांना
५.शंकर घाबरलेल्या पार्वतील समीप घेत धीर देतांना
६.रावणची भावमुद्रा थकलेली/किंचित निराश/भयज दाटलेली .

अजून दोन चित्रे राजा रविवर्मा यांच्या प्रेस मधली आहेत .पण त्या प्रेसचे हक्क अनंत शिवाजी देसाई यांच्याकडे असल्याने त्यांचे नाव आहे.
रावणानुग्रह कथेचे अजून बारकावे.
रावण हा भगवान शिवाचा भक्त होता. असे म्हंटले जाते की एकदा स्वप्नात शिवानी रावणाला दर्शन दिले आणि कैलासाला बोलावले, रावण कैलासाला जाऊन शिवाला म्हणाला की तुम्ही लंकेत या मी तुम्हाला सोन्याने मढवतो, त्यावर भगवान शिव म्हणाले की तू मला नेणार असशील तर कैलासा सोबत ने! रावणाने रौद्ररूप धारण करून कैलासा सहित शिवाला उचलले, परंतु शिवाने आपल्या पायाचा अंगठा जमिनीवर टेकवला त्याक्षणी रावणाची बोटे कैलासाखाली अडकून राहिली, अडकलेला हात बाहेर काढल्यानंतर त्याठिकाणी दहा गुहा तयार झाल्या.
तमिळ शैव कार्यात , रावणाने त्याचे एक मस्तक कापले आणि त्यातून वीणा बांधली. त्यांनी तारांसाठी कंडरा(tendon) वापरला आणि शिवाचे गुणगान गायला सुरुवात केली. ते गाणे होते शिव तांडव स्तोत्रम् .
इ

उ

रावणानुग्रह -तंजौर(तंजावुर) चित्रकला शैली
उ

कर्नलतपस्वी's picture

10 Jul 2024 - 5:35 pm | कर्नलतपस्वी

माहेरवाशीण पार्वती या चित्रातली फुले काढलेली आहेत का वरतून वाहिलेली.खुपच ताजी वाटत आहेत

चौथा कोनाडा's picture

10 Jul 2024 - 5:39 pm | चौथा कोनाडा

व्वा .. रावणानुग्रहाच्या कलाकृती आणि माहिती रोचक मनोरंजक आहे !
किती संपन्न साठा आहे आपल्या कडील पौराणिक कथांचा !

प्रसाद गोडबोले's picture

11 Jul 2024 - 11:59 am | प्रसाद गोडबोले

चित्राचे नाव : विराटसभेतील द्रौपदी अवमान
चित्रकाराचे नाव : राजा रवि वर्मा
चित्रशैली : भारतीय (?)
इंटरनेटवरील लिंक : https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ee/Draupadi_humil...

सर्व चित्रांची लिंक उपलब्द असल्यास त्याची लिंक : https://commons.wikimedia.org/wiki/Raja_Ravi_Varma
चित्र :
d
टिप्पण्णी : हे राजा रविवर्मा च्या अनेक अभिजात चित्रांपैकी माझे आवडते एक चित्र !
मला महाभारतातील विराटपर्वातील हा प्रसंग नक्की आठवत नाही . कॉलिंग @ प्रचेतस .

सैरंध्रीची प्राप्ती व्हावी म्हणून किचकाने विराटपत्नी सुदेष्णेशी संगनमत करुन द्रौपदीस किचकनिवासात बोलवले. तेथे ती आली असताना किचकाने तिजवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा किचकाला हिसडा मारुन ती विराटाच्या राजसभेला शरण आली. किचकाने तिच्यापाठोपाट विराटाच्या राजसभेत येउन तिथेही तिला धरण्याचा प्रयत्न केला. किचकापुढे दुबळा असलेला विराट हतबल होऊन हे सर्व पहात होता. क्रोधावश झालेला भीमास पाहून कंक ब्राह्मणाने (युधिष्ठिराने) संकेताने भीमास रोखून धरले व द्रौपदीस राणीच्या महाली जाण्यास सांगितले.

येथे चित्रात काळ्या पोशाखातील किचक व भगवे कपडे घातलेला कंक दिसत आहे. उजवीकडच्या कोपर्‍यात खाली बसून उठण्याच्या बेतात असलेला भीम असावा.

धर्मराजमुटके's picture

11 Jul 2024 - 9:49 pm | धर्मराजमुटके

चित्रातली पात्रे इतकी मर्‍हाटी दिसतात की मला शिवरायांच्या दरबारातील प्रसंग आठवला. जणू आबाजी ने कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला दरबारात हजर केले आहे आणि महाराज वैतागून "आता या आबाजीचे काय करू" आविर्भावात हताशेने पाहत आहेत. भगव्या वेषातील साधू (वेष बदललेले रामदास स्वामी) त्यांना एक डाव माफी करा म्हणत आहेत असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
ठळक टीप : (डोळ्यासमोर उभे राहिलेले सर्व चित्र काल्पनिक)

चित्रगुप्त's picture

11 Jul 2024 - 10:33 pm | चित्रगुप्त

या चित्रात कीचक अगदीच 'हा' वाटतोय. त्याचा अविर्भावही एकाद्या 'नाच्या' सारखा आहे. उजवीकडील माणूस भीम म्हणावा, तर तो बलदंड, आवेशपूर्ण, क्रोधित वगैरे अजिबात दाखवलेला नाही.
रविवर्माच्या चित्रात असे दोष आढळतात.

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2024 - 12:23 pm | प्रसाद गोडबोले

चित्राचे नाव : The Birth of Venus
चित्रकाराचे नाव: Sandro Botticelli
इंटरनेटवरील लिंक : https://commons.wikimedia.org/wiki/Category:Sandro_Botticelli
चित्र : https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/0b/Sandro_Bottice...

venus

टिप्पण्णी : कसलं अफलातुन चित्र आहे हे ! मला वाटतं की चित्रकार , शिल्पकारांच्या कलेतुन तत्कालीन समाजाच्या सौंदर्याच्या व्याख्या दिसुन येतात. जसे मायकल अँजेलोचा डेव्हिड हे पौरुषत्वाचे , तत्कालीन पुरुषाच्या सुंदरतेच्या व्याखांचे चित्रण आहे तसे ह्या चित्रातील व्हिनस ही तत्कालीन स्त्रीत्वाचा , स्त्रीसुलभ सौंदर्यांच्या व्याख्यांचे चित्रण आहे !

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2024 - 12:31 pm | प्रसाद गोडबोले

शिल्पचे नाव : डेव्हिड
शिल्पकार नाव: Michelangelo
इंटरनेटवरील लिंक : https://commons.wikimedia.org/wiki/Category:David_by_Michelangelo_Buonar...
शिल्प: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bb/%27David%27_by...

david

टिपण्णी : हे मायकल अँजेलो ह्याने बनवलेले डेव्हिड चे शिल्प. पहिल्यांदा जेव्हा पाहिले होते तेव्हा शब्दच सुचले नव्हते वर्णन करायाला ! अ‍ॅबसोल्युट परफेक्शन . __/\__
ह्यावर बोलाल तितके कमी आहे . ह्यावर अनेक व्हिडीओ आहेत युट्युबवर !

टर्मीनेटर's picture

16 Jul 2024 - 11:10 am | टर्मीनेटर

१) बिहार मधल्या जयनगर येथील नेपाळ रेल्वेच्या अखत्यारीतील रेल्वे स्टेशनच्या तिकिटघरात लावलेले राम-सिता विवाह प्रसंगाचे चित्र... (काळ माहिती नाही)

ram-sita

२) जनकपुरच्या जानकी मंदीराच्या एका दालनात लावलेले राम आणि सिता होलिकोत्सव साजरा करतानाचे चित्र... (काळ सोळा ते विसाव्या शतकातला कुठलातरी)
holi
वरील दोन्ही चित्रांच्या शैली बद्दल अनभिज्ञ आहे. कॄपया जाणकारांनी, विशेषतः चित्रगुप्त काकांनी त्यावर प्रकाश टाकावा!

चित्रगुप्त's picture

17 Jul 2024 - 4:34 pm | चित्रगुप्त

दोन्ही चित्रे मधुबनी शैलीची वाटतात. पेकी नेपाळ मधले जास्त परिष्कृत (उदा. दिल्लीत विकली जातात तशी) तर जानकी मंदिरातले जास्त 'गावठी'. लोककलेतील असल्याने 'गावठी' जास्त 'Jenuine' म्हणावे का?
दोन्ही आधुनिक काळातली असावीत. (एकविसाव्या शतकातील सुद्धा असू शकतात)

चित्रगुप्त's picture

18 Jul 2024 - 3:38 am | चित्रगुप्त

https://lh3.googleusercontent.com/ci/AL18g_SNJ1LqchOFZLrKoiHMrI1fHirmVNd...

आकारः 40 x 53 cm. अठराव्या शतकाचा उत्तरार्ध. (शैली नक्की माहीत नाही) हे चित्र दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे.

.
रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर, रामाने तिच्या पुनर्प्राप्तीसाठी वानरसेनेच्या मदतीने युद्ध करण्याचा निर्णय घेतला. विस्तीर्ण महासागर ओलांडून, वानर-सेनेने लंकेला वेढा घातला. येऊ घातलेल्या युद्धामुळे होणारा प्रचंड विनाश आणि रक्तपात टाळण्यासाठी, रामाने अंगद या वानर राजपुत्राला रावणाकडे दूत म्हणून त्याच्या दरबारात पाठवले.
अंगदाने रावणाची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. रावणाने आपल्या सेवकांना अंगदाला पकडण्याची आज्ञा दिली. त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सेवकांना झटकून अंगद रावणाच्या महालाच्या छतावर उडी मारून परत तळ ठोकलेल्या वानर सैन्याकडे आला.
--- चित्रात रावणाचा सोन्याचा अभेद्य किल्ला डावीकडे क्षितिजापर्यंत पसरलेला दिसत असून त्यातील एकमेकांशी जोडलेले सोनेरी महाल, मंडप आणि बुरूज सूर्यप्रकाशात तळपत आहेत. रावणाच्या महालातील दृश्य, रावण, राक्षस, अंगद वगैरे दिसत असून आकाशात अंगद रावणाच्या महालाकडे उडत असताना दिसतो आहे. खाली वानरसेनेच्या तुकड्या तटबंदीजवळ आतुरतेने हल्ल्याच्या आदेशाची वाट बघत आहेत.
अगदी उजवीकडे राम, लक्ष्मण, रावणाचा भाऊ विभीषण आणि वानरसेना दिसते आहे. रावणाला संदेश देऊन परतलेला अंगद रामाला नमस्कार करत असून राम त्याला आशीर्वाद देत आहे.

या लहानश्या चित्रात बारीकसारीक तपशीलही कमालीच्या कसबाने चित्रित केलेले दिसतात.
एवढ्या लहान आकारात चित्रित केलेली घटना आणि तपशील पाश्चात्त्य पद्धतीच्या चित्रणात अशक्यप्राय वाटते. भारतीय आणि पाश्चात्य चित्रकलेतील भेद समजून घेण्यासाठी खालील लेख उपयोगी ठरावा :

चांदबीबी आणि मादाम पोंपादूर : भारतीय आणि पाश्चात्त्य कलेतील भेद

https://www.misalpav.com/node/26407