भाग १ येथे वाचा
सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगड : भाग 1
आज थोडी उशिराच जाग आली. सूर्य उगवला नसला तरी चांगलाच उजेड झाला होता. ब्रश केला, तोंड वगैरे धुतले. बाकी प्रातःर्विधीसाठी शौचालय वगैरे काही नाही. पाण्याची बाटली भरून माळरानावरच झुडुपांच्या जाळीत जायचे.
सर्व आटोपून चहा घेतला आणि कोकण कडा पाहण्यासाठी निघालो. कडा अगदी बाजूलाच आहे. झोपडीजवळूनच कड्याच्या बाजूने सुरक्षेसाठी लावलेले कठडे दिसत होते.
दोन मिनिटात येथे पोहचलो.
कड्याजवळ पोहचताच अचानक अप्रतिम नजारा समोर येतो. कड्याहून समोरची खोल दरी व बाजूचे सरसोट कडे दिसतात. पायथ्याशी एक गावही दिसते.
आणि नजर पोहचेल तेथपर्यंतचा कोकण परिसर आणि सह्याद्रीचे कडे दिसतात.
मला नावं सांगता येणार नाही पण अनेक सुळके, डोंगरमाथे येथून नजरेस पडतात.
कडेकडेने फेरफटका मारत भरपूर फोटो घेतले.
रात्री माळावर लागलेले तंबू रिकामे झाले होते. माहितीसाठी तंबूंचा फोटो
तासभर फिरून झोपडीत परत आलो. सकुबाई नाश्त्यासाठी पोहे बनवत होती. गरमागरम पोहे खाल्ले.
आता पुढचा कार्यक्रम ठरवायचा होता. आणखी उंचावर जाऊन तारामती शिखर पाहता येणार होते. बालेकिल्लाही पाहता येऊ शकत होता पण दुपारपर्यंत खाली उतरून रात्री नऊ-दहापर्यंत मुंबईला परतणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे उतरतांनाच असणारे गणेश मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि केदारेश्वर गुफा पाहण्याचे ठरले. सर्व ठिकाणे बाजुबाजुलाच आहेत.
तुम्ही व्हा पुढे, मंदिर बघा तोपर्यंत मी येतेच आवरून असे सकुबाईने सांगितल्याने आम्ही पुढे निघालो. जड सामानाच्या पिशव्या सकुबाई घेऊन उतरणार होती.
हरिश्चंद्रेश्वर मंदिर दृष्टीपथात आले.
त्याआधी उजवीकडे वळून थोडेसे पुढे गेल्यावर काही गुफा आणि गणेश मंदिर आहे
गुफा
गुंफेतील गणेशमंदिर
गणेश मंदिराजवळच TrekKamp या नगरच्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरचे श्री. लाहोटी सर भेटले.
त्यांनीच आम्हाला मूर्तीबद्दल सांगतले की ही खूपच वैशिष्ठपूर्ण मूर्ती आहे जिच्यात श्री गणेशाचे लिंग दाखवण्यात आले असून अशा प्रकारची ही संपूर्ण भारतातील एकमेव मूर्ती आहे.
खाली उतरून शिव मंदिराकडे निघालो.
पाण्याचे टाके
बाजूलाच लहानसे मंदिर आहे
मंदिरासमोर सप्ततीर्थ समजले जाणारे पुष्कर्णी कुंड आहे. कुंडाच्या आतील बाजूने चौदा देवळ्या आहेत . सध्या यात मूर्ती नाहीत.
पश्चिमेला ‘हरिश्चंद्रेश्वराचे’ शिवमंदिर आहे. मंदिराला दगडी तटबंदी आहे.
तटबंदीतील प्रवेशद्वार
आतमध्ये शिरताच दिसणारे सुंदर मंदिर
मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्व व पश्चिम दोन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत आणि विशेष म्हणजे दोन्ही बाजूने नंदी देखील आहेत.
शिवलिंग
पश्चिम दरवाजाकडील मंदिराचे खांब
मंदिराची दक्षिणेकडील बाह्य भभिंत व गणेश मूर्ती.
मंदिराची उत्तरेकडील बाजू.
मंदिराच्या बाह्य भिंतींवर आणि प्रागंणात अनेक कोरीव शिल्प आहेत.
मंदिर पाहून बाहेर आलो. थोड्या वेळापूर्वी भेटलेले लाहोटी सर नगरच्या शाळकरी मुलांचा ग्रुप घेऊन आले होते व प्रश्नोत्तर स्वरूपात मंदिराबद्दल छान गोष्टी समजावून सांगत होते.
आम्हीही बाजूला बसून ऐकू लागलो. त्यांच्या बोलण्यात चांगदेव ऋषी व त्यांच्या गुफेच्या उल्लेख आला. आम्ही मंदिर पाहून आलो होतो पण आम्हाला गुफा दिसली नव्हती.
त्यांना माहिती विचारून परत मंदिरात गेलो. मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस असलेल्या गुफेत एक चौथरा आहे. येथे एक पालखी ठेवली आहे ती बाजूला सारून पाहिल्यास कातळात कोरलेली छोटीशी अंधारी खोली दिसते तीच ही गुफा चांगदेव ऋषींनी येथे बसून अनेक वर्षे तपश्चर्या केली असे सांगतात.
मंदिराच्या उत्तरेस असलेल्या घळीत केदारेश्वर गुफा आहे.
गुफेच्या आत पाणी असून पाण्यातच एक चौथरा आहे, त्यावर भव्य शिवलिंग आहे. चौथऱ्याच्या चारही कोपऱ्यावर आधारासाठी छतापर्यंत खांब होते. तीन खांब तुटलेले असले तरी एक शाबूत खांब आणि दोन अर्धवट खांब त्यांचे अस्तित्व दाखवतात. गुंफेतील थंड पाण्यातून याला प्रदक्षिणाही मारता येते.
मंदिर परिसरात अनेक वीरगळ, मूर्ती आढळतात.
दुपारचे बारा वाजायला आले. गड उतरायला सुरुवात केली. वाटेत एके ठिकाणी नदीच्या थंडगार पाण्यात पाय सोडून आराम केला.
आज उतरतांना लिंबू सरबतही मिळाले. कपारीतच दगड रचून त्यामागे सामान ठेवायची खोली होती. संध्याकाळी सगळे सामान आतमध्ये ठेवून नंतर दगड रचून कपार बंद करून जातात. माकडांपासून संरक्षण.
उतरतांना एक शेवटचा फोटो घेतला.
साधारण दोन-सव्वादोन पर्यंत पाचनई गावात येऊन पोहचलो. भास्कर कुटुंबीयांनी जेवणासाठी आग्रह केला पण घरी पोहचण्यास उशीर झाला असता म्हणुन लगेच निघालो. नेटवर्क नसल्याने रस्त्याचा गूगल नकाशा मिळत नव्हता. विचारत विचारत निघालो. येतांना राजूर मार्गे आलो होतो. आताही राजूरलाच जायचे होते पण रस्ता वेगळा होता आणि बराचसा खराबही होता. राजूरला पोहचलो. येथे ठिकठिकाणी कंदी पेढे बनवून विक्री करणारी दुकाने दिसत होती. वाटण्यासाठी म्हणून थोडे पेढे घेतले. येथेच चहापाणी घेतले व भंडारदरा-घोटी-ठाणे मार्गे रात्री दहाला नवी मुंबई गाठली
मला तांत्रिक बाबी सांगता येणार नाहीत पण गाडी ऍटोमॅटिक असल्याने घाटांमध्ये चढावावर गाडी हळू झाली किंवा अगदी थांबली तरी परत वर चढण्यास अजिबात त्रास झाला नाहीं. सर्व प्रवास अगदी आरामात झाला.
खर्च:
* पेट्रोल व टोल - रु.१२००/ प्रत्येकी
* गडावरील चहा, नाश्ता, दोन वेळेचं जेवण, रात्री राहण्याची व्यवस्था - रु.५००/ प्रत्येकी
* इतर खर्च : रु.८००/ प्रत्येकी
* दोन दिवसांचा एकूण खर्च - रु.२५००/- प्रत्येकी
समाप्त
प्रतिक्रिया
2 Jan 2024 - 4:23 am | कंजूस
सुंदर फोटो.
पुन्हा एकदा जायला हवे इथे.
2 Jan 2024 - 11:06 am | Bhakti
अरे वाह! विशाल दादा(लाहोटी) भेटला :) .नगरकरांमध्ये ट्रेकिंगची आवड निर्माण करणार अवलिया आहे तो!
फोटो खुप सुंदर आहेत.
2 Jan 2024 - 12:18 pm | गोरगावलेकर
धन्यवाद! वाटलंच होतं तुम्ही ओळखत असणार. आता आठवले, तुम्ही विशाल दादाबरोबर ट्रेक केला होता.
आपला 'एक धुंद गुलाबी सकाळ!' लेख शोधून परत वाचला. परत तितकीच मजा आली वाचतांना
2 Jan 2024 - 2:11 pm | Bhakti
:)
2 Jan 2024 - 1:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
भटकंती आवडली.
हरीश्चंद्र गडावर ३-४ दिवस राहीले तरीही कमीच पडतील ईतका मोठा घेरा आहे. जायला अनेक वाटा आहेत. पाचनईवरुन, माकडनाळेतुन्,नळीच्या वाटेने, साधले घाटातुन, खिरेश्वर किवा खुबी फाट्यावरुन वगैरे.
गडावर जाणारे बहुतेक लोक गणेश गुहा, केदारेश्वर गुहा,पुष्कर्णी , हरीश्चंद्रेश्वर मंदीर, कोकण कडा वगैरे बघतात. पण चांगदेवांची गुहा प्रथमच समजली. मंगळगंगा नदीचा उगमही आहे थोडा खालच्या बाजुला. रोहीदास्/तारामती शिखरे बघायला बरीच पायपीट करावी लागते. एकंदर बुलंद किल्ला आहे.
2 Jan 2024 - 1:35 pm | कर्नलतपस्वी
तुमच्या लेखावर, मस्त, छान, आवडला व तत्सम प्रतिसाद देण्यास आवडत नाही.
दोन,तीन वाचनाची आवर्तनं झाली की मगच समाधान वाटते.
3 Jan 2024 - 2:32 pm | प्रचेतस
मस्त झालाय हा भागही, फोटो एकदम सुरेख. हा किल्ला सिद्धांचा, चांगदेवांच्या नावाने येथे शिलालेखदेखील आहेत. यावरुन ह्या परिसरात नाथपंथाचे प्राबल्य होते हे दिसून येते. येथील गुहा मात्र थोड्या अधिक प्राचीन असाव्यात.
10 Jan 2024 - 5:13 pm | चौथा कोनाडा
लेखन आणि प्रचि .... एक नंबर !
अप्रतिम !
11 Jan 2024 - 11:29 am | गोरगावलेकर
@कंजूस, राजेंद्र मेहेंदळे, कर्नलतपस्वी, प्रचेतस, चौथा कोनाडा प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार
12 Jan 2024 - 4:10 pm | श्वेता२४
तुमची प्रवास वर्णने अतीशय सविस्तर माहितीसह असल्यामुळे नियोजन करायला अत्यंत उपयुक्त आहेत. हे स्थळ केव्हापासून बकेटलिस्टमध्ये आहे, तुमच्या लेखातील फोटे व माहिती वाचून जायची इच्छा अजूनच प्रबळ झाली.
30 Jan 2024 - 11:42 am | जयंत कुलकर्णी
१९७१ साली केलेल्या ट्रेकची आठवण झाली. आता खूपच सुधारणा झालेली दिसतेय... पण तुमच्या या सुंदर लेखामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
धन्यवाद!
31 Jan 2024 - 1:38 pm | गोरगावलेकर
प्रतिसदाबद्दल धन्यवाद. लेख आवडला हे वाचून छान वाटले.