हृदयसंवाद (४) : हृदयविकाराचे प्रकार

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
5 May 2024 - 8:09 pm

भाग ३ इथे
………..
सर्वसाधारणपणे ‘हृदयविकार’ असा शब्द उच्चारला की सामान्यजनांच्या डोळ्यासमोर ‘हार्ट अटॅक’ आलेला(च) रुग्ण येतो ! हार्ट अटॅक हा करोनरी वाहिन्यांशी संबंधित महत्त्वाचा हृदयविकार नक्कीच आहे. परंतु, त्या व्यतिरिक्तही हृदयाच्या अंतर्गत रचनेनुसार त्याच्या आजाराचे अनेक प्रकार असतात. या लेखात त्यातल्या प्रमुख आजारांची प्राथमिक ओळख करून घेऊ. इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा. हृदय आणि रक्तवाहिन्या यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार एकत्रितपणे अभ्यासले जातात.

असे काही प्रमुख आजार खालीलप्रमाणे :
१. करोनरी हृदयविकार
२. हृदय-स्नायूविकार
३. Rheumatic हृदयविकार
४. हृदय किंवा रक्तवाहिन्यांचा जंतुसंसर्ग
५. हृदय-झडपांची दुर्बलता
६. उच्चरक्तदाब
७. जन्मजात हृदय विकृती

करोनरी हृदयविकारावर २ स्वतंत्र लेख या मालेत पुढे असणार आहेत. उच्चरक्तदाबावर यापूर्वी अन्य डॉक्टरांनी इथे लिहिलेले असल्याने त्याची पुनरावृत्ती करत नाही. बाकीच्या आजारांबाबत आता प्राथमिक माहिती करून घेऊ.

हृदयस्नायूविकार(cardiomyopathy)
या आजारामध्ये हृदयस्नायू जाड व कडक होतात. कधीकधी त्यांच्या पेशींत नको ती रसायने जमा होतात. परिणामी या स्नायूंची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होऊ लागते. ती खूप कमी झाल्यास रक्तप्रवाह पुढे न सरकल्यामुळे फुफ्फुसे आणि शरीराच्या उर्वरित भागात रक्त साठते. हीच ती हृदयदुर्बलता अर्थात हार्ट फेल्युअर.

या आजाराची कारणे बरीच असून त्यामध्ये आनुवंशिकता, ऑटोइम्युन आजार, करोनरी हृदयविकार, शरीरात अतिरिक्त लोह साठणे, अनेक प्रकारचे जंतूसंसर्ग, थायरॉईड विकार, मधुमेह, दीर्घकालीन अतिरिक्त मद्यपान किंवा कोकेनचे व्यसन आणि औषधांचे दुष्परिणाम यांचा समावेश आहे.
रुग्णाची लक्षणे : दम लागणे, खूप अशक्तपणा, छातीत धडधड होणे. प्रसंगी एकदम मूर्च्छा येऊन शुद्ध हरपणे.
या आजाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी जो पौगंडावस्थेत उद्भवतो तो बऱ्यापैकी धोकादायक ठरू शकतो. त्या प्रकारात मुलांचे अकस्मात मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत.

· Rheumatic हृदयविकार
हा आजार मुख्यत्वे गरिब आणि विकसनशील देशांमध्ये आढळतो. ५ -१५ या वयोगटातील मुले याला बळी पडतात. याची सुरुवात घशामधील जंतुसंसर्गाने होते विशिष्ट प्रकारचे जंतू (group A streptococci) घशाचा दाह करतात. त्याच्या उपचारांमध्ये बऱ्याचदा हलगर्जीपणा होतो. त्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनी शरीरात ऑटोइम्युन प्रक्रिया तीव्र होते. त्याचे परिणाम हृदय, सांधे आणि अन्य काही अवयवांवर होतात. हृदयाच्या बहुतेक सर्व झडपांवर परिणाम होऊ शकतो परंतु सर्वाधिक परिणाम mitral या डाव्या बाजूच्या झडपेवर होतो. कालांतराने ती झडप कडक होते. त्याला stenosis असे म्हणतात. झडपांच्या कार्यावर परिणाम झाला की हृदयातला रक्तप्रवाह उलट्या दिशेने देखील मागे येऊ शकतो.

हृदयाचा जंतुसंसर्ग (Endocarditis)
यात हृदयाच्या अस्तराचा दाह होतो. त्याची कारणे अशी :
१. जिवाणू/विषाणू/फंगसचा जंतुसंसर्ग
२. कुपोषण, मूत्रपिंड दुर्बलता किंवा कर्करोग
३. इंजेक्शनद्वारा मादक पदार्थ घेण्याचे व्यसन
या आजारात हृदयाचे अंतर्गत अस्तर, झडपा किंवा उभ्या पडद्याला इजा होते. त्यातून पू आणि रक्तगुठळ्या निर्माण होतात. अशा रुग्णाला ताप आणि संसर्गाची इतर लक्षणे दिसतात. त्वचा, नखे आणि डोळ्याच्या अंतर्गत पडद्यामध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. एखादी रक्तगुठळी मेंदूत गेल्यास कमीअधिक प्रमाणात लकवा होतो.

हृदय-झडपांची दुर्बलता
आपण लेखमालेतील दुसऱ्या लेखात पाहिल्यानुसार हृदयाच्या रचनेत एकूण चार झडपा आहेत. कुठल्याही झडपेचे मुख्य काम म्हणजे तिच्यामधून जाणारा रक्तप्रवाह फक्त एकाच (पुढच्या) दिशेने जाऊ देणे. या झडपांमध्ये बऱ्याचदा दोष निर्माण होतात. त्यापैकी काही जन्मजात असतात तर काही पुढच्या आयुष्यात अन्य आजारामुळे उद्भवतात. हे दोष तीन प्रकारचे असू शकतात :
१. Atresia : इथे संपूर्ण झडप बंद अवस्थेत असते. त्यामुळे अर्थातच रक्तप्रवाह तिच्यातून पुढे जाऊ शकत नाही.

२. Regurgitation: इथे झडप अकार्यक्षम झालेली असते. तिची नीट उघडझाप होत नाही. त्यामुळे तिच्यातून जेव्हा रक्तप्रवाह पुढे जातो त्यातील काही रक्त सतत उलट्या दिशेने मागे (backflow) येत राहते. परिणामी शरीराला अपुरा रक्तपुरवठा होतो. असा दोष mitral या झडपेत सर्वाधिक दिसून येतो (mitral valve prolapse).
३. Stenosis : इथे झडपेचे भोक खूप अरुंद झालेले असते. त्यामुळे हृदयाला तिच्यातून रक्त पंप करताना खूप ताण येत राहतो.
हृदयाच्या चार झडपांपैकी एका वेळेस एकाहून अधिक देखील दोषयुक्त असू शकतात. तसेच एखाद्या झडपेत वरीलपैकी एकाहून अधिक दोष देखील असू शकतात.

जन्मजात हृदय विकृती
या अनेक प्रकारच्या असतात. त्यामध्ये हृदयाच्या एखाद्या भागाचा खुंटलेला विकास, झडपांची दुर्बलता, महारोहिणी किंवा फुफ्फुस रोहिणीच्या गंभीर समस्या, हृदय-पडद्याच्या समस्या, हृदयाच्या डाव्या-उजव्या कप्प्यांच्या दरम्यान भगदाड पडलेले असणे, इत्यादी अनेक प्रकार आहेत. यातील काही विकृतींमध्ये संबंधित मूल निळे पडलेले दिसते तर अन्य काहींमध्ये ते तसे नसते. या प्रकारच्या जन्मजात आजारांबरोबर शरीराचे अन्य काही जन्मजात विकार देखील असू शकतात. अशा काहींचा आढावा मी यापूर्वीच वेगळ्या लेखमालेतून घेतलेला आहे.

ok
वरती चित्रात दाखवलेला Tetralogy of Fallot हा एक बऱ्यापैकी आढळणारा बहुचर्चित आजार असून त्यामध्ये जन्मतःच चार मोठे बिघाड असतात.
..
हृदयाच्या अनेक आजारांपैकी काही प्रमुख प्रकारांचा आपण वर परिचय करून घेतला. प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे त्या यादीत प्रथम क्रमांकावर असलेल्या आणि आपल्या छातीत धडकी भरवणाऱ्या करोनरी हृदयविकाराचे सविस्तर विवेचन पुढील २ लेखांत करतो.

**********************************************************
क्रमशः

जीवनमानआरोग्य