कोपनहेगन-पॅरीस भटकंती-५

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in भटकंती
27 Feb 2024 - 10:38 am

सकाळी मी आणि विकास दहा वाजता उठलो. थंडी होती त्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती, खिडकीतून बाहेर पाहिलं आयफेल टावर दिसत नव्हता धुक्यात हरवला होता. आम्ही आंघोळी आटोपून अकरा वाजेपर्यंत तयार झालो. आयफेल टॉवर धुक्यातून अर्धा बाहेर आला होता.
.
आम्ही पाणी गरम करून रूम मध्ये रेडी टू मेक चहा बनवला, विकास ने आणलेले खाकरे खाल्ले. ऊरलेले पाच सहा खाकर्यांचे पॅकेट त्याने मला दिले. बॅग भरून खाली आलो. लिंडा नावाची गोरी रिसेप्शनिस्ट होती तिने लॉकरमध्ये सामान ठेवले आम्ही निघालो, मिपाकर चित्रगुप्त काकांचा व्हिडिओ कॉल आला त्यांच्याशी बोललो. विकासला आयफेल टॉवर समोर फोटो काढायचे होते त्यामुळे आम्ही आयफेल टॉवर कडे जायचे ठरवले. आम्ही ला डिफेन्स मेट्रो स्टेशन कडे पायी चालत निघालो. रस्त्यात एका स्त्रीशी पत्ता विचारण्यावरून गप्पा झाल्या तीने आम्हाला सुचवले की आयफेल टॉवर तुम्ही मागच्या बाजूने पहा तिथून तो अफलातून दिसेल. “अफलातून ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मला शब्द सुचत नाहीये” असं ती बोलली.
.मी तिला बोललो की मला अफलातून चा अर्थ माहितीय. ला डिफेन्स स्टेशनला जाताना आम्हाला रस्त्यात एक गार्डन लागले विकास बोलला की आपण रस्ता चुकलोय आपण गार्डनमध्ये घुसतोय. मी त्याला सांगितलं की हे गार्डन रस्त्याच्या मधोमध बनलंय. गार्डनच्या आजूबाजूंनी रस्ता गेला आहे, त्याचा विश्वास बसला नाही तो बोलला “रस्त्यामध्ये एवढे सुंदर गार्डन? आपल्या इथे तर गार्डन मध्येही गार्डन सारखं वाटत नाही.” जाताना आम्हाला खूप सुंदर सुंदर बिल्डींग्स लागल्या..
.

ला डिफेन्सला पोचून आम्ही चार्ल्स दी गाॅल साठी मेट्रो पकडली, तिथून दुसरी मेट्रो पकडून आयफेल टॉवर पोहोचलो. आयफेल टॉवरच्या गकडे जाताना एक म्युझियम होतं पण त्याचं 14 की 17 युरो तिकीट पाहून आम्ही आल्या पावली माघारी आलो पण मला जेवढे फोटोज दिसले ते खूप सुंदर होते.,आफ्रिकेतले काढलेले.
.आम्ही आयफेल टॉवरवा पोहोचलो. तिथे अजिबात गर्दी नव्हती तसेच फोटोज छान येत होते.
.
.
.
हे सर्व करेपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. विकास ची रात्री साडेनऊ ची फ्लाईट होती, तो निघायची घाई करू लागला आम्ही परत बस, स्टेशन मेट्रो करत ला डिफेन्स स्टेशनला पोहोचलो.
.इथे एक गंमत झाली.एका स्त्रीला आम्हा मशीन मधून तिकीट काढून द्यायची विनंती केली. तिने विचारलं कुठे जायचंय?? आमचं स्टेशन सांगीतल्यावर बोलली की मीही तिकडेच चाललीय, “जस्ट फोलो मी.” आम्ही तिकीट न काढता तिच्या मागे मागे गेलो. बस, मेट्रो करत आम्ही ला डिफेंस ला फूकट पोहोचलो. पुर्ण रस्ताभर आम्ही जीव मूठीत धरून होतो की कुणीतरी पकडेल. मी त्या स्त्रीला भिती सांगीतली पण ती बोलली “डोंट वरीं.” इथे मेट्रो आणि बस तिकिटांची गंमत होती ते विकत घेतल्यानंतर तुम्ही मशीन मध्ये टाकले की त्यानंतर ते दीड तास व्हॅलिड असायचे. दीड तासात कितीही बस किंवा मेट्रो बदला दीड तासानंतर ते तिकीट व्हॅलीड नसायचं. तिकिटाची किंमत साधारण दीड युरो असायची. मला चित्रगूप्त काकांनी पास घे असं सुचवलं होतं. पण मग मी पायी फिरलो नसतो. ला डिफेन्स स्टेशनला बेस्ट फिल्ड मॉल होता तिथून विकासने अर्धा किलो चॉकलेट विकत घेतले, आणि परत आम्ही पायी हॉटेलला आलो. ला डिफेन्स स्टेशन ते हॉटेल पायी अर्धा तासाच्या अंतरावर होते, विकासने फ्रेंचांचा धसका घेतला होता. इंग्रजी बोलनारा एखादाच सापडायचा. आपण हरवू आणि कुणाला पत्ता विचारता येणार नाही यामुळे त्याने मेट्रो किंवा बसणे एअरपोर्ट न जाता सरळ 44 युरो देऊन उबेर बुक केली. चार वाजले होते रिसेप्शनिस्ट लिंडाने उबेर ड्रायव्हरला फ्रेंच मध्ये समजावले की याला व्यवस्थित सोड. मी विकासचा निरोप घेतला. “जायची ईच्छा होत नाहीये, तू मजा कर” बोलला.
४ वाजले होते, विकास गेला होता.नंतर मी रिसेप्शनला उभा राहून लिंडाशी गप्पा मारू लागलो लिंडा ईराणची होती. चार वर्षा आधी पॅरिसला आली होती तिची मेडिकल सायन्स ची डिग्री इथे व्हॅलिड नव्हती म्हणून तिला नर्स बनता येत नव्हतं. जर्मनीला डिग्री वॅलीड झाली असती आणी पैसे चांगले मिळणार होते पण जर्मन शिकावी लागेल म्हणून ती जायचं नाही म्हणत होती. खुप मेहनत घेऊन फ्रेंच शिकले बोलली. फ्रेंच वर तिचं प्रभुत्व होतं. न्यूरोलॉजी मध्ये ती पॅरिसमध्ये मास्टररेट करत होती. शनिवार रविवार ती रिसेप्शनीस्ट म्हणून काम करायची, त्याचे तिला 2400 युरो महीना मिळायचे. तिने कागद पेन घेऊन मला हिशोब सांगितला. 2400 मधले 400 युरो टॅक्स जायचा. 600 युरो अपार्टमेंट भाडे, ट्रान्सपोर्टेशन मध्ये 200 युरो. खूप कमी पैसे उरतात बोलली. 400 युरो सरकार टॅक्स म्हणून घेते याचा तिला खूप राग होता. खूप संताप करत होती. तिला बोललो की याबद्दल तुम्हाला सुविधा तरी मिळतात. मग आमची गाडी भारताकडे वळाली बरेच विषय निघाले, जेवणखाण ते मुंबई, दिल्ली शहर वगैरे. फारसी नी भारतीय कोणते शब्द सारखे आहेत हे तीने ना मी शोधले जसे कुलूप किल्ली वगैरे. तिने मला शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन माहीत आहेत सांगीतले. ती ख्रिश्चन होती मागच्या वर्षी इराण मध्ये झालेल्या आंदोलनाबद्दलही आम्ही बरंच बोललो त्याबद्दल सांगताना ती मागच्या रूममध्ये झाकून पाहत होती कारण तिथे एक हिजाबवाली स्त्री होती. तिने सांगितलं की मौलवींनी इराणची वाट लावलीय.तिथे मौलवींचं राज्य चालतं. आम्ही खूप विषयांवर गप्पा मारत होतो मला वेळेचं भान नव्हतं. नंतर मी घड्याळ पाहिली तर लक्षात आलं आम्ही तब्बल एक तास गप्पा मारत होतो. मी तिला सांगितलं की आता मला निघायला हवं ती मला बोलली की इथेच थांब, मी कमी करते रेट. पण मी आधीच दहा हजार रुपये भरून दुसरं होस्टेल बुक केलं होतं. त्यामुळे मी थांबू शकत नव्हतो. हे मी तिला सांगितलं, तिला टाटा बाय बाय करून मी निघालो. पोंट बेन्यू नावाच्या बस स्टॉप ला मी बसची वाट पाहत उभा राहिलो. पाच बत्तीसला बस यायची होती पण आलीच नाही, मला वाटलं माझं काहीतरी चुकतंय म्हणून मी एकाला विचारलं तर तो म्हणे होतं असं कधी कधी बस येत नाही. त्यानंतर पुढची बस धरून मी बुक केलेल्या “एन्जॉय होस्टेलला” होस्टेल कडे निघालो. तासाभराने gellite नावाच्या स्टेशनला उतरलो. बोगद्यातून वर आलो. दहा मिनिटे चालल्यावर हॉटेल येणार होते पण बॅग घेऊन चालायचा माझी इच्छा नव्हती. म्हणून मी बस पकडली पण चुकून मी विरुद्ध दिशेने जाणारी बस पकडली हे बस मधल्या एका आजीने लक्षात आणून दिले. तिने ड्रायव्हरला बस थांबवायची विनंती केली पण त्याने ऐकलं नाही आणि पुढच्या स्टॉप लॉस बस थांबवली आधी मला दहा मिनिटे चालावे लागणार होते आता मला पंधरा मिनिटे चालावे लागेल असं गुगल बाबा सांगत होते. शेवटी मी पावसात चालत चालत बॅग ओढत एन्जॉय होस्टेलला पोहोचलो. एन्जॉय होस्टेल हे पॅरीसची धर्मशाळा होतं. स्वस्त आणि मस्त. एका रूममध्ये चार बेड असायचे आणि चार लॉकर. मला चार दिवसासाठी नऊ हजारात हॉटेल मिळाले. माझ्या रूममध्ये एक ब्रिटिश कपल आणि एक आजोबा होते. मी ब्रिटिश कपलशी गप्पा मारल्या त्यांनी मला त्या आजोबांबद्दल सांगितलं की “ही इज नॉट मॅन विथ वर्ड्स”. मला खाली एक खडूस दिसनारे आजोबा बसलेले दिसले होते. रूम हीटर मुळे रूम खूप गरम झाला होता. मला घामाच्या धारा लागल्या होत्या. शेवटी हिटर बंद करून मी कपलच्या परमिशनने खिडकी उघडली. थंडगार हवा आत घुसली. खुप बरं वाटलं. खाली जाऊन मी किचनमध्ये डीश घेऊन थोडा खाकरा खाल्ला. बाहेर जाऊन साडेआठ युरो चा पिझ्झा आणला त्याचे दोन स्लाईस उरले ते टॅग लावून फ्रीजमध्ये ठेवले बाजूच्या दुकानात लाॅकर साठी कुलूप पाहायला गेलो कारण मी आणलेले कुलूप लागत नव्हते. नऊ युरोला होतं मग न घेता आलो आणि रूमवर येऊन झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता उठलो खालच्या बेड वरचे आजोबा नव्हते. बाजूच्या बेड वरचं कपल सामान बांधून निघून गेलं होतं. कुलूप घ्यायला मी बाहेर पडलो. दोन युरो आणि वरून काहीतरी सेंट्सला मिळालं. कुलपाच्या दुकानात एक श्रीलंकन तमिळ मुलगी होती तिच्याशी गप्पा मारल्या. पासपोर्ट आणि लॅपटॉप लॉकर मध्ये ठेवला नी त्या कुलूपाच्या हवाली केला. मिपाकर चित्रगुप्त काकांनी आखून दिलेल्या रस्त्याप्रमाणे मी आधी luxemburg गार्डनला चालत गेलो.
.
गार्डन खूप मोठं आणि सुंदर होतं.
. तिथून पुढे Pantheon ला पोहोचलो.
. तिथून मग काकांनी सांगितलेल्या माओझ नावाच्या फलाफल सँडविच दुकानात गेलो. .दुकानात अफगाणी कामगार होता त्याने आणि मी पाकिस्तानला खूप शिव्या घातल्या. तिथे फलाफल साठी ठेवलेले पदार्थ आपल्या हाताने आपण घ्यायचे होते. पण मी आधी कधीही फलाफल खाल्लं नव्हतं त्यामुळे मी त्यालाच बनवून द्यायला सांगितलं, त्याने मला मस्त फलफल बनवून दिले ते मला पूर्ण गेलं नाही मग मी त्याला उरलेले पॅक करून देण्यास सांगितलं. ते खाऊन मी त्याच्या समोरच्या आईस्क्रीम दुकानात गेलो तिथे एकदम चविष्ट आईस्क्रीम मिळाले.
. नंतर एका एक हजार वर्षे जुन्या Notre dame cathedral चर्चला गेलो ते चर्च २०१९ ला जळाले होते त्यामुळे त्याचे काम चालू होते म्हणून ते बघता आले नाही तिथून मी सेंट उस्ताचे चर्च ला गेलो..
.
.
चर्च खूप भव्य होतं. शांतता होती. काही मूल स्केच काढत होते, त्यातल्या एकाला मी माझं स्केच काढतो का बोललो. तो “नो” बोलला. त्यांच्या मॅडमने गोड स्माईल दिली. तिथून निघालो.
.
मध्ये विकास चा फोन येत होता भारतातून, तो बोलला की त्याला ब्रूटचे स्प्रे हवे आहेत तो घ्यायचं विसरला होता. त्याने मला ते आणण्याची विनंती केली. चर्च जवळच्या मार्केटमध्ये ते मला खूप स्वस्तात मिळाले दोन युरो मध्ये. तिथून मी जवळच्या मॉलला गेलो. तिथे फोन चार्जिंग लावायला लॉकर्स होते मी लोकर मध्ये फोन चार्जिंग लावला. आणि एक तास मॉल भटकत फिरलो. तिथून मी नदी किनाराने फिरत लूव्र म्युसीयम पोहोचलो. मध्ये बर्याच सुंदर ईमारती लागल्या. .
.लूव्रच्या काचेच्या पिरॅमीड समोर खूप फोटो काढले. लूव्र बंदं होतं.
. .
.फ्रेंच राज्यक्रांतीनंतर ज्या चौकात राजा राणीस मारले त्या place de la concorde चौकात मी पोहोचलो. .
.तिथे हरियाणाचे काही मुलं रस्त्यावर काहीतरी पदार्थ विकताना दिसले. . त्यांच्याशी गप्पा मारत उभा राहिलो बोलले की वर्क विसा संपला आहे तरी थांबलोय म्हणून काम मिळत नाही. मी त्यांना बोललो की तुम्हाला पकडत नाहीत पोलिस? ते बोलले की “आम्हाला पकडतात पण आम्ही खोटं नाव सांगून निसटतो.” मी त्यांना विचारलं की तुम्हाला परत भारतात जायचं असेल तर? ते बोलले की देशात आम्ही सहज जाऊ शकतो आम्हाला आपल्या देशात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. पण फक्त परत आम्हाला कधीच फ्रांसमध्ये येता येणार नाही. मी मेट्रो पकडून रूमवर आलो, बरंच फिरणं झाल्यामुळे पाय थोडे दुखत होते, सकाळपासूनपाईच फिरत होतो. माझ्या बेड खालचे आजोबा दिसले, मी त्यांच्याशी गप्पा मारू लागलो मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठले आहात? तर त्यांनी सांगितलं की पॅरीसचा आहे. मग तुम्ही इथे का राहता? त्यांनी सांगितलं की मला घर नाही,बायको मुलंही नाहीत. मी त्यांना विचारलं की तुम्ही लग्न का केलं नाहीत? ते बोलले की “गोड नॉट मेड वुमन फॉर मी” मला त्या आजोबांची दया आली. ते दिवसभर खाली हॉलमध्ये बसून असायचे आणि रात्री येऊन त्यांच्या बेडवर झोपायचे. असं करत ते दिवस ढकलत होते मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटलं, पुढे जास्त बोलवलं नाही. माझ्या बेडवर जाऊन झोपलो. दुसर्या दिवशी वर्साय म्युसीयम जायचे होते. चित्रगूप्त काकांनी एंजोय होस्टेल पासून ते म्युसीयम पर्यंत ट्रॅम, मेट्रो, बस असा रूट आखून दिला होता.

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Feb 2024 - 11:22 am | राजेंद्र मेहेंदळे

हा ही भाग मस्त जमलाय. आता खरी भटकंती सुरु झाली आहे. धुक्यातला आयफेल टॉवर "अफलातून" दिसतोय. पण दुरुन घेतलेल्या एका फोटो मध्ये त्याच्या आसपास सटरफटर सामान ठेवलेले बघुन मजा वाटली. हे म्हणजे कधीतरी येणार्या परदेशी माणसाने आठवण म्हणुन गेट वे ऑफ ईंडियाचे फोटो काढावेत आणि रोज तिथुन जाणार्या स्थानिक माणसाला मात्र तिथले मुन्सिपालिटीचे पत्रे आणि गर्डर्सच दिसावेत तसे काहीतरी. :)

रामचंद्र's picture

27 Feb 2024 - 12:18 pm | रामचंद्र

प्रवासातही 'माणूस' शोधण्याच्या तुमच्या सवयीमुळे लेखन खरंच वाचनीय झाले आहे.

वाटेत सर्वत्र खूप लोकांशी संवाद साधत साधत गेल्याने प्रवास आणि वर्णन अनोखे होत आहे.

श्वेता व्यास's picture

27 Feb 2024 - 1:02 pm | श्वेता व्यास

हा भागदेखील आवडला.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Feb 2024 - 1:09 pm | अमरेंद्र बाहुबली

सर्वांचे आभार.

Bhakti's picture

27 Feb 2024 - 1:48 pm | Bhakti

छान कथन!

नठ्यारा's picture

27 Feb 2024 - 7:10 pm | नठ्यारा

अमरेंद्र बाहुबली,

तुम्हांस माणसांची आवड आहे. त्यामुळे वर्णन ओघवतं आणि प्रत्ययी झालंय.

हॉस्टेलच्या आजोबांची केविलवाणी स्थिती समाजातल्या फेमिनीझम व कामातिरेकाने ( feminism and promiscuity ) झालीये. कौटुंबिक मूल्यांचा सत्यानाश झाल्याने आजोबांना कुटुंब नाही. तशी आपली स्थिती होऊन द्यायची नसेल तर आपण पुरुषांनी फेमिनीझमचा कडाडून विरोध करायला हवा. त्याच वेळी अनैतिक संबंधांपासून कटाक्षाने दूर राहायला हवं.

-नाठाळ नठ्या

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Feb 2024 - 7:37 pm | अमरेंद्र बाहुबली

प्रतिसादाबद्दल आभार भक्तीताई नी नठ्याराजी.

कर्नलतपस्वी's picture

27 Feb 2024 - 8:24 pm | कर्नलतपस्वी

तुमचं इन्टर पर्सनल रिलेशनशीप एस्टॅब्लिश करण्याचे स्कील बघितल्यावर तुमची लाईन चुकली असे नाही वाट्त. बाकी लेख फोटो मस्तच.

मराठीदिन आणी आंग्ल भाषेत प्रतिसाद याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.

मुक्त विहारि's picture

27 Feb 2024 - 9:40 pm | मुक्त विहारि

हा पण भाग मस्त

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Feb 2024 - 9:50 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद कर्नल सागेब ना मुविकाका.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Feb 2024 - 9:51 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद कर्नल साहेब नी मुविकाका.

चित्रगुप्त's picture

28 Feb 2024 - 4:02 am | चित्रगुप्त

खरंच, तुम्ही कुठेही अगदी अल्प काळासाठी जरी गेलात तरी तिथल्या लोकांशी मोकळेपणाने बोलता, तेही समरसून बोलतात हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. खूपच छान. अशा प्रकारचे संवाद माझ्या बाबतीत फार कमी वेळा घडून आलेले आहेत. आता पुन्हा प्रवासाला निघेन तेंव्हा करुन बघीन. तुम्ही 'ट्रोकॅडेरो' बाजूने आयफेल टॉवरला गेलात की त्याविरुद्धच्या दिशेने?

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Feb 2024 - 10:29 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद.ट्रोकॅरेडो माहीत नाही. नदीवरच्या पूलाच्या बाजूने नी त्याच्या विरूध्द बाजूने.

नठ्यारा's picture

29 Feb 2024 - 2:48 am | नठ्यारा

ट्रोकेडेरो म्हणा हो. ट्रोकेरेडो नको ! :----------)

नचिकेत जवखेडकर's picture

29 Feb 2024 - 8:55 am | नचिकेत जवखेडकर

मस्तंच! आयफेल टावर खूप छान दिसतोय धुक्याच्या आडून.

आम्ही २०२० मध्ये लंडन आणि पॅरिस अशी सहल आयोजित केली होती मे महिन्यात. पण नेमकी टाळेबंदी झाली आणि सगळी सहल रद्द करावी लागली. तुमच्यामुळे आता ती काही प्रमाणात तरी होतीये हेही नसे थोडके :)

चित्रगुप्त's picture

30 Mar 2024 - 12:07 am | चित्रगुप्त

पुढला भाग केंव्हा येतोय ?

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Mar 2024 - 8:26 am | अमरेंद्र बाहुबली

लिहीतो लवकरच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Mar 2024 - 1:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

मालिका खंडीत झाली की काय?