खूप दिवसापासून ब्राह्मणीची बारव पाहायचं मनात होतं. पण आज ते जुळून आलं. खरं म्हणजे सकाळीच ग्रुप ट्रेकला जायचं होतं पण पण उठायला उशीर झाला सहा साडेसहा वाजले होते. पिंपळगाव माळवीच्या रोडनी चाललो होतो तेव्हा म्हटलं जाऊ या. पुढे वांबोरी चा घाट ओलांडून काही अंतराने वांबोरी गाव लागते गावाच्या सुरुवातीलाच उजवीकडे एक रस्ता जातो.
तिथे पहिल्यांदा पाहिले ते खोलेश्वर मंदिर पुरातन शंकराचे मंदिर. गाभाऱ्यात पायऱ्या उतरण्यास खोल आहे. मंदिराचा बाह्यभाग अतिशय प्राचीन दिसल्याने सुंदर भासतो. या मंदिरात बाह्य भागावर अनेक मुर्ती कोरल्या आहेत.
पुढेच वांबोरी गावाच्या वेशीतून गेल्यावर एक पुष्करणीच म्हणजेच वाम तीर्थ नावाची जागा आहे. भव्य अशी पुष्करणी तिथे आहे. बाजूलाच एक भग्न मंदिर आहे आणि मागच्या बाजूला देखील पडीक अवस्थेत असलेले शंकराचे मंदिर आहे. वामतीर्थ हे वाल्मिकी ऋषींचे नावांवरून दिलेले आहे (ऐकीव माहिती).
पुढे आम्ही निघालो ब्राह्मणीची बारव बघायला वांबोरी गावापासून पुढे 12 किलोमीटर वरच ब्राह्मणी गाव आहे.रस्ता अत्यंत चांगला असल्याने प्रवासाचा अजिबात ताण भासत नाही.
ब्राह्मणी बारबापर्यंत पोहोचलो. पुरातत्व खात्याने ही जागा आपल्या ताब्यात घेतल्याने तेथे चांगल्या प्रकारे स्वच्छता व सोय केलेली आहे.
बारव म्हणजेच स्टेप वेल पायऱ्यांची विहीर. आजूबाजूला तळी अथवा तलाव हा पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याच्यापासून येणारे झरे शोधून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्टेप्स वेल्स म्हणजेच पायऱ्यांच्या विहीर चौरस किंवा आयताकृती किंवा षटकोनी आकारात बांधल्या जातात .पुरातन जलव्यवस्थापनेचा हा एक उत्तम नमुना आहे.आणि त्याचबरोबर त्याच्या समोर एक मंडप असते या ठिकाणी तुम्ही मूर्तीची स्थापना बघू शकता किंवा मंडप हा त्यात हे मोकळा देखील असू शकतो व बाजूलाच अनेक प्रकारच्या तिथे खोल्या असू शकतात या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी किंवा स्त्रिया पाण्यासाठी जमत असत व त्यानिमित्ताने त्यांना एकत्रित येण्याची संधी मिळत असे.
आता अशा बारवांचे स्वरूप हे अत्यंत कमी राहिले आहे त्यामुळे ज्या बारव आहेत त्यांचे संवर्धन करून तेथे दीपोत्सव करून आपण या बारवांना एक वेगळी सुद्धा एक पर्यटनाचे क्षेत्र म्हणून विकसित करू शकतो.
बारव हे नाव लांबी मोजण्याच्या ‘बाव’ या मापावरून आले असावे. बारा बाव लांब असलेल्या वास्तुला बारव असे संबोधले गेले असावे. अनेक वेळेला बारवेला कुंड, पुष्करिणी अथवा जलमांडवी या नावांनी संबोधले जाते.(संदर्भ -मानस मराठे)
बारवे कडचा भाग अत्यंत शांत निर्मळ सुंदर आहे. बाजूला चाफ्याची व इतर प्रकारची शोभिवंत सुगंधी फुले असल्याने आणि आवारा मोठा असल्याने अत्यंत शांत असे वातावरण तेथे आहे. आणि समोरच दिसते ती सुंदर अशी ब्राह्मणी बारव. या बारावेचा साधारणता काळ हा 2000 वर्षांपूर्वीचा असावा किंवा बाराशे वर्षांपूर्वीचा असावा याबाबत ठोस अशी माहिती नाही.पण नक्कीच ही बारव खूप जुनी आहे. ही बारव पाहताना आपल्याला समोरच एक भग्न अवस्थेतील एक मंडप उंचावर दिसतो.तोपर्यंत बारवेमध्ये तळाशी आलेल्या पाण्यात पिटुकल्या शंखांचा खजिना सापडला.तो गोळा करण्यात ती दंग झाली
शांत अशा सुंदर परिसराचा अनुभव घेण्यासाठी ही बारव एकदा नक्कीच पाहिली पाहिजे व डोळ्यांचे पारणे फेडले पाहिजे.
पुढे समजले की गावामध्ये बल्लाळ देवीचे मंदिर आहे ते देखील अति प्राचीन असे आहे. बल्लाळ देवीचे मंदिर पाहायला गेलो . प्राचीन काळी मुस्लिम आक्रमणापासून वाचवण्यासाठी मूर्ती एका दर्ग्यासदृश खड्डा आणि वर उंचवटा अशा आकारात लपवली होती.तो भाग आजही देवीसमोर असून त्यावर चादर होती,त्याची आजही पूजा होते.आम्हाला दिसले की या ठिकाणी परत नवीन आधुनिक पद्धतीने तिथे ऑइल पेंट मंदिराला दिलेला आहे. त्यामुळे मूर्ती पाहताना थोडा त्रास होतो.परंतु खरं सांगते एकाहून एक सरस अशा मूर्ती तिथल्या खांबांवरती ,तिथल्या मंदिराच्या बाह्य भागावरती कोरल्या आहेत.प्रत्येक मूर्ती ही ही विशेष आणि एकमेकांपासून वेगळी आहे.
मला बऱ्याच मूर्ती ह्या ओळखताच आलेल्या नाही. काही समाधीस्थ अवस्थेतील मूर्ती पाहून ह्या आणि मोठमोठ्या मूर्तींचे मोठमोठाले कान पाहून ही मूर्ती जैन ऋषींची आहे का किंवा दाढी पाहून ही मूर्ती इजिपशन आहे का अशा प्रकारचे मला वाटले. प्रत्येक खांबावरती असलेले भार वाहक यक्ष हे सगळे वेगवेगळे आहेत.मंदिराच्या बाह्यभागावर ते देखील कोरलेल्या मूर्ती ह्या सामान्य नव्हत्या नक्कीच याचा अभ्यासकांनी अभ्यास करून या विषयाची माहिती किंवा एखाद्या लेखन केले पाहिजे. मंदिरात मंदिराच्या परिसरामध्येच मागे शंकराचे जुने मंदिर आहे.
या मंदिराची अजून एक विशेषता म्हणजे ज्याप्रमाणे नेवासाला ज्ञानेश्वर महाराजांनी पैस खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहिली त्याचप्रमाणे बल्लाळ देवीच्या आवारात असलेल्या 'अमृतानुभव' या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी 'अमृतांनाभव' हा ग्रंथ लिहिला. बाजूलाच एक अतिशय सुरेख असा शांतपणे बसून आराम करणारा महिषा आहे. जो ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्याची प्रतिकृती मानली जाते..
मंदिरामागे एक भव्य तलाव आहे. मागच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर जे अत्यंत मोठे , खूप पुरातन असणार. आहे कारण की तिथे अतिशय केवळ मंदिर प्रवेशासाठी चौकट किंवा मंदिराची चौकट असलेली एक बाजू आपल्याला दिसते बाकीचे चहू बाजूचे मंदिरे पडलेले आहे.
अशा प्रकारे सुंदर असे मंदिरांचे अनुभव घेऊन परत निघालो आणि येताना मिसळपावचा आस्वाद घेतला.
-भक्ती
खोलेश्वर मंदिर
वामतीर्थ
ब्राह्मणीची बारव
बल्लाळ देवी मंदिर
ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवलेला त्या रेड्याची प्रतिकृती
अमृतानुभव खांब
ओळखू न आलेली पैकी एक वेगळी मूर्ती
सुंदरी
सुरेख सुंदर बाप्पाची पूजा
प्रतिक्रिया
28 Apr 2024 - 5:38 pm | कंजूस
लेख आवडला.
{ वेद म्हटल्यावर }नतमस्तक झालेल्या रेड्याचे शिल्प आवडले.
28 Apr 2024 - 8:25 pm | Bhakti
हो ना मस्त आहे तो..
28 Apr 2024 - 7:15 pm | सर टोबी
नगरमध्ये मी जवळपास बावीस वर्ष होतो. पण तिथे पंचक्रोशीत वृद्धेश्वर, नेवासा, राशीनची दीपमाळ, सौताड्याचा धबधबा अशा मोजक्याच जागांची माहिती होती. निघोजचे रांजण घळगे, सांधण घळ वगैरे जागा आता आता लोकप्रिय व्हायला लागल्या आहेत.
जाता जाता: पुरातन दगडी वास्तूंना ऑइल पेंट फासण्यावर कायदेशीर बंदी आणावी असे वाटते.
28 Apr 2024 - 7:43 pm | अहिरावण
>>>पुरातन दगडी वास्तूंना ऑइल पेंट फासण्यावर कायदेशीर बंदी आणावी असे वाटते.
खरे आहे.
28 Apr 2024 - 8:26 pm | Bhakti
अगदी..तो शिलालेख तर अदृश्य करून टाकलाय..
धन्यवाद अहिरावण.
28 Apr 2024 - 8:24 pm | Bhakti
सांधण घळ करायची खुप इच्छा आहे,लवकर पूर्ण व्हावी.
28 Apr 2024 - 10:19 pm | प्रचेतस
सांधण दरीत पहिल्यांदा १४/१५ वर्षांपूर्वी गेलो होतो, तेव्हा ती कुणाला माहितीदेखील नव्हती, अगदी निर्जन परिसर होता, आता मात्र जनता असते.
29 Apr 2024 - 11:02 am | Bhakti
भारीच,हो सध्या तिथे गर्दी असते.
29 Apr 2024 - 2:00 pm | चौथा कोनाडा
अधून मधून चेंगराचेंगरी देखिल होते असं ऐकलं आहे !
28 Apr 2024 - 7:43 pm | अहिरावण
भारी
28 Apr 2024 - 9:08 pm | कर्नलतपस्वी
छोट्याछोट्या गावातून इतीहास बघायला मिळतो. फक्त दृष्टी आणी इच्छा हवी.
लागली सुट्टी की चला उटी, चला काश्मीर पण आजूबाजूस किती वैभव आहे ते मात्र माहित नसते. आवडले.
28 Apr 2024 - 9:57 pm | Bhakti
करेक्ट दृष्टी आणि इच्छा हवी.मागच्या दोन आठवड्यात पूर्वी हत्ती बारव पाहिली.किती तरी वर्ष रोज या रोडने जायचे पण कधीच थांबून पाहिले नव्हते कारण दृष्टीकोनच नव्हता इतिहास आसपास पासून सुरू करावा.आज ब्राह्मणी बारव पाहायला आले हे बहिणीला सांगितले तर तू काय आता बारव रिसर्च करतेय का तिने विचारले (हा हा ;))
28 Apr 2024 - 9:58 pm | Bhakti
*पूर्वी=पहिल्यांदा वाचा.
28 Apr 2024 - 10:15 pm | प्रचेतस
छान लिहिलंय, बारवेच्या एकूण स्थापत्यशैलीवरून तसेच खोलेश्वर ह्या मंदिराच्या नावावरून ही बारव तसेच मंदिर ह्यांचा काळ १३व्या शतकातला असावा असे वाटते. सिंघण यादवाचा पराक्रमी सेनापती खोलेश्वर हा होता व त्याने पुष्कळ मंदिरेदेखील बांधली होती.
बारव आणि त्याच्या काठावरील मंदिर अगदी अशाच प्रकारची रचना लोणी भापकर येथेही दिसते.
28 Apr 2024 - 10:17 pm | Bhakti
वाह! चांगली माहिती.लोणी भापकरचे फोटो आताच पाहिले.
धन्यवाद.
29 Apr 2024 - 10:16 am | गोरगावलेकर
खूप चांगली माहिती आणि फोटोही आवडले