कोलेस्टेरॉल : Statins, बुरशी व घातकता

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 Apr 2024 - 11:23 am

नव्या वाचकांसाठी :
कोलेस्टेरॉलवर मूलभूत माहिती देणारा लेख इथे आहे.
…………..........................................................................................................................................
रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल ही गेल्या ७५ वर्षांत जाणवलेली एक मोठी आरोग्यसमस्या आहे. हृदयविकाराच्या धोका वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये या घटकाचा समावेश होतो. त्या अनुषंगाने कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी कमी करणे इष्ट असते. त्यासाठी औषध म्हणून अनेक घटकांचा वापर देश-विदेशांमध्ये होताना दिसतो. या औषधोपचारांमध्ये वनौषधी आणि आधुनिक वैद्यकातील statins या औषधांचा समावेश आहे. या औषधांचे दुष्परिणाम देखील बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे अत्यंत तारतम्याने ती औषधे वापरावी लागतात.

एकदा का “आधुनिक औषधांचे दुष्परिणाम” हा मुद्दा समाजमनात खोलवर घुसला की मग पर्यायी उपायांना जवळ करण्याची प्रवृत्ती होते. अशा पर्यायांपैकी वनस्पतींचे उपाय हा एक प्रमुख पर्याय असतो. वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असलेले अनेक घटक असतात. मात्र त्यातला कुठला घटक कोणत्या आजारावर किती प्रमाणात घ्यायचा यासंबंधीची माहिती सर्वसामान्यांना नसते. मग काही औषधी उद्योग अशा वनस्पती अथवा नैसर्गिक गोष्टींपासून गोळ्या बनवतात. या गोळ्यांच्या उत्पादनांवर आधुनिक औषधांच्या उत्पादनाइतके कठोर निर्बंध नसतात. बऱ्याचदा अशा नैसर्गिक उत्पादनांच्या गोळ्यांमध्ये संबंधित रासायनिक घटकांचे प्रमाणीकरण झालेले नसते. एवढेच नाही तर त्या मुख्य घटकाच्या बरोबरीने काही अन्य त्रासदायक/घातक रसायने (contaminants) देखील गोळ्यांमध्ये राहिलेली असतात. अशा अप्रमाणित औषधांची विक्री देखील तुलनेने सोपी असते आणि ग्राहकांना भुलविण्यासाठी त्यांच्या जोरदार जाहिराती केल्या जातात. कालांतराने अशा गोळ्यांचे दुष्परिणाम दिसू लागतात आणि काही प्रसंगी ते गंभीर स्वरूपाचे होतात.

गेल्या आठवड्यात जपानमध्ये याच प्रकारची एक आरोग्य दुर्घटना घडलेली आहे. त्यातील बाधितांनी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी beni-koji red yeast rice या तथाकथित ‘औषधी’ उत्पादनाचे सेवन केलेले आहे. त्यापैकी ५ जण मृत्युमुखी पडलेत आणि अन्य 114 जणांना रुग्णालयात दाखल केलेले आहे. त्या व्यतिरिक्त 680 जणांनी तब्येतीच्या त्रासामुळे डॉक्टरकडे धाव घेतलेली आहे. आता सदर औषधी कंपनीने त्यांचे ते औषध बाजारातून परत मागवले आहे.

ok
या अनुषंगाने वरील बुरशीजन्य नैसर्गिक उत्पादन आणि वैद्यकातील statins या औषधांची तुलना करणारा आढावा घेतो.

बुरशीजन्य औषधे आणि त्यांचा विकास

बुरशी (फंगस) हा सूक्ष्मजीवांचा एक प्रकार आहे. तिचे अनेक प्रकार निसर्गात आढळतात आणि त्यांच्यापैकी बऱ्याच प्रकारांत औषधी गुणधर्म असल्याचे ज्ञान पूर्वापार होते. सन 1928 मध्ये बुरशीपासून पेनिसिलिन तयार केल्यानंतर या प्रकारच्या संशोधनाला जोरदार चालना मिळाली. बुरशीच्या अनेक प्रकारांपैकी Monascus हा प्रकार औषध म्हणून चीनमध्ये सुमारे 1000 वर्षांपासून वापरात आहे. पुढे त्याचा प्रसार होऊन त्याचा वापर जपान, कोरिया,अन्य काही आशियाई देश आणि अमेरिकेपर्यंत झाला.

या बुरशीतले एक महत्त्वाचे रसायन म्हणजे monacolin K. या रासायनिक घटकात कोलेस्टेरॉलची रक्तपातळी कमी करण्याचा गुणधर्म आढळला. कालांतराने जैवतंत्रज्ञानाचा वापर करून या बुरशीपासून statins ही आधुनिक औषधे प्राथमिक रेणूस्वरूपात तयार केली गेली. नंतर Aspergillus आणि Penicillium या बुरशीही या उत्पादनासाठी वापरात आल्या. त्यांच्यापासून Lovastatin व Mevastatin ही औषधे (1G) तयार करण्यात आली. कालांतराने या औषधांच्या रचनेत काही रासायनिक बदल करून pravastatin and simvastatin ही पुढच्या टप्प्यातील statins (2G) तयार झाली. जसा या औषधांचा रुग्णांवर मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला तशी त्यांची उपयुक्तता, मर्यादा आणि दुष्परिणाम देखील अनुभवास आले. यावर अधिक शास्त्रीय अभ्यास करून त्यापुढच्या टप्प्यातील statins (3G) उदयास आली. ती तयार करताना त्यांची उपयुक्तता अधिक असेल आणि दुष्परिणामही कमीतकमी होतील याचा विचार झाला. 3G या श्रेणीमध्ये काही औषधे असून त्यापैकी rosuvastatin atorvastatin ही दोन अधिक प्रचलित आहेत.

बुरशीयुक्त भात (beni-koji) : उपयुक्तता व धोके
या प्रकारच्या पारंपरिक खाद्यात मोनाकोलीन थोड्या प्रमाणात असते. मात्र या भाताचे घटक वापरुन तयार केलेली अनेक व्यापारी उत्पादने पुढे बाजारात उपलब्ध झालीत. त्यांच्यात असलेल्या मोनाकोलीनच्या प्रमाणात प्रचंड तफावत दिसून येते. काही उत्पादनांमध्ये ते अत्यंत कमी प्रमाणात तर अन्य काहींमध्ये ते भरमसाठ आहे. मुख्य म्हणजे त्याचे प्रमाण किती आहे याचा उल्लेख त्या उत्पादनाच्या लेबलवर केला जात नाही. काही उत्पादनांमध्ये तर बेकायदेशीररित्या आधुनिक वैद्यकातील lovastatin हे औषध मिसळलेले देखील आढळले. असे प्रकार लक्षात आल्यानंतर अमेरिकी औषध प्रशासनाने त्यांच्या देशातील संबंधित उत्पादकांना ताकीद दिलेली आहे. तसेच या प्रकारची उत्पादने ‘अधिकृत औषधे’ म्हणून वापरण्यास पूर्ण मनाई केलेली आहे.

आता अशा अप्रमाणित गोळ्यांचा धोका पाहू. ज्याप्रमाणे statins या अधिकृत औषधांचे दुष्परिणाम आहेत त्याच प्रकारचे दुष्परिणाम या अप्रमाणित औषधांना देखील आहेत. म्हणजेच, त्यांच्यामुळे स्नायू, मूत्रपिंड, यकृत आणि पचनसंस्थेला इजा होऊ शकते. परंतु त्याहून महत्त्वाचा मुद्दा या औषधांच्या अशुद्धतेचा (crude form) आहे. त्यांच्यामध्ये मुख्य औषधी द्रव्याखेरीज citrinin, puberulic acid व अन्य प्रकारची घातक रसायने देखील आढळलेली आहेत. वर उल्लेख केलेल्या जपानमधील दुर्घटनेत puberulic acid मुळे रुग्णांना खूप त्रास झालेला असावा. या प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता अमेरिका आणि युरोपमध्ये या प्रकारच्या बुरशी उत्पादनांना वैद्यकीय औषध म्हणून मान्यता मिळू शकलेली नाही. मुळात त्यांची उपयुक्तता बेभरवशाची असून त्यांच्यापासून वर उल्लेख केलेले धोकेही संभवतात.

Statins : उपयुक्तता व दुष्परिणाम
ही आधुनिक औषधे सुमारे गेल्या ४० वर्षांपासून वापरात आहेत. त्यांची वैद्यकतील उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. परंतु त्याच बरोबर त्यांच्यामुळे होणारे अनेक प्रकारचे दुष्परिणाम हा देखील गांभीर्याने बघण्याचा मुद्दा आहे. मुळात रक्तातले वाढलेले कोलेस्टेरॉल आणि त्यावर औषध द्यावे की नाही, हे मुद्दे सुद्धा वैद्यकीय विश्वात वादग्रस्त आहेत. तरीसुद्धा जगभरातील आधुनिक वैद्यकाच्या विविध वैद्यक संघटनांनी ही औषधे गरजेची आणि उपयुक्त असल्याचा निर्वाळा दिलेला असून त्याप्रमाणेच डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि संबंधित रुग्णांमध्ये असलेल्या अन्य हृदय-धोकादायक घटक किंवा आजारांचा साकल्याने विचार करूनच डॉक्टर ही औषधे सुयोग्य डोसमध्ये रुग्णाला देण्याचा निर्णय घेतात. रुग्णाच्या बाबतीत या औषधाने होणारा फायदा त्याच्या संभाव्य धोक्यापेक्षा बराच जास्त असतो तेव्हा हे औषध दिले जाते.

ok
या औषधांचे दुष्परिणाम काय आहेत हे आता विस्ताराने पाहू.
सर्वप्रथम एक महत्त्वाचा मुद्दा. वैद्यकीय संदर्भांमध्ये दुष्परिणामांची भली मोठी यादी जरी बघायला मिळाली तरी असे परिणाम होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण टक्केवारीमध्ये बरेच कमी असते. सर्वांनाच सर्व प्रकारचे दुष्परिणाम जाणवत नाहीत. खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसू शकतात :
१. वय 70 वर्षांच्या वर असणे
२. अतिरिक्त मद्यपानाचे व्यसन

३. औषध चालू करण्यापूर्वीच यकृत, मूत्रपिंड अथवा थायरॉइडचा आजार असणे
४. शरीरातील आधीच्याच अन्य आजारांसाठी अनेक प्रकारची औषधे चालू असणे

५. रुग्णाचा वंश : इथे एक उदाहरण महत्त्वाचे. आशियाई वंशाच्या लोकांमध्ये स्नायूदुखी हा दुष्परिणाम अधिक प्रमाणात आढळतो.

६. सध्याच्या वेगवान संगणक संवादयुगात अजून एक मुद्दा दिसून आलेला आहे. जे रुग्ण हे औषध सुरू करण्याच्या सुमारास भरपूर ‘ गुगलगिरी’ करून त्यासंबंधी वाचन करतात किंवा समाज माध्यमांमधील संबंधित चर्चांमध्ये पडीक असतात, त्यांच्या बाबतीत औषध चालू केल्यानंतर स्नायूदुखी आणि अन्य काही तक्रारींचे प्रमाण अज्ञानी लोकांपेक्षा अधिक प्रमाणात दिसून येते ! वरवर पाहता हा विनोद वाटेल, परंतु तसे नसून या प्रकारच्या परिणामाला nocebo effect असे शास्त्रीय नाव दिलेले आहे (placebo च्या विरुद्ध).

आता प्रत्यक्ष दुष्परिणाम पाहू.
औषध बाजारात सुमारे डझनभर Statins उपलब्ध असून त्या प्रत्येकाच्या गुणावगुणांमध्ये थोडाफार फरक आहे. तूर्त आपण Rosuvastatin हे 3G या श्रेणीतील औषध नमुना म्हणून घेऊ आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊ :
१. १०% हून अधिक रुग्णांच्या बाबतीत : स्नायूदुखी.
२. १-९ % रुग्णांच्या बाबतीत : बद्धकोष्ठ, सांधेदुखी, यकृताचा दाह, औषधजन्य मधुमेह (३%) आणि मेंदूकार्यावर तात्पुरता परिणाम.
३. याहून गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम हे अत्यंत दुर्मिळ असतात.

हे औषध चालू करण्यापूर्वी डॉक्टर काही प्रयोगशाळा तपासण्या करून रुग्णाच्या यकृत व मूत्रपिंडाच्या कार्याविषयी मूलभूत माहिती करून घेतात. तसेच त्यातून मधुमेह अथवा त्याची पूर्व अवस्था असल्यासही लक्षात येतेच. औषध चालू केल्यानंतर दुष्परिणाम जर सौम्य स्वरुपात दिसले तर औषधाचा इच्छित परिणाम साध्य होईपर्यंत ते सहन करता येतात. परंतु जर ते असह्य झाले तर मात्र डॉक्टरांचा तातडीने सल्ला घेणे आवश्यक.

जर दुष्परिणाम असह्य असतील तर डॉक्टर खालील प्रकारचे निर्णय घेऊ शकतात :
१. statin चा प्रकार बदलणे किंवा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे औषध देणे
२. काही काळ औषध थांबवून निरीक्षण करणे
३. औषधांचा डोस कमी करणे

सारांश
रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉल संदर्भातील दोन औषध पद्धतींचा हा होता लेखाजोखा. वरील विवेचनातून एक गोष्ट लक्षात येईल. जेव्हा रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने मान्यताप्राप्त औषध चालू केलेले असते, तेव्हा डॉक्टर रुग्णाला संभाव्य दुष्परिणामांसंबंधी सावध करतात आणि योग्य त्या सूचनाही देतात. पुढे प्रत्यक्ष दुष्परिणाम दिसल्यानंतरही तारतम्याने विचार करून डॉक्टर रुग्णाचे हित पाहतात.
या उलट पारंपारिक ‘वनस्पती’ प्रकारातील मान्यता नसलेली व्यापारी उत्पादने जर रुग्णांनी स्वतःच्या मनानेच वापरली तर त्यातून निश्चितच धोका संभवतो. मुळात तशी उत्पादने अप्रमाणित व अशुद्ध असल्यामुळे त्यांची उपयुक्तता तर बेभरवशाची असतेच, परंतु दुष्परिणाम देखील कोणत्या पातळीपर्यंत जातील याचा अंदाज बांधता येत नाही. म्हणूनच कुठल्याही आजाराच्या रुग्णांनी नेहमी आपापल्या पसंतीच्या अधिकृत डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कुठलेही औषधोपचार करावेत.
*****************************************************************************************************
संदर्भ :
१. https://www.sciencedirect.com/science/article/pii/S2095809923001546
२. https://www.nccih.nih.gov/health/red-yeast-rice#:~:text=But%2C%20because....
आणि इतर काही.

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

मनो's picture

1 Apr 2024 - 10:02 pm | मनो

Statin हा बऱ्यापैकी safe option आहे असे ऐकले होते. आता घेण्यापूर्वी अभ्यास करावा लागणार :-)

सत्तरीच्या पुढे वैद्यकशास्त्र तशीही कोणतीच guarantee देत नाही, आणि मद्यपान म्हणजे प्रश्नच मिटला. परंतु, ४०-५० वयात हे दुष्परिणाम दिसतात का?

औषध जर घेतले नाही तर रक्तवाहिन्यामध्ये काठिण्य येऊन हृदयविकार बळावणयाची भीती पाहिली तर इकडे आड तिकडे विहीर?

कुमार१'s picture

2 Apr 2024 - 6:17 am | कुमार१

दुष्परिणाम कोणत्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसू शकतात त्याची यादी लेखात दिलेलीच आहे. वृद्धापकाळात त्यांची शक्यता जास्त असते. परंतु मध्यम वयात देखील बाकीचे घटक तब्येतीला लागू असतील तर दुष्परिणाम दिसू शकतात.
विशेषतः स्त्रिया, बराच काळ मधुमेह असणे किंवा थायरॉईड न्यूनते चा विकार असून त्याचे उपचार योग्य झालेले नसल्यास statinsचे दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसतात.

२. प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत फायदे आणि संभाव्य धोके यांच्या तराजूचे गणित मांडल्यास योग्य तो निर्णय घेता येतो.

कर्नलतपस्वी's picture

2 Apr 2024 - 6:26 am | कर्नलतपस्वी

पण थोडा भितीदायक.

आता सत्तरी पार करण्यास अगदी थोडेच दिवस राहिलेत त्यामुळे थोडा दिलासा सुद्धा.

आतापर्यंत मुख्यत्वेकरून आहार आणी विहार या दोन गोष्टींवर भर असल्याने वसा ची मात्रा सामान्य.

स्टॅटीन सुरवात दहा आणी आता विस मिलिग्रॅम घेत आहे.

कुमार१'s picture

2 Apr 2024 - 6:43 am | कुमार१

भीती बाळगू नका; जागरूकता असावी !
या औषधांच्या बाबतीत लेखात दिलेला nocebo परिणाम अधिक दिसतो. .:)

दुष्परिणाम होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी तशी कमीच आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेत असाल तर डॉक्टर काळजी घेतील.

सुबोध खरे's picture

2 Apr 2024 - 9:58 am | सुबोध खरे

कोणतीही गोष्ट हर्बल किंवा वनस्पतीजन्य आहे म्हणून सुरक्षित आहे हे मानणारे असंख्य लोक आहेत.

अशाना मी एकच सांगतो-- अफू, गांजा आणि तंबाखू या पण वनस्पतीच आहेत आणि त्या कितपत सुरक्षित आहेत?

तेंव्हा आंधळेपणाने वागू नका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2024 - 3:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.साहेबांशी सहमत आहे, आंधळेपणाने वागू नये.

-दिलीप बिरुटे

चांगला लेख.नवीन माहिती समजली.अशाच प्रकारे बरेच दिवसांपासून मी अश्वगंधा विषयी ऐकतेय.अधिक-दीर्घकाळ अश्वगंधा घेतल्याने दुष्परिणाम दिसतातच हे या चर्चांत सांगितले आहे.वनस्पतीजन्य औषधे सहज घेतो,पण क्रुड आणि शुद्ध याकडे डोळेझाक केली जाते.

अवांतर एक रोचक उदाहरण
अजून एक कीटकजन्य पदार्थही औषधी म्हणून वापरले जातात.एका लेक्चर मध्ये जपानमध्ये एक मोठी मधमाशी होती(किंवा अजूनही आहे)ती आधी ग्लुकोज वापरून लढते ,थोडा ग्लुकोज तसाच ठेवते.मग इतर सोर्स वापरून लढते .शेवटी परत ठेवलेला ग्लुकोज वापरून जोमाने लढते.हाच तिचा एक वेगळा सोर्स जो तिला ग्लुकोज बाजूला ठेवायला मदत करतो तो वापरून जपानने एनर्जी ड्रिंक तयार केले.
माणसाला शक्तिमान होण्याची शक्यता दिसली की तो खटाटोप करीतच राहतो :)

कुमार१'s picture

2 Apr 2024 - 11:20 am | कुमार१

एनर्जी ड्रिंक

अगदी !

(थोडे अवांतर थोडे संबंधित)
'एनर्जी ड्रिंक' या मुद्द्यावरून नुकतीच आलेली ही बातमी वाचली नसल्यास जरूर वाचा.

एनसीपीसीआर म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स या आस्थापनेने नुकतीच सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्राहक व्यवहार विभागांना नोटीस पाठवून बोर्नव्हिटासह तत्सम कोणतीही पेये आरोग्यदायी पेये म्हणून विकली जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला सांगितले आहे. . .
. . . बालरोगतज्ज्ञांनी मात्र या कंपन्यांचे दावे खोडून काढले होते. त्यांच्या मते आरोग्यदायी पेये म्हणून मुलांना दिल्या जाणाऱ्या पेयांमध्ये असलेली साखर मुलांच्या रोजच्या हालचालींसाठी अतिरिक्त ठरते. या साखरेचे सेवन केल्याने मुलांमध्ये तृष्णा, चिडचिड, थकवा इत्यादी गोष्टी वाढू शकतात. आरोग्यदायी पेय म्हणवल्या जाणाऱ्या पेयांमुळे प्रत्यक्षात मुलाचे आरोग्य सुधारत नाही.

अशी औषधे डॉक्टरांनी दिली की घेणे भाग...

त्याबद्दल कोणतीही माहिती वाचणे म्हणजे आणखी काही नोसिबोंची भर. Including हा लेख.

बाकी व्हिटॅमिन सप्लिमेंट, फास्ट फूड याबाबत गुण दोष, रिस्क बेनेफिट वाचून फरक पडू शकतो.

पण स्टाटिन्स, रक्त पातळ करणारी औषधे, रक्तदाबावर औषधे ही जीवरक्षक म्हणून दिलेली असतात. काहीतरी झटका येऊन गेलेला असतो. अशा वेळी त्यांनी लिव्हरचा दाह होऊ शको, किंवा वीस टक्के लोकांत स्नायुदुखी होऊ शको. घेणे बंद करता तर येणार नाहीच. कोण मॉडर्न मेडीसिन डॉक्टर म्हणेल की यातील कोणतीही गोळी बंद करा. रिस्क जास्त आहे आणि बेनिफिट कमी आहे..?? ;-)

कुमार१'s picture

2 Apr 2024 - 3:24 pm | कुमार१

वीस टक्के लोकांत स्नायुदुखी होऊ शकते.. घेणे बंद करता तर येणार नाहीच. कोण मॉडर्न मेडीसिन डॉक्टर म्हणेल की यातील कोणतीही गोळी बंद करा ?

>>>
प्रत्येक रुग्णागणिक औषध चालू ठेवण्याचा/ बंद करण्याचा/ डोस कमी करण्याचा निर्णय वेगवेगळा असेल; यात सरसकटीकरण करता येणार नाही. परंतु, डॉक्टर तारतम्याने असे नक्की करू शकतात :
1. समजा, स्नायूदुखी सौम्य आहे आणि औषधाचा इच्छित परिणाम चांगला दिसतो आहे. तर डॉक्टर म्हणतील, काही हरकत नाही; तुम्ही स्नायूदुखी काही काळ सहन करत राहा. पुढे आपण काय होतेय त्याप्रमाणे ठरवू.

2. समजा, स्नायूदुखी बऱ्यापैकी जास्त आहे आणि औषध चालू ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर अशा वेळेस डॉक्टर पूरक उपचार म्हणून इ- जीवनसत्व किंवा अन्य काही सौम्य प्रकारच्या गोळ्या देऊ शकतात ज्याने ती स्नायूदुखी नियंत्रणात राहते.

सारांश : डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेल्या औषधाचे दुष्परिणाम जरी असह्य झाले तरी डॉक्टरांकडे जे अन्य पूरक उपचार किंवा पर्याय असतात ते डॉक्टर नक्की सुचवतात.

कोलेस्टेरॉल शरीर बांधणीसाठी उपयुक्त आहे. त्याची पातळी खालावून नेमकं काय साध्य होतं? हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर पुटं चढतात त्याला केवळ कोलेस्टेरॉलच जबाबदार कसं काय? कोलेस्टेरॉल मुळे दाह कमी होतो. जर हृद्रोहिण्यांचा दाह कमी केला तर कोलेस्टेरॉलची आवश्यकता आपोआप कमी होईल.

हृद्रोहिण्या या नळासारख्या मानल्या जातात व त्यावरील पुटांचा हवाला देऊन कोलेस्टेरॉलला खलनायक ठरवलं जातं. प्रत्यक्षात हृद्रोहिण्या एखाद्या बोगद्यासारख्या असतात. समजा कोलेस्टेरॉलची पातळी कमी केली आणि त्यामुळे या बोगद्यांच्या बांधणीत कमतरता उद्भवली व भिंती चेमटू लागल्या तर जबाबदार कोणाला धरायचं?

शिवाय स्टॅटिनचे दुष्परिणाम आहेत ते वेगळेच. तरुण वयात स्टॅटिन धकवता येतं. पण जसजसं वय वाढतं तसतसे स्टॅटिनचे त्रास वाढायला लागतात.

असो.

कोलेस्टेरॉल हा पदार्थ हल्ली अमेरिकेत हृद्रोगजनक मानीत नाहीत असं ऐकलंय.

-नाठाळ नठ्या

कुमार१'s picture

8 Apr 2024 - 7:56 am | कुमार१

कोलेस्टेरॉल हा पदार्थ हल्ली अमेरिकेत हृद्रोगजनक मानीत नाहीत असं ऐकलंय.

>>>

सहमत. वरील विधानात ‘हल्ली’ हा शब्द आला तेव्हा मी मुद्दाम 2024 च्या अमेरिकन असोसिएशन फॉर कार्डिओलॉजीच्या परिषदेचा वृत्तांत वैद्यकीय संस्थलावर वाचला (तो सर्वांसाठी खुला नाही). त्यामध्ये त्यांनी 2018 सालची यासंदर्भातील जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्याचा हवाला दिला आहे. तो संदर्भ पुढे देतो.

सुरुवातीस काही महत्त्वाचे मुद्दे, जे मी कोलेस्ट्रॉलवरील २०१७ मधील माझ्या लेखात स्पष्ट केलेले होतेच :
१. हृदयविकारांच्या संदर्भात कोलेस्ट्रॉल हा एकटा खलनायक कधीच नव्हता आणि नाही; रक्तातील सर्व मेद पदार्थांचा यासाठी विचार केला जातो ( लिपिड प्रोफाइल).

२. चालू परिषदेतील एक महत्त्वाचे विधान जसेच्या तसे देतो :

when cholesterol elevations occur in combination with other risk factors, a much higher risk for CVDisease is predicted.

या इतर धोकादायक घटकांत वय, लिंग आहारशैली, व्यसने, मधुमेह उच्च रक्तदाब हे सर्व येतात.

३. या विषयावरील जी मार्गदर्शक तत्वे असतात त्यांची साधारण पाच ते दहा वर्षांनी उजळणी केली जाते. माझ्या वाचनानुसार सध्यातरी 2018 ची मार्गदर्शक तत्वे जारी असून ती इथे पाहता येतील. त्यामध्ये त्यांनी रक्तातील मेद पातळी आणि त्यानुसार रुग्णांच्या श्रेणी ठरवल्या असून सुमारे पाच श्रेणीमध्ये स्टॅटिनचे उपचार सौम्य, मध्यम किंवा उच्च डोसमध्ये कसे करावेत याची संपूर्ण तालिका दिलेली आहे.

४. कोलेस्ट्रॉल हा घटक असा आहे की त्याच्या जन्मापासूनच तो वादग्रस्त राहिलेला आहे ! आपण या विषयावरील जेवढे संशोधन वाचत जाऊ तसे आपल्या लक्षात येईल या विषयाचे समर्थक आणि विरोधक जवळजवळ समसमान आहेत. :))

५. एकंदरीत गोंधळुन टाकणारा हा विषय असला तरीसुद्धा पाश्चात्त्य देशांमधील विविध वैद्यकीय आस्थापनांनी त्यांच्या डॉक्टरांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अजूनही रक्त-मेदांना महत्त्व दिलेले आहे.

कुमार१'s picture

8 Apr 2024 - 11:44 am | कुमार१

इथे अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने 2023 साली प्रसिद्ध केलेली ‘धोका वाढवणाऱ्या घटकांची’ यादी आहे.

त्यातील जे “सुधारता येण्याजोगे (modifiable) अनेक घटक आहेत त्यामध्ये रक्तातील मेद पदार्थांना (Hyperlipidemia) दुसऱ्या स्थानावर ठेवलेले आहे.