वाईचा कमळगड

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
27 Jun 2024 - 4:32 pm

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते गर्द धुक्यातून डोकावणाऱ्या डोंगर-किल्ल्यांवर पावलांचे ठसे उमटवण्याचे. पण आठवडी सुट्टीच्या दिवशी जायचं तर एक तर प्रचंड गर्दी सहन करायची तयारी ठेवावी लागते व असं अनवट ठिकाण शोधावं लागतं जिथे केवळ पावसाळ्यात तयार होणारे निसर्गप्रेमी बेडूक सहसा येणे टाळतात. याचं उद्दिष्टातून, यावर्षीच्या वर्षाऋतू भ्रमंतीची सुरवात करण्यासाठी सापडलेला एक सुंदर किल्ला म्हणजे ”कमळगड”. वाईच्या निसर्गरम्य परिसरात आणि धोम-बलकवडी या जोड-धरणांच्या सान्निध्यात वसलेला, घनदाट जंगलाने वेढलेला कातळसमृद्ध किल्ला व त्याला जोडून वाई परिसरात वसलेली काही देवस्थाने अशी दुहेरी भटकंती ठरली.

महाबळेश्वरच्या नेढ्यामुळे प्रसिद्ध अशा “केटस पाँईट”च्या समोर तेवढ्याच उंचीचा उत्तरेकडे दिसणारा डोंगर म्हणजे “कोल्हेश्वराचा डोंगर” आणि त्यालाच चिकटून असणारा गर्द झाडीतुन डोके वर काढणार ताशीव कातळी माथ्याचा डोंगर म्हणजेच कमळगड. महाबळेश्वरचा डोंगर आणि कोल्हेश्वरच्या डोंगरांमध्ये आहे तो बलकवडी धरणाचा जलाशय.

Jhad

कमळगडाला पोहोचण्यासाठी वाईवरून येणं क्रमप्राप्त आहे. कमळगडाच्या डोंगराला धोम धरणाच्या फुगवट्याने दोन बाजूला वेढा घातलेला आहे. त्यामुळे गडावर पोहोचायला पायथ्याच्या वेगवेगळ्या गावातून मार्ग आहेत. एका बाजूने वाळकी नदीच्या बाजूने फुगत जाणारा जलाशय व दुसऱ्या बाजूने कृष्णा नदीचा बलकवडी धरणाच्या भिंतीपर्यंत जाणारा पाण्याचा फुगवटा यांच्या कडेने अनेक छोटी-छोटी गावे वसली आहेत. यातील काही गावांमधून कमळगडावर पोहोचता येते.

jungle

आम्ही परतवडी किंवा नांदगणे मार्गे जाण्याचा पर्याय निवडला होता. या, पर्यायाखेरीज, आकोशी, वासोळा आणि तुपेवाडी या गावांमधून ही वाटा आहेत. पहाटे साडेपाचला पुण्यावरून निघून, वाईमार्गे धोम धरणाच्या कडेने जाणाऱ्या रस्त्याने साडे-नऊच्या सुमारास बलकवडी धरणाच्या भिंतीपाशी असलेल्या उळुम्ब गावातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे जास्तीचे सामान टाकून गरजेपुरत्या गोष्टी बरोबर घेऊन दहाच्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्याकडे कूच केलं.

damview

बलकवडी धरणाच्या भिंतीपासुन साधारण तीन किलोमीटर पुर्वेला परतवडी गावची स्वागत कमान रस्त्याच्या डाव्या बाजुला दिसते. पाच-पंचवीस घरांची वस्ती मुख्य रस्त्यापासून थोडीशी आत वसली आहे. कमानीतून आत प्रवेश करून थेट परतवाडी गावच्या ग्रामदैवताच्या मंदिराच्या बाजूला गाडी लावली.

गाडीतुन उतरतो-न-उतरतो तोच दोन ते तीन कुत्री अगदी अनेक दिवसांची ओळख असल्यासारखी सामोरी आली व आनंदाने तोंडातून कुई-कुई आवाज काढीत शेपटी जोरजोरात हलवत अंगावर जणु उडयाच मारू लागली. या अनपेक्षित स्वागताने थोडासा अवघडलो तर समोरील उंचवट्यावर घराला लागून असलेल्या टपरीवजा दुकानातून हे दृश्य पाहणाऱ्या एका माऊलीने ओरडुनचं सांगितले की आता हिचं कुत्री तुम्हाला पार गडाच्या माथ्यापर्यंत सोबत करणार आहेत सबब त्यांच्यासाठी थोडा खाऊ घेऊनच जा. मंदिराच्या बाहेर बसलेल्या आजोबांकडे किल्ल्याच्या वाटेची जुजबी चौकशी केली. त्यांनीही आता ही कुत्री सोबत येणार आणि तुम्हाला वाट चुकू देणार नाहीत याची ग्वाही दिली

Khekada

मग आमच्या आजच्या या वाटाड्यांसाठी थोडा खाऊ बरोबर घेऊन परतवडी गावच्या वस्तीतून गाव ओलांडून आम्ही चढणीच्या वाटेला लागलो. पाचच मिनिटात मागे गाव, पुढे एका सपाटीवर दिसणारं एक छोटंस मंदिर, डाव्या हाताला डोंगर उतारावर चढत जाणारी शेती व कुरणं, उजव्या हाताला खाली दोन खडे डोंगर जोडणाऱ्या बेचक्याचा तीव्र उतार व त्या पलीकडे सपाट कुरण अशा ठिकाणी पोचलो.

kavadse

अचानक त्या बेचक्यात हालचाल जाणवली म्हणून जागीचं थबकलो. पाच-सहा पुर्ण वाढ झालेल्या हरणांचा कळप त्या बेचक्यातील कोवळ्या गवतात चरत होता. गावाच्या एवढ्या जवळ असा जंगली हरणांचा कळप असण्याची कोणतीही अपेक्षा दूर-दूर पर्यंत नसल्याने आम्ही अंमळ बेफिकीरीने जरा मोठ्या आवाजात गप्पा मारत चालत होतो, आमच्या आवाजाने बुजून तो कळप जागीच स्तब्ध उभा राहून आमचं लक्ष जाताचं बेचक्यातून जोरात पळत काही क्षणात नजरेआड झाला. हे सर्व इतक्या वेगात झालं की अगदी मोबाईलमध्ये ही त्यांची झलक पकडण्यात आम्ही अयशस्वी ठरलो. असो, मोहिमेची सुरुवातचं अशी झकास झाली.

Gaav

समोरचं गुरू गोरक्षनाथांचं एक छोटंसं मंदिर होतं, तिथे बाहेरून दर्शन घेऊन आम्ही पुढे चालू लागलो.

किल्ल्याची वाट म्हणजे वर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने खाली धाव घेण्यासाठी निवडलेल्या वघळीचा मार्ग. खड्या चढणीच्या या मार्गावर अनेक ठिकाणी पावसाने वाहून आणलेली अत्यंत छोट्या खड्यांची पसरलेली वाळु घसरण वाढण्याला हातभार लावीत होती. पाऊस तसा गैरहजर होता पण डोंगर नवतीच्या हिरवाईने नटून गेला होता, महाबळेश्वर व कोल्हेश्वर डोंगरांच्यामधून वाहणारा जोरदार वारा अंगाला सुखावत होता. डोंगरांवर विसावलेले ढग सुंदर स्वप्नातीत परीदृश्य साकार करीत होते. खाली धोम धरणाच्या पाणलोटात कृष्णा नदीची गढूळ रेघ तेवढी आपल्या मूळ प्रवाहाचा मार्ग अधोरेखित करीत होती. एकुणात वातावरण सुशेगात होतं.

flower

अशा वातावरणात आमच्या आजच्या तीन वाटाड्यांच्या भरवशावर आम्ही खडा चढ हळुहळु चढत होतो. आजूबाजूच्या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेत आम्ही पहिले दोन टप्पे चढून गेलो व मग दरीच्या कडेने जाणाऱ्या डोंगरधारेवरील मार्गाने चालत एका सपाटीवर पोहोचलो. तिथून पाच मिनिटांच्या चालीत डोंगरउताराने लागणाऱ्या घनदाट झाडीत शिरलो. एखादी निगुतीने राखून ठेवलेली देवराई वाटावी अशा प्रकारचं दाट, झाडे वेलींनी भरलेलं , रातकिडे आणि विविध पक्षांच्या आवाजाने जिवंत असणारं, वेगळ्याच विश्वातील वाटावं असं ते नितांत सुंदर जंगल. वेलींनी झाडांना विळखा घातल्याने तयार होणारे चित्र-विचित्र आकार, खाली पाचोळ्याच्या जाड थरावर नजर केंद्रित केली की सहज दृष्टीस पडणारे ना-ना प्रकारचे जीवजंतु, आसमंत ढगांनी भरला असल्याने आतमध्ये झिरपणाऱ्या मर्यादित प्रकाशाने तयार केलेल्या कवडशांचे अनेकानेक विभ्रम अनुभवत आम्ही पुढे निघालो, वाटेत एक सव्वा-इंची लोखंडी पाईपलाईन अंथरलेली दिसली, वरून एखाद्या झऱ्यातून खालील परतवडीत पाणी नेण्यासाठी केलेली ती सोय असावी. ती पाईपलाईन ओलांडून आम्ही पुढे चालत निघालो.

आमचे तीनही वाटाडे मागे-पुढे राहून आमची सोबत करत होतेच. आम्ही थांबलो की ते थांबायचे, थोडे पुढे असले की परत मागे फिरून यायचे, आम्ही चालू लागलो की ते ही उठून चालू लागायचे. या तिघात एक विटकरी रंगाचा मोठा कुत्रा व इतर दोन कुत्री होत्या, त्यातील तांबडी-पांढरी कुत्री बहुदा पोटूशी होती. कुठे ही आम्ही थोडा वेळ जरी थांबलो की ती लगेच झोपून घ्यायची, ती फारसं खात ही नव्हती. काळ्या पांढऱ्या रंगाची कुत्री तर खुपचं लाघवी, बसलं की लगेचं अंगचटीला येणारी, व हात चाटु पाहणारी. तसं पाहता इनमिन दोन तीन तासांची आमची निव्वळ तोंडओळख व जास्तीत जास्त आज दिवसभराचा होईल एवढाच सहवास व त्याबद्दल केवळ चार बिस्किटांची आमच्याकडून मिळणारी भेट यावर ही तिघे आमच्याबरोबर आली होती की बहुदा इथे गडभेटीसाठी येणाऱ्या लोकांना सोबत करणे हा नियमचं त्यांनी स्वतःला घालून घेतला होता.. कुणास ठाऊक ?? त्यांची भाषा आम्हाला समजली असती तर ते ही समजलं असतं बहुतेक. पण भाषा समजत नसली तरी भावना पोहोचायला भाषेचा अडसर कधीच येत नाही. आजचा दिवस उलटल्यावर नंतरच्या आयुष्यात पुन्हा कधीही हे लोक आपल्याला भेटतील वा आपल्यासाठी काही करतील याची सुतराम शक्यता नसताना इतकं निर्व्याज, निस्वार्थ आणि त्याचवेळी अलिप्त असं प्रेम करू शकणारी दुसरी कोणती जमात या पृथ्वीतलावर अस्तित्वात असेल बरं ??

Doggy

असो, सुखावणाऱ्या गर्द झाडीतील दहा-पंधरा मिनिटांच्या वाटचालीनंतर आम्ही पुन्हा एकदा मोकळ्या जागेत आलो. थोडं पुढे चालल्यावर, वासोळा, तुपेवाडी मार्गे येणारी वाट जिथे नांदगणे-परतवडीवरून येणाऱ्या वाटेला मिळते तिथे आम्ही पोहोचलो. या ठिकाणी लावलेल्या फलकावर दाखवलेल्या खुणेप्रमाणे उजव्या हाताला वरच्या चढणीला लागलो.

थोडे अंतर चालल्यावर पुन्हा एक गोरक्षनाथांचे मंदिर समोर आले. पत्र्याचे छप्पर घातलेले दुर्गम जागेच्या मानाने बऱ्यापैकी मोठे असे मंदिर वासोळे ग्रामस्थांनी जीर्णोद्धारीत केले असावे असे तेथील फलकांवरून समजते. आतमध्ये, दत्तगुरु, मच्छीन्द्रनाथ, गोरक्षनाथ व बहुदा गहिनीनाथ यांच्या प्रतिमा आहेत. गणपती बाप्पाची ही एक छोटी मुर्ती आहे. खाली आधुनिक पद्धतीची फरशी घातली आहे. वर पत्र्याचे छप्पर टाकून तेच पुढे पडवीसारखे उतरवले आहे. मंदिरालाच भिंत घालून खेटून एक छोटीशी अंधारी कुटी केली आहे. नाथपंथी मंदीर असल्याने आणि नाथपंथी संन्यासी दुर्गम भागात राहणे नियम म्हणून पाळत असल्याने, कुणी संन्यासी आला तर त्याच्या मुक्कामाची सोय म्हणून ह्या खोलीकडे पाहता येईल.

Temple

मंदिराच्या आत तोकड्या जागेत काही वेळ बसलो, अतिशय दुर्गम भागातील अशी स्थाने वेगळ्याच ऊर्जा लहरींची अनुभूती देतात, त्यांच्या अनादी-आदिम अस्तित्वाची जाणीव करून देतात. शब्दात व्यक्त न होऊ शकणारे काहीतरी अशा ठिकाणी अनायासे गवसून जाते. याठिकाणी यथास्थित दर्शन करून काही वेळ घालवून पुढे गडाकडे मार्गस्थ झालो.

top

मंदिरापासून पुढे पुन्हा एकदा दाट झाडीतील वाट सुरू होते जी एका विस्तीर्ण मोकळ्या माळावर संपते. कदाचित पुर्वी या ठिकाणी असलेली गर्द झाडी तोडून हा परिसर मोकळा केला असावा अशी शक्यता वाटते. या मोकळ्या माळावर एक भलं मोठं घर आहे व तिथे लोकं राहतातही. या माळावर शेतीच्या खुणा ही दिसल्या. म्हणजे त्या घरात राहणारे लोक हे चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या या जागी शेती व पशुपालनाच्या माध्यमातून आपली उपजीविका चालवीत असावेत.

jangle

घराजवळून जाताना कुणी बाहेर दिसले नाही म्हणून तसेंच पुढे निघालो तो मागून डोक्यावर घमेले घेऊन एक आजीबाई आतून बाहेर आल्या, त्यांनी ओरडूनचं कुठून आलात हे विचारले, आता गडमाथ्याचे वेध लागले असल्याने मागे न फिरता त्यांना तिथूनच उत्तर देऊन पुढचा रस्ता धरला. पुन्हा एकदा गर्द झाडीतून चढणीच्या रस्त्याने चालत एका कातळ भिंतीपाशी पोहोचलो. या वाटेने जाताना कातळभिंतीआधी आपल्याला मोठंमोठ्या शिळा रचलेले तटबंदीसदृश्य भिंतीचे अवशेष दिसतात. याचा अर्थ, संरक्षणासाठी कमळगडाच्या बालेकिल्ल्याला एकेकाळी तटबंदी होती जी आता अस्तित्वात नाही.

Balekiila

या कातळभिंतीला छेदून एक मार्ग वर नेलाय जिथे एक लोखंडी शिडी चढून आपण गडावर पोहोचतो. संपुर्ण वाटेवर एक गुराखी व एक खाली वासोळे वाटेकडे उतरणारी स्थानिक महिला वगळता आम्हाला अन्य कुणी दिसलं नव्हतं. गडावर वाईवरून तुपेवाडी मार्गे आलेली वाईचीच चार मुले भेटली. ते चार आणि आम्ही सहा असे फक्त दहा लोक गडावर होते. काही वेळाने, दहिवडी, तालुका माण येथील दोघेजण तिथे पोहोचले. ते आमच्याच मार्गाने, आमच्या आधी निघाले होते पण वाट चुकल्याने आमच्या नंतर पोहोचले होते.

वर आल्यावर पुर्वेला धोम जलाशयाचा अनुपम नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो. जोरदार वाहणारे वारे चढण्याचा शीण हलका करतात. कमळगडाचा माथा म्हणजे कातळाचा चारही बाजूने तासलेला चौथरा आहे. माथ्यावर बांधकामाचे कुठलेही अवशेष शिल्लक नाहीत. किल्ल्यावरील एकमेव आकर्षण म्हणजे उभ्या खडकात शंभर-दिडशे फूट खोदलेली व कोरीव पायऱ्या असणारी विहीर जिला कावेची विहीर म्हणून ओळखले जाते.

KaavBoard

गडाच्या मध्यभागी जमीन चिरत गेलेली पायर्‍या असलेली ही विहीर म्हणजे कमळगडाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विहीर कोरडी होती. विहीरीत उतरण्यासाठी एका बाजुला पायर्‍या आहेत. जांभ्या दगडामधे कोरलेल्या लालसर रंगाच्या पायर्‍या उतरुन खाली गेलो. आतले कातळ थंड वातावरण अंगावर काटा आणते, वरून झिरपणारे प्रकाशाचे कवडसे गूढरम्य विभ्रम तयार करतात. विहिरीच्या तळाला पोहोचल्यावर जाणवणारी गुढ शांतता वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. लालभडक कावेने आधाराला टेकवलेले तळहात त्या रंगात रंगून जातात. नेचेसदृश्य झुडपांनी विहिरीची पुर्ण कातळभिंत व्यापली आहे व एखाद्या जिवंत सजावटीच्या हिरव्या पडद्यासारखे दिसणारे ते दृश्य खिळवून ठेवते.

Wellinside

ही कातळकोरीव विहीर सोडली तर येथे किल्लेपणाची इतर कोणतीही खुण आज शिल्लक नाही. अनेक अजस्त्र शिळा तुटून खालील जंगलात पडलेल्या दिसतात, शिवाय मध्यावर उत्तर बाजूच्या कड्याला वरपासून खालपर्यंत मोठा तडा गेलेला स्पष्ट दिसतो. कालौघात, ह्या बेलाग कातळभिंती झिजून खालील जंगलात कोसळताहेत. दक्षिण बाजुला तटबंदीसदृश्य अवशेष दिसतात, तसेच, कावेच्या विहीरीपलीकडे चौथरा आहे जो एखाद्या बांधीव निवासस्थानाचे अवशेषरुपी अस्तित्व दाखवतो. बाजूलाच एक खडकात कोरलेलं शिवलिंग ही आहे पण त्यावर मंदिर सदृश्य कुठल्याच खुणा नाहीत.

shivling

गडाभोवती सर्व बाजूने घनदाट जंगल दिसते. या जंगलातुनच कामळगडाच्या एका बाजुला नवरा-नवरीचे सुळके म्हणून प्रसिद्ध कातळकडे दिसतात. याशिवाय गडाच्या पुर्व बाजुला धोम धरणाच्या पाण्याचा फुगवटा, ईशान्येला कातळटोपी केंजळगड व त्यामागे थोडे उत्तरेला एखाद्या भिंतीसारखे रायरेश्वराचे पठार पसरलेले दिसते. पश्चिमेला घनदाट वृक्षराजीचे घोंगडे पांघरलेले कोल्हेश्वराचे पठार दिसते. व दक्षिण बाजूला महाबळेश्वर-पाचगणी डोंगररांग आडवी पसरलेली आहे. पांडवगड ही इथून दिसतो.

Chauthara

कमळगडाचा इतिहास फारचा ज्ञात नाही. शिलाहार राजांनी या परिसरात जे पंधरा किल्ले उभारले त्यापैकी कमळगड एक असावा. त्याही आधी इथे शैव पंथीयांचे वास्तव्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही जुन्या कागदपत्रात याचा उल्लेख “घेरा भेळंजा” म्हणून येतो तसेच काही कागदपत्रात किल्ले कत्तलगड म्हणून असलेला उल्लेख कमळगडाचाच असावा असा कयास आहे. शिवकाळात इथे फारशा घडामोडींची नोंद अजूनपर्यंत तरी मिळाल्याचे ऐकिवात नाही.

साधारण तासभर थांबुन परतीचा मार्ग धरला. परतीच्या मार्गावर पाचचं मिनिटात मोकळ्या माळावरील त्या मोठ्या घरापाशी पोहोचलो. तेथे राहणाऱ्या लोकांकडुन, एवढ्या दुर्गम भागात वस्ती करून राहण्याची त्यांची प्रेरणा जाणून घेण्याची इच्छा होती पण बाहेर कोणी नव्हतं, पुरुष मंडळींची उपस्थिती जाणवत नव्हती आणि महिला वर्गाच्या या दुपारच्या साधारण आराम करण्याच्या वेळी आगंतुकपणे घरात घुसणं वा आवाज देऊन बाहेर बोलावणं प्रशस्त वाटलं नाही त्यामुळे तसेचं पुढे निघालो.

crack

शहरी सुख सोयींना चटावलेल्या आपल्यासारख्या लोकांना अशा जंगलात वस्ती करून राहणाऱ्या लोकांच्या त्यामागील प्रेरणा समजून घेण्याची गरज आहे. कुठल्याही ऐहिक गोष्टींची अपेक्षा न ठेवता, मुलभूत गरजांसाठी ही रोजचा प्रचंड संघर्ष करण्याची तयारी असलेल्या या लोकांचं जगण्याचं तत्वज्ञान समजून घेणं तसं आवाक्याबाहेरचं काम आहे पण त्यांची मनोभुमिका जाणून घेण्यात अडचण नसावी.

असो, पुन्हा एकदा गर्द झाडीतून चालत व घसरडा उतार काळजीपुर्वक उतरत आल्या मार्गानेच गड उतार झालो. वाटेत, गढ चढताना पाहिलेली सर्व दृश्य पुन्हा अनुभवायला मिळाली. अनवट वाटेवरच्या एक दुर्लक्षित किल्लाला स्पर्श करण्याचं भाग्य लाभलं. मागे सांगितल्याप्रमाणे आमच्या तिन्ही वाटाड्यानी आमची शेवटपर्यंत मनापासून सोबत केली व मंदिरापर्यंत पोहोचल्यावर काही वेळ थांबून तितक्याचं अलिप्तपणे निरोप घेऊन ते अंत:र्धान ही पावले. मग आम्ही ही गाडी काढून मुक्कामाचे ठिकाण गाठले.

Mukkam

मुक्कामाचं ठिकाणही तसं सुंदर होतं, अगदी बलकवडी धरणाच्या भिंतीला लागून असलेल्या स्वच्छ खोल्या, समोर महाबळेश्वरचा तर मागे कोल्हेश्वरचा डोंगर. आजूबाजूला शेती, शांत-निवांत वातावरण व उत्तम जेवण बनवणारा खानसामा... दमवणाऱ्या मोहिमेनंतर आरामाला अशी व्यवस्था म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो अनेक... अशी अवस्था.

असो, एकुणात कमळगड सारख्या दुर्गम व अस्सल जंगलाचा अनुभव देणाऱ्या किल्ल्याला भेट देऊन समाधान वाटलं. पावसाळी भटकंतीची यापेक्षा चांगली सुरुवात शक्य नव्हती.

well

प्रतिक्रिया

सदर धागा भटकंती सदरात हलवावा ही विनंती

किसन शिंदे's picture

27 Jun 2024 - 6:22 pm | किसन शिंदे

अफलातून फोटोज आले आहेत सगळेच आणि भटकंतीही जोरदार झालेली दिसतेय.

कमळगडाची आयुष्यभर न विसरता येणारी आठवण घेतलीय आता दोन वर्षांपूर्वीच. :)

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2024 - 1:44 pm | प्रसाद गोडबोले

ख्या ख्या ख्या !

टाकु का आपले फोटो किसनदेवां ? =))))

#जिंदा हुं यार , काफी है =))))

बाकी ह्या लेखनामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या . सुंदर !
लिहित रहा !

सुंदर फोटो आणि छान वर्णन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2024 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व छायाचित्रे आणि वर्णनही आवडले.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

27 Jun 2024 - 10:56 pm | चौथा कोनाडा

एक नंबर !

+१

अफलातुन लेखन आणि अप्रतिम प्रचि... तुअम्च्या सोबत कमळगडवर चक्कर_बंडा मारल्याचा फील आला !

किल्लेदार's picture

28 Jun 2024 - 12:03 am | किल्लेदार

छान लिहिलंय. बरेचदा या गडावर जायचा बेत केलाय पण काही कारणांनी तडीस नेता आला नाही. बसल्याबसल्या आपसूकच सहल घडली.

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.

कुठल्याही ऐहिक गोष्टींची अपेक्षा न ठेवता, मुलभूत गरजांसाठी ही रोजचा प्रचंड संघर्ष करण्याची तयारी असलेल्या या लोकांचं जगण्याचं तत्वज्ञान समजून घेणं तसं आवाक्याबाहेरचं काम आहे पण त्यांची मनोभुमिका जाणून घेण्यात अडचण नसावी.

-- समजा तिथे त्यावेळी काही विविध वयाचे पुरुष, स्त्रिया वगैरे असत्या आणि निवांतपणे त्यांचेशी गप्पा करता आल्या असत्या, तर त्यांची मनोभूमिका आणि जगण्याचे तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी नेमके काय काय विचारले असते ?

चक्कर_बंडा's picture

28 Jun 2024 - 9:58 am | चक्कर_बंडा

मनोभुमिका वा जगण्याचे तत्वज्ञान हे बोजड शब्द फक्त लिहिण्यापुरते.... कुठले ही संभाषण सुरू करायला आपण जे स्वाभाविक प्रश्न विचारतो तेच माझ्या कामाला आलेत आतापर्यंत तरी, त्याला येणाऱ्या उत्तरावरून आपण आपले आडाखे बांधायचे..

माझ्या अल्प अनुभवावरून अशा ठिकाणी एक प्रश्न जो नेहमी विचारावा व एक प्रश्न जो नेहमी टाळावा तो तेवढा इथे नमूद करतो.

महिला असो वा पुरुष, थोड्या औपचारिक संवादानंतर त्यांना त्यांचे लग्न कधी, कसे, कुठे झाले हे विचारायचं धाडस मी नक्की करतो, त्याच्या उत्तरातून त्यांचे नातेसंबंध, रूढी-परंपरा, गोतावळा अशा बऱ्याच गोष्टींचा अंदाज येतो. तरुण,मध्यमवयीन असो वा म्हातारे, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या डोळ्यातील चमक आणि भूतकाळात फेरफटका मारून येतानाचे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अनुभवण्यासारखे असतात.

एक प्रश्न जो विचारणे मी आताशा टाळतो, तो म्हणजे त्यांच्या ताब्यातील जागेच्या मालकी हक्काबाबत. सहसा या जागांवर कागदोपत्री त्यांचा कुठलाही हक्क नसतो व ती त्यांची दुखरी नस असते. ती न छेडावी हेच उत्तम... बहुतांश वेळा दुर्गम जागांवर गैररसोयींत राहण्यामागे उपजीविकेपेक्षा जागेवरचा ताबा हा कळीचा मुद्दा असतो.

सौंदाळा's picture

28 Jun 2024 - 12:02 pm | सौंदाळा

छान दृष्टीकोन आणि विचार

चित्रगुप्त's picture

28 Jun 2024 - 12:53 pm | चित्रगुप्त

'जागेवरचा ताबा' याविषयी मला आलेला एक जुना अनुभव लिहीण्याजोगा आहे. तो पुन्हा कधितरी लिहीन. लग्नाविषयी विचारण्याची कल्पना भारीच आहे.
फार वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातल्या दुर्गम आदिवासी भागात मुक्काम आणि फिरणे झाले होते, त्याची आठवण झाली. तेंव्हा तिथे केलेली रेखाचित्रे अजून असतील माझ्याकडे. साधारणपणे १९७३-७४ चा काळ असावा.

कर्नलतपस्वी's picture

28 Jun 2024 - 5:49 am | कर्नलतपस्वी

निसर्ग अद्भुत आहे. नवरा नवरीच्या कातळांची लोककथा त्याच भागात वाढलेल्या आमच्या निसर्ग वेड्या मित्राने सांगीतली.

गड किल्ले निसर्ग छायाचित्रण मस्त.

आंद्रे वडापाव's picture

28 Jun 2024 - 8:22 am | आंद्रे वडापाव

कमळ गडाच्या कावेच्या विहिरीतील कावं वापरून..
आणि कापड दुकानातून आणलेल्या पांढऱ्या ध्वजाचे...
रंगीकरणा नंतरच... तयार झालेला भगवा ध्वज वारकरी... वारीला न्यायचे... अशी एक प्रथा पुर्वी होती... असे ऐकिवात आहे...

चक्कर_बंडा's picture

28 Jun 2024 - 9:56 am | चक्कर_बंडा

धन्यवाद !

वाह! मस्तच भटकंती!कावेची विहिर छान आहे,ती तिथे दोरी (रेलिंग?) तुम्ही टाकली की आधीच आहे.ती पाहिजेच जरा निसरडी वाट वाटतेय.
काय माहीत नाही आम्ही दुष्काळातले,सातारा वाईचा दूरदूरचा संबंध नाही पण मनात आलं वाई जाणून घ्यायची तेव्हा मागच्या दिवाळीत दोन दिवस होते,केंजाळगड, रायरेश्वर केलं.कमळगडपण घडायला पाहिजे,बाकी सातारा पाहत राहणार .चंदन वंदन गडपण आहे तिथे, रविवारी तिथे ट्रेक आहे कोणाला शक्य असेल तर जा.

गोरगावलेकर's picture

3 Jul 2024 - 2:11 pm | गोरगावलेकर

लेख आणि फोटो दोन्हीही आवडले