सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगड : भाग 1

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
25 Dec 2023 - 10:03 am

बऱ्याच वर्षांपासून सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर पहावयाचे मनात होते. श्री.वल्ली यांचा लेख आल्यावर तर इच्छा अजूनच प्रबळ झाली होती. पण योग येत नव्हता. गेल्या बुधवारी मात्र हा योग जुळून आला. आमचे पारिवारिक मित्र सौ.व श्री. मुजावर यांच्यासोबत त्यांचीच गाडी घेऊन गोंदेश्वर आणि हरिश्चंद्र गड पहायचे ठरले.
ठरल्याप्रमाणे पहाटे बरोबर साडे पाचला नव्या मुंबईतून प्रवास सुरु झाला. ठाणे, शहापूर, इगतपुरी मार्गे नऊ वाजता घोटीला पोहचलो. येथे उजवीकडे वळण घेत जुन्या मार्गाने सिन्नरला पोहचायचे होते. भूक लागली होती आणि सकाळच्या औषध गोळ्याही घ्यायची वेळ झाली होती . त्यामुळे वळल्यावर बाजूच्याच ढाब्यावर झणझणीत वडा रस्सा खाल्ला, चहा घेतला आणि पुढे निघालो.

चुकून समृद्धी मार्गाला लागलो पण पुढे एका ठिकाणी रस्ता बंद असल्याने माघारी फिरून परत योग्य रस्ता पकडला आणि अकरा वाजता गोंदेश्वर मंदिराजवळ येऊन पोहचलो.

मध्यावरचे मुख्य शिव मंदिर आणि चार उपदिशाना असलेली गणेश, विष्णू , पार्वती आणि सूर्य यांची चार मंदिरे यामुळे हे शैवपंचायतन म्हणून ओळखले जाते.
पुरातत्त्व खात्यातर्फे लावलेल्या फलकावरील माहिती जशीच्या तशी -
गोंदेश्वर महादेव मंदिर
गोंदेश्वर महादेव दख्खनमधील शैलीच्या मंदिराचे पूर्ण संरक्षित आणि सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर अंदाजे इ. स. १२ व्या शतकाच्या सुरवातीस बांधले गेले. हे पंचायतन मंदिराचे ( चार कोपन्यावर स्थित चार छोट्या मंदिराच्या केंद्रभागी स्थापित मुख्य मंदिर) विलक्षण उदाहरण आहे. पाच मंदिराचा समूह एका ३८ ४२८ मीटर अशा प्रशस्त जोत्यावर उभा असुन येथे मध्यभागी मुख्य शिवमंदिर असुन इतर चार छोटी मंदिरे विष्णु, गणपती, सूर्य आणि पार्वती आदि देवी-देवतांना समर्पित आहेत. मंदिराचा संपूर्ण परिसर चारी बाजूंनी भिंतीनी घेरलेला आहे, जिथे दक्षिण आणि पूर्व दिशेस प्रवेशद्वाराची योजना आहे. मुख्य मंदिरात गर्भगृह, अंतराळ, महामंडप आणि उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना अर्धमंडप अशी योजना आहे. पूर्व दिशेस मुख्य मंदिरापासुन निराळ्या मंडपात बसलेला नंदी आहे. मुख्य मंदिराचे वक्ररेखिय शिखर अनेक छोट्या होत जाणाऱ्या लघु अंग-शिखरांनी बनलेला आहे. महामंडपाचे शिखर शंक्वाकृती आहे.

मंदिराचा बाह्यभाग रामायणातील दृश्ये, देवी, देवता आणि नृत्यमग्न अप्सरांच्या शिल्पांनी सुशोभीत आहे. मुख्य मंदिराच्या भिंतीवर ब्राह्मी, पार्वती, शिव, भैरव मूर्ति प्रमुख आहेत. नंदी मंडपावरील वराह आणि नरसिंह या प्रतिमा उल्लेखनीय आहेत. गर्भगृहातून निघणारे पाणी उत्तर दिशेस असलेल्या एका अलंकृत मकरमुखाच्या माध्यमातून बाहेर निघते. गोंदेश्वर महादेव मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या सममित रुपात आणि भव्य आकारमानातच सामावलेले आहे.

फलकावर सर्वसाधारण माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी वल्लींचा हा लेख जास्त उपयुक्त ठरेल. अत्यंत ओघवत्या भाषेत त्यांनी मंदिराची संपूर्ण ओळख करून दिलेली आहे.

गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात

त्यामुळे फक्त फोटोतुनच हे मंदिर आपल्याला दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

मंदिर दर्शन वेळ

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे असले तरी सध्या रस्त्याच्या बाजूकडील (दक्षिण)
दरवाजानेच प्रवेश आहे.

प्रवेश करताच हे भव्य मंदिर संकुल नजरेस पडते.

मुख्य शिव मंदिराचे सभागृह. सभामंडपाच्या खांबावर अप्रतिम कोरीव काम आहे.

मैथुन शिल्पही दिसतात.

काही मैथुन शिल्प नंदी मंडपावरही दिसतात.

भिंतीवर पौराणिक, रामायणातील प्रसंगही कोरलेले आहेत.

इतर काही शिल्पं

दरवाजाच्या चौकटीवरील सुंदर कोरीव काम

शिवलिंग

शाळुंकेतील पाणी बाहेर जाण्यासाठी असलेले सुंदर मकरमुख.

पार्वती मंदिराच्या पुढे मकरमुखातून पडलेले शाळुंकेचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग असल्याने तो ओलांडून ईशान्येकडील सूर्य मंदिराकडे जाऊ नये असे सुचविण्यात आल्याने मागे वळून परत गणेश मंदिराकडून फेरी मारून पलीकडे जावे लागले. वास्तविक मकरमुखातून पडलेले पाणी एका कुंडात जमा करून पाणी जाण्यासाठी भूमिगत व्यवस्था केली तर ही अडचण दूर होऊ शकते.

नंदी मंडप

चार कोपऱ्यांना असलेली मंदिरं. शिल्प वेगळी असली तरी रचना सारखीच.

पश्चिम बाजूने दिसणारे मंदिर

स्वर्ग मंडप असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार (आतील बाजूने). सध्या बंदच आहे. उत्सव, यात्रेच्या वेळी उघडतात.

स्वर्ग मंडप असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार (बाहेरील बाजूने).

स्वर्ग मंडप. अतिशय सुंदर. नुकतीच मेघालायची सहल केली. तेथल्या पर्यटन मंडळाचे घोषवाक्य आहे "Half Way To Heaven". तेथे अर्ध्या वाटेहुन स्वर्ग पाहण्याचा प्रयत्न केला पण येथे तर प्रत्यक्ष स्वर्ग पाहिल्याचा आभास झाला.

मंदिर पाहून थोडा वेळ पायऱ्यांवर विसावलो

दुपारचे साडे बारा वाजले. आम्ही हरिश्चंद्र गडासाठी सिन्नर-अकोले-राजूर-पाचनई मार्गाने निघालो. वाटेत चहा घेतला. रस्ता जरा लहान असला तरी खूप चांगला आहे. रहदारीही विशेष नव्हती. वातावरण थोडेसे ढगाळ असल्याने ऊन अजिबात जाणवत नव्हते. आजूबाजूचे डोगर, दऱ्या , नद्या, धरणाचे अडलेले पाणी यांचे देखावे असा नयनरम्य प्रवास होता.

पाणवठे

शेती

निळेशार आकाश, आणि विखुरलेले ढग

नदी

उत्तुंग डोंगर माथे

वाटेत एक वनखात्याची चौकी लागली. तेथे गाडीचे रु,१००/- व माणशी रु.३०/- भरून गडाकडे निघालो.

पाचनई गावात येऊन पोहचलो.
गावातले हनुमान मंदिर

पर्यटकांसाठी डॉर्मिटरीचीही व्यवस्था दिसली.

आदल्या दिवशीच पाचनईचे 'हॉटेल कोकणकडा' चे मालक श्री भास्करभाऊ यांचेशी संपर्क साधला होता. त्यांनी माहिती पत्रक, पार्किंगचे लोकेशन इ. ची माहिती पाठवली होती.

त्यानुसार त्यांच्या घरापुढील अंगणात येऊन पोहचलो. स्वत: भास्करभाऊ नव्हते पण घरच्यांनी व्यवस्थित स्वागत केले. फोन लागत नव्हता त्यामुळे आम्ही थोड्याच वेळात पोहचतो आहे व जेवणार आहोत हे सांगू शकलो नव्हतो. पण भूक लागली आहे सांगताच चूल पेटवून पटकन चार भाकरी टाकल्या.

कुतूहल म्हणून मी त्यांच्या घरात फिरूनही आले. जुळ्या मुलांसाठी एकसारखे कपडे आपण नेहमी बघतो इथे दिड वर्षाच्या मुलींसाठी दोन एकसारखे झोके बांधलेले दिसले.

पिठले तयारच होते. पिठलं भाकरी खाल्ली. मिळालेल्या वेळात फोन चार्ज करून घेतले . (नवीन फोन गाडीत असलेल्या चार्जरवर चार्ज होत नव्हता). आता पुढील २४ तास वीज नसल्याने फोन चार्ज करता येणार नव्हता तसेच नेटवर्कही असणार नव्हते. पण फोटोंसाठी फोन वापरावाच लागणार होता तो मात्र जपून. मोजकेच सामान बरोबर घेतले. तरी सुद्धा पाठीवरच्या पिशव्यांव्यतिरिक्त सतरंजी, स्वतःचे पांघरून वगैरे अशा दोन तीन पिशव्या घेऊन गड चढणे आम्हाला कठीण होते. पण सकुबाईने सर्व सामान उचलले आणि आमची काळजी मिटली. आमचा वाटाड्याही तीच होती आणि गडावर आमची सर्व व्यवस्थाही तीच पाहणार होती.

चढाईला सुरुवात करता करता चार वाजले.

प्रवेशद्वार

अजून ताज्या दमाचे असल्याने चढाई सोपी वाटत होती.

आता मात्र थोडा दम लागायला लागला

सखुबाई मात्र खांद्यावर, पाठीवर पिशव्या लटकावून, डोक्यावरच्या पिशवीचा तोल सांभाळत झरझर चालत होती आणि काही अंतर पुढे जाऊन परत आमची वाट बघत थांबत होती.

रस्ता कठीण होत चालला.

हा तर अगदीच कठीण पण आता शिड्या लावल्याने थोडा सोपा

काही ठिकाणी कठडे आहेत.

कातळावर सुंदर चित्र काढली आहेत.

संध्याकाळ व्हायला लागली . डोंगरमाथ्यांना सोन्याची झळाळी आली.

नदी पार करण्यासाठीअसलेला पूल. सध्या नदीला पाणी नसल्याने खालूनच जाता येते.

एका सपाट भागात पोहचलो


हरिश्चंद्रेश्वर मंदिर टप्प्यात आले

मंदिरापर्यंत पोहचता पोहचता अंधार पडायला सुरुवात झाली. मंदिर उद्या सकाळी परत येतांना बघा. सकूबाईची सूचना आली. आम्हाला वाटले आम्ही पोहचलो पण नाही. आमचा कॅम्प कोंकण कड्यावर होता. मंदिराच्या बाजूनेच कड्याला जायचा मार्ग आहे.

अजून जवळपास एक तासाची चढाई करायची होती. थोड्याच वेळात काळोख झाला. सोबत टॉर्च होते म्हणून बरे. धडपडत कसेबसे मुक्कामी पोहचलो. सकुबाईने पटकन चहाचे आधण चुलीवर चढवले.

आज आठवड्याचा मधला दिवस असल्याने पर्यटक नव्हते. माळावर फक्त दोन तंबू लागलेले दिसत होते. सकुबाईचे हॉटेल म्हणा, घर म्हणा किंवा झोपडी म्हणा जे काही होते ते प्रशस्त होते. तुम्ही म्हटला तर तंबू लावू पण आज गर्दी नाही त्यामुळे घरातच झोपला तरी चालेल असं सांगितल्याने आम्ही घरातच झोपायचे ठरवले.

रात्रीचं जेवण तयार होईपर्यंत थोडं झोपडीच्या बाहेर येऊन बसलो. मस्त गार वारा सुटला होता. जास्त वेळ मात्र बसवले नाही. परत घरात आलो आणि जेवायला बसलो.

दुपारपासून शहरी जीवनाचा संपर्क तुटला आहे. आज केक नाही, महागडे हॉटेल नाही, चमचमीत जेवण नाही, आरामदायी बिछानाही नाही पण आकाशात डोक्यावर अष्टमीचा चंद्र आणि त्याच्यापासून थोडेसेच अंतर राखून गुरुही ढगांच्या पुंजक्यातून डोकावून पाहत आहेत, चंद्राचा मंद शीतल प्रकाश आहे, चुलीवरचे अस्सल ग्रामीण जेवण आहे, झोपायला सारवलेल्या जमिनीवर चटई अंथरलेली आहे यापेक्षा चांगले वातावरण लग्नाचा वाढदिवस साजरा करायला कायअसू शकते.

चला ,आता झोपायला जातो आम्ही. पुन्हा भेटू लवकरच उर्वरित सहलीच्या निमित्ताने. शुभ रात्री!

क्रमशः
भाग २ येथे वाचा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

25 Dec 2023 - 12:19 pm | कर्नलतपस्वी

अप्रतिम चित्रकथा म्हणेन मी.

खुप आवडले.

तुषार काळभोर's picture

26 Dec 2023 - 1:04 pm | तुषार काळभोर

अगदी!

पर्णिका's picture

3 Jan 2024 - 12:11 am | पर्णिका

अप्रतिम चित्रकथा...

अगदी अगदी ! फारच सुंदर स्थान आणि फोटोजही.
पुढील भारतवारीत गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगडला नक्की भेट देणार :)
तुम्हा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ! May you be blessed with many more !

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Dec 2023 - 12:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त सहल किवा ट्रेक झालेला दिसतोय. एकाच लेखात २ लेख वाचायला मिळाले (तुमचा आणि प्रचेतस सरांचा).

रच्याकने-मी ऐकले होते की आजकाल गडावर राहु देत नाहीत म्हणुन? पण तुम्ही तर राहीलात , शिवाय १-२ तंबूही होते. (की फक्त गुहेत रहायला मनाई आहे?)

कंजूस's picture

25 Dec 2023 - 4:06 pm | कंजूस

प्रथम ३८व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पुढच्या वाटचालीसाठी आणखी शुभेच्छा.

.
इतर साग्रसंगीत सहलींपेक्षाही ही तुमची धाडसी साहसी सहल फारच आवडली. छान फोटो आणि वर्णन.
.....
स्थानिक महिला गाईड आणि सहकारी असे सर्वच डोंगरदऱ्यात होतील तर मुलींचे गटही जाऊ शकतील. शहरी मुलींनाही इतरांची गरज लागणार नाही आणि गावातील कुटुंबाला महिला जोड कमाई देतील.
.....
या वाढत्या वयातही नवनवे करमणुकीचे प्रकार शोधता हे छानच आदर्श ठरतील. वर्ष अखेर किंवा नववर्ष आगमन सोहळा म्हणूनही इतरांनी अजमावण्यासारखं आहे.

नवीन वर्ष असेच सुखाचे समाधानाचे जावो.

मस्तच!गोंदेश्वर फोटो सुंदर आहेत.हरिश्चंद्रगड सखुताई भारीच! खुप काटक चपळ असतात डोंगरावर राहणारे.

प्रचेतस's picture

26 Dec 2023 - 9:17 am | प्रचेतस

अर्रर्रर्र.....!, आपली थोडक्यात चुकामूक झाली म्हणायची. तुम्ही गेलात आणि मी गोंदेश्वर मंदिरात आलो. बुधवारी साधारण साडेबाराच्या आसपास आम्ही तिघे मित्र गोंदेश्वर मंदिर पाहायला आलो होतो. त्याच दिवशी सकाळी ९ च्या आसपास धुळ्यानजीकच्या झोडगे गावातील माणकेश्वराचे भूमिज मंदिर पाहून चांदवड, लासलगाव मार्गे सिन्नरास आलो होतो.

बाकी वर्णन आणि छायाचित्रे सुरेख आहेत. भास्कर आणि त्याचे कुटुंबीय अतिशय आतिथ्यशील आहे. पाचनई मार्गावर पूर्वी रेलिंग वगैरे नव्हते. हा मार्ग अतिशय सुंदर आहे. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.

आणि हो, ३८ व्या लग्नाच्या वर्षापूर्वीच्या तुम्हा उभयतांना खूप सार्‍या शुभेच्छा.

गोरगावलेकर's picture

26 Dec 2023 - 12:20 pm | गोरगावलेकर

अगदीच थोडक्यात चुकामुक झाली आपली. आपल्या तोंडून शिल्प आणि मंदिराची माहिती ऐकायला आवडले असते. आम्ही एक स्थानिक गाईड बोलावला होता पण तो इतरच काही तरी फेकत होता. अमुक बाजूने मंदिर बालाजी सारखे दिसते वगैरे. मूर्ती, शिल्पकलेबद्दल विचारले तर माझा मोबाईल घरी राहिला त्यात सर्व माहिती आहे ती तुम्हाला नंतर पाठवतो असे काहीतरी सांगत होता.

झोडगेचे माणकेश्वर सुंदरच आहे. आमच्या गावी जाण्या-येण्याच्या रस्त्यावर अगदी लागूनच आहे त्यामुळे कधीतरी जाणे होतेच.

बाकी तुम्हाला आठवते की नाही माहित नाही पण आपण पूर्वी भेटलेलो आहोत!

प्रचेतस's picture

26 Dec 2023 - 12:54 pm | प्रचेतस

बाकी तुम्हाला आठवते की नाही माहित नाही पण आपण पूर्वी भेटलेलो आहोत!

हो, वाशी कट्ट्याला आपली भेट झाली होती.

गोरगावलेकर's picture

26 Dec 2023 - 2:14 pm | गोरगावलेकर

या कट्ट्यापर्यंत मिपावर फक्त वाचनमात्र होते. कट्ट्याला अनेक दिग्गजांची भेट झाली. अगदी भारावून गेले होते त्यातच मी नवखी असल्याने बुजल्यासारखे झाले होते. विविध विषयांचे सखोल ज्ञान नसले तरी आजूबाजूला काय दिसते, आपण काय बघतो त्याबद्दल लिहिता येईल येईल असा विचार करून भटकंती विभागात लेखन सुरु केले. मिपाकरांनी सांभाळून घेतले याबद्दल समस्त मिपाकरांची मी आभारी आहे.

गोरगावलेकर's picture

26 Dec 2023 - 12:17 pm | गोरगावलेकर

@ कर्नलतपस्वी:चित्रकथा आवडल्याबद्दल धन्यवाद

@राजेंद्र मेहेंदळे: इतर गडांचे माहित नाही पण येथे खूप जण मुक्काम करतात. शनिवार-रविवार तर जत्राच असते. चार-पाच हजार लोक भेट देतात आणि त्यातले बरेच जण वस्तीला असतात असे समजते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@कंजूस: प्रतिसाद आवडला. येथे बरेचसे स्थानिक सरसावले आहेत व ते उत्तम सेवा देतात. पाचनई गावातील जवळजवळ प्रत्येक कुटुंब गडावर खाद्य पदार्थ, पाणी, तंबू पुरवण्याच्या व्यवसायात आहे.

@ Bhakti : खूप खूप धन्यवाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Dec 2023 - 12:33 pm | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला. कोरोना काळात ह्या मंदीरात गेलथो पण बंदं होतं. सिन्नक ला गेलात तर तिथे महाराष्ट्रातील एकमेव मौल्यवान की काहीतरी खड्यांचं संग्रहालय आहे. तिथेहा जाऊन धडकावे.

मुक्त विहारि's picture

26 Dec 2023 - 12:45 pm | मुक्त विहारि

पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

गोरगावलेकर's picture

2 Jan 2024 - 9:25 am | गोरगावलेकर

@ अमरेंद्र बाहुबली:अभिप्रायाबद्दल धन्यवाद. सिन्नरच्या 'गारगोटी' संग्रहालयाला भेट द्यायचा आमचाही विचार होता पण वेळेअभावी रद्द केला.
@मुक्त विहारि आणि सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार

गोरगावलेकर's picture

11 Jan 2024 - 11:30 am | गोरगावलेकर

@ तुषार काळभोर, पर्णिका प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

छान 👍
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

गोरगावलेकर's picture

19 Jan 2024 - 2:42 pm | गोरगावलेकर

पुढील भाग आलेला आहे

गोरगावलेकर's picture

19 Jan 2024 - 2:43 pm | गोरगावलेकर

कृपया लेखाचे दोन्ही भाग भटकंती विभागात हलवावे